महाराष्ट्रातील चित्रकलेची परंपरा

सांस्कृतिक पर्यटन करत हिंडलेल्या एखाद्या परदेशी पर्यटकाला उपखंडातल्या, विशेषकरून भारतीय कलेबद्दल विचारलं, तर त्याच्या/तिच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम ताजमहाल, मग राजस्थानातले राजवाडे-गडकिल्ले-मंदिरांचं स्थापत्यवैभव, मुघल व राजपूत शैलींतली चित्रे, दक्षिणेतील हंपी व महाबलिपुरम् येथील पुरावशेष, उंच गोपुरांची मंदिरे आणि अजिंठा-वेरूळ येथील लेणी येतील. भारतीय कलेच्या पर्यटन-नकाशावर अजिंठा-वेरूळ हमखास येतात; पण 'महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेणी' अशा संदर्भाने क्वचितच. अगदी एतद्देशीय पर्यटकाला किंवा स्थानिक यजमानाला जरी महाराष्ट्रातील कला व सांस्कृतिक पर्यटनस्थळांबद्दल विचारलंत, तरी यादी अजिंठा-वेरूळ आणि इतर काही मोजक्या स्थळांपुढे लांबणार नाही. महाराष्ट्रात अजिंठा-वेरूळ यांखेरीज कलापरंपरेचा ठेवाच नाही असं नाही; पण राजस्थान किंवा दक्षिणेचा जसा ब्रँड वलयांकित झालाय, तसा 'ब्रँड महाराष्ट्र' पुढे आला नाहीये हे याचं मुख्य कारण. वस्तुतः अजिंठा-वेरूळनंतर महाराष्ट्रातील कलापरंपरा हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरे, पोथ्या-हस्तलिखितांमधील लघुचित्रे, चित्रकथीसारख्या लोककला इत्यादी विविध माध्यमांतून वाहतच होती. पुढे ब्रिटिशांशी संपर्क आल्यावर युरोपीय चित्रशैली स्वीकारून हा प्रवाह अधिक विस्तारला. अगदी वर्तमानातही समकालीन चित्रकला व वारली चित्रशैलीसारख्या पुन्हा प्रकाशझोतात आलेल्या पारंपरिक कलाप्रकारांतून महाराष्ट्रातील कलापरंपरा वर्धिष्णु राहिली आहे. एवढा विस्तृत वारसा असलेल्या, परंतु दुर्दैवाने अल्पख्यात राहिलेल्या महाराष्ट्रातील कलापरंपरेचा - त्यातही चित्रकलेचा - संक्षिप्त आढावा मांडणारं हे माहिती-संकलन :

=================================================

ऐतिहासिक कालखंड
इ.स.पू. दुसर्‍या शतकापासून इ.स. सातव्या शतकापर्यंत अजिंठ्यातील, तर इ.स. पाचव्या शतकापासून इ.स. दहाव्या शतकापर्यंत वेरूळातील लेणी खोदली जात होती असे संशोधकांचे मत आहे. अजिंठ्याच्या लेण्यांतील बौद्ध जातककथा व तत्कालीन समाजव्यवहार चितारणारी भित्तिचित्रे ही महाराष्ट्रातील ज्ञात असलेली प्राचीनतम चित्रे. मालिकेप्रमाणे कथनात्मक पद्धतीने एकापुढे एक मांडलेल्या या भित्तिचित्रांत गोलाईदार, लयपूर्ण रेषांनी व वर्णादी शरीरवैशिष्ट्ये परिणामकारकतेने दाखवणार्‍या रंगयोजनेतून चितारलेल्या, सौष्ठवपूर्ण मनुष्याकृत्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

इ.स. दहाव्या शतकात राष्ट्रकूटांच्या प्रभावाला ओहोटी लागली, त्या सुमारास वेरूळातील लेण्यांची खोदकामे बंद झाली असावीत. अजिंठा-वेरूळ येथील भित्तिचित्रांनंतरची उपलब्ध चित्रे ही थेट इ.स. सोळाव्या शतकातील दख्खनी पातशाह्यांच्या काळातील लघुचित्रे आहेत. मधल्या कालखंडात महाराष्ट्रात शिल्पकृतींच्या जोडीने भित्तिचित्रांच्या रूपात चित्रकृती रंगवल्या गेल्याही असतील; पण आजतरी या चित्रकृतींबद्दल कुठलीही निश्चित माहिती उपलब्ध नाही.

