संपादकीयsaraswati.png

श्री

गणरायाच्या शुभाशीर्वादाने कार्याला आरंभ करून, आज दिवाळीच्या मंगलमय, चैतन्यमय वातावरणात 'हितगुज २०१२चा दिवाळी अंक' आपणांसारख्या रसिक वाचकांसमोर सादर करताना संपादक मंडळाला अतिशय आनंद होत आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण, मांगल्याचा उत्सव तर दिवाळी अंक हा वाङमयाचा, साहित्याचा महोत्सव!! आज जिकडेतिकडे मराठीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न मांडला जात असताना, मायबोलीसारख्या संकेतस्थळावर, मराठी माणसाची नव्हे, तर अस्सल मराठी मनाची ओळख दर्शविणारा 'दिवाळी अंक' गेली १२ वर्षे सातत्याने प्रकाशित होत आहे. मराठी साहित्याच्या दिंडीतले एक लहानसे पुढचे पाऊल म्हणजे 'हितगुज'चा हा दिवाळी अंक!

या वर्षीच्या अंकात, लेखकांच्या कल्पनाशक्तीला, अनुभवांना, रसिकतेला रुचतील अशा उत्स्फूर्तपणे केलेल्या लिखाणाचा समावेश आहे. त्याचबरोबर ॠतू, छंद आणि तंत्रज्ञान या आपल्या आयुष्यात जाणता-अजाणता एक कोपरा निर्माण करणार्‍या संकल्पनांचा वेध घेऊन अंकाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न संपादक मंडळाने केला आहे.

निसर्गाचे आणि माणसाचे नाते जितके जुने तितकेच ते नित्यनूतनही! या बदलणार्‍या निसर्गाचा कळत-नकळत आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, त्यापासून आपण प्रेरणा घेत असतो. निसर्गातल्या ह्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या भावभावनांची, जाणिवांची, नात्यांची, वृत्तीची, बदलणारी स्वरूपे शब्दांतून आणि प्रकाशचित्रांतून मांडण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'ऋतुरंग'.

बदलत्या ऋतूंप्रमाणे बदलणार्‍या मानवी आयुष्याच्या अवस्था आणि या प्रत्येक अवस्थेतून घडणारा एक अखंड प्रवास... या प्रवासात कधी नवनवीन सखेसोयरे भेटतात, तर कधी जुळलेले धागे अचानक तुटतात. पण या प्रवासात आपल्या साथीला सदैव असतो आपण स्वतःच, आपल्या व्यक्तिमत्त्वासहित!

कधी सख्यांची साथ लाभे, अन् कधी भासे उणे
छंद हाचि ध्यास घेऊन, जीवनी या नित्य रमणे

आपलं अस्तित्व अधिकाधिक उत्साहवर्धक करतात, त्याला अनेकविध पैलू पाडतात आणि बघताबघता एक दिवस जे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होऊन आयुष्यभर आपली साथ करतात ते म्हणजे छंद! अशी काही छंदांची आणि छंदवेड्या व्यक्तींची ओळख म्हणजे 'छंदमग्न'!

एकीकडे साधे राहणीमान, मनाची एकाग्रता आणि शांती शोधण्याच्या प्रयत्नात असलेले आपण सगळेच कुठेतरी, बदलत्या, धावत्या, वेगवान जगाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. जे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेले आहे, त्याविषयी आपली काय मते आहेत, त्याचे चांगले-वाईट परिणाम आपल्याला जाणवतात का, दैनंदिन जीवनातून चार घटका उसंत घेऊन आपण त्याबद्दल विचार करतो का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा संपादक मंडळाचा एक प्रयत्न म्हणजे 'तंत्र मैत्र!' जी गोष्ट आपल्या आजूबाजूला कायम दिसते, किंबहुना एका मर्यादेपर्यंत जिने आपल्या आयुष्याचा ताबा घेतला आहे त्या तंत्रज्ञानाबद्दल समाज विचार करत असेल, त्यावर लिहायला उत्सुक असेल ह्या बाबतीत मात्र आमचा होरा साफ चुकला. आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याला इतके व्यापून राहिलं आहे की, 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे 'त्यावर अधिक बोलण्यासारखे काही उरलेच नाही' असा काहीसा आपणा सर्वांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असावा, असे आम्हांला वाटते.

