हजारो मुलींची आई नव्या मुलीच्या शोधात ........

मा

यबोलीवरील 'हितगुज २०१२ दिवाळी अंकातील' संवाद विषयी निवेदन वाचले आणि लीला पूनावाला यांचे नाव समोर आले. भारतात एकीकडे स्त्रीभृणहत्येसारखी समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर स्वरूप प्राप्त करत असताना, मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना सर्वार्थानं स्वावलंबी बनवून त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी झटणार्‍या,प्रयत्न करणार्‍या 'लीला पूनावाला फाऊंडेशन' च्या कार्यासंबंधी त्यांची मुलाखत घ्यावी असं वाटलं.
लीला आणि फिरोज पूनावाला म्हणजे फाउंडेशनशी निगडीत असलेल्या मुलींचे, फेलोंचे मॉम आणि डॅड. या नावांना सार्थ करणारं त्या दोघांचं या सगळ्या मुलींशी असलेलं नातं.
मी लीला आणि फिरोज पूनावाला यांना गेल्या चार पाच वर्षांपासून ओळखते. त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ काढून मॉम एकदा माझ्याशी बोलल्या आणि अधिक माहितीसाठी गप्पा मारायला त्यांनी मला ऑफीसमधे बोलावलं. त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून दडपण नव्हते. मनात वेगळाच आनंद होता, पण त्याचबरोबर 'ज्यांना आपण ओळखतो त्यांना त्रयस्थासारखे कसे प्रश्न विचारायचे?' अशी मनात थोडी चलबिचल होती. याच विचारात फिरोज डॅड यांच्या केबिन मध्ये गेले. ’हाय, हॅलो’ झाल्यावर डॅडनी दोन चॉकलेटं दिली. माझ्या चेहर्‍यावरचं ’हे काय?’ असं प्रश्नचिन्ह समजून त्यांनीच आपणहून 'डॅड आपल्या मुलांना चॉकलेट देतात ना? मग गुपचूप खा.’ असं उत्तर दिल्यावर माझ्या मनातली मुलाखतीबद्दलची चलबिचल थांबली आणि संवादाची जागा गप्पांनी घेतली....

लीला पूनावाला फाउंडेशन (LILA) या आपल्या संस्थेची सुरुवात कशी झाली ? कधी झाली ?
१७ वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ मध्ये लीला पूनावाला फाउंडेशनची सुरुवात केली. सर्वसामान्य घरातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून गरीब आणि हुशार मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली.
पूर्वी मी शिकत असताना मला स्वतःला जेव्हा इंजीनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता तेव्हा आमच्या घरची परिस्थिती बेताची होती. हा शिक्षणाचा खर्च पेलवणारा नव्हता म्हणून मी शिष्यवृत्ती मिळवली आणि शिक्षण पूर्ण केले. आपण मोठे झाल्यावर मुलींच्या शिक्षणासाठी काही काम करावं असा ध्यास मी तेव्हाच घेतला.
१९९४ या साली ३६ वर्ष काम केल्यावर निवृत्त झाले आणि माझ्या मनात आले, प्रोविडंट फंड आणि अन्य काही रक्कम मिळणार आहे तर या रकमेचा काहीतरी चांगला उपयोग करावा, म्हणून फाउंडेशनची सुरुवात केली.

लीला पूनावाला फाउंडेशन या आपल्या संस्थेच्या नावामागे काही विशेष अर्थ आहे काय ?
हो, नक्कीच आहे. लीला पूनावाला फाउंडेशन (LILA) , असं संस्थेचं जे नाव आहे त्याचा असा अर्थ आहे की लिडिंग इंडियन लेडीज अहेड (Leading Indian Ladies Ahead). या माझ्या संस्थेतील मुली नेहमी पुढे असाव्यात असं माझं स्वप्न आणि हेच तर ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळेच हे नाव ठेवले आहे आणि आमचे प्रयत्न ही त्याच दिशेने सुरु आहेत जेणेकरून भविष्यात सगळ्या मुली भारतातील यशस्वी महिला म्हणून ओळखल्या जाव्यात.

हा सुरुवातीचा काळ कसा होता आणि यामध्ये तुम्हाला कोणी सहकार्य केले ?
तसे पाहायला गेले तर काळ कठीण होता कारण संस्थेतून कोणाला मदत करावी आणि कशी करावी या संकल्पनेवर काम करताना अनेक सल्ले आले. मुलांना द्या. कारण पुढे मुले नोकरी करतात . मुलीना नको,त्यांचे लग्न झाले तर घरीच बसतात, पालकही शिक्षण पूर्ण होऊ देत नाही. मग पैसे देऊन काय उपयोग असे अनेकांचे मत होते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. आणि माझ्या पतीची मला पूर्ण साथ होती.

या फाउंडेशनचा उद्देश काय आहे ?
सर्व मुलींना शिक्षणाची संधी मिळावी तसेच मुली फक्त सुशिक्षीत नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर दिला गेला आहे. यामुळे शेकडो मुली आज यशाच्या शिखरावर आहेत. देशात तसेच परदेशातही आपली उत्तम कामगिरी पार पडत आहेत.