इस्लामी पातशाह्यांच्या कालखंडातील सर्वांत जुनी लघुचित्रे इ.स. १५६५-६९ दरम्यान लिहिल्या गेलेल्या 'तारीफ-इ-हुसेनशाही' या हस्तलिखितात सापडतात. अहमदनगरच्या निजामशाहीचा सुलतान पहिला हुसेन शाह याच्या कारकिर्दीचे गुणवर्णन या हस्तलिखितात आहे. मूळ हस्तलिखितातील चौदा लघुचित्रांपैकी सध्या बारा लघुचित्रे उपलब्ध आहेत. या लघुचित्रांमध्ये इ.स. १५६५ सालच्या पाच दख्खनी पातशाह्यांनी विजयनगरच्या साम्राज्यावर मात केलेली तालिकोट्याची लढाई, दरबारातील प्रसंग व उद्यानातील जनाना इत्यादी विषयांवरील चित्रे आहेत. या चित्रांतील निसर्ग व भूदृश्यांच्या चित्रणातला इराणी प्रभाव, अलंकरणा-वस्त्रप्रावरणांमध्ये - विशेषकरून स्त्रियांनी नेसलेल्या साड्यांमध्ये - जाणवणार्‍या दक्षिणी/विजयनगर शैलीसोबत अशा कल्पकतेने योजला आहे, की त्यामुळे दख्खनी शैली म्हणजे केवळ निरनिराळ्या चित्रशैलींची सरमिसळ न वाटता, स्वतंत्र अभिव्यक्तिक्षम चित्रशैली असल्याची साक्ष पटते.

इ.स. सोळाव्या शतकाच्या अखेरीस दख्खनेतील पातशाह्यांना अंकित करण्यासाठी मुघलांनी मोहीम आरंभली. या संघर्षमय काळात खूपच थोडी चित्रे चितारली गेली. इ.स. १६३८ साली मुघलांचा दख्खनेतील सुभेदार असलेल्या औरंगजेबाने निजामशाहीचा पाडाव केल्यावर अहमदनगरची चित्रपरंपरा खंडित झाली.

पुढे मुघलांचा दख्खनेत जम बसल्यावर इ.स. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत औरंगाबाद मुघलांचे केवळ लष्करी, प्रशासकीय ठाणेच न राहता, सांस्कृतिक केंद्रही बनू लागले होते. मुघल सैन्यातील राजपूत सेनापतींच्या आश्रयाने औरंगाबादेत चित्रनिर्मिती होऊ लागली. मात्र तेथील चित्रे एका विशिष्ट शैलीतली नसून, मुघल व निरनिराळ्या राजपूत शैलींमध्ये चितारलेली आढळतात. यातील उल्लेखनीय चित्रकृती 'रसमंजरी' नावाच्या हस्तलिखितात इ.स. १६५० च्या सुमारास चितारलेल्या आहेत. मेवाडच्या सिसोदिया घराण्यातील सेनापतीकरता चितारलेल्या या चित्रकृतींवर मेवाडी परंपरेचा प्रभाव असला, तरी त्यातील तजेलदार रंगयोजना मेवाडी परंपरेपेक्षा, स्थानिक कारागिरीतून आली असावी.

राजपूत व दख्खनी शैलींचं मिश्रण इ.स. अठराव्या शतकातील चित्रांमध्येही दिसून येतं. विदर्भातील कारंजा गावात चितारलेल्या तीर्थंकर ऋषभमुनींवरील 'पंचकल्याणक' पट्टचित्रात (इ.स. १७०० च्या सुमारास), 'चंदन मलियगिरी कथा' नावाच्या हस्तलिखितातील चित्रांत (इ.स. १७३३) व नागपूरकर भोसल्यांकडील 'भागवतपुराणा'च्या हस्तलिखितातील चित्रांत असे कल्पक मिश्रण आढळते.

