सजाण

आमच्या घरातून बाहेर पडलं, की रस्त्यावर कुण्णीच नसतं. रस्त्यावरचं पहिलंच घर आमचं, थोडंसं चाललं की रस्ताच वळतो. मग एकदम गर्दी, गडबड, दुकानंच दुकानं. रोजच्यासारखंच आईनं माझं बोट घट्ट धरलं होतं. मी ते सोडवलं की ती पुन्हा धरते. ऐकत नाही अगदी. आई नेहमीसारखी घाईघाईत मला काकूंकडे पोचवायला चालली होती. तिथून तिला कामावर जायचं होतं. मला उड्या मारत, काचेच्या खिडकीतून दुकानांच्या आत बघायचं होतं. टेडी बेअर, मिकी माऊसचं जे दुकान आहे ना, ते मला खूप आवडतं. मी तिथे थांबतेच. मग आई पुन्हा हात धरून ओढते. आजही आईने तसंच केलं. तिच्या मागेमागे जाताना त्या दुकानाच्या समोर एक मुलगा बसला होता तो दिसला. हा कधी इथे आला? काल तर नव्हता. तो काहीतरी वाजवत होता.

"तो मुलगा काय वाजवतोय?" मागे वळून वळून पाहत मी आईला विचारलं. पण तोपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो. आईने मान वळवून पाहिलं.
"बाजा."
"पण तिथे का बसला आहे तो?"
"भिकारी आहे."
"म्हणजे?"
"नंतर सांगेन. आता उशीर होतोय गं."
"पण त्याच्या बाजूला ताटली का आहे?"
"त्यात पैसे टाकावेत येणार्‍याजाणार्‍यांनी म्हणून."
"पैसे कशाला?"
"पोटासाठी"
"पोटासाठी पैसे का लागतात?"
"म्हणजे पोट भरण्यासाठी. बाजावर गाणी वाजवतो आणि पैसे मिळवतो तो, कुणी काही दिलं तर घेतो. जगायला पैसे लागतात. आता प्रश्न विचारू नकोस."
बापरे, काय म्हणाली आई आत्ता? मला काही समजलंच नाही. मी तशीच उभी राहिले. ती चिडली.
"तू काय म्हणालीस ते सांग आधी."
"पैसे मागतोऽऽय. जगायला पैसे लागतात."
चिडली की आई सावकाश सांगते पण खूप जोरात. मला आता कळलं. मी म्हटलं,
"मग त्याची आई का नाही आणत पैसे? तू आणि बाबा आणता तसे."
आई काहीच बोलली नाही.
"आपल्याकडचे पैसे देऊया त्याला?"
आईच्या पर्समध्ये नेहमी पैसे असतात. पैशांनी कसं जगायचं असतं? पण जगायचं म्हणजे काय करायचं? विचारलं नाही आईला. किती गं तुझे प्रश्न, असं म्हणत ती खेकसते.
आई तशीच चालत राहिली. मी तिला हात धरून मागे ओढलं. ती वैतागली. रोज वैतागते तश्शीच.
"नको गं. माझ्याकडे नाहीत पैसे आणि उशीर होतो आहे."
"आहेत. तुझ्या पर्समध्ये पैसे आहेत."
आता मात्र ती हसली. किती छान दिसते आई हसली की. मग तिची भीती वाटत नाही.
"तुला कसं माहीत गं ठमे?" माझा गाल ओढत आई म्हणाली. मी गाल खसखसा पुसले. कसं या मोठ्या माणसांना कळत नाही गाल ओढले की किती दुखतं ते.
"तूच सांगतेस. पण दे ना ते पैसे त्या मुलाला."
"नको."
"का नको पण? "
"आपल्याकडचे संपतील."
"म्हणजे आपण भिकारी होऊ?" आईने एकदम माझ्या पाठीत धपाटा घातला. किती लागतं. मी तिच्याकडे रागारागानं पाहिलं.
पण तीच रागावून म्हणाली, "काहीतरी बोलू नकोस गं."
"अगं, पण तूच सांगतेस ना त्या मुलाकडे पैसे नाहीत म्हणून तो भीक मागतो." आता मला रडायलाच यायला लागलं. पण मी रस्त्यावर रडत नाही.
"हं." आईचं लक्ष नसलं की नुसतं ’हं’ करते. मग मी पुन्हा तेच म्हटलं.
"पैसे मिळाले की तो काय करतो?"
"किती बोलतेस मीनू तू. लहान आहेस. मोठी झालीस की सांगेन."
मी नाक उडवलं. आईला उत्तर द्यायचं नसलं की ती असंच करते. रागारागानं पाय आपटत मी तिच्याबरोबर चालत राहिले. काकूचं घर येईपर्यंत.

