शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्था

'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी या उक्तीला आपल्या जीवनात नेहमीच पाळले. त्यांच्या लढाया, पराक्रम, किल्ले, आग्र्याहून सुटका, अफझलखान वध असे सर्वच प्रसिध्द आहे. त्यांचा पराक्रम डोळ्यांसमोर ठेवताना आपण 'त्यांचे प्रशासन' या गोष्टीकडे मात्र थोडेफार दुर्लक्ष करतो. त्यांच्यावर या नेहमीच्या विषयांवर लिहिण्यापेक्षा आज या लेखात मी त्यांच्या सैन्यव्यवस्था व राज्यकारभाराबाबतीत थोडेफार लिहायचा प्रयत्न करेन. त्यांच्या प्रशासनाबद्दल लिहिताना त्या काळच्या महाराष्ट्राची थोडीफार ओळख या निमित्ताने होईल.

शिवाजी महाराजांना सामाजिक क्रांती अभिप्रेत नव्हती. शिवकालीन सामाजिक जीवन शिवपूर्वकालाहून फार भिन्न होते वा ते नंतर बदलले असे म्हणता येणार नाही. त्यांनीदेखील रूढ असणार्‍या परंपरा व पध्दतींचाच अवलंब केला, पण तो करताना समाजातील सर्व घटकांना, संस्थांना त्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन सामाजिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवाजी महाराज वेगळे.

स्वराज्यवॄध्दीबरोबरच त्या प्रदेशाची शासकीय व्यवस्था लावणे महत्त्वाचे, नाहीतर परत तो भाग मोगल वा इतर शाह्यांकडे जायचा हे महाराजांनी ओळखले व त्यादॄष्टीने पाऊले उचलली. (पुढे जेव्हा मराठे उत्तरेत गेले, तेव्हा त्यांनी त्या प्रदेशाची व्यवस्था न लावता फक्त खंडण्या घेतल्या, त्यामुळे दर एक-दोन वर्षांनी त्याच त्या राजांना जिंकणे क्रमप्राप्त झाले व मराठेशाही दुबळी झाली).

महाराजांची शासन व्यवस्था प्रचलित मुसलमानी शासन व्यवस्था व भारतीय नीतीशास्त्र यांवर आधारलेली होती. महाराज हे प्रशासनाचे प्रमुख होते. राजकीय प्रशासन व्यवस्थेबरोबरच स्थानिक, लोकारूढ शासनसंस्था आणि वर्णाधिष्ठित जातीव्यवस्थादेखील कार्यरत होत्या.

राजशासनाची प्रमुख सात अंगे: राजा, मंत्री, मित्र, कोष, राष्ट्र, दुर्ग आणि सैन्य. यांपैकी एकही अंग कमी पडल्यास राज्य नाश पावे. 'राजा कालस्य कारणम्' अशी या प्रशासनाची व्यवस्था होती. स्मृत्यादी ग्रंथांनी धर्माची मर्यादा श्रेष्ठ मानून राज्य व समाजाची सर्व व्यवस्था त्यांच्या कक्षानुरुप मर्यादित केली आहे. राज्यधर्मामध्येच राष्ट्रपालन, प्रजार्तिनिवारण, धर्मपालन ह्यांचा समावेश होता. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी राजास प्रधानमंडळ निर्माण करावे लागे व त्यांच्याद्वारा कार्याची वाटणी करुन प्रशासन करावे लागे. मुसलमान पध्दतीमध्ये 'रख्तखाना' ही संस्था असे, पण तिचे स्वरूप थोडे वेगळे होते. 'सप्तांगम राज्यम'ची अमंलबजावणी करण्याकरता महाराजांनी प्रधानमंडळ स्थापन केले.

अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व वाढ राज्याच्या विस्ताराबरोबरच होत गेली. महाराज बंगळुराहून परतताना शहाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर नीळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत दीक्षित, हणुमंते, मुजुमदार (राज्याचे अमात्य), सोनोपंत डबीर (सुमंत), रघुनाथ बल्लाळ सबनीस (सेनालेखक) असे अधिकारी दिले होते. १६४९ मध्येच महाराजांनी तुकोजी चोर यांना तेव्हा असलेल्या लष्कराचा सरनौबत नेमले होते. (म्हणजे प्रधानमंडळाची कल्पना ही स्वराज्य बाल्यावस्थेत असतानाच निर्माण झाली व अवलंबली गेली). पुढे सरनौबती ही माणकोजी दहातोड्यांकडे व नंतर नेताजी पालकरांकडे आली. तेव्हा फौज सात हजार व पागा (घोडेस्वार) ३००० होती. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, सोनोपंत डबीर, निराजीपंत, शामराव नीळकंठ ही मंडळी राज्याभिषेकाच्या आधीपासूनच स्वतंत्रपणे आपापली कार्यक्षेत्रे सांभाळत होती. राजे या सर्व लोकांची मसलत घेऊनच पुढील कार्य आखत. पुढे जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी खालील पदे निर्माण केली. ही पदे निर्माण करताना त्यांनी फार्सी शब्द टाळून मराठी प्रतिशब्द आणण्यावर भर दिला. त्यासाठी रघुनाथराव हणुमंतेंना नवीन मराठी कोष करावयास सांगितले.

अष्टप्रधान व त्यांच्या जबाबदार्‍या:

१. मुख्य प्रधान (पेशवा) : सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रांवर शिक्का करावा, सेना घेऊन युध्दप्रसंग करावा. प्रदेश स्वाधीन होईल त्याचा रक्षून बंदोबस्त करुन महाराजांच्या आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार व सेना यांनी त्यांजबरोबर चालावे. मोरो त्रिंबक पिंगळे हे पेशवे झाले व त्यांचा वार्षिक पगार १५००० होन ठरला. ( एक होन म्हणजे साधारण तीन ते चार रुपये).
२. अमात्य (मुजुमदार): -राज्यातील जमाखर्च ठेवावा. दफ्तदरदार व फडणीस यांच्याकडुन त्यांची कामे करून घ्यावी. फडणिशी व चिटणिशी पत्रांवर निशाण करावे. नारो व रामचंद्र नीळकंठ ह्या बंधुद्वयांकडे हे पद आले. तनखा १२००० होन ठरला.
३. सचिव (सुरनीस) : राजपत्रे वाचून त्यातील मजकूर शुध्द करावा. राजपत्रांवर 'संमत' अशा शिक्का करावा. अण्णाजी दत्तो हे सचिव झाले.
४. मंत्री (वाकनीस) : यांनी सर्व राजकारण सावधानतेने करावे. राजाची दिनचर्या लिहून ठेवावी. युध्दादि प्रसंग करावा. दत्ताजी त्रिंबक हे मंत्री झाले.

हे चार प्रधान महाराजांच्या उजवीकडे बसत.

५. सेनापती (सरनौबत): सर्व सैन्याचा मुख्य अधिपती, युध्दप्रसंग करावा. हंबीरराव मोहिते हे सेनापती झाले.
६. सुमंत (डबीर) : परराज्यांच्या विचार करावा. त्यांचे वकील आले तर सत्कार करावा, आपले वकील धाडावेत. रामचंद्र त्रिंबक हे सुमंत झाले.
७. न्यायाधीश: यांनी सर्व राज्यांतील न्याय-अन्याय धर्मतः करुन राजास निवेदन करावे. निराजी राऊजी हे न्यायाधीश झाले.
८.पंडितराव (दानाध्यक्ष): यांजकडे सर्व धर्माधिकार होता. दान धर्म करणे, अनुष्ठान करणे हे सर्व यांच्या अखत्यारीत.

शेवटच्या सहाही प्रधानांचा सालीना तनखा १०००० होन ठरला.

राज्याचे प्रांत आखून ते अष्टप्रधानांच्या हवाली करण्यात येत. जेव्हा अष्टप्रधान स्वारीवर जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांचा कारभार पाहात. अष्टप्रधांनाच्या कचेरीस प्रत्येक काम पाहायला दरकदार नेमले जात. त्यात मुख्यत: १. दिवाण, २. मुजुमदार, ३. फडणीस, ४. सबनीस, ५. कारखानीस, ६. चिटणीस, ७. जामदार (खजिनदार) व ८. पोतनीस (नाणेतज्ञ) असत.