मराठा साम्राज्यातील चित्रकृती
इ.स. सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठ्यांच्या स्वराज्याचा उदय झाला. आरंभीच्या पाऊणशे वर्षांचा काळ मुघल साम्राज्याविरुद्ध निकराच्या संघर्षात गेल्यामुळे, या कालखंडात फारशी चित्रनिर्मिती झाल्याचे आढळत नाही. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथाकडे प्रशासनाची धुरा सोपवून स्वराज्याची घडी नीट बसवल्यानंतर चित्रकलेला काही प्रमाणात आश्रय लाभला. या काळातील एका लघुचित्रात छत्रपती शाहू महाराजांची मुनिवत् छबी चितारली असून, दुसर्‍या एका चित्रात दिमतीस श्वान व सेवक घेऊन अश्वारूढ झालेले छत्रपती रंगवले आहेत. याखेरीज मसनदीवरील बसलेले, अश्वारूढ, मसलत करत असलेले पेशवे/मराठा राज्यकर्तेदेखील काही चित्रांत चितारले आहेत. या चित्रांमधून साधारणतः राजपूत चित्रशैलींचा प्रभाव जाणवत असला, तरीही त्या सर्वांत एकजिनसी चित्रशैली आढळत नाही. ही चित्रे वतनावर दरबारी चित्रकार न ठेवता, एकेक चित्र हौसेनुसार एकेका गुणवान चित्रकाराकडून स्वतंत्रपणे काढून घेतले असावे.

पेशवाईच्या काळात मात्र वैशिष्ट्यपूर्ण एतद्देशीय चित्रशैली (ज्याला 'मराठा चित्रशैली' म्हणूनही संबोधले जाते) राजाश्रयाच्या आधाराने पुण्यात विकसली व सातारा, वाई, नाशिक परिसरात पसरली. या चित्रशैलीत स्थूलपणे दोन प्रकार दिसतात : पहिल्या प्रकारात पौराणिक विषयांवरील किंवा 'रागमाला', 'ताल' अशा ललित विषयांवरील लघुचित्रे आढळतात. या चित्रांमधील चित्रण रेखीव व अभिजात आहे; मात्र त्यात चितारलेल्या मनुष्याकृती काहीशा निश्चल, स्तब्ध वाटतात. दुसर्‍या प्रकारात हस्तलिखित पोथ्या, पोथ्या-पुस्तकांच्या बांधणीची लाकडी पृष्ठे, जन्मकुंडल्या व सणावारांचे कापडी पट यांवरील चित्रे मोडतात. या प्रकारातील चित्रांत अभिजात रेखीवपणा नसला, तरीही त्यात लोककलांच्या ढंगातला मोकळेपणा जाणवतो. मराठा चित्रशैलीतील बर्‍याच लघुचित्रांमध्ये रंगयोजनेचे एक वैशिष्ट्य आढळते - या चित्रांत पार्श्वभूमी मोकळीच सोडून फक्त पुरोभूमीवरच्या गोष्टीच रंगवल्या जात. मोकळ्या सोडलेल्या पार्श्वभूमीवर रंगवलेल्या मनुष्याकृती, वस्तू त्यामुळे अर्थातच उठावदार दिसतात.
लघुचित्रांच्या जोडीने उत्तरकालीन मराठेशाहीच्या काळात घरंदाजांच्या वाड्यांमध्ये मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे रंगवली जाऊ लागली. मेणवलीतील नाना फडणविसांच्या वाड्यात, व वाईतील सरदार रास्त्यांच्या मोतीबाग वाड्यातील काही भित्तिचित्रे आज शिल्लक आहेत.

