ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे: एक हृद्य भेट !!!

भीमरावांची आशयप्रधान गायकी गझलेतल्या आशयाला हृदयापर्यंत सहज पोचवते. आशयाला केंद्रस्थानी आणि संगीताला दुय्यम ठेवून गायकी साकार करायची, म्हणजे गायकीचा भार न होऊ देता शब्दांतील आशयाला स्वरांचं कोंदण देणारी खास अशी गायनशैली लागते, जी भीमरावांजवळ आहे अन् ते खरं अप्रूप आहे! या गायकीला रसिकांची भरभरुन दाद मिळाली आहे, रसिकाश्रय मिळालाय!!!

border2.JPG

ला कविता अन् कवितेतलं गाणं समजायला केव्हा सुरुवात झाली, ते आता आठवत नाही. भावगीतांवर पोसलेल्या पिढीचा एक पाईक म्हणून मीही ज्याला 'लाईट म्युझिक' असं काहीसं संबोधलं जातं तिथनंच बहुधा सुरुवात केली असावी. आईची भजनं अन् तिचं संगीतावरचं प्रचंड आणि निरागस प्रेम हे उत्प्रेरकाचं काम करायचं हेही सांगायला हवंच!

आतापर्यंतच्या प्रवासात तसं खूप ऐकून झालं. काही अवीट गोडीच्या मैफिली अजूनही याद आहेत. गाणं वेगवेगळ्या अंगानं भेटत गेलं अन् कान सफाईने सगळं ऐकायला-साठवायला लागले. पण या सगळ्या प्रवासात मला अगदी जवळचं वाटून गेलेल गाणं कुठलं असं जर कोणी विचारलं तर मात्र माझं तत्पर उत्तर असेल : भीमरावांची गझल!! भीमरावांच्या गाण्याशी माझी पहिली ओळख नागपुरातली... एका मैत्रिणीनं 'हे ऐकून बघ' म्हणून दिलेली भीमरावांची कॅसेट ऐकून मी पार भारावून गेलो होतो. तोपर्यंत मेहदी हसन अन् गुलाम अली ऐकण्यातच वेळ जाई. पण हा आवाज अगदी 'आपला' वाटून गेला. मला वाटतं, ती कॅसेट होती 'एक जखम सुगंधी' अन् लिहिणारे बहुतांश आमच्या विदर्भातलेच; त्यात इलाही जमादारांची जीवघेणी 'अंदाज आरशाचा', संगीता जोशींची 'आयुष्य तेच आहे', नीता भिसे यांची 'मी किनारें सरकतांना पाहिले', म. भा. चव्हाणांची 'तुझा तसाच गोडवा..' अन् भटसाहेबांची 'तू नभातले तारें माळलेस...' अश्या एकाहून एक सरस गझलांचा खजिना होता. नंतर मी भीमरावांचं मिळेल ते अन् मिळेल तसं सगळं गाणं ऐकत गेलो. प्लास्टिकच्या कॅसेटच्या त्या जमान्यात त्या मिळवणं, हाही एक विशेष प्रयास असायचा. या कॅसेट्स् घरात सगळे सारख्याच आवडीनं ऐकत. या गझला ऐकत मी गाडीनं खूप भटकलोय. गाडीत भीमरावांचं गाणं अन् मैलोन् मैल ड्राईव्ह हा माझा त्याकाळचा आवडता उपद्व्याप होता. भीमरावांची गायनशैली एक प्रचंड आपलेपणा घेऊन येते. अन् आवाजातली नजाकत तर क्या बात है... ( व्वा..क्या आवाज बक्शी है खुदाने ! क्या अंदाज है गानेका... इति दस्तुरखुद्द गुलाम अली!!!). भीमरावांची गाण्यासाठी योग्य अशा गझलांची निवड हाही त्यांच्या यशाचा मोठा भाग आहे. गझलेतल्या भावना आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची जी संगीताची अवर्णनीय व्यूहरचना असते, ती लाजवाब अन् म्हणूनच मी म्हणालो - मला अगदी जवळच वाटून गेलेल गाणं कुठलं तर नि:संशय भीमरावांचंच!