चिटणिसाचा हुद्दा अष्टप्रधान मंडळात समाविष्ट नाही. चिटणीस हा महाराजांचा मुख्य लेखक. राजमंडळात त्याचा समावेश होता. राज्यातील सर्व राजपत्रे लिहिण्याचे काम त्याच्याकडे होते. उत्तरेही तोच लिही. इनामासंबधी कागदपत्रांची व्यवस्थाही फडणीसच करी.

अष्टप्रधानांकडे पुढील कारखाने व महाल यांची व्यवस्था लावण्याचे काम होते. राज्याची घडी या कारखान्यांवर व महालांवर अवलंबून होती.
कारखाने:
१. खजिना २. जवाहिरखाना ३. अंबारखाना (हत्ती) ४. शरबतखाना (औषधे) ५. तोफखाना ६. दफ्तरखाना ७. जामदारखाना (नाणी) ८. जिरातखाना (शेती). ९. मुतबकखाना १०. उष्ट्रखाना ११. नगारखाना १२. तालीमखाना १३. पीलखाना १४. फरासखाना १५. अबदरखाना (पेये) १६. शिकारखाना १७. दारूखाना व १८. शरतखाना.

महाल:
१. पोते (खजिना) २. सौदागर (माल) ३. पालखी ४. कोठी ५. इमारत ६. बहिर्ला (रथ) ७. पागा ८. शेरी ९. दरुणी १०. थट्टी (खिल्लार) ११. टांकसाळ व १२. छबिना.

राज्यकारभार:
प्रांताच्या बंदोबस्तासाठी राज्याचे दोन विभाग केले गेले. एक सलग असणार्‍या प्रदेशाचा व दुसर्‍या विखुरलेल्या दक्षिणेकडील प्रदेशाचा. पहिल्या मुलखाचे तीन भाग केले. पेशव्यांकडे उत्तरेकडील प्रदेश दिला त्यात कोळवनातील सालेरपासून पुण्यापर्यंतचा वरघाट व उत्तर कोकणाचा समावेश होता. मध्यविभागात दक्षिण कोकण, सावंतवाडी व कारवार हा भाग होता - हा सचिवाकडे सोपविण्यात आला. तिसर्‍या भागात पूर्वेकडील वरघाटाचा प्रदेश म्हणजे सातारा-वाई ते बेळगाव कोप्पळपर्यंतचा प्रदेश - हा भाग मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. कर्नाटकाचा स्वतंत्र सुभा करुन त्यावर हंबीरराव मोहिते व रघुनाथ नारायण अमात्य यांची नेमणूक केली गेली. या सर्व विभागांवर सरसुभेदारांची नेमणूक होई व ते प्रधानांबरोबर काम करीत. यास राजमंडळ म्हणत. किल्लेदार व कारकुन वर्गाची नेमणूक स्वत: महाराज करीत. या प्रदेशातील सैन्य प्रधानमंडळ हवे तसे कमी जास्त करू शकत असे. दरवर्षी प्रधानांनी हिशोब महाराजांना सादर करायचा अशी व्यवस्था असे.

विभागीय कारभारात सरसुभेदार मदत करीत, त्यांना देशाधिकारी म्हणत. पुढील सरसुभ्यांचे उल्लेख पत्रात मिळतात:
१. कल्याण-भिवंडी २. तळकोकण ३. कुडाळ ४. पुणे ५. सातारा-वाई ६. पन्हाळा ७. बंकापुर ८. कोप्पल.
दोन-तीन सुभ्यांची व्यवस्था पाहायला एका सरसुभेदाराला ठेवण्यात आले.

मुसलमानी राजवट व शिवाजी महाराजांची राज्यववस्था ह्यातील मुख्य फरक म्हणजे हे सरसुभे महसुली विभाग नसून विशेषतः कारभार व्यवस्थेसाठीच केले गेले. त्यामुळे सुभेदार मनमानी करु शकत नसत. (पुढे मराठा मंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा हे सुभे महसुलीपण केले गेले त्यामुळे शिंदे, होळकर, गायकवाड सारखे सरदार नंतर स्वतंत्र राज्य करू लागले.) यावरुन शिवाजी महाराजांचे लक्ष आपल्या प्रांतीय कारभारात किती होते हेच दिसून येते.

दोन महाल मिळून लाख-सव्वालाख महसुलाचा एक सुभा होई. सुभेदाराच्या मदतीस मुजुमदार, सभासद, चिटणीस, सबनीस असे अधिकारी असत. सुभ्याच्या बंदोबस्तीकरता शिंबदी असे. सुभेदारास सालीना ४०० होनाचा तनखा व मुजुमदारास १२५ होनाचा तनखा मिळत असे. सुभेदारास सरकारी करवसुलीचे कामी प्रजेचे परंपरागत अधिकारी परगण्याचे देशमुख व देशपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. जमिनीची लागवड व वसाहत करवून सरकारचा सारा गोळा करणे हे देशमुखाचे मुख्य काम असे. वसुली करण्याकरता देशमुखास महसुलाच्या उत्पन्नावर शेकडा ५ टक्के मोबदला मिळे. सरकारचे सर्व हुकूम जनतेपर्यंत नेणे व त्यांचे पालन करने ही देशमुखाची मुख्य जबाबदारी. देशपांडे हा देशमुखाच्या सर्व हिशोबाचे व दफ्तराचे काम पाही. त्यास देशमुखाचा निम्मा हक्क मिळे. महालावरील अधिकार्‍यास हवालदार म्हणत. सर्व सरकारी अधिकार्‍यांना वतन न मिळता वेतन मिळे. सरकार सेवेबद्दल मोकासा अथवा जमीन लावून धरण्याची पद्धत त्यांनी बंद केली त्यामुळे देशमुख, देशपांड्यास जनतेवर बळजबरी करता येत नव्हती.

गाव अथवा खेडे हे स्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होते. एखादे खेडे हे सर्व बाबतीत स्वंयपूर्ण असे. त्यामुळेच राज्य कोणाचेही असले तरी त्या भागातील अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होत नसे. प्रत्येक खेड्यात बारा बलुतेदार असत, त्यांचे सर्व व्यवसाय हे जातीवर अवलंबून असत. आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय कोणी करत नसल्यामुळे प्रत्येक जातीला आणि त्या व्यवसायांना समाजात निश्चित असे एक स्थान होते.

शिवशाही धारापद्धत- शिवकाठी:

जमिनीचा धारा ही सर्वात महत्त्वाची बाब होती. जमिनीवरील शेतसारा ठरविण्यासाठी पूर्वी मलिकंबरने ठरविलेली पद्धत अंमलात आणली गेली होती पण ती शिवाजी महाराजांनी बदलून वेगळी पद्धत लागू केली. त्यांनी जमिनीचे मोजमाप ठरविण्यासाठी काठीचे माप ठरविले. पाच हात व पाच मुठी मिळून एक काठी, वीस औरस-चौरसांचा एक बिघा व १२० बिघ्यांचा एक चावर असे जमिनीचे मोजमाप ठरविले. अण्णाजी दत्तो (सचिव) यांनी गावोगावी जाऊन जमिनीचा धारा, चावराणा, प्रतबंदी व लावणी वरुन ठरविला. चावराणा म्हणजे जमीन मोजून तिच्या सीमा ठरविणे. डोंगरी जमीनीच्या सार्‍याची आकारणी बिघ्यावर न करता नांगरावर होई. आकारणीत जमिनीच्या कसाबरोबर पिकाची जातही पाहण्यात येई. आकार (सारा) ठरवताना तीन वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी घेऊन मगच सारा ठरविण्यात येई. वाजट जमीन, जंगल, कुरण, इत्यादी गावची जमीन सार्‍यासाठी विचारात घेतली जात नसे.

खर्‍या अर्थाने ही पध्दत लोकमान्य होती म्हणूनच शिवाजीस 'जाणता राजा' म्हणले गेले.

