'मॅ
जिकल रिअॅलिझम' किंवा जादुई वास्तववाद म्हणजे थोडक्यात कथानकात तर्क्य आणि अतर्क्य गोष्टींची बेमालूम सांगड घालणे, असं म्हणता येईल. अतर्क्य गोष्टी म्हणजे निव्वळ कल्पनेच्या अमर्यादित भरार्या नव्हेत, तर 'प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट' ह्या कल्पित विरोधाभासाचा वास्तवात रुतलेला पाया. दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी कथानकाच्या ओघात एकत्र आणून त्यांच्या विरोधाभासातून कथानक पुढे नेणं, हा या शैलीचा मुख्य उद्देश म्हणता येईल.
आधुनिक साहित्यात काफ्काच्या 'मेटामॉर्फॉसिस' ह्या लघुकादंबरीपासून हा साहित्यप्रकार सुरू झाला, असं मानलं जातं. ग्रेगर सॅम्सा हा मध्यमवर्गीय कारकून एका सकाळी जागा होतो, तोच मुळी आपलं एका कीटकात रूपांतर होतं आहे, या जाणिवेने. ही अद्भुत घटना कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा पार्श्वभूमीशिवाय पहिल्याच वाक्यात अगदी सहजपणे सांगितली जाते. आधुनिक काळात माणसाचं यंत्रवत, किडामुंगीसारखं झालेलं आयुष्य ("मी एक मुंगी, हा एक मुंगी" - मर्ढेकर) आणि आर्थिकदृष्ट्या निरुपयोगी व समाजमान्य अशा 'नॉर्मल' साच्यांत न बसणार्या एखाद्या व्यक्तीचं अगदी जवळच्या कुटुंबीयांनाही नकोसं झालेलं अस्तित्व - ह्या मुख्य संकल्पना मांडताना काफ्काने वास्तवाशी नाळ जोडलेल्या फँटसीचा आधार घेतला. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी, पहिलं महायुद्ध सुरू व्हायच्या आधी लिहिली गेलेली ही कथा/लघुकादंबरी आणि 'द ट्रायल'सारख्या इतर कथा, काफ्काचं द्रष्टेपण दाखवून देतात. त्याच्या शैलीला उद्देशून काफ्काएस्क (Kafkaesque) असा शब्द आता रूढ झाला आहे. (एकविसाव्या शतकातली याचीच विनोदी आवृत्ती येथे पाहता येईल - http://www.newyorker.com/humor/issuecartoons/2012/03/12/cartoons_2012030...)
अर्थात, अद्भुत आणि वास्तवाची सांगड अशा प्रकारे घातली जाणं काही नवीन नाही. जगभरातल्या प्रत्येक प्राचीन संस्कृतीत अशा बोध आणि पुराणकथांचं भांडार उपलब्ध आहे. माणसाला ज्या गोष्टींचा अचंबा वाटतो, भय वाटतं, हर्ष होतो; त्या साधारण सारख्याच असतात. याचंच प्रतिबिंब निरनिराळ्या संस्कृतींतल्या बोधकथांत पडलेलं दिसतं. प्रलयाची कल्पना उत्तर अमेरिकेतल्या रेड इंडियन जमातींपासून ते सुमेरियन संस्कृतीतल्या गिल्गामेशच्या मिथकापर्यंत, हिब्रू बायबलपासून ते हिंदू पुराणांपर्यंत दिसून येते. इहलोक आणि परलोक यांच्या सीमेवर असणारं एखादं कैलास पर्वतासारखं प्रतीक (Axis mundi) हेही अनेक संस्कृतींत आढळणारं एक सामयिक मिथक. (कम्पॅरॅटिव्ह मायथॉलॉजी या विषयावरची, विशेषतः जोसेफ कॅम्पबेल यांची पुस्तकं ह्या संदर्भात वाचनीय आहेत.) सत्य आणि कल्पिताची ही सरमिसळ, त्या दोघांमधली गूढ सीमारेषा याबद्दलच्या सनातन आकर्षणाला मॅजिकल रिअॅलिझम शैली आवाहन करते, पण ती सर्वस्वी निराळ्या अशा आजच्या वर्तमानाच्या संदर्भात.