bpl1_0.jpg

देश सुटल्यापासून भीमरावांचं गाणंही मागेच राहून गेलेलं. कामाच्या व्यापात ज्या खूप सार्‍या गोष्टी मागे पडल्या त्यात गाणं होतं! काही दिवसांपूर्वी देशात असताना अचानक, का कुणास ठाऊक, गाडीत गुलाम अली ऐकताना भीमरावांच्या गझलेची आठवण झाली. मग कुठे मिळणार म्हणून मित्रांना फोनाफोनी झाली पण त्यांचं सगळं गाणं एका ठिकाणी मिळणं जरा मुश्किल, असं सगळ्यांचं मत. मग कसातरी भीमरावांचा फोन नंबर मिळवला अन त्यांनाच फोन लावला.... माझी प्राथमिक माहिती अन् फोनचं कारण सांगितलं... अन् काय विचारता? " माझ्या घरीच या... माझ्याजवळ सगळी जरी नसली तरी एकत्र केलेलं असं काही आहे... त्याची कॉपी मी देऊ शकतो....!!" असं उत्तर मिळालं. आता हे ऐकून मी हरखून गेलो. हा गझलगंधर्व स्वतःहून मला दान द्यायचं म्हणत होता. मी दक्षिण मुंबईत होतो आणि दुसर्‍या दिवशी सकाळच्या विमानाने निघणार होतो. हे ऐकल्यावर तर 'तीनला यायला जमत असेल तर या. मग तुमच्याशी बोलून मी विद्यापीठात व्याखानाला निघेन...' असा प्रस्ताव आला. मी एका सेकंदात 'हो' म्हटलं. मला संधी घालवायची नव्हतीच नव्हती. माझ्या पुढच्या भेटी शफल करायला ऑफिसात सांगितलं अन् दिलेल्या वेळेवर गझलनवाजांकडे पोहचण्यासाठी बोरिवलीकडे प्रयाण केलंही.

घर शोधायला फार वेळ लागला नाही, इतका पत्ता नीट दिलेला होता. दार स्वतः भीमरावांनीच उघडलं. एक प्रसन्न हास्य अन् तो जानलेवा आवाज..."या, या... ". मी सोफ्यावर टेकलो अन् चौफेर नजर फिरवली. सगळं घर मैफिलींचे फोटो-ट्रॉफीज्-मानपत्रं-वगैरेंच्या खजिन्यानं भरलेलं होत. "मी आजकाल कॉम्प्युटरशीही दोस्ती केली आहे...", हे सांगतानाच्या त्यांच्या निर्मळ हसण्यातनं त्यांच्यातला भला माणूस डोकावत होता.

भीमरावांची बहुधा विद्यापीठात गझलेवर द्यायच्या व्याख्यानाची तयारी चालली असावी. त्यांनी ते सगळं बाजूला ठेवलं अन् माझ्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. मी कसा मैलोन् मैल त्यांचं गाणं ऐकत गाडी चालवली आहे, माझी नागपूरशी असलेली नाळ, अकोल्याशी नातं असलेली बायको, त्यांनी काम केलेल्या एसबीआयशी असलेला माझा संबंध - असं सगळं अगदी लहान मुलाच्या तन्मयतेनं मी त्यांना सांगत गेलो अन् तेही तितक्याच हौसेनं ऐकत होते. पण मला पटकन मूळ मुद्द्यावर यायचं होतं... त्यांना ऐकायचं होतं. मी देशाबाहेर असतो, हे ऐकून मग विषय भीमरावांच्या परदेशदौर्‍यांवर आला. अमेरिका-युरोप-मिडल ईस्ट सगळीकडेच भीमरावांचे गझलगायनाचे कार्यक्रम झालेयत. हाँगकाँग मात्र राहिलंय हे ऐकून माझ्या मनाला रुखरुख लागून राहिली. (आता तिथल्या महाराष्ट्र मंडळातल्या मित्रांना लिहायला हवं...) ते स्विट्झर्लंडला गेलेले असतानाचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. झुरीखला दोन तासांसाठी कार्यक्रम होता. संपला तेव्हा चार तास झालेले अन् तरीही रसिक जायचं नाव घेईनात. संगत करणारेही थकलेले म्हणून मग आटोपतं घ्यावं लागलं.. भीमरावांना एकूणच स्विट्झर्लंड आवडलेलं दिसत होतं. त्यावरही बोलणं झालं. असल्या असंख्य मैफिलींद्वारे असंख्य लोकांची हृदयं काबीज करणार्‍या गवयाला 'गझलनवाज़' ही उपाधी मिळाली मराठी गझलचे बादशहा सुरेश भटांकडून! "गझल कशी गावी हे कुणी मला विचारलं तर मी भीमरावकडे बोट दाखवीन. आज तुम्हां रसिकांच्या साक्षीने मी त्याला उपाधी देतो आहे - गझलनवाज़!" इति भटसाहेब आणि स्थळ पार्ल्याचं दीनानाथ मंगेशकर सभागृह!

