वादळ

“अरे आता तू घरात कशी काय?” समीरने त्याच्याकडच्या चावीनं लॉक उघडलं आणि अनपेक्षितरीत्या मन्वा समोर बसलेली पाहून तो जवळजवळ दचकला. “तू आज कोलकत्याला जाणार होतीस ना?”
“फ्लाईट कॅन्सल झाली. एअरपोर्टवरून परत आले.” मन्वा हातातल्या पुस्तकावरून नजर न काढता म्हणाली. त्यानं विचारलं, “कशामुळे? ओह, ते दुपारी काहीतरी वादळाची सूचना वगैरे दिली होती... त्यामुळे का?”
“हो. काहीतरी वादळाची दिशा बदलली...” मन्वा नाराजीने म्हणाली.
“अच्छा, तरीच एवढं पावसाळी वातावरण झालंय होय. मला वाटलेलं मुंबईचा पावसाळा संपला; पण आमच्याकडे दिवाळीचा असा एक पाऊस पडतो, परतीचा पाऊस, तसलाच असणार हा पाऊस असं वाटलं होतं... पण गेले दोन दिवस या शिरीनने फार त्रास दिलाय.”
मन्वा काही न बोलता शांत बसून राहिली. गेल्या दोन दिवसापासून या शिरीन नावाच्या वादळाची सूचना सतत मिळतच होती. मीडियावाले तर वेड लागल्यागत “अब इतना स्पीड, अब इसका रूख मुंबईकी तरफ़” वगैरे बरळत होते. “माझ्या ऑफिसमध्ये पण आज हीच चर्चा चालू होती, आज रात्रीपर्यंत चक्रीवादळ इकडे सरकेल म्हणाले. तसं ते सरकू नये म्हणून कुठल्या तरी देवळात यज्ञ वगैरे पण चालू केलाय. सगळंच कॉमेडी. न्यूज वेबसाईट्सवरून सूचना येत होती सारखी ब्रेकींग न्यूज म्हणत, मग हळूहळू सगळा स्टाफ घरी जायचं म्हणायला लागला, मग म्हटलं जा घरी. म्हणून तर मी पण आज लवकर आलो.”
मन्वा यावर काहीही बोलली नाही. ही स्टंट क्वीन कोलकत्याला गेली असती तर घरी येऊन निवांत चार पेग मारले असते, आज घरी आहे म्हणजे जोरात टीव्ही लावायची पण सोय नाही, असं मनातल्या मनात म्हणत समीरने बाथरूममधे जाऊन ड्रेस बदलला.
“कॉफी घेणार आहेस का?” किचनमधे जाताना त्यानं विचारलं.
“नको,” परत मन्वाचं तुटक उत्तर आलं.
समीरनं त्याच्या पिशवीतलं भेळपुरीचं पार्सल बाहेर काढलं. ती नाही म्हणणार याची त्याला पूर्ण खात्री होती, बाहेरचं काही जंक फूड खाणं म्हणजे महापाप होतं तिच्या दृष्टीने. तरी त्याने विचारायचं म्हणून तिला “भेळ खाशील का?” असं विचारलं. मन्वाने नाही म्हणून फक्त मान हलवली. समीरने किचनमधे जाऊन कॉफी बनवली. पण आज त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. “समीर, बचके रहना रे बाबा | ज्वालामुखी कभीभी बरसेगा,” असं स्वत:शीच पुटपुटत त्याने तिच्यासाठी पण कॉफी बनवली.
कॉफीचा मग तिच्यासमोर ठेवला तेव्हा त्याने पाहिलं, मन्वाच्या डोळ्यातून पाणी येत होतं.
“काय झालं मन्वा?” त्याने काळजीने विचारलं. “काही प्रॉब्लेम आहे का?” या फ्लॅटवर रहायला येऊन चार महिने झाले तरी असं मन्वाच्या डोळ्यांतून पाणी वगैरे तो पहिल्यांदाच पाहत होता.
त्याच्या आवाजाने इतका वेळ पुस्तकाच्या पानाकडे नुसती बघत बसलेली मन्वा भानावर आली. “काही नाही... थोडी अपसेट आहे. कलकत्त्याच्या चान्स फार मोठा होता. फिल्मसाठी कोरीओग्राफीचा. बंगाली फिल्म होती, पण त्यांना मराठी लावणी कोरीओग्राफ करणारा हवा होता, आज नेमकी फ्लाईट कॅन्सल झाली. म्हणून थोडं वाईट....”
“ओके” समीर हलकेच म्हणाला. मन्वाच्या क्षेत्राबद्दल त्याचं ज्ञान अगदीच लिमिटेड होतं, तरीपण तिला थोडं बरं वाटावं म्हणून तो म्हणाला, “पण आज सगळ्याच फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात म्हणजे इतर कुणीही गेलं नसेल ना मुंबईमधून? मग ऑडिशन पोस्टपोन करतील ते. त्यात एवढं टेन्शन कशाला?”
“तसं होणार नाही. एक दोन दिवसांपासून ऑलरेडी ऑडिशन्स चालू आहेत त्यांच्या. मी गेलेच नाही तर नक्की चान्स दुसर्‍याला मिळेल.”
“फोन करून सांग ना त्यांना इथली कंडिशन.”
“ऑलरेडी केलाय मी फोन. त्यावर लेट्स सी एवढंच मोघम उत्तर मिळालंय सध्या....” मन्वा परत पुस्तकात डोकं खुपसत म्हणाली.
डिसेंबरचा महिना असूनपण दुपारपासून आभाळ भरलेलं होतं. वारा जोराने वाहत होता. अधूनमधून पावसाच्या एक दोन मोठ्या सरी पण येऊन गेल्या होत्या. अरबी समुद्रात कुठेतरी कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे एक भलंमोठं वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
“मी टीव्ही लावू का थोडावेळ? त्या चक्रीवादळाचं काय झालं ते तरी समजेल,” समीरने विचारलं. “अंजू कधी येणार, काही समजलं का?”
मन्वा परत पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. “माहित नाही... हल्ली रोज उशीराच येते ती,” वर न बघता ती म्हणाली. तेवढ्यात कुठेतरी धडामधुड वीज पडल्याचा जोरात आवाज आला. “बाप रे!” मन्वा उद्गारली.
समीरने टीव्ही लावला होता. न्यूज चॅनलवाले नुसते अकाण्डतांडव करत होते. “शिरीन आ रहा है मुंबईकी तरफ़ | प्रतिघंटा 240 किमी की रफ़्तारसे | मुंबईपे छाया शिरीन का खौफ़ |”
मन्वाने हातातलं पुस्तक मिटलं आणि बातम्या बघायला लागली. “हे शिरीन काये?”
“त्या सायक्लोनचं नाव आहे. दुपारी म्हणत होते की मुंबईकडे सरकणार नाही. बट लूक्स लाईक, ते इकडे सरकतंय. मुंबई-गुजरात एरिया धोक्यामध्ये आहे.” समीर बोलत असतानाच पुन्हा एकदा वीज पडल्याचा आवाज आला. “अंजूला फोन करून विचारतो ती कुठे आहे. एव्हाना ऑफिसमधून बाहेर पडली असेल. वाटेत कुठे अडकली नाही म्हणजे मिळवली,” समीर खिशातून मोबाईल घेत म्हणाला. “मन्वा, तुझा मोबाईल कुठाय?”
“आत माझ्या रूममध्ये,” मन्वा टीव्ही बघत म्हणाली.
“लगेच चार्जिंगला लाव, फुल चार्ज करून ठेव. वादळ आलं तर लाईट नक्की जाणार. मी लगेच डिनरसाठी ऑर्डर करून ठेवतो. लाईट गेले तरी प्रॉब्लेम नाही,” समीर म्हणाला आणि लगोलग त्याने अंजूला फोन केला. “हॅलो अंजू, कुठे आहेस? अच्छा, ओके. ट्रेन्स बंद झाल्या का? तुझ्यासोबत कोण आहे? चालेल. काही वाटलं तर फोन कर. नाही... मन्वा आहे इथेच माझ्यासोबत. हां ते ठिक आहे.... नाही... आता कुठे बाहेर नाही जात. घरी सुखरूप आहोत. टेक केअर. चल बाय.”
टीव्हीवर “गरज नसल्यास बाहेर पडू नका” अशी सतत सूचना देत होते. वेगवेगळ्या चॅनल्सवरून वादळ कुठे आहे आणि कसं पुढे सरकत आहे ते चित्रविचित्र नकाशे आणि ग्राफिक्स काढून दाखवत होते.
“अंजू ऑफिसमध्येच आहे. त्यांच्या ऑफिसने प्रिकॉशन म्हणून कुणालाच घरी जाऊ न द्यायचं ठरवलंय. ऑफिसमध्ये सगळी व्यवस्थित सोय केलीये म्हणाली ती,” समीर स्वत:चा फोन चार्जिंगला लावत म्हणाला. “आता लोकल्स पण बंद झाल्यात कदाचित.”
“एवढं सिरीयस काही असणार नाहीये हे वादळ. उगाच मीडिया हाईप आहे,” मन्वा म्हणाली, “तरीपण तू म्हणतोस तसे लाईट गेले तर प्रॉब्लेम नको म्हणून स्वयंपाक करते. खिचडीभात आणि पापड.” बोलता बोलता मन्वा कुणाला तरी फोन करत होती, पण तिकडून नुसती रिंग वाजत होती.
“मी ऑर्डर करतो खालच्या उडप्याकडून. माझ्या रेंटमधे जेवायचं ठरलं नाहीये,” तो लगेच म्हणाला. मन्वा आणि अंजूसोबत शेअरींगमधे फ्लॅटमेट म्हणून तो इथे चार महिन्यांपूर्वी रहायला आला तेव्हा त्याने फक्त राहण्याची सोय बघितली होती. खाण्यापिण्यासाठी बहुतेकदा तो बिल्डींगच्या खाली असणार्‍या हॉटेलमध्येच जायचा. अगदीच कंटाळा आला असेल तर फोनवरून ऑर्डर दिली की उडुपी दहा मिनिटांत वर पार्सल पाठवून द्यायचा. उडप्याचा कंटाळा आला तर फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, वडापाव असे अनेक ऑप्शन्स होतेच.
“उडप्याला जेवढे पैसे देशील तेवढे मला दे. पण ते शिळं आणि तेलकट खात जाऊ नकोस. कधी बनवून ठेवतात कुणास ठाऊक. तुला किचनमधे काम करायला नको म्हणून घरात जेवत नाहीस ते माहित आहे मला. पण आज मी करते तेच खा,” मन्वा म्हणाली. मनातल्या मनात “याची अजून तिशी संपली नाही तर एवढं पोट सुटलंय. दिवसभर एके ठिकाणी बसायचं आणि कीबोर्ड बडवायचा, वाट्टेल ते जंक फूड खायचं शिवाय सिगरेट ड्रिंक्स वगैरे सवयी आहेतच जोडीला. इथे रहायला आल्यावर एक वेळ किराण्याच्या पैशामध्ये शेअर करेन, पण भांडी घासणं वगैरे करणार नाही हे आधीच बोलून मोकळा झाला. त्या हॉटेलातल्या घाणेरड्या जेवणावर पैसे उडवेल, पण घरात स्वत:चं ताट घासून ठेवायला लाज वाटेल,” वगैरे बोलून घेतलं. तिला कधीतरी एकदा स्पष्टपणे त्याला हे सुनवायचं होतं. पण जरी तो या फ्लॅटमध्ये चार महिन्यांपासून त्यांचा रूममेट म्हणून राहत असला तरी तिची आणि त्याची अजून एवढी घनिष्ट मैत्री नव्हती. मैत्री? ती पण समीरसोबत! त्या शब्दावर मन्वा स्वत:शीच हसली. समीरला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा अंजूवर किती चिडली होती ती, असलाच माणूस का मिळाला तुला रूममेट म्हणून.

त्या दिवशी विमान मुंबई एअरपोर्टला लँड झालं तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. जेटलॅगमुळे मन्वाला कधी एकदा घरी पोहचतेय आणि झोपतेय असं झालं होतं. दोन महिन्याभराचे शोज, रोजची रिहर्सल, सततचा प्रवास, खाण्यापिण्याचे हाल एवढं सगळं करून मन्वा प्रचंड दमली होती. आता आठ दिवस विश्रांती घ्यायची आणि मग काम चालू करायचं हे तिने मनाशी ठरवलं होतंच. अंजूला तिने दोन दिवस आधीच फोन करून कधी येणार वगैरे ते सगळं सांगितलं होतं. फ्लाईट दुपारी येणार असल्याने अंजू तेव्हा ऑफिसमध्येच गेलेली असणार. मन्वा फ्लॅटवर आली आणि शॉवर घेऊन सरळ झोपून गेली. जाग आली ती थेट संध्याकाळी. सात-साडेसात वाजले असावेत, बाहेर टीव्हीचा आवाज येत होता. हॉलमधला लाईट चालू होता, म्हणजे बहुतेक अंजू परत आली असावी. उठून तिने तिच्या रूमचा दरवाजा उघडला. “अंजू?” तिने हाक मारली.
टीव्हीचा आवाज बंद झाला. मन्वा डोळे चोळत चोळत हॉलमध्ये आली. “अंजू,” तिने परत हाक मारली.
“अजून आली नाही ती. रात्री उशीरा येईल, क्लायंट मीटींग आहे तिची,” हा अनोळखी पुरूषी आवाज ऐकताच मन्वाची झोप खाड्कन उडाली. “आपण कोण?” तिने विचारलं. समोर एक पस्तीशीचा तरूण उभा होता. पक्का चित्पावनी रंग, पिंगट केस आणि घारे डोळे. “ओह सॉरी, आपली ओळख करून घ्यायची राहिली ना? मी समीर. अंजूचा रूममेट,” त्याने हात पुढे केला.
“ओह...” तिने शेकहॅन्ड करत म्हटलं. “मी मन्वा. मी पण अंजूचीच रूममेट. अंजू म्हणाली होती मला फोनवर नवीन रूममेट मिळाल्याचं. पण माझ्या लक्षात राहिलं नाही. सॉरी.”
“हरकत नाही,” तो हसून म्हणाला. “तुम्ही तिथे फार बिझी असणार दुबईमध्ये. तुम्ही तिथे नाचायला गेला होतात ना?” त्याने तिच्याकडे बघत म्हटलं. त्याच्या वाक्यातला उपहास आणि उपरोध तिच्या बरोबर लक्षात आला.
“नाचायला नव्हे, अ‍ॅज अ कोरीओग्राफर. नृत्यदिग्दर्शक. मी ट्रेन्ड कथक डान्सर आहे. शिवाय थोडंसं मोहिनीअट्टम् पण शिकलेय. साल्सा, कंटेम्पररी, जॅझ, अ‍ॅक्रोबॅटिक्स वगैरे पण शिकलेय. डान्स शोज डीझाईन पण करते मी.” आपण या माणसाला आपला बायोडेटा का वाचून दाखवतोय असा प्रश्न तिला स्वत:लाच पडला होता, “आणि मी दुबईला नव्हते गेले. युरोप टूर होती,” शांतपणे ती म्हणाली.
“ओके. गूड,” एवढंच म्हणत त्याने खाली ठेवलेला रिमोट उचलला आणि टीव्हीचा आवाज वाढवला.
“तुम्ही प्लीज आवाज थोडा कमी कराल? मी अजून थोडावेळ पडेन.”
“शुअर!! व्हाय नॉट? इन फॅक्ट मी आता टीव्ही बंद करून बाहेर जेवायलाच जात होतो. तुमच्यासाठी काही आणू का? पार्सल वगैरे?” त्याच्या बोलण्यातली खोटी अदब जाणवत होती तिला शब्दाशब्दाला.
“नको. महिनाभर बाहेरचं खाऊन दमलेय मी. सूप नाहीतर वरण भात करून घेईन मी. एनीवे, थॅंक्स,” म्हणून मन्वा परत रूममध्ये आली. अंजूने रूममेट म्हणून हा कुठला प्राणी आणून ठेवला होता कुणास ठाऊक?
आता लगेच टीव्ही बंद करून जेवायला जाणारा म्हणाला होता हा माणूस, पण अर्धा तास होऊन गेला तरी टीव्ही ढणाणा ढणाणा आवाजात चालूच होता. शेवटी न राहवून मन्वा परत बाहेर आली. “प्लीज आवाज जरा कमी कराल का?”
“ओह सॉरी. विसरूनच गेलो मी,” तो तत्परतेने म्हणाला. “मला वाटलं, तुम्ही एवढ्या डान्सर, तुम्हाला म्युझिकची वगैरे सवय असेल कानांना.”
नाटकी साला हे मनातच म्हणत मन्वा वरकरणी हसून म्हणाली, “म्युझिकची सवय आहे, पण म्हणून चोवीस तास म्युझिक ऐकत नाही... आणि बारा तासांची फ्लाईट घेऊन आल्यावर तर नक्कीच नाही.”
“सॉरी म्हटलं ना?” तो म्हणाला. त्या शब्दाच्या अर्थाचा लवलेशही त्याच्या बोलण्यात नव्हता.
याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही म्हणत मन्वा किचनमध्ये आली. किचनमधल्या एका कोपर्‍यात फळीवर ठेवलेल्या देवांकडे तिने पाहिलं. कमाल आहे या अंजूची. दीड महिन्यात तिला एकदाही देवापुढे साधा दिवादेखील लावावासा वाटला नाही असा विचार करत तिने दिव्याची वात सारखी केली. देवापुढे दिवा लावला आणि हात जोडून उभी राहिली. “सॉरी बाप्पा, उद्या आंघोळ झाल्यावर सगळी धूळ वगैरे झटकेन आणि नीट पूजा करेन,” ती म्हणाली.
अचानक तिला समीर किचनच्या दाराशी उभा राहून तिच्याकडे बघत असल्याचं जाणवलं. “काही हवंय?” तिने मागे बघत विचारलं.
“नाही. जस्ट वण्डरींग. तुम्ही शॉर्टस घातल्यात, गंजी घातलीये आणि देवासमोर उभं राहून पूजा.... काहीतरी गडबड आहे असं वाटतं ना?” पुन्हा एकदा त्याचा उपरोधिक आवाज.
“काय गडबड असणार? देव काय कपडे घातलेत ते बघत नाही पूजा करताना.”
“देव बघत नाही, पण इतर माणसं बघतात ना...” तो हसत म्हणाला.
“अशी माणसं चीप मेन्टॅलिटीची असतात!” मन्वा चिडून म्हणाली. “तुम्ही जेवायला बाहेर जाणार होतात ना?”
“कॅन्सल केला प्लॅन. कंटाळा आलाय. ऑर्डर करून पिझ्झा मागवेन. तुमच्यासाठी पण ऑर्डर करू का? आणि हो, डोन्ट वरी, तुम्ही कसलेही कपडे घाला, मला काही फरक पडत नाही. मी सभ्य घरातला सज्जन मुलगा आहे,” हसत तो म्हणाला.
मन्वाला त्याला धरून बुकलून काढावं असं वाटत होतं. अंजू ऑफिसमधून आल्यावर तिच्यासोबत चांगली तासभर भांडत राहिली मन्वा. रूममेट शोधायला सांगितला तर हा कसला नमुना आणलास म्हणून... आणि अंजू तो किती चांगला आहे याचं गुणगान करत राहिली फक्त.
“अगं, किती चांगला मुलगा आहे. आमची कंपनी सध्या त्याच्याबरोबर एक प्रोजेक्ट करतेय. तिथे त्याने बोलता बोलता कुणालातरी सांगितलं की मला वेस्टर्न लाईनला रहायला रूम हवी. मी तेव्हा रूममेट शोधतच होते, तू युरोपला टूरला म्हणून गेलीस आणि मधुराला युकेचा जॉब मिळाला म्हणून ती पण गेली, ईमेल केला होता ना मी तुला? तूच रीप्लाय केलास की तुला योग्य वाटेल असा कुणीपण बघ, म्हणून त्याला भेटले. खरंतर त्याला स्वत:चा वेगळा स्वतंत्र फ्लॅट हवा होता त्याच्या ऑफिसजवळ. पण तो काही त्याच्या बजेटमध्ये मिळेना, म्हणून शेअरिंगवर यायला तयार झालाय. मी कंपनीत चौकशी केली. चांगल्या घरचा मुलगा आहे. त्याची फायनान्शिअल सॉफ्टावेअरची कंपनी आहे. युएसला होता पाचसहा वर्षे. घरचा एकुलता एक आहे. शिवाय फ़ायनान्शिअली साऊण्ड आहे.”
मन्वा अंजूच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली, “मी तुला त्याची मेट्रीमोनियल चौकशी करायला नव्हती सांगितली. आपण दोन मुली राहणार. त्यातून माझं येण्याजाण्याचं टायमिंग विचित्र. तसा मला प्रॉब्लेम काही नाही. असले नमुने रोज शूटवर बघतेच मी. हॅन्डल पण करू शकते त्यांना. पण तुला जमेल का ते?”
“गेले पंधरा दिवस राहतेय त्याच्यासोबत. ओके आहे तो. बोलावागायला ठिक आहे, शिवाय मला काही टेक्निकल डिफिकल्टीज आल्या तर सॉल्व्ह करायला मदत करतो. जाम हुशार पण आहे. युनिव्हर्सिटी रॅन्कर आहे.”
मन्वा हताश होऊन म्हणाली, “मुली, अगं तो आईन्स्टाईनदेखील असेल. त्याचा इथे काय संबंध? आपल्याला रूममेट म्हणून नीट राहणारा, वागणारा, बोलणारा माणूस हवाय. इथे गेल्या तासाभरात त्याचे शंभरेक टोमणे मारून झालेत मला. टिपिकल!!!”

आता समीरने हॉलची खिडकी उघडली. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. जवळपासची झाडं जोरात हलत होती. त्यांच्या बिल्डिंगसमोरचा गुलमोहर तर कोळिष्टकं काढायला फिरवलेल्या झाडूसारखा हलत होता.
“सॉलिड वारा आहे,” समीर म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मन्वा हसली. “इंजीनीअर आहेस ना? मग वारा कधी सॉलिड असतो का?”
“पीजे मारू नकोस!” समीर खिडकीतून बाहेर बघत वैतागत म्हणाला. पण मन्वा त्याचं उत्तर ऐकायला तिथे थांबली नव्हती. संध्याकाळचे सहाच वाजले होते, पण रात्रीसारखा काळोख झाला होता, आकाश पूर्ण काळंकुट्ट दिसत होतं. अजून विजा कडकडतच होत्या. वार्‍याचा वेग पण वाढत होता. टीव्ही आता बंद झाला होता, वार्‍यामुळे बहुतेक सिग्नल येत नसावा अथवा डिश अ‍ॅन्टेना उडून गेला असावा. पावसाची आधी एक जोरात झड येऊन गेली, जरा पाऊस थांबल्यासारखा झाला आणि मग नंतर पाचेक मिनिटांनी परत सपासप पावसाला सुरूवात झाली.
“काही मदत करू का?” त्याने किचनमध्ये असलेल्या मन्वाला विचारायचं म्हणून विचारलं. “नको, तशी काही गरज नाही. तू तुझ्या कलीग्जना फोन करून घे. म्हणजे लगेच मोबाईल चार्ज करून ठेवता येईल.”
समीरने त्याच्या ऑफिसमध्ये फोन लावला. पण कुणी फोन उचलला नाही. “या अश्विनच्या नानाची टांग. रात्रभर बसून इश्यू सॉल्व्ह करतो म्हणाला होता. घरी गेला वाटतं, पण बरं झालं. नाहीतर या वादळात अडकला असता,” म्हणत त्याने सर्व स्टाफला फोन करायला सुरूवात केली. स्टाफमध्ये जवळजवळ पंचवीस जण होते, त्यापैकी प्रत्येकाला फोन करून चौकशी करेपर्यंत त्याचा जवळ जवळ तास गेला. सुदैवाने सर्व जण घरी पोचले होते. तशी काही चिंतेची बाब नव्हती.
मन्वाने कूकर गॅसवर चढवून तिच्या काही असिस्टंट्सना फोन केले. सगळेच सुखरूप घरी किंवा स्टुडिओमध्ये होते. मीडियामधून सतत दाखवणर्‍या “घराबाहेर पडू नका” या सूचनेला कधी नव्हे ते मुंबईकरांनी गंभीररीत्या घेतलं होतं. “मी आताच इंटरनेटवर चेक केलं, वादळ अजून मुंबईकडेच सरकतंय म्हणे आणि त्याचा जोर पण वाढत चाललाय. आय थिंक, इट्स अ डिझास्टर...” समीर काळजीच्या आवाजात म्हणाला. “मुंबईमध्ये एवढा पाऊस आणि वारा म्हणजे कठीणच आहे.”
“कठीण वगैरे काही नाही. मागे पण एकदा अशीच ढगफुटी झाली होती की मुंबईध्ये. तीन दिवस चांदिवलीच्या स्टुडिओमधे अडकलो होतो आम्ही. पण बाकी काही त्रास झाला नाही.”
“पाणी वगैरे भरलं होतं ना?”
“पाणी तिकडे मिलन सबवे, सांताक्रूझ वगैरे... आपल्याकडे इथे भरत नाही.”
“मन्वा, जोगेश्वरीला भरतं का गं पाणी?” समीरने अचानक विचारलं.
“हो, मागच्या वेळेला, इन फॅक्ट दरवर्षीच तिथे पाणी भरतंच भरतं. लो लाईंग एरिया आहे ना तो,” मन्वा बोलत असताना समीरच्या चेहर्‍यावरचा रंग उडत होता. “काय रे? काय झालं?” तिने विचारलं.
“काही नाही... माझं ऑफिस आहे तिकडे...” समीर म्हणाला. आता त्याच्या चेहर्‍यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं.
“काळजी करू नकोस. तेवढा जास्त नाहीये हा पाऊस. आता जेवून घे.” मन्वा म्हणाली. समीरचं ऑफिस जोगेश्वरीला आहे हे इतक्या दिवसात आपल्याला कधीच समजलं नव्हतं, याची तिला गंमत मात्र वाटली. मुळात ती आणि समीर एकाच वेळेला घरात असणं कठीण आणि असले तरी कधी एकमेकांशी बोलायचे नाहीत. पहिल्याच दिवसापासून तिचं आणि समीरचं पटत नव्हतं. तशी भांडणं वगैरे काही नव्हती, पण एकंदरीत त्याला तिच्या “डान्सर” असण्यावरून टोमणे मारायला आवडायचं, आणि तिला त्याच्या “स्वत:ला दीडशहाणा समजायच्या” स्वभावाचा राग होता.

समीरला खरंतर त्याची रूममेट डान्सर आहे हेच आधी माहित नव्हतं. अंजूपाशी जेव्हा त्याने घरासाठी चौकशी केली तेव्हा तिची रूममेट कोरीओग्राफर असल्याचं ऐकल्यावर त्याला ती बहुतेक फिजिओथेरपिस्ट अथवा अ‍ॅनिमेशनमध्ये काम करणारी वाटली होती, का कुणास ठाऊक. रूममधे रहायला आल्यावर त्याला दोनतीन दिवसांनी “कोरीओग्राफर म्हणजे नृत्यदिग्दर्शक” असा साक्षात्कार झाला होता. तेव्हा तर तो अजून मन्वाला भेटला पण नव्हता, कसल्यातरी युरोप टूरवर गेली होती म्हणे ती. आपण एका डान्सरसोबत रूम शेअर करून राहतोय हेच त्याला कसंतरी वाटत होतं. “ही मुंबई आहे समीर, इथे असंच चालतं” त्याने स्वत:लाच समजावलं होतं. त्याच्या गरजा पण फार नव्हत्या. रात्री झोपायला हॉलमध्येच असलेला एक सोफा-कम-बेड, लॅपटॉप-मोबाईल चार्जिंगची सोय आणि सकाळी आवरायला टॉयलेट बाथरूम एवढंच त्याला हवं होतं. शिवाय रात्रभर बसून सलग काम करण्याचा निवांतपणा. पण तेव्हा त्याने मन्वाला पाहिलंसुद्धा नव्हतं, फक्त अंजूकडून तिच्याबद्दल ऐकलं होतं... अंजूच्या मते तरी मन्वा एकदम चांगली मुलगी होती. समीरने मात्र तिला पाहिल्या पाहिल्या तिचं नामकरण “स्टंट क्वीन” करून टाकलं होतं. तशी मन्वा “डान्सर” वगैरे असूनपण वागायला भलतीच स्ट्रिक्ट होती. तरीपण समीरला तिचं रात्री अपरात्री येणं, वाटेल तसे कपडे घालून घरात फिरणं वगैरे गोष्टी पटायच्या नाहीत.
त्याला मन्वा अजिबात आवडायची नाही असंदेखील नाही. तसं तिच्यामध्ये न आवडण्यासारखं काही नव्हतं म्हणा. मन्वा दिसायला सुंदर होती, शरीराने तर मॉडेलच्या वरताण कमनीय वगैरे होती, कुठल्याही पुरूषाला आवडावी इतकी आकर्षक निश्चितच होती. मन्वाची आई नर्स आणि वडील शिक्षक असल्याचं जेव्हा अंजूने सांगितलं तेव्हा समीरचा विश्वासच बसत नव्हता. आईवडील तिला असं गावाबाहेर राहून इतक्या फालतू क्षेत्रामध्ये काम कसं काय करू देतात हा प्रश्न त्याला पडला होता. मन्वा आणि अंजू दोघींनी कितीही वेळा कोरीओग्राफर असं सांगितलं तरी समीर तिला कायम “डान्सर” असंच म्हणायचा आणि त्यावरून तिला टोचून बोलायचादेखिल. अर्थात मन्वा ऐकून घेणार्‍यातली नव्हतीच. ती पण बरोबर उलट उत्तर द्यायची. या दोन तिरसट आणि स्वत:चंच खरं करणार्‍या लोकांसोबत राहताना अंजूची मात्र चांगलीच ओढाताण व्हायची. मन्वा गेल्या साडेतीन वर्षांपासून तिची रूममेट होती आणि समीरशी जरी नुकतीच ओळख झालेली असली, तरी प्रोफेशनली त्यांचं ऑफिसमध्ये रोज एकत्र काम असायचं. मन्वा आणि समीर जेव्हा कधी एकत्र घरात असतील तेव्हा अंजू मनातल्या मनात महायुद्धाची तयारी करत असायची.
“जेवायचं का?” मन्वाने परत एकदा विचारलं.
“इतक्यात मला भूक नाही,” समीर म्हणाला. एवढ्यात कुठेतरी वीज पडल्याचा धडामकन् आवाज आला आणि त्यासरशी लाईट गेले. अख्खा फ्लॅट अंधारामध्ये विरघळून गेला. “जवळच पडली वाटतं कुठेतरी वीज!” मन्वाने धास्तावून विचारलं. “शिवाय आता लाईट पण गेले, बरं झालं कूकर झालाय, कोशिम्बीर चिरून झाली...”
समीरचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू होते.
मन्वाने अंधारातच टेबलच्या ड्रॉवरमधून एक मेणबत्ती काढली होती आणि तरी तिची अजून खुडबूड चालूच होती. “काय शोधतेस?” त्याने न राहवून विचारलं. “मेणबत्ती लावायला काडेपेटी,” तिने टीव्हीच्या खालचा कप्पा शोधत उत्तर दिलं. “देवघरात आहे काडेपेटी, पण मला अंधारात सापडणार नाही. देवापुढचा दिवा शांत झालाय बहुतेक...”
समीरने खिशातला लायटर काढला आणि पेटवला. एवढ्या अंधारामध्ये पण मन्वाच्या कपाळावरची सूक्ष्म आठी पडलेली त्याला जाणवली. “सिगरेट ओढत नाहीये, तुला मेणबत्ती पेटवायला दिलाय,” त्याने सांगितलं.
“मी तसं काही म्हटलंय का? तुला सिगरेट ओढू नको, हे कधी सांगितलं नाही. फक्त माझ्यासमोर ओढायची नाही एवढीच एक विनंती.”
तिने विनंती म्हटल्याबरोबर समीरला हसू आलं. मन्वाला त्या युरोप टूरवरून परत येऊन चारपाचच दिवस झाले होते. तिच्याशी जास्त बोलायचा प्रश्नच नव्हता, सकाळी पाच वाजता उठून ती जॉगिंगला बाहेर जायची ती तो ऑफिसला गेल्यावरच परत यायची. संध्याकाळी पण उशीरा घरी यायची, स्वत:चा स्वयंपाक करून घेऊन रूममधे घेऊन जायची. अंजूबरोबर पण जास्त बोलत नव्हती तेव्हा. तो आणि अंजू लॅपटॉपवर काहीतरी काम करत असताना ही स्टंट क्वीन घरी आली. येताना कुठेतरी डोक्यात राख घालून घेतली होतीच, समीरकडे पाहिल्यावर मात्र ज्वालामुखीचा स्फोट झाल्यासारखी फुटली. “अंजू, तू या नवीन रूममेटला घरातले रूल्स नीट सांगितले नाहीस का?”
अंजू एकदम चपापून उठली, समीरला नक्की काय झालंय तेच माहिती नसल्याने तो शांत बसून होता.
“समीर, सिगरेट!” अंजू हळूच म्हणाली. समीर आता अजूनच गोंधळला.
“अंजू, तुझ्या मित्राला प्लीज सांग की घरामधे स्मोकिंग करायचे नाही म्हणून.” मन्वा आवाजामधल्या रागावर शक्य तितके नियंत्रण ठेवत म्हणाली. समीर हातातली सिगरेट घेऊन तसाच उभा राहिला.
“अंजू, तू मला विचारलं होतंस की रेग्युलर स्मोकर आहेस का? मी नाही म्हटलेलं. पण अधूनमधून पण ओढलेली चालणार नाही का? काही मेजर प्रॉब्लेम आहे का याबाबत इथे?”
“हे बघा, मिस्टर समीर, तुम्हाला अधूनमधून ओढायची असेल तर घराबाहेर जाऊन ओढा. घरात नको... आणि कायम ओढायची असेल तर हे घर सोडा,” मन्वा अजूनदेखील संतापलेलीच होती.
समीरने हातातली सिगरेट विझवली. “सॉरी.” मन्वाकडे बघत तो म्हणाला. “मला खरंच माहित नव्हतं. पण तुम्ही सिगरेट ओढत नाही? मला वाटलेलं तुमच्यासारख्या मुली....”
“तोंड सांभाळून बोला तुम्ही!” मन्वा कडाडली. “व्हॉट डू यू मीन बाय तुमच्यासारख्या मुली? चांगल्या घरातली मुलगी आहे मी. तुमचं मॉरल पोलिसिंग माझ्यासमोर नको... आणि माझ्यासमोर सिगरेट ओढलेलं मला चालत नाही. तुम्हाला तुमच्या फुप्फुसांची चिंता नसेल पण मला पॅसिव्ह स्मोकची जास्त चिंता आहे... आणि अंजू, तुला अक्कल नाही? तुझ्यासमोर सिगरेट ओढतोय आणि तू खुशाल त्याला काही बोलत नाहीस!!!!”
मन्वाचा तो चढलेला आवाज ऐकून अंजू गप्प उभी राहिली. आता जर ती काही म्हणायला गेली असती तर मन्वाने सरळ तिच्यावरच तोफ डागायला सुरूवात केली असती. शेवटी काही झालं तरी समीरला रूममेट म्हणून ठेवून घ्यायचा निर्णय तिचा एकटीचा होता.
“सांगितलं ना सॉरी, यापुढे नाही करणार. साला... आमच्या लाईफची टेन्शन इथे आम्हाला माहित... वर यांचं ऐकून घ्या!”
“कुणी ऐकून घ्यायला सांगत नाही, पण एकत्र रहायचे तर काही नियम पाळावेच लागतात,” मन्वा ताबडतोब उत्तरली आणि तडक तिच्या रूममध्ये निघून गेली.

