स्पेस कॅप्स्यूल थांबल्याचं अन्वयाला कळलं, कारण अंतराळातून आल्यासारखे पाझरणारे ते मनोहारी सूर अचानक थांबले होते. गेले तीन दिवस मधूनमधून लागलेली झोप वगळता ते सूरच तिची सोबत करत होते. ते सूर इतके स्वर्गीय होते, की तिला प्रवासाचं, त्यातल्या चिंतांचं भानच हरपल्यासारखं झालं होतं.
"प्रवास संपला. आता उतर अन्वया."
अन्वयाच्या मनात हे शब्द स्पष्ट आदेशासारखे उमटले. ते ध्वनिलहरीसारखे नव्हते, तर विचारलहरीसारखे होते. खरं तर विचारांचं प्रक्षेपणच होतं ते. तिला आता या असल्या 'शब्देवीण संवादु'ची सवय झाली होती.
"तुझ्या डाव्या बाजूच्या गडद निळ्या काचेचं दार तू तिथे गेलीस की उघडेल. उतरायचं, तुझं सामान आणलं जाईल. बाहेर मी तुझी वाट पाहतोय."
"तू कोण?" अन्वयानं मनातल्या मनातच विचारलं .
"मी अविरत. तुझा मित्र . उतरताना एक मोठा हवेचा झोत तुला उतरायला प्रतिरोध करेल. घाबरू नकोस. एक मोठ्ठा श्वास घे, म्हणजे घुसमटणार नाहीस. नंतर मी तुझं ट्रेनिंग करेनच ब्रीदलेसनेसवर. गुड लक."
अविरतचा आवाज (?) थांबला. अन्वया त्या छोट्याशा कॅबिनेटच्या डाव्या बाजूच्या निळ्या काचेच्या दाराकडे गेली. तिनं एक दीर्घ श्वास घेताच दरवाजा अत्यंत प्रवाहितेने उघडला आणि झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झ्झॅप! एक प्रचंड वादळ जणू अन्वयाच्या अंगावर चाल करून आलं.
त्या काळोखात, अधांतरात पाऊल टाकताना तितकाच मोठा अनिश्चितीचा, कसल्याशा जुन्या भयाचा गोळा आपल्या पोटात उठला आहे, याशिवाय अन्वयाच्या मनात कोणतीच जाणीव शिल्लक राहिली नव्हती. 'अविरत, अविरत..' मनातल्या मनात आक्रंदत, स्फुंदत ती त्या काळोखाच्या अधीन झाली.
***
एक चंदेरी घुमट ज्यात सरमिसळलेले रंग खेळत आहेत. एक काळ्याकुट्ट मेटलचा रुंद पट्टा ज्यावर ती उभी आहे. उभी आहे म्हणण्यापेक्षा कुणाच्या तरी कुशीत आहे. आल्हाददायक सोनेरी प्रकाश, पट्ट्याच्या मागल्या बाजूला अपरिचित झुडपे नीट निगराणी केलेली, फुलांनी वाकलेली. वार्याच्या प्रत्येक झुळुकीबरोबर हवेत मुठींनी उधळलेले संमिश्र सुगंध. तिच्या पंचसंवेदना हुशारताहेत.
"सुंदर दिसते आहेस अन्वया! प्रवास ठीक झाला ना तुझा? मी अविरत. मी अपार स्नेह करतो तुझ्यावर." खोल गंभीर शब्द. तिच्या कपाळाला एक हलकासा ओठांचा स्पर्श अन ऊर्जेचा एक थरार तिच्या शरीरातून. तिला अगदी उत्साहित वाटतं. ती सरळ पायांवर उभी होत त्याच्याकडे बघते.
"अविरत! याआधीही भेटलो होतो का आपण?" तो खूप ओळखीचा वाटतो. मध्यम वय, नाजूक चण, किलकिले हसरे डोळे, रापलेला गोरा वर्ण. हा चेहरा भारतीय वाटत नाही.
"घरी जाऊ. तू थकली आहेस. प्रवास साधा नव्हता. तू हजार वर्षं पुढे आली आहेस. वेगळ्या ग्रहमालेवरही आहेस. वाळली आहेस."
अन्वयाचं लक्ष प्रथमच स्वत:कडे जातं. तिच्या त्वचेतून एक नवाच उजाळा बाहेर फेकला जातोय. अविरतसारखाच, तिच्या अलीकडल्या चित्रांसारखा! अन् शरीर आळलं आहे. तिचा कमनीय बांधा, त्याची वळणं आकसून हल्लक झाली आहेत. तिला श्वास घ्यायची कमी गरज वाटतेय.
वरचं आकाश.. ते खोल खोल पारदर्शी जांभळ्या रंगाचं आहे. तिला अचानक खूप शीण येतो आहे, झोपही येतेय. तरीही घटना आठवत राहतात. त्या स्वप्नांसारख्या असंबद्ध, तरीही अर्थपूर्ण.
