संवाद - कर्नल बकरे

मुलाखतकार : तृप्ती आवटी
शब्दांकन आणि देवनागरीकरण साहाय्य : अश्विनी शेवडे, वैशाली राजे

Sanju_Army_official_Photo_Bust.jpg
कर्नल संजीवनी बकरे यांच्याबद्दल प्रथम ऐकलं मायबोलीकर मृण्मयीकडून. आपल्या आईच्या पिढीतली एक मराठमोळी स्त्री अमेरिकी सैन्यात शल्यविशारद म्हणून काम करते, ही किती नवलाईची गोष्ट. परदेशगमन ही बाब आता माझ्या पिढीला अगदी किरकोळ वाटते. 'पहिल्या फळीतल्या' स्थलांतरितांना परदेशात बस्तान बसवताना आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेले मार्ग, आणि परदेशातील समाजजीवनात मिळून मिसळून जातानाही जपलेलं स्वत्त्व, यांच्या सुरस कथा वाचलेल्या - ऐकलेल्या असतात, पण त्या पिढीतल्या एका स्त्रीने सैन्यात जाणे, ही घटना मायबोलीकरांना 'युद्धस्य कथां'इतकीच रम्य आणि प्रेरणादायी ठरेल, म्हणून दिवाळी अंकासाठी त्यांचं मनोगत जाणून घ्यावं असं वाटलं. कर्नल बकरे यांच्याबरोबर रंगलेल्या या ऐसपैस गप्पा :

अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं - "माझं मराठी फारसं चांगलं नाही हं. मला नवर्‍याने शिकवलंय तेवढंच मराठी येतं."
खरंतर मुंबईतली आठ वर्षे वगळता उभं आयुष्य महाराष्ट्राबाहेर काढूनही डॉ. बकरे उत्तम मराठी बोलतात. संपूर्ण मुलाखत होईपर्यंत त्यांनी अगदी हट्टाने, आठवून आठवून मराठीच शब्द वापरले.


तुमच्या बालपणाविषयी, जडणघडणीविषयी माहिती करून घ्यायला आवडेल. लहानपण महाराष्ट्रातच गेलं का? घरातलं कोणी सैन्यात होतं का? तशा शिस्तीचे संस्कार कळत नकळत तेव्हाच तुमच्यावर झाले होते का?

कर्नल बकरे : माझा जन्म माझ्या आजोळी वर्ध्याला झाला. वयाची पहिली पाच वर्षे कराचीला गेली. मग १९४७ साली फाळणीची धामधूम सुरू झाल्यावर वडिलांनी भारतात यायचा निर्णय घेतला. मला अजूनही आठवते, सगळे जहाज परतीच्या वाटेला लागलेल्या भारतीयांनी खचाखच भरले होते. परत आल्यावर जवळजवळ नऊ महिने आम्ही नागपूरला आजोबांकडे होतो. वडिलांना नवी नोकरी मिळाल्यावर तिथून मग कोचीनला स्थलांतर केलं. माझं सगळं शिक्षण कोचीनला इंग्रजी माध्यमातून झालं. तिथे राहून मी मल्याळम् पण शिकले. वडील नौसेनेत होते, त्यामुळे आर्मी लाईफ जवळून पाहिलं होतं.

आजोबांकडे नागपूरला असताना हिंदू प्रशालेच्या मुख्याध्यापिकांकडून मी पहिल्यांदा मराठीचे धडे घेतले. लहानपणी माझी आजी रामायण-महाभारतातील, तसंच झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, यांच्या गोष्टी सांगायची. आर्मी माणसाला कशी शिस्त शिकवते याचं तिला फार अप्रूप होतं.

थोडी मोठी झाल्यावर मराठी मासिकं वाचायची गोडी लागली. आमच्याकडे किर्लोस्कर, वाङमयशोभा, अमृत अशी मासिके पोस्टाने येत. तेवढाच काय तो मराठीशी संपर्क. अगदी लहान असल्यापासून वाचल्याने असेल, पण मला अजूनही मासिके वाचायला फार आवडतात.