बाहेर पावसाचा जोर वाढतच होता. त्याहून जास्त जोर वार्‍याचा होता. वार्‍याच्या झूम्म्ढूम्म्धूम्शूश अशा आवाजामधे बाहेरचं काहीही ऐकू येत नव्हतं. एरवी रात्रभर जागी असणारी मुंबई अचानक शांत झाली होती - वादळाच्या आवाजामुळे. मन्वाने खिडकीतून बाहेर वाकून पाहिलं, दूर दूरवर अंधार पसरला होता. पावसाच्या झडी जोरजोरात थडथडत होत्या.
“खिडकी लाव मन्वा, मेणबत्ती विझतेय,” समीर म्हणाला.
“काय वारा सुटलाय... ते समोरचं झाड बघ कसं हलतंय. एवढं मोठं झाड, पण या वार्‍याच्या वजनाने कसं मस्तपैकी नाचतंय बघ तरी...” समीरला त्याच्यामधे आता काही रस नव्हता. त्याला त्याच्या ऑफिसचीच चिंता लागून राहिली होती. कितीतरी वेळ तो नुस्ता विचारच करत होता.
“मन्वा, मी पटकन ऑफिसला जाऊन येऊ का? चालत गेलं तर अर्ध्या तासात पोचेन तिथे,” शेवटी न राहवून तो म्हणाला.
“वेडा आहेस का? पाऊस बघ कसा पडतोय, शिवाय वारा बघ. चक्रीवादळ आहे हे. मघाची अनाऊन्समेंट ऐकलीस ना? इमर्जन्सी असल्याशिवाय बाहेर पडू नका म्हणून. सर्वांनाच इन्डोअर रहायच्या सूचना आहेत,” मन्वा म्हणाली.
“ऑफिसमधे पाणी वगैरे भरलं तर... माझ्यासाठी ही एक इमर्जन्सीच आहे की...”
“अरे नाही भरणार. ढगफुटीला खूप जोरात पाऊस होता, चक्रीवादळामध्ये पावसापेक्षा वार्‍याचा जोर जास्त. आता चिंता करू नकोस.”
“ग्राऊंड फ्लोअरला आहे माझं ऑफिस..... मागे एकदा तिथे पाणी भरलं होतं असं ऐकलंय. लाईट जायच्या आधी ईअरफोन शोधायला हवा होता. एफएम तरी ऐकता आला असता, तिथे तरी काही इन्फो मिळेल.”
“माझ्या मोबाईलचा ईअरफोन मिळाला तर देते तुला आणि एवढ्या पावसातून चालता तरी येणार आहे का? एरवी चालायला काही नाही, रिक्षा, बस लोकल काहीतरी मिळेलपण, पण आता वारा बघ, ढकलून टाकेल असला वारा आहे.....माणूस उडून जाईल असला...” मन्वाचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत जबरदस्त कसलातरी कडाडकट असा आवाज झाला आणि कितीतरी वेळ होतच राहिला. खिडकीतून वारा आत शिरला आणि मेणबत्ती विझली. मन्वाने झटकन कानावर हात झाकून घेतले, इतका तो आवाज मोठा होता. “आपली बिल्डींग पडतेय का समीर?” तिने घाबरून विचारलं. समीरने उठून मन्वाला घट्ट धरलं. “बिल्डींग नाही, ते बघ, झाड पडलंय” समीर खिडकीतून बाहेर बघत म्हणाला. इतका वेळ हलणारं नाचणारं ते झाड आता मुळासकट उखडून खाली पडत होतं. अवाढव्य आणि अतिप्रचंड असं त्याचं धूड अस्ताव्यस्त पसरलं होतं. खाली पडताना त्याच्या फांद्या खिडकीवरून घासत खाली गेल्या आणि खिडकीची एक काच फुटली. इतक्या अंधारामधे ते दृश्य इतकं भीषण दिसत होतं! “बरं झालं तू खाली गेला नाहीस ते...” मन्वा हलकेच पुटपुटली. “केवढं मोठं झाड आहे ते..” ती अजूनही घाबरलेलीच होती. एवढावेळ हे वादळ म्हणजे उगाच मीडिया हाईप आहे असं म्हणत असली तरी आता या चक्रीवादळाची भीषणता तिच्या लक्षात आली होती. “मी इथे आल्यापासून बघतेय ते झाड. असं कसं काय पडलं?”
“शांत हो मन्वा, शांत हो,” समीर तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. “मी मेणबत्ती लावतो, तू बस इथे पाच मिनिटं.” त्याने मन्वाला हाताशी धरून अंदाजानेच सोफ्यावर बसवलं. फ्लॅटमधला तो अंधार, वार्‍याचा भेसूर आवाज आणि नुकताच तो झाड पडताना झालेला कानठळ्या बसवणारा आवाज, सतत मुसळधार चालू असलेला पाऊस या सर्व वातावरणामुळे समीर पण तसा भेदरलेलाच होता. त्यात परत ऑफिसमध्ये पाणी भरतंय की काय याची चिंता. एका प्रोजेक्टची डेडलाईन पुढच्या महिन्यात... काम जवळजवळ संपत आलं होतं. कधी नव्हे ते शेड्युलच्या पुढे चालू होतं काम. आता या वादळामध्ये जर ऑफिसमध्ये पाणी भरलं तर!!! सगळंच कठीण झालं असतं. वार्‍याने विझलेली मेणबत्ती त्याने लावली. मन्वा सोफ्यावर डोळे मिटून शांत बसली होती. “सगळं ठिक होइल,” तो स्वत:शीच म्हणाला. जवळजवळ दहा मिनिटे ते दोघं अंधारातच तसेच शांत बसून राहिले. काय बोलावं तेच सुचत नव्हतं.
ऑफिसमध्ये जवळपास राहणार्‍या कुणाकडून तरी फोनवर किमान चौकशी करावे म्हणून समीरने मोबाईल हाती घेतला... नो नेटवर्क.
“मन्वा, तुझ्या मोबाईलला रेंज आहे का बघ...” मन्वाने मोबाईल पाहिला, “नाही रे..”
“चला, सगळंच कल्याण झालं. रेंज नाही, म्हणजे आता बाहेर नक्की काय चालू आहे ते समजणार नाही... तू इथे बसशील का? मी आजूबाजूला कुणाकडे रेंज आहे का बघून येतो. घाबरू नकोस.”
“लवकर ये,” मन्वा हातातला मोबाईल बघत म्हणाली. मघाशी वादळाची बातमी आल्यापासून तिने अमोलला फोन लावला होता, पण त्याचा नंबर केव्हाचा स्विच ऑफ येत होता. कुठे असेल तो? व्यवस्थित असेल का? समीरसमोर उगाच त्याला बोलायला विषय नको म्हणून ती काही म्हणाली नव्हती. आता नेटवर्क नाही असं दाखवत असतानादेखील तिने अमोलचा नंबर डायल केला. फोन लागला नाहीच, पण तिच्या डोळ्यांमध्ये पाणी मात्र आलं.
अमोल. ठिक आहेस ना तू? स्वत:शीच तिने हा प्रश्न विचारला. अमोल गेल्या दोन महिन्यापासून मुंबई-पुणे करत होता, जसं काम असेल तसं. पण आज तो नक्की कुठे होता ते तिलादेखील माहित नव्हतं.
दोन महिन्यापूर्वी आपल्या आयुष्यात अशाच वादळासारखा परत आला होता अमोल. कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी देशोदेश फ़िरताना त्याला आठवण झाली नव्हती, पण आता दहा वर्षानंतर त्याला मी त्याच्या आयुष्यात परत हवे होते, त्याचं अजून प्रेम होतं म्हणे माझ्यावर...
समीर फ़्लॅटचा दरवाजा उघडून आत आला. “सगळे शेजारी ग्रेट आहेत आपले. इतक्या महिन्यामधे कधी भेटलो नव्हतो त्यांना. काय अजब नमुने आहेत. समोरच्या फ़्लॅटमधले अंकल ऑलरेडी पिऊन टुन्न आहेत, चक्रीवादळच काय, अख्खा समुद्र त्यांच्यावर ओतला तरी फ़रक पडणार नाही...”
समीर पुढे बोलत होता, पण मन्वाचं लक्षच नव्हतं. आपण त्यानंतर अमोलला कितीवेळा विनवलं की घरी येत जाऊ नकोस, पण दर दिवसाआड त्याचा फोन असायचाच, रोजच्यारोज गूडमोर्निंग सारखे फ़ालतू मेसेजेस तर ढीगाने.
“जेवायचं का?” समीरच्या या वाक्याने ती भानावर आली. “चालेल, मला मेणबत्तीचा उजेड दाखव किचनमधे. प्लेट्स वाढते.”
“अख्खी रात्र लाईट्स येणार नाहीत... पाऊस पण थांबेलसं वाटत नाही.” समीर चिंतेमधे म्हणाला. “मघाशी एकदा बिल्डिंगच्या वॉचमनला फोन केला तर त्याने उचलला नाही”
“आं?” मन्वा अजून तिच्याच विचारांच्या तंद्रीत होती. “काय म्हणालास?”
“माझं ऑफ़िस ज्या बिल्डींगमधे आहे ना त्या बिल्डींगच्या वॉचमनला.... खरंतर आम्ही म्हणतो म्हनून ते ऑफ़िस आहे, ऍक्च्युअली थ्री बीएचकेचा फ़्लॆट आहे तो.”
“ओके,” मन्वाने त्याच्या हातात प्लेट दिली. “तेवढं छोटं ऒफ़िस पुरतं तुला?” तिने विचारलं.
“बारा जणं तरी आहोत आम्ही. पुण्यामधे होतं ते ऑफ़िस याहून छोटं होतं, पण मला सारखे मुंबईच्या शेअरब्रोकर्सचे प्रोजेक्ट मिळायला लागले म्हणून मुंबईला शिफ़्ट झालो. कुठे सारखं रोज रोज प्रवास करणार.”
“कठिण असतं ना असं... एका ठिकाणाहून उठून दुसरीकडे जाऊन स्थिरावणं....” मन्वा स्वत:शीच बोलल्यासारखी म्हणाली.
“टेल मी अबाऊट इट... रोज दिवसातून एकदातरी प्रश्न पडतो.. हॅव आय डन राईट थिंग? नोकरी सोडली, कर्ज काढून स्वत:ची कंपनी चालू केली.. दिवसरात्र मेहनत चालू आहे.. पण सालं जे मिळवायचं ते मात्र अजून मिळत नाही.” समीर आणि मन्वा हॉलमधे येऊन बसले. “कॅन्डल लाईट डिनर!!” समीर मेणबत्तीकडे बघत म्हणाला.
मन्वा हसली. “तेपण तुझ्यासोबत. हू वूड हॅव थॉट अबाऊट इट? समीर, खरं तर विचारायचा काही हक्क नाही माझा, पण तू का नोकरी सोडलीस? यु एसमधे होतास ना? भरपूर पैसा असेल तिथे.... मग ते सर्व ऐषोआराम सोडून हे स्ट्रगलरचं आयुष्य कशाला?”
मन्वाकडून हा प्रश्न ऐकून समीरला जरासं आश्चर्य वाटलंच. “मला ना आधीपासून दुसर्‍याचं ऐकून घ्यायला आवडायचं नाही. नोकरीमधे कसं असतं, बॉस जसं सांगेल तसं काम करा. स्वत:ची अक्कल चालवू नका वगैरे. पण मला ते पटायचं नाही.. इतक्या कष्टाने शिक्षण घेतलं ते काय दुसर्‍याची गुलामगिरी करण्यासाठी का? खूप आधीपासून माझ्या डोक्यात स्वत:चंच काहीतरी चालू कराय्चं होतं. पण माझी घरची आर्थिक परिस्थिती फ़ार काही ग्रेट नाही. त्यामुळे शिक्षण झाल्यावर लगेच नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. दहा बारा वर्षं केली नोकरी. पैसा कमावला, युएस-युरोपचा अनुभव घेतला, आणि मग दोन वर्षापूर्वी केलं चालू....”
“गूड.” मन्वा म्हणाली.
“मन्वा, तुला हाच प्रश्न विचारू? तुला या क्षेत्रात का यावंसं वाटलं, आय मीन...”
त्याला नक्की काय विचारायचं आहे हे तिच्या लक्षात आलं, आणि या प्रश्नाची तिला खूप गंमत पण वाटली, तरी शक्य होइल तितक्या शांतपणे तिने उत्तर दिलं. “मी वयाच्या पाचव्या वर्षापासून कथ्थक शिकत होते. सुरूवातीला आईने तिची आवड म्हणून घातलं, नंतर मलाच खूप आवडायला लागलं.”
“पण नृत्यात करीअर करायचं का ठरवलंस?”
“बाप रे, तू माझी मुलाखत वगैरे घेतोस की काय?” आता मात्र मन्वाला हसू आलं. “करीअरच करायचं असं काही ठरवलं नव्हतं, पण बारावीनंतर एका डान्स शोमधे सीलेक्ट झाले, त्याच्यामधे सहज भाग घेतला..” सहज?? मन्वाने स्वत:लाच विचारलं. अमोलबरोबर दोन दिवस सलग भांडली होती ती या शोसाठी. पण आता बारा वर्षानंतर तिचा निर्णय किती योग्य होता हे तिलाच समजून चुकलं होतं.
“मग?” समीरने पुढे विचारलं.
“जिंकले. तेव्हा टीव्हीवर पाहिलं असशील कदाचित तू मला. “नचके दिखा” नावाचा शो होता. बारा वर्षापूर्वी खूप हिट झाला होता, तो शो जिंकल्यावर मग पूढचं काम मिळालं, स्टेज शो मिळत गेले. सीरीयल्ससाठी वगैरे ऑफ़र आल्या पण मला त्यात काही इंटरेस्ट नव्हता. डान्समधेच काम करायचं होतं. दरम्यान फ़िल्म्ससाठी असिस्टंट कोरीओग्राफर म्हणून काम केलं. त्यानंतर डान्स रीऍलिटी शोचं पेव फ़ुटलं आणि मी इथेच काम करत राहिले” मन्वा सहज म्हणाली.
“सॉरी, आमच्याकडे माझं ग्रॅज्युएशन होइपर्यंत केबल टीव्ही नव्हता, त्यामुळे मी पाहिलं नसेल. पण म्हणजे तू बारावीनंतर शिक्षण सोडलंस?”
मन्वा हसली. “बारावीनंतर कॉलेजशिक्षण सोडलं असं म्हण. नंतर उलट बरंच काही शिकत राहिले. वेगवेगळे डान्स फ़ॉर्म्स शिकले. स्टंट्स शिकले, वर्कशॉप्स अटेंड केली. हल्लीच स्वत:चा डान्स क्लास चालू केलाय. असंच काहीबाही अजून चालूच आहे. आता एखाद्या पूर्णपणे डान्स बेस्ड फ़िल्मसाठी कोरीओग्राफी करायची आहे. ”
“पण तू खुश आहेस यामधे?” समीरने विचारलं.
“खुश??? प्रचंड खुश आहे मी. अर्थात तू मघाशी म्हणालास तसं जिथवर पोचायचं आहे तिथवर अजून पोचलेले नाही. बट आय जस्ट लव्ह माय लाईफ़...”
“पण असं घरापासून लांब राहणं वेळी अवेळी काम करणं....”
“समीर, जर समजा मी इंजीनीअर झाले असते, तरी घरापासून लांब राहिलेच असते ना. आणि वेळी-अवेळा कामांबद्दल तू बोलतोयस... परवा मी पहाटे जॉगिगला निघाले तेव्हा तू लपटॉपवर काम करत होतास. रात्रभर अखंड... ते चालतं का?”
“नाहीपण तरीही...”
“समीर घुटमळत बोलू नकोस. स्पष्टपणे विचार. या असल्या नाचासारख्या, तेही शास्त्रीय नव्हे तर फ़िल्मी नाचाच्या क्षेत्रात मी का आले तेच तुला विचारायचं आहे ना? माझी आवड, माझी पॅशन आणि माझा इंटरेस्ट म्हणून आले...”
“पण हे क्षेत्र इतकं बेभरवश्याचं आहे की....”
“कुठलं क्षेत्र भरवश्याचं आहे समीर? माहिताय, आम्ही लोक काय म्हणतो तुम्हा लोकांबद्दल, सॉफ़्टवेअर इंजीनीअर्सबद्दल “जब तक सामने कम्प्युटर तबतक ही पैसा है” आयटीमधे किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधे हे असं असतंच की, मग तसंच थोडंफ़ार आमच्याकडेपण.”
“हे बघ, आधीच सांगतो, मला फ़ारसं काही माहित नाही याबद्दल, चुकीचं ऐकलं असेन मी पण ते कास्टींग काऊच वगैरे प्रकार असतात, शिवाय मुलींसाठी सेफ़ नाही असं पण मी ऐकलंय..”
“ओह... येऊन जाऊन गाडी आलीच का “मुलींसाठी सेफ़ नाही” या विषयावर? कुठलं क्षेत्र मुलींसाठी सेफ़ आहे रे? कुठली जागा मुलींसाठी सेफ़ आहे? बातम्या बघतोस ना? चालत्या बसमधे रेप होतात, मग मुलींनी बसमधून फ़िरायचंच नाही का? आधी म्हटलं तसं वाईट लोकं संधीसाधु लोक, सर्वत्र असतात, आपण त्यांना बळी पडायचं की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्यात पुढे जाताना शॉर्टकट घ्यायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी माझं टॅलंट आणि माझा सेल्फ़ रीस्पेक्ट यावरच कायम मदार ठेवली. सुदैवाने मला कायम चांगले लोक मिळत गेले, कधी काहीच प्रॉब्लेम झाला नाही.”
“पण समजा, असं काही झालं असतं तर.. तुला कुणी फ़सवून अथवा खोटीनाटी आमिषं देऊन.....”
“तर मी काय केलं असतं मला माहित नाही. जे घडलंच नाही त्या वेळेला मी काय केलं असतं हे आता कसं सांगणार? पण एक मात्र खरं की इतक्या वर्षात कुणाच्याच भूलथापाना अथवा फ़सव्या बोलांना बळी पडले नाही. माझं प्रोफ़ेशनल लाईफ़ आणी पर्सनल लाईफ़ या दोन्ही बाबी कायम भिन्न ठेवल्या. नो अटॆचमेन्ट्स ऎट वर्क!”
“यु मीन टू से, तुझा कोणी बॉयफ़्रेन्ड वगैरे नाही?” समीरने आश्चर्याने विचारलं.
“वेळ तरी आहे का मला? आणि समजा जरी वेळ असला तरी माझा कुणीही बॉयफ़्रेन्ड नसता.....”
“बरोबरच आहे म्हणा, तुझ्यासारख्या स्टम्ट क्वीनसोबत रहायचं म्हणजे काय चेष्टा आहे?” समीर अचानक बोलून गेला.. त्या मिणमिणणार्या मेणबत्तीच्या उजेडामधे अचानक शांतता पसरली समीरला आपण काय बोलून गेलो ते अचानक जाणवलं. “सॉरी, म्हणजे मला म्हणायचं होतं की.....”
“गेले सहा महिने मी कसा इथे बिचार्‍यासारखा राहतोय आणि मन्वा कशी दर वेळेला मला नियम आणि रूल्स ऐकवत असते,” मन्वाचा अवाज बर्फ़ासारखा थंड होता. “मग अशा मुलीसोबत कोण मुलगा राहू शकेल? तिच्यावर प्रेम करू शकेल वगैरे हेच म्हणायचं आहे ना?”?”
“नाही, तसा अर्थ नव्हता....”
“अच्छा, मग नाचणार्‍या मुलीवर कोण चांगल्या घरातला मुलगा कशाला प्रेम करेल असं म्हणायचं होतं का?”
“प्लीज, तू माझ्या वाक्याचे भलते अर्थ काढू नकोस, मला फ़क्त एवढंच म्हणायचं होतं की तुझ्यासारख्या स्ट्रिक्ट मुलीबरोबर कोण.... ऍन्ड आय ऎम सॊरी. दॅट इज वे आऊट ऑफ़ लाईन... पण मला खरंच सांग. तू आता तिशीच्या आसपास असशील तरी पण एकटी का आहेस?”
“हा प्रश्न जरा जास्तच पर्सनल होतोय असं वाटत नाही तुला?”
“असेल कदाचित, पण उत्तर दे ना.... मन्वा, तू स्टेजवर उत्तम डान्सर असशील, तुझे दोन तीन व्हीडीओ पाहिलेत मी अंजूच्या कंप्युटरवर, कमाल नाचतेस तू. तू कदाचित उत्तम कोरेओग्राफ़र पण असशील. पण तू आयुष्यात सुखी आहेस का?”
“मिस्टर समीर, आयुष्यात सुखी असणं म्हणजे नेमकं काय ते मला माहित नाही. मी माझ्य कामामधे खुश आहे. आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून नाही. अजूनतरी मला कुणाच्या मदतीची आवश्यकता नाही, सो मी तरी असं म्हणेन की मी खुश आहे....”
“नाही, मन्वा. मी इथे आल्यापासून पाहतोय, कुठलीतरी एक गोष्ट तुला सतावतेय. त्या दिवशी रविवारी मी घरात असताना तुला भेटायला एक माणूस आला होता, आठवतंय? तू अंजूला म्हणालीस की प्रोड्युसरचा कुणीतरी माणूस आहे, कामानिमित्त भेटायला आलाय, पण तो कामासाठी नव्हता आला. त्याला बघताच तुझ्या चेहर्यावर आधी अर्धा सेकंद आनंद दिसला आणि मग राग दिसला. पण तो राग तिरस्काराचा नव्हता, प्रेमाचा होता.... ऍम आय राईट?”
“तुला चेहरा इतका चांगला वाचता येतो हे माहित नव्हतं मला.... आधी समजलं असतं तर नाचताना माझ्या चेहर्यावर भाव नीट येतात की नाही ते तपसायला तुझीच मदत घेतली असती मी” मन्वा शांतपणे म्हणाली.
“म्हणजे मी आता जे काही बोललो त्याला तू सक्सेसफ़ुली बगल देत आहेस का?”
“वाटलं तर तसं समज..” मन्वा हातातली प्लेट घेऊन किचनमधे गेली. अंधाराला डोळे सरावले होते, आणि बाहेरच्या धडामधूड वाहणार्या वार्याला कान. त्यामुळे पाऊस अजून कोसळतच होता. अचानक मधेच कुठूनतरी प्रचंड जोरात आवाज आला की आसपास याच भागात कुठेतरी झाड पडलं असावं हे समजत होतं. “मुंबईमधे एवढी झाडं असतील असं कधी लक्षात आलं नाही ना? ही शिरीन फ़ार त्रास देणार आहे यावर्षी..” मन्वाने हातासरशी प्लेट घासून ठेवली आणि बाहेर येत म्हणाली.
समीर खिडकीतून बाहेर बघत निवांत बसला होता. “अरे जेव ना लवकर. माझं जेवण झालंसुद्धा. कसला विचार करतोस?”
“कसला नाही.... पाऊस बघतोय. हे चक्रीवादळ फ़ार महाग पडणार आहे मला...”
“चिंता करू नकोस. एवेरीथिंग विल बी ऑल राईट. व्यवस्थित जेव. उद्य सकाळी बघू काय करायचं ते.”
“उद्या सकाळी? काय करणार आहोत आपण? फ़ॉर दॅट मॅटर... मी काय करणार आहे? आयुष्यभराचं स्वप्न तिथे गटारीच्या पाण्यात लोळतंय. ऑफ़िसमधे पाणी भरलं तर माझं किती नुकसान होइल हे तुला माहित नाही. रस्त्यावर येइन मी”
“उगाच मेलोड्रामा करू नकोस. आता जरा पाऊस कमी झाल्यासारखा वाटतोय. थोड्या वेळात जर पूर्ण पाऊस थांबला तर आपण दोघे जाऊ तुझ्या ऑफ़िसकडे. मी पण येईन सोबत, ठिक आहे?” मन्वा त्याची चलबिचल ओळखत त्याच्या समजूतीखातर म्हणाली.
समीर विषण्णपणे हसला. “मी मघाशी तुला एक गूड न्युज दिलीच नाही. ते झाड पडलंय ना ते आपल्या बिल्डिंगच्या एंट्रन्सवर पडलंय. तिथला अर्धा जिना कोलॅप्स झालाय. आपण चौथ्या मजल्यावर आहोत. दुसर्‍या मजल्यावरून खाली उतरता येत नाहीये. फ़ायर ब्रिगेड येऊन ते झाड हलवत नाही, किंवा दुसरा मेक-शिफ़्ट जिना बनवत नाही तोपर्यंत आपण इथे अडकलोय. वी आर ट्रॅप्ड, मन्वा!!” त्याच्या आवाजामधे एक विलक्षण निराशा होती. “ज्या गतीने हे वादळ सुरू आहे ते पाहता, फ़ायरब्रिगेड कधी येईल आणि कधी नाही...” मेणबतीच्या त्या प्रकाशातपण मन्वाला समीरच्या डोळ्यांतली अगतिकता दिसली.
मन्वाने जवळ जाऊन त्याच्या हातावर हात ठेवला. “सगळं ठिक होइल. आता रात्र आहे, आपण बाहेर पडू शकत नाही. पण उद्या सकाळी दिवस चालू झाल्या झाल्या तुला बिल्डींगच्या बाहेर मी घेऊन जाईन. बीलीव्ह मी, मी दोरावरती मल्लखांब करू शकते, हवेमधे लटकून डान्स करू शकते, तर जिथे जिना नाही, तिथून तुला बाहेर नक्की काढू शकते. चिंता करू नकोस..”
“कसा विचार नको करू? मन्वा, माझ्या आईवडलांचं घर, शेतीचा एक तुकडा, आईचे दागिने सगळं गहाण ठेवलंय मी. बॅंकेकडून हवं तितकं कर्ज मिळालं नाही म्हणून गावातल्या सावकाराकडून दामदुपटीने पैसे उचललेत. वर्षभरामधे ते कर्ज फ़ेडायचा विचार होता. आता सर्व... ऑफ़िस जर पाण्यात गेलं तर.....”
“इन्शुरन्स वगैरे असेल ना समीर?”
“मन्वा, हे चक्रीवादळ आहे, नैसर्गिक कॅलामिटीमधे इन्शुरन्स मिळेलच याची खात्री नाही. शिवाय, क्लेम कधी निकालात निघेल ते देवालाच ठाऊक. माझा एक प्रोजेक्ट पुढच्या महिन्यांत पूर्ण होतोय, त्याचं बिलिंग निघालं असतं तर चिंता नव्हती... झक मारली आणि ही नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरू केली.” समीर स्वत:च्याच कपाळावर हात मारत म्हणाला. “शिवाय हे वादळ अख्ख्या मुंबईवर आहे, माझा स्टाफ़ माझ्यासोबत काम करणारे.. त्या सर्वंची पण चिंता आहेच ना!!”
“हे बघ, पुन्हा एकदा सांगते, उद्या काय होइल याचा विचार करू नकोस. “आपल्या हातात काहीच नाहीये. सगळेच सुरक्षित राहू देत म्हणून आपण देवाला प्रार्थना करू शकतो सध्या” मन्वा बोलता बोलला क्षणभर थबकली. “तुला इमर्जन्सीला थोडेफ़ार पैसे उभे करायचे असतील तर मी देऊ शकेन. बॅंकेत वीसलाख तरी निश्चित आहेत.”
“थॆंक्स मन्वा,” समीर हलकेच हसत म्हणाला, “पैशापेक्षा जास्त चिंता ऑफ़िस आणि स्टाफ़ सुस्थितीत असण्याची आहे. देव करो आणि ऑफ़िसमधे पाणी भरून कंप्युटर्स फ़र्निचर वगैरेचे नुकसान नको. आणि माझ्यासोबत काम करणरे सर्व सुरक्षित असोत, एनीवेज, तुझं हे बोलणंच माझ्यासाठी फ़ार मोठं आहे.”
थोड्या वेळापूर्वी थोडा कमी झालेला वारा आता परत आधीच्याच जोशाने वाहत होता. पावसाचा जोर पण वाढला होता. आजूबाजूचा आंधार आता भेसूर वाटायला लागला होता. ही रात्र मुंबईसाठी फ़ार मोठी काळरात्र ठरणार होती.
समीरने हातातली प्लेट किचनमधे नेऊन धुवून ठेवली ते पाहून मन्वाला हसू आलं. एरवी तो भांडी घासायला नको म्हणून पार्सलच्या कन्टेनरमधेच खायचा. चहा-कॉफ़ीचा कपदेखील नुस्ता विसळून ठेवायचा. आज मात्र व्यवस्थित प्लेट घासून ठेवली. बाहेर येताना त्याने फ़्रीझमधलं दूध बाहेर काढलं. “मन्वा, आता रात्री तापवून ठेवू का? रात्रभर लाईट आले नाहीत तर खराब होइल. उद्या दूध मिळेलच याची खात्री नाही.”
“त्याची चिंता नाही, घरात मिल्क पावडरचं एक पाकिट आहे. किमान चहा कॊफ़ीचा तरी प्रॊब्लेम नाही. पण दूध ठेव बाहेर काढून. दहापंधरा मिनिटांनी तापवते मी, बरं झालं तुझ्या लक्षात आलं, मी विसरूनच गेले या चक्रीवादळाच्या भानगडीमधे.”
“दह्याचं काय करू?” समीर वाकून फ़्रीझमधे बघतच म्हणाला.
“असू देत, उद्या सकाळी लाईट आले नाहीत तर वापरून संपवू. रात्रभर फ़्रीझमधे काही होणार नाही.” मन्वाने बसल्या जागीच उत्तर दिलं.
“मन्वा, अंजू सेफ़ असेल ना?” फ़्रीझमधलं एक भलामोठं चॉकोलेट खात समीर हॉलमधे आला.
“ऑफ़िसमधे आहे ना ती... मग तसा काही प्रॉब्लेम नसेल.”
“हो, पण तिचं ऑफ़िस मरीन ड्राईवला आहे, समुद्राच्या जवळ आणि वादळाचा वारा बघ... म्हणून टेन्शन... आज अख्खी दुनियाभरच्या न्युज चॅनल्सवर याच वादळाची बातमी असेल ना? आपल्याला सोडून अख्खं जग ऐकत असेल आपले हाल. आठवतं मागे एक असंच चक्रीवादळ ओरिसाकडे आलं होतं तेव्हा आपण कसे टीव्ही बघत होतो... तसंच आजपण ना....”
“समीर, अरे तू किती चिंता करणार आहेस? राहू देत आता.... अंजूच काय आज आपण सर्वच धोक्यामधे आहोत. कारण समुद्राच्या जवळ तर अख्खी मुंबई आहे.. आणि अंजू असेल व्यवस्थित.... तिच्या ऑफ़िसमधे सगळी नीट व्यवस्था करतात,”
“रात्रीचे नुसते आठच वाजतायत.” समीर म्हणाला. “पण मध्यरात्र झाल्यासारखं वाटतंय. वारा असला आहे की झोपणं अशक्य. मग करणार काय आता? चिंता करण्याव्यतिरिक्त.”
“बोलत बसूया थोडा वेळ. झोप आली तर झोपू” मन्वा पुन्हा एकदा मोबाईलला रेंज येतेय का ते बघत म्हणाली.
“कुणाला फोन करायचा प्रयत्न करतेस? संध्याकाळपासून बघतोय” समीरने थोड्यावेळाने विचारलं.
“कुणाला नाही...” मन्वा शांतपणे म्हणाली.
पाचेक मिनिटं मन्वा आणि समीर दोघेही अंधारामधे शांत बसून राहिले. वार्‍यच्या एका झोतामधे मेणबत्ती केव्हाच विझली होती. बाहेर पावसाचा जोर अजून चालू होता.
“अमोल नाव आहे त्याचं.” मन्वा म्हणाली. “आणि तो माझा नवरा आहे.” समीर क्षणभर काहीच बोलला नाही. मन्वाला आपल्या चेहर्यावरचं आश्चर्य दिसलं नसावं याबद्दल अंधाराचे त्याने मनोमन आभार मानले.
“नवरा म्हणजे?”
“म्हणजे हसबंड... पती वगैरे वगैरे.” मन्वाच्या आवाजात मिश्किलपणा होता. “धक्का वगैरे बसला का? अमोल माझा शाळेपासूनचा मित्र. गावामधे शाळेत एकत्र होतो, नंतर अकरावी बारावीला एकत्र होतो, बारावी झाल्यावर लक्षात आलं की आता आपल्या वाटा वेगळ्या होणार. मग डोक्यात प्रकाश पडला, अरे आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय. मग प्रेमात पडल्यावर जे काय व्हायचं ते झालं, आणि मग ते झालं म्हणून आम्ही एका देवळांत गुपचुप लग्न केलं. कुणाला न सांगता. काय वेडे विचार होते तेव्हा. देवीच्या मूर्तीसमोर उभं राहून त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावलं तेव्हा कसलं भारी वाटलं होतं. सगळाच खुळेपणा...” मन्वा कितीतरी दिवसांनी अमोलबद्दल कुणाशीतरी बोलत होती. इतकी वर्षं अंजूला पण तिने कधी त्याच्याबद्दल सांगितलं नव्हतं.
“मन्वा, हे तू खरं सांगतीयेस? मग काय झालं?”
“त्याला माझं बारावी नंतर डान्सशोमधे गेलेलं आवड्लं नाही. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. कधीकधीना समीर, तुझ्याकडे बघताना मला अमोल आठवतो. त्याचेपण तुझ्यासारखेच फ़ंडे होते. राईट ऍन्ड रॉन्गचे फ़ंडे. तुझ्यासारखाच अभ्यासू वगैरे. “तुला आवडतं ना तू नाच, पण इंजीनीअर होच. त्याशिवाय आयुष्याला स्थैर्य कसे येइल? डान्स ही काय करीरर करायचं फ़िल्ड आहे का?” वगैरे वगैरे. खूप भांडले आणि सोडून दिलं. पण गेले कित्येक दिवस मला भेटतोय, आता त्याला मी परत हवी आहे. मी दर वेळेला त्याला टाळतेय. पण किती दिवस.. कधी कधी वाटतं... जावं बिनधास्त त्याच्याकडे...”
“मग का जात नाहीस?”
“एवढं सोपं आहे का ते समीर? आज मी इथे मुक्तपणे जगतेय. हव्या त्या वेळेला हवी तशी येऊ जाऊ शकते. आज माझ्या आयुष्यामधे कसलीही बंधनं नाहीत. कुणाची जामजोरी नाही. माझ्या मर्जीची मी मालक. आता हे सर्व सोडून परत कुणाच्या तरी आयुष्याचा भाग व्हायचं, कुणासोबत तरी रहायचं...”
“पण इथे तरी तू एकटी कुठेस? मी आहे, अंजू आहे.”
“पण तरी मी स्वतंत्र आहे. अंजू माझ्या आयुष्याचे निर्णय घेत नाही.. तू तर राहूच दे, लॉजिंग म्हणून राहतोस इथे.... आणि अमोल कितीही चांगला असला तरी मला माझ्या स्वातंत्र्याच्या बदल्यात तो नकोय.”
“पण तू असं समजून का चालतेस की अमोलसोबत राहीलीस तर तुला त्याच्या मताप्रमाणे रहावं लागेल? आधी बोल त्याच्याशी. घाईघाईत कुठलाही डीसीजन घेऊ नकोस. पण किमान एक संवाद तरी चालू ठेव. धाडकन असं उठून त्याच्या घरी रहायला जाण्याआधी थोडे दिवस भेटत रहा त्याला. दोघांमधे चांगलं कम्युनिकेशन डेव्हलप करा. मग तुला निर्णय घेणे सोपे जाईल.” समीर बोलत गेला. “सॉरी, माझा तसा तुला सला द्यायचा काही अधिकार नाही.. पण तरीही...” मघाशी फ़ाटकन उठून गेलेली मनवा आठवून तो म्हणाला.
“पटतंय मला तुझं म्हणणं, सगळं लक्षत येतंय... पण तरीही भिती वाटतेय.. खूप एकटेपणा येतो मनामधे, आता जे लाईफ़ आहे ते परफ़ेक्ट आहे. करीअर आहे, पैसा आहे, खुशी आहे... मग तरी कुण्या एकट्याच्या प्रेमासाठी हे सर्व सोडायचं, नक्की कशासाठी?”
“आय नो, हीच सेम कंडिशन माझी होती, जेव्हा मी इतक्या पगाराची मोठी नोकरी सोडून स्वत:ची कंपनी चालू करायचा विचार केला. पैसा होता, प्रमोशनचे चान्सेस होते, देशविदेश फ़िरायची संधी होती. पण हे सगळं सोडून स्वत:ची कंपनी.... ते पण या अशा रीसेशनच्या भरामधे... आता जे लाईफ़ आहे ते परफ़ेक्टच आहे की. मग कशाला रिस्क घ्या....” विषय थोडा बदलण्यासाठी तो म्हणाला.
“पण तरीही तरी तू कंपनी चालू केलीसच ना? कसं मिळालं तुला हे धाडस करण्याचं बळ?”
“हो, कारण विचार केला की मला माझं स्वत:चं असं काही हवंय. दुसर्‍याच्या हाताखाली काम करायचं नाही. स्वत:साठी एकट्यासाठी काम करायचं आहे. कंपनी नीट चालू झाली तर पैसा मिळेल, मान मिळेल. सगळं मिळेल. आणि जर नाहीच झालं तर तर परत आहेच एखादी नोकरी...”
“म्हणजे? परत मागे फ़िरून यायचं?”
“त्यात काय बिघडलं? आयुष्य म्हणजे काय सतत पुढे बघत चालणं नव्हे, कधीतरी मागे बघून आपल्याच चुका आपण निस्तरत वाट शोधणं. कंपनी जर बुडाली तरी उद्या मला एक कंपनी चालवायचा अनुभव तरी गाठीला राहील. पण खरं सांगू... जर आजच्या वादळामुळे कंपनीचं खूप नुकसान झालं तर मला फ़ार वाईट वाटेल. माझी काहीही चूक नसताना केवळ निसर्गलहरीमुळे...”
“तसं काहीही होणार नाही. डोन्ट वरी. तुझा डेटा वगैरे सर्व सेफ़ असेलच, त्यामुळे जास्त चिंता करू नकोस”
“इथे मी माझ्या ऑफ़िससाठी चिंतेत आणि तू अमोलसाठी. हो ना?” समीर म्हणाला.
समीरच्या या प्रश्नावर मन्वा काही न बोलता शांत बसून राहिली. बाहेरचा पाऊस अजून जोरात पडत होता. वारापण सुसाट होताच.
“चल, मी किचनमधे सगळं आवरते आणि झोपायला जाते. गूड नाईट.” म्हणत मन्वा पाचेक मिनिटांनी उठली. समीर तिथेच बसून राहिला. मन्वाच्या बेडरूमचा दरवाजा तिने बंद करून ठेवला होता, समीर घरात असतानाची तिची ही सवय होती. बाजूलाच असलेली अंजूची बेडरूम ऑफ़िसला जाताना अंजू रोज लॉक करून बाहेर पडायची. मन्वाने तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडला, तेवढ्यात तिचा घाबरा आवाज आला, “समीर, पटकन इकडे ये.” समीर उठून लगेच तिच्या पाठी गेला. समोरचं दृष्य बघून तो थबकलाच. मघाशी समोरचं झाड पडताना फ़ांद्यांनी मन्वाच्या रूमच्या खिडकीची काच पूर्ण फ़ुटली होती, आणि सपासप पाऊस आत शिरत होता, इतक्या वेळच्या वार्‍याच्या आणि पावसाच्या नादात दोघांनाही हे समजलंच नव्हतं.
रूममधे पावसाचे शिंतोडे उडत होते. बेडवरची गादी जवळजवळ भिजली होती. “इथे झोपणं अशक्य आहे.” समीर इतकंच म्हणाला.
मन्वाने लगोलग तिच्या पर्समधून चावी बाहेर काढली आणि अंजूच्या रूमचा दरवाजा उघडला. तिथे पण थोड्याफ़ार फ़रकाने हीच तर्‍हा होती. खिडकीची काच फ़ुटली नव्हती, पण अंजूच्या बेडरूमला असलेल्या बाल्कनीच्या दरवाज्यातून रूममधे घोट्याइतकं पाणी भरलं होतं.
“समीर, तू टॉर्च दाखव मला, हे पाणी तुंबलंय तिथे पाईपमधे काही अडकलं का बघते” मन्वा म्हणाली. अंधारामधे बाल्कनीच दिसत नव्हती, तरी दोघे सावकाश टॉर्चच्या अपूर्‍या उजेडामधे बाहेर गेली.
“सावकाश, पाऊस खूप आहे” समीर हलकेच तिला म्हणाला. मन्वाने बाल्कनीचा दरवाजा उघडल्यावर त्या वार्‍याचा फ़टका तिला खर्‍या अर्थाने जाणवला. सपासप चाबकाचे फ़टकारे मारल्यासारखा वारा. मोठ्या शिताफ़ीने तिने रेलिंगला घट्ट धरून पायानेच तुंबलेला पाईप मोकळा केला, पण तेवढं करेपर्यंत ती पूर्ण भिजली. “आता पाणी तिच्या रूममधे तरी येणार नाही. बाकीचं उद्या बघू” म्हणत ती आत आली आणि बाल्कनीचा दरवाजा घट्ट बंद केला. “पाऊस आहे का मस्करी.. एवढ्या जोरात पाऊस आयुष्यात कधी पाहिला नाही मी......”
“रूमचा दरवाजा उघडा राहू देत का? परत पाणी आलं तर समजेल किमान” समीरने विचारलं.
“हो. चालेल. अंजू तसं काही म्हणणार नाही. मला टॉर्च दे, मी पटकन ड्रेस चेंज करून घेते.”
मन्वा ड्रेस बदलून केस पुसत हॉलमधे आली तेव्हा समीर खिडकीतून बाहेर बघत होता. “ही रात्र फ़ार मोठी आहे ना? आताशी दहा वाजलेत...”
“पाऊस काही कमी होत नाही.... वारापण तसाच जोरात चालू आहे. मघाशी बातम्यात म्हणाले की नऊ नंतर वादळाचा जोर कमी होइल. अमोलचा जॉब लोअर परळला आहे, कुठे असेल तो?” इतक्या वेळात पहिल्यांदा समीरला तिच्या आवाजामधे भिती जाणवली.
“अग, चिंता करू नकोस. असेल तो व्यवस्थित. मोबाईलला रेंज आली की आपण लगेच फोन करू या. तुझ्याकडे त्याच्या ऑफ़िसचा लॅन्डलाईन आहे ना? मग सकाळी उठून मोबाईलला रेंज नसेल तर पीसीओवरून तो नंबर ट्राय करू या... सगळं ठिक होइल...” मन्वाला सांगताना तो एकीकडे स्वत:ला पण सांगत होता.
मन्वा अजून विचारांतच गढलेली होती. अमोल, अंजू, तिच्या डान्सग्रूपचे सहकारी, मित्र-मैत्रीणी कितीजणं कुठे असतील आता? सगळे व्यवस्थित असतील ना आता.... कुणाचं काही होणार तर नाही ना? अख्खी मुंबई आज या वादळाच्या तडाख्यात सापडली होती. किती आयुष्यं उद्ध्वस्त झाली असती या वादळाने? इतका वेळ दुर्लक्ष केलेल्या कुशंकेच्या झडी बाहेरच्या पावसासारख्या थडाथडा बसायला लागल्या. समीरदेखील वरकरणी शांत दिसत असला तरी त्याच्या मनामधे आता किती खळबळ माजली असेल हे तिला माहित होतं.
“तुला तुझ्या रूममधे झोपता येणार नाही. इथे हॉलमधेच झोपूया का? तू माझ्या बेडवर झोप, मी खाली झोपेन.” समीर पाच मिनिटांनी म्हणाला.
“नको. तू बेडवर झोप. मी इथे टेबलवर झोपेन.” मन्वा म्हणाली. “तशी मला गादी नसली तरी चालते. आय ऍम युज्ड टू इट”
“सो गूड नाईट?” समीर म्हणाला.
“तू झोप. मी गाणी ऐकत बसते.”
“कशाला मोबाईलचा चार्ज संपवतेस? उद्या लाईट कधी येतील माहित नाही.”
“एम पीथ्री प्लेयर आहे. त्याचा चार्ज संपला तरी चालेल. मला आता रूममधे मिळाला. झोप तरी येणार नाही असल्या वारा पावसांत. किमान गाणी ऐक्ताना मूड तरी हलका होइल.”
समीरने टॉर्चच्या उजेडात सोफ़्याचा बेड बनवून घेतला.. खिडकीच्या फ़ुटलेल्या काचेमधून वारा सणाण्ण आत शिरत होता, अशा वार्‍यात मेणबत्ती टिकणं शक्यच नव्हतं.
“तुझा देवावर विश्वास आहे ना गं?” समीरने बेडवर पडल्या पड्ल्या अचानक विचारलं.
“आं?” अचानक आलेल्या समीरच्या या प्रश्नाने मन्वा दचकलीच. कानातला हेडफोन काढून तिने विचारलं. “काय म्हणालास?”
“तुझा देवावर विश्वास आहे ना?” समीरने परत विचारलं.
“हो.”
“मग आता जे काही हे चालू आहे ते प्रलय वगैरे आहे का? आय मीन लहानपणी मी काही गोष्टी ऐकल्या आहेत. माझा देवावर कशावरच विश्वास नाही....”
“पण असं काही पाहिलं की देवावर विश्वास ठेवावासा वाटतो ना? एखादी सुंदर गोष्ट पाहताना कित्येकदा देव आठवत नाही... पण असं हे रौद्रतांडव बघताना देवाचीच आठवण येते. त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाला शक्य नाही असलं काहीतरी विध्वंसक...” मन्वा स्वत:शी बोलत असल्यासारखी म्हणाली. तिच्या डोळ्यासमोर तांडवामधे शिवशंकराची संतप्त मुद्रा आणि त्याच्या नर्तनाने हिंदकळ्णारी पृथ्वी तरळून गेली. “हा प्रलय आहे की नाही ते मला माहित नाही. आजवर असं कधी काही पाहिलंच नाही मी. पण आता अचानक तुला हे का आठवलं?”
“कारण, मला मघासपासून का कुणास ठाऊक वाटतंय की एव्हरीथिंग विल बी ओव्हर. आता हे सगळं संपून जाणार आहे. माझं ऑफ़िस, माझं करीअर, माझी सगळी स्वप्नं.... सगळं सगळं संपणार आहे. ही रात्र काळरात्र ठरेल माझ्यासाठी. आणि माझंच कशाला? सगळंच जग संपून जाणार आहे.” समीर हताशपणे म्हणाला. “जर या वादळाने माझं करीअर ट्रॅकबाहेर फ़ेकलं तर? निसर्गाच्या मर्जीपुढे कुणाचं काही चालत नाही... पण त्या मर्जीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर.....?”
“एवढा पण डिप्रेस होऊ नकोस. सगळं नीट होईल. प्रलय एवढ्यात येत नाही, आणि समजा आलाच तर अख्खं जग नष्ट झालं तर कशाला म्हणून घाबरायचं? तुझ्या ऑफ़िसची वाट लागेल तशीच तुझ्या क्लायंट्सच्या ऑफ़िसची पण लागेलच ना!!! प्रत्येक जण कसल्या ना कसल्या त्रासात असेल तर कुणीच दु:खी राहत नाही. कशाला विनाकारण घाबरतोस? रात्र आहे म्हणून भिती वाटतेय, रात्र वैर्‍याची असते, पण दिवस आपला असतो. सूर्य उगवला की मग पुढचं काय ते बघू. आता शांत रहा.” मन्वा पुन्हा एकदा समजूतीच्या अवाजात म्हणाली. “तुला नक्की काय वाटतंय ते माहित आहे मला. अवस्था समजू शकते मी तुझी. तुझ्या आणि माझ्या आयुष्यामधे काहीही साम्य नसलं तरीही..”
“नाही, मन्वा. तसंच नाहीये. एका दृष्टीने आपण दोघंही सिमिलर आहोत”
“कसे?”
“आपण चौकटी मोडल्या आहेत, मन्वा. शिक्षण, नोकरी, लग्न अशा ठरलेल्या रेषांवरून न चालता, आपण काहीतरी वेगळं धाडस केलं. तुझं शिक्षण-लग्न वगैरे सोडून नृत्यात करीअर करणं काय आणि माझं बक्कळ पगाराची नोकरी सोडून स्वत:ची कंपनी काढणं काय... दोन्ही वेडेपणाचेच नमुने. या गोष्टी कधीच या चौकटींना मानवत नाहीत. तू आणि मी, बघायला गेलं तर दोन ध्रुवावरचे प्राणी आहोत. पण तरीही, आपण आतून खूप सारखे आहोत.”
मन्वा हसली. “असा विचार मी कधीच केला नाही.... करीअरचा निर्णय घेताना आपण कसली चौकट मोडत आहोत वगैरे तर अजिबात नाही... जे मला हवं होतं त्याचाच फ़क्त विचार केला. स्वार्थी म्हणू शकतोस किंवा अजून काही पण.... अमोलला आता दहा वर्षानंतर वाटतंय की तो माझ्याशिवाय जगू शकत नाही. पण मला चांगलं माहिती होतं की त्याने ज्या क्षणी माझ्याकडे पाठ फ़िरवली त्या क्षणापासून मी नाही जगू शकणार. पण जगलेच ना... अजून जगते आहेच ना?”
“जगण्यासाठी नक्की काय हवं ते आपल्यालाच कित्येकदा माहित नसतं ना?”
“हो, म्हणून तर मनामधे संभ्रम निर्माण होतो, आज मी अमोलकडे परत जाईन, पण उद्या? उद्या मला असं वाटलं की मला माझ्या आयुष्यात त्याची काहीच गरज नाही तर???”
“पण मन्वा, किती दिवस अशी एकटी राहणार आहेस? हा एकटेपणा तुला निगेटीव्ह बनवतोय, कडवट बनवतोय, असं तुला कधी वाटत नाही का? आज ना उद्या मी सोडून जाईन, अंजू लग्न करून जाईल. घरचे ऑलरेडी बघतायत तिचं. इथे दुसरा कुणीतरी रूममेट येईल. पण तरी तू इथे एकटीच? किती दिवस? कधी ना कधी कोण तरी हवंसं वाटेल? आज तुझ्याकडे खूप काम आहे. वेळ मिळत नाही अशी तक्रार आहे. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा... विचार करून बघ ना.... “
“खरं सांगू? मला खरंच असं कधी वाटत नाही की आयुष्यात कुणी असावं....”
“कधीनाकधी वाटेल. तेव्हा? तेव्हा काय करशील? मन्वा, कदाचित माझं बोलणं तुला आवडलं नसेल तर माफ़ कर मला. मी हे सर्व तुझ्याशी का बोलतोय मलाही माहित नाही. कदाचित या वादळाबद्दल विचार करायचा नाही मला म्हणून असेल... पण याहीआधी कितीतरी वेळा तुला विनाकारण सतत तुझा इन्सल्ट होइल असे टोमणे मारलेत... माझी रूममेट डान्सर आहे हे मी कधी मोकळेपणाने ऍक्सेप्ट करूच शकलो नाही... माझ्या मध्यमवर्गीय संस्कारांची मर्यादा म्हण. पण तरीही मन्वा, एक व्यक्ती म्हणून तू मला कायम कोड्यात टाकलंस. मी लाईफ़मधे कधी सीरीयसली असा विचार केला नव्हता की एखाद्या मुलीला मी असं काही सांगेन. माझा प्रेमावर, कमिटमेंटवर अजिबात विश्वास नाही, बीलीव्ह मी, लाईफ़मधे खूप मुली फ़िरवल्यात. टाईमपास या लेबलने. पण तुझ्याकडे बघून मला या प्रेमावर विश्वास ठेवावासा वाटतोय. का ते माहित नाही... पण तुझ्यासारखी स्वत:वर प्रचंड विश्वास असणारी, स्वत:च्याच मनाचाच निर्णय खरा मानणारी अशीच कोणीतरी आयुष्यात हवी.....” समीर अचानक बोलायचा थांबला.

“समीर, माझाच अंदाज खरा ठरला... अंजूला कायम म्हणायचे मी, समीर दिसतो तितका सरळ नाही.... टिपिकल फ़्लर्ट आहे तो. आता तूच सांगतोयस... टाईमपास वगैरे म्हणत मुली फ़िरवणारा,” दोन मिनिटांनी मन्वाचा आवाज आला. नेहमीसारखाच हसरा आवाज.
समीर पण गालातल्या गालांत हसला. “विषय कसा बदलायचा ते तुझ्याकडून शिकायला हवं मन्वा, माझ्या एवढ्या मोठ्या लेक्चरमधे फ़क्त तुला तेवढंच ऐकू आलं का? पण माणूस जसा दिसतो तसाच असतो असं नाही ना? मला पाहिल्यावर लोक मला नर्ड, अभ्यासू स्कॉलर समजतात. इमेजच तशी आहे माझी. लहानपणापासून हुशार, प्रत्येक वेळेला वर्गात पहिला नंबर, सीन्सीअर वगैरे... मी तसा आहेच, त्यात वाद नाही. पण तितकीच माझी ओळख पण नाही ना?” ...
“नाही, माझ्यासाठी तरी तुझी ओळख एक अत्यंत एनॉयिंग रूममेट इतकीच आहे.” मन्वा हसत म्हणाली.
“उद्या ऑफ़िसचं काही झालं असेल तर कदाचित महिनोनमहिने रेंट चुकवणारा रूममेट म्हणूनदेखील माझी ओळख बनेल...” अचानक समीर म्हणाला.
“डोन्ट वरी, तेवढं काही होणार नाही, आय जस्ट होप की सर्व सुरक्षित असेल आणि सर्व नीट असेल.... देवाकडे आज हीच प्रार्थना. ”
“माझा विश्वास नाही, पण तरीही.. आय जस्ट विश द सेम!! म्हणून माझ्यावतीने तूच प्रार्थना कर. किती वाजलेत?”