प्राचीन संस्कृतीतील बोधकथा आणि युरोपातला आधुनिक तर्कनिष्ठ वास्तववाद अशा दोन सर्वस्वी भिन्न प्रवाहांचा जिथे प्रभाव आहे, त्या लॅटिन अमेरिकन साहित्यात काफ्काने सुरू केलेली जादुई वास्तववादाची परंपरा फोफावली. गॅब्रिएल गार्सिया मार्केस हा या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा बिनीचा शिलेदार. निव्वळ काफ्काच्या शैलीने प्रभावित न होता, तिला स्थानिक संदर्भांचं, घटनांचं, मिथकांचं परिमाण देत आपली स्वतंत्र प्रतिसृष्टी आणि परंपरा निर्माण करण्याचं श्रेय मार्केसला जातं. "माझी आजी लहानपणी जशा अद्भुत गोष्टी अगदी सहज सुरात सांगायची, तसं लिहिताही येऊ शकतं हे मला काफ्काची 'मेटामॉर्फसिस' ही कथा वाचून जाणवलं"; अशा शब्दांत मार्केसने आपल्या ह्या दोन सर्वस्वी भिन्न अशा प्रेरणास्रोतांचं ऋण मान्य केलं आहे. अतिशय गाजलेलं 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'च नव्हे तर, 'अ क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड' सारख्या पुस्तकांतही मार्केसची ही संमिश्र तरीही स्वतंत्र शैली दिसून येते.
मार्केस आणि काफ्का यांच्या शैलीतला फरक केवळ स्थानिक घटनांचे संदर्भ आणि पुराणकथांतील दाखल्यांचा सढळ वापर एवढ्यापुरताच मर्यादित नाही. काफ्काच्या कथांत समाज आणि कुटुंबीयांपासून तुटलेल्या व्यक्तीचा परात्मभाव अधिक प्रकर्षाने जाणवतो. मार्केसच्या 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' मध्ये ज्या ब्वेन्दिया कुटुंबाच्या सात पिढ्यांची कहाणी रेखाटली आहे, त्यातले वेगवेगळे सदस्य जरी ज्ञात जगापासून (होजे अर्कादियो ब्वेन्दियाने मकाँडो गावाचा पाया अतिदुर्गम भागात घालणे) किंवा आजूबाजूला घडणार्या गोष्टींपासून (कर्नल ऑरेलियानो ब्वेन्दियाने सोनारकामात शोधलेला एकांतवास) सुटकेच्या धडपडीत असले; तरी अखेरीस त्यांचा त्यांच्या कुटुंबाशी वा आसपासच्या घटनांशी संबंध पूर्णपणे तुटत नाही. उलट त्या कथानकाचा आणि त्या त्या व्यक्तिरेखेचा अविभाज्य भाग बनून जातात. "A person does not belong to a place until there is someone dead under the ground." हे कादंबरीच्या सुरुवातीलाच येणारं वाक्य काय किंवा शंभर वर्षांच्या एकांतवासाच्या शापाची अंतिमता सांगणारे कादंबरीचे भरतवाक्य काय - दोन्ही याच परस्परसंबंधाकडे निर्देश करतात.
काफ्काची शैली मिताक्षरी आणि त्याची तत्त्वज्ञानाबद्दलची भूमिका अस्तित्ववादी (Existentialist) आहे. तर दुसरीकडे 'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड'मध्ये अनेक पिढ्यांची कहाणी सांगताना कादंबरी बर्याचदा संथही होते. काफ्काच्या शैलीशी पूर्णपणे विसंगत, मात्र भारतीय वाचकाला परिचित वाटतील अशा चक्रनेमिक्रमेण आणि काही प्रमाणात कर्मविपाक या संकल्पनाही मार्केसच्या लेखनात डोकावतात.
मार्केसच्या ह्या 'देशीवादी' परंपरेचा मॅजिकल रिअॅलिझमचा वारसा पुढे नेणार्या लेखकांवर - विशेषतः तिसर्या जगातील लेखकांवर - अधिक प्रभाव पडलेला दिसून येतो. यात सलमान रश्दीपासून नोबेल पारितोषिकविजेत्या मो यानपर्यंत; नायजेरियन लेखक बेन ऑक्रीपासून चिली देशातल्या इझाबेल आयेंदेपर्यंत अनेक लेखक आले. गेल्या पन्नास वर्षांत मॅजिकल रिअॅलिझम शैलीत झालेलं बहुतांश लिखाण हे, काफ्काचं ऋण मान्य करूनही (मुराकामीने आपल्या एका कादंबरीला 'काफ्का ऑन द शोअर' असं दिलेलं नाव हे एक अगदी ढोबळ उदाहरण), मार्केसच्या शैलीशी अधिक जवळचे नाते सांगणारे आहे.
