कुठल्याही सजिवाच्या आयुष्यात श्वासाला जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व माझ्या आयुष्यात वन्यजीवसृष्टीला आहे. छंद म्हणून जंगलात भटकायचं आणि नुसतेच प्राणी-पक्षी यांचे फोटो काढायचे, हे मला मान्य नाही. या वन्यसृष्टीतील दुर्मिळातला दुर्मिळ क्षण टिपायचं वेड मला आहे. या झपाटलेपणामुळे मी वाट्टेल ती जोखीम पत्करायला कधीही तयार असतो. कधी गुडघाभर चिखलात तासन्तास उभं राहावं लागतं, तर कधी काट्याकुट्यातून प्रवास करावा लागतो. पण मला याची पर्वा नाहीये. कारण असामान्य काम करायचं असेल धोका सामान्य असून चालणारच नाही. जंगलातले असामान्य क्षण टिपण्यासाठी मी कितीही वेळ प्रतीक्षा करू शकतो. हे म्हणणं आहे बैजू पाटील या असामान्य फोटोग्राफरचं.
बैजू - औरंगाबादच्या एस. बी. कॉलेजमध्ये शिकलेल्या कोणालाही हे नाव अगदीच परिचयाचं. इथे शिकणार्या प्रत्येकाला बैजूज् कॉर्नरची सवय. येताजाता प्रत्येक जण इथे थोडावेळ थांबणारच. पण हा बैजू पुढे जाऊन एवढा मोठा फोटोग्राफर होईल, असं आम्हांलाच काय त्याला स्वतःलादेखील वाटलं नसावं. त्याच्या या प्रवासाबद्दल त्याच्याकडूनच जाणून घेऊया.
नुकत्याच मिळालेल्या 'सेवस एस बँक - नॅचरल कॅपिटल अवॉर्ड'बद्दल तुझं मनःपूर्वक अभिनंदन. आपण तुझ्या या पुरस्कारप्राप्त फोटोपासूनच सुरूवात करूया. या स्पर्धेसाठी तुझ्या ज्या फोटोला पुरस्कार मिळाला आहे, त्या फोटोबद्दल आणि या पुरस्काराबद्दल आम्हांला सांग.
आशियातील ‘बेस्ट वर्ल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’ हा पुरस्कार मिळवणे, हे माझ्यासाठी स्वप्न होते.
सेवस आणि एस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट छायाचित्रकार शोधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंधरा हजारांच्या जवळपास संपूर्ण आशियातून छायाचित्रे मागवण्यात आली होती. त्यात भारत, कोरिया, नेपाळ, पाकिस्तान, जपान या ठिकाणांहून छायाचित्रे आली होती.
ज्या फोटोसाठी मला हा पुरस्कार मिळाला, तो फोटो म्हणजे पाणकावळा माशाला गिळतानाचा फोटो आहे. हा फोटो राजस्थान इथल्या भरतपूर पक्षी अभयारण्यात काढला आहे. ही जी मूव्हमेंट असते ही फार रेअर मूव्हमेंट आहे. माझ्या गाईडने मला ही माहिती दिली होती, की इथे हे असे पक्षी येतात आणि असे मोठे मोठे मासे पकडतात. या फोटोसाठी मी आठ दिवस नुसताच त्या पक्ष्यांचं बिहेविअर अभ्यासत होतो. तो कधी, कसा, कुठल्या बाजूने येतो, तो त्या माश्याला पकडण्यासाठी कशी डाईव्ह मारतो, ही सगळी घटना किती वेळात घडते? त्यानंतर फोटोसाठी जायला लागलो. शेवटी पाचव्या दिवशी मला ही मूव्हमेंट कॅप्चर करायला मिळाली. माझ्या नशिबाने ही मूव्हमेंट आणखीनच रेअर होती. कारण त्या पक्षाने ज्या माश्याला पकडलं होतं, तो आकाराने जरा जास्तच मोठा होता. त्याने जो मासा पकडला तोपण त्याचा स्वतःचा आकार लहान असल्याने त्या माश्याला गिळता येत नव्हतं. मग तेव्हा त्याने त्या माश्याला गिळण्यासाठी अगदी अर्ध्यापेक्षाही कमी सेकंदासाठी थोडासा बाहेर काढला, पोझिशन घेतली आणि पुन्हा गिळला. हा जो त्या माश्याला बाहेर काढून पुन्हा गिळण्याचा क्षण होता तो मला माझ्या कॅमेर्यामधे कॅप्चर करता आला.
