...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे. परीक्षेचा अभ्यास असो, सुट्टीतले कार्यक्रम असोत, इतर काही मौजमजा अथवा अडीअडचणी असोत किंवा एखाद्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो, त्यांच्या एकमेकांशी सल्लामसलत-गप्पा-गुजगोष्टी या ठरलेल्या असायच्या. बरं, ती त्याला सोडून आमच्यात मिसळायची नाही म्हणावं, तर तेही नाही. ग्रूपच्या धमाल मस्तीत कायम हजर असायची, कॉलेजच्या सगळ्या उपक्रमांमध्येही पुढे असायची. हे कॉलेज सोडून त्या मुलाच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यावी किंवा त्याच्या मागे लागून त्याला इकडे अ‍ॅडमिशन घ्यायला लावावी, असंही कधी तिच्या बोलण्यात आलं नाही. आम्हांला त्यांच्या या मैत्रीचं खूप अप्रूप वाटायचं आणि अभिमानही वाटायचा की, आपल्याला नाही तर नाही, किमान आपल्यातल्या एका मैत्रिणीला तरी असा एक सख्खा, निखळ नात्याचा ‘मित्र’ आहे.

कॉलेजवयीन मंडळींत जोड्या जुळवण्याचं अजून एक फॅड असतं. तर या दोघांबद्दल तसंही कधी आमच्या मनात आलं नाही, जाणवलं नाही. आणि थर्ड इयरला असताना अचानक एक दिवस कळलं की, त्या मुलानं तिला प्रपोझ केलं. ऐकून जरा आश्चर्यच वाटलं. आम्ही मुलीमुलींनी आपापसांत असंही म्हणून घेतलं की, सगळी मुलं शेवटी असलीच, मुलींकडे निखळ मैत्रीच्या नजरेनं यांना पाहायला जमतच नाही कधी, वगैरे वगैरे. तिनं त्या मुलाला काय आणि कसं उत्तर दिलं, हे मात्र अजून गुलदस्त्यात होतं. आम्हांला खात्री होती की, ती ‘नाही’ म्हणणार. पण विचार करायला तीनचार दिवस मागून घेऊन अखेर तिनंही त्याला होकार दिला की! हे ऐकून मात्र आम्ही तीनताड उडालोच. तिच्या घरी तडकाफडकी आमची एक बैठक झाली. तिनं अगदी दिलखुलासपणे आणि हर्षभरल्या चेहर्‍यानं प्रपोझलची, होकाराची कथा आम्हांला ऐकवली. तिनं त्या मुलाबद्दल ‘तसा’ विचार आधी कधीही केला नव्हता, पण त्यानं प्रपोझ केल्यावर केला म्हणे, आणि तिच्या मनानं तिला म्हणे होकाराचाच कौल दिला.

आता, आम्हाला आनंद तर होताच. ग्रूपमधल्या एकीचं ‘ठरलंय’ याची एक्साईटमेण्टही होती. पण ती ‘निखळ मैत्री’ वगैरे? त्याचं काय? तिला आम्ही बोलूनही दाखवलं की, आता आदर्श मैत्रीचे दाखले कुणाचे देणार आम्ही?
यथावकाश त्यांचं लग्न झालं; ग्रूपमधल्या इतरांचीही लग्नं झाली. नोकर्‍या-व्यवसाय, संसार, मुलंबाळं आणि अधूनमधून मैत्री पुढे चालू राहिली. त्या आदर्श मैत्रीच्या मुद्द्यावरून तिला नंतर कुणीच, कधीच छेडलं नाही, कारण आमच्या दृष्टीनं ज्याक्षणी त्यानं तिला प्रपोझ केलं, त्याक्षणी त्यांच्यातली मैत्री संपुष्टात आली होती...

परवा नकळत आठवणींचं बोचकं उचकलं गेलं आणि त्यात हा किस्सा अगदी अवचित सापडला. त्यावर नव्यानं विचार करण्याची संधी मी कशी सोडणार?

