संपादकीय

नमस्कार मंडळी,

'संयुक्ता'तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने विशेष उपक्रम करण्याचे हे तिसरे वर्ष. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांशी संबंधित विषय आणि उपक्रम असणे हे तसे यथायोग्यच. त्याप्रमाणे दोन वर्ष स्त्रियांना वा स्त्रीवादाला केंद्रस्थानी ठेवून उपक्रम केले गेले.

व्यक्ती जन्माला येताना स्त्री वा पुरुष म्हणून जन्माला येते. ते त्या त्या व्यक्तीचं जीवशास्त्रीय सत्य. परंतु जन्मापासून शेवटापर्यंत प्रत्येक वेळी, प्रत्येक घटनेत त्या व्यक्तीच्या असण्यात स्त्री वा पुरूष असणं एवढंच असतं का? तर नाही. तसं तर नसतं. स्त्री वा पुरूष असण्याआधी मनुष्यप्राणी असणं हे एक जीवशास्त्रीय सत्य असतंच.

स्त्री वा पुरूष असण्याचे जीवशास्त्रीय सत्य आणि त्यानुसार असलेली समाजाची बांधणी याच्या प्रतिक्रियेतच कुठेतरी स्त्रीवादाचा उगम मानता येईल. मानवाच्या इतिहासात सुरूवातीपासून आत्तापर्यंत स्त्री वा पुरूष असण्यावर उभारलेली असली तरी समाजाची बांधणी वेगवेगळ्या कारणांनी, मूल्यांनुसार बदलत आलेली आहे. म्हणजेच असं म्हणता येऊ शकतं की, स्त्री वा पुरूष असण्याचे दोन भाग आहेत. त्यातला एक जीवशास्त्रीय जो सहजगत्या बदलता येऊ शकत नाही आणि दुसरा भाग मानसिक व सामाजिक पातळीवरचा जो देशानुसार, कालानुसार आणि व्यक्तीनुसार बदलत राहतो.

याचाच अर्थ असा की, मानसिक वा सामाजिक पातळीवरचं अस्तित्व (जेण्डर) हे संपूर्णपणे जीवशास्त्रीय सत्याशी (सेक्स) जोडलेलं आहे, असं म्हणता येणार नाही. तस्मात जीवशास्त्रीय सत्यामुळे मानसिक-सामाजिक अस्तित्वावर विनाकारण अनेक बंधने लादली गेलेली आहेत असं नक्कीच म्हणता येईल. ही बंधने समाजात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेली असतील. तसेच कधी ना कधी तरी जीवशास्त्रीय सत्याच्या पलीकडे जाऊन, स्त्री/पुरूषपण बाजूला ठेवून केवळ माणूस म्हणून व्यक्त होणे हेही प्रत्येकाने अनुभवले असेल.

हे निखळ माणूसपण अनुभवणे ही कदाचित एका अतिशय सुंदर अशा समाजाच्या घडण्याची नांदी असेल का? तसे असेल तर समाजाचा अर्धा भाग असलेल्या स्त्रियांनी महिला दिनाचे निमित्त साधून माणूसपणाला हाक घालणार्‍या लिंगनिरपेक्षतेबद्दल चर्चा करण्याचे योजणे हे वावगे ठरू नये. हाच विचार करून या अंकाचे शीर्षक 'निरभ्र' असे ठेवले आहे.