या क्षेत्रात किती वर्षांपासून आहेस? कसा आलास? आणि त्या आधी काय करत होतास?
मी एक छंद म्हणून फोटोग्राफीला सुरवात केली होती आणि अजूनही छंद म्हणूनच फोटो काढतो.
या क्षेत्रात जवळजवळ १०-१५ वर्षांपासून आहे. त्याआधी मी एक चांगला चित्रकार आहे. चित्रकलेतली रंगांची जाण आणि आवड मला माझ्या या फोटोग्राफीसाठी पूरक ठरली आहे. कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं, पण नंतर पुढे फोटोग्राफीमधेच रमलो, तेच प्रोफेशन झालं आहे. विद्यार्थीदशेत मला लॉन टेनिस, स्विमिंग आणि खो-खो आदी खेळांत मला चार सुवर्ण आणि तीन रजत पदकं मिळाली आहेत.
या क्षेत्रात यायचं कारण म्हणजे कॅमेर्याचं आकर्षण. कॅमेर्याचं खूप आकर्षण होतं मला. आपलं औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. इथे कितीतरी प्रेक्षणीय स्थळे आहेत. लहानपणापासून जेव्हा जेव्हा आम्ही अशा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायला जायचो, तेव्हा त्या परदेशी पर्यटकांच्या गळ्यातले वेगवेगळे कॅमेरे बघून मलाही असा एखादा कॅमेरा हवा, असं वाटायला लागलं. त्याचा परिणाम म्हणून माझ्याकडे कॅमेरा आला, मी फोटो काढायला लागलो आणि मी काढलेले फोटो लोकांना आवडायला लागले. त्यामुळे मलाही एक प्रकारची एनर्जी मिळाली. आपण वेगळं, चांगलं काम करत आहोत हे जाणवलं. त्यानंतर मी अभ्यास करायला सुरूवात केली. त्यासाठी मी बंगळूर, मुंबई, सिंगापूरला आणि दिल्लीला गेलो. तिथे सगळीकडे बरंच शिकलो.
तरी मी शोधात होतो की कोणीतरी गुरू मला मिळेल आणि मी माझ्या कलेमध्ये अजून पारंगत होईन. बर्याच सिनिअर लोकांकडे गेलो, त्यांच्याकडून काही शिकायचा प्रयत्न केला पण तिथे फार काही मिळालं नाही. नीट मार्गदर्शन असं कोणी केलं नाही. या सगळ्यामध्ये माझी जवळपास पाच वर्षं गेली. माझ्या लक्षात आलं, की मी माझ्या अनुभवातून आतापर्यंत बरीच मजल मारली आहे. माझे अनुभव मला बरंच शिकवून गेले आहेत. जाणवलं, की कदाचित हे असं स्वतःचं स्वतः शिकण्यात जे काही ज्ञान वाढतं, ते कोणी स्पूनफीड केल्याने वाढत नसावं. मला जर गुरू मिळाले असते, तर मी फक्त त्यांनी दाखवलेली वाट किंवा दिशा चालत राहिलो असतो. एवढं एक्स्प्लोअर केलं नसतं. या पाच वर्षांत मी जे जे मिळेल ते घेत गेलो, घडत गेलो. तेव्हा प्रत्येकानेच स्वत:त स्वतःचा गुरू नक्की शोधावा. आपला एकलव्य व्हायला फार वेळ नाही लागत. माझ्या क्षेत्रातला गुरू असा मला मिळाला नाही पण आयुष्यात काही लोकांना गुरू मानून मी वाटचाल करतो आहे.
असाच एखादा फोटो काढतानाचा लक्षात राहिलेला एखादा अनुभव आम्हांला सांगशील का?
वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची म्हणजे आपण युद्धावर जायच्या शारीरिक आणि मानसिक तयारीनेच जायला हवं. जंगलात जायचं तिथे रस्ते कसेही असतात, कसंही कुठेही राहावं लागतं, मिळेल ते खावं लागतं, तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायलाच लागतं. तुमच्या प्रकृतीच्या तक्रारी असतील तर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकणार नाही. इथे मला माझ्या शालेय जीवनातल्या सगळ्या स्पोर्टस् अॅक्टिव्हिटीमुळे मला फार फायदा होतो आहे.
वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी तुम्हाला प्रचंड पेशन्स ठेवावा लागतो. निसर्गाचा एक भाग बनून वावरावं लागतं.
दोन सरड्यांच्या भांडणाचा एक फोटो आहे त्याबद्दल सांगतो. या फोटोलादेखील कॅनन बेटर फोटोग्राफी फोटोग्राफर ऑफ द इअर २०११चा पुरस्कार मिळाला आहे. फॅन थ्रोटेड लिझार्ड जातीचा सरपटणारा सरडा एका मादीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न पाहून दुसरा एक सरडा त्याच्यावर हल्ला करतो. निसर्गाच्या रम्य वातावरणात दोन प्राण्यांची जिवाच्या आकांताने सुरू झालेली झुंज मी कॅमेर्यात टिपली. हे छायाचित्र जगभरातील ७० हजार छायाचित्रातून निवडलं गेलं होतं.
तर हा फोटो काढण्यासाठी मी जवळपास तीन वर्षं तिथे जात होतो. कोणी या सरड्याच्या जवळपास गेलं तरी तो घाबरत असे. आता साहजिक आहे, त्यांना तुमची सवय नसते. ते तुम्हांला घाबरणारच. पण मला तो घाबरत नव्हता. म्हणजे त्यांनी मला अगदी पोझ दिली असं नाही, तर मी त्यांच्या एवढा जवळ गेलो होतो. तेच तेच कपडे घालून मी तिथे रोज जात होतो. शेवटी त्यांना माझी एवढी सवय झाली, की त्याला माझ्या असण्याने फार फरक पडत नव्हता. ते बिचकत-घाबरत नव्हते. त्यामुळे मला हा फोटो काढता आला. निसर्गावर तुमचा कंट्रोल नसतो. तुम्ही टेक म्हटलं की तुमचं शूटिंग सुरू आणि कट म्हटलं की बंद, हे नेचर फोटोग्राफीमधे अजिबात चालत नाही.
तसे अनेक प्रसंग आहेत खरंतर. बर्याचदा प्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यातला एक अगदी आठवणारा म्हणजे लदाखला पेंगाँग लेक आहे, तिथे ब्राउन नेटेड गल्स हे मायग्रेटरी बर्डस येतात. या पक्ष्यांचे फोटो काढायचे ठरवलं होतं. लेकचं पाणी म्हणजे जस्ट वितळलेला बर्फ. मला त्या लेकमध्ये उभं राहून फोटो काढायचे होते. तिथल्या स्थानिकांनी मला वेड्यात काढलं. या पाण्यात आम्ही कधीच जात नाही, तुम्हीही जाऊ नका! पण माझी जिद्द होती. तिथे उभं राहून मला त्या पक्ष्याचा पाण्यात असतानाचाच फोटो काढायचा होता. माझ्याकडे कोणतीही हायटेक साधनं नव्हती. मी आपला माझा ट्रायपॉड लावून लेकच्या पाण्यात शिरलो. मग जाणवलं, की हे लोक म्हणत आहेत ते खरं आहे. पण मला पुढे जाणं भाग होतं. मी तसाच इच्छित जागी जाऊन पोचलो, कॅमेरा सेट केला आणि तब्बल २५-३० मिनिटे कंबरेपर्यंत अशा गोठवून टाकणार्या पाण्यात उभा राहिलो. फोटो काढले. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मात्र माझी हालत खराब होती. माझं संपूर्ण शरीर बधीर झालं होतं. दात वाजत होते. फक्त डोळे नीट काम करत होते. माझ्या गाईडनं मला लगेच ब्लँकेटमध्ये लपेटलं आणि गाडीतला हीटर चालू करून गरमगरम चहा प्यायला दिला, तरी नंतर माझी गाडी रूळावर यायला तीन तास लागले.
तुझं जे पुस्तक आहे 'वाईल्डस्केप' नावाचं , असं हे पुस्तक काढावं असं तुला कसं वाटलं? आणि या पुस्तक प्रकाशनामागची कथा काय आहे?