एकूण उत्पन्नाच्या ४० टक्के कर शेतकर्‍यास द्यावा लागे. पूर्वीच्या काळी २/५ कर हा लोकमान्य होता. मोगलाईमध्ये पण एवढाच कर भरला जात असे. नवीन गावे वसविली जात असत. नवीन रयतेला कसण्यास गुरेढोरे, बीजास दाणा-पैका, रोज राहण्यास दाणा-पैका देण्यात येई व तो ऐवज दोन वर्षानी जेव्हा पीक येई तेव्हा कापून घेतला जाई. शिवाजी महाराजांनी कौल देऊन अनेक गावे वसविली आहेत. या पद्धतीला 'बटाई पद्धत' म्हटले गेले.

राज्याचे उत्पन्न वाढविताना प्रजेचे कल्याण पाहणेही जरुरी होते अथवा मोगलाईत व शिवशाहीत काय फरक! शिवाजी महाराज याबाबत किती जागरुक होते ते खालील पत्रावरुन दिसेल:

इ.स. १६७६ सुभेदार रामाजी अनंत, मामले प्रभावळी यांस,

"साहेब मेहरबान होऊन सुभास फर्माविले आहे. ऐसीयास चोरी न करावी. ईमानेइतबारे साहेब काम करावे. येसी तू क्रिया केलीच आहेस. तेणेप्रमाने येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास्त व दुरुस्त वर्तने. मुलूकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयेतीवर जाल रयेतीचा वाटा रयेतीस पावे आणि राजभंग राजास येई ते करणे. रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. रयेतीस तबाना करावे आणि किर्द करावी. गावचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुनबी किती आहेत ते गोळा करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबळ असेली त्या माफीक त्यापासी बैलदाणे संच असेल तर बरेच झाले त्याचा तो कीर्वी करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, तो आडोन निकामी जाला असेल, तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलांचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे. जे सेत कर त्याचाने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासुन बैलाचे व गायांचे पैसे वाढिदीवाढी न करता मुदलच उसनेच हळुहळु याचे तवानगी माफव घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई, तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावेतो खर्च करिसील आणि कुणबिया, कुणबि यांची खबर घेऊन त्याल तवानगी येती करुन कीर्द करसील आणि पड जमीन लावुन दस्त ज्याजती करुन देसील, तरी साहेब कबूल असतील तैसेच कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करावयास उमेद धरती. ...."

वरील पत्रावरून हे दिसून येईल की शिवाजी महाराज जनतेची किती काळजी करत. सभासदाने वर्णन केल्याप्रमाणे स्वराज्याचे उत्पन्न हे सुमारे एक कोट होन म्हणजे तीन कोटी रुपये व चौथाईचे उत्पन्न ८० लाख रुपये वेगळे होई.

सैन्यव्यवस्था:

गनिमी काव्याबद्दल मी नवीन सांगायला नकोच. शिवाजी महाराजांनी ही नीती पाठीशी सह्याद्री असल्यामुळे अंगीकारली होती. तसेही मराठ्यांचे बळ तेव्हा एवढे नव्हते की मैदानी युध्द करुन ती जिंकावीत व प्रदेश काबीज करावा. शिवाजी महाराजांनी सैन्याची तत्कालीन पद्धतच अंगीकारली होती पण त्यांची बारीक नजर सैन्यावर राही. मी पुढे काही त्यांची पत्रे देईनच पण त्या आधी आपण सैन्यरचना कशी होती ते पाहू:

सर्व सैन्यास डोईस मंदील, अंगास सकलादी, हाती सोन्याची वा रुप्याची कडी, हुद्याप्रमाणे तलवारीस सोन्या/रुप्याचे म्यान, कानास कुड्यांची एक जोड अशी हुजुरातीची (म्हणजे खासे महाराजांसोबत जी फौज चाले अशी) फौज तयार केली. त्या फौजेत शंभर लोक, साठ लोक, तीस लोक अशी पथके होती. काही जणांकडे बंदुकी, काही विटेकरी, भालकरी, धारकरी अशी विभागणी केली गेली.