त्यांच्या लग्नानंतर इतरांच्या लग्नकार्यांत, अजून काही प्रसंगांनिमित्त त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या. मी एकदा तिच्या सासरी जाऊन आले. ती नोकरीनिमित्त एकटीच परदेशी गेली, तेव्हा तिच्या चौकशीसाठी एकदोनदा त्या मुलाला फोन केल्याचं मला आठवतंय. तेव्हा आम्ही भरपूर गप्पाही मारल्या होत्या फोनवर. या सर्व प्रसंगांदरम्यान तो माझ्या समोर होता तो तिचा नवरा याच रूपात. ‘तिचा कोणे एके काळचा मित्र’ हे बिरूद मी त्याला लावू शकले नाही. खरंतर ‘कोणे एके काळचा’ हे तरी कशाला? नुसता ‘जवळचा मित्र’ असं चित्रंही माझ्या डोळ्यासमोर आलं नाही. मला आठवतंय, कॉलेजला असताना मनातल्या मनात त्या दोघांचा इतका हेवा वाटायचा की काय सांगू. अनेकदा स्वतःशीच कल्पना केली जायची की आत्ता त्याच्यासारखा आपलाही एखादा मित्र असता, तर त्याच्याशी या या विषयावर बोलता आलं असतं, अशी अशी चर्चा करता आली असती. खरंतर एक शाळेतली आणि एक कॉलेजमधली अशा माझ्या दोन जीवलग मैत्रिणी होत्या, घरी सख्खी बहीण होती. ती जी काय चर्चा करण्याचं माझ्या मनात तेव्हा होतं, त्यासाठी इतकी मंडळी पुरेशी होती की! पण तरीही ते मित्राचं वाटायचं खरं. आता विचार करताना वाटतंय की ‘भिन्नलिंगी व्यक्‍तीशी नुसती मैत्री’ हाच एक मुद्दा त्यामागचा बोलविता धनी होता का?

‘नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो. मुळात आपल्या मातृभाषेतच ‘मित्र’ आणि ‘मैत्रीण’ असा मूलभूत भेद आहे. इंग्रजीतल्या 'फ्रेण्ड'प्रमाणे हे दोन्ही व्यक्‍तीविशेष एकाच सामान्यनाम-छपराखाली नांदू शकत नाहीत. म्हणजे ते शब्द शिकताना, त्यांचे अर्थ आत्मसात करतानाच त्यांच्यातला फरक मनात ठसवला जातो. मग तो गृहित धरूनच या बाबीकडे का पाहू नये? वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरूष मैत्रीचं पर्यावसान प्रेमविवाहात होत नसेलही, पण कदाचित त्याचं प्रमाण बर्‍यापैकी असावं. म्हणूनच अशा मैत्रीकडे भुवया उंचावून पाहिलं जातं.
आता, भुवया उंचावणारे ‘धूर आहे म्हणजे विस्तव असणारच’ हा दाखला देतील; तो ज्यांना पटणार नाही ते ‘ओल्याबरोबर सुकंही जळणार’ म्हणून गळे काढतील. हे न थांबणारं, न संपणारं आहे. मग ज्यानं त्यानं आपलं मन स्वच्छ ठेवावं, आपल्या मनाचा कौल मानावा, लोकांना त्यांची आयुष्य जगू द्यावीत, हे काय वाईट आहे? शेवटी स्त्रीला आणि पुरुषाला जन्म देताना निसर्गानंही काही एक भेदभाव ठेवलेलाच आहे. त्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहेच. ते जे काही मूलभूत भेद आहेत ते कुठल्याही स्त्री-पुरूष नात्यात राहणारच, किंबहुना राहू द्यावेत. असा विचार करून बघा की त्या भेदांमुळेच ते नातं एक नवी उंची गाठू शकतं. पण तिथेही तो स्वच्छ मनाचा मुद्दा पुन्हा तडमडतोच आणि मामला कठीण होऊन बसतो. त्यापेक्षा मग भुवया उंचावणं, गॉसिपिंग करणं सोपं वाटतं, नाही?