या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. निखळ माणूसपणासंदर्भाने ह्या विषयाचा शोध घेताना इतरही अनेक गोष्टी हाताला लागू शकतात. स्त्री वा पुरूष म्हणून येणारी सामाजिक व मानसिक बंधने यांपासून शरीराने स्त्री व मनाने पुरूष (अथवा उलट) असलेल्या व्यक्तींचे प्रश्न, स्त्री वा पुरूष दोन्हीच्या जीवशास्त्रीय खुणा घेऊन जन्माला आलेल्या तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रश्नांपर्यंत सगळ्याच गोष्टी या विषयात समाविष्ट होऊ शकतात. स्त्री वा पुरूष ही शारीर ओळख (आयडेन्टिटी) बाजूला काढून ठेवून/ नकार देऊन जोडलेले विशुद्ध वगैरे असलेले नाते ते शारीर अनुभवांतून पार पल्याड गेलेले निखळ नाते अशा अनेकविध नात्यांचा धांडोळा लिंगनिरपेक्षतेच्या कक्षेत येऊ शकतो. दैनंदिन राहणीमानाशी निगडीत असलेल्या कपडे, पादत्राणे ते लॅपटॉप अशा असंख्य वस्तूंबद्दल विचार करताना त्या वस्तूंच्या आकाराउकाराचा लिंगसापेक्षतेकडून लिंगनिरपेक्षतेकडे होणारा प्रवास आणि त्याचा समाजमानसाशी असलेला संबंध, याचा विचार आपण याच स्टेशनावर थांबून करू शकतो. विविध लोककलांमध्ये वा संगीत नाटकात स्त्रीभूमिका करणारे कलाकार, ऑपेराच्या जगामध्ये वरच्या पट्टीचा स्त्रीआवाज खराब होऊ नये म्हणून घडवलेले आणि पुरुष म्हणून जन्माला आलेले 'कास्त्राती', एलिझाबेथन काळातल्या नाटकांतलं विरुद्धलिंगी कपडे घालणं आणि अशा अनेक गोष्टींबद्दल याच विषयाच्या अंतर्गत समजावून घेऊ शकतो.

कुठल्याही विषयावर चर्चा करताना त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून काही ज्ञानकण मिळाले तर विषय समजायला मदत होते. ओरिसातील फकीर मोहन विश्वविद्यालयात समाजशास्त्र शिकवणार्‍या तनया मोहान्ती यांचा लिंगाधारीत ओळख (आयडेन्टिटी) या संदर्भाने असलेला लेख यादृष्टीने उपयुक्त ठरावा. या लेखासाठी तनया मोहान्ती यांचे विशेष आभार.

विषय दिसतो तितका सोपा आणि सहज नाही ह्याची नम्र जाणीव ठेवूनच संयुक्ता व्यवस्थापनाने या विषयाला हात घातला आहे. हा परिसंवाद-विशेषांक आहे. विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या लेखांवर सर्व बाजूंनी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय परिसंवाद पूर्ण होणे अशक्य आहे. विशेषांकासाठी आलेल्या लेखांच्या संदर्भाने एक आढावा घेतलेला आहे. तोही जरूर वाचावा. विषय महत्त्वाचा आहे आणि चाचपडत का होईना शोध घेण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे असे व्यवस्थापनाला आणि परिसंवाद संयोजकांना नक्की वाटते.

हा विशेषांक प्रत्यक्षात येण्यासाठी आम्हाला अनेकांनी मदत केली. अंकासंदर्भाने पहिला विचार संयुक्ता व्यवस्थापनात मांडला गेला आणि व्यवस्थापनाने तो उचलून धरला. अंकाचे मुखपृष्ठ नीलू यांनी अतिशय कमी वेळत करून दिले. संपूर्ण अंकाचे मुद्रितशोधन चिनूक्स यांनी करून दिले. या सर्वांचे आणि ज्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत झालेली आहे त्या सर्वांचे संयोजक मंडळाकडून विशेष आभार. तसेच ह्या उपक्रमाचे संयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेबमास्तर यांचेही आभार.

- संपादक मंडळ

प्रतिसाद

संपादक मंडळाचे अभिनंदन आणि आभार.

तस्मात जीवशास्त्रीय सत्यामुळे मानसिक-सामाजिक अस्तित्वावर विनाकारण अनेक बंधने लादली गेलेली आहेत असं नक्कीच म्हणता येईल. ही बंधने समाजात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेली असतील. तसेच कधी ना कधी तरी जीवशास्त्रीय सत्याच्या पलीकडे जाऊन, स्त्री/पुरूषपण बाजूला ठेवून केवळ माणूस म्हणून व्यक्त होणे हेही प्रत्येकाने अनुभवले असेल. >>>
छान थोडक्यात आढावा. संपादकीय आवडले.