पागेत शिलेदार होते, हर घोड्यास एक बारगीर, पंचवीस बारगीरांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमला. जुमलेदारास ५०० होनांचा तनखा. दहा जुमल्यास एक हजारी आणि पाच हजारास एक पंचहजारी व पाच पंचहजार्‍यांवर एक सरनौबत अशी फौजेची रचना होती. सैन्यात काही फिरंगी व मुसलमानही होते.

पायदळाची रचना- दहा हशमांचा एक गट, त्यावर एक नाईक, पाच गटांवर एक हवालदार, दोन-तीन हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमल्यांवर एक हजारी व सात हजार्‍यांवर एक सरनौबत अशी व्यवस्था लावली.

पावसाळ्यात लष्कर छावणीस परत येई. त्यांस दाणा, रतीब, औषधे, घरे यांची उपलब्धी करुन दिली जाई. दसरा होताच लष्कर कामगिरीस निघे. आठ महिने बाहेर व चार महिने घरी अशी व्यवस्था असे. लष्करात बायका, बटीक व कलावंतीण ठेवण्यास सक्त मनाई होती. जो हे सर्व बाळगील त्याची गर्दन मारली जात असे. (मुगली सैन्य या विरुद्ध - सोबत जनानखाना, कलावंतिणी, जवाहीर असे सर्व बाळगीत. युध्द हरण्यास हे सर्व कारणीभूत होई कारण पटापट हालचाल करता येत नसे. पुढे मराठ्यांनी हे सर्व बाळगायला सुरुवात केली. पानपतावरच्या मराठ्यांच्या पराभवास हे बाजरबुणगे व जनानखानाच कारण ठरले.) तसेच परमुलुखांत पोर, बायका धरण्यास मनाई होती. मर्द लोक सापडले तर धरावे, गाय धरू नये, बैल धरावा, ब्राम्हणांस उपद्रव देऊ नये तसेच खंडणी केलेल्या जागी ओळख म्हणून ब्राम्हण घेऊ नये असे नियम होते. (सभासद बखर)

सरनौबत, मुजुमदार यांची तैनात वराता अथवा हूडीने देत. लष्करास गाव मोकासा देण्याची पध्दत बंद केली. सर्व व्यवहार रोखीने होत. मोकासे दिल्याने रयतेस त्रास होतो, धारा नीट वसूल होत नाही म्हणून ती पद्धतच बंद केली. लढाईत जखमी झालेल्यांना जखमेप्रमाणे नेमणूक मिळे, मेलेल्यांना तैनात देण्यात येई.

महाराजांचे १३ मे, १६७१ चे एक पत्र:

"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा."

वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते.

मराठेशाहीत किल्ल्यांना फार महत्त्व होते. 'अखिल राज्याचे सार ते दुर्ग' अशी महाराजांची श्रध्दा असल्यामुळे त्यांनी नवीन किल्ले उभारणी, जुन्यांची डागडुजी यांवर विशेष लक्ष दिले. पण तेवढेच महत्त्व त्यांनी आरमारालाही दिले.
साधारण १६५७मध्ये कल्याण-भिवंडी घेतल्यावर स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली. मिठाचा व्यवहार इंग्रज, फ्रेंच करत होते. महाराजांना समुद्रावरपण सत्ता हवी होती. पण महाराजांजवळ लढाऊ गलबते कशी बांधायची ही माहिती नव्हती. तत्काळ त्यांनी पोर्तुगीजांशी संबंध प्रस्थापित केला. पोर्तुगीजांना सिद्दीचे भय होते. महाराजांनी त्याना भासविले की ते सिद्दीविरुद्ध लढा देणार आहेत. रुय लैतांव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस या लढाऊ जहाजे बांधणार्‍या शिल्पकारांसोबत महाराजांनी आपले निवडक कोळी धाडले व त्याकडून २० लढाऊ नौका तयार करून घेतल्या. महाराजांनी अशाच लोकांना पाठविले की ते नंतर स्वतःच अशा युध्दा नौका तयार करु शकतील. १६७५पर्यंत महाराजांकडे ४०० छोट्यामोठ्या युद्धनौका होत्या. सुरतेच्या दुसर्‍या स्वारीत महाराजांनी ही गलबते सुरत किनार्‍यावर आणली होती व लूट त्यावरून स्वराज्यात आणली.