मला हा फोटो काढायचा छंद बराच आधीपासून होताच, हे मी बोललोच. एकदा इथे एक क्रिकेटचा मोठा सामना चालू होता. मी माझा कॅमेरा, माझ्या टेलिलेन्सेस घेऊन तिथे गेलो होतो, फोटो काढत होतो. तिथे खासदार विजयजी दर्डा आले होते. त्यांनी माझी चौकशी केली, की हे एवढं मोठं काय आहे? मी त्याचं काय करतो? मग मी माझ्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीबद्दल त्यांना सांगितलं. त्यांनी माझे फोटो बघायची इच्छा व्यक्त केली आणि मी माझे सात-आठ वर्षांत काढलेले फोटो त्यांना दाखवले. त्यांनी त्यांच्या काही परदेशी मित्रांना माझे फोटो दाखवले. तेही फारच प्रभावित झाले. त्यांनी ते फोटो काढण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली, मग मी त्यांना भेटलो. या सगळ्या फोटोंच्या संग्रहाचं पुस्तक का काढू नये, असं त्यांनी सुचवलं. मलाही असा काही प्लॅटफॉर्म हवाच होता. या पुस्तकामध्ये बर्याच रेअर प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या बिहेविअरच्या निरीक्षणाच्या नोंदींचाही समावेश केला गेला आहे.. लोकमत प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा या पुस्तकाचं खूप कौतुक झालं आहे. आता या पुस्तकाचा पुढचा भाग लवकरच येणार आहे. त्याचा विषय अंडरवॉटर हा आहे. त्यासाठी मी लवकरच अंदमानला जातो आहे. तिथलं सगळं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. लवकरच तुम्हांला हे दुसरं पुस्तक वाचायला मिळेल.
नव्याने फोटोग्राफीकडे वळणा-या लोकांना तू काय सांगशील?
मी जरा इथे सविस्तर बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे फोटोग्राफी हा अतिशय महागडा छंद आहे. कॅमेरे, लेन्सेस आणि इतर अॅक्सेसरीज हे सगळं प्रचंड महाग असतं. पूर्वीच्या काळात कसं एखाद्या राजा-महाराजांच्या दरबारात एखादी कला राजाला आवडली की दे गळ्यातला कंठा काढून किंवा दे सुर्वणमुद्रांची थैली, असं होत नाही. आपल्याला आपल्या खिशातून पैसा खर्च करावा लागतो. तो परत मिळणारच नाही हे माहिती असायला हवं. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर याकडे बघत असाल तर ते अगदी चूक आहे. हां, तुम्ही व्यवस्थित स्टुडिओ सुरू केला असेल, तर तुम्हांला नक्कीच त्यातून पैसा मिळेल. मी असंच करतो. माझं नेक्स्ट मिशन प्लॅन झालं, की मी माझ्या स्टुडिओमध्ये काम करतो. त्यासाठी लागणारा पैसा जमवतो. प्रसंगी सायकलवर ये-जा करून पेट्रोलचेसुद्धा पैसे वाचवतो. त्यातून मला दोन गोष्टी साध्य होतात. माझा व्यायाम होतो आणि पेट्रोलचे पैसे वाचतात. पैसे जमा झाले, की मी माझ्या मिशनवर जायची तयारी करतो. तर या छंदाकडे वळताना, तुम्ही अर्थार्जनासाठी दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे, यातून अर्थार्जन होईल ही अपेक्षा ठेवू नये.
फोटो काढण्याबद्दल आणि आपल्या निसर्गसौंदर्याबद्दल पण मला बोलायचं आहे. आपल्या भारतातील निसर्गाचे फोटो काढूया म्हटलं, तर आपल्याकडे एवढी विविधता आहे, की आपला एक जन्म अपुरा पडेल. मोठेमोठे परदेशी फोटोग्राफर इथे येऊन फोटो काढतात, त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळतात. मग आपण का दुर्लक्ष करायचं? आपणही आधी आपल्या सभोवतालाचे फोटो काढूया ना. आपण आपल्या सुंदर देशाचं भान ठेवायला हवं. आपल्या भारताचं सौंदर्य तुम्ही डोळसपणाने बघा, ते तुमच्या कॅमेर्यात पकडा. बघा किती विविधता आहे आपल्याकडे.
माझा पुढचा प्रश्न या संबधीच आहे, की तुम्ही असे ज्या मिशनवर जाता ते मिशन स्पॉन्सर करणं अशी काही सरकारी मदत तुम्हांला होते का?