नीलू- मुखपृष्ठ सुरेख आहे.

नीधप, नीलू, अगो, नादखुळा, नानबा, पराग, सानी, स्वाती२: संपादकीय खूप सुंदर लिहिले आहे.

संपादकीय आणि मुखपृष्ठही छान.
विषय दिसतो तितका सोपा आणि सहज नाही ह्याची नम्र जाणीव ठेवूनच संयुक्ता व्यवस्थापनाने या विषयाला हात घातला आहे.>>>
यासाठी विशेष कौतुक!

थोडक्यात आढावा घेऊनही किती सखोल मुद्दे मांडले आहेत. हा विषय म्हणजे एक शिवधनुष्यच होते. या निमित्ताने चांगली चर्चा वाचायला मिळेल आणि मिळो. धन्यवाद.

अभिनंदन सर्व संबंधितांचे :-)

>>>हा विषय म्हणजे एक शिवधनुष्यच होते. >>>>>+१
अभिनंदन!! अंक सुरेख आहे.

मुखपृष्ठ आवडले . फोटो अगदी समर्पक आहेत. अंक वाचते आहे , सावकाशीने.

बर्‍यापैकी नेब्युलस विषयावर चर्चा घडवून आणण्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचे, मायबोली प्रशासकांचे अन संपादक मंडळाचे अभिनंदन व आभार

मुखपृष्ठ आवडले. फोटोही मस्त निवडले आहेत. अंक अजून वाचायचाय.

मुखपृष्ठ आणि संपादकीय आवडले.

हा विषय चर्चेसाठी छेडल्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापन आणि संपादक मंडळाचे अभिनंदन! लेख वाचायची खूप उत्सुकता आहे. आता सावकाशीने एकेक वाचते. चर्चेमध्ये यथायोग्य सहभाग घेण्याचा प्रयत्न करेनच.

संपादक मंडळाचे आणि साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अंक सुंदर झालाय.

छान आहे संपादकीय !!

मुखपृष्ठ नेत्रसुखद व विषयासाठी समर्पक आहे तर संपादकीय नेटके, विषयाच्या व्याप्तीची जाणीव करून देणारे झाले आहे. सर्व संपादक मंडळी, सहभागी झालेली मंडळी व पडद्याआडच्या मदतनीसांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक!! आणि असा विषय हाताळण्याबद्दल व त्यावर चर्चा घडवून आणण्याबद्दल संयुक्ता आणि मायबोली प्रशासनाचे खास आभार! :)

संपादक मंडळ :
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
कुठल्याही विषयावर चर्चा करताना त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांकडून काही ज्ञानकण मिळाले तर विषय समजायला मदत होते. ओरिसातील फकीर मोहन विश्वविद्यालयात समाजशास्त्र शिकवणार्‍या तनया मोहान्ती यांचा लिंगाधारीत ओळख (आयडेन्टिटी) या संदर्भाने असलेला लेख यादृष्टीने उपयुक्त ठरावा. या लेखासाठी तनया मोहान्ती यांचे विशेष आभार.

विषय दिसतो तितका सोपा आणि सहज नाही ह्याची नम्र जाणीव ठेवूनच संयुक्ता व्यवस्थापनाने या विषयाला हात घातला आहे. हा परिसंवाद-विशेषांक आहे. विशेषांकात प्रसिद्ध झालेल्या लेखांवर सर्व बाजूंनी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय परिसंवाद पूर्ण होणे अशक्य आहे. विशेषांकासाठी आलेल्या लेखांच्या संदर्भाने एक आढावा घेतलेला आहे. तोही जरूर वाचावा. विषय महत्त्वाचा आहे आणि चाचपडत का होईना शोध घेण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे असे व्यवस्थापनाला आणि परिसंवाद संयोजकांना नक्की वाटते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
या आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कृपया मूळ लेख उपलब्ध करुन द्यावा, ही पुनश्च विनंती.