गैरसमजांच्या विळख्यातील लिंगनिरपेक्षता

’लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री’ अर्थात genderless identity - genderless friendship असा विषय परिसंवादासाठी जाहीर झाला, त्या दिवसापासून ह्या विषयावर माझं मत नक्की काय आहे, हे तपासून पाहायला सुरुवात झाली होती. नंतर परिसंवादाच्या घोषणा, जाहिराती ह्यांवरुन लोकांना पडलेले उलटसुलट प्रश्न, शंका हे पाहता ’लिंगनिरपेक्ष’ हा शब्द अनेक जणांना गोंधळात टाकतोय, हे प्रकर्षाने जाणवलं. इतरांच्या कशाला, प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याही मनात ह्या विषयाबद्दल संभ्रम होताच, कारण त्यापूर्वी ह्या विषयावर जास्त विचारच केलेला नव्हता. ह्या परिसंवादाच्या निमित्ताने तो झाला हे चांगलं झालं.

’लिंगनिरपेक्ष’ ह्या शब्दाची उकल करुन सांगायची असेल, तर मला मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषांचा आधार घेण्यावाचून पर्याय नाही. इंग्लिशमध्ये sex (सेक्स) आणि gender (जेंडर) असे दोन वेगळे शब्द आहेत. ’सेक्स’ म्हणजे नैसर्गिकरीत्या किंवा शारीरिकदृष्ट्या तुम्ही ज्या वैशिष्ट्यांसकट जन्माला येता ते, अर्थात निव्वळ शारीरिक फरकावर आधारलेलं ’स्त्री’ किंवा ’पुरुष’ असणं. तर ’जेंडर’ म्हणजे समाजाने किंवा तुमच्या संस्कृतीने तुम्हांला आखून दिलेली वैशिष्ट्यं, अर्थात (तथाकथित) ’बायकीपणा’ किंवा ’पुरुषीपणा’. उदाहरणार्थ, पुरुष कणखर असतो(च) आणि बाई भावनाप्रधान असते(च), बायकांना घरकामाची, स्वयंपाकाची आवड असते(च), पुरुषांना राजकारण,खेळ ह्यावर बोलायला आवडतं(च).
परिपूर्ण स्त्रीत्व = शारीरिकदृष्ट्या ’स्त्री’ असणं + सामाजिकदृष्ट्या आखून दिलेले बायकी गुण.
परिपूर्ण पुरुषत्व = शारीरिकदृष्ट्या ’पुरुष’ असणं + सामाजिकदृष्ट्या आखून दिलेले पुरुषी गुण.
सेक्स आणि जेंडर असे दोन वेगवेगळे शब्द असले तरी रोजच्या वापरात त्यांची बरेचदा सरमिसळ होताना दिसते किंवा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्याचा विसर पडतो. मराठीत तर ह्या दोन्ही शब्दांसाठी ’लिंग’ असा एकच शब्द आहे.

