दिल है के मानता नही!

सर्वप्रथम या विषयासाठी संयुक्ताचे आभार! आपण स्वतःचा वा दुसर्‍या व्यक्तीचा लिंगनिरपेक्ष विचार करु शकतो का, हा अनेक स्तर असलेला गुंता आहे आणि तो; आपण स्वतः, समोरची व्यक्ती, त्याचं-आपलं वय, नातं, हुद्दे अशा अनेक धाग्यांनी बनलेला आहे. हे या गोंधळाचे विश्लेषण नव्हे, तर त्याचे नुसते अवलोकन आहे.

एखादी व्यक्ती कशाप्रकारे भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहते, यावर सर्वात मोठा प्रभाव आपल्या पालकांच्या एकमेकातील नात्याचा असतो. माझी आई कायमच तिच्या माहेरी आणि सासरीही ’डिसिजन मेकर’ भूमिकेत होती आणि हे बाबांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले होते. स्त्री-पुरूष समानतेवरील भाषणे किंवा समुपदेशन जे साध्य करु शकणार नाही तो संस्कार त्यांचे सहजीवन सतत पाहताना माझ्यावर नक्कीच झाला.

मैत्रीचे म्हणाल तर माझ्या बाबतीत टिनएजमधलीच मैत्री पूर्णपणे लिंगनिरपेक्ष होती. 'ओह, हा मित्र नाही मैत्रीण आहे, हीच्या समोर असे वागा, हे बोला, ते बोलू नका, 'डिसेंट' राहा' इ. विचार माझ्या मनात कधीही आले नाहीत. पण मी हेही पाहिले आहे की, बहुतांश मुलींना हे चालत नाही. त्यांच्या मनात मुलाने-पुरुषाने जसे वागावे याचे जे कंडीशनिंग असते, याची पूर्तता झाली नाही तर त्या दुखावतात आणि दुरावतात.

या जंजाळातून टिकून राहिल्या फक्त दोन! मी जसा आहे तसा मला वागू देण्यात माझ्या या मैत्रिणींचा तितकाच वाटा आहे. कुठलाही मुखवटा न घालता मला त्यांच्याशी नातं जपता आलं. ही मैत्री अजूनही कायम आहे. मध्येच कधीतरी फोन जातो आणि आम्ही मुख्यतः 'आमच्या'बद्दल बोलतो, फारतर फोन ठेवताठेवता एकमेकांच्या 'कुटुंबा'ची चौकशी! या बोलण्यात कुठलाही विषय वर्ज्य नाही, आध्यात्मिक अनुभूतीपासून लैंगिक जीवनातील अनुभवांपर्यंत सर्व काही.

व्यावसायिक नातेसंबंधात मात्र असा मोकळेपणा अर्थातच नाही आणि नसावाही. कामाच्या ठिकाणी मैत्री व्हावी ही माझी अपेक्षाच नाही. त्यामुळे दिलेले काम टीम म्हणून व्यवस्थित होते आहे का यापलीकडे सहकारी पुरुष आहे की स्त्री या फंदात पडण्याची मला गरज वाटत नाही. कामातील संवेदनशीलता, पारदर्शकता, उरक आणि प्रभावीपणा हा पूर्णतया लिंगनिरपेक्ष आहे . तीच गोष्ट कम्युनिकेशनची. सहकार्‍यांमधला संवाद एकतर उत्तम असतो वा नसतो, त्यात ते पुरुष आहेत का स्त्री याने फार फरक पडत नाही. सभ्य भाषा आणि बॉडी लँग्वेज ही सर्वांशीच संवाद साधताना वापरायची असते याचे भान हे हवेच. उदा. मी जे विनोद मोकळेपणे माझ्या स्त्री सहकार्‍यांसमोर सांगू शकत नाही ते कामाच्या ठिकाणी सांगायच्या पात्रतेचे नाहीत हे लक्षात ठेवायला हवे (याचा अर्थ हे विनोद वाईट आहेत असा नव्हे, ती त्यांची जागा नाही इतकेच!). अर्थात असा मोकळेपणा निर्माण झाल्यास केवळ त्या स्त्रिया आहेत एवढ्या कारणाने असे विनोद न सांगणेही तितकेच चूक आहे.

शिक्षक असल्याने या दृष्टीने माझ्या कामातला सगळ्यात काळजीपूर्वक हाताळावा लागणारा भाग म्हणजे विद्यार्थिनी-शिक्षक संबंध. त्यातही मी कायम १४-१८ वर्षे वयोगटाला शिकवीत असल्याने जबाबदारी जास्तच वाढते. शिक्षक-विद्यार्थी संबंध तसेही अधिक मोकळे झाले आहेत आणि म्हणूनच ते मैत्रीचे ठेवत असतानाच त्यांतले अंतर कायम ठेवणे ही कसरत जमवावी लागते. या नात्यात मात्र लिंगनिरपे़क्षता आणता येत नाही, किंबहुना ती मला तरी आणता आलेली नाही. माझे विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या आर्थिक-सामाजिक वर्गातून येतात तेथे लैंगिक स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक मुले-मुली आठवीपासूनच डेटिंग करतात. पुन्हा माझा विषय जीवशास्त्र, त्यामुळे त्यातील मेल-फिमेल रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, मेनस्ट्रुअल सायकल इ.भाग शिकवताना विषयाचे गांभीर्य राखत मोकळेपणाने चर्चा होईल असे वातावरण तयार करावे लागते. त्यामुळे फार पारंपरिक मनोवत्तीतून या गोष्टी शिकवण्याला काही अर्थ नसतो, हे मला शिकावे लागले. ’व्हॉट इज द बेस्ट एज टू लूज व्हर्जिनिटी’ असा प्रश्न नववीतल्या एका मुलीने भर वर्गात विचारला हा माझ्यासाठी मोठा ’कल्चरल शॉक’ होता. तरीही मनातली खळबळ चेहर्‍यावर न येऊ देता, शिक्षक म्हणून या प्रश्नाचे समर्पक उत्तर मी देऊ शकलो. या अनुभवाने मला माझ्या मनातील पूर्वग्रह किती बळकट आहेत याचीच जाणीव करुन दिली. अर्थात ते असे एकदम जाणारही नाहीत. नवे अनुभव, लोक, विचार याच्या प्रभावानेच ते बदलतील असे वाटते. या सुरुवातीच्या धक्क्यानंतर मात्र जसजसे मला माझे विद्यार्थी कळत गेले तसा माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. आज माझे माझ्या विद्यार्थिनींबरोबरचे नाते जास्त सहज आहे.

लग्नाआधी आणि नंतरची मिळून १०-११ वर्षे मी आणि माझी बायको एकमेकांना ओळखतो, अगदी ’ओळखून आहे’ म्हणावे इतके! या मुलीशी एकतर लग्न करायचे किंवा कसलेच नाते नको ('जस्ट फ्रेंड्स्'तर अजिबात नाही!) हे मी जेव्हा पक्के केले, त्यावेळी ती एक स्त्री म्हणून सर्वार्थाने मला भावली होती आणि हवी होती हे खरेच. आम्ही आधी मित्र नव्हतोच, होता ते फक्त प्रेमाचा आवेग, अत्यंत शारीर आणि पूर्णपणे लिंगसापेक्ष. मैत्री हळूहळू झाली, वाढत्या जबाबदार्‍या, निर्णयाचे प्रसंग यातून नात्याची समज आणि उमज आली.

पती-पत्नीच्या नात्यातही एक क्षण असा येतो की ज्यापुढे स्त्री-पुरुषपणाच्या चौकटी मोडून पडतात. स्पर्शात कसलाही उन्माद नाही, नजरेत कोणतीही वासना नाही, सोबती मिठीत आहे आणि आहे केवळ दोन व्यक्तींमधले निखळ नाते. तो क्षण मी अनुभवला आहे!

परवाचा प्रसंग. मी माझ्या मुलाला (वय वर्षे पाच) प्रेमाने जवळ घेऊन ’आय लव्ह यू’ म्हटले. त्यावर तो तत्काळ उत्तरला- ’हे बॉयने बॉयला नसतं म्हणायचं, बॉयने गर्लला म्हणायचे’- मी गपगार! त्याच्या मेंदूत शिरु लागलेली ही लिंगसापे़क्षता चांगली की वाईट हा प्रश्न अजून सुटत नाही आहे!

शेवटी एवढचं म्हणेन की मी पुरुष असल्याचे माझे भान कधीही जात नाही आणि समोरची व्यक्ती स्त्री असल्यास त्याचेही. यात माझे पालक, मैत्र, समाज या सगळ्याचाच वाटा आहे. हे काहीवेळा अनावश्यकही आहे, व्यक्तीला व्यक्ती म्हणूनच ओळखा वगैरे पटतं, पण मनाची घडण इतक्या सहज बदलत नाही. दिल है के मानता नहीं!

- आगाऊ

प्रतिसाद

व्हॉट इज द बेस्ट एज टू लूज व्हर्जिनिटी? या प्रश्नावरील उत्तर सुंदर, मार्मिक, सहज आहे. फ्रेम करुन शाळाशाळांत पाठवू शकतो काय?

एखादी व्यक्ती कशाप्रकारे भिन्नलिंगी व्यक्तीकडे पाहते, यावर सर्वात मोठा प्रभाव आपल्या पालकांच्या एकमेकातील नात्याचा असतो. माझी आई कायमच तिच्या माहेरी आणि सासरीही ’डिसिजन मेकर’ भूमिकेत होती आणि हे बाबांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले होते. स्त्री-पुरूष समानतेवरील भाषणे किंवा समुपदेशन जे साध्य करु शकणार नाही तो संस्कार त्यांचे सहजीवन सतत पाहताना माझ्यावर नक्कीच झाला. >>>>

नशिबवान आहेस ! या स्थितीत परस्परांवरचा विश्वास आणि खात्री खुप महत्वाची असते. नाहीतर मग संसाराचा विस्कोट होतो. अर्थात जेव्हा सोलापुरात तुझ्या घरी तुझ्या बाबांना भेटलो होतो तेव्हाच त्यांच्या स्वभावातील मोकळेपणा जाणवला होता. आईंशी काही भेटणे नाही झाले पण आता सोलापूरला गेलो की ठरवून भेटेन. सुदैवाने म्हण अथवा दुर्दैवाने म्हण पण आमच्या घरी मुळात कुणी सिंगल डिसीजन मेकर हा प्रकारच नाहीये. अजुनही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरदेखील आम्ही आपापसात बोलून, एकमेकांची मते आजमावून मगच निर्णय घेतो. त्यामुळे संघर्षाचे प्रसंग येतात कधी-कधी. पण ते तिथेच सामंजस्याने मिटतातही.

<<मैत्रीचे म्हणाल तर माझ्या बाबतीत टिनएजमधलीच मैत्री पूर्णपणे लिंगनिरपेक्ष होती. 'ओह, हा मित्र नाही मैत्रीण आहे, हीच्या समोर असे वागा, हे बोला, ते बोलू नका, 'डिसेंट' राहा' इ. विचार माझ्या मनात कधीही आले नाहीत. पण मी हेही पाहिले आहे की, बहुतांश मुलींना हे चालत नाही. त्यांच्या मनात मुलाने-पुरुषाने जसे वागावे याचे जे कंडीशनिंग असते, याची पूर्तता झाली नाही तर त्या दुखावतात आणि दुरावतात. >>>
पटेश एकदम :)

अतिशय प्रामाणिक लेखन ! अर्थात तुझ्याकडून हेच अपेक्षीत आहे म्हणा :)

सरळ-सरळ विचारांचा,साध्या-सोप्या पण सुंदर शब्दांतला सुरेख लेख. आवडला :)