आजपण तो मुलगा तिथेच होता. मी हळूच आईचं बोट सोडलं, तिला कळलंच नाही माझं बोट सुटलं आहे. मी त्या मुलासमोर गेले. त्यानं लगेच ताटली पुढे केली.
"तू भिकारी आहेस?"
तो काही बोलला नाही. मी त्याच्या ताटलीत पाहत होते. खूप नाणी होती.
"आहेत की तुझ्याकडे आता पैसे. आता तू भिकारी नाहीस."
त्यानं उत्तरंच दिलं नाही. नुसताच पाहत राहिला.
"तू खेळायला येशील माझ्याकडे?"
"खेळायला म्हणजे?" त्याच्या स्वरात उत्सुकता होती.
मी त्याला सांगणार होते खेळ म्हणजे काय, त्याच्याआधीच तो म्हणाला,
"तू खायला देशील मी आलो खेळायला तर?"
"आईला विचारून सांगते. पण तू ये. आई नाही म्हणाली तर माझा खाऊ मी तुला देईन."
मी उड्या मारत आईला गाठलं. तिचं बोट धरलं.

2013_HDA-sajaaN.JPG

रोजच्यासारखं मी बागेत उड्या मारत होते. बाबा मला घरी घेऊन येतात काकूंकडून. सॅंडविच करून देतात, नाहीतर दूधबिस्किटं. बाबा माझ्याशी गप्पा मारत चहा पितात. मग जाऊन झोपतात. म्हणतात, जा पळ, बागेत खेळ आता.
तितक्यात एक मुलगा बागेच्या फाटकाशी येऊन थांबला. फाटकापाशी गेल्यावर मला कळलं, ’अय्या, हा तर भिकारी.’
"मी खेळायला आलोय."
खूप आनंद झाला मला. फाटक उघडलं आणि म्हटलं,
"तू कंगवा केला आहेस ना? मी ओळखलंच नाही तुला."
तो फक्त हसला.
"ये ना. काय खेळूया?"
"मला नाही खेळता येत. मी कधीच खेळत नाही."
"मग तू काय करतोस?"
"बाजा वाजवतो."
"आपण पकडापकडी खेळूया. सोप्पं असतं."
तो बघत राहिला. मग मी त्याला पकडापकडी म्हणजे काय, ते सांगितलं. तर तो इतका हसला, इतका हसला की त्याच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. माझे गाल एकदम फुगले. आई म्हणते तसे, पुरीसारखे टम्म.
"पकडापकडी म्हटल्यावर वेड्यासारखा हसतोस काय?"
"हा काय खेळ झाला? पोलीस दिसले की आम्ही असेच पळतो." तो पुन्हा हसायला लागला. मी त्याला ढकलून दिलं. तो मला ढकलायला निघाला तशी मी पळत सुटले. तेवढ्यात आई आली.
"अरे, अरे... थांब गं मीनू." आईनं माझा दंड पकडला.
"आणि हा कोण?"
तो तसाच उभा राहिला.
"अरे नाव काय तुझं?"
"पक्या"
"म्हणजे पंकज?"
"नाही पक्याच."
"असं कसं असेल. मीनूसुद्धा नाव विचारलं की मीना असं सांगते."
"पण माझं नाव पक्याच आहे." तो चड्डी थोडीशी वर करून मांडी करकरा खाजवत होता. आईला ते अजिब्बात आवडलं नाही. मला सांगायचं होतं तो कोण आहे ते. मी तिचा हात धरून ओढत होते. तसं केलं की ती रागाने बघते माझ्याकडे, पण मग मला कळतं ती माझं ऐकतेय म्हणून. पण तिने पाहिलंच नाही. पक्याशीच बोलत राहिली.
"आई, आज रस्त्यावर बाजा वाजवत होता ना, तो भिकारी आहे हा." मी जोरात सांगितलं तिने ऐकावं म्हणून.
आई नुसतीच एकदा माझ्याकडे, एकदा पक्याकडे पाहत राहिली. पक्या रडायलाच लागला.
"चल गं आत. पक्या तूही जा घरी. रडत नको उभा राहूस इथे." आई रागावलीच एकदम. रागावली की आईची खूप भीती वाटते.
"पण माझा खाऊ? मीनू म्हणाली मी खेळलो तर ती खाऊ देईल."
"चेंगट नुसता. उद्या देईन." आईने माझं बकोट धरून ओढतच नेलं मला घरात. पक्यालापण तिथून जायला लावलं. पक्याला खाऊ द्यायचाच म्हणून मी भोकांड पसरलं. बाबा आतूनच ओरडले.
"मीनू, काय चाललं आहे? इकडे ये." मी रडतरडत बाबांच्या कुशीत शिरले. आईशी कट्टी केली.