ह्या वरच्या व्याख्या पाहिल्यावर लक्षात येईल की खरं तर ’genderless identity' किंवा ’लिंगनिरपेक्ष ओळख’ म्हणताना आपण आपल्यातल्या शारीरिक फरकांबद्दल बोलतच नाहीयोत. मग ’लिंगनिरपेक्ष’ म्हणजे नक्की काय ? मला उमजलेली ’लिंगनिरपेक्षता’ म्हणजे आपल्या सामाजिक लिंगाशी (जेंडर) जोडलेल्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांपासून स्वत:ला मुक्त करणे आणि त्याचवेळी जे नैसर्गिक आहे (sex) त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करणे. शारीरिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत आणि निसर्गाने त्यांना नेमून दिलेली कामंही वेगळी आहेत. उदा. नवीन जीव पोटात वाढवणे आणि त्याला जन्म देणे हे स्त्रीच्या वाट्याला आले आहे, त्याकरिता आवश्यक असलेले मासिक पाळीचे चक्र आणि बाळंतपणानंतर आपल्या बाळाची पोषणाची गरज भागवण्यासाठी शरीरातच दूध तयार होणे, हेही नैसर्गिकरीत्या स्त्रीच करते. त्यात आधुनिक विज्ञानाला अजूनतरी यशस्वी आणि सर्वसमावेशक ढवळाढवळ करता आलेली नाही. पण ही कामं तिच्यावर आली म्हणून हा नैसर्गिक भाग पार पडल्यानंतरही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी बहुतांशी तिच्यावरच राहील, हे कुणी ठरवले ? परिपूर्ण स्त्री / पुरुष असण्याचे ठोकताळे कुणी ठरवले ? वस्तुस्थिती आणि अपेक्षा ह्यांतला फरक कसा ओळखायचा ? सगळ्यांत सोपा निकष म्हणजे जे नैसर्गिक आहे ते सगळ्यांच मनुष्यप्राण्यांमध्ये सारख्या पद्धतीने घडताना दिसते. उदा. स्त्रीने मूल जन्माला घालणे. पण जी विभागणी मानवाने कृत्रिमरीत्या केलेली आहे, ती स्थळकाळसापेक्ष आहे. उदा. अशाही जमाती आहेत जिथे जेंडरवर आधारित असलेल्या कामांची अदलाबदल झालेली दिसते. आफ्रिकेतील काही जमातींत बायका शिकारीला जातात, पुढचा तंबू कुठे ठोकायचा ह्याचा निर्णय घेतात आणि पुरुष घर सांभाळतात किंवा आपल्या देशात शंभर वर्षांपूर्वी एखाद्या घरात स्त्री नोकरीसाठी बाहेर पडून लोकांत मिसळली असती आणि पुरुष बाळाला भरवत बसला असता तर जितका गहजब झाला असता तितका आता नक्कीच होत नाही.

आपल्या ’जेंडर’शी जोडलेल्या ह्या अपेक्षांना मुक्त करुन लिंगनिरपेक्ष ओळखीच्या दिशेने पहिले पाऊल टाकायचे असेल तर त्यासाठी आत्तापर्यंत चालत आलेल्या पारंपरिक भूमिकांची अदलाबदल होणे (gender role reversal) हा सहज टप्पा आहे असे मला वाटते. पण अर्थात तो एक टप्पाच असला पाहिजे, अंतिम मुक्काम नव्हे. स्वत:ला काय आवडतं ह्याची नीट ओळख करुन घ्यायची असेल, तर ते करुन बघायची संधी तरी मिळायला हवी आणि तीही खुलेपणाने, समाजाच्या दबावाला बळी न पडता मिळायला हवी. तेव्हाच ’अरे हो, आपल्यालाही हे काम करायला मजा येतेय की’, ही जाणीव स्पष्ट होऊ शकेल. स्त्रीवाद आणि लिंगनिरपेक्षता ह्यांचा संबंध येतो तो नेमका इथे.

स्त्रीवादी (feminist) चळवळीची सुरुवात झाली ती स्त्रियांना समाजात समान हक्क मिळवून देण्याच्या हेतूने. स्त्री आणि पुरुषांसाठी लिंगाधारीत कामविभागणी (gender based roles) झाली इथपर्यंत ठीक. पण त्यामुळे जेव्हा ही ’स्त्री आहे म्हणून ही दुय्यम’ आणि ’पुरुष आहे म्हणून वर्चस्व त्याचे’, ही मनोवृत्ती शतकानुशतके समाजात रुजली, तेव्हा ही चळवळ मूळ धरणे स्वाभाविकच होते. पूर्वीच्या तुलनेत ह्या अपेक्षा झुगारुन देण्यात स्त्रिया यशस्वी झाल्या असल्या तरी दुर्दैवाने अजूनही समाजात ’लिंगनिरपेक्षता’ म्हणावी तशी स्वीकारली गेलेली नाही. ह्याचे मुख्य कारण हे जेंडर रोल्स मुख्यत्वे एकाच बाजूने बदलले गेले. स्त्री घराबाहेर पडली, अर्थार्जन करु लागली पण त्याचवेळी पुरुषांनी तिची कामं वाटून घ्यायची तयारी त्या प्रमाणात दाखवली नाही. जेंडरलेस आयडेंटिटी व्हायच्या ऐवजी तिची सुपरवूमन अशी ओळख झाली. हळूहळू तिचं सुपरवूमन असणं हीसुद्धा एक जेंडर स्पेसिफिक अपेक्षाच झाली.

थोडक्यात काय तर, ’ही मुलगी/मुलगा आहे म्हणून तिने/ त्याने हे करायचं नाही’ पासून ’ही मुलगी/मुलगा आहे तरी ती/तो हे करणार' इथपर्यंत झालेला आत्तापर्यंतचा प्रवास जेव्हा तिला/त्याला हे आवडतं, जमतं म्हणून तो/ती हे करणार, इथपर्यंत येईल तेव्हा ’लिंगनिरपेक्ष ओळख’ जपणे आपण खर्‍या अर्थाने साध्य करु.

’लिंगनिरपेक्ष’ ह्या शब्दाचीच खरी ओळख पटली तर ’लिंगनिरपेक्ष मैत्री’ भोवती असलेलं गैरसमजाचं धुकं दूर व्हायलाही पुष्कळच मदत होईल. ज्या मैत्रीला सामाजिक लिंगाशी (जेंडर) जोडल्या गेलेल्या अपेक्षांचं बंधन नाही, अशी मैत्री म्हणजे लिंगनिरपेक्ष मैत्री. उदा. मुलगा आहे म्हणून त्यानेच हॉटेलचं बिल द्यायचं किंवा रिक्शेचे पैसे पुढे करायचे, मुलगी आहे म्हणून तिने अमूक एका विषयावर मतं मांडायची नाहीत. पिक्चरमधून भिरकावली जाणारी ’एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते’ ह्यासारखी वाक्यं तर अजूनच दिशाभूल करत असतात. आपण विसरतो की ती sexless friendship नाहीये तर genderless friendship आहे. समजा एखाद्या मुलात आणि मुलीत छान मोकळी मैत्री असेल आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं तर त्यांच्यातल्या लिंगनिरपेक्ष (genderless) मैत्रीवर शंका कशी काय घेतली जाऊ शकते ? मैत्रीच्या एका टप्प्यावर त्यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण झालं किंवा त्यांच्यातील मैत्री इतकी घट्ट झाली की एकमेकांच्या जोडीने आयुष्य घालवावं असं त्यांना वाटलं, एवढाच त्याचा अर्थ. लग्नानंतरही त्यांच्यातील ’लिंगनिरपेक्ष मैत्री’ अबाधित राहू शकते किंवा ठरवून लग्न केलेल्या जोडप्यांतही लग्नानंतर अशी मैत्री होऊ शकते. पण जर ’हा नवरा/बायको आहे म्हणून हिने/ह्याने असं वागायला हवं’ अशा अपेक्षांची भाषा सुरु झाली तर त्या मैत्रीतली ’लिंगनिरपेक्षता’ संपुष्टात आलेली असेल.

नात्यात जपल्या जाणार्‍या लिंगनिरपेक्ष मैत्रीच्या अनुषंगाने मला नेहमी ’खुबसूरत’ हा चित्रपट आठवतो. संपूर्ण चित्रपटात सासरा आणि त्याच्या सुनेची बहीण ह्यांच्यात इतकी सुंदर, निखळ मैत्री दाखवली आहे. त्या मैत्रीला वयाचे, लिंगभेदाचे (gender difference) कुठलेही बंधन नाही. पण शेवटच्या प्रसंगात जेव्हा तीसुद्धा त्यांची सून बनून घरात येते आणि ते नेहमीसारखं ’फ्रेंड’ म्हणत तिला जवळ घेतात तेव्हा ती लाजून आता मला ’बहू’च म्हणा, तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतं, असं म्हणते. चित्रपट म्हणून ते बघायला मलाही खूप आवडते पण ’अरेरे, आता ही अगदी टिपिकल बहू होणार आणि ह्यांच्यातल्या मैत्रीचं काय होणार मग ?’ अशी खंतही मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी उमटतेच.

आपली शारीरिक ओळख आणि आपली मानसिक/सामाजिक ओळख ह्या दोन्ही आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग असल्याने दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणे फार गुंतागुंतीचे होऊन बसते आणि त्यातून ’लिंगनिरपेक्ष’ हा शब्द समजून घेण्यातच गल्लत होते. ’लिंगनिरपेक्ष ओळख’ जपण्यासाठी काही जणांनी ’लिंगनिरपेक्ष बाळ’ वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं वाचते (raising genderless child), तेव्हा त्या बाळांबद्दल वाईट वाटतं. जन्माला आल्यानंतर तो मुलगा आहे की मुलगी हे जाहीरच करायचं नाही, नाव मुलगा आहे की मुलगी कळणार नाही, असं ठेवायचं. जे नैसर्गिकरीत्या मिळालं आहे ते नाकारुन, लपवून काय साध्य होणार ? तो मुलगा आहे की मुलगी ह्या मुद्द्याला महत्त्व न देता त्याला/ तिला आवडीप्रमाणे कपडे, खेळणी, विचारस्वातंत्र्य, आवडीचं कार्यक्षेत्र निवडू देणं, हा योग्य मार्ग झाला.

त्याचबरोबर लैंगिकता (sexuality) ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्री / पुरुष ह्या दोघांनीही त्याचा आदर करायला हवा आणि शारीरिक फरक आहे आणि तो राहणार ह्याचे भान राखायला हवे. हे भानही व्यक्तीगणिक बदलते हेही ओघाने आलेच. कुठल्याही दोन व्यक्ती समोरासमोर येतात तेव्हा त्यांना त्यांच्यात किमान ’पर्सनल स्पेस’ असावीशी वाटणे ही एक अंत:प्रेरणा आहे. हे अंतर नेमके किती असावे हे व्यक्तीसापेक्ष आहे (लिंगसापेक्ष / sex based नव्हे). त्यामुळेच लिंगनिरपेक्ष मैत्रीतही एखाद्या मित्राला / मैत्रिणीला अगदी सहज स्पर्श केला जाऊ शकेल आणि लैंगिकतेची जाणीवही होणार नाही तर दुसर्‍याशी बोलताना स्पर्श होणार नाही ह्याची मुद्दाम काळजी घेतली जाईल. ही कंफर्ट लेव्हल ज्याची त्याला ठरवू द्यावी.

मला उमजलेली ’लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री’ ही अशी आहे. माझ्या मते लिंगनिरपेक्षता अस्तित्वात आहेच. परंपरेने बहाल केलेल्या चष्म्यातून ती धूसर दिसते. चष्मा उतरवला की लख्ख !

- अगो

प्रतिसाद

आपली शारीरिक ओळख आणि आपली मानसिक/सामाजिक ओळख ह्या दोन्ही आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग असल्याने दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणे फार गुंतागुंतीचे होऊन बसते आणि त्यातून ’लिंगनिरपेक्ष’ हा शब्द समजून घेण्यातच गल्लत होते. >>>
अनुमोदन.

सैद्धातिंक पातळीवर, तुला जे म्हणायचे आहे ते सुघड आणि स्पष्ट पोचते आहे.

उत्तम लेख.

(ही पोच समजावी. सविस्तर प्रतिसाद नंतर.)

लेखातील काही मुद्दे पटले नाहीत.

<<आपल्या ’जेंडर’शी जोडलेल्या ह्या अपेक्षांना मुक्त करुन लिंगनिरपेक्ष ओळखीच्या दिशेने पहिले पाऊल टाकायचे असेल तर त्यासाठी आत्तापर्यंत चालत आलेल्या पारंपरिक भूमिकांची अदलाबदल होणे (gender role reversal) हा सहज टप्पा आहे असे मला वाटते. पण अर्थात तो एक टप्पाच असला पाहिजे, अंतिम मुक्काम नव्हे.>>

एकच टप्पा आहे आणि मुक्काम नव्हे हे लेखक कबूल करत आहेत. पण जो मूळ मुद्दा आहे, पारंपारिक भूमिकांची अदलाबदल स्वीकारणे / त्या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे व त्या गोष्टीला केवळ एक / पहिला टप्पा म्हणून स्वीकारणे (लिंगनिरपेक्ष ओळखीच्या दिशेच्या प्रवासातील) तो स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठीचा एक अटेंप्ट ठरतो. लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यात असलेला फरक 'अ‍ॅड्रेस' झालेला दिसला नाही किंवा तो फरक चुकून इग्नोर केला गेलेला असावा.

<<पण ही कामं तिच्यावर आली म्हणून हा नैसर्गिक भाग पार पडल्यानंतरही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी बहुतांशी तिच्यावरच राहील, हे कुणी ठरवले ?>>

एक लक्षात घ्यायला हवे की उत्क्रांतीवादानुसार स्त्री पुरुषांच्या (लैंगीक फरक सोडून इतर) शरीराची वाढ मुळातच ते करत असलेल्या कामांनुसार स्वीकारत असलेल्या जबाबदार्‍यांनुसार झालेली आहे. पुरुषांचे खांदे रुंद व कणखर असतात याचे कारण पिढ्यानपिढ्या लाकडे तोडून ती उचलून आणण्याची जबाबदारी पुरुषांकडे आली. स्त्री नाजूक असली तरी काटक असते कारण तिच्याकडे घरातील अनेक 'टिच्चून करण्यासारखी' कामे आलेली असतात.

नैसर्गीक भाग पुरा झाल्यानंतरही मुलाला आईबद्दल व आईला मुलाबाद्दल जी शारिरीक व मानसिक अ‍ॅटॅचमेन्ट निर्माण झालेली असते ती पुरुषाबाबत होणे नैसर्गीकरीत्या जवळपास अशक्य आहे.

एक मत थोडे स्पष्ट मांडावेसे वाटले.

लिंगनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता यातील फरकाकडे लक्ष दिले गेले नाही असे मला वाटले.

-'बेफिकीर'!

अगो, तु म्हणाल्या प्रमाणे हा विषय थोडासा गोंधळात टाकणारा होता. पण हळु हळु बर्याच चर्चां मधुन आणि नीधप, स्वाती, मैत्रेयी ह्यांनी टाकलेल्या पोस्ट्स मधुन तो क्लिअर होत गेला. तुझा हा लेख खुप सुटसुटीत झालाय आणि खुपसा पटला पण. तु केलेली 'लिंगनिरपेक्ष’ ह्या शब्दाची उकल तर छानच :)

छान. लेखनामागची कळकळ भिडली.
जेण्डर आणि सेक्स यातला फरक उत्तमरीत्या मांडला आहे.

अगो,
मला नाही वाटत, हा अर्थ या अंकाच्या जाहिरातींमधून स्प्ष्ट झाला होता.
ललिताने जे मत मुख्य पानावर मांडले आहे, त्याच्याशी सहमत.

बराच सहज आणि सोपा लिहिला आहेस, शेवटच वाक्य लाख मोलाच.

उत्तम, मुद्देसूद लेख अगो.
>> तिला/त्याला हे आवडतं, जमतं म्हणून तो/ती हे करणार,
सहमत.

>ही कंफर्ट लेव्हल ज्याची त्याला ठरवू द्यावी. >> अगदी. लेख आवडला अगो.

लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यात असलेला फरक 'अ‍ॅड्रेस' झालेला दिसला नाही <<<
ह्म्म या फरकाबद्दल अजून तपशीलात स्पष्ट करू शकाल का?

मला नाही वाटत, हा अर्थ या अंकाच्या जाहिरातींमधून स्प्ष्ट झाला होता. >>> दिनेशदा, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते खरंच कळले नाही. प्लीज थोडे उलगडून सांगाल का ? :)

लिंगनिरपेक्षता व स्त्री पुरुष समानता यात असलेला फरक 'अ‍ॅड्रेस' झालेला दिसला नाही किंवा तो फरक चुकून इग्नोर केला गेलेला असावा. >>> तुम्हालाही नक्की काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. उदाहरण देऊन सांगाल का प्लीज. स्त्री-पुरुष शारीरिकदॄष्ट्या वेगळे आहेत त्यामुळे काही बाबतीत वेगळेपण राहणारच हे मान्यच आहे. तसे लिहिलेही आहे. स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय ? स्त्री/पुरुष कुणीही असलं तरी त्याला ठराविक अपेक्षांमध्ये अडकवून ठेवू नये, समाजाचं प्रेशर न घेता त्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य कसं घालवावं हे निवडता यावं हा एकच विचार मी मांडला आहे :)

नैसर्गीक भाग पुरा झाल्यानंतरही मुलाला आईबद्दल व आईला मुलाबाद्दल जी शारिरीक व मानसिक अ‍ॅटॅचमेन्ट निर्माण झालेली असते ती पुरुषाबाबत होणे नैसर्गीकरीत्या जवळपास अशक्य आहे. >>> हीच ती लिंगसापेक्षता ज्याबद्दल मी बोलले आहे. वात्सल्यभावना स्त्रियांमध्ये जास्त प्रबळ असते आणि पुरुषांमध्ये कमी असे चित्र समाजात बघायला मिळते असे मानले ( त्याचे कारण जीवशास्त्रीय आहे की सोशल कंडिशनिंग हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ) तरी पुरुषांमध्ये ती नसतेच असं म्हणणं फारच धाडसी विधान वाटलं. समाजाच्या प्रेशरला घाबरुन ती दडपून टाकायची प्रवॄत्ती दिसू शकते. आणि वात्सल्य नसणार्‍या 'पाषाणहॄदयी' स्त्रियाही असतातच की :) 'व्यक्ती तितक्या प्रकॄती' हे सत्य आहे पण ही स्त्री आहे म्हणून ही अशीच आणि हा पुरुष आहे म्हणून हा तसाच अशी लेबलं सरसकट लावणे ( निदान काहीजणांसाठी तरी ) अन्यायकारक असू शकते.

'लिंगनिरपेक्षता' समाजात सर्वदूर रुजवणे ही कठीण गोष्ट आहे पण लिंगनिरपेक्षता ( मी ज्या अर्थाने घेतलीय त्या अर्थाने ) अस्तित्वातच नाही असं मला तरी वाटत नाही. लिंगाधारित कामाची विभागणी न करता केवळ सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे कामांची वाटणी करुन सुखाने आयुष्य जगणारी / लिंगाधारीत ओळखीच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारी लोकं आपल्या आसपास आहेत, सगळ्यांनीच पाहिली असतील.

*लिंग हा शब्द जेंडर ह्या अर्थाने वापरला आहे.

अगो, छान लिहिलं आहेस. नेमकं आणि प्रामाणिक. :)

एकदम सुस्पष्ट विचार आणि मांडले पण आहेत सुटसुटीत. आवडला आणि पटला लेख.

अगो, छानच. अवघड विचार अगदी सोप्या शब्दात स्पष्ट केले आहेस.

माझ्या मते लिंगनिरपेक्षता अस्तित्वात आहेच. परंपरेने बहाल केलेल्या चष्म्यातून ती धूसर दिसते. चष्मा उतरवला की लख्ख
>>> परफेक्ट! :)

सुस्पष्ट आणि मुद्देसूद लेख! इतक्या कठीण विषयावर लिहायला कसं काय जमतं बुवा तुम्हा मंडळींना? :)

छान लेख अगो. :)

छान मांडलं आहेस, अगो!

अगो: तुम्ही लेख फारच छान लिहिला आहे. तुम्ही सोशल सायकॉलॉजीचा अभ्यास केलेला दिसतो. खरेच खूप विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.

आधी बेफिकीर यांच्या मुद्द्याकडे : लिंगनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता यांतील फरक :- माझ्या मते लिंगनिरपेक्षता ही "अधिक करुन" विवाहसंबंधाच्या आशयाने येते असे ढोबळमानाने म्हणता येईल. जसे: लग्न, शरीरसंबंध, मूल होताना मुलगा की मुलगी हे ठरवणे इत्यादी. स्त्री-पुरुष समानता ही "अधिक करुन" सामाजिक आशयाने येते असे ढोबळमानाने म्हणता येईल. जसे: नोकरी, खेळ, व्यवसाय, अर्थार्जनाची इतर ठिकाणे, विविध "प्रोफेशन्स" आदि सामाजिक नात्यांच्या अनुषंगाने स्त्री-पुरुष समानतेचा विचार होतो. अर्थातच, हे ढोबळमानाने केलेले वर्गीकरण झाले. त्यांतही "इंटरमेशिंग" आहेच.

तसेच, <<पण ही कामं तिच्यावर आली म्हणून हा नैसर्गिक भाग पार पडल्यानंतरही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी बहुतांशी तिच्यावरच राहील, हे कुणी ठरवले ?>> याबद्दलही थोडेसे: सर्व समाज, धर्म, संस्कृती इत्यादींमध्ये सतत स्थित्यंतर घडत आले आहे. एकेकाळी स्त्रीप्रधान असलेल्या प्रदेशात आज पुरुषप्रधानता दिसून येते. त्या-त्या समाजांत झालेल्या काही स्थित्यंतरांमुळे असे बदल घडत गेले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मोगल आक्रमकांनी जसजशी स्त्रियांवरील अत्याचारांना सुरुवात केली, तसतसे मराठी समाजाने, निसर्गदत्त देणगीमुळे, आपल्या समाजातील स्त्रियांना लपविण्यासाठी / वाचविण्यासाठी नवनवे मार्ग शोधले. ही पॉझिटिव बाजू कोणी विचारात घेतलेली दिसत नाही. वास्तविक संस्कृती लवचिक असल्यामुळेच ती अधिकाधिक परिपक्व होत असते. आज भारतीय समाजात असलेले स्त्रियांचे स्थान इतर देशांतील समाजापेक्षा नक्कीच "वरचे" आहे. एका मर्यादे पलिकडे कुठल्याही समाजात सामाजिक स्थित्यंतर घडून येत नाही. आज आपण सिनेमांमधून सुंदर "सेक्सी" स्त्रियांनी केलेली उत्तान दृश्ये / नृत्य पाहतो, ती चित्रित करण्याचे धारिष्ट्य त्या-त्या स्त्रियांमध्ये समाज अधिक प्रगत झाल्यामुळे आले आहे की प्रगत समाज म्हणजे काय याविषयी असलेल्या गैरसमजांमुळे, ते तुम्हीच ठरवा. पण महत्त्वाचे म्हणजे स्त्री व पुरुष असे निसर्गाला वेगळे घडवायचे होते म्हणूनच ना त्याने (आता निसर्गाला "त्याने" असे म्हटले जाते, "तिने" नाही, याला मी काही करु शकत नाही! :) ) पालनपोषणाची जबाबदारी स्त्रियांवर सोपवली? म्हणजे साधारणपणे पुरुषांनी शिकारीला जायचे नि स्त्रियांनी पालनपोषण करायचे असे "ढोबळमानाने" ठरवले ते "निसर्गाने" (हो, निसर्गदेवता म्हणा हवे तर !), पुरुषांनी नाही. जर आपण असे म्हणू लागलो की स्त्रियांनीच का म्हणून पालनपोषण करायचे, पुरुषांनी का नाही, तर मग पुरुषांनीच का म्हणून शिकारीला जायचे, स्त्रियांनी का नाही? असे म्हणायचे का? :) .............. ५० % आरक्षण येऊनही किती स्त्रियांनी त्याचा फायदा घेतला आहे सरकारी आस्थापनांत / राजकारणात / पंचायत समित्यांत / सोसायट्यांच्या कारभारात? वृत्ती / लैंगिक ओळख पुसली जात नाही. त्यात काही गैर नाही. स्त्री-पुरुष समानता म्हणजे "आहे त्या लैंगिक / शारीरिक / सामाजिक / आर्थिक / वैषयिक / इतर जाणिवा / फरक / मर्यादा / ताकदींसकट आपल्या जोडीदाराला (पती / पत्नीला, मित्र / मैत्रिणीला / जोडीदाराला) स्वीकारणे व त्याला / तिला पदोपदी मदत करण्याचा प्रामणिक प्रयत्न करणे" एवढा आणि एवढाच आहे. हेच आपल्या लग्नात आपल्याला सांगितलेले असते, नाही का?

शेवटी, पुन्हा एकदा तुम्ही लिहिलेल्या सुंदर व विचारप्रवण लेखाबद्दल धन्यवाद.

विषयातील क्लिष्टता सोपी करून चांगल्या पद्धतीने मांडलेय. लेख आवडला.

माझ्या मते लिंगनिरपेक्षता अस्तित्वात आहेच. परंपरेने बहाल केलेल्या चष्म्यातून ती धूसर दिसते. चष्मा उतरवला की लख्ख ! >> क्या बात कही है!!! या वाक्याबद्दल तुला १००० मोदक! :)

सुंदर लेख !!

लेख प्रचंडच आवडला. सगळे क्लिष्ट अगदी सोपे करुन सांगितलय. :)

अगदी बेसिक व्याख्या स्पष्ट झाल्या ह्या लेखामुळे. खुप आवडला.

अगो,छान लिहिले आहेस.आवडले.

अगो,
आज वाचले.. छान लिहीलयस.. तुझे वैयक्तीक विचार "स्पष्ट" आहेत हे जाणवते. एकंदरीतच "लिंगनिरपेक्षता" याची व्याख्या बहुरंगी असल्याने अ‍ॅबसुल्यूट भूमिकेतून तपासणे अवघड आहे पण तरिही या लेखात तू दिलेली ऊदाहरणे निश्चीतच संदर्भास धरून आहेत.

>>>>माझ्या मते लिंगनिरपेक्षता अस्तित्वात आहेच. परंपरेने बहाल केलेल्या चष्म्यातून ती धूसर दिसते. चष्मा उतरवला की लख्ख !
आता परंपरा आधी का लिंगनिरपेक्षता आधी हे आधी कोंबडी की अंडे सारखे असल्याने मला वाटते दोन्ही एकमेकास पुरक असतील, किमान मारक ठरत नसतील, ईतपत समाजमन होईल तेव्हा यातील बर्‍याच "गैरसमजातून" मुक्त व्हायला वाव आहे. तोपर्यंत संघर्ष सर्वांसाठीच आहे..

मला असे वाटते की मुळात लिंगनिरपेक्षता याला जैविक/वैज्ञानिक आधार नाही कारण मनुष्य जन्माला येतानाच स्त्री/पुरूष असे लिंग (देह) विशेषण घेवून येतो. समान जीवनात मात्र लिंगनिरपेक्षता या संकल्पनेला अनेक प्रकारे वाव आहे.

रच्याकने: शस्त्रक्रीया करून लिंग बदलून घेणारे लोक यांना नेमके काय अभिप्रेत असते हाही एक उत्सुकतापूर्ण विषय आहे.