ह्या घटनेवरून सहज लक्षात येईल की त्यांनी जमिनीबरोबरच समुद्रावर सत्ता स्थापन केली. एकदा प्रत्यक्ष मुंबईत, जिथे इंग्रजांची सत्ता होती तिथे महाराजांची मिठाची गलबते आली. इंग्रजांच्या आरमारापासून रक्षण करण्यासाठी महाराजांनी त्यांचे एक २५० टनी लढाऊ जहाज मुंबई बंदरात पाठविले, ह्या घटनेने इंग्रज हादरून गेले होते. १६५९ पूर्वी हेच इंग्रज महाराजांना 'बंडखोर', 'लुटारू' अशी विशेषणे लावीत पण १६५९ नंतर मात्र 'आमचा मित्र', 'आमचा शेजारी' ही विशेषणे त्यांच्यासाठी दिली गेली. राज्याभिषेकानंतर तर त्यांना ते पूर्वेकडील थोर मुत्सद्दी वाटू लागले!

लोकांसाठी चालविलेल्या ह्या राज्याची मुद्रा विशेष करुन अभ्यास करण्यासारखी आहे.

स्वराज्याची राजमुद्रा

प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||
शाहसुनो: शिवस्यैषा
मुद्रा भद्राय राजते ||

शिवाजी महाराजांच्या अंतकाळी त्यांचा दबदबा सर्वत्र पसरला होता. अर्धा कर्नाटक (तंजावरपासून जिंजीपर्यंत) स्वराज्यात आला होता. कुतुबशहाने तह केला, अदिलशाही नामशेष झाली, मोगलांनी भय घेतले. माळव्यात आणखी एक नवीन शिवाजी, या शिवाजीने उत्पन केला त्याचे नाव राजा छत्रसाल. सर्व बाजूने मोगलांना टक्कर देणार्‍या शिवाजीचे वर्णन उत्तरेतल्या कवीराज भूषणाने असे केले आहे..

'सजि चतुरंग बीररंगमे तुरंग चढि,
सरजा सिवाजी जंग जीतन चलत है!
भूषण भनत नाद बिहद नगारन के
नदी नद मद गैबरनके रलत है!!'

पुढे तो म्हणतो,

'भूषण भनत भाग्यो कासीपती विश्वनाथ,
और कौन गिनतीमें भूली गती भब की!
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि,
सिवाजी न होतो तो सुनति होत सब की!!

महाराजांच्या अंतकाळी संभाजीचा भरवसा महाराजांना राहिला नव्हता. राजाराम फार लहान होता. औरंगजेब स्वराज्यावर चालून येत होता, इंग्रज बळकट होत होते, तरीही महाराजांना आपले राज्य कधीच नष्ट होणार नाही याचा भरवसा होता. स्वराज्याची वॄद्धीच होईल असे त्यांचे शब्द होते, "मोडिले राज्य तिघे ब्राम्हण व तिघे मराठे सावरतील."
हे तिघे ब्राम्हण म्हणजे प्रल्हादपंत, रामचंद्र आणि निळोपंत आणि तिघे मराठे म्हणजे संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे आणि धनाजी जाधव. आणि महाराजांनी वर्तविल्याप्रमाणे या तिघांनीही आधी संभाजी, नंतर राजाराम व त्याही नंतर छत्रपती शाहूची साथ दिली व राज्य लावून धरले. ही निष्ठा पैदा होण्यास कारणच तसे होते कारण हा राजा नुसता राजा नव्हता तर 'जाणता राजा' होता.

स्वराज्याभिषेक होण्याआधी 'सरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहू घाव शिरी' लिहीणारे समर्थ 'स्वर्गींची लोटली जेथे राम गंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही आनंदवनभुवनी' लिहितात यातच शिवाजीच्या राज्याचे सार आहे.

संदर्भ:
मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५, संपादक: अ. रा कुलकर्णी, ग. ह. खरे
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे

-kedarjoshi