'हितगुज दिवाळी अंका'चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे 'संवाद'. कलागुणांमुळे, विचारांमुळे, कार्यामुळे सर्वसामान्यांपासून वेगळे होत होत एका असामान्य उंचीवर जाऊन पोहोचलेल्या व्यक्तींशी त्यांच्या प्रवासाबद्दल केलेली मनमोकळी बातचीत म्हणजेच 'संवाद'! या अंकात दिलीप प्रभावळकरांसारखा, आपल्या अभिनयातून, लेखणीतून लहानथोरांना जवळचा वाटणारा 'एक खेळिया' आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर, भूतकाळाची ओझी नाकारून वर्तमानात वावरणारा सचिन कुंडलकरसारखा प्रतिभावान दिग्दर्शक, लेखक समजून घ्यायची संधी मिळणार आहे. बालसाहित्याबद्दलचे विचार तळमळीने मांडले आहेत माधुरी पुरंदरे यांनी, तर तंत्रज्ञान या संकल्पनेशी जवळीक साधणार्‍या, परंतु मराठी साहित्यात तुलनेने कमी हाताळल्या गेलेल्या विज्ञानकथांविषयी गप्पा मारल्या आहेत सुबोध जावडेकरांनी. दिवाळी अंकात मनोरंजनाच्या, ज्ञानाच्या जोडीला सामाजिक आस्था आणि बांधिलकीची जाणीव ठेवून 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' आणि 'लीला पूनावाला फाउंडेशन' या संस्थांच्या कार्याची ओळख वाचकांना करून देण्याचा आमचा मानस आहे.

अशा या साहित्याच्या दिंडीत समाविष्ट होणार्‍या वैविध्यपूर्ण लेखनाची, कलाविष्काराची नुसतीच निवड करून न थांबता, त्यावर यथायोग्य संस्कार करून 'संपादित' करण्याची जबाबदारी खूप मोठी आणि आव्हानात्मक होती. कोणत्याही साहित्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार एक वाचक म्हणून आम्हांला नसेलही कदाचित, पण संपादक मंडळ ह्या नात्याने या सर्व साहित्याचा विषय, आशय, मांडणी, शैली, अर्थपूर्णता या विविध कसोट्यांवर जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. या अक्षरदिंडीमध्ये आपल्या साहित्याच्या, कलाकृतीच्या माध्यमातून लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी मोठ्या उत्साहाने आणि आपुलकीने सहभाग घेऊन त्यांचे उत्तम साहित्य अंकासाठी पाठवले. मात्र एखाद्या विषयावर ब्लॉगच्या माध्यमातून केलेले स्फुट लिखाण, फेसबुकवर लिहिलेले स्टॅटस किंवा एखाद्या लेखावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त केलेले मत आणि दिवाळी विशेषांकासाठी केलेले लेखन ह्यां बाबतीत काही ठिकाणी गल्लत झालेली आम्हांला आढळून आली. संपादक मंडळाकडून सुचवलेल्या बदलांचे आणि संस्कारांचे सर्व लेखकांनी अतिशय सकारात्मकरीतीने स्वागत करून आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले ही खूप दिलासा देणारी आणि आमचा आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट आहे.

संपादक मंडळासाठी दिवाळी अंकाच्या सादरीकरणाचा हा प्रवास आज अंक प्रकाशित होण्याच्या टप्प्यावर येऊन पोचला असला, तरी तो संपलेला नक्कीच नाही. ह्या प्रवासात आम्हाला साथ लाभली अंकासाठी आपुलकीने रात्रंदिवस काम करणार्‍या, जिव्हाळ्याने साथ देणार्‍या आणि ज्यांच्या मदतीशिवाय हा अंक पूर्णत्वालाच पोचू शकला नसता अशा जगभर पसरलेल्या मायबोलीकरांची, मित्रमंडळींची, आप्तांची. या दिवाळी अंकाच्या निमित्तानं ही मैत्रीची, आत्मीयतेची नाती अधिक दृढ झाली हा या अंकामुळे आम्हां सर्वांनाच मिळालेला अनमोल ठेवा!

रसिकहो, ही साहित्याची आनंदयात्रा आहे. यात लेखक, कलाकारांचा सहभाग जितका महत्त्वपूर्ण आहे तितकेच रसिक वाचकांचे योगदानही मोलाचे आहे. कोणत्याही भाषेतील सकस, कालातीत साहित्य निर्माण होण्यासाठी तितकाच अभिरुचिसंपन्न, जाणकार वाचकवर्ग असणंही आवश्यक आहे. भाषेच्या, विचारांच्या, साहित्याच्या ह्या दिंडीला तुमच्या जीवनशैलीत सामावून घेऊन ती तशीच पुढे पुढे अखंड चालू ठेवण्याचे नम्र आवाहन आणि विनंती करून, आपल्यासारख्या सुज्ञ, विचारी आणि रसिक वाचकांच्या समर्थ हातांमध्ये आज हा अंक आम्ही मोठ्या आशेने आणि विश्वासाने सुपूर्त करीत आहोत.

'दिंडी ही चालवू अखंडित' असा साहित्याचा गजर करीत हा प्रकाशाचा आणि वाङमयाचा महोत्सव आपणा सर्वांना सुखी, समाधानी आणि समृद्ध करो ही सदिच्छा !

वाढवू वैभव | मायबोली मराठीचे | साहित्य, विज्ञान, संस्कृती | तेज पसरो भास्कराचे ||

श्रेयनामावली

- संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१२

प्रतिसाद

व्वा ! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ ! अप्रतिम.
संपादक मंडळ, अभिनंदन आणि धन्यवाद.
अंक वाचुन झाल्यावर अभिप्राय देईनच.

वॉव! खूप खूप सुरेख आणि देखणा झाला आहे अंक!

अतिशय सुन्दर.