सरसकट सर्वसामान्यीकरणाचा आरोप मान्य करूनही, यामागची काही ढोबळ कारणं शोधता येऊ शकतात. तिसर्या जगात जादुई, फँटॅस्टिक गोष्टींचं अस्तित्व अधिक मोकळेपणाने स्वीकारलं जातं आणि परिणामी त्याच परिचित गोष्टींचं थोडं निराळं स्वरूप दाखवणारा 'मॅजिकल रिअॅलिझम' अधिक मोकळेपणाने त्या देशांत स्वीकारला गेला; अशी एक शक्यता बर्याचदा व्यक्त केली जाते. मात्र मला वाटतं, ह्यापेक्षाही तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा ह्या शैलीच्या स्वीकारामागे मोठा वाटा असावा.
'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' मार्केसने साठच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात लिहायला घेतली. तिसर्या जगातील देशांच्या दृष्टीने हा काळ मोठा खळबळीचा होता, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आफ्रिकेतले आणि आशिया खंडातले अनेक देश नुकतेच स्वतंत्र झाले होते. मात्र त्याबरोबरच दुष्काळ, फाळणी, अंतर्गत दुफळ्या, दोन महासत्तांच्या साठमारीत फक्त प्यादी बनून राहिलेली सरकारं, सैन्यांचा उठाव, साम्यवादाचे आकर्षण आणि त्याचवेळी जगड्व्याळ बहुराष्ट्रीय कंपन्यांचा छुपा वसाहतवाद यांसारख्या अनेक कारणांनी समाजजीवन ढवळून निघालं होतं.
भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्रे निर्माण होत असताना झालेली रक्तरंजित फाळणी असो ('मिडनाईट्स चिल्ड्रेन' - सलमान रश्दी), सीआयएच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेल्या पिनोशेची चिलीतली जुलमी राजवट असो ('द हाऊस ऑफ द स्पिरिट्स' - इझाबेल आयेंदे), अर्जेंटिनातल्या कुप्रसिद्ध डर्टी वॉरची अमेरिकन लेखकाने घेतलेली दखल असो ('इमॅजिनिंग अर्जेंटिना' - लॉरेन्स थॉर्न्टन) किंवा जालियनवाला बागेची आठवण करून देणार्या कोलंबियातल्या युनायटेड फ्रुट कंपनीच्या हजारो कामगारांच्या हत्याकांडाचे 'बनाना प्लँटेशन मासएकर'चे मार्केसच्या लेखनात उमटलेले गडद पडसाद असोत - प्रत्यक्ष परिस्थितीच इतकी भयावह होती की ती या जगात अस्तित्वात असणे शक्यच नाही; केवळ कल्पनेतच असलं भीषण वास्तव शक्य आहे असं वाटायची पाळी यावी. 'मॅजिकल रिअॅलिझम म्हणजे केवळ वास्तवाला जादुई दृष्टीची दिलेली जोड नव्हे, तर अशी वास्तव परिस्थिती जी निव्वळ तिच्या स्वतःच्या अस्तित्वानेच अद्भुत ठरावी' ("Magical realism is not a realism to be transfigured by the supplement of a magical perspective, but a reality which is already in and of itself magical or fantastic") अशा शब्दांत ज्येष्ठ समीक्षक फ्रेडरिक जेम्सनने या शैलीचं वर्णन केलं आहे - ते इथे सार्थ ठरावं.
दोन विभिन्न संस्कृतींच्या किंवा जीवनशैलींच्या संगमावर किंवा संघर्षक्षेत्रांवर जे देश आहेत, तिथे स्वाभाविकपणे अशी परिस्थिती वारंवार उद्भवणं नवीन नाही. मार्केस आणि रश्दीबरोबरच, दोन खंड आणि संस्कृती व्यापणार्या तुर्कस्थानच्या ओरहान पामुकच्या लेखनातही या शैलीचे ठसे आढळतात.
ह्या बाह्य, ठळक घटकांबरोबरच हजारो वर्षांच्या रूढी आणि परंपरांच्या ओझ्यामुळे होणारी कुचंबणा, या भूतकाळाच्या ओझ्यासोबतच जोडीला आलेला पोस्ट-कलोनियल हँगओव्हर आणि वाढत्या अपरिहार्यतेने सामोरे येणारे जागतिकीकरण ह्यांचे द्वंद्व व्यक्त करण्यासाठीही मॅजिकल रिअॅलिझमचा वापर झाला आहे. लॉरा इस्किवेल' ह्या मेक्सिकन लेखिकेचे चक्क दर महिन्याला एक पाककृती ह्या पद्धतीने प्रत्येक प्रकरणाची सुरुवात करणारे 'लाईक वॉटर फॉर चॉकलेट' हे पुस्तक याचे उत्तम उदाहरण ठरावे.
नोबेल पारितोषिकविजेत्या जोसे सारामागोपासून पश्चिम आफ्रिकेतल्या तुलनेने अपरिचित लेखकापर्यंत अनेकांनी ह्या जादुई वास्तववादाच्या शैलीत निरनिराळे प्रयोग केले आहेत; संज्ञेत किंवा व्याख्येच्या शाब्दिक कसरतीत अडकून न पडता तिचा परीघ रुंदावण्यात हातभार लावला आहे. प्रथेप्रमाणे मराठी साहित्याच्या नावाने गळा काढायचा म्हणून नव्हे, तर या पार्श्वभूमीवर मराठीतल्या नाव घेण्याजोग्या प्रयत्नांची वानवा अधिक प्रकर्षाने जाणवते.
ब्रिटिशांच्या प्रभावामुळे वास्तववादाकडे असलेला अधिक ओढा असेल किंवा नवीन प्रयत्न करण्याची फारशी इच्छा नसलेला लेखक व/वा वाचकवर्ग हे कारण असेल; पण 'हयवदन' किंवा 'नागमंडल'सारखे प्रयत्न मराठी लिखित साहित्यातही जितक्या प्रमाणात व्हायला हवेत तितके झाले नाहीत, हे खरं आहे. मात्र आजच्या आणि येत्या पिढीतला एक वर्ग अजूनही भारतीय परंपरा, मिथके यांच्याशी नाळ टिकवून असलेला आणि आणि त्याचवेळी बहुभाषक जगाला सामोरे जाणारा आहे, असेल. तेव्हा एकविसाव्या शतकात आपली ओळख शोधताना नवीन जगाचे वास्तव आणि पूर्वसंचित अद्भुताचा ठेवा या मिश्रणातून अस्सल मराठी मातीतली, या जोडपरंपरेला समृद्ध करणारी एखादी साहित्यकृती जन्मास येईल; अशी आशा बाळगणं अवास्तव ठरू नये.
- नंदन होडावडेकर
प्रतिसाद
फारच आवडला लेख.. खरेच
फारच आवडला लेख.. खरेच पंचतंत्र , लोककथा,स्त्रीवाङमय, पुराणकथा अन मिथकांनी समृद्ध अशा या देशात अलिकडे तरी ही वास्तवाची अद्भुतात सरमिसळलेली हाताळणी फारशी झाली नसावी .
इथे मराठीत जी.एं.नी मिथक स्वतंत्रपणे हाताळले, नेमाडे अगदी आत्ता हिंदूमध्येही अद्भुताचा सूर लावत पण वास्तवाचंच कोलाज मांडतात.कदाचित जयवंत दळवी व चिं.त्र्यं. खानोलकरांना हा प्रकार थोडा गवसला होता..
लेख आवडला.
लेख आवडला.
मस्तच. नंदन. सुरेख आणि
मस्तच. नंदन.
सुरेख आणि मुद्देसुद. लेख आवडला आणि पटला.
मार्केझ नीट वाचायला घ्यावा असा मोह झाला हे वाचून.
तुझा व्यासंग आणि जागतिक साहित्याचे वाचन मला नेहमीच अचंबित करते. दरवेळेस तू लिहीलेले काही वाचले की 'बालिष्टर (साहित्याचा) का नाही झालास' असे म्हणावेसे वाटते. ;-)
भारतीताई +१.
(हे ललित या विभागात विशेष वैचारिक लेख हा विभाग नसल्यामुळे यात टाकले असावे मंडळाने. :-) )
नंदन, तुझे हे ललित
नंदन, तुझे हे ललित नेहमीप्रमाणेच छान रसाळ वाटले वाचताना पण शेवटी शेवटी तू जी मराठी साहित्यावर टिका केलीस ती नाही आवडली. आपल्या मराठी साहित्यात जेवढे सुंदर ललित सापडते तेवढे सुंदर ललित मला इतर कुठल्याच भाषेत आढळले नाही.
