स्टेम सेल थेरपी: बाजारातल्या तुरी

काही दिवसांपूर्वी माझ्या परिचयातले एक गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांची सून गरोदर होती. बाळ जन्मतानाच
त्याच्या नाळेतून रक्त काढून घेऊन ते जतन करून ठेवावं, भविष्यात त्याला काही गंभीर आजार झाल्यास हे
जतन करून ठेवलेलं रक्त आणि त्यातील पेशी उपयोगी ठरतील, असं त्यांना सांगण्यात आलं होतं आणि ते याबाबत माझा सल्ला घ्यायला आले होते. 'याला किती खर्च येईल?' या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर चक्रावून टाकणारं होतं! मी या विषयावर अनेक दिवसांपासून विचार करतोय आणि 'मायबोली'नं लिहायची संधी दिलीय तर त्याचा फायदा घ्यावा म्हणतोय.

आपल्या शरीरात अनेक पेशी असतात आणि त्यांचं कार्य ठरलेलं असतं. त्या पेशी विघटन होऊन त्यांची संख्या वाढते. मात्र नव्या पेशी या पहिल्या पेशींसारख्याच तंतोतंत असतात, तसंच कार्य करतात. स्टेम सेल्स याही पेशीच. मात्र त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या इतर पेशींप्रमाणे विघटनाद्वारे पुनरुत्पादन तर पावतातच, पण नव्या पेशी या त्यांना जन्म देणार्‍या पेशींपेक्षा वेगळ्या असू शकतात! एखादी पेशी विघटन होऊन दोन वेगळ्या अवयवांना जन्म देऊ शकते ! स्टेम सेल्सचा हा खास गुणधर्म वैद्यकशात्राच्या जरा उशिराच लक्षात आला. रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर मॅकिस्मॉव्ह यानं 'स्टेम सेल' हा शब्द प्रथम १९०८मध्ये सुचवला. मेंदूतील पेशींचं विघटनाने पुनरुत्पादन होत नाही, हा समज जोसेफ आल्टमननं १९६०मध्ये खोडून काढला. १९६८मध्ये 'बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट'ची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यानंतर या पेशींच्या संशोधनाला गती आली. २००७मध्ये मारिओ कपेची, मार्टीन इव्हान्स आणि ऑलिव्हर इव्हान्स यांना स्टेम सेलवरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं. बी.बी.सी.नं ११ ऑक्टोबर, २०१०ला एक बातमी प्रसारित केली. त्यात म्हटलं, की अमेरिकेतील 'गेरॉन' या औषध कंपनीला 'स्पायनल इंज्युरी'साठी 'एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स'चा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याची परवानगी मिळाली आहे, उंदरावर या उपचाराचा सकारात्मक परिणाम दिसून आला होता, मनुष्यातील वापराची ही प्राथमिक पायरी असून या प्रयोगातून काही अपाय तर होत नाही ना, हे पाहणं हा पहिला उद्देश आहे. याला 'फेज वन ट्रायल्स' असं म्हणतात. 'व्याधीवर परिणाम' होतो की नाही, हे नंतर (फेज टूमध्ये) पाहिलं जाईल. त्यानंतर फेज थ्री आणि मग विक्रीस परवानगी, अशा टप्प्यांतून ही चाचणी अजून जायची आहे, हे लक्षात घेतलं, तर अजून बराच प्रवास शिल्लक आहे हे लक्षात यावं.

स्टेम सेल उपचार पद्धतीची ही सद्यस्थिती आहे आणि काही मंडळी, कशास काही पत्ता नसताना 'दुकानं' थाटून बसली आहेत. कुष्ठरोगाच्या लसीचा किस्साही असाच. १९७६-७७ची गोष्ट असेल. वृत्तपत्रात 'कुष्ठरोगावर लस?' या शीर्षकाखाली एक लेख आला होता. खरी गोष्ट अशी, की तेव्हा भारतात त्याची एक चाचणी (ट्रायल) चालू होती. आज त्याबाबत कोणी काहीही बोलत नाही. कारण स्पष्ट आहे. तेव्हा मी औरंगाबादला शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात होतो. आमचा लसीकरण विभाग आहे. तिथं एका कुष्ठरोग्याचा मुलगा आला आणि तो 'ही लस मिळेल का?' अशी चौकशी करायला लागला. मला त्याची समजूत काढणं खूपच अवघड गेलं. उत्साहाच्या भरात संशोधक मंडळी वृत्तपत्रात किंवा प्रसारमाध्यमांत अशा बातम्या देतात, तेव्हा त्याचे दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुलंच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात 'ऋषीमंडळींनी वनातून वारंवार शहरात येऊ नये. पोरंटोरं दाढ्या ओढतात', अशा अर्थाचं वाक्य आहे. संशोधकांच्याबाबतीतदेखील हे एका वेगळ्या अर्थानं खरं आहे ! 'बीबीसी'वरची ती बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली आणि याबाबतीत एक हाईप निर्माण झालाय!

'स्टेम सेल्स'चे पाच प्रकार मानले जातात. अ‍ॅडल्ट स्टेम सेल्स : शरीरात होणारी झीज भरून काढण्याचं काम या पेशी करतात. त्वचा, स्नायू, लहान आतडे आणि बोन मॅरो या ठिकाणी या पेशी मिळतात. त्वचेच्या पेशी त्वचेची झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या पेशी स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी उपयोगी पडू शकतील. 'बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट' हे या प्रकारच्या पेशींच्या उपयोगाचं प्रयोगसिद्ध उदाहरण आहे. वाढ होत असलेल्या गर्भापासून मिळू शकणार्‍या पेशी (फिटल स्टेम सेल्स) नाळेपासून (कॉर्ड ब्लड) मिळणार्‍या पेशी, एंब्रियॉनिक आणि ईंड्यूस्ड प्ल्युरिपोटंट स्टेम सेल्स हे आणखी काही प्रकार. यातला शेवटचा प्रकार २००६मध्ये आला. त्वचेतून मिळणारे स्टेम सेल्स घेऊन त्यांना 'यकृत किंवा स्नायूंच्या पेशी व्हा', असा 'आदेश' देऊ शकणारे हे तंत्रज्ञान म्हणजे एक ब्रेक-थ्रूच म्हटला पाहिजे. आज उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अनेक कारणं असलेल्या मधुमेहासारख्या आजारावर एका अवयवापासून मिळणारे स्टेम सेल्स प्रभावी होणार नाहीत. शास्त्रोक्त पद्धतीनं केलेल्या क्लिनिकल ट्रायल्स या आधुनिक उपचारपद्धतीचा पाया होय. आजमितीला बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट आणि स्नायू, हाडे आणि कॉर्नीया या अवयवांतील काही व्याधीवगळता अन्य कोणत्याही आजारावर अशी प्रयोगसिद्ध उपचारपद्धती उपलब्ध नाही. स्टेम सेल उपचारानं बर्‍या झालेल्यांच्या कहाण्या आपल्या वाचनात येतील. स्टेम सेल्सचा हा कथित परिणाम म्हणजे प्रसिद्ध 'प्लासिबो इफेक्ट'तर नाही ना, आजारात नैसर्गिकरित्या होणार्‍या उतारचढावाचे तर हे उदाहरण नाही ना, इत्यादी शास्त्रीय कसोट्यांतून या उपचारपद्धती गेल्या नाहीत, हे लक्षात घ्यावे लागेल. अशा बाबतीत स्टेम सेल उपचाराव्यतिरिक्त इतर काही उपचार दिले गेले होते का, हेही तपासावं लागेल. बोन मॅरो ट्रान्सप्लाण्ट यशस्वी ठरलं, कारण इथं आपण वापरल्या गेलेल्या पेशींना त्या ज्या कार्यासाठी आहेत, तेच नेमकं काम सांगतो म्हणून! हे सांगणं त्या पेशींना 'समजेल अशा भाषेत सांगणे' इथं सध्या आपण अडकलो आहोत आणि वर उल्लेखलेल्या ईंड्यूस्ड प्ल्युरिपोटंट स्टेम सेल्स ही यातली पहिली पायरी आपण गाठली आहे.

स्टेम सेल थेरपीत रुग्णाच्या शरीरातील पेशी त्याच्यासाठीच वापरणं (ऑटोलॉगस) आणि त्याला इतरांच्या पेशी देणं (हिटरोलॉगस) असे दोन प्रकार संभवतात. आपल्या शरीरातून मिळवलेल्या पेशी आपल्याच शरीरात वापरल्या म्हणजे सगळं काही निर्धोक असं नव्हे! आपल्या शरीरातून ह्या पेशी मिळवताना, त्यावर प्रक्रिया करताना, त्या जतन करताना आणि त्या आपल्या शरीरात परत टाकताना अनेक 'परदेशी' त्यात येतात आणि आपले शरीर त्यांना 'ओळखू' शकले नाही, तर गंभीर धोका संभवतो! स्टेम सेल थेरपीसाठी जी दुकानं उघडली आहेत, त्यांपैकी अनेक आजारांना आधुनिक वैद्यकशात्रात परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे 'बघूया, नथिंग टू लूज' असा विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते ! अशाच एका 'प्रयोगातून' एका मुलाला ब्रेन ट्युमर झाला होता हे लक्षात घ्यावे ! म्हणजे मूळ आजार राहिला बाजूला आणि ही ब्रेन ट्युमरची आफत! इथं या पेशींची 'संवाद' साधणारी टेक्नॉलॉजी चुकली होती आणि त्यामुळे या पेशीपण भरकटल्या' होत्या!

एखादं 'दुकान' प्रायोगिक तत्त्वावर ही उपचारप्रणाली आपल्याला देत आहे, म्हणजे ती वैज्ञानिक पद्धतीनं चाललेली क्लिनिकल ट्रायल आहे, असं नव्हे! वैज्ञानिक पद्धतीच्या चाचणीसाठी त्या उपचारपद्धतीच्या धोक्यांचा आणि परिणामकारकतेचा प्राथमिक पुरावा मिळवलेला असतो. हा पुरावा एखाद्या नामवंत संस्थेच्या स्वतंत्र
आणि स्वायत्त इथिकल कमिटीपुढे ठेवून त्यांची परवानगी मिळवलेली असते. अन्न आणि औषधी प्रशासनाने
त्याची कायदेशीर बाजू तपासलेली असते. ह्या चाचण्यांची 'क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री'वर नोंदणी झालेली असते.
शेवटी चाचणीचे निष्कर्ष प्रतिष्टित वैद्यकीय नियतकालिकांत प्रसिद्ध होऊन त्यावर साधकबाधक चर्चा झाल्यावर मग ही उपचारप्रणाली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वापरात येते. हे सगळं ह्या 'दुकानदारांनी' केलेलं नसतं, हे
लक्षात असू द्यावे. स्टेम सेल उपचारपद्धती ही भविष्यात अनेक रोगांवर प्रभावी ठरू शकते. मात्र आज अत्यंत
मोजक्या व्याधींवर ही उपचारपद्धती या काटेकोर मार्गानं सिद्ध झालेली आहे. अन्य बर्‍याच आजारांवर ती प्रायोगिक अवस्थेत आहे, म्हणून मी या आजारावरच्या या दुकानदारीला पद्धतीला 'बाजारातली तुरी' म्हटलंय.

उपरोक्त विधानाचा अर्थ भविष्यात स्टेम सेल्स उपचार पद्धती येणारच नाही, असा नव्हे. मात्र त्यात बरेच अडथळे आहेत. महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण अजूनही स्टेम सेल्सना पुरेसे समजून घेऊ शकलेलो नाही. त्यांना आपल्याला हवं तसं 'वागण्यासाठी' आदेश देणारी प्रणाली विकसित करू शकलेलो नाही. दंतशास्त्रात भविष्यात या उपचारप्रणालीनं क्रांती घडून येईल, असं काही तज्ञ मानतात. रूट कॅनॉल या उपचारपद्धतीत पुढील दहा वर्षांत आमूलाग्र बदल झालेले दिसू शकतील. डेण्टल पल्प आणि टिश्यू इंजिनिअरींग हे नवे स्पेशलायझेशन येऊ घातले आहे. अस्थिव्यंग (ऑर्थोपेडीक्स) शास्त्रातही नव्या उपचारप्रणाली येतील. यात प्रामुख्यानं ऑस्टीओआर्थ्रायटीसच्या उपचारात क्रांतिकारक बदलाची अपेक्षा आहे.

स्टेम सेल्स संशोधनाच्या बाबतीत इंडिअन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चनं अशात काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यानुसार हे संशोधन करणा़र्‍या संस्थांना एक वेगळी स्टेम सेल इथिकल कमिटी स्थापन करावी लागेल. त्यात या क्षेत्रातल्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञाची नेमणूक करावी लागेल आणि ही स्टेम सेल्स संशोधनाच्या राष्ट्रीय कमिटीशी संलग्न करावी लागेल. स्टेम सेल संशोधनानं काही नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि त्यामुळे औषध संशोधन आणि स्टेम सेल संशोधन यांच्यामुळे उपस्थित होणारे नैतिक प्रश्न वेगळे आहेत, हे अधोरेखित झाले आहे. दोन प्रमुख नैतिक मुद्द्यांचा विचार आवश्यक आहे. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स संशोधनासाठी नुकत्याच फलन झालेल्या एम्ब्रियोपासून स्टेम सेल्स मिळवले जातात. यात फलन झालेला एम्ब्रिओ नष्ट होतो. 'ही हत्त्या आहे' असा काहींचा आक्षेप आहे, तर 'एम्बियो इज नॉट अ पर्सन' असं दुस़र्‍या बाजूचं म्हणणं आहे. अ‍ॅडल्ट स्टेम सेल्सच्या वापरात काही प्रकरणांत त्या सेल लाईन्समध्ये दात्यामध्ये नसलेले काही हानिकारक जनुकीय बदल झाल्याचं दिसून आल्यानं आणि यातून काही विषाणूजन्य आजारांचं संक्रमण होण्याची शक्यता असल्यानं यावरही बर्‍याच जणांचे आक्षेप आहेत.

या सर्व गदारोळात सामान्य माण्सानं काय करावं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याला एकच उत्तर आहे, की असा काही उपचार घेण्याचा सल्ला मिळाला तर आणखी किमान दोन तज्ञांचा सल्ला घेऊन मगच निर्णय़ घ्यावा, हे उत्तम !

- डॉ. अशोक

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

लेख पटला.
बाजारात तुरी आणि मार्केटिंगची मारामारी हेच खरं.

चांगली माहिती. धन्यवाद.

चांगली माहीती.

चांगली माहिती. लेख अजून थोडा विस्तृत हवा होता असं मात्र वाटलं.

मस्त लेख

साती, स्वाती, नंदिनी आणि जाई
धन्यवाद !

चांगल्या माहिती बद्दल धन्यवाद डॉ. अशोक.

सहा महिन्यांपुर्वी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी आम्हालाही "नाळेतून रक्त जतन करतो म्हणजे नंतर "गरज पडली" तर उपयोगी पडेल' असा पर्याय देण्यात आला होता (त्यासाठी खर्च काहिच्या बाही होता.). तेव्हा असलेल्या जुजबी माहितीवरऊन आम्ही तो नाकारला.
आपण अजून सविस्तर माहिती दिली आहेत. ती मी माझ्या मित्रमंडळींनी सागेन आणि त्याचा फायदा त्यांना नक्किच होईल.

हल्ली ह्या गोष्टी पण लोक स्टेटस साठी वापरतात ़ ़ :) मस्त लेख

छान लेख, माहिती सोप्या भाषेत दिल्याबद्दल खास धन्यवाद.

छान माहिती डॉक्टर ! यातून पुढे काहितरी चांगलेच निष्पन्न होईल, अशी आशा वाटते.
सध्या ऐश्वर्या राय बच्चन या क्षेत्रात अँबेसेडर म्हणून कार्यरत आहे, असे वाचले.

धन्यवाद दोस्तहो !
दिनेश: "ऐश्वर्याजी या क्षेत्रात ब्रँड ऍंबेसेडर आहेत." असू देत. तो त्यांचा व्यवसाय आहे. जाहिरात करण्याचा ! आपण असल्या जाहिरातीला भुलायचं की नाही हे आपणच ठरवू या !

चांगला, सोप्या भाषेतला लेख.
ते कुष्ठरोग्याच्या लशीचं आधी कुठे लिहिलं होतंत का? वाचल्याचं आठवतंय.

खूप चांगली माहिती. धन्यवाद.

चांगली माहिती. सोप्या भाषेत लिहिलय अगदी. धन्यवाद.

खुप चांगली माहिती आणि सोप्या शब्दात मांडली आहे :)

सोप्या शब्दात छान माहिती दिलीये. धन्यवाद.

चांगली माहिती आहे.

छान माहिती . धन्यवाद !

अतिशय छान माहिती. हे स्टेम सेल आणी भोंदु डॉक्टर म्हणजे माकडाच्या हातात कोलीत. अजून संशोधनही नीट झालेले नाही पण देशोदेशीचे भोंदु दुकान उघडून तयार आहेत. सेरेब्रल पाल्सी सारख्या रोगाने पीडीत मुलाचे आईबाप आशेखातर अगदी कितीही खर्च करायला तयार असतात. नेमका याचाच फायदा उठवून दिल्लीतील एका महिला गायनॅकॉलॉजिस्ट ने देशोदेशीच्या पालकांकडून 'स्टेम सेल' च्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा धंदा सुरु केला आहे. अशा लोकांसाठी नरकात खास जागा हवी. काही दिवसांनी 'मर्दानी कमजोरी का शर्तिया इलाज' करणारेही स्टेम सेल वापरतील.

मित्र हो , धन्यवाद ! खरं तर अत्यंत साशंक मनाने हा लेख दिला होता. पण प्रतिसाद बघून भरून पावलो !

तांत्रिक विषय शक्य तितक्या सोप्या भाषेत मांडला आहे त्यामुळे लेख आवड्ला. अधिक वाचनाकरिता उपयुक्त लिन्कही देता येतील.

खूपच सुंदर आणि उद्बोधक लेख.

दोन्ही बाजू नीट समजल्या.

मनापासून धन्यवाद डॉ. साहेब....

a

अरे!
भारी विषय निवडलाय.
सध्या सो कॉल्ड हायर इन्कम ग्रूपच्या पब्लिकला येडे बनविण्याचा हा उद्योग भलताच जोरात आहे. माझ्या एका मावसभावाचे प्रबोधन मी काही महिन्यांपूर्वीच केले होते ते आठवले.
अभिनंदन अशोक सर!

अत्यंत संवेदनशील विषयावर खूप प्रबोधन केलंत डॉक्टर. आभार.

माहितीपुर्ण लेख.
:)

छान सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख .. :)

खुपच उपयुक्त माहीती ....बरेचसे गैर समज दुर होतिल हे नक्की .....
साध्या सोप्या भाषा शैली ने सामान्या पर्यन्त माहीती पोहोचवलित....ग्रेट

द्न्याती, शशांक, इब्लीस, भारती, झकासराव, सशल, सुहास्य
धन्यवाद !!