उत्तरकालीन मराठेशाहीतील ब्रिटिश-प्रभावित चित्रकृती
इ.स. अठराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी हितसंबंधांच्या संरक्षणार्थ उपखंडातील राजकारणात सक्रिय रित्या लक्ष घालू लागली. ब्रिटिशांच्या वाढत्या संपर्कामुळे युरोपीय कला, चैनीच्या उंची वस्तू इत्यादींचा राज्यकर्त्या वर्तुळात परिचय व प्रवेश झाला. दरम्यान एव्हाना स्थिरावलेल्या उपखंडातील ब्रिटिश वसाहतींमधून मागणी असल्यामुळे व उपखंडाविषयी असलेल्या औत्सुक्यापोटी काही हिकमती ब्रिटिश कलाकारही येथे येऊ लागले. इ.स. १७८६-१७९६ दरम्यान पुणे दरबारात कंपनीचा वकील असलेला ब्रिटिश रेसिडेंट चार्ल्स मॅलेट हुशार व अभिरुचिसंपन्न होता. त्याने इग्लंडहून मुंबईत आलेला ब्रिटिश चित्रकार जेम्स वेल्स व त्याचा मदतनीस चित्रकार रॉबर्ट मेबन यांना पुण्यास बोलावून घेतले (इ.स. १७९२). मॅलेटाने वेल्स व मेबन यांना चित्रे चितारण्याची कामे देऊन आश्रय तर दिलाच, शिवाय त्यांचा परिचय सवाई माधवराव पेशव्यांशी व महादजी शिंदे, नाना फडणवीस अशा मातबरांशीही करून दिला. युरोपीय पद्धतीने आपली व्यक्तिचित्रे बनवून घेण्यातून ब्रिटिशांसोबत संबंध दृढावायला व आपली प्रतिमा, प्रतिष्ठा उंचावायला मदत होईल असा विचार करून मराठे जेम्स वेल्साकडून आपली, आपल्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे चितारून घ्यायला लागले. या चित्रांपैकी सवाई माधवराव पेशवे-नाना फडणवीस-महादजी शिंदे यांचे समूहचित्र, सवाई माधवराव पेशवे-नाना फडणवीस यांचे समूहचित्र, सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस, महादजी शिंदे, पेशव्यांचे वकील बहिरो रघुनाथ मेहेंदळे, ब्रिटिशांचे वकील नूरुद्दीन हुसेन खान यांची व्यक्तिचित्रे सध्या उपलब्ध आहेत. मॅलेटाने जेम्स वेल्साकडून इ.स. १७९० सालच्या ब्रिटिश-मराठा कराराच्या प्रसंगावर मोठे चित्र चितारून घ्यायचे ठरवले होते. परंतु इ.स. १७९५ साली वेल्स अकाली मरण पावल्यामुळे, त्याने बनवलेल्या कच्च्या अभ्यासचित्रांवरून थॉमस डॅनियल या प्रसिद्ध ब्रिटिश चित्रकाराने हे चित्र साकारले. आज ज्ञात असलेली मराठा राज्यकर्त्यांची विश्वासार्ह व्यक्तिचित्रणे जेम्स वेल्स याच्या चित्रांमुळेच उपलब्ध आहेत.

जेम्स वेल्साने फक्त चित्रेच चितारली नाहीत, तर चार्ल्स मॅलेटाकरवी पेशव्यांना कलाशिक्षणार्थ चित्रशाळा स्थापायला राजीही केले असावे. या चित्रशाळेत त्याने काही एतद्देशीय कलाकारांना युरोपीय ढंगाने चित्रकला शिकवली असावी. चित्रशाळेत शिकलेल्या गंगाराम चिंतामण तांबट नावाच्या कलाकाराने पुढे वेरूळ व घारापुरीच्या लेण्यांची रेखाचित्रे, आराखडे बनवण्याच्या कामी वेल्साच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम केल्याचे उल्लेख आढळतात.

गंगाराम तांबटाखेरीज इ.स. अठराव्या शतकाच्या मध्यास शिवराम नावाच्या कलाकाराचे उल्लेख आढळतात. सदाशिव, माणको, तानाजी, राघो, अनुपराव हे त्याचे पुत्रही कलाकार होते. इ.स. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात चित्रांच्या हुबेहूब नकला रंगवण्यात वाकबगार असलेल्या नरसप्पा विजापूरकर नावाच्या कलाकाराचाही उल्लेख सापडतो. जेम्स वेल्स, थॉमस डॅनियल वगैरे उपखंडात येऊन गेलेल्या ब्रिटिश चित्रकारांमुळे प्रभावित झालेल्या एतद्देशीय चित्रकारांनी पारंपरिक चित्रशैलीसोबत काही युरोपीय तत्त्वे वापरून संमिश्र शैलीत चित्रे रंगवली. त्या काळातील बहुतांश चित्रांमध्ये कागदावर टेंपरा जलरंगांचे माध्यम वापरल्याचे दिसते.