हे आपल्याकडे अतिशय दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या फोटोग्राफरना जर पूर्णवेळ काम करता आलं आणि असे अजून निसर्गातले कित्येक दुर्मिळ क्षण टिपता आले तर किती जास्त काम होईल. पण आम्हांला आमचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी - व्यवसाय करावा लागतो. पैसा जमवावा लागतो, मग आम्ही मिशनवर जाऊ शकतो. जर आपल्या राज्य सरकारने म्हणा किंवा केंद्र सरकारने म्हणा वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी प्रोत्साहनपर काही योजना सुरु केली, तर ती नक्कीच स्वागतार्ह असेल. कारण नाही म्हटलं तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर माझ्या फोटोची निवड झाली, तरी भारताचंच नाव होत असतं. छायाचित्रणाच्या माध्यमातून मी माझ्या नजरेतून वन्यजीवसृष्टी तुमच्या समोर मांडत असतो याचं मला खरंच खूप समाधान आहे
बैजू, वेळात वेळ काढून तू आम्हांला मुलाखत दिलीस त्याबद्दल मायबोली परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या सगळ्या मिशनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रकाशचित्रांचे सर्व हक्क बैजू पाटील यांच्याकडे राखीव.
- कामिनी फडणीस-केंभावी
प्रतिसाद
मस्त झालीय मुलाखत..
मस्त झालीय मुलाखत.. बैजुसरांनी अतिशय मनमोकळेपणाने योग्य उत्तरे तसेच माहिती दिलीय.. मस्त
बैजू पाटील खूप पूर्वीपासून
बैजू पाटील खूप पूर्वीपासून माहीत होते, पण त्यांना मायबोलीवर पाहून अत्यानंद झाला. वन्यजीवन छायाचित्रणकलेतील त्यांचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर फारच प्रशंसनीय आणि नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे.
धन्यवाद!
फोटोज अमेझिंग आहेत! बोललेतही
फोटोज अमेझिंग आहेत! बोललेतही छान. पुस्तक शोधायला हवं यांचं.
वाह! काय फोटो आहेत, सुंदर
वाह! काय फोटो आहेत, सुंदर मुलाखत!
मधे एकदा आयबीएन लोकमतवर ग्रेट भेटमधे यांची मुलाखत पाहिली होती, त्याची आठवण झाली.
व्वा काय फोटो आहेत!
व्वा काय फोटो आहेत!
मस्त झाली आहे मुलाखत. बैजु
मस्त झाली आहे मुलाखत. बैजु पाटील यांना एकदा तरी भेटायची इच्छा आहे. इथे दिलेले सगळेच फोटो अप्रतिम आहेत पण आधी प्रकाशित झालेले आहेत. दिवाळी अंकाकरता नविन फोटो असते तर अधिक मजा आली असती. काजव्यांच्या फोटो मात्र न बघितलेला आहे. अप्रतिम. :)
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी :)
छान झाली आहे मुलाखत आवडली
छान झाली आहे मुलाखत
आवडली
सुंदर मुलाखत आणि फोटो तर
सुंदर मुलाखत आणि फोटो तर अप्रतीमच!
मस्त मुलाखत, आवडली! फोटो तर
मस्त मुलाखत, आवडली! :) फोटो तर भारी!
त्यांच्या वेबसाईटची लिंकही देता आली असती का?
बैजू पाटील खूप पूर्वीपासून
बैजू पाटील खूप पूर्वीपासून माहीत होते, पण त्यांना मायबोलीवर पाहून अत्यानंद झाला. वन्यजीवन छायाचित्रणकलेतील त्यांचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर फारच प्रशंसनीय आणि नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे >>> +१
मस्त झालीय मुलाखत.
छान झालीय मुलाखत. नेमके आणि
छान झालीय मुलाखत. नेमके आणि सविस्तर बोललेत श्री. पाटील! फोटो तर अप्रतिम आहेत!
बैजू - औरंगाबादच्या एस. बी.
बैजू - औरंगाबादच्या एस. बी. कॉलेजमध्ये शिकलेल्या कोणालाही हे नाव अगदीच परिचयाचं. इथे शिकणार्या प्रत्येकाला बैजूज् कॉर्नरची सवय. येताजाता प्रत्येक जण इथे थोडावेळ थांबणारच. >>>> यासाठी अनुमोदन.
आम्ही शाळा-कॉलेजात असताना बैजूकडून पोर्टफोलिओ बनवून घ्यायची फॅशन होती औरंगाबादमध्ये. अगदी मॉडेलींगशी काहीही संबंध नसणारे लोकपण बैजूकडून पोर्ट्फोलिओ बनवून घेण्यासाठी रांगा लावायचे. एसबीमध्ये शिकत नसूनही आम्ही बैजूज कॉर्नरमध्ये नेहेमी जायचो. ओळखी-पाळखीमधल्या कुणालाही बैजूकडून फोटो काढून घ्यायचा असल्यास सोबत म्हणून जायला मी नेहेमी तयार असायचे. :)
मुलाखत खूप आवडली.
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली.
चांगली मुलाखत. सगळेच फोटो
चांगली मुलाखत. सगळेच फोटो अप्रतिम. काजव्यांचा जास्त आवडला.
शैलजा म्हणते तसे त्यांच्या वेबसाईटची लिंकही देता आली तर बघा नक्की.
फोटोज अमेझिंग आहेत! बोललेतही
फोटोज अमेझिंग आहेत! बोललेतही छान. पुस्तक शोधायला हवं यांचं.
>>+1
मस्त मुलाखत . सगळेच फोटो
मस्त मुलाखत . सगळेच फोटो सुंदर अर्थातच, काजव्यांचा अविस्मरणीय .
मुलाखत अजून वाचायची आहे.
मुलाखत अजून वाचायची आहे. नुसते फोटोच किती वेळा बघितले. अप्रतिम फोटो आहेत सगळे.
एक शंका- वॉटरमार्क का नाही टाकले या फोटोंना?
शैलजा, त्यांच्या वेबसाईटची
शैलजा, त्यांच्या वेबसाईटची लिन्क मी दिली होती पण संपादकांनी का वगळली आहे ते समजलं नाही.
सिंडरेला, वॉटरमार्क्सनी फोटोंच सौदर्य कमी होतं असं त्यांच मत आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना.
सुंदर मुलाखत .... जबरदस्त
सुंदर मुलाखत ....
जबरदस्त व्यक्तिमत्व, भन्नाट फोटो .....
वॉटरमार्क्सनी फोटोंच सौदर्य कमी होतं असं त्यांच मत आहे. >>>+१००
खुप छान मुलाखत आहे. मस्त
खुप छान मुलाखत आहे. मस्त :)
फोटो तर अप्रतिम आहेत. अजुन थोड्या मोठ्या आकारात असते तर जास्त मजा आली असती.
फोटो तर अप्रतिम आहेत
फोटो तर अप्रतिम आहेत !!!!!!!!!!!!!!!!
वॉव!!!!!!!!! अप्रतिम फोटो
वॉव!!!!!!!!!
अप्रतिम फोटो आहेत.
मुलाखत देखील मस्त रंगली आहे. :)
वाइट तेव्हा वाटत जेव्हा अशा प्रकारे मेहनत करुन काढलेला फोटो हा एक जस्ट फॉरवर्ड बनतो.
सुंदर मुलाखत श्यामली. फोटो अ
सुंदर मुलाखत श्यामली.
फोटो अ प्र ति म आहेत!! हॅट्स ऑफ.
आधी फोटो पाहिल्यावर वाटलं की ह्यांना कुठेतरी पाहिलं आहे, आणि मग बैजू'ज कॉर्नरचा उल्लेख झाल्यावर कुठे ते लक्षात आलं (आम्हीही एसबीत असताना बैजू'ज ला कित्येकदा पडीक असायचो! :)) आणि आश्चर्याचा धक्काच बसला आणि खूप कौतूकही वाटलं :). मुंबई पुण्यात राहून मुलं बरीच जास्त अवेअर असतात, रिसोर्सेस उपलब्ध असतात, पण औरंगाबाद मध्ये राहून एवढं पुढे जाणं खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्याबद्दल अजून वाचायला/फोटो पहायला आवडेल. वेबसाईट /ग्रेट भेट पाहते.
ही आहे बैजु पाटला.न्च्या
ही आहे बैजु पाटला.न्च्या वेबसाईटची लिन्क
http://www.baijuwildlife.com/