***
रनेसाँस या विषयावर अन्वयानं थीसिस करायचं नक्की केलं, तेव्हाच तिला असं जाणवत होतं की, जणू हा तिचा निर्णय नव्हता. तिला काही स्वप्नं पडत होती अन् त्या स्वप्नांमध्ये ती याच विषयावरची पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसलेली असे. तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत युरोपात जागलेला हा प्रबोधनकाळ, ज्यात एका विलक्षण योगायोगासारख्या निरनिराळ्या प्रतिभावंतांच्या प्रतिभा निरनिराळ्या क्षेत्रात युरोपातील निरनिराळ्या देशात विकास पावल्या. चित्रकला, शिल्पकला, गणित, विज्ञान, सौंदर्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, साहित्य, संगीत - प्रत्येक क्षेत्राची घुसळण झाली. महान कलाकृती जन्माला आल्या. शोध लागले.
अन्वयाला थीसिस तर करायचाच होता. विशुद्ध चित्रकलेच्या पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी तिच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिला एक विषय निवडायचा होता. काय हरकत आहे हाच विषय निवडायला? तिला अभ्यासाचा तसा थोडा आळसच होता. कॅनव्हासजवळ भान हरपून रमणारी अन्वया थीसिसकडे तितक्याशा गांभीर्यानं पाहत नव्हती. तरीही रनेसाँस हा विषय आकर्षक वाटला तिला, थोडी गंमतही वाटली. जेऊरकर मॅडमना तिने जेव्हा स्वप्नांबद्दल सांगितलं, तेव्हा त्या चकितच झाल्या होत्या.
"पण अन्वया, अशी स्वप्नं तुला लहानपणापासून पडतात का?"
"छे हो, मॅडम! अगदी निरर्थक स्वप्नं असतात माझी. बहुधा अभ्यास झाला नाही, परीक्षा चालू आहे, बाकीची मुलं जोरात पेपर लिहिताहेत, असलीच!" मग दोघीही खूप हसल्या होत्या.
***
अविरतची कार म्हणजे एक किरणांचा पुंज जणू अशी झळाळी डोळ्यांवर. त्या वाहनातून त्याच्या पॅडवर जाणं ही एका प्रचंड वेगाची धूम्ररेषा. ही कुठली ऊर्जा? अन्वयाची नजर सगळ्याच भूभागावर भिरभिरत होती. जणू एका वेगळ्या सौंदर्यपूर्ण सफाईत न्हालेले, काहीसे पारदर्शक, आतून प्रकाशित वाटणारे इमारतींचे, वनस्पतींचे आकार, रंग.
सरकत जाणारी वनं-उपवनं, तुरळक माणसं. कुरणात चरणारी हरणं...
***
"तुझ्यासारख्यांसाठी स्पेस कॅप्स्यूल कार. इथे संकल्पानंच प्रवास होतात. प्रत्यक्ष वाहनातून प्रवास कमी करतो आम्ही."
" ? "
"तू ३०१३मध्ये आहेस अन्वया. तुमचा दुसरा रनेसाँसही संपण्याच्या काळात."
"..........."
"अन्वया, बोल ना." एक खूप मधुरसं हास्य. कोण आहे हा ?
"कोण आहेस तू अविरत? हे सगळं काय आहे? का आणलं आहेस मला इथे?"
"सध्या तरी मी अविरत आहे. तू अन्वया आहेस. या अनंत अपरिमित विश्वामधली आपली विश्वं आता वेगळी आहेत. कालखंड वेगळे आहेत. पण स्वप्नांच्या पुलावरून मी तुझ्या मनात अलीकडे डोकावलो आहे. काही प्रयोजन आहे त्याला. आपण सारेच ही प्रयोजनं घेऊन नेहमीच विशाल अवकाशाच्या सांदीकोपर्यात भिरभिरत असतो. आपापले स्थळकाळ, कथानकं, उत्पात आणि शांतिकाळ सामावून घेणारं हे अंतहीन विश्वसुद्धा विधात्याचं एक स्वप्नच आहे. त्या स्वप्नातून जागं होऊन आपण सर्वजण त्याच्या अथांग हेलकावणार्या जाणिवेत सामावून जाऊ तेव्हासुद्धा अन्वया, तू आणि मी भिन्न असूनही एकच असू."
"कोण होतास तू माझा अविरत? का ओळखीचा वाटतो आहेस? बाप? भाऊ? सखा? नवरा?"
"तुझ्या लहानशा जाणिवेत किती तपशील कोंबायचे आहेत अन्वया? आपण एकमेकांचे सर्व काही आणि कोणी नाही. हा क्षण आहे ना, हा एवढाच खरा असतो, यालाच अगदी आत खोल ओढून घे श्वासासारखा. तो श्वासही किती मंद, संथ झालाय इथे आल्यावर कळलंय तुला? नसल्यागत आहे त्याचं स्पंदन. आपण प्रकाश आहोत अन्वया, आणि प्रकाशावर जगतो. तू स्वतःची जाणीव हाडामांसाशी निगडित केली आहेस म्हणून श्वासबंधनाची दोरी तुझ्या गळ्यात आहे. म्हणून तुझी प्राणशक्ती अन्नपाण्यावर जगते. हे श्वास कधीकधी वैरी बनतात. यांना जिंकायचं असतं."
