हितगुज दिवाळी अंक २०१२ : तंत्रमैत्र - परिसंवाद

१.

२६ वर्षाच्या अस्मा माहफ़ूझने यूट्यूबवरती केलेल्या एका आवाहनाला सोशल मिडीया, मोबाईल यांच्यामार्फ़त लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे ताहरीर चौक कैरोमध्ये जमा झालेले हजारो लोक. त्यानंतर इजिप्तच्या होस्नी मुबारक यांची राजकीय सत्ता उलथावून टाकली गेली.

२. एका मार्क डग्गन नावाच्या सशस्त्र इसमाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. त्यावरून लंडनच्या एका छोट्या भागात सुरू झालेले लुटालूटीचे, जाळपोळीचे लोण, लंडनजवळच्या इतर शहरात पसरले. ब्लॅकबेरी आणि ट्विटर आणि फेसबूकचा वापर करून ही लुटालूट, जाळपोळ, तोडफोड यांचे सत्र निश्चित केले जात होते असे निदर्शनास आले आहे.

३. भारतात अण्णा हजारे यांचे उपोषण आणि तत्कालीन ’टीम अण्णा’नी सुरू केलेले ’ईंडीया अगेन्स्ट करप्शन’ हे सत्रदेखील फेसबुकावरून खूप पसरले. फेसबुकावरून तयार केलेल्या ’इव्हेंट'ला अनेक मेणबत्तीधारी मुलं/मुली/पुरूष/स्त्रिया गेले. मेणबत्ती धरणे योग्य की अयोग्य हा मुद्दा सोडला तर लोकांना जागे करून एकत्र करणे हे एक मोठ्ठेच काम फेसबुकावरून झाले.

४. सकाळ पेपरमधली एक घटना फेसबुकवरचे काही मजकूर वाचून झालेली तोडफोड.

वरील चारही घटना फेसबूक, किंवा सोशल मिडीया या नवीन तंत्रज्ञानाशी बांधलेल्या आहेत. त्याचे चांगले वाईट परिणाम यातून दिसतात.

५. मोबाईल कंपनीची जाहिरात, पानाच्या टपरी भोवती लोकं उभे असतात. फोन वाजतो तसे, सर्वजण आळीपाळीने आपला फोन तर नाही ना याची खात्री करून घेतात सर्वात शेवटी बाजूने एक चहावाला फोन उचलतो कानाला लावतो आणि विचारतो 'कुटं पाटवू चा?'

६. 'अगं बिल बघितलेस का फोनचे ? नेहेमी येते त्याच्या दुप्पट आले आहे एकदम.'
'अग्गं बाई, हे मी घेतलंच नव्हतं काही फोनवरून. एक एसेमेस आला होता, त्यानंतर एकदम भरमसाठ बिल वाढलंय. काय पण ना हे मोबाइल कंपनीवाले, लोचट आहेत मेले!'

या व अशाच घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. तंत्रज्ञानाचा वाढता वापर कधी सुलभ तर कधी त्रासदायक ठरतो. या विषयावर आम्ही साधू इच्छितो एक संवाद, तुमच्याशी!

मांडा तुमची मते, खालील प्रश्नांच्या अनुषंगाने:

* आजवर तुम्ही वापरलेल्या सर्व आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या उपकरणांमध्ये / प्रणालींमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त उपयुक्त, फायदेशीर ठरलेले, आवडलेले साधन, प्रणाली, तांत्रिक संकल्पना इ. कोणते? त्याचा तुम्हांला नक्की कसा फायदा होतो?

* तंत्रज्ञान / उपकरणे वापरताना दडपण येते का? त्यामुळे मानसिक तणाव जाणवतो का? तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलाशी कशाप्रकारे जुळवून घेता?

* तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एखाद्या कामासाठी लागणारा वेळ, ऊर्जा अथवा श्रम वाचतात का? त्या वाचलेल्या गोष्टींचा दुसरीकडे कुठे (व्यायाम, कुटुंबाबरोबर वेळ चालवणे, वाचन, छंद इत्यादी गोष्टींसाठी) सकारात्मक उपयोग केला जातो का?

* तुमच्या बाबतीत / आजूबाजूला एखादी अशी घटना घडलेली आहे का जिथे तंत्रज्ञानामुळे अडचणीवर मात करता आली? वैद्यकीय शास्त्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज मानवाचे आयुर्मान वाढले आहे असे वाटते का?

* तंत्रज्ञानाच्या होणार्‍या चुकीच्या अथवा अतिरेकी वापराबद्दल तुमचे काय मत आहे? ह्या बाबतीत तुम्ही, तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबियांवर काही मर्यादा घालून घेतल्या आहेत का?

* सोशल नेटवर्किंगने जग जवळ येत आहे असे वाटते की माणसे दुरावत आहेत असे वाटते?

* नैसर्गिक आपत्तींचे संकेत तंत्रज्ञानामुळे ओळखता येऊन ते टाळता येतात पण दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास होत आहे असे तुम्हांला वाटते का?

