अ डिनर विथ ग्रॅनी

ट्रिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्ंग!!

विनीनं जोर एकवटून दाराची बेल वाजवली. खरंतर तिला त्याचाही कंटाळा आला होता. आधीच ट्रेनचा दगदगीचा प्रवास, त्यात स्टेशनवर उतरल्यावर रिक्शासाठी पळापळ. अगदीच उबायला होत असे विनीला. संध्याकाळी सहानंतर तिची बॅटरी अगदीच डाउन होई. आताशा तिला ऑफिसचा मनस्वी कंटाळा येऊ लागला होता. दुसरं काही करायला वेळच मिळत नसे. या ऑफिसच्या तर ना..... मनोमन वैतागलीच ती.
कितीतरी दिवसांनी ती आज आजीकडे आली होती. आजीकडे यायचं तर ट्रेन बदलाव्याच लागत. त्यामुळे इच्छा असूनही पटकन जाता येत नसे. आज आईनं 'जाऊन येच' असं सांगितलेलं.. आजीची तब्येत जरा जास्तच बिघडलीय हल्ली...विनीनं हलकासा एक सुस्कारा सोडला.

आजोबांनी दार उघडलं. "आलीस! ये ये!" म्हणत ते बाजूला झाले. ऐंशी पार केलेल्या आजोबांकडे विनीनं क्षणभर बघितलं. सहजच तिची नजर त्यांच्या सुरकुतलेल्या हातांकडे गेली. ते हात पाहून तिचं मन अगदीच थकून गेलं. नकळत तिनं मान हलवली आणि चपला काढून समोरच्या स्टॅंडवर ठेवल्या.

"गर्दी होती गाडीला ??"

"हो!! गर्दी काही कमी होत नाही. ती वाढतेच आहे दिवसेंदिवस."

आजोबांनीही सारं काही उमजगल्यात मान हलवली.

विनीनं आपला मोर्चा बाथरूमच्या दिशेनं वळवला. समोरच किचनमध्ये मामीचं जेवणाचं काम लयीत चाललं होतं. विनीची चाहूल लागताच मामीनं मागं वळून पाहिलं. विनीला पाहून मंदसं हसली. विनीनंही स्मितहास्य केलं.
हातपाय धुऊन बाहेर येताच विनी स्वयंपाकघरात गेली. पिठल्याचा खमंग वास सुटला होता.
"मामा आले नाहीत अजून?" मामीनं पुढे केलेला पाण्याचा पेला हातात घेत विनीनं विचारलं.
"नाही, हल्ली उशीर होतो त्यांना. ऑडिट चालू आहे म्हणे.. "
"सोहमचा कसा चालू आहे अभ्यास?"
"ठीक चालू आहे, येईल आता दिवाळीत घरी."
"आजीचं कसं आहे आता?? आवाज येत नाहीये. तब्येत जास्त बिघडलीय असं ऐकलं!"
"हो, हल्ली जरा जास्त नरम असते तब्येत. चिडचिडही फार करतात. विसरतातही हल्ली खूप. भान नसतं बर्‍याचशा गोष्टींचं. बेभरवशी झालंय सगळं. फार त्रास होतोय त्यांना. आता झोपल्यात.." खोल आवाजात मामीनं उत्तर दिलं.
"बघते मी", म्हणत विनीनं पेला खाली ठेवला.

बाहेर आल्यावर तिनं खोलीत डोकावून पाहिलं. आजी गुरफटून शांत झोपलेली. खरंच प्रकृती प्रचंड नाजूक झाली होती. थकलेला चेहरा. ओढून घेतलेले पाय. विरळ झालेले केस. बाजूच्या टेबलावर औषधांचा ढीग. आपल्याला लहानपणी अंगाखांद्यांवर खेळवलेल्या आजीचं आताचं असं रूप पाहून विनीच्या घशात दाटून आलं. काहीही न बोलता तिनं दार लोटलं.

"विनी, अगं उठतेस का? नऊ वाजलेत. जेवायचं नाही का?" मामीनं खुर्चीत पसरलेल्या विनीला हलवलं.

'अरेच्च्या! आपण कधी झोपलो? आत्ताच तर मामीशी आणि आजोबांशी बोलत होतो ना? कधी झोप लागली आपल्याला?' विनीनं डोळे किलकिले करत स्वतःशीच म्हटलं.

"अं.. हो, हो. जेवायचं आहे. तुम्ही सगळे जेवलात का?" घड्याळाकडे पाहिलं तर काटा नऊचा आकडा ओलांडत होता.
"नाही गं, जेवायचं आहे. आजीचंपण व्हायचं आहे. त्याही आत्ताच उठल्यात. तूही आटप आणि आजीच्या खोलीत ये. तिथेच आणते सगळ्यांचं. त्यांनाही बरं वाटेल."
"हो, चालेल."

आजी एव्हाना उठली होती. विनीनं खोलीत पोचल्यापोचल्या तिला घट्ट मिठी मारली. तोळामासा प्रकृती झालेली आजी सहज दोन हाताच्या कवेत मावून गेली. अगदी अलगद. दोनतीन वर्षांपूर्वीचं आजीचं साजिरं, देखणं रूप आठवून विनी मनोमन खंतावली. केवढी म्हातारी झालीये ही!! छे, ही आपली आजी नव्हेच. कुठे गेलं ते हिचं तेज? रया निघून गेलीये सगळी. एवढं या अल्झामायरनं ग्रासलं हिला. दमून गेलीये ही अगदी.

विनीच्या त्या घट्ट मिठीत आजीला गुदमरल्यासारखं झालं. सुटकेसाठी ती चुळबुळायला लागली. विनीच्या ते लक्षात येताच तिनं मिठी सैल केली.
"काय आजी, कशीयेस ?" विनीन हळुवारपणे विचारलं.
पाच सेकंद घेतलेन् आजीनं तिला ओळखायला. पण तेवढाही वेळ विनीला अस्वस्थ करून गेला. खुपलंच तिला ते. ओळख पटताक्षणीच आजीच्या चेहर्‍यावर विनीला चिरपरिचित असलेलं हसू आलं. पण त्यात आता श्रांतपणाची भावना अधिक जाणवली तिला. कसंतरीच झालं तिला.

"विनी ना? आलीस कधी? ये ये", एवढं शब्द बोलून आजी गप्प राहिली. जणू पुढे काय बोलायचं, हे तिला कोडं पडलं असावं. त्या शब्दांनी विनी मात्र आनंदली.
"कधीच आलेय. आजी काय गं आजारी पडतेस अशी? चल पटकन बरी हो."
"बरीच आहे मी. काय धाड भरलीये मला. सगळ्यांनी मिळून मला आजारी पाडायचं ठरवलं आहे का?" आजीचा स्वर थोडा चिडखोर झाला.

यावर विनी काही बोलणार इतक्यात ताट घेऊन आत आलेल्या मामीनं तिला डोळ्यांनी खुणावलं. विनी गप्पच बसली. पाठोपाठ आलेल्या आजोबांनी बेडवरची चादर ठीकठाक केली. त्यावर वर्तमानपत्र पसरवलं आणि मामीकडून ताट घेऊन व्यवस्थित आजीच्या पुढ्यात ठेवलं. विनीही आपलं ताट घेऊन बेडवरच फतकल मारून बसली. एवढं सगळं होईपर्यंत आजी सर्वांकडे टुकूटुकू पाहत होती. नजरेत काहीसे ओळखी-बिनओळखीचे भाव. चेहर्‍यावरचा चिडखोरपणा गोठलेला.

"हं, ही घे गोळी", आजोबांनी हात पुढे करत म्हटलं.
"किती गोळ्या देताय? आताच तर खाल्ली ना?" आवाजात राग धुमसला.
"अगं, ती दुपारी घेतली. ही रात्रीची गोळी."
"नकोय मला. नुसत्या गोळ्या.. गोळ्या.. किती खायच्या त्या? बाहेर काढा इथून मला या हॉस्पिटलातून. कोंडून ठेवलं आहे इथे मला. घरी जायचंय मला माझ्या. मला नाही राहायचं इथे. कळलं तुम्हाला?" रागावल्या सुरात समोरचा हात तिने धुडकावून लावला. गोळी कुठच्याकुठे उडाली.

तेवढ्यात मामी लगबगीनं पुढे झाली. एकाच वेळी चिडखोरपणाने, रागावल्यामुळे जवळ जवळ दमलेल्या आजीला तिनं नीट बसवलं. तिच्या तोंडातून बाहेर पडणारी लाळ पुसली. साडी नीट केली तिची. पाकिटातून दुसरी गोळी काढून बाबापुता करून तिला ती घ्यायला लावली. प्रचंड धुसफूस करून शेवटी आजीनं नमतं घेतलं आणि सगळं केलं.