"हे काय बोलतो आहेस, जरा समजावून सांगशील का? इथे का आले मी? तुझं निमंत्रण आधी सारखं स्वप्नात, मग जागेपणीही माझ्या जाणिवेत निनादू लागलं. माझं कुठे लक्ष लागेना. मी होस्टेलवर राहते. माझे आईवडील घरी हे कळल्यापासून थोडे बेचैन आहेत.. मी नाही. मला हे सगळं समजून घ्यायचंय, म्हणून त्यांना न कळवता मी तुझ्या बोलावण्यावरून इथे आलेय तू पाठवलेल्या यानातून. मला तू आवडला आहेस.. तुझ्या आवाजात, स्पर्शात जे आहे त्याला आम्ही प्रेम म्हणतो."
"प्रेम हा शब्द खूप नकारात्मक भावनांशी जोडलात तुम्ही माणसांनी. मत्सर, संशय, स्वामीत्वभावना, सूड, हिंसा, रक्तपात, लढाया, विनाश. मी खूप स्नेह करतो तुझ्यावर. सर्वांवरच. तुझ्याबद्दलचे जुने विशेष, त्यांचे तपशील अवकाशाच्या कचर्यात जाळून टाकले मी. आता हे निर्हेतुक आपलेपण आहे!"
"कळतं आहे थोडं थोडं अविरत. तुला भेटून शब्दांपलीकडला आनंद वाटतो आहे."
"धन्यवाद प्रिय. मलाही. तुला समजून घ्यायचं आहे ना आपण इथे का आलो ते?आपल्या भेटीला एक प्रयोजन आहे. दुसरा रनेसाँस!"
***
अन्वया एव्हाना थीसिससाठी माहिती गोळा करू लागली होती. जेऊरकर मॅडमशी चर्चा एकीकडे.
"रनेसाँस. मूळ फ्रेंच शब्द, ज्याचा अर्थ आहे पुनर्जन्म मॅडम! असं का? पुनर्जन्म ही तर भारतीय संकल्पना. कोणत्या फ्रेंच मनात हा शब्द आला या कालखंडाचं नाव निश्चित करताना?"
"अन्वया, इतक्या खोलात तू कशी जाणार? तुझ्या विषयमांडणीत तुला चित्रकलेच्या अंगावर फोकस ठेवून ही मध्ययुगातून मानववंश बाहेर पडण्याची पहाटवेळ मांडायचीय. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत इटलीतून युरोपात फैलावत गेलेला एक प्रबोधनाचा, नवनिर्माणाचा, सगळ्या कल्पना, संकेत तपासून घेण्याचा संघर्षमय कालखंड. कागद, मुद्रणकला, संवादसाधनांचा, तंत्रज्ञानाचा विकास यांतून फोफावत गेलेली एक चळवळ ही पार्श्वभूमी. चित्रकलेच्या क्षेत्रात राफाएल, लेओनार्दो दा विंची, मिकेलांजेलो अशा बहुविकसित, बहुआयामी प्रतिभांचा जन्म. ख्रिश्चन धर्मांतर्गत नव्या प्रागतिक प्रोटेस्टंट पंथाचा उदय. मूलतः ग्रीक व रोमन अभिजात परंपरांचं पुनरुज्जीवन करतानाच मानवी बुद्धिमत्तेनं घेतलेली उत्स्फूर्त नवी वळणं. संगीत, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान - मानवी जीवनावर परिणाम करणार्या सर्वच ज्ञानशाखा जणू नवनवोन्मेषांनी बहरल्या तो हा काळ."
''मॅडम, राफाएल, लेओनार्दो दा विंची, मिकेलांजेलो.. रनेसाँस मेन म्हणतात ना यांना? मग रनेसाँस विमेन नव्हत्या का कुणीच?''
"तूच शोधून काढ अन्वया. वेळेत सबमिट कर म्हणजे झालं. आधी चालढकल, आता खूपच रस घेते आहेस."
मग पुन: दोघींचं खळाळून हसणं.
***
"अविरत! काय बोलतो आहेस! दुसरा रनेसाँस! पण रनेसाँस एकचतर आहे! तोच विषय मी निवडलाय थीसिससाठी!"
"तू निवडलास? मी तुला सुचवत राहिलो, तुझ्याकडे प्रक्षेपित, तुला प्रेरित करत राहिलो होतो!"
यावर अन्वया बिथरलीच. तो सगळा झपाटलेला काळ आपला एकटीचा नव्हता तर!
"का पण? अविरत, माझ्या स्वप्नांत, माझ्या मनात यायचा काय अधिकार आहे तुला? असशील तू विकसित अस्तित्वाच्या जगातला. मला नाही आवडलं हे असं तू माझी कठपुतळी करणं!"
"मान्य. ही आहे माझी अन्वया. अशीच बंडखोर, स्वतंत्र बाण्याची. मी खुलासा करेन अन्वया, तू खाऊन घे हे पदार्थ मी तुझ्यासाठी केलेले. आपण उद्या बोलू. विश्रांती घे. वेळ कमी आहे अन्वया, तुझ्या जगात परतायचंय तुला."
***
अन्वयाचं वाचन, आकलन तिच्याही नकळत खूप वाढू लागलं होतं. तिच्या स्वतःच्या चित्रांवरही त्याचा परिणाम दिसू लागला होता. तिच्या चित्रांतले रंगांचे, आकृतींचे परिमित स्फोट एका आतल्या उजाळ्यानं झळाळू लागले होते.
"व्वा अन्वया, खूप पुढे जाते आहेस! थीसिस मानवलाय तुला", मॅडम म्हणाल्या होत्या. पण अन्वया खरंच जरा जास्तच पुढे जात होती. प्रबोधनकाळ ओलांडून ती एकोणिसाव्या-विसाव्या अस्वस्थ शतकात मनानं शिरली होती. जणू झपाटून गेली होती. आता क्षितिजावर महायुद्धं, विनाश. चित्रांतले सुंदर आकार, जग लोपत होतं. दृश्य वस्तूत दडलेले इंप्रेशनिस्ट आकृतिबंध लोपून फॉव्हिझमचे लोपलेले, भंगलेले आकार; एक्स्प्रेशनिझममधली बंडखोरी, मुक्त अभिव्यक्ती; क्युबिझममधून व्यक्त झालेले जीवनाचे यांत्रिकीकरण; दादाइझममधला प्रक्षोभ. कॅनव्हासचं जग अंतर्मनाइतकं दुर्बोध झालं होतं. हे सर्व आजवर अभ्यासक्रमात होतंच, पण आता चित्रांच्या, शब्दांच्या आतली दारं उघडलीत. अर्थ बाहेर धावत येऊन तिला मिठी घालताहेत. पॉल सेझान, फिन्सेन्ट फॉन होख, मातिस, ऑन्री द तुलुज-लोत्रेक, गोगँ, मोने, पिकासो. महान चित्रकारांची व्यामिश्र जीवनं, कलाकृती. दु:खाचे रंग. आक्रोशाचे आकार.
***
आठवणी. झोप. गुंगी? दबलेले ताण. तरळणारी स्वप्नं. दु:स्वप्न!
अन्वया सुनसान रस्त्यातून एकटीच चालतेय. कुठलंतरी जुन्या काळातलं वाटणारं लोकेशन. एक खेडवळ माणूस अन् बाई समोरून येतात. त्या बाईच्या हातात एक चिट्ठी आहे. "अवो बाई, हा पत्ता वाचून दाखवा ना आमास्नी", ती बाई अन्वयाला विनवते. अन्वया बेसावधपणे ती चिट्ठी हातात घेऊन वाचू लागते तो काय, तो माणूस तिला घट्ट पकडून तिच्या नाकातोंडावर एक हात घट्ट दाबतो. दुसरा मस्तकामागे. तिचा श्वास घुसमटतोय. "अहो, अहो, काय करताय हे! वाचवा मला कोणी!". अन्वयाचा आकांत तोंडातून उमटतच नाही. आयुष्य संपतंय इथेच. का हा घातपात? ती आचके देतेय. ओरडायचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करतेय.. संपतंय सगळं..
***
"काय झालं अन्वया? का ओरडते आहेस?", तिच्या शेजारी बसून अविरत तिला विचारत होता.
"मी जिवंत आहे? किती भयानक स्वप्न! हेपण तूच पाठवलंस का?" ती अशांत, खोलवर हादरलेली. तरीही ते भयस्वप्न स्वप्नच होतं, सत्य नव्हे हे जाणवून हायसं वाटलेली.
"काय म्हणते आहेस तू, अन्वया?" तो अत्यंत दुखावलेला. "अन्वया, माझ्या या जगात दु:खं नाहीत कारण सुसंवाद आहे इथल्या मनामनांमध्ये! नियम आहेत एकमेकांच्या मनात डोकावण्याचेही. कळेल तुला योग्य वेळी.. इथे असला विसंवाद आमच्या प्रकाशशरीरांना जखम करतो, शस्त्रं नाहीत. तू मला आता घायाळ केलंस अन्वया! माझ्या स्नेहाचा संपूर्ण विपर्यास केलास."
अन्वया त्याच्या नजरेतलं अपरिमित दु:ख पाहून शरमली. ते दु:स्वप्न त्याला सांगून म्हणाली, "अगदी खरंच घडत होतं रे हे सगळं. स्वप्नातून जाग आली म्हणून स्वप्न म्हणायचं. काय अर्थ असतो रे अशाही स्वप्नांचा? हेही कुणीतरी मला प्रक्षेपित केलं असं मला आता कालचं तुझं बोलणं ऐकून वाटलं तर माझी काय चूक त्यात?''
***
अविरतचे तपकिरी डोळे कुठल्यातरी दुसर्याच विश्वात हरवलेले. "अनसूया, पुनः जगलीस तू ते सगळं."
मग मनात म्हणाला, "अनसूया, तुझ्या अंतर्मनातून गेल्या नाहीत त्या आठवणी. तेव्हा मी कमी पडलो तुला अनसूया. माझ्या परधर्मी, परदेशी प्रेमाचा तसा घातपाती शेवट तुला भोगावा लागला. मी तुझ्या देशात, शहरात पाहुणा होतो. एकत्र शिकत होतो आपण महाविद्यालयात. तुझ्या प्रागतिक घरात त्या काळातही माझा पाहुणचार होत होता कौतुकानं. पण हे प्रेम त्यांनाही मान्य होण्यासारखं नव्हतंच अन् समाजाला तर मुळीच नाही...कुणी तुला मारलं तेव्हा कळलं नाही कुणालाच.. तुझेच काही दुष्ट नातेवाईक होते त्यामागे, हे मी खूप नंतर जाणलं. तुझ्या अपमृत्यूनंतर मी आतून विरागी झालो अनसूया, मी प्रश्नाच्या तळापर्यंत जाऊन पोचलो. आयुष्याचा परम-अर्थ शोधताना तुला मनाच्या मुठीत घट्ट धरून राहिलो. सगळं काही दुसर्या महायुद्धात हरवून तर मी भारतात आलो होतो. आता तुझाही पाश तुटला होता. मृत्यू कसं हिरावून नेईल तुला अनसूया माझ्यापासून? सतत चिंतन अन् प्रखर साधनेच्या बळावर मी तुझ्या दु:खाच्याही खूप पुढे निघून आलो अनसूया, कितीतरी प्रकाशवर्षं पुढे.''
"अविरत? कोण अनसूया? मी अन्वया आहे! काय बोलतो आहेस तू असंबद्ध?"
"अगं, चुकून अनसूया आलं तोंडात अन्वया.. भयस्वप्न म्हणजे कुठल्यातरी जन्मातल्या घातक स्मृती असतात, ज्या आपण कधीतरी जगल्या असल्यानं खूप खर्या वाटतात! विसरशील ते भयस्वप्न तू. मी निराशानाशक संगीत लावतो ना तुला प्रवासात ऐकवलेलं. सगळं भय संपलंय अन्वया. मी आहे ना! आणि आता तुलाही खूप समर्थ व्हायचं आहे. दुसर्या रनेसाँसबद्दल ऐकायचंय ना तुला? ऐक मग. पहिला रनेसाँस युरोपात जन्मून विस्तारला. खूप भौतिक शोध लागले. साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान - सगळं फळफळलं. पण मानवजात हे ज्ञान, ही विकसित जाणीव घेऊन गेली कुठे पुढे? तर महायुद्धांकडे अन् विनाशांकडे. म्हणून आता दुसर्या रनेसाँसचा केंद्रबिंदू भारतीय विचारधारेतून येणारा असणार आहे अन्वया! अन् हा सहस्र वर्षांचा प्रबोधनकाल कला-विज्ञानाबरोबरच आत्मविकासाचा असेल. मनोवीक्षण, विचारप्रक्षेपण अशी नवी संवादसाधनं वाढून विसंवाद लोपतील. विश्वबंधुत्व वाढेल.. जगाला शांतीचा, अमृतत्वाचा वसा देणारा असेल हा काळ. अनेक क्षेत्रातल्या प्रतिभा एका कालखंडात विकसतात तेव्हा तो अपघात नसतो, ती योजना असते. तो ईश्वरी संकेत असतो! आता या दुसर्या प्रबोधनकाळात 'रनेसाँस मेन'ऐवजी 'रनेसाँस विमेन' आघाडीवर असतील निरनिराळ्या क्षेत्रांत. तू त्यातली एक असशील अन्वया! मला तुझा अभिमान वाटतो."
अविरत इथेच थांबला. मनात म्हणाला - तू खूप दु:ख साहिलंस अन्वया. अपमृत्यूच्या आघातातूनही माझी अनसूया राख झाली नाही. अन्वयाच्या रूपात तिचा पुनर्जन्म झालाय. सुरुवातीला चित्रकलेच्या क्षेत्रातली ती एक श्रेष्ठ प्रतिभा म्हणून ओळखली जाईल! अन् नंतर आत्मशोधात ती विलीन होईल. आपण पुनः भेटू तेव्हा आकलनाच्या माझ्याच पातळीवर तू असशील अन्वया..
"बरंचसं कळत नाहीय, अविरत. मला सगळंच स्वप्नवत वाटतंय आता! कशावरून आपलं हे बोलणं तरी खरं आहे? पण ते काही असो, मला तुला सोडून परत जाववणार नाही, अविरत! तू माझ्या जगात ये!''
"या सर्व भेटीगाठी योजनाबद्ध असतात, अन्वया! या भेटीसाठी ईश्वराचे आभार मान अन् पुढच्या भेटीसाठी प्रार्थना कर. पण आधी तुझं काम चोख कर, अन्वया. अभ्यासात, कलासाधनेत बुडून जा. कलावंत-तत्त्वज्ञ-विचारवंत यांना येणार्या स्फूर्तिलहरी विकसित अस्तित्वांकडून येत असतात, पण त्यात नेहमीच त्यांचं स्वतःचं सत्व मिसळलेलं असतं म्हणून प्रत्येक कलाकृती, शोध, तत्त्वविचार अनन्य असतो!''
"खरंच बोलतो आहेस, अविरत! पण एक शेवटचं सांग, निरोप घेण्याआधी. मला कसं शोधलंस? इथे का बोलावलंस?"
"तुझ्या विचारांच्या रेडिओलहरी आम्हांला अभिप्रेत असलेल्या विकासपातळीवरच्या होत्या, म्हणून तू इतर निवडक लोकांबरोबर निवडली गेलीस अन्वया. तुला कळणार्या शब्दांत सांगायचं, तर येणार्या काळात तुझ्यावर प्रतिभेचा वरदहस्त राहील. तू अशी निवडली गेलीस तेव्हा माझा आनंद अन् अभिमान थोडा जास्त वाढला. तुझ्याच जगात तुला आमचे संदेश प्रक्षेपित करताकरता तुलाही माझ्या जगात आणावं, त्या निर्घृण ताटातुटीनंतर तुला एकदा भेटावं, यासाठी मी परवानगी घेतली माझ्या वरिष्ठांची. या भेटीची किंमत मला द्यावी लागणार आहे! पण माझे वरिष्ठ खूप दयाळू आहेत."
"कसली निर्घृण ताटातूट? कोण आहेत तुझे वरिष्ठ?"
"सगळंच आज नको, अन्वया! चल जरा आमचं निराशानाशक संगीत ऐकू, फ्रेश होऊ, मग आमचं सुंदर जग फिरून पाहू!" अविरतनं तिला जवळ घेत, थोपटत विषय कायमचा संपवला.
***
कारण आता तो अन्वयाला त्या संगीतातून आनंददायी खोल निद्रेत नेऊन तिच्या जगात अलगद परत पाठवणार होता.. त्याला दिलेली भेटीची वेळ संपत आली होती...
अन्वया ही भेट विसरणार होती, पण तिचा परिणाम बरोबर घेऊन - अंतर्मनात एक नवी जाणीव घेऊन पृथ्वीतलावर परतणार होती. दुसर्या रनेसाँससाठी वैश्विक प्रतिभा सिद्ध होत होत्या...
- भारती बिर्जे डिग्गीकर
प्रतिसाद
सॉलिड आवडलं
सॉलिड आवडलं
नाही आवडली कथा. खूपच बाळबोध
नाही आवडली कथा. खूपच बाळबोध वाटली.
छान..... एका वेगळ्याच
छान..... एका वेगळ्याच वातावरणात शिरल्यासारखं वाटलं हे वाचताना.
छान लिहील आहेस वेगळ आहे .
छान लिहील आहेस
वेगळ आहे .
मांडायला खूपच कठीण असलेली
मांडायला खूपच कठीण असलेली संकल्पना कल्पकतेने, चित्रकलेच्या शैलींचा औचित्यपूर्ण वापर करत अतिशय छान, ओघवत्या शैलीत सादर केलीय. अभिनंदन.
आभार सर्वांचे. ''बायबलमध्ये
आभार सर्वांचे.
''बायबलमध्ये एक गोष्ट आहे.अब्राहमने परमेश्वरास अशी विनंती केली की सोडोम शहरात जर दहा सच्चरित माणसे आढळली तर त्या शहराचा नाश करू नये.तेव्हा परमेश्वराने त्याला तसे वचन दिले -(जेनेसिस १८-२३-३२ )..परमेश्वराच्या या उक्तीनुसार भारताने काळाच्या हजारो आघातांपुढे टिकाव धरून स्वत:ला शाबूत ठेवले आहे. '' परमहंस योगानंद.
येत्या सहस्त्रकात महायुद्धा-युद्धांनी रक्तलांच्छीत झालेल्या मानवजातीचा नवा प्रबोधनकाळ भारतीय विचारधारेतून येणार आहे.सर्व वस्तुजात हे शक्तीमध्ये परिवर्तन पावू शकते हे विज्ञानाने सिद्ध केले, हाडामासाच्या शरीराचेही विशुद्ध शक्तीत परिवर्तन होऊ शकण्याचे शास्त्र भारतीय योगविद्येत आहे आणि हीसुद्धा अस्तित्वाची परम-सिद्धी नाही.जडदेह, सूक्ष्म देह आणि कारणदेह या चढत्या श्रेणीत विभागल्या गेलेल्या अस्तित्वानुरूप लोक-परलोकविश्वांच्या पलीकडच्या परमानंदात विलीन होणे ही परमावधी आहे.
हा विचार एका सोप्या, रंजक कथेच्या माध्यमातून मांडला गेला.यात त्रुटी राहिली असेल तर ती माझीच.
वेगळीच कथा आहे... पण
वेगळीच कथा आहे...
पण "रामराज्य" हे नेहेमी कल्पनेतच असते बहुधा .....
(परस्पर विरोधी विचारधारा, परस्पर विरोधी उर्जा शक्ति यांची जगाला अतिशय गरज असते. किंबहुनी त्याशिवाय हा डोलारा उभा राहूच शकणार नाही - माझी अल्पबुद्धि..)
कथेमागील विचारकोश
कथेमागील विचारकोश -
‘Autobiography of a Yogi’ या योगी- आत्मवृत्तात निवेदक परमहंस योगानंद हे मुंबईत रिजंट हॉटेलमध्ये आपले गुरु श्री युक्तेश्वर यांच्या मृत्युशोकात असताना त्यांना ते पुनरुत्थित स्वरूपात दिसले, भेटले. युक्तेश्वरांनी या भेटीत परलोक-विश्वाच्या ,लोक-परलोक जीवनाच्या, मरणोत्तर अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल प्रदीर्घ विवेचन केले आहे. आत्मवृत्ताचे हे ४३ वे प्रकरण मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यातला काही भाग शेअर करण्याचा प्रयत्न/धाडस करत आहे. जे काही त्रुटित /खंडित वाटत आहे तो माझ्या उद्धृतीकरणातील दोष.
या विवेचनात ख्रिस्ती व इस्लामी जगातील पुनरुत्थान व हिंदू पुनर्जन्म यांची सांगड बसते म्हणून व्यक्तिश: मला हे फार समाधानकारक वाटतं . श्रीयुक्तेश्वरांचा बायबलचाही सखोल अभ्यास होता, तो वेगळा विषय. त्यांच्या व्यक्तीमत्वात एखाद्या ख्रिस्तयोग्याची वैशिष्ट्ये दिसतात.
- पुनरुत्थान हे सिद्धयोग्यांचे होते,जे मृत्यूनंतर हिरण्यलोकात(Illumined astral planet) जातात,जेथे आध्यात्मिक दृष्ट्या फार वरच्या कोटीला गेलेली माणसे रहातात. या सर्वांनी पूर्वीच्या भूलोकातील आयुष्यात ध्यानाच्या बळावर पूर्वसंचिताशी संलग्न कर्मबीजे नष्ट करून टाकली असतात व त्या जीवनकाळातच सविकल्प व निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला असतो. तरीही उच्चतर पारलौकिक कर्मांची पूर्तता ते करत असतात. जसे की अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणे , दुर्वृत्ताना परत मार्गावर आणणे. हे स्वेच्छेनुसार जडदेह घेतात किंवा त्यागतात.त्यांची इच्छाशक्ती -cosmically attuned will - परमेश्वराच्या निर्माणशक्तीच्या तेजामध्ये आंदोलन पावत असते.या समरसतेमुळे त्यांना काही असाध्य नसते. पार्थिव शरीराला असंख्य धोके असतात. परलोकशरीर इच्छाशक्तीच्याच जोरावर दुरुस्त होते .प्रकाश आणि अंतरिक्ष शक्ती ग्रहण करून ते जगतात. त्यांना प्राणवायूची गरज नसते). पाच ज्ञानेंद्रिये आपल्या परिचयाची आहेत. या अतिप्रगल्भ अस्तित्वांचे सहावे ज्ञानेंद्रिय म्हणजे अंत:स्फूर्ती. उच्च कोटीस पोचलेल्या या सिद्धांशिवाय इतर जीवांना मरणोत्तर साधारण स्वरूपाच्या परलोकगोलांमधून जावे लागते.
- असे परलोक अनेक आहेत.ते प्रकाश आणि रंग यांच्या सूक्ष्म आंदोलनांचे बनले आहेत.त्यात रहाणारेही अनेक प्रकारचे आहेत.त्यांची वाहने त्यांना साजेशी अशी आहेत, तेजाचे किंवा प्रकाशाचे पुंजके.जे radioactive लहरींपेक्षा जास्त वेगाने एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर गमन करतात.या लोकांतही असंख्य सूर्यमाला व तारकापुंज असतात जसे जडसृष्टीत आहेत.हे astral universe सुंदर, स्वच्छ, शुद्ध आणि सुसंबद्ध असते.पृथ्वीवरील किल्मिषे येथे नसतात. येथील वनस्पतीही प्रकाशमान , किरणरूपच आणि विपुल असतात. फळे, कंदमुळे, भाज्या येथील लोक खातात आणि तेजस्वी द्रवरूप प्रकाशाचे प्राशन करतात. कल्पनेच्या भरारीतून वने उपवने निर्माण करतात व फिरून ती सृष्टी ईथरमध्ये विलीन करतात.समभावना व दूरवीक्षणामुळे या जीवांमध्ये गैरसमज, घोटाळे, दु;ख निर्माण होत नाही या अवस्थेप्रत ते साधनेने पोचले असतात. हे जग त्या साधनेमुळे त्यांना प्राप्त होते.याचा रामराज्याशी संबंध नाही. आपली जाणीव मूलत: जडदेहाशी संबद्ध, विकसित आत्मे प्राणकण व वैश्विक शक्ती यांच्या संयोगाने बनलेले (Life-trons and cosmic energy )म्हणून सूक्ष्मात पोचलेले असतात.त्यांची आयुर्मर्यादा खूपच जास्त असते व याही अस्तित्वाचा शेवट दोन प्रकारे होतो. एक तर भूलोकावर काही कारणाने परत जाण्यासाठी किंवा सर्व विचारलहरींसकट कारण-सागरात –जवळजवळ मुक्तावस्थेत –विलीन होण्यासाठी.
