निवृत्ती २०३१

माननीय विश्वस्त, प्रिय सहकारी शिक्षक, पालक आणि मैदानातल्या आणि स्क्रीनवरच्या माझ्या माजी-मुलांनो,
या मंचावरून माझा शेवटचा नमस्कार.

आज १ मार्च २०३१. तब्बल वीस वर्ष कोणालातरी ‘शिकवायचं’ या हेतूनं मी या वास्तूमध्ये रमले, आणि निवृत्तीच्या दिवशी हे खुल्या दिलानं मान्य करते, की जेवढं शिकवू शकले त्यापेक्षा कैक पटींनी जास्त शिकून चालले आहे. मला वाटलं होतं पंचेचाळीशीत बी.एड करून या शाळेत शिकवणं, म्हणजे शिकवण्यासाठी जेमतेम दहा-बारा वर्षं आहेत माझ्या हातात. अर्थात, सध्याच्या पेन्शनच्या तर्‍हा आणि नखरे लक्षात घेता मी वयाची पासष्ठ वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होते आहे, यात काही नवल नाही!

इथे काम करताना पहिल्याच वर्षी मी इंग्लिशच्या गृहपाठाला एक विषय दिला होता - पुढच्या पंचवीस वर्षांत काय होईल असं तुम्हांला वाटतं, यावर निबंध लिहा. एकेकाचे कयास वाचून मी चक्रावले होते. जो काळ डोळ्यांसमोर येत नाही त्याबद्दल बोलताना कल्पनाशक्ती किती धावते! सातवीच्या मुलांनी पंचवीस वर्षांत गरिबी नाहीशी केली होती, झाडांवर शहरं वसवली होती, चंद्रावर शाळा सुरू केली होती, समुद्राच्या तळाशी वायफाय सेवा उपलब्ध करून दिली होती आणि विमानाऐवजी माणसांना पंख फुटल्याचं सांगितलं होतं! त्यात स्वप्न आणि भविष्य अशी बेमालूम मिसळ होती...

त्यांतील पंचवीसपैकी वीस वर्षं खरंच पूर्ण झाली आहेत. बदललेल्या गोष्टी इतक्या कल्पनातीत नाहीत, पण दूरवर बघत असताना जवळ पाहायचं राहून जातं, तशातलंच काहीतरी आहे! पंच्याहत्तर मुलांचा वर्ग आज शंभरच्या वर गेलाय, तर पाच तुकड्यांच्या आठ तुकड्या झाल्या आहेत. आपली शाळा बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरू होता होता राहिलं. पालकसभांना प्रत्यक्ष यायला कोणाला वेळ होईनासा झाला. मग असेना का जुनाट, स्वस्तात स्वस्त फेसटाईमवर त्या व्हायला लागल्या.

वर्गातल्या खोड्यांवरून भांडणं सुरू होण्याऐवजी अगदी पूर्वी माय-चॅट आणि आता मी-एअर वरून भांडणं लागायला लागली. ‘एकाच बाकावर बसून चिट्ठ्या देणार्‍या मुली आणि मागून पुढच्या बाकावर कागदी रॉकेटनं निरोप पोचवणारी मुलं अचानक शहाणी कशी झाली?’ असा मला प्रश्न पडायचा. पण ते त्यांच्या नवीन अवयवाचा - फोनचा उपयोग समोरच्या माणसाशी बोलायला करत होते. आज माझ्यासमोर शेजारीशेजारी बसलेल्या रिया आणि सायुरीचं माय-चॅटवरचं भांडण अगदी स्क्रीनशॉटसकट मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलं होतं! मात्र शेवटी ते मिटताना घाटगे बाईंसमोर बसून एकमेकींशी प्रत्यक्ष बोलताना मिटलं, आठवतंय ना?

आम्ही पाटी वापरत असू, आमच्या राघवनं वह्या वापरल्या, मी शाळेत शिकवायला लागले तेव्हा आपली चकचकीत कॉम्प्युटर लॅब हे शाळेतलं मोठं आकर्षण होतं, आणि आता दोन महिन्यांनी शाळा सोडणारी आमची मुलं आयस्लेटवर शिकत मोठी झाली आहेत. साधारण सहा वर्षांपूर्वी झाडांपासून तयार होणार्‍या कागदावर अवाच्या सवा कर लागायला लागला आणि पुस्तकं महागली, तेव्हापासून कागदी वह्यापुस्तकांचा हट्ट हळूहळू सोडावाच लागणार, हेही उशिरानं का होईना, शाळेला पटलं.

काही बदल मी सुचवले, तसेच काही मला पचायलाही जड गेले. शाळेच्या लहानशा, निरागस जगातही आता वयाच्या बाराव्या वर्षापासून निवडणूक आयोग, निवडणुका सुरू झाल्या. वर्गमंत्र्यांपासून स्वच्छतामंत्र्यांपर्यंत निवडणुका घेताना लहानलहान मुलांच्या अंगी राजकारण भिनायला लागलं. ते मला रुचलं नसलं तरीही बदलत्या जगाची गरज म्हणून ते स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाला मी आजही एकच गोष्ट सांगेन - ‘काम केलं’ असं दाखवण्यापेक्षा ते ‘करणं’ जास्त महत्वाचं आहे, हे कायम लक्षात असू द्या.

इयत्ता पाचवीपासून, म्हणजे बर्‍याच गोष्टी शिकण्याआधीच, मुलांना आपापला सीव्ही लिहायचे धडे द्यायला शाळेनं दोनतीन वर्षांपूर्वीच सुरुवात केली. सगळ्या विषयांशी पुरेशी ओळख होण्याआधीच कोणत्या विषयाकडे त्यांचा कल आहे, हे ओळखण्यासाठी चाचण्या घेणं सुरू झालं. त्याच योजनेचं पिल्लू म्हणून युवा-उद्योजक योजना आली, आणि अभ्यासाऐवजी आपल्या ‘उद्योजकांचा’ वेळ यातच जास्त जायला लागला. मी लहान असताना नाटकाच्या तालमींना जाणार्‍यांचा शिक्षकांना राग येत असे, तसा मला वर्गाबाहेर दिवस दिवस काढणार्‍या चौदा वर्षांच्या उद्योजकांचा यायला लागला होता. पण दहावी-बारावीला ज्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना आपली शाळा परीक्षा केंद्र म्हणून लाभली, त्यांना याच मुलांनी सहा महिन्यात उसळ-पोळी आणि कोशिंबीर असा साधा स्वयंपाक जेवणाचा डबा म्हणून विकला; आपलं स्वत:चं कँटीन शाळेत उभं केलं.

दुसर्‍या बॅचनं ऑस्ट्रेलियातल्या समवयस्क मुलांना नेटवरून गणित शिकवायचा उपक्रम राबवला आणि पैसे उभे केले. ‘आपापला अभ्यास सांभाळा, ई-स्वाध्याय पूर्ण करा, स्वत: गणित शिका, इतक्यात शिकवायच्या मागे लागू नका’ असं मी त्यांना कित्येकदा ओरडले होते. पण वर्षअखेरीस त्यांना जिल्हा परिषदेचं बक्षीस मिळालं तेव्हा माझ्या आडमुठेपणाची इतकी सुखद हार झाली होती म्हणून सांगू! आज त्यांच्यापैकी काहीजण त्यांच्या बारावीच्या परीक्षा चालू असतानाही इथे आले आहेत. अन्या, तृषा आणि विघ्नेश, सगळ्यांसमोर तुमची जाहीर माफी मागताना मला होणारा आनंद अवर्णनीय आहे... पण धनराशी मोजण्या-वाढवण्याएवढं गणित तरी तुम्हांला आलंच पाहिजे, असा माझा हट्टही कायम आहे!

अचानक मुलामुलींना शेजारी बसायची परवानगी दिल्यावर पालकांमध्ये केवढा गहजब झाला होता, हे मी वेगळं सांगायला नकोच! पण तशी मुभा दिल्यावरही ते स्वातंत्र्य वापरेपर्यंत दोन-अडीच वर्षं कुठेच गेली... मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे शाळेत द्यावेत की नाही, आई-वडील विभक्त झाले असल्यास शाळेतर्फे मुलांशी बोलून त्यांची बाजू समजून घेणारं कोणी असावं की नाही, असे नवनवीन प्रश्न दररोज समोर येत होते. तेव्हा शाळेनं घेतलेल्या निर्णयाच्या चांगल्या परिणामांबद्दल बोलण्याऐवजी मी एवढंच म्हणेन, की आज पाचशे लोकांसमोर या विषयांचा मी मोकळेपणानं उल्लेख करू शकते, यातच सगळं आलं.

विद्यार्थी म्हणून शाळेत असताना मला कधीच वाटलं नाही की मोठेपणी वर्गासमोर जाऊन शिकवावं. स्वत: शाळेतून बाहेर पडल्यावर कॉलेज, नोकरी, लग्न या सगळ्यांच गोष्टी इतक्या रांगेनं आणि आजच्या मानानं सुरळीत होत गेल्या, की वाटेवर जरासा विराम घेऊन शाळेचे दिवस तेव्हा आठवायला वेळच मिळाला नाही. माझी मुलं शाळेत जायला लागल्यावरही पालकसभा आणि वार्षिक समारंभ सोडून मी शाळेत कधी हजेरी लावल्याचं मला आठवत नाही. दोघं मुलं गुणी होती म्हणून नव्हे, पण त्यांच्या चुका, त्यांचा अभ्यास, भांडणं आणि मैत्री, हे सगळं त्यांचं त्यांनीच करणं गरजेचं होतं. त्यांचं शाळेचं जग घरच्या जगापेक्षा वेगळं असावं, असं आम्हांला नेहमी वाटायचं.

मग बॅंकेची नोकरी उत्तम चालू असताना, त्यातून बर्‍यापैकी पगार मिळत असताना, दोन्ही मुलं शाळेतून उत्तीर्ण झालेली असताना, वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी मी पुन्हा शाळेकडे का वळले? शाळेत शिकवणं हे तेव्हा माझ्या लेखी यशाचं लक्षण नव्हतं. एक वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आलो होतो-

Those who can, do; those who can’t, teach.

कोणीतरी शिक्षक झालंय म्हणजे त्यांचे बाकीचे उपाय हरले असणार अशी काहीशी धारणा होती माझी.

पण २००७ साली आमचा राघव बारावी झाला आणि केमिस्ट्री शिकायला दिल्लीला गेला. दोन वर्षांनी अगस्त्यनं बारावी पूर्ण करून त्याच्या भटकंतीला सुरूवात केली. घर अचानक शांत झालं होतं. इतक्या लहानपणी घरापासून इतके लांब जाऊ नका, असं त्यांना सांगत असताना एकदा अगस्त्य मला चिडून म्हणाला, “आई, यार! तुला नाही समजणार. जनरेशन गॅप आहे.” एकाच वाक्यात मला त्याने ‘यार’ करून जनरेशन गॅपनं दूरही ढकललं होतं. कुठेतरी ती भरून काढायला, तरुण पिढीचा सहवास मिळावा म्हणून, आणि एक नवं जग अनुभवायला मिळावं म्हणून मी नव्यंने शिकून शिक्षिका व्हायचं ठरवलं. खरं सांगते, बदलत्या जगाचं शाळेपेक्षा जिवंत चित्र दुसरीकडे कुठे शोधूनही सापडणार नाही!

मला माझ्या शाळेतल्या सगळ्या मुलांचा अभिमान आहे. परदेशी राहणार्‍यांचा, तिथून परत आलेल्यांचा, हुशार मुलांचा, उपद्व्यापी उद्योजकांचा, भटकंती करणार्‍यांचा, शिक्षक झालेल्यांचा, दहावीपुढे नेहमीचं शिक्षण सोडून जिम्नॅस्टिक्समध्ये नाव कमावणार्‍यांचा, माझ्याशी वाद घालणार्‍यांचा, मस्करी, मस्ती करणार्‍यांचा आणि भरभरून प्रेम करणार्‍यांचा! या शाळेनं तुम्हांला आणि मला खूप काही दिलं. नुसते आभार मानून फिटणारं ऋण नव्हे हे...

‘परतली पाखरे’ उपक्रमात तुमच्यापैकी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन मुलांना दोन-तीन महिने विशेष वर्ग शिकवण्यासाठी नाव नोंदवलं आहे. निघतानिघता त्या सगळ्यांना एकच सांगते - शाळेत शिकवण्यासाठी जरी आलात, तरी नवीन मुलांकडून काहीतरी शिकायच्याच हेतूनं या...तुम्ही रिकाम्या हातांनी परत जाणार नाही, याची हमी मी देते!”

- Arnika

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

भविष्यवेध आवडला.

:)

मस्तच!

छान आहे वेध

खूपच वास्तव वादी आहे हा भविष्य वेध, आवडला. :)

पण अर्निका, तुझ्याकडून अजून खुसखुशीत यायला हवं होतं.

छान लिहिले आहेस

पण अर्निका, तुझ्याकडून अजून खुसखुशीत यायला हवं होतं. + १

अर्निका, हे असे रुटीन लेख आम्ही लिहायचे. तुझ्याकडून अजून चांगलं अपेक्षित आहे :)

:) प्रयत्न करत राहीन!

:) छान आहे .. शाळेत इंग्लिश मिडीयम नाही पण आयस्लेट आलं हा भविष्यवेध आवडला .. :)

>> “आई, यार! तुला नाही समजणार. जनरेशन गॅप आहे.” एकाच वाक्यात मला त्याने ‘यार’ करून जनरेशन गॅपनं दूरही ढकललं होतं

ह्या वाक्यातून अर्निका एकदम जाणवली ..