वडिलांसारखे नौसेनेत अथवा इतर सुरक्षा दलात न जाता डॉक्टर व्हायचे कसे ठरवलेत ?

कर्नल बकरे : माझे आजोबा - मोरेश्वर रामचंद्र चोळकर - हे ग्रँट महाविद्यालयाचे पदवीधर. त्यांनी १९०८-०९ साली तिथून एम्. बी. बी. एस्. ही पदवी घेतली होती. मला स्वत:ला आर्मी लाईफ आवडायचं, पण माझ्या आजोबांसारखं, आणि त्याच विद्यालयातून पदवी घेऊन डॉक्टर व्हायचं, असं माझं स्वप्न होतं. तिथे अ‍ॅडमिशन तर मिळाली. दुसरा मुख्य प्रश्न होता रहाण्याचा. तेव्हा मरीन ड्राईव्हवर ताराबाई वसतीकर म्हणून मुलींसाठी वसतीगृह चालवत. तिथे मला जागा मिळाली. त्यामुळे सगळंच सुकर झालं. ती आठ वर्षे मी महाराष्ट्रात काढली, त्यानंतर लगेचच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आले.

अमेरिकेत यायचा निर्णय कसा काय घेतलात? तेव्हा इथे आल्याचे तुमच्या कुटुंबावर काय पडसाद उमटले?

कर्नल बकरे : मला पिडिअ‍ॅट्रिक सर्जन व्हायचं होतं. वैद्यकक्षेत्र, समाजकार्य, परदेशगमन हे आमच्या घराण्यात नवीन नव्हतंच. माझ्या आजोबांच्या पिढीपासूनच त्याला सुरूवात झाली होती. माझ्या आजोबांचे बंधू हे एक धाडसी व्यक्तिमत्त्व होतं. संघाचे कट्टर कार्यकर्ते. त्यांनी नागपूरमध्ये अनाथ विद्यार्थीगृह सुरू केलं होतं. तिथे ते काका चोळकर म्हणून ओळखले जात. आजोबांचे त्याकाळी बहुसंख्य मुसलमान पेशंट असत. भारतात जेव्हा पहिली निवडणूक झाली, तेव्हा ह्या सर्व लोकांची अशी इच्छा की काकांनी त्यांचं प्रतिनिधीत्व करावं. त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढवली, आणि पुढे तीन वर्षे ते नागपूरचे मेयर होते.
आजोबांना प्रवासाची खूप आवड होती. त्यांनी त्यांच्या तरुणपणी युरोपचा प्रवास केला होता. त्यांनी फ्रेंच आर्मीसाठी पण काम केले होते. तिथून ते व्हिएन्नाला शल्यविशारद होण्यासाठी गेले. व्हिएन्ना म्हणजे वैद्यकशास्त्राची पंढरी समजली जायची. १९३९मधे जपानने चीनवर हल्ला केला तेव्हा चिनी सैन्याच्या मदतीला गेलेल्या डॉ. कोटनीसांबरोबर आजोबा चीनलाही गेले होते. तर मला नेहमी असे वाटते की माझ्यावर आजोबांची सावली पडली आहे. आणि आजोबांची फार इच्छा होती, की मी परदेशात राहून उच्च शिक्षण घ्यावे. अर्थात, शिक्षण संपल्यावर भारतात परत जावं अशी त्यांची अपेक्षा होती. आमच्या घरात एकूण धाडसी वृत्तीचे कौतुक होते. आणि आजोबांचा पाठिंबा असल्याने घरातून विरोध फारसा झाला नाही. रीतसर ECFMGची (Educational Commission for Foreign Medical Graduates) परीक्षा दिली आणि आले इथे. तेव्हा अमेरिकेत डॉक्टरांचा तुटवडा होता. माझ्या विद्यापीठाने तर इतर कागदपत्रांसोबत मला विमानाचं तिकीट पाठवलं होतं.