मुळातच कुठल्याही दोन व्यक्‍तींच्या मर्यादा, बलस्थानं निराळी असतात; त्यांचे दृष्टीकोन, मतंही निरनिराळी असतात. त्याउपर लिंगभेदाचाही निकष लावला तर भावनांच्या प्रकटीकरणांमधे, आविष्कारपद्धतींमध्ये कल्पना करता येणार नाही इतकं वैविध्य दिसून येतं. मग हे सगळं जसंच्या तसं स्वीकारून त्या मैत्रीच्या नात्याला अधिक श्रीमंत करून सोडायचं की लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण करून टाकायचं हे ज्यानं-त्यानं ठरवावं.

हे मत स्त्रीवादाला पाठिंबा देणारं आहे, की त्यापासून फारकत घेणारं आहे या वादात मला पडायचं नाही. शेवटी स्त्रीवाद तरी का अवतरला या पृथ्वीतलावर? निसर्गनिर्मित स्त्री-पुरूष-विरोधाभासातला तोल बिघडला म्हणूनच ना? मग हा बिघडणार्‍या तोलाचा धोका या मैत्रीच्या नात्यातही आहेच. तो साधणंच महत्त्वाचं आहे, कळीचं आहे. पण त्यासाठी त्या मैत्रीकडे लिंगनिरपेक्षतेनं पाहण्याचा उपाय कुणी सुचवत असेल तर माझ्या मते तो सुचवणारा स्वतःचीच फसगत करतोय इतकं नक्की.

निसर्गाने मांडलेल्या सजीवसृष्टीच्या सोहळ्याचं मर्म कशात आहे? तर त्याच्या वैविध्यात. त्याला नजरेआड करणारे आपण कोण? ती आपली कुवत नाही, पात्रता तर त्याहून नाही. त्यापेक्षा त्या वैविध्याचे निरनिराळे पैलू लक्षात घ्यावेत, त्यांना अंगिकारावं आणि विविध नात्यांचा सोहळा मांडावा, त्याचा मनसोक्‍त आनंद घ्यावा, झालं. लिंगभिन्नतेसारख्या गोष्टी त्या नात्यांच्या आड येतायत असं वाटलं, तर नवीन नातं निर्माण करावं, जसं आमच्या मैत्रिणीनं आणि त्या मुलानं केलं, पण लिंगनिरपेक्षतेसारख्या मानवनिर्मित पैलूंचा शाप त्या निसर्गनिर्मित वैविध्याला द्यायला जाऊ नये हेच खरं.

- ललिता-प्रीति

प्रतिसाद

‘नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो. >>> :-) पटलंच हे.

छान लिहिलं आहेस ललिता.

छान जमलय. खुपच सुस्पष्ट विचार, तसच लेखनही. आवडलं.

लले.. कुठलीही बोजड शब्दरचना किंवा वाक्यरचना न करता अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेला लेख आवडला नि पटलाही.. :)

तू काही लिहिलेलं पहिल्यांदा पटलंय मला :)

नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो >> परफेक्ट!

नुसती मैत्री असेल तर छान, आणि हळूहळू एकमेकांबद्दल काहीतरी वाटू लागलं तर अचानक वाईट, हा दांभिकपणाच आहे. 'त्या' दोघांबद्दल विचार केला, तर मैत्री आणि आकर्षण यातल्या सीमारेषा अत्यंत पुसट असतात, आणि ज्या काही असतात, त्यांनाही अनेक पोत-पदर आणि संदर्भ असतात. निसर्ग त्या 'लिंगनिरपेक्षते'चं अचानक केव्हा भजं करून टाकतो, हे इतर कुणाला तर सोडाच, पण त्या दोघांनाही कळत नाही. नुसता 'मैत्री' हा वेगळा विषय आहे, मोठा आहे. 'लिंगनिरपेक्ष मैत्री' ही काय भानगड आहे, हे मला तरी काही कळत नाही. 'लिंगनिरपेक्ष मैत्री' असं एकदा का म्हटलं, की भविष्यातल्या अनेक 'सापेक्ष' शक्यतांची नांदी वाजते आणि तो शब्द उच्चारल्याक्षणीच 'लिंगनिरपेक्षते'चा कडेलोट होतो. अत्यंत धोकादायक आणि स्वतःलाच फसवणारा शब्दप्रयोग!

छानच... साजिराशी सहमत.. :)

सुरेख लिहिलं आहेस ललिता.

मुळातच कुठल्याही दोन व्यक्‍तींच्या मर्यादा, बलस्थानं निराळी असतात; त्यांचे दृष्टीकोन, मतंही निरनिराळी असतात. त्याउपर लिंगभेदाचाही निकष लावला तर भावनांच्या प्रकटीकरणांमधे, आविष्कारपद्धतींमध्ये कल्पना करता येणार नाही इतकं वैविध्य दिसून येतं. मग हे सगळं जसंच्या तसं स्वीकारून त्या मैत्रीच्या नात्याला अधिक श्रीमंत करून सोडायचं की लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण करून टाकायचं हे ज्यानं-त्यानं ठरवावं.
..... हे खुपच आवडलं.

हम्म ... इथे सोलमेट चा मुद्दा येतो. पण मग जर मित्र-मैत्रिणी सोलमेट असतील तर ते अधिक सुंदर आयुष्य एकत्रपणे काढू शकतील ना? मग त्यांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून निवडलं तर काय हरकत आहे? पण मग एकदा संसारात शिरल्यावर ते नवरा-बायकोचे रोल वठवायला लागले तर त्यांच्यातलं मैत्र कमी होतं का? अनेक वर्षांपासून एकमेकांची ओळख, घट्ट मैत्री, लग्न असे टप्पे पार पाडलेल्या जोडप्यांचे संसार का तुटतात? अनेक प्रश्न. जितके पापुद्रे सोलावे तितकेच आत अधिक दिसताहेत.

लले, लेख छान आहे. मुद्दा पटला. (नियमानुसार मला सगळ्यांचेच मुद्दे पटत आहेत.)

>> शब्द उच्चारल्याक्षणीच 'लिंगनिरपेक्षते'चा कडेलोट होतो.
एकदम पटले. हा विचार आधी केला नव्हता. तरी.

>>लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण
करायलाच हवे असे नाही ना.
मला वाटते की लिंगसापेक्ष असे काही गुण, वागणूक, विचार असावेत्_च_ हे चुकीचे. काय जे आहे ते केवळ स्वभावविशेष असावे.

खरंतर एक शाळेतली आणि एक कॉलेजमधली अशा माझ्या दोन जीवलग मैत्रिणी होत्या, घरी सख्खी बहीण होती. ती जी काय चर्चा करण्याचं माझ्या मनात तेव्हा होतं, त्यासाठी इतकी मंडळी पुरेशी होती की! पण तरीही ते मित्राचं वाटायचं खरं. आता विचार करताना वाटतंय की ‘भिन्नलिंगी व्यक्‍तीशी नुसती मैत्री’ हाच एक मुद्दा त्यामागचा बोलविता धनी होता का? >>
असे वाटणे फक्त नॉव्हेल्टी म्हणून होते का ? कधी कधी आपल्यापेक्षा वेगळा विचार, वेगळे अनुभव असणार्‍यांशी मैत्री असाविशी वाटते. भिन्नलिंगी व्यक्ती असल्यास हे वेगळेपण आपोआप येते त्यामुळे पण अशा मैत्रीचे आकर्षण असू शकते की.

छान लिहिलंयत

सुंदर!!

सुंदर!काही दिवसांपुर्वी मी सुद्धा अशा काठावर होते.. पण आत्ता ही तो माझा तितकाचं चांगला मित्र आहे :)

आपल्या मनाचा कौल मानावा, लोकांना त्यांची आयुष्य जगू द्यावीत, हे काय वाईट आहे? शेवटी स्त्रीला आणि पुरुषाला जन्म देताना निसर्गानंही काही एक भेदभाव ठेवलेलाच आहे. त्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहेच. ते जे काही मूलभूत भेद आहेत ते कुठल्याही स्त्री-पुरूष नात्यात राहणारच, किंबहुना राहू द्यावेत. असा विचार करून बघा की त्या भेदांमुळेच ते नातं एक नवी उंची गाठू शकतं.>>>>>
अगदी अगदी अनुमोदन ललिता-प्रीति.
लेख आवडला :)

छानच लिहिलंयस, आवडलं.

नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो >>> प्रचंड अनुमोदन, लले हे मी अगदी अनुभवले आहे, अगदी माझ्या लेखातही याचा संदर्भ आहे!
लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण करून टाकायचं >>> अचूक!
छानच लिहीले आहे!
आपल्यातले भेदच आपल्याला जास्त श्रीमंत करतात हे अगदी खरे!

स्त्रीला आणि पुरुषाला जन्म देताना निसर्गानंही काही एक भेदभाव ठेवलेलाच आहे. त्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहेच. ते जे काही मूलभूत भेद आहेत ते कुठल्याही स्त्री-पुरूष नात्यात राहणारच, किंबहुना राहू द्यावेत. असा विचार करून बघा की त्या भेदांमुळेच ते नातं एक नवी उंची गाठू शकतं>>>>>>>>>>>>>
मुळातच कुठल्याही दोन व्यक्‍तींच्या मर्यादा, बलस्थानं निराळी असतात; त्यांचे दृष्टीकोन, मतंही निरनिराळी असतात. त्याउपर लिंगभेदाचाही निकष लावला तर भावनांच्या प्रकटीकरणांमधे, आविष्कारपद्धतींमध्ये कल्पना करता येणार नाही इतकं वैविध्य दिसून येतं. मग हे सगळं जसंच्या तसं स्वीकारून त्या मैत्रीच्या नात्याला अधिक श्रीमंत करून सोडायचं की लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण करून टाकायचं हे ज्यानं-त्यानं ठरवावं.>>>>>>>>>>>> लले हे खुप खुप पट्ल, अगदी मनापासुन

प्रीति....

छान लिहिले आहेस.... खुप मस्त.... आठवणी उसळुन आल्या...

तु जीचं उदाहरण दिलं आहेस, तिची मानसिकता मला वाटतं वेगळी असावी. तिला खरच त्या आधी त्याच्या बद्दल तसं वाटत नसेल. पण त्याने विचारल्या वर " का नाही?" चं द्वंद्व तिच्या मनात झालं असेल. हा जर मित्र मला चांगला समजतो, उमजतो, आमच्यात आत बाहेर काही नाही, तर मग हाच नवरा म्हणुन का नको? उलट तेही नातं सुंदर होवुन जाईल. तिकडेही नव्याने 'समजुन" घेणे होणार नाही. आपलाच मित्र आपल्याला "स्थळ" म्हणुन सांगुन आला आहे. मग त्याचा विचार का नको करायला?

ह्या नात्यात तुम्हा तिर्‍हाईतांना काय वाटलं ह्या पेक्षा त्या मुलीला / मुलाला लग्ना नंतर त्यांचे "तेच" मैत्र परत मिळालं का, हे समजुन घेणं जास्त इंटरेस्टींग होईल.

छान लिहिलं आहे.

‘नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो.>>>>खरंच की!!लक्षात आलं नाही हे आधी!! आता यानुसार बोलण्यात आणि विचारांत पण सुधारणा करणार :)
मस्त लेख !!!