bpl2_0.jpg

गझलनवाज भीमराव पांचाळे हे नाव आता देश-विदेशात माहीत झालंय. हजारो-लाखो चाहते आहेत, पण तरी हा माणूस अगदी साधा! त्यांचं अदबशीर वागणं पाहिल्यावर 'Humility is the best aspect of one's confidence' हे माझ्या वडलांचं वाक्य भीमरावांना भेटल्यावरच लिहिलं असावं, असं मानायला भरपूर वाव आहे. अमरावतीचे पं. भैय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे पं. एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचं शिक्षण. सोबत वाणिज्य शाखेची आणि मराठी -हिंदी साहित्य, संगीत यांतील पदव्या, उर्दू भाषेचा जोरदार अभ्यास, पुढे बँकेत नोकरी, असा भीमरावांचा जीवनक्रम! "ज्या दिवशी मी नोकरी सोडली त्यादिवशी खूप खूष झालो होतो...", असं जेव्हा भीमराव म्हणाले तेव्हा मी त्यांच्याकडे अजून रोखून बघायला लागलो. (मलाही एक दिवस ती सोडायची आहे, म्हणून!)

भीमरावांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायनप्रकार सादर केले. पण १९७२ साल त्यांच्या आयुष्यातला एक चिरंजीव रोमान्स घेऊन आले... त्याच वर्षी त्यांनी गझलगायन मैफिलींना सुरुवात केली. गेल्या सदतीस वर्षांपासून हा 'गझल एके गझल' असा प्रवास अव्याहत सुरू आहे! मराठी व उर्दू गझल एकाच मंचावरुन पेश करुन भीमरावांनी एक वेगळाच भाषासमन्वय साधलाय. याहूनही सगळ्यांत भावणारी गोष्ट म्हणजे अनेक नव्या-अप्रकाशित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध करुन लोकप्रियही केल्या आहेत! याद्वारे गझलेचा जगभर मोठ्ठा चाहतावर्ग निर्माण व्हायला मोठा हातभार लागलाय, हे सांगायला नकोच. भीमरावांचे असेच एक चाहते श्री. पु ल. देशपांडे त्यांच्या गझलगायनाबद्दल म्हणतात, "भीमरावांच्या गाण्यात शब्द अन् सूर एकमेकांना अलिंगन देऊन लयीत चालतात... व्वा भीमराव... असेच गात रहा!!"

bpl3_0.jpg

गझल कशाला म्हणायचं, असे तांत्रिक प्रश्न मी कधीही स्वतःला पडू दिले नाहीत. कारण मी भीमरावांची गझल ऐकून होतो. शेवटी गझल कशाला म्हणायचं, ते प्रत्येकाच्या जाणिवा ठरवतात. गझल म्हणजे सुरावटीतून उलगडत जाणारे स्वर की स्वरांतून आंदोलित होणार्‍या रेशमी भावना? की मदालसेचं उत्कट रूप म्हणजे गझल? ... गझलेचं रूप शोधता शोधता ती भेटते... गझलनवाजांच्या गायनात!

