आम्ही आणि आमचे सोशल कंडीशनींग

विवारची सकाळ होती. घड्याळाच्या टिकटिकीवर लक्ष ठेवत हालचाल करण्याचं बंधन नव्हतं म्हणून घटका दोन घटका गरम चहाचा घोट घेत घेत एकीकडे वर्तमानपत्र चाळण्याची चंगळ करण्याची सोय होती. तिचाच लाभ घेत आम्ही वर्तमानपत्र वाचत वेळ सत्कारणी लावत होतो. कचरेवाला, दूधवाला येऊन गेला होता आणि पाणी यायला पूर्ण वीस मिनिटांचा अवधी होता म्हणून निवांत वाचत होतो.

(आता हे असं वाक्य सुरुवातीलाच लिहीलंत की झालेच समजा तुमच्या लेखाचे दोन तुकडे! एक तुकडा तुम्हाला करोडो मोदक देणार आणि दुसरा तुकडा म्हणणार, ''आम्ही सांगितलंय घड्याळापाठी धावा म्हणून? काय उगाच ज्यात त्यात एन्कॅश करणं!''. असो. आपण आपली लहानपणी ऐकलेली आणि आता आपापल्या लहानग्यांना झोपताना 'गोष्ट हव्वीये'चे हट्ट पुरवताना ऐकवलेली ती 'गाढव, वडील आणि मुलाची' गोष्ट आठवायची आणि एक स्मित ठोकून द्यायचं)

तर नमनालाच असं घडाभर तेल वाहून झालंय तेव्हा मुद्द्याकडे वळूयात. वर्तमानपत्र चाळता चाळता आतल्या पानावरच्या सगळ्यात खालच्या रकान्यात छापलेल्या एका छोट्या बातमीने आमचं लक्ष वेधून घेतलं (असं लिहिलंत की तुम्ही वर्तमानपत्र बारकाईने वाचता हे सूज्ञ वाचकाला आपोआप कळतं.)

"समस्त स्त्रिया ह्या पपू जाधवच्या पुजारी आहेत" किंवा "समस्त स्त्री वर्गावर पपू जाधवचा पगडा आहे" असं काहीसं ते वाक्य होतं. (आता असं "किंवा" लिहून तुम्ही लिहिलंत वाक्य की, दोन मतं फिक्स! एक म्हणणार
''ह्यांचं ह्यांना आठवत नाही काय वाचलं ते'' तर दुसरे म्हणणार ''भावार्थ महत्वाचा! तो लक्षात आहे ना मग झालं तर.'' तुम्ही ह्या मतमतांतरात पडायचं नाही.)

हा कोण बॉ पपू जाधव? काय रणबीर कपूर लागून गेला की गेला बाजार शाहीद कपूर लागून गेला हा?(आजकाल ह्याची चलती आहे/होती म्हणतात. ह्यातलं आज आणि आहे मध्ये रणबीरची चलती आणि काल आणि होती मध्ये शाहीदची चलती असे वाचावे) मग खाली केलेल्या खुलाशात त्याचा उलगडा झाला. पपू जाधव म्हणजे परंपरा,पूजा, जात, धर्म आणि वर्ण म्हणे. हे म्हणजे लहानपणी ते 'यमुनाबाई आगाशे' म्हणायचो त्यासारखं झालं. पण आम्हांला त्यांचं मत अजिबात म्हणजे अजिबातच पटलं नाही. जुन्या जमान्यातल्या, आमच्या कायद्याने नातेवाईक झालेल्या काही नातलग मंडळींबद्दल हे अगदी म्हणजे अगदी १०१% खरं असलं तरी पण आजच्या जमान्यातल्या आमच्यासारख्या मॉड बायांसाठी हे म्हणजे भलतंच ऑड विधान झालं.

आता काल आम्ही अष्टमी होती म्हणून देवीची ओटी भरून आलो, तो भाग निराळा. ते म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी जस्ट माहीत असाव्यात म्हणून. काय चालू ठेवायच्या नि काय बंद करायच्यात हे त्यांनी ठरवायला मुळात हे म्हणजे 'काय' हे माहीत असावं म्हणून केलेला तो एक खटाटोप होय. आधीचे दिवस काही 'अडचणींमुळे' शक्य झालं नाही म्हणून अष्टमीला गेलो. आता ह्या सगळ्याचा त्या पपू जाधवशी काही एक संबंध नाही.

ह्यांचं आपलं काहीतरीच बाई ते बोलणं. आता हे देवीची ओटी भरणं, कुमारी पूजन झालंच तर हळदी कुंकू समारंभ, श्रावणातली सवाष्ण नि बटू भोजन हे हे सगळं उत्साहाने करणं म्हणजे काय त्या पपू जाधवच्या आहारी जाणं झालं का? सांगा तुम्हीच.

ह्या निमित्ताने भेटी गाठी होतात. नाहीतर आजकाल आहे कुणाला वेळ कुणाकडेही मुद्दाम विनाकारण जायला? आता जाऊबाईंना अजून काही इश्यू नाही आणि सासरेबुवा गेले म्हणून आईंना ओटी भरता येत नाही मग आम्हांलाच करावं लागणार ना हे सगळं?

ह्यांचं काय जातंय व्यासपीठावरुन नुसतं वाक्य टाकून टाळ्या मिळवायला? ह्यांनाच विचारावं का की कुठच्या कुठच्या मंदिरांत, पूजेत बायांना असलेली बंदी हे पण त्या पपू जाधवचंच कारस्थान काय म्हणून?

पण जाऊदे! त्यांचा तरी काय दोष म्हणा! आजकाल व्याख्याते अशी टाळीची वाक्ये पेरतातच. नाही पेरली तर फाऊल धरत असावेत. हमखास टाळीवाली आणि हमखास हास्य पिकवणारी वाक्ये ही 'फॉर द नेमसेक' ह्या उक्तीप्रमाणे फक्त व्याख्यानात पेरण्यासाठीच असतात हे सगळ्यांना ठाऊक नसल्याने कधी कधी लढाई पेटू शकते. आणि मग पोलिसांना कशाकशावर किंवा कोणाकोणावर जाