किनारा

श्रद्धा जुनीच आहे, ईश्वर जुनाच आहे
दररोज माणसांचा गोंधळ नवाच आहे

भेटायला कधीही, ये जीवना इथे मी
होतो तिथेच आहे, होतो तसाच आहे

जागून रात्रभर मी बसतो जिच्या उशाशी
ती आठवण तुझी अन, मीही तुझाच आहे

या नेहमी असू द्या गाठीस चार कविता
गाठायचा तुम्हाला पल्ला बराच आहे

हे विश्व, हे पसारे; हे स्थूल सूक्ष्म सारे
सगळे खरे, जरी हे सगळे उगाच आहे

सरला प्रवास, आला अर्धाच शेर हाती
आयुष्य एक मिसरा, तोही उलाच आहे

याहून सोसवेना आता मला किनारा
ही लाट वाट पाहे; क्षण हाच, हाच आहे

-पुलस्ति

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

व्वा! गझल फार आवडली! :)
वाचन/गायन रुक्ष वाटतंय मात्र. थोडं मंद पार्श्वसंगीत वगैरे वापरून उठावदार करता आलं असतं कदाचित.
पण गझल आवडलीच! :)

("भेटायला कधीही ये जीवना, इथे मी" अशी हवी आहे ना ती ओळ? स्वल्पविरामाची जागा चुकली आहे.)

गझल खूपच आवडली. सादरीकरण मात्र नाही. पण त्याने काही फरक पडत नाही. सर्वच शेर इतके अफाट झालेत की वाचनानुभव म्हणून खूप समृद्ध करून गेली ही रचना.
<<याहून सोसवेना आता मला किनारा
ही लाट वाट पाहे; क्षण हाच, हाच आहे>> क्या बात है.

समर्थ रचनेबद्दल अभिनंदन :)

क्या बात है, वाह... उत्तम...
अगदी खयाल-रम्य गज़ल आहे...

प्रत्येक शेर आवडला...
एकापेक्षा एक झालेत... सुंदर रचनेसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद...!

छान गझल.
"हे विश्व, हे पसारे; हे स्थूल सूक्ष्म सारे
सगळे खरे, जरी हे सगळे उगाच आहे

सरला प्रवास, आला अर्धाच शेर हाती
आयुष्य एक मिसरा, तोही उलाच आहे" >>> हे दोन शेर सर्वात विशेष. त्यातही 'उलाच' हा खासच.

गझल वाचून माझ्यातल्या वाचक खूप सुखावला, पण सादरीकरण माझ्यातल्या श्रोत्यास आनंद देऊ शकले नाही.
प्रांजळ मताचा कृपया राग नसावा.

गझल खूप आवडली!

हा प्रयोग केलेला असल्याने यातील अडचणींची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे डब्बल अभिनंदन !

पुलस्ति, गझल चांगली आहे.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद!!

गझल आवडली. चांगली आहे! सादरीकरण थोडं संथ वाटलं.

पुलस्ति गझल आवडली

अप्रतिम..

सुपर्ब....... केवळ सुपर्ब .........

गझल खूप आवडली!

मोहना, जाई, भारतीताई, शशांक आणि कविता - मनापासून धन्यवाद!

हे विश्व, हे पसारे; हे स्थूल सूक्ष्म सारे
सगळे खरे, जरी हे सगळे उगाच आहे

सरला प्रवास, आला अर्धाच शेर हाती
आयुष्य एक मिसरा, तोही उलाच आहे

हे विशेष सुंदर! आवडली गजल.

-सतीश