सहजसुंदर आणि सोप्या भाषेत लिहिलाय म्हणून खूप आवडला लेख. सर्व मुद्दे पटले एकदम.
आपल्याच मनातले विचार आहेत हे असं वाटून गेलं. :)

<<<<<<<<<<<<<<<<<निसर्गाने मांडलेल्या सजीवसृष्टीच्या सोहळ्याचं मर्म कशात आहे? तर त्याच्या वैविध्यात. त्याला नजरेआड करणारे आपण कोण? ती आपली कुवत नाही, पात्रता तर त्याहून नाही. त्यापेक्षा त्या वैविध्याचे निरनिराळे पैलू लक्षात घ्यावेत, त्यांना अंगिकारावं आणि विविध नात्यांचा सोहळा मांडावा, त्याचा मनसोक्‍त आनंद घ्यावा, झालं. लिंगभिन्नतेसारख्या गोष्टी त्या नात्यांच्या आड येतायत असं वाटलं, तर नवीन नातं निर्माण करावं, जसं आमच्या मैत्रिणीनं आणि त्या मुलानं केलं, पण लिंगनिरपेक्षतेसारख्या मानवनिर्मित पैलूंचा शाप त्या निसर्गनिर्मित वैविध्याला द्यायला जाऊ नये हेच खरं.>>>>>>>>>>>>
अगदी माझ्या मनातलं लिहिलंय तुम्ही. धन्यवाद. लेख खरंच फार सुरेखच आहे. ........ अशा जोड्या माझ्याही पाहण्यात आहेत.......अगदी जवळचे म्हणजे माझे काका-काकू, सासू-सासरे व वडिलांचा एक जवळचा मित्र व त्यांची बायको............ हे शेवटचे तर मी अगदी (माझ्या) लहानपणापासून जवळून पाहिले आहेत, एक चांगले मित्र-मैत्रिण म्हणून, एक आदर्श प्रणयी युगुल म्हणून, अगदी आदर्श जोडपं म्हणून, एक आदर्श आई-वडिल म्हणून मी त्यांना पाहत आलेलो आहे व त्यांना तसं म्हणूनही दाखवलें आहे. खरंच. काही जोड्या स्वर्गातच ठरुन येतात, हेच खरं!

लले....सही लिहलंय्स..एकदम साधं-सोप्पं :)

सध्या मी पावलो कोएलो यांचं "ब्रिडा" वाचतो आहे............. स्त्री-पुरुष नात्याबद्दल किती सुरेख कोट केलंय पहा:

"द सॉइल नीड्स द सीड, अ‍ॅण्ड द सीड नीड्स द सॉइल.... द वन ओन्ली हॅज मीनिंग विथ द अदर. इट इज द सेम थिंग विथ ह्युमन बीईंग्स....... व्हेन मेल नॉलेज जॉइन्स विथ फीमेल ट्रान्स्फॉर्मेशन, देन द ग्रेट मॅजिकल युनियन इज क्रिएटेड, अ‍ॅण्ड इट्स नेम इज विस्डम. विस्डम मीन्स, बोथ, टू नो अ‍ॅण्ड टू ट्रान्सफॉर्म.....!! "

यावर मी काही अनुवाद वगैरे करायची गरज आहे का?

मी हे वाचायला इतका वेळ का लावला? हल्ली असंच होतं! मस्त आणि पटेल असंच लिहिल आहेस.. खूप दिवसानी तू लिहिलेलं काहीतरी वाचलं! माझी, खरं सांगू, मुलींपेक्षा मुलांशीच जास्त मैत्री होती आणि अजुनही तीच परिस्थिती आहे.. म्हणजे मैत्रिणी नाहीत असे नाही पण मित्राण्चे प्रमाण जास्त! तू लिहिलेल्या तुझ्या मैत्रिणी सारखचं मी ही माझ्या मित्राशीच लग्न केलयं... आणि अजुनही म्हणजे आत्ताच त्याचा ५० वा वाढदिवस झाला तेंव्हा त्याने मला हा compliment दिला की तू बायकोपेक्षा best friend म्हणुनच मला आवडतेस. मैत्रा कडे बघण्याचा त्याचा आणि माझा दृष्टीकोन निखळ तर आहेच पण बाकी कशात आमच्यात साम्य नसलं तरी आम्ही दोघही मैत्रीला खूप मानतो.

दीपक, सुरेख/समर्पक शब्दात सांगितलय 'ब्रिडा' मध्ये!