“बारा वाजून गेलेत... माझ्या प्लेयरमधे कुठलं गाणं चालू आहे माहित आहे?”
जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो
थोडीसी रात और है हमे सोने तो दो
“झोप गुपचुप असं सरळ सांग ना. इतकं फ़िल्मी पद्धतीने कशाला?” समीर म्हणाला.
“लाईफ़ इज फ़िल्मी. इतक्या मोठ्या चक्रीवादळामधे, जिथे हजारो लाखो लोक जीवाच्या आकांताने रात्र घालवत आहेत, तिथे आपण दोघे बसून आयुष्याच्या तत्त्वज्ञानाची चर्चा करतोय. दॅट इज फ़िल्मी”
“आपण दुसरं काही करू पण शकत नाही. या बिल्डींगच्या बाहेर पडू शकत नाही, कुणाची मदत करू शकत नाही, इथे राहून आपला जीव सुस्थितीत ठेवू शकतो.. शिवाय, हे चक्रीवादळ मला माझ्या आयुष्यातला सगळ्यांत मोठा निर्णय कसा चुकला होता ते सिद्ध करून मगच जाणार आहे बहुतेक!!”
मन्वा हसली, “वादळ काहीही सिद्ध करणार नाही, ते येणार आणि जाणार... गेल्यावर आपणच तपासायचं आपलं आयुष्य!! आणि आता म्हणालास, तसं जीव वाचवणं महत्त्वाचं! “मन्वा म्हणाली.
“तेही आहेच,” समीर म्हणाला. “मन्वा, पाऊस जरा कमी झाल्यासारखा वाटतोय ना?”
“हो. कदाचित.. वारा पण कमी झालाय असं वाटतंय, वादळाचा जोर कमी होतोय बहुतेक!! उद्या सकाळपर्यंत सर्व शांत होइल ना?”
“बहुतेक! आणि अमोल अंजू सर्वजण व्यवस्थित असतील. चिंता करू नकोस. निवांत झोप आता..” समीर बेडवर पडत म्हणाला.
“तूपण झोप. तुझं ऑफ़िस आणि इतर सर्व काही सुरक्षित असेल... गूड नाईट!” मन्वा डोळे मिटत म्हणाली.