ब्रिटिश वसाहतकालीन चित्रकला
इ.स. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभिक काळापर्यंत ब्रिटिश सत्ता उपखंडात बरीच विस्तारली होती. आधुनिक यंत्रशास्त्रातील प्रगतीमुळे ब्रिटिश उत्पादने एतद्देशीय कारागिरांच्या उत्पादनांपेक्षा सरस ठरू लागली होती; परिणामी एतद्देशीय उद्योगांची, कारागिरांची पीछेहाट होऊ लागली. ही बाब जमशेटजी जीजीभॉय नावाच्या मुंबईकर व्यापार्‍याने निरखली अन् यावर तोडगा शोधायच्या दिशेने त्यांचे विचारचक्र फिरू लागले. एतद्देशीय कारागिरांना आधुनिक तंत्र शिकवण्यासाठी एखादी तंत्रशाळा काढायचा विचार त्यांच्या मनी आकार घेऊ लागला. इ.स. १८५१ मध्ये लंडनात भरणार्‍या प्रदर्शनासाठी ब्रिटिश भारतातून पाठवायच्या कलाकृती, कारागिरीचे नमुने निवडणार्‍या समितीमध्ये जमशेटजींची वर्णी लागली. या प्रदर्शनात उपखंडातल्या कारागिरांची कारागिरी, सौंदर्यदृष्टी पाहून प्रेक्षकांना अतिशय अचंबा वाटला. प्रदर्शनातून एतद्देशीय कारागिरीबद्दल तयार झालेल्या सकारात्मक प्रतिमेचा पाठपुरावा करीत जमशेटजींनी तंत्रशुद्ध कलाशिक्षण देणारे विद्यालय स्थापायला सरकारास राजी केले. जमशेटजींनी दिलेल्या रु. १ लाख देणगीच्या आधारे रेखन, रंगकाम, हिर्‍याची पैलूकटाई व लाकडावरील कोरीवकाम यांचे शिक्षण देणारे मुंबईचे कलाविद्यालय (विद्यमान 'सर जमशेटजी जीजीभॉय कलाविद्यालय') २ मार्च, इ.स. १८५७ रोजी स्थापले गेले.

एतद्देशीय पारंपरिक कलेत सरावलेले हात कारागिरीतील बारकाई, आशयमांडणीत तरबेज असत; परंतु छायाप्रकाशामुळे होणार्‍या रंगछटांतील स्थित्यंतराच्या, त्रिमितीय प्रक्षेपाच्या जाणिवांचा त्यात अभाव असे. त्यामुळे इंग्लंडातील कलाविद्यालयांच्या धर्तीवर ही नवीन कलातत्त्वे रुजवणारे रेखन, रंगकाम व संकल्पन यांचे प्रशिक्षण मुंबईच्या कलाविद्यालयात दिले जाऊ लागले. छाया-प्रकाशदर्शी रेखन शिकवण्याकरता ग्रीक/रोमन धाटणीच्या प्राचीन वस्तू व व्यक्तिचित्रणाकरता मानवी मॉडेलांची योजना करण्यात आली. एकरंगसंगतीत व बहुविध-रंगसंगतीत हलक्या-गहिर्‍या छटांमधून त्रिमितीय आभास दाखवण्याचे तंत्र शिकवले जाऊ लागले. त्रिमितीय प्रक्षेपाचेही पद्धतशीर शिक्षण दिले जाऊ लागले. थोड्या काळातच, नव्या शिक्षणपद्धतीने शिकलेल्या विद्यार्थ्यांना पारंपरिक चित्रणपद्धतीतला सैद्धांतिक व शास्त्रीयतेचा अभाव जाणवू लागला. याच काळात राजा रविवर्म्यांनी तैलरंगांच्या युरोपीय तंत्राचा अभ्यास करून वास्तववादी शैलीत रंगवलेली पौराणिक विषयांवरील चित्रे नावाजली जाऊ लागली. या घटकांच्या एकत्रित प्रभावांतून मुंबईच्या कलाविद्यालयात शिकलेले चित्रकार युरोपीय वळणाच्या आभासी वास्तववादी चित्रकलेकडे आकर्षिले गेले. वास्तविकतः ब्रिटिशांनी कलाविद्यालय चालवण्यासोबत पुरातन भारतीय कलेचे जतन-प्रकल्पही हाती घेतले होते. अजिंठ्यातील भित्तिचित्रांच्या नकला उतरवण्याच्या प्रकल्पामध्ये मुंबईच्या कलाविद्यालयाचे विद्यार्थीदेखील सहभागी होते; किंबहुना, इ.स. १८८० साली कलाविद्यालयाचे प्राचार्य झालेल्या जॉन ग्रिफिथ्स यांनीही जतन-प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या सफाईदार कामाबद्दल कौतुकोद्गार काढले. मात्र मुंबई कलाविद्यालयातले चित्रकार अजिंठ्यातील कलेमुळे भारतीय कलामूल्यांकडे आकर्षिले गेले नाहीत. युरोपीय वळणाच्या आभासी वास्तववादी चित्रकलेचाच त्यांच्यावर पगडा राहिला.

ब्रिटिशांनी तैलरंग व जलरंग ही नवी माध्यमे महाराष्ट्रात आणली. एतद्देशीय कलाकार पूर्वापार टेंपरा प्रकारातले, अर्थात गोंदासोबत मिसळलेले, अपारदर्शक जलरंग वापरत होतेच; परंतु पारदर्शक जलरंगातील वॉशांचे थर देत केलेले रंगकाम महाराष्ट्रीय कलाकारांसाठी नवीन होते. तैलरंगांचे माध्यम तर सर्वस्वी नवीन होते. नव्या माध्यमांसोबत नवे चित्रविषयही हाताळले जाऊ लागले. लाइफ-साइझ व्यक्तिचित्रे, स्थिरचित्रे, लँडस्केपचित्रे व रचनाचित्रे अशा विविध प्रकारांत चित्रनिर्मिती घडू लागली. इ.स. विसाव्या शतकातल्या पहिल्या तीन दशकांत महाराष्ट्रात असंख्य रचनाचित्रे चितारली गेली. पेस्तनजी बोमनजी, माधवराव धुरंधर, ए.एक्स. त्रिंदाद, एन.आर. सरदेसाई, लक्ष्मण नारायण तासकर, राजाराम दाजी पानवलकर हे चित्रकार या प्रकारात आघाडीवर होते.

इ.स. १८९६-१९१८ दरम्यान जे.जे. कलाविद्यालयाचे प्राचार्य असलेले सेसिल बर्न्स हे लँडस्केपचित्रणात तरबेज चित्रकार होते. त्यामुळे त्या काळातील विद्यार्थीदेखील पारदर्शक जलरंगांच्या माध्यमाकडे - त्यातही लँडस्केपचित्रणाकडे - आकर्षिले गेले. इ.स. १९२०-३० ची दशके महाराष्ट्रातील जलरंगातील लँडस्केपचित्रणाचा सुवर्णकाळ मानता येईल. महाराष्ट्रभरात बर्‍याच ठिकाणी या प्रकारातील चित्रनिर्मिती झाली. मुंबईतले सावळाराम हळदणकर, आगासकर, तासकर, मंचरशा फकीरजी पीठावाला, माधवराव परांडेकर, माळी; कोल्हापुरातले आबालाल रहिमान, माधवराव बागल, वडणगेकर, एस.एन. कुलकर्णी; नाशकातले व्ही.जी. कुलकर्णी; पुण्यातले दीक्षित; सांगलीचे जांभळीकर व मालवणातले पेडणेकर हे चित्रकार या प्रकारात नावाजलेले होते. इंदुरातले डी.जे. जोशी, देवळालीकर, नारायण श्रीधर बेंद्रे हे चित्रकारदेखील मुंबईतल्या कलाविद्यालयामुळे प्रभावित झाले.

संस्थानी अंमल शिल्लक असलेल्या त्या काळात कलाविद्यालयात शिकून घडलेल्या चित्रकारांना संस्थानिकांकडून, तसेच ब्रिटिश व एतद्देशीय प्रतिष्ठितांकडून व्यक्तिचित्रणासाठी विशेष मागणी असे. त्या काळातील आघाडीच्या व्यक्तिचित्रकारांमध्ये पेस्तनजी बोमनजी, त्रिंदाद, पीठावाला, माधवराव धुरंधर, आगासकर, हळदणकर, बाबूराव पेंटर हे चित्रकार गणले जात. यांपैकी त्रिंदादांची चित्रणशैली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व अभिजात होती. रेंब्रांट वगैरे डच चित्रकारांच्या पद्धतीप्रमाणे तैलरंगांच्या पातळ, पारदर्शक थरांतून छाया-प्रकाश दर्शवणार्‍या छटा साधण्याची त्यांची हातोटी लक्षणीय होती. त्रिंदादांनी जशी तैलरंगांत, तशी जलरंगांतील व्यक्तिचित्रणात सावळाराम हळदणकरांनी उंची गाठली. काव्यात्म परिणाम साधणार्‍या तरल, अलवार रंगछटा वापरत त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रणशैली विकसवली. यानंतरचे नावाजलेले व्यक्तिचित्रकार म्हणजे भोंसुले, देऊसकर, एम.आर. आचरेकर. देऊसकरांनी रंगवलेले बालगंधर्वांचे चित्र (जे पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आहे) त्यांच्या व्यक्तिचित्रणातील कौशल्याची साक्ष देते, तर भोंसुल्यांनी चितारलेले जे.जे. कलाविद्यालयाचे प्राचार्य डब्ल्यू. ई. ग्लॅड्स्टन सॉलोमन यांचे व्यक्तिचित्र श्रेष्ठ व्यक्तिचित्रांमध्ये गणले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात गजानन हळदणकर, माधव सातवळेकर व रवींद्र मेस्त्री यांनी व्यक्तिचित्रणात स्वतःचे स्थान निर्माण केले.

सेसिल बर्न्स यांच्यानंतर इ.स. १९१९ साली जे.जे. कलाविद्यालयाचे प्राचार्य बनलेले ग्लॅड्स्टन सॉलोमन पारंपरिक भारतीय कलेचे चाहते होते. इ.स. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून कोलकात्याच्या कलाक्षेत्रात जोम धरू लागलेल्या भारतीय पुनरुत्थानवादी चळवळीप्रमाणे मुंबईतल्या कलाक्षेत्रातही भारतीय कलामूल्यांना पुनरुज्जीवित करण्याची ध्येयदृष्टी त्यांनी बाळगली. या प्रोत्साहनामुळे रघुवीर चिमुलकर, र.धों. धोपेश्वरकर, नगरकर, जगन्नाथ अहिवासी, ज.द. गोंधळेकर इत्यादी चित्रकारांनी पुनरुत्थानवादी चित्रनिर्मिती केली. यांपैकी अहिवासी पारंपरिक पद्धतीप्रमाणे अपारदर्शक टेंपरा जलरंगांत चित्रे रंगवीत. चिमुलकर व नगरकर पारदर्शक जलरंगांचा एक थर लावून, मग चित्र धुऊन, पुन्हा त्यावर पुढचे थर देत काहीसा गूढ परिणाम साधणार्‍या पद्धतीने रंगकाम करीत. मात्र या मोजक्या कलाकारांनी केलेल्या चित्रनिर्मितीव्यतिरिक्त मुंबईतली पुनरुत्थानवादी चळवळ बहरू शकली नाही.

आधुनिकतावादी प्रवाह
सॉलोमनांनंतर इ.स. १९३६ साली जे.जे. कलाविद्यालयाच्या संचालकपदी नेमल्या गेलेल्या चार्ल्स गेरार्ड यांनी विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना चित्र-संकल्पन व रंगलेपनातून पोतनिर्मितीसारखी आधुनिक तंत्रे वापरायला उद्युक्त केले. इंपास्टो पद्धतीने दाट रंगलेपन करणे व रंग लावण्यासाठी थेट पॅलेट नाइफ वापरण्यासारख्या आधुनिक पद्धतींना उत्तेजन दिले गेले. कलाशिक्षणाच्या या बदललेल्या दिशेमुळे सॉलोमनांच्या काळात रुजवलेली पुनरुत्थानवादी परंपरा मुंबईच्या कलाविद्यालयात क्षीण होत गेली आणि उत्तर-दृक्प्रत्ययवाद (पोस्ट-इंप्रेशनिझम) व अभिव्यक्तिवादासारख्या चळवळींनी प्रभावित झालेल्या नव्या दमाच्या चित्रकारांची आधुनिकतावादी परंपरा बळावली.

स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई व महाराष्ट्रातील कलाक्षेत्रात बरेच बदल घडले. कृष्णाजी आरा, मकबूल फिदा हुसेन, नारायण श्रीधर बेंद्रे, अब्दुलरहीम आपाभाई आलमेलकर हे जे.जे. कलाविद्यालयाबाहेर घडलेले चित्रकार प्रकाशात आले व त्यांना वॉल्टर लँगहॅमर, रुडी फॉन लाय्डन व ई. श्लेसिंगर आदी युरोपीय आश्रयदात्यांचे प्रोत्साहनही लाभले. या कलाकारांच्या कट्ट्याचे स्थळ - आर्टिस्ट्स एड सेंटर - अशा आधुनिक चळवळीचे केंद्र बनले. यातूनच इ.स. १९४८ साली फ्रान्सिस न्यूटन सूझा, सैद हैदर रझा, हुसेन, आरा, हरी अंबादास गाडे, सदानंद बाकरे इत्यादी चित्रकारांच्या 'प्रोग्रेसिव ग्रूप' नामक मंडळाचा उगम झाला. भारतीय पुनरुत्थानवादी चळवळीतून होत असलेल्या कलेच्या अतिरिक्त भारतीयीकरणाविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. कलात्मक सुसूत्रता व रंगयोजना या मोजक्या मूलभूत तत्त्वांशी बांधिलकी राखून आशय व तंत्राबाबत मोकळीक घेत चित्रनिर्मिती केली जावी, अशी त्यांची भूमिका होती. या मंडळाने काही चित्रप्रदर्शने भरवली; पण पन्नाशीच्या दशकात सूझा, रझा, बाकरे परदेशी जाऊन स्थिरावले अन् काही काळात हा ग्रूप विखुरला.