भीमरावांची आशयप्रधान गायकी गझलेतल्या आशयाला हृदयापर्यंत सहज पोचवते. आशयाला केंद्रस्थानी आणि संगीताला दुय्यम ठेवून गायकी साकार करायची, म्हणजे गायकीचा भार न होऊ देता शब्दांतील आशयाला स्वरांचं कोंदण देणारी खास अशी गायनशैली लागते, जी भीमरावांजवळ आहे अन् ते खरं अप्रूप आहे! या गायकीला रसिकांची भरभरुन दाद मिळाली आहे, रसिकाश्रय मिळालाय!!! एकाहून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं भीमरावांच्या गायकीची फॅन आहेत. व.पु.काळे ( 'एका अत्यंत एकाकी अन उदास संध्याकाळी तुमचं प्रसन्न गाणं ऐकायला मिळालं अन उदासीनतेतही उत्सव साजरा करायला शिकलो!'), निळू फुले ( 'भीमरावांच्या गझलेने आयुष्यात अनेक सुखद क्षण निर्माण केले'), चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजदत्त ( 'भीमरावांच्या गझलेतनं आपलं जगणं आपण घेत असतो') अन् बाबा आमटे ('स्वानंदाने फुलून डुलणे हा तुमच्या गझलगायकीचा धर्म.. स्निग्ध हृदयीचे छंद मुक्तपणे गाणार्‍या तुमच्या गायकीने मनावर मोहिनी घातली...') अशा दिग्गज माणसांनी गौरवलेली ही गायकी महाराष्ट्राचं-मराठीचं एक मोठ्ठं भूषण आहे!

bpl4_0.jpg

मी भीमरावांशी बोलताना हे सगळं साठवत होतो. या माणसानं काय काय केलंय. गेल्या बत्तीस वर्षांत शेकडो मैफिली केल्या आहेत, अनेक कॅसेट्स्-सीडीज्, नाटकं, टेलीफिल्म्स्, मालिका अन् चित्रपटांचं संगीत दिग्दर्शनही! यातनं वेळ काढून साहाय्यार्थ मैफिलीही ... मग ते चंद्रपूर असो की बदलापूर, धुळे असो की वर्धा, सगळीकडे मदतीचा हात फिरलाय.

भीमरावांच्या गायनासारखाच त्यांचा आदरातिथ्याचा बाजही लाघवी. पण भीमरावांना विद्यापीठात व्याख्यान होतं, त्यामुळे कितीही इच्छा असली तरी निघावं लागणार होतं. घरात दुसरं कोणी नसल्यामुळे आमच्या गप्पा रंगल्या होत्या. मी तर त्यांच्याशी बोलण्यातच रमलो होतो. सौ. पांचाळेही बँकेत नोकरी करतात. (त्याही शास्त्रीय संगीतात पारंगत आहेत.) त्यामुळे त्या घरात नव्हत्या. अन् मुलगी गाणं अन फिलॉसॉफी शिकतेय. 'तीही उत्तम गात असणारच' या माझ्या वाक्यावर भीमराव छानसं हसले! पुढल्या वेळी सहपरिवार मैफल जमवायचीच, हे ठरवून आम्ही बरोबरच निघू म्हणून उठलो.

मी परतीच्या प्रवासात या एका जगावेगळ्या माणसाला भेटल्याचं समाधान पदरी घेऊन जात होतो. सोबत होत्या त्यांनी स्वाक्षरी करुन दिलेल्या त्यांच्या गझलांच्या सीडीज्..! तो एक खजिना आता मी जपणार आहे. आयुष्यात तुम्हांला अनेक भेटी मिळतात... पण अशी कधीच परतफेड न करता येणारी भेट आज मला त्या शंभर गझलांच्या स्वरूपात मिळाली होती अन् मी विचार करत होतो मी कसं वर्णन करेन या अवलियाचं? ज्याचं आयुष्यच 'श्वास गझल, नि:श्वास गझल....जगण्याचा विश्वास गझल..' असं झालंय त्याला समर्पक शब्दांत कसं उभं करणार? नटवर्य यशवंत दत्त भीमरावांबद्दल छान बोलून गेले आहेत. ते म्हणतात, "ग़म या शब्दाखाली नुक्ता नसेल ना तर त्या ग़मला काही किंमत रहात नाही... भीमरावांचं गझलमधील महत्त्व त्या नुक्त्यासारखं आहे!!!"
आदाब!!!

- गिरीश कुलकर्णी

Taxonomy upgrade extras: