बेदरकार

तुझा सख्खा हट्ट,
आणि माझ्या इच्छा मात्र, सावत्रासारख्या!
माझ्याच घरात
मला पाठ करून उभ्या..

आजही हट्ट धरावा, इतका मी तुला
विश्वासू वाटतो -
ह्या समाधानाचं हसू आणि
कैक दिवसांनी हसण्यासाठी
विलगलेले ओठ!

तुझ्या हट्टाचं, माझ्या
संयमाशी कधीच पटत नसतं!
त्यातच सवय मोडलेली -
कुणाचं ऐकून घेण्याची!

मग आपसूकच दरीचं विस्तारणं,
तुझं उदास मनानं परतणं...
आणि तू गेल्यावर, तुझ्या हट्टानं
माझ्या पुढ्यात रेंगाळत राहणं....
घरातल्या नकोशा गुंतवळाप्रमाणे-
मी त्याला उचलून बाहेर टाकणं... अन्
पुन्हा जगण्याच्या एका कोपर्यात
जाऊन बसणं...

तुला हक्काचा वाटलोच इथून पुढेही,
तर तू येशीलच.
तेव्हाच हे दार किलकिलं होईल
तुला आत घेण्यासाठी,
रूसून तू जाण्यासाठी...

- बागेश्री

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

खूप छान बागेश्री !
नेहमीप्रमाणेच मस्त.
>> तुझा सख्खा हट्ट,
आणि माझ्या इच्छा मात्र, सावत्रासारख्या! >> हे खूप खूप आवडले.

छान....
सख्खा हट्ट, सावत्र इच्छा हे वेगळंच आणि मस्त.

शेवटच्या खंडातला आशावाद
आणि अचानक शेवटच्या ओळीतला झटका हे विशेष वाटले.

सुंदर.

छान आहे. आवडली

हक्क आणि हट्ट - एकाच नाण्याच्या दोन बाजू. मस्त लिहिलीय.

चांगली आहे कविता

सख्खा हट्ट, सावत्र इच्छा हे वेगळंच आणि मस्त.
>>+1

मस्त... :)

हक्क आणि हट्ट .. :)

बागेश्री, खूप आवडली गं कविता. हट्ट व इच्छा यांचे द्वंद्व छान व्यक्त केले आहेस. :)