- नंदिनी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

सगळ्यात पहिली तुझी गोष्टं शोधून वाचली.
मस्तं आहे.
आवडली.

मी लेखक/लेखिकेचं नाव न वाचता कथा वाचायला घेतलेली आणि वाचताना प्रत्येकवेळी ही कथा नंदिनीचीच असणार अशी खात्री वाटत होती!
यू आर जस्ट ऑसम!!!

मानवी मनाचे कंगोरे अधोरेखीत करण्याची लेखिकेची हातोटी याही कथेत दिसून आली. सुरेख कथा.

संपादक, काही चुका सुधारणार का?
>>तत्त्वद्न्यानाची , सिद्द्ध, मीडियावाले>>

सुरेख कथा! आवडली!

सुरेख! आवडली कथा! बारीक सारीक चुकांचं नंतर पाहू!

जरा लांबल्यासारखी वाटली. किंचित कंटाळा पण आला. पण कॉन्सेप्ट आवडलाच.

>>
जागे है देर तक हमे कुछः देर सोने दो
थोडीसी रात और है हमे सोने तो दो
आशे अधुरे ख्वान जो पुरे हो न सके
एक बार फ़िरसे नींद मे वो ख्वाब बोने दो.
<<

खूप टायपो राहून गेलेल्या दिसत आहेत. या ओळी लगेच नजरेत आल्या म्हणून प्रकर्षाने जाणवलं. संपादक, जरा बघणार का?

सुरेख विषय आहे .. 'ती' रात्र हा backdrop घेऊन त्याचा विस्तारही अगदी छान केलाय नंदिनी.

साती, रिया +१०००
कधी नव्हे तो नंदिनीच्या 'पूर्ण' कथेच्या शेवटावर 'क्रमशः' असावे, असे मनापासून वाटले. :)

Mastach... Ekdam oghavati, Aavdalii!!

कथाकल्पना छान आहे, शेवट जरा अ‍ॅब्रप्ट वाटला, पण दुसरा काय असला असता ते सांगता नाही येणार :)

आवडली कथा !

विषय आवडला, वातावरण निर्मिती/मांडणी/पात्रं छान उतरली आहेत, पण शूम्पी म्हणते तसं, मलाही मध्ये
कुठेतरी स्लो झाल्यासारखी वाटली. शेवटाबद्दल मैत्रियीशी सहमत.

अवांतरः समीर चे संवाद वाचतांना स्वप्नील जोशीच डोळ्यासमोर येत होता :-)

नंदिनी - अपूर्ण वाटली ग. असं आयुष्य थांबत नसतं ना, पाण्याला बांध घातला तरी कुठून ना कुठून ते रस्ता काढतं म्हणून असेल.

इथे नाही तरी माबो गुलमोहरवर कथा पूर्ण कर बाई नाहीतर मला अपूर्ण वाटली म्हणून मीच कल्पना विस्तार करायला लागेन...

सर्वाना मनापासून धन्यवाद.

आवडली कथा !

कथा आवडली. वादळाची वातावरण निर्मिती अतिशय मस्त झालीये. इतकी की क्षणभर खरच बाहेर वादळ होतंय असं वाटून गेलं.

छान आहे कथा. खूप मोठी आहे मात्र.

मस्तच! सविस्तर नन्तर लिह्ते.

मी पण भाऊंची व्यंगचित्रं आणि थेट तुझीच कथा वाचायला घेतली.
खूप सुरेख. मनाचा वेध घेणारी कथा...

सुरेख कथा !

अंक उघडल्यावर सगळ्यांत पहिल्यांदा तुझी कथा वाचली! जियो!

मस्त कथा!

वातावरण निर्मिती छान झाली आहे ..

>> खूप टायपो राहून गेलेल्या दिसत आहेत

हो .. "ग्यान" हा तर मला सगळ्यात नावडता टायपो/चुकीचा शब्द ..

जागें है देर तक हमें कुछ और सोने दो
थोडीसी रैन बाकी है सुबह तो होने दो
आधे अधुरे ख्वाब जो पुरे ना हो सके
एक बार फिर से नींद में वो ख्वाब बोने दो

असं आहे ना?

छान कथा. तू एक आघाडीची कथा लेखिका नक्की बनणार. शेवट प्रेडिक्टेबल नाही हे फार आवडले.

वादळाची वातावरण निर्मिती अतिशय मस्त झालीये. इतकी की क्षणभर खरच बाहेर वादळ होतंय असं वाटून गेलं. >>> +१०

सुंदर कथा.

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. बर्‍याचशा टायपो आता दुरूस्त झालेल्या दिसत आहेत. त्यासाठी संपादकांचे आभार.

वातावरण निर्मिती आणि व्यक्तिचित्र फार ताकदीने उभं केलंय!

चांगली लिहिली आहे कथा.