तू संदर्भ म्हणून दिलेली सगळी साहित्यिक उदाहरणे वाचाविशी वाटत आहेतः
'हयवदन' किंवा 'नागमंडल'सारखे >> हे कुणी लिहिले आहे? मराठी आहे का?
'वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' मार्केसने साठच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात लिहायला घेतली. तिसर्या जगातील देशांच्या दृष्टीने हा काळ मोठा खळबळीचा होता, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आफ्रिकेतले आणि आशिया खंडातले अनेक देश नुकतेच स्वतंत्र झाले होते. मात्र त्याबरोबरच दुष्काळ, फाळणी, अंतर्गत दुफळ्या, दोन महासत्तांच्या साठमारीत फक्त प्यादी बनून राहिलेली सरकारं, सैन्यांचा उठाव, साम्यवादाचे आकर्षण आणि त्याचवेळी जगड्व्याळ बहुराष्ट्रीय कंपन्यांचा छुपा वसाहतवाद यांसारख्या अनेक कारणांनी समाजजीवन ढवळून निघालं होतं.
भारत आणि पाकिस्तान ही दोन नवीन राष्ट्रे निर्माण होत असताना झालेली रक्तरंजित फाळणी असो ('मिडनाईट्स चिल्ड्रेन' - सलमान रश्दी), सीआयएच्या आशीर्वादाने सत्तेवर आलेल्या पिनोशेची चिलीतली जुलमी राजवट असो ('द हाऊस ऑफ द स्पिरिट्स' - इझाबेल आयेंदे), अर्जेंटिनातल्या कुप्रसिद्ध डर्टी वॉरची अमेरिकन लेखकाने घेतलेली दखल असो ('इमॅजिनिंग अर्जेंटिना' - लॉरेन्स थॉर्न्टन) किंवा जालियनवाला बागेची आठवण करून देणार्या कोलंबियातल्या युनायटेड फ्रुट कंपनीच्या हजारो कामगारांच्या हत्याकांडाचे 'बनाना प्लँटेशन मासएकर'चे मार्केसच्या लेखनात उमटलेले गडद पडसाद असोत!
>> ही सगळी पुस्तके वाचायची आहेत.
'लाईक वॉटर फॉर चॉकलेट' >> हेही!
फारच सुंदर लेख. मराठी काय
फारच सुंदर लेख. मराठी काय किंवा इंग्रजी काय, माझं वाचन अगदीच तुटपुंजं आहे. काही छोटेखानी लेख आणि काही अप्रकाशित कविता यांपलीकडे माझ्या लिखाणाची मजल गेली नव्हती. माझे ज्येष्ठ मित्र श्री. मनोहर सप्रे यांच्याशी मैत्री आणि त्यातून आमचा पत्रव्यवहार सुरू झाला. त्यांची 'सांजी' आणि 'रुद्राक्षी' हे पत्र-संग्रहही वाचले. माझी पत्रं वाचून, मी 'काही तरी' लिहिलं पाहीजे हा त्यांचा लकडा सुरू झाला. सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर मलाही वाचन-लेखनाला थोडी फुरसत मिळू लागली होती. मी एक दीर्घकथा म्हणून लिहायला घेतली आणि बघता बघता तिचं रुपांतर एका कादंबरीत झालं [आदिबंध - प्रकाशक प्रफुल्लता, पुणे.]तिचं स्क्रीप्ट वाचून एक मित्र म्हणाला, "मराठीत 'आर्कीटाइप्स'ला आदिबंध म्हणतात. तुला तो अर्थ अभिप्रेत नसावा असं वाटतं." मग मी त्याच्याच शिफारसीवरून आणि गूगलवरून 'आर्कीटाइप्स' बद्दल माहिती घेतली. मला आदिबंध हे भाषांतर काहीसं खटकलं. मग मी त्याबाबतचा खुलासा प्रस्तावनेत करून, ते पुस्तक छापायला दिलं. बर्याच जणांना ते आवडलं. एका मित्रानं विश्राम बेडेकरांच्या 'रणांगण' ची आठवण झाल्याचं सांगीतल्यावरून, मी मुद्दाम 'रणांगण' मिळवून वाचली.