- याशिवाय अनेक इतर परलोकांमध्ये इतर मत्स्यसदृश जीव, प्राणी, भुते, खुजे,यक्ष, गंधर्व ,मृतात्मे हेही रहातात.Astral cosmos च्या अगदी खालच्या थरात अंधकारमय जगात पतितात्मे रहातात, ते आपसात लढतही असतात.
- आपले,मनुष्याचे अस्तित्व सोळा स्थूल रासायनिक तत्वांनी बनलेला स्थूल देह(Gross material body ),एकोणीस तत्वांनी बनलेला सूक्ष्मदेह ( subtle astral body ) व पस्तीस मूलगामी तत्वांनी बनलेला कारणदेह ( the idea or casual body ) यांनी सिद्ध झालेले असते.यांचा सखोल विचार भारतीय अध्यात्मात आहे.पार्थिव शरीराच्या विनाशानंतर रक्तमांसाचा जाडजूड अंगरखा काही काल फेकला जातो.आत्मा मात्र सूक्ष्म लिंगदेह व कारणशरीरात बद्ध असतोच.( या तीनही शरीरांना जोडणारा adhesive force म्हणजे वासना. )शारीरिक वासना इंद्रियभोगावर आधारित असतात.सूक्ष्म लिंगदेहधारी आपल्या वासना प्रकाशकिरणांच्या आविष्कारातून काढतो, विचार व स्वप्ने यांचे स्थूलीकरण करू शकतो.कारण –वासना ही जवळजवळ मुक्तावस्थेत पोचली असते.
- हे कारण-विश्व इतके सूक्ष्म आहे की त्याचे वर्णन करता येत नाही.त्याचे ज्ञान करून घ्यायचे तर जबरदस्त ध्यान लावून अंतश्चक्षूसमोर परलोकविश्व व पार्थिवविश्व खाली जड टोपली अडकवलेल्या प्रकाशमान हवाई फुग्याप्रमाणे केवळ कल्पनेने दिसले पाहिजे.ज्याप्रमाणे एखाद्याने डोळे मिटावे व आपण अस्तित्वात आहोत हे समजावे , तसे. ही दोन्ही विश्वे त्यांच्या गुंतागुंतीच्या समग्र स्वरूपात जो ध्यानात पाहू शकतो तो मन व वस्तुजात यांच्या संमीलन बिंदूवर सर्व सृष्ट वस्तू –घन, द्रव , वायू, वीज, शक्ती , प्राणिजात , जीवमात्र, वनस्पती सगळे मनोकल्पित हे अनुभवू शकेल.
- कारण-विश्वातील आत्मे स्वत:ला परमानंदाच्या व्यक्तिगत बिंदूसारखे (individual points of One Joyous Spirit)समजतात .जाणीवेच्या या स्तरावरून सर्व घन-द्रव-वायू आदी सृष्ट वस्तू , सर्व शक्तीस्रोत, सर्व अथांग जीवसृष्टी, मृत्यु व पुनर्जन्म ही केवळ मनोकल्पित स्वरूपात दिसतात.चिरंतन नवज्ञान, शांतता, विशुद्ध अवलोकनाचा अनुभव घेत विश्वाकार झालेल्या या अस्तित्वांना कारण-देहात राहूनही जाणीवेच्या व्यक्तिगत लहरी जोपासण्याची गरज वाटत नाही. मग तीनही शरीरांच्या कोशातून बाहेर पडलेले अस्तित्व शेवटी पूर्णावस्थेत जाते, मुक्त होते ..
आवडली कथा.
आवडली कथा. :)
मला आवडली कथा. हा विषयच
मला आवडली कथा. हा विषयच शब्दांत मांडण्याचा प्रयत्नच खूप धोक्याचं (??) आहे.
म्हणूनच नक्की काय केलं असता ती अधिक बांधीव झाली असती ते संगताही येत नाहीये.
खरेय दाद . धोका घेतला गेला.
खरेय दाद . धोका घेतला गेला. प्रत्येक लेखनात तो असतोच, इथे अपरंपार होता :)
कथा आणि नंतरच्या प्रतिसादातलं
कथा आणि नंतरच्या प्रतिसादातलं विवेचन वाचलं .. वाचायला आवडलं .. मध्ये मध्ये समजत आहे असंही वाटलं पण बाकी वेळा काहितरी स्कॅटर्ड किंवा मग खूप जास्त गोष्टी सरमिसळ होऊन दिसत आहेत असंही वाटलं ..