आपल्या फाउंडेशनतर्फे जी शिष्यवृत्ती दिली जाते त्याबद्दल अधिक काही सांगू शकाल का ?
पुणे जिल्ह्यातील गरीब व मध्यम वर्गातील हुशार मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. पहिल्यांदा फक्त उच्च शिक्षणासाठी दिली जात असे. हळुहळू फाउंडेशनचा विस्तार होत गेला. म्हणून पदवी आणि पदविका यांसाठी शिष्यवृत्ती सुरु केली. लहान मुलींना याचा लाभ मिळावा म्हणून आम्ही मागील वर्षापासून शाळेतील मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. सातवी ते बारावीपर्यतचे मुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तक घेतले जाते. या दरम्यान त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च,गणवेष व अन्य खर्च केला जातो. मुलींना शाळेसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आर्थिक मदतीसह इतर क्लासेस, आरोग्य, समुपदेशन असे उपक्रम राबविले जातात. मोठ्या मुलींना आर्थिक मदत केली जाते. त्यामधून त्यांचे कॉलेजचे शुल्क भरले जाते. सर्व शाखा व क्षेत्रांतील मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. यामध्ये अगदी कला शाखेतील संगीत, नृत्य, असो की नर्सिंग, बी.एड., अभियांत्रिकी, फिजोथेरपी या कोर्सेससाठी शिष्यवृत्ती दिली जाते.तसेच वाणिज्य ,विज्ञान शाखेतील मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. यात शाखा महत्त्वाची नाही,त्या मुलीची जिद्द पहिली जाते. काही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना परदेशी विद्यापिठात प्रवेश मिळतो.पण आर्थिक अडचणींमुळे त्यांचे परदेशी विद्यापीठाचे स्वप्न अपुरे राहते. यामुळे आम्ही अशा मुलींना सहकार्य करतो. मग त्यांना एक लाखापर्यंत रक्कम असेल तरीही दिली जाते. आजपर्यंत १३३१ मुलींना २०३२ शिष्यवृती दिल्या आहेत. काही मुलींना दुसऱ्या वर्षीही शिष्यवृत्ती दिली जाते. कारण त्यांचे शिक्षण आर्थिक कारणांनी कुठे थांबू नये, हा या मागे उद्देश आहे. अभियांत्रिकी, फिजीओथेरपी अशा शाखांचा एका वर्षाचा मोठा खर्च पाहता त्या मुलींना पुन्हा शिष्यवृत्ती मिळते.

शाळा प्रोजेक्ट नेमका काय आहे?
सुरुवातीला पुण्यातील सहा शाळांमध्ये सुरु झाला आहे. त्यामध्ये कॅम्प एज्युकेशन हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, डॉ. कलमाडी हायस्कूल, सेंट क्लेयर कॉन्वेंट स्कूल, सी. ई. एस. उत्कर्ष हायस्कूल, गावडेवाडी हायस्कूल सुरु झाली आहे. यामुळे खेडेगावातील मुलींनाही शहरातील मुलींसारखे शिक्षण, अन्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या गावातील मुलीचा उच्च शिक्षणाचा आणि प्रगती मार्ग मोकळा झाला आहे. गावाच्या शाळेतील मुलीसाठी शौचालय बांधण्याचे काम सुरु केले. शाळेत मुलीना न पाठवण्याची अनेक कारणं असतात ते सोडवण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने समुपदेशकाची नेमणूक केली आहे, अश्या पद्धतीने शाळा प्रोजेक्ट चांगला सुरु आहे.

शिष्यवृत्ती व्यतिरिक्त फाउंडेशनकडून मुलींसाठी कोणकोणते उपक्रम राबविले जातात ?
मुलींसाठी विविध उपक्रम राबविले जातात. हळुहळू फाउंडेशनच्या कामाचा विस्तार वाढत आहे. कारण आम्ही पाहिले की, मुलींना आर्थिक मदतीसोबत स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त पदवी नाहीतर कलागुण आवश्यक झाले आहेत. यामुळे वारली पेंटिंग, व्यक्तिमत्त्व विकास, फोटोग्राफी, डान्स क्लास असे विविध उपक्रम राबविले जातात. यामुळे आमच्या लक्षात आले की आपल्या मुली इंग्लिशमध्ये कमी पडत आहेत. त्यासाठी स्पोकन इंग्लिश क्लास सुरु केला त्याचा अनेक जणींनी लाभ घेतला. आज एका वर्षात बावीस कार्यक्रम राबविले जातात. हे कार्यक्रम तीन तारांकित किंवा चार तारांकित हॉटेलमध्ये होतात. त्यावेळी ३०ते ५० मुली उपस्थित असतात. यामुळे खर्चात भर पडते. परंतु मुलींना चांगले वातावरण मिळावे व विभिन्न खाद्यपदार्थ व संस्कृतीची ओळख व्हावी अशी भावना आहे. त्यांना देश विदेशाची माहिती मिळावी यासाठी उपक्रम राबवितो.