आतापर्यंत मूक राहिलेली विनी आजीचा हा अवतार पाहून थक्क झाली. अल्झामायरमुळे आजी चिडखोर , विसराळू झालीये, हे तिला माहीत होतं. पण डोळ्यासमोर घडलेल्या या प्रसंगामुळे तिला हबकायलाच झालं. काही न सुचून तिनं आजोबा, मामीकडे पाहिलं. दोघांनीही तिला जेवायला सुरुवात कर, अशा अर्थाची खूण केली. मान डोलवून विनीनं ताट ओढून घेतलं. आजीकडे पाहिलं तर ती बरचसं काढून ठेवत होती.

"अगं काय हे, खा ना थोडंफार, ताकद कशी येणार अशानं?" आजोबांनी समजावण्याच्या सुरात म्हटलं.
"काही बोलू नका. जेवणाचे चोचले हवेत तुम्हांला. इथे काम करून झेंडू तुटतो माझा. नोकर आहे मी या घरात. आत्ताच ते केवढाले कपडे धुतले. भांडी घासली. केर काढला. दम लागतोय त्यानंच.." आजी एकदम उसळलीच.

आजीचा हा असंबद्ध सूर ऐकताच आजोबांनी पडतं घेतलं. जणू त्यांना याची सवय झाली असावी.

"आई, विनीचं प्रमोशन झालंय. आता मॅनेजर झालीये ती", मामीने सहेतुक विनीकडे पाहत म्हटलं.
"हो, हो आजी. मॅनेजर झालेय ना आता. सॅलरी पण वाढणारे", विनीने उमजून तिची री ओढली.

एव्हाना आजी थोडी शांत झाली. स्थिरावली. कळल्यागत तिच्या चेहर्‍यावर हसू फुटलं. विनीच्या पाठीवरून तिनं हात फिरवला. "छान!" अस्पष्टसा हुंकार तोंडून बाहेर पडला. मग विनीचीही कळी खुलली.

"अगं आजी, मला आता सेपरेट केबिन मिळणारे, आणि गाडीपण. आहेस कुठे?" आनंदातच तिने जेवायला सुरुवात केली.

जेवताजेवता तिचं लक्ष आजीच्या ताटाकडे गेलं. आजीनं नुसतंच अन्न चिवडलं होत.

"अगं, हे काय आजी, जेवायला सुरुवात नाही केलीस का ?? ते पिठलं घे ना. छान बनवलंय मामीनं", विनीनं ताट सरकवत म्हटलं.
"जेवते, जेवतेय गं."

संथ लयीत जेवणं चालली होती.

"घाटकोपरचे आजोबा आले होते ऑफिसात", विनीनं शांतपणे जेवत असलेल्या आजोबांकडे पाहत म्हटलं.
"कोण राजाराम का?"
"हो! आमच्याच भागात आले होते. तेव्हा फेरी मारली. थकलेत तेही आता."
"असणारच. साधारण माझ्याच वयाचा आहे तो. एखादं वर्ष पुढेमागे", पाणी पीत आजोबांनी म्हटलं.
"राजारामाबद्दल बोलतेस का?" आजीनं मध्येच विचारलं.
"हो, आजी!"

"आमचा राजा म्हणजे एकदम धडाडीचा माणूस, माझ्यापेक्षा मोठा. वाचण्यात हुशार. बारावी केलीन् गावात आणि पुढे येऊन शिकला. खूप कष्ट घेतले. मोठा झाला", आजी बांध फुटलेल्या धरणाच्या पाण्याप्रमाणे बोलायला लागली. चेहरा प्रफुल्लित झालेला.
"पहिल्यापासूनच हुशार तो! नोकरी न करता व्यवसाय सुरू केला. मेहनत करून पुढे आला. अण्णांचा फार जीव त्याच्यावर..." ती आता थांबण्याच्या मन:स्थितीत दिसत नव्हती.

मामीनं तेवढ्यातल्या तेवढ्यात आजीचं लक्ष नाहीसं पाहून ताट व्यवस्थित केलं. साडीवर सांडलेलं अन्न हळूच टिपून घेतलं. अशक्तपणामुळे आजीच्या शारीरिक क्रिया मंदावल्या होत्या. भान उरत नव्हतं. तेवढ्यात आजोबांचं जेवण आटपलं आणि ते खुर्चीवर येऊन बसले. विनी मात्र अजून जेवतच होती.

"माझंही मग लग्न झालं चैत्रात. अण्णांनी खूप मोठं कार्य केलं. पाहुणे आलेले बरेच. सुलुआत्या, बाळूमामापण आलेले. अख्खं गाव लोटलेलं. अण्णांचा दरारा होता तसा. माझे अण्णा..." बोलताबोलता आजीनं खरकट्या हातानंच वर पाहत हात जोडले. आठवणीत हरवून गेली होती ती.

विनीनं हसून आजोबांकडे पाहिलं. तेही गाल्यातल्या गालात हसत होते.

"आजी, तू बरी हो. मग आपण सगळेच गावाला जाऊया", विनीनं जेवण आटपत म्हटलं.
"हो, हो, केशव आला होता परवा. मला म्हणाला, गिरिजा चल आता गावाला. महाशिवरात्री जवळ येतेय. मोठा उत्सव ना आपला. यावर्षी तर पालखीचा मान आपल्याकडे असणारे. मुंबईला आला होता खरेदीला. तिकीटपण काढलंय माझं." उत्साहानं चेहरा नुसता फुलून गेला होता तिचा. त्याच नादात ती जेवत होती. भाजीतल्या मिरचीकडेही लक्ष नव्हतं तिचं.

हे ऐकताच विनी बावचळली.
"केशवआजोबांना जाऊन तर दोन वर्षे झाली ना..." ती स्वतःशीच पुटपुटली. काही सुधारणार एवढ्यात तिची नजर मामी व आजोबांकडे गेली. दोघेही शांत होते. जणू त्यांना सवयीचं होतं सारं. विनीनं मग गुपचूप आवरतं घेतलं.

विनीचं झालं तरीही आजी जेवतच होती. जेवत कसली, अन्न चिवडत होती. काला झाला होता जेवणाचा. मध्येच मनात आलं की घास घ्यायचा नाहीतर शांत बसून राहायचं. एकटक पाहत... कुठेतरी हरवून गेल्यासारखी नजर. अंगात ताकद नव्हती. अर्धंअधिक तर खालीच सांडत होतं. जमत नव्हतं जेवायला. तरीही स्वतःच्याच हातानं जेवायचा हट्ट कायम होता.

"अगं आजी, जेव ना लवकर. ती सीरियल पाहायची आहे नं आपल्याला?" थोड्या मोठ्या आवाजातच विनीनं म्हटलं.

आजीनं क्षणभर विनीकडे पाहिलं. तेच अनोळखी भाव परत आले तिच्या डोळ्यांत. विनी अस्वस्थ होऊन गेली. काय होतंय हे हिला सारखं? अशी ट्रांसमध्ये गेली की भीतीच वाटते एकदम.

"अगं विनी बघ काय म्हणतेय ते..." आजोबा शांतपणे म्हणाले.

"आजी, अगं, जेव ना. ताकद हवीय ना यायला. जायचं ना आपल्याला गावाला. चल जेव पटकन", विनीनं अजिजी करत म्हटलं.

आजी एकाएक शांत झाली. गप्पच बसून राहिली. हुप्प अगदी. काही बोलेचना अन् काही करेचना. विनीला कळलंच नाही एकदम अस काय झालं ते. बावरून गेली ती.

"अगं, थोडंच मीठ कमी पडलेलं गं आई.. आपण जेवढं टाकतो ना मीठ आणि पानात वाढतोच ना.. अण्णांनापण तसंच लागतं ना.. मी तसंच केलं गं आई.. पण सासूबाईंनी ऐकलंच नाही. बोल बोल बोलल्या गं मला.. मोठ्या नणंदबाई पण बोलल्या. हेच शिकवलं का पंधरा वर्ष आईनं, असं म्हणाल्या. धड स्वैपाकपाणी जमत नाही अजून. घरच्या कामाच्या नावाने बोंब आहे. कुठून आली काय माहीत... आमच्या पदरात पडलंय ध्यान असलं खुळचट, असं म्हणाल्या. आई, मी करते गं सगळं तू सांगितलं तसं .. कुठे री राहतं गं कमी. मी प्रयत्न करतेय गं सुधारण्याचा. आजपण थोडंसंच मीठ कमी पडलं गं. ह्यांनी पण माझी बाजू घेतली नाही हो अण्णा.. ताट सारून निघून गेले न बोलता. खूप वाईट वाटलं मला. अगदी एकच दाणा कमी पडला. शिक्षा केलीये मला सासूबाईंनी. जेवायलापण नाही दिलंय आज. कधीची उपाशी आहे गं आई. वाढ ना मला जेवायला. खूप भूक लागलीये..."

विनीनं चमकून आजीकडे पाहिलं. शून्यात गेलेली नजर. हात अजूनही ताटात फिरत असलेला. कापत असलेला आवाज...काष्ठवत झालेलं, दमलेलं, थकलेलं शरीर...विनीला भरून आलं एकदम. लहानपणीची खेळकर, कर्तबगार आजी आठवली तिला एकदम. हिच्याच मांडीवर आपण खेळायचो, झोपायचो. आई नसली की हट्ट करायचो. हवं ते मागून घ्यायचो. लाड करून घ्यायचो. सर्रकन् आठवलं तिला हे सारं..

"बायो गं!" म्हणत भरल्या गळ्यानं तिनं एकदम मिठीच मारली तिला...

डोळ्यांतल्या पाण्याचा निचरा करत विनीनं आजोबांकडे पाहिलं.. त्यांच्या डोळ्यांतही मेघांनी दाटी केली होती.

- जाई

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

सुरेखच ग. अगदी डोळ्यात पाणी आलं वाचता वाचता. :(

कठिण परिस्थिती :अओ:

गोश्ट वाचुन माझ्या आजी ची आठवण आलि. तिची हीच स्थिती झालि होती. सगळ अगदि असेच बोलणे असायचे रोज.

जाई, मन अगदि सुन्न झालं ग वाचून ! किती अवघड असतं ना हे सगळं ?

खरंच डोळे भरून आले वाचता वाचता. मलापण माझ्या दोन्ही आज्या आठवल्या, शेवटी काही महिने अंथरुणात होत्या, स्मरणशक्ती चांगली होती पण त्यांना असे बघून खूप वाईट वाटायचे.

वाईट वाटत राहिलं वाचताना. डोळ्यासमोर घडत असल्यासारखं. छान.

अगदी डोळ्यासमोर घडतेय असं वाटत होतं वाचताना. अशीच एक केस जवळुन बघितली, त्यामुळे ....
खुप छान लिहिलय.

जाई, खूप आवडली कथा. मनापासून लिहिलियस... त्यामुळे भिडते.

जाई, अजून सविस्तर वाचायला आवडली असती.

जे लिहीलयस ते छान आणि मनापासून लिहीलयस हे समजतय. पण मला अजून डिटेल्स वाचायला आवडले असते ह्या सेक्शन मधे आहे म्हणून आजाराच्या अनुशंगाने येणारे

पण जर विभागा बाहेर असती कथा तर आजीच्या स्वभावाचे, तिने आत्तापर्यंत आत दडवून ठेवलेल्या आणि तरीही ठुसठुसणाऱ्या तिच्या भुतकाळाचे

किंवा आजार+स्वभाव+नातेसंबंध इत्यादी ची गुंफण असलेले डीटेल्स वाचायला आवडले असते.

तू आम्हाला विहीरीत उतरवलं नाहीस, वरून काठावरून आजी दाखवल्येस असं वाटलं मला (विहीर खोल आहे हे जाणवतय पण ती खोली नजरेने बघतोय त्यात बुडून अनुभवत नाही आहोत असं वाटलं)

मला खात्री आहे तू राग मानणार नाहीस ह्या प्रतिक्रीये बद्दल आणि तू लिहू शकतेस ह्याची खात्री असल्यानेही मी हे लिहीतेय. तरीही अशा प्रतिक्रियेचा राग आला असेल तर आधीच माफी मागते :)

:(

कथा छान लिहिलीय.

आभार्स सार्याचे

प्राची ; प्रताय ; अन्जू ; विजय हे सगळ जवळून अनुभवल आहे

कथा चांगली लिहिली आहे.

जाई, माझं मनोगत तुला माहितीये. ह्या कथेत खूप जीव आहे... मला तरी ती अधिक कंगोर्‍यांनी फुलायला हवी होती.
शब्दचित्र प्रगट करण्याची तुझी हातोटी आहे. ती अधिक उपयुक्ततेनं वापरता आली असती असं प्रामाणिक मत.
डिमेन्शिया हा रोग रोग्यालाच नाही तर आजूबाजूच्यांना किती अन कसं हतबल करतो त्याचं चित्रण अधिक प्रभावीपणे यायला हवं होतं.
तरीही... तुझ्या धबडग्यातून लिहू शकलीयेस ती कथा चांगली आहे.

छान लिहिली आहेस जाई.प्रत्ययाचे शब्द आहेत..

आवडली!
पुलेशु!!

छान लिहिली आहेस कथा जाई. सुन्न झाल.

मनापासून आभार सार्याचे

कथा चांगली लिहिली आहे.

शूम्पी, मोहना +१ ..