प्रोग्रेसिव ग्रूप विखुरला तरी प्रयोगशीलतेचे लोण सरले नाही. किंबहुना, त्यांच्या समकालीन पिढीपासून आजच्या चित्रकारांपर्यंत अनेक जणांनी तंत्र, आशय, प्रतिमांमधील कल्पक प्रयोगशीलतेतून उल्लेखनीय कलानिर्मिती केली आहे. दैनंदिन आयुष्यातील वस्तू आणि घटना आगळ्या पद्धतीने मांडत व रंगलेपनातून केलेली पोतनिर्मिती हे के.के. हेब्बरांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. शंकर बळवंत पळशीकरांच्या आगळासा गूढभाव जाणवणार्‍या चित्रांमध्ये रचनेतले अभिजात भारतीयत्व जाणवते. असेच पारंपरिकतेचे सूत्र धरून कलाकुसरीचा, सजावटीचा नव्या पद्धतीने केलेला आविष्कार आलमेलकर व रायबांच्या चित्रणशैलींत दिसतो. याउलट वासुदेव गायतोंडे, प्रभाकर बरवे यांनी अमूर्ततावादी पद्धतीने निर्मिती केली. अमूर्ततावादाची तीच धुरा वाहणारे चित्रकार प्रभाकर कोलते व नागरी जीवन चितारणार्‍या सुधीर पटवर्धन यांसारखे आजचे महाराष्ट्रीय चित्रकार आपली वैशिष्ट्यपूर्ण वाट चोखाळत चित्रनिर्मिती करत आहेत.

समारोप
इ.स.पू. दुसर्‍या शतकापासून वर्तमानापर्यंत दोन हजार वर्षांची चित्रकला-परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या विस्तीर्ण कालखंडात वेळोवेळी घडलेल्या राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरांमुळे ती कधी क्षीण झाली, कधी थबकली, तर कधी नव्या बदलांना स्वीकारत प्रवाही राहिली आहे. तिच्या या वाटचालीत असे अनेक कलाकार होऊन गेले असतील, ज्यांची नावे आज ज्ञात नाहीत. ज्यांची माहिती उपलब्ध आहे, त्यांपैकी काही कलावंतांच्याच बहुमोल योगदानाची दखल विस्तारमर्यादेमुळे या लेखात घेता आली आहे. ही मर्यादा स्वीकारून महाराष्ट्र-राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कलेतिहासाची स्मृति जागवण्याच्या नम्र हेतूने हा संक्षिप्त आढावा मांडला आहे.

संदर्भ/ स्रोत:
१. 'महाराष्ट्र', प्रकाशक: मार्ग पब्लिकेशन्स, प्रकाशन वर्ष: १९८५; निबंध : 'मिनिएचर पेंटिंग', लेखिका: शरयू दोशी
२. 'महाराष्ट्र', प्रकाशक: मार्ग पब्लिकेशन्स, प्रकाशन वर्ष: १९८५; निबंध : 'कंटेंपररी आर्ट', लेखक: बाबुराव सडवेलकर
३. 'इंडिया अँड ब्रिटिश पोर्ट्रेचर, १७७०-१८२५', प्रकाशक: ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, प्रकाशन वर्ष: १९७९, लेखक: मिल्ड्रेड आर्चर, ISBN 0-85667-054-5, पृ. ३३३-३५५
४. 'कंपनी ड्रॉइंग्ज इन द इंडिया ऑफिस लायब्ररी', प्रकाशक: हर मॅजेस्टीज स्टेशनरी ऑफिस, प्रकाशन वर्ष: १९७२, लेखक: मिल्ड्रेड आर्चर, ISBN 011-880422-7, पृ. २३६-२४९
५. 'कंपनी पेंटिग्ज: इंडियन पेंटिग्ज ऑफ द ब्रिटिश पीरियड', प्रकाशक: विक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियम, लंडन, प्रकाशन वर्ष: १९९२, लेखक: मिल्ड्रेड आर्चर, ISBN 0-944142-30-3, पृ. १७७
६. 'महाराष्ट्रातील कलावंत: आदरणीय आणि संस्मरणीय', प्रकाशक: ज्योत्स्ना प्रकाशन, प्रकाशन वर्ष: २००५, लेखक: बाबुराव सडवेलकर, ISBN 81-7925-120-9

संकलन : pha