तुमचे चांगले, बरे-वाईट अनुभव आणि त्यावरची तुमची निरीक्षणे, अनुमाने खाली प्रतिसादात लिहावेत. एकच विनंती अशी की येऊ द्यात फक्त तुमची मते, तुमचे अनुभव. प्रतिसादावर प्रतिसाद देताना कृपया समोरासमोर बोलताना पाळायचे शिष्टाचार येथेही कटाक्षाने पाळावेत. प्रतिसाद देताना लक्षात असूद्या, की ही चर्चा संपादक मंडळाकडून मॉडरेटेड आहे.

लिहा तर मग मंडळी !

-आपले नम्र
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१२

प्रतिसाद

अरे वा!
ही कल्पना सुंदर आहे. दिवाळी अंकातच, वाचकांच्या सहभागाने एक परिसंवाद निर्माण होणार अन मग तो वाचायलाही मजा येणार. कित्येकदा लेखाहून प्रतिसाद भारी असतात मायबोलीवर.
तर अशा या इंटरअ‍ॅक्टिव परिसंवादाचा समावेश तो ही दिवाळी अंकात करायची कल्पना सुचण्यासाठीही तंत्रज्ञानाचाच बेस आहे. हे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झाले आहे.
(नाही तर कल्पना करा, ५० कोरी पानं लावलेला एक दिवाळी अंक लायब्ररीतून फिरतो आहे, अन तुम्ही तुमच्याकडे अंक आल्यावर त्यात प्रतिसाद लिहिता आहात व इब्लिसचं गिच्चमीऽड अक्षर पाहूनच परिसंवाद बंद करीत आहात.) ;)
बघा एका दगडात दो पक्षी, तसे एकाच वेळी टेक्नॉलॉजीचे २ फायदे.
१. मेडीया इंटरअ‍ॅक्टिव्ह होणे.
२. इब्लिसाचे अक्षर सुवाच्य होणे.
नमनाला इतकेच लिहून थांबतो. पुन्हा पुढे संवादात सहभागी होईनच.

फारच छान! आता आयपॅड वरून प्रतिसाद नाही देता येत. नंतर कम्प्यूटर वरून लिहेन...

माझा तंत्रज्ञानावर असीम विश्वास आहे. मनुष्यबळ कमी आणि फॅमिली बॅक अप ना के बराबर अशी परिस्थिती असताना तंत्रज्ञानाने फार मदत केलेली आहे. शिवाय लोक तुमचा गैर फायदा घेऊ शकतात पण तंत्रज्ञान आणि प्राणि वनस्पती कधीच वाइट वागत नाहीत. तुम्ही त्यांना समजून घेतले तर ते नेहमी व प्रेडिक्टेबल प्रतिसाद देतात. अर्थात तंत्रज्ञान कितीही चांगले व उच्च प्रतीचे असले तरीही वापरायची अक्कल मनुष्याकडेच आहे व त्यामुळे योग्य वापराचे तारतम्य बाळगले पाहिजे.

आवड्ते इन्स्ट्रुमेंट किंवा काही: आय पॅड, अँड्रोइड व ब्लॅक बेरी फोन, डिजिटल कॅमेरा. घरी माणशी एक संगणक. २४ बाय ७
नेट सुविधा आवश्यक असलेली जीवन शैली. साइट्स पैकी. मायबोली, फेसबुक गूगल चे बरेच, शिवाय सर्व इ शॉपिन्ग पर्याय
इत्यादी कचकुन वापरले जातात. रोजचे जीवन जालीय सुविधांवर आहे. शिफ्ट करण्याचा निर्णय मायबोली मुळे इन्फ्लुअन्स झाला शिवाय पूर्ण शिफ्ट करताना सर्व पर्याय गुगल करून शोधून घेतले आहेत.

कामाच्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग अपरिहार्य आहे. तो बिनधास्त करावाच लागतो. काहीही नवीन टेक्निकल वस्तू वापरायला घाबरत नाही. उलट नवे ते हवे अशी मानसिकता आहे. फेसबुक आवड्ते व वापरले जाते. पण उगीचच रोजचे स्वयंपाक व पीळ फोटो टाकत नाही.

मानवाचे जीवन मान सुधारले असले तरीही जास्त वेळ बसून राहण्याच्या घातक सवयीने माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो.
कार, शॉपिन्ग टीवी, लॅपटॉप अशी जीवन शैली नाही. सगळी कडे चालत जाणे शिवाय दोन तास डॉग वॉक डेली. त्यामुळे नॉर्मल जीवनाशी, निसर्ग, साहित्य, कला यांच्याशी नाळ जोडलेली आहे.
स्टीव जॉब्ज यांना मानते पण ते अगदी वेगळ्या कारणाने. त्यांचे सर्व प्रॉड. इनोव्हेशन्स अभ्यास करण्या जोगे आहेत.

सोशल नेट वर्किन्ग मुळे जग जवळ येते आहे. प्रत्यक्ष भेटीपेक्षा मेसेज ठेवणे सोपे पडते.

इ वेस्ट घातक आहेच. पण त्याहूनही पहिल्या जगातील अति कंझंप्शन मुळे निसर्गाचा तोल ढळत आहे. व रिसोर्सेस
अयोग्य रीत्या वापरले जात आहेत असे वाट्ते. जसे ऑस्ट्रियातील दुकानात सोललेली केळी विकायला असणे. डू वी रिअली नीड दॅट?