परदेशाविषयी बोललात यासाठी काही विशेष उपक्रम करता का?
सर्वसामान्य मुलीला सातासमुद्रापारचे जग पाहता यावे,त्यांना इतर संस्कृती, जीवनमान विविध गोष्टींची माहिती मिळावी म्हणून पीस अँबॅसडर म्हणजे शांतीदूत या कार्यक्रमाची आखणी केली. मुलींना एकटे कसे पाठवणार म्हणून आम्ही दोघे सोबत जातो. दरवर्षी १४ मुलींना लंडन येथील आशा सेंटर मध्ये प्रशिक्षणाची संधी मिळते. त्याच बरोबर त्यांना संस्कृती, जीवनमान, खाद्यपदार्थ, तिकडची इंग्लिश भाषा अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. परत आल्यावर या मुली समाजासाठी सामाजिक उपक्रम राबवितात. खेळणी वाटप, वृद्धांसाठी मनोरंजन, अंध शाळेला मदत यातून त्या समाजामध्ये आनंद पसरवितात व लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. हे तर मला अपेक्षित आहे की माझ्या मुलीने समाजहिताचे काम करावे. या पीस अँबॅसडर मुलींनी तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे ’समागम’. यामध्ये ज्या मुली परदेशी गेल्या होत्या. त्या मुली पुढच्या वर्षीच्या मुलींसाठी फंड गोळा करतात. यामध्ये व्यावसायिकरित्या आपली कला सादर केली जाते. गायन, वादन,नृत्य, नाटक सादर केले जाते.

म्हणजे ही मुलींकडून केलेली परतफेड म्हणावी का?
तसे म्हणता येईल.पण काहीजणी आपल्या करियरमध्ये चांगल्या यशस्वी आहेत त्या आर्थिक स्वरुपातही मदत करतात.

काही यशस्वी मुलींची नावं सांगाल?
कोणाचे नाव सांगू? अनेक आहेत. ज्योती दळवी आता न्यूयॉर्कला प्रोफेसर आहे. तिची झालेली प्रगती पाहून खूप समाधान होते. तसेच अभिनेत्री देविका दफ्तरदार ही लीला फेलो आहे हे सांगताना अभिमान वाटतो. अशी अनेक उदाहरणं आहेत.

या कामाची सरकार व समाजाकडून कशी दाखल घेतली आहे ? कामामुळे कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?
सामाजिक कामाची खूप दाखल घेतली जाते. या कार्याची दाखल घेताना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला तर स्वीडनचेपोलर स्टार अ‍ॅवार्ड मिळाले आहे. तसेच हिंद गुरव, बेस्ट लेडी एक्झीक्यूटिव्ह, इंदिरा गांधी प्रियदर्शनी अशी मोठी यादी तयार होईल. स्वीडनचा पोलर स्टार अ‍ॅवार्ड हा पुरस्कार फक्त त्या देशातील पुरुषांना दिला जातो. परंतु मी स्वीडीश कंपनीत कामाला होते म्हणून हा पुरस्कार दिला अजून काय हवं.संस्थेला मान्यता मिळाली तो देखील एक आनंदाचा क्षण होता आणि जेव्हा एखादी लीला फेलो येते आणि सांगते ’मॉम,मला दहा लाख पॅकेज मिळाले’ हे ऐकून खूप आनंद होतो. हाही एक आनंद होतो की या देशाला एक हजारपेक्षा जास्त सुशिक्षीत मनुष्यबळ मी देऊ शकले, पुढेही देत राहीन.प्रत्येक गरजू मुलीपर्यंत मला पोहोचता यावे अशी अपेक्षा आहे व जास्तीजास्त मुलींची मी आई व्हावे ही इच्छा आहे.

लीला पूनावाला यांना भेटल्यावर वयाच्या मानाने त्या किती काम करतात याचा अंदाज लावणे कठीण आहे, फाउंडेशनचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना त्या उत्साहाने आणि नव्या उमेदीने नवनवीन उपक्रम हाती घेत आहेत. मुलींच्या शिक्षणाबरोबर त्यांना या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वसाने उभे राहता यावे यासाठी कळकळीनं कार्य करणार्‍या लीला पूनावाला म्हणजेच मॉम पाहिल्या की मनात एकच विचार रेंगाळतो ... हजारो मुलींची आई अजूनही नव्या मुलींच्या शोधात आहे !

- प्रयागा होगे

प्रतिसाद

वाचले हे सांगण्यासाठी ही पोच. लिहीत रहा. :-)

उत्तम माहिती व लेख. त्यांच्याशी संपर्क साधायला आवडेल. साबण, उदबत्ती, डिओ बनविणे हे उद्योग मुलींना शिकवण्यासारखे आहेत असे मला नेहमी वाट्ते. धन्यवाद प्रयागा.

मस्त मुलाखत.

आवडला परिचय ..
मला माहिती नव्हती या संस्थेबद्दल.

LILA foundation बद्दल आधीपासून माहित होतेच..

>>हजारो मुलींची आई अजूनही नव्या मुलींच्या शोधात आहे !
अगदी समर्पक... ईथे अजून ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!