आता इतक्या वर्षांनी, इथे शिक्षण घेतल्यावर, तसेच दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केल्यावर, इथे येण्याचा निर्णय योग्य/अयोग्य होता असे वाटते का ?

कर्नल बकरे : इथे येण्याचा निर्णय योग्यच होता असे वाटते. तेव्हा इथे येऊन स्थायिक होईन असे नव्हते ठरवले, नक्कीच परत जायचे होते. मग मला अमृत (श्री. अमृत बकरे) भेटला. त्याने माझे बरेच मतपरिवर्तन केले. तो म्हणायचा की भारतात परत गेलो तर तिथल्या अनेक डॉक्टरांपैकी एक बनून राहू. त्यापेक्षा अमेरिकेत राहून आपल्या लोकांसाठी कितीतरी करण्यासारखं आहे. इथे भारतीयांमध्ये आणि एकूणच आपली वेगळी ओळख बनवता येईल. त्याने तसे कामही केले. १९६० मध्ये भारतातून आलेली आमची पिढी. तेव्हा सगळंच फार वेगळं होतं. तेव्हा शक्यतो उच्च शिक्षणासाठी म्हणून लोक येत. मग इथे येणार्‍या विद्यार्थ्यांची माहिती काढणे, त्यांना काही मदत हवी असल्यास करणे, इतरही अनेक कामे त्याने अनिवासी भारतीयांसाठी केली, अजूनही करतो.

इथे राहिल्यामुळे अर्थातच आपले लोक, आपली संस्कृती, आपली भाषा हे सगळे सुटले. सगळ्याच नव्या गोष्टींशी जमवून घ्यायचे होते. पण माझ्या बाबतीत कायमच महाराष्ट्राबाहेर राहिल्याने हा प्रवास सोपा झाला. आपण रहातो त्या जगात आपली मातृभाषा बोलणारी लोक नसायचीच, हे जणू गृहित धरले गेले. आपल्या घरी बनणारे पदार्थ फक्त आपल्याच घरी बनणार अशा गोष्टींचीही सवय होती. आता हेच बघ ना - केरळमधले लोक म्हणजे भात, नारळ आणि मासे असे समीकरण तर आपण वरण-भात लोक!

अमेरिकेतल्या वास्तव्यातला आठवणींत राहिलेला एखादा प्रसंग/आठवण सांगता येईल का ?

col_bakre2.jpg
कर्नल बकरे : एक प्रसंग असा नाही सांगता येणार. पण इथे पाऊल ठेवल्यापासून एक जाणीव जी आजपर्यंत साथ करत आलीये ती म्हणजे, भारतीय आहोत म्हणून मिळालेली असमान वागणूक. इथे आल्यापासून इतक्या लोकांबरोबर काम केले. पण एक गोष्ट नेहेमी जाणवली की आपल्याला इतरांपेक्षा अधिक कष्ट घेतल्याशिवाय, त्यांना 'आऊट परफॉर्म' केल्याशिवाय त्यांच्या बरोबरीचे स्थान मिळत नाही. It was not enough being as good but we had to outperform them to be treated equally. अजूनही कामाच्या ठिकाणी कुणा भारतीयाला बढती मिळाली, वरचे पद मिळाले की खूप आनंद होतो. ब्रिजच्या ग्रँड मास्टर्सची यादी झळकली की त्यात भारतीय नावं स्वत:च्याही नकळत शोधली जातात.

ह्यासंदर्भातली एक आठवण सांगते. इथे शिक्षण झाल्यावर मी चीफ रेसिडंटच्या पदासाठी अर्ज केला होता. पण विद्यापीठ मला त्या पदावर घ्यायला तयार होईना. कारण तोपर्यंत एकाही बाईने त्या पदावर काम केले नव्हते. त्यात मी तर अनिवासी भारतीय बाई! त्यांनी त्याऐवजी मला दुसर्‍या एका लहानशा हॉस्पिटलमध्ये चीफ रेसिडेंट म्हणून जागा देऊ केली. ती गोष्ट अर्थातच मनाला खूप लागून राहिली.