प्रकाशकांच्या आग्रहावरून मी दुसरी कादंबरी - उजवण- लिहिली. तिचा शेवट मी एका फँटसीने केला आहे. तिच्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या - विशेषतः शेवटच्या प्रकरणावर. एका वाचकानं त्याला 'गूगली' म्हटलं. एकानं म्हटलं की, "लिहिता लिहिता कंटाळा आला म्हणून पुस्तकाचा शेवट असा करून टाकला का?" एकानं 'Many Lives, Many Masters' ले. Brian Weiss या पुस्तकाची आठवण दिली. मी त्याचं नावही ऐकलं नसावं याची मला लाज वाटली. मी ते मागवून घेतलं आणि ते वाचून इतका झपाटलो की त्या लेखकाची चारही पुस्तकं वाचून काढली. मार्क्वेस आणि काफ्का हे सप्रेकाकांच्या आवडत्या लेखकांपैकी. त्यांच्याविषयी ते बर्याचदा बोलत. सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी कॉलेजात असताना आस्तित्ववादी आणि परात्मवादी तत्वज्ञानाच्या संदर्भात मी काफ्काचं एक नाटक वाचल्याचं आठवत होतं. काकांनी मला पुन्हा एकदा काफ्का वाचायला लावला. आजच्या वास्तवाच्या संदर्भात मला तो तितकासा relevant वाटला नाही. मला त्याच्यात आणि 'उजवण' मध्ये साम्य आढळेना. [कदाचित मी अद्यापही परात्मवाद आणि आस्तित्ववाद यांचे चष्मे लावून त्याच्याकडे पहात होतो.]आता तुमचा लेख वाचल्यानंतर मी पुन्हा एकदा काफ्का वाचेन आणि मार्क्वेसही. कदाचित काही साम्य-स्थळं लक्षात येतीलही. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे, जागतिक स्तरावरच्या ख्यातकिर्त लेखकांचं लेखन डोळ्याखालून जाईल!
एवढी मोठी आणि आत्मचरित्रात्मक प्रतिक्रिया देण्याचं कारण म्हणजे 'मॅजिकल रिअॅलिझम' ही संज्ञा मला तुमच्या लेखामुळे प्रथमच समजली. ही एक लेखन-शैली असू शकते याचाही शोध लागला!
समीक्षकांच्या [म्हणजेच प्राध्यापकी थाटाच्या आणि कंटाळवाण्या] भाषेत न लिहिल्यामुळे तुमचा लेख वाचून एका नव्या आणि चांगल्या विषयाची ओळख झाली. त्याबद्दल शतशः धन्यवाद!
जाता जाता, दोन प्रश्न."तुम्ही मायबोलीवर का लिहित नाही? " आणि " तुमचा ब्लॉग आहे का?" मला तुमचं लेखन वाचायला आवडेल.
-बापू.
सुरेख लेख. मार्केस बर्याच
सुरेख लेख. मार्केस बर्याच दिवसांपासून यादीत आहे, त्याला प्रमोशन द्यायला हवं.
मात्र आमच्या लाडक्या मुराकामीबद्दल एकच वाक्य पाहून अंमळ खट्टू व्हायला झालं. ;)
बापू, नंदनचा ब्लॉग इथे आहे.
http://marathisahitya.blogspot.in/
छान लेख. तेव्हा एकविसाव्या
छान लेख.
तेव्हा एकविसाव्या शतकात आपली ओळख शोधताना नवीन जगाचे वास्तव आणि पूर्वसंचित अद्भुताचा ठेवा या मिश्रणातून अस्सल मराठी मातीतली, या जोडपरंपरेला समृद्ध करणारी एखादी साहित्यकृती जन्मास येईल; अशी आशा बाळगणं अवास्तव ठरू नये.
>>>> आमेन!
तुझे सर्वच लेख अगदी
तुझे सर्वच लेख अगदी अभ्यासपूर्ण असतात. नेहमीप्रमाणेच सुंदर लेख!
अभ्यासपूर्ण लेख, छान
अभ्यासपूर्ण लेख, छान
अभ्यासपूर्ण तरीही अवजड न
अभ्यासपूर्ण तरीही अवजड न झालेला.
रैना+१
अंतर्नाद दिवाळी अंकातला भारत
अंतर्नाद दिवाळी अंकातला भारत सासणे यांचा लेख वाचताना या लेखाची आठवण झाली. 'राहीच्या स्वप्नांचा उलगडा' या त्यांच्या लघुकादंबरीच्या निमित्ताने, कदाचित प्रथमच जाणकारांनी 'जादुई वास्तव' हा शब्दप्रयोग मराठीत केला, असं त्या लेखात सासणे म्हणतात.
एज्युकेशनल!
एज्युकेशनल! :)