पण आईने कबूल केलं तसं माझ्या हातात खाऊ दिला पक्यासाठी दुसर्‍या दिवशी.
"दे त्याला आज जाताजाता. पण आपल्याला पक्या कोण कुठला काही माहीत नाही. अशा मुलांशी खेळायचं नसतं. आज येऊ नको म्हणून सांग त्याला."
"अशा मुलांशी म्हणजे?" पण आईने उत्तर दिलं नाही. ती चालतच राहिली. पक्याला मी खाऊ दिला, पण आज येऊ नकोस, असं नाही सांगितलं. पक्या एकदम गोड हसला खाऊ पाहून. मलापण खूप आनंद झाला. मी उड्या मारत आईच्या मागे धावतधावत पोचले.

आज आईला सुट्टी. बाबांनापण. आई म्हणाली, संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊ आज, मस्त मूव्ही टाकू. बाबांनी माझा पापा घेत होकार दिला. आईने माझ्या छान वेण्या घालून दिल्या. किती दुखतं ती वेण्या घालते तेव्हा. पण नंतर पापा घेते तो आवडतो मला. म्हणाली,
"पळा आता. खेळ जा बाहेर. मी येते तयार होऊन." आई मला खूप आवडली. बागेत आईने खूप फुलं लावली होती. मी धावतधावत जाऊन आईला लाललाल गुलाबाचं फुल दिलं. आईने पुन्हा एक पापा घेतला. किती पापे घेतात ही मोठी माणसं. मी तो खसाखसा पुसला आणि खेळायला गेले. तितक्यात पक्या आला. मी फाटकापाशी धावतधावत गेले. आईने सांगितलं होतं, त्याला येऊ नकोस म्हणून सांग.
"मी खेळायला आलो आहे."
"हो पण आत्ता नाही खेळता येणार. आम्ही ना बाहेर चाललो आहोत. जेवायला." त्याचे डोळे एकदम चकाकले.
"मी पण येऊ?"
"तू तुझ्या आईबाबांबरोबर जा ना. आईबाबांबरोबरच जायचं असतं."
"मला नाहीत आईबाबा."
"म्हणजे? सगळ्यांना असतातच आई बाबा."
"पण मला नाहीत."
"का?"
"माझे आईबाबा मेले."
"मेले? म्हणजे काय?"
तितक्यात आई, बाबा बाहेर आले तसा तो पळालाच.
आई म्हणालीच,
"अगं तो पक्या ना? त्याला यायचं नाही म्हणून सांगितलं नाहीस का?"
"त्याचे आई बाबा मेले. म्हणजे काय गं?"
"कुणी सांगितलं तुला?"
"त्यानेच."
"अगं, किती छोटी आहेस अजून तू. आत्ता नाही कळणार तुला." आईने पुन्हा तेच सांगितलं. मी मोठी होणार तरी कधी? तेवढ्यात बाबा म्हणाले,
"मेले म्हणजे देवाघरी गेले. आजीसारखं."
"आजी येणार आहे परत, तसे पक्याचे आई, बाबापण येतील."
बाबांनी मला जवळ घेतलं. केसातून हात फिरवले माझ्या आणि म्हणाले,
"आणि असं रस्त्यावरच्या मुलांशी बोलायचं नसतं."
"का?"
"नसतं बोलायचं."
"पण का?"
"नंतर सांगतो."
"नाही आत्ताच सांगा", मी गाडीत न बसता पाय आपटत राहिले.
"काय वैताग आहे हिचा. हट्टी आहे नुसती", गाडीत बसलेल्या आईने डोळे मोठे करत दारच लावलं. मला आणखी रडायला आलं. पण तितक्यात आईने दार उघडलं.
"या आत." मग आईने भिकारी, पैसे सारं काही नीट समजावून सांगितलं. काहीकाही मुलांना आई, बाबा का नसतात तेही. पुढचं ती उद्या सांगणार आहे. माझं डोकं लहान आहे, त्यात एका दिवशी सगळं मावणार नाही म्हणून.

आज काकूंकडे जाताना मी माझ्या वाट्याची बिस्किटं खिशात ठेवली. अजिब्बात प्रश्न विचारले नाहीत आईला आणि जाता जाता पक्याच्या हातात पटकन दिली. मागे वळून पाहिलं, तर तो मिटक्या मारत खात होता. मला वाटलं, मीपण त्याच्या बाजूला जाऊन मिटक्या मारत खावं. त्याचा बाजापण वाजवावा. पण आज बाबा मला नीट सांगणार आहेत, पक्याशी मी का खेळायचं नाही ते. काकूंकडे मजा येते खूप. मी तर पक्याला विसरूनच जाते तिथे गेले की. काकू खूप गोष्टी सांगतात, लपाछपी खेळतात. लाडू देतात. काकूंकडे खूप मुलं येतात. त्यांच्याशी खेळायला मलापण आवडतं. फक्त सोनू सारखी रडते. पण काकू तिला ओरडत नाहीत. बाबा गाडीतून येतात. मग आम्ही घरी जातो. घरी जाताना मला पक्याची आठवण होते. आज घरी आल्यावर मी बाबांना म्हटलं,
"बाबा, आता सांग ना पक्याशी मी का खेळायचं नाही."
"अं?" ते चहा पीत होते. ओठाला लागलेला चहा पुसत त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मला खूप हसायला आलं. मनिमाऊसारख्या मिशा दिसत होत्या त्यांच्या.
"सांगा ना", मी हसतहसत म्हटलं. मिशा पुसत तेही हसले.
"आज नाही गं बेटा. दमलोय मी." बाबा झोपायला गेले. मी खेळायला गेले बागेत. पण आज पक्या आला नाही. मी मग झोक्यावर खूप झोके घेतले. उंच झोका गेला की बाजूच्या घरातली पिनू खेळत असली तर दिसते. मग तीपण तिच्या बागेत झोक्यावर बसते. आम्ही उंचउंच जातो आणि खूप हसतो एकमेकींकडे बघत. आई आली की मगच मी घरात जाते.

आज पक्या आल्यावर आम्ही खूप खेळलो. बाबांना कळलंच नाही. ते झोपून गेले. मी पक्याला सांगितलं होतं. आवाज नाही करायचा. बाबा उठले तर खेळता नाही येणार आपल्याला. तो बरं म्हणाला.
आई आली आणि पक्या पळालाच.
"चल घरात. बरं झालं आपला आपणच गेला. पुन्हा पुन्हा तेच. तुला सांगितलेलं तू ऐकत नाहीस. त्याला सांगून काही उपयोग नाही." ती तरातरा आत गेली. बाबांना उठवलंच तिने.
"हिला सांग रे, का नाही खेळायचं त्या पक्याबरोबर." बाबा डोळे चोळत उठले.
मला जवळ बसवून म्हणाले, "अगं तो वाईट मुलगा आहे."
"नाही. तो चांगला आहे."
" त्याला आई, बाबा नाहीत. तो शाळेत जात नाही. भिकारी मुलं चांगली नसतात बेटा."
"नाही तो चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे." बाबांनी एक फटका दिला तसं मला खूप रडायला आलं.
आईने मला पटकन जवळ घेतलं. बाबांना चहा दिला. मलापण पुन्हापुन्हा समजावून सांगितलं. मला फक्त कळलं की, पक्याशी मी खेळायचं नाही. का ते समजतच नाही मला...

मग बाबा झोपले की थोडा वेळच पक्या खेळायचा. त्याला माहीत होतं, आई कधी येते. ती यायच्या आधी तो जायचाच. मी नाही काही सांगितलं त्याला. पण त्याला सगळं कळतं. आईला मी त्याच्याशी खेळलेलं आवडत नाही, हे कळलंच त्याला, पण मला त्याच्याशी खेळायला आवडतं हेपण. माझा खाऊ आता मी रोज त्यालाच देते. आईला कळतपण नाही. आईला वाटतं मी पक्याशी आता बोलतच नाही. पक्याला ही गंमत सांगितली. पक्या म्हणाला, "तुझ्या आई बाबांमुळे तुला खोटं बोलायचं कसं ते कळलं."
पक्या माझ्यापेक्षा मोठा आहे नं, त्यामुळे त्याला सगळं समजतं. मीपण आता मोठी व्हायची वाट पाहते आहे.

मग असेच खूप दिवस झाले. आता मी तिसरीत आहे. मला खूप मैत्रिणी आहेत. आईबाबांना काही धड माहीतच नाही, पण भिकारी कसे असतात, त्याच्यांमागे पोलीस का लागतात, मेलं की आपण कुठे जातो, परत नाही काही येता येत. ते सगळं माझ्या मैत्रिणी सांगतात. पक्या खेळायला येतो, पण आता मला नसतं खेळायचं त्याच्याशी. आवडतच नाही त्याच्याशी खेळायला. मैत्रिणी हसतील ना मला त्याच्याशी खेळले तर. पण मला त्याला ते सांगायचं नाही, म्हणून मग मी थोडा वेळ खेळते त्याच्याशी.

काल आई बाबांना सांगत होती ते मी ऐकलं. ती म्हणाली, "आली एकदाची मीनू आता माणसात. पक्याशी खेळत नाही विशेष. तिला वाटत होतं आपल्याला ठाऊक नाही ती त्याच्याशी खेळते, चोरून खाऊ देते त्याला ते. मला आवडायचंच नाही अगदी. पण एकीकडे वाटायचं जाऊ दे, तो मुलगाही बाजा वाजवून स्वत:चं पोट भरायचा प्रयत्न करतो, तर कशाला जास्त विरोध करा. तसा काही वाईट नाही तो. आणि त्याला तरी कोण आहे. एकदा शाळेत गुंतली की मागे पडेल हे. तसंच झालं ना, शाळेनं शहाणं करून सोडलेलं दिसतं आहे. सांगत नाही काही, पण पक्याचं येणं कमी झालं आहे. "

मला आईबाबांनी खोटं बोलायला शिकवलं आणि शाळेने शहाणं केलं. आहे की नाही गंमत??

- मोहना

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

मस्तय!

बालकथा म्हणून चांगली वाटली. विशेषतः लहान पात्रांच्या तोंडी फार लाडेलाडे संवाद नाहीत हे आवडलं. पण रस्त्याच्या कडेला बसून बाजा वाजवून पोट भरणार्‍या लहान मुलाच्या तोंडी पुस्तकी भाषा आणि इतर पात्रांच्या तोंडी बोली भाषा खूप खटकली वाचताना.

सिंडरेला +१

आवडली :)

कथा चांगली आहे. लहान मुलांचे विश्व निरागस असते.

पात्रांच्या तोंडच्या भाषेचा बाज थोडा खटकतो.

:) छानच ..

कथा आवडली मोहना !!
छान लिहीलय

सर्वांना धन्यवाद. अल्पना चित्र आवडलं.

कथा आवडली.

कथा आवडली. लहान मुलीचं भावविश्व छान रेखाटले आहे.

लहान मुलीचं भावविश्व छान रेखाटले आहे. >>> +१

लहान मुलांच्या भावविश्वाचा इतका समरसून विचार करणं हेच फार दुर्मिळ. मला फार आवडली ही गोष्ट!

चांगली लिहिली आहे कथा.
भाषेच्या बाजाबद्दल सिंडरेलाशी सहमत.

सिंडरेलाला अनुमोदन.

कथा आवडली.

कथा आवडली असं नाही म्हणता येणार, पण चांगली लिहिलीये. वाचताना अनेक प्रश्न पडले, भवतालाबद्दल, स्वतःबद्दल आणि आपल्या मुलांना आपण देत असलेल्या उत्तरांबद्दलही.

सर्वांना धन्यवाद!
सिंडरेला - कथा वाचली मी पुन्हा पुन्हा पण पक्याच्या तोंडी जे संवाद आहेत ते बोलीभाषेत कसे करता येतील ते समजलं नाही. एखादं उदाहरण देणार का प्लीज.
गुरु - हे असे प्रश्न पडावेत हीच इच्छा होती कथा लिहताना.

छान आहे.

Khupach chaan. :) I could see myself and my daughter there. The dialogues are perfect too between mom and the daughter.

Vidya.

आवडली कथा.

चांगली लिहिलीये. वाचताना अनेक प्रश्न पडले, भवतालाबद्दल, स्वतःबद्दल आणि आपल्या मुलांना आपण देत असलेल्या उत्तरांबद्दलही.
>>+1

चांगली लिहिलीये. वाचताना अनेक प्रश्न पडले, भवतालाबद्दल, स्वतःबद्दल आणि आपल्या मुलांना आपण देत असलेल्या उत्तरांबद्दलही. >> +१

<<<<<<मला आईबाबांनी खोटं बोलायला शिकवलं आणि शाळेने शहाणं केलं. आहे की नाही गंमत??>>>>>>> जरा खटकतय का ?

बाकी कथा मस्त .......

चांगली आहे!

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

@ सुहास्य - निरागसता हरवण्याची जी पहिली पायरी असते ती कथेतून शब्दबद्ध केली आहे आणि त्याचं उपहासात्मक सार म्हणजे शेवटचं वाक्य आहे.