मला वाटतं हा सगळ्याच इमिग्रंट्सचा इतिहास आहे, माझाच असं नाही. त्यामुळे इमिग्रंट्सच्या पहिल्या पिढीशी तुम्ही बोललात, तर असं लक्षात येईल की या लोकांत जास्त कॉम्पिटिटीव्हनेस आहे. दुसर्‍या पिढीत तो हरवला आहे. दुसर्‍या पिढीतली मुले सगळ्या गोष्टी गृहित धरतात, त्यांना त्या सहज मिळतात.

आमची अमेरिकेत आलेली पिढी ही 'सेव्हन डॉलर जनरेशन' म्हणून ओळखली जाते. तेव्हा रुपयांचे डॉलर करणे सोपे नव्हते. सात रुपयांचा एक डॉलर होता. कायद्याने फक्त सात डॉलर्स आणायला परवानगी होती. विद्यापीठाने तिकिट पाठवले म्हणून येणे शक्य झाले. खिशात अवघे सात डॉलर्स घेऊन येणार्‍या असंख्य भारतीयांपैकी मी एक होते पण मला स्वत:ची ओळख निर्माण करायचे प्रोत्साहन अमृतने सतत दिले. आणि मी काही प्रमाणात यशस्वी झाले, असे मला वाटते. (हे सांगत असताना त्यांचा स्वर अर्थातच थोडा खुलतो.)

म्हणजे तुमच्या कामाची सुरुवात ही सिव्हिल डॉक्टर म्हणून झाली. मग सैन्यात जायचं कसं ठरलं?

कर्नल बकरे : अमेरिकेत मी रेग्युलर आर्मीत नाही. 'आर्मी रिझर्व' म्हणून एक प्रकार असतो. 'नागरी सैनिक' अशी ही कल्पना आहे. प्रत्येक नागरिक देशासाठी सैनिक होऊ शकतो. ही युरोपिअन संकल्पना आहे. स्वित्झर्लंडमध्ये आर्मीच नाही. प्रत्येकच नागरिक सैनिक! हा तसाच प्रकार आहे. तुम्ही तुमचा रिकामा वेळ आर्मी रिझर्व्ह किंवा 'नॅशनल गार्ड'साठी द्यायचा. आणि बोलावणं आलं तर 'रेग्युलर आर्मी क्रू'मध्ये कामाला जायचं. मी दर महिन्याला एक वीकएन्ड आणि प्रत्येक वर्षी दोन आठवडे या कामाला देते. ते तुमची बॅकग्राऊन्ड पाहतात. तिथे मी एक 'फिजिशियन' आहे, लढणारी सैनिक नाही.

तुम्ही लढाऊ सैनिक नसलात तरी सैन्यात म्हणून तुम्हाला काही प्रशिक्षण घ्यावं लागलं का?

कर्नल बकरे : हो, हो. ते तर घ्यावंच लागतं. युद्धकाळात तुम्हाला स्वतःचं आणि बाकीच्यांचं संरक्षण करता आलंच पाहिजे. त्यासाठी त्यांना तुम्हाला काही बेसिक ट्रेनिंग, म्हणजे बंदूक कशी वापरावी, स्टॅमिना कसा वाढवावा, दहा-पंधरा मैल चालत पाठीवर वजन वाहून नेणे.. हे असं सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग. पुन्हा वजन स्टँडर्ड ठेवणे. म्हणजे तुमची स्वतःशीच लढाई! आर्मीत असण्याचा हा एक प्रकारचा, आरोग्याच्या दृष्टीने फायदा मला जाणवला. पण अर्थातच हा दुय्यम आहे; मुख्यत: मला असं वाटत होतं की या देशानं माझ्यासाठी चांगलं काही केलं आहे, तर आपण परतफेड म्हणून हे करावं.

हा खूप उदात्त विचार आहे. तुम्हाला किती वर्षं झाली आर्मी जॉईन करून?

कर्नल बकरे : मी खूप उशीरा, म्हणजे ९०च्या दशकाच्या सुरुवातीला जॉईन केली. पण एक 'सैनिक' म्हणून नसल्यामुळे त्यांनी माझी विनंती मान्य केली. लढणारे सैनिक म्हणून जायचं असेल, तर ते विशीतल्या लोकांना प्राधान्य देतात. विशीत जॉईन करून पन्नासाव्या वर्षी निवृत्ती.

जॉईन केल्यापासून तुम्हाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याचा प्रसंग कधी आला का?

कर्नल बकरे : युद्धभूमीवर - म्हणजे जेव्हा आम्ही इराकमध्ये होतो तेव्हा पण - आम्हाला सुमारे एक हजार वाहनांच्या ताफ्यातून जावे लागे. हा एक अविस्मरणीय अनुभव आहे... एकदा आमच्या जीपचं टायर पंक्चर झालं. त्यामुळे जी व्यक्ती या हजारांच्या ताफ्याची प्रमुख होती तिच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली, की बाकी नऊशे नव्याण्णव वाहनांसाठी एका वाहनाचा बळी द्यावा की काय.. मग बाकीचे पुढे गेले आणि आमच्या संरक्षणासाठी चार सैनिकांसह एक रणगाडा पाठवला. मग आम्ही टायर बदललं. आम्ही चौघे मेडिकल पेशातलेच जीपमध्ये होतो. जीप चालवणारा सोडला तर बाकीच्यांना लगेच 'सैनिक' बनावे लागे. प्रत्येकाकडे बंदुका होत्या. बंदुका काढणे, त्या फायरिंगसाठी तयार ठेवणे, टायरवर काम करणार्‍या लोकांभोवती कोंडाळं करून त्यांना संरक्षण देणे ही जबाबदारीच. समजा हल्ला झालाच, तर तुमच्यासाठी नाही पण तुमच्या ग्रूपच्या संरक्षणासाठी हल्लेखोरांना गोळ्या घालणे हे तुमचे कामच. टायर बदलतानाचे ते दोन तास हा युद्धभूमीवरचा खरा अनुभव होता. तिथे वाळवंटात अक्षरश: कोणीही नव्हतं. आर्मीने जो रस्ता काढला होता तो नकाशातसुद्धा नव्हता. Hartaj वर हल्ला करण्यासाठी आर्मीने तयार केलेला तो एक गुप्त रस्ता होता.

तुम्ही मघाशी म्हणालात, की आजोबांचा धाडसी स्वभाव तुमच्यामध्ये आला आहे, तर या प्रसंगी तुम्हाला नक्की कसं वाटलं? म्हणजे भीती वाटली, ताण आला, की वाटलं, येस, यासाठीच आपण आर्मी जॉईन केली'?

कर्नल बकरे : असं नाही वाटलं. पण हा एक तणावाचा प्रसंग होता. मी कधी विसरू शकणार नाही. बाकीच्या वेळी काय होतं, तुम्ही मेडिकल क्रू असल्याने आर्मी तुम्हाला जास्त संरक्षण देते कारण जखमी सैनिक तुमच्याकडे मदतीसाठी येतात. या सैनिकांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, याची काळजी आर्मी घेते. यामुळे तुम्हाला काही अंतरावर बंदुकीच्या फैरींचा आवाज येईल, पण प्रत्यक्षात कधी लढाईत भाग घेण्याची वेळ येत नाही. अर्थात अतिरेकी मानवी बॉम्ब येऊन तुमचा कँप उडवून लावू शकतात. अशाच प्रकारे गेल्या सहा वर्षांत तीन मुली, केवळ तिथे होत्या म्हणून मृत्यू पावल्या. अतिरेकी कँपमध्ये आले आणि स्वतःसह तिथे असलेल्या सर्वांना उडवले.

माझा नवरा पूर्वी मला चिडवत असे की तू आर्मी जॉईन केल्यावर अमेरिका युद्ध सुरू करणार, तेव्हा तू जॉईन करू नको. योगायोगाने तेच खरं झालं. मी जॉईन केल्यावर एका महिन्यात अमेरिकेने इराकशी युद्ध पुकारलं. त्याआधीच्या युद्धात मी न जाण्याचं एकमेव कारण म्हणजे माझे पेपर्स अजून नवीन होते. प्रोसेस झाले नव्हते. त्या युद्धात (पहिलं आखाती युद्ध) एक मद्दीवार म्हणून मराठी सैनिक होते, ज्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे. मी असताना कोणी मराठी लोक तिथे मला भेटले नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मराठी डॉक्टर्स आहेत आर्मीत.

सर्जरी आणि आर्मी - ही दोन्ही क्षेत्रं पुरुषप्रधान समजली जातात, तर त्या दृष्टीने तुमचे अनुभव कसे होते काम करताना?

कर्नल बकरे : जो अनुभव इमिग्रंट म्हणून, तोच स्त्री म्हणूनही. त्या क्षेत्रात शिरकाव करून तुमची कुवत दाखवून देणं हा कठीण भाग. एकदा जॉईन केल्यावर काही प्रॉब्लेम नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेतले बरेचसे लोक एखाद्याची कुवत मान्य करतात. प्रत्येक क्षेत्रातच निष्णांत लोकांची गरज असते. एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध केलंत, की भारतापेक्षा इथे जास्त चांगली परिस्थिती आहे.

या सर्व कसोट्यांना उतरताना तुमच्या बॅकग्राऊंडचा किती आणि कसा फायदा झाला?

कर्नल बकरे : 'कॉमनवेल्थ' देशाचा फायदा म्हणून कॉन्व्हेन्टमध्ये इंग्रजीतून शिक्षण झालं होतं. इंग्रजी संभाषणात कसली अडचण नव्हती. याचा मला मोठा फायदा झाला. इतर लोकांना थोडं जास्त स्ट्रगल करावं लागलं असेल पण मला या देशातल्या लोकांशी कोणत्याही लेव्हलवर बोलणं सहज वाटलं. पेशन्ट, नर्स यांच्याशी बोलताना त्यांच्या अडचणींबद्दल त्यांना समजेल अशा भाषेत बोलावे लागते. या गोष्टी मला सहज जमल्या, म्हणजे डायग्नॉसिस इतके सहज जमले नसेल पण पेशन्टचा विश्वास मिळवणं सहज जमलं.

चांगलं करियर केलेल्या स्त्रियांना नेहमी विचारला जाणाराच एक प्रश्न विचारते, कुटुंब आणि काम यात समतोल कसा साधला?

कर्नल बकरे : सुरुवातीला थोडं कठीण वाटलं. इथे ठराविक आर्थिक स्थैर्य येईपर्यंत घरातली सगळीच कामं स्वतः करावी लागतात. भारतात तसं नसतं. घर चालवणं, घरातली लहानमोठी कामं अंगावर घेऊन करणं, याची आधी मला फारशी सवय नव्हती. पण शिकत गेले, हळूहळू सवय झाली. लग्नानंतरचं पहिलंच वर्षं हे ट्रान्झिशनचं म्हणून फार महत्त्वाचं होतं. पण तेव्हा आम्ही दोघेच होतो त्यामुळे काम आणि घर सांभाळणं मोठं आव्हान नव्हतं. पण तुमच्यासारख्या लोकांचं मला या बाबतीत जास्त कौतुक वाटतं, परदेशात येऊन घर, नोकरी सांभाळता याचं.

कामाच्या स्वरूपाचा लाईफस्टाईलवर कसा परिणाम झाला?

कर्नल बकरे : एकच परिणाम म्हणजे - कामाच्या वेळा अनिश्चित असल्यामुळे कधीतरी झालेले वाद. पण वेळांवर माझं खरोखरच काही नियंत्रण नव्हतं. एकदा तर दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशीर केला होता मी नवर्‍याला भेटायला - तो ही नवीन नवीन लग्न झाल्याच्या काळात. अर्थात या गोष्टी हळूहळू अंगवळणी पडत जातात.


कामाचं स्वरूप आणि संसार याबद्दल तुम्ही एकमेकांना कसं समजावलं?

कर्नल बकरे : आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये भेटलो. तो अभ्यासासाठी आला होता आणि आमचे कॉमन नातलग, मित्र होते. लग्न करण्याचं ठरवण्यापूर्वी एक वर्षभर तरी आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्ही बर्‍याच गोष्टींबद्दल बोललो. मी भारतात असते तर एका आठवड्यात मी एका व्यक्तीला भेटले असते आणि दुसर्‍या आठवड्यात लग्नपत्रिका निघाल्या असत्या. इथे तुम्ही विचार करून निर्णय घेऊ शकता की हे योग्य होईल की नाही. आता तुम्हाला हे माहीत आहे का मला माहीत नाही - पण भारतातून येणार्‍या डॉक्टर्समध्ये इथे घटस्फोटाचे प्रमाण खूप जास्त आहे.

असं? का बरं?

कर्नल बकरे : १९७० च्या दशकात भारतीय वृत्तपत्रांत याबद्दल आलं होतं. नवरा-बायको दोघेही डॉक्टर असतील, तर त्यांच्या संसारात खूप तणाव असतो आणि घटस्फोटाचं प्रमाण जास्त होतं. एक कारण म्हणजे अ‍ॅरेन्जड मॅरेज - जिथे एक डॉक्टर इथे येणार्‍या दुसर्‍या डॉक्टरशी लग्न करतो तो इथे येण्याचा मार्ग म्हणून. अर्थात भारत सोडून इथे आल्यावर दोन्हीकडे काही वेगळ्या अपेक्षा निर्माण होतात आणि तणाव निर्माण होतो. मी लेटेस्ट पेपर्स पाहिलेले नाहीत, पण ही सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे. आता कदाचित प्रमाण कमी झाले असेल पण गॅप आहेच. फार थोडे लोक समजूतदारपणे इथल्या वेगळ्या आयुष्याला सामोरं जातात. बाकीचे अगदी इस्त्री स्वतःला करावी लागते याची तक्रार करतील, ही कामे बायकोने करावीत अशी अपेक्षा करणारे काही लोक माझ्या माहितीत आहेत. याला सगळा समाजच जबाबदार आहे. मला अजून आठवतं, माझे आई-वडील माझ्याकडे पहिल्यांदा रहायला आले, तेव्हा आम्ही आमच्या कामांची विभागणी केलेली असायची. मी स्वयंपाक करायचा, भांडी त्याने धुवायची. तर माझ्या आईला ते बघून कसंतरीच वाटायचं. "जावयाला भांडी धुताना बघून मला बरं नाही वाटत," म्हणून ती भांडी घासायची. मग मला राग यायचा, मग मी म्हटलं माझ्यासाठी स्वयंपाकही कर. पण म्हणाली, "मी करेन, पण मला माहीत नाही कुठलं काय ते." मग तर मी म्हटलं, "stay out of the kitchen."

It's a cultural thing. हे चॅलेंजिंग होतं सुरुवातीला. लग्न हे आव्हान नव्हतं, पण वेगळ्या संस्कृतीतून आलेल्या अपेक्षा तुमच्यासोबत राहतात. सर्जरीच्या कामापेक्षा हे मोठं आव्हान होतं कारण कामाच्या ठिकाणी ठराविक हायरार्की असते. आर्मीतही कोणी कोणाला रिपोर्ट करायचं हे ठरलेलं असतं. पण जेव्हा दोन लोक एकत्र राहतात, तेव्हा हे एक आव्हान होतं. तुम्ही सतत नवीन गोष्ट शिकत जाता. म्हणून मला 'ब्रिज' खेळ आवडतो. तिथे दोन लोकांनी एकमेकाला समजून घेऊन प्रतिस्पर्ध्याचा पराभव करायचा असतो. नियम समान असतात पण एकमेकांशी ते कशा प्रकारे संवाद साधतात यावर रिझल्ट अवलंबून असतो. So that is a good exercise, एकमेकांबरोबर सुसंवाद साधून रहायला शिकणं.

थोडं तुमच्या आजींविषयी बोलूया. लक्ष्मीबाई केळकर या 'राष्ट्रसेविका समिती'च्या संस्थापिका म्हणून त्यांच्याविषयी माहिती आहे, पण 'आजी' म्हणून तुम्हाला त्यांचा सहवास कितपत लाभला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काही सांगता येईल का?

कर्नल बकरे : 'शिस्त' म्हणजे काय हे मावशी केळकरांकडून शिकावं. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला कधी शिस्त नाही लावली. वडिलांचे वडील डॉक्टर होते. ते, आणि आईची आई, यांनी आम्हाला शिस्त लावली. मावशी केळकर येणार असल्या की माझी आई सगळं घर स्वच्छ करून घ्यायची की जसे प्रेसिडेन्ट्च येणार आहेत. मावशींचे डोळे फार तीक्ष्ण होते. आपल्या हाताखाली काम करणार्‍यांशी कसं वागावं, ही एक गोष्ट मी आईकडून शिकले आणि आई मावशी केळकरांकडून. आम्ही केरळात रहात असताना आई नोकरांशी बोलता यावं, म्हणून मल्याळम् भाषा शिकली होती. मावशींची शिस्त कडक खरी, पण आम्हां नातवंडाचे लाड करत. आम्हाला झोपायच्या आधी गोष्टी सांगायच्या. स्वच्छता आणि टापटीपही त्यांच्याकडून शिकावी. तसंच वेळेचं नियोजनही. ते माझं आदर्शस्थानच होतं एक.

मग कधी असं वाटलं का, की त्यांची विचारधारा पुढे न्यावी किंवा इथे अमेरिकेत पण आर. एस्. एस्. चं काम चालतं बरंच, त्यातही तुमचा सहभाग आहे का?

कर्नल बकरे : खरंतर सध्या अगदी सक्रीय सहभाग नाही. नोकरीत बिझी असल्यामुळे मनात असूनही हे काम करता येत नाही. निवृत्तीनंतर वेळ देता येईल अशी आशा आहे.
विचारांचा आणि कामाचा वारसा तर मावशी, आईवडील, सर्वांकडूनच आहे. माझे वडील नेव्हीतून निवृत्त झाल्यावर ते आणि आई नागपूरमध्ये 'शक्तिपीठ' म्हणून एक संस्था आहे तिचं काम पहायचे. लोकल पेपरमध्ये माझ्या आईबद्दल एक लेखही आला होता 'ती शक्तिपीठाचा आधार आहे' म्हणून. समाजासाठी गरज पडेल तेव्हा पडेल ते काम करायची दोघांचीही तयारी असे.

आता इतके वर्षांनी तुमची भारताशी, महाराष्ट्राशी कितपत नाळ जोडलेली आहे?

कर्नल बकरे : आई होती तोपर्यंत मी दरवर्षी जायचे, पण आता गेली चार वर्षं गेले नाहीये.

तुम्ही दिवाळी, आपले इतर सणवार वगैरे साजरे करता का इथे?

कर्नल बकरे : हो, आमच्या घरी मी सगळ्यांत धार्मिक. आमच्याकडे दर वर्षी गणपती होतो. आणि मी फारसा स्वयंपाक करू शकत नाही पण उकडीचे मोदक करता येतात. अमेरिकन सण थॅन्क्सगिव्हिंग मला आवडतो, माझ्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. जसं आपल्याकडे सत्यनारायण आहे तसं. वर्षातून एकदा आम्ही सत्यनारायण करतो. दिवाळी करते, पण दिवाळीचा खरा आनंद आपली माणसं जवळ असण्यावर अवलंबून आहे. पूर्वी सगळी भावंड एकत्र यायची, मोठा सण व्हायचा. आता सगळे लांब गेले आहेत. असो.

तुम्हा मायबोलीकरांना दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त आमच्या मायबोलीकरांशी हा संवाद साधल्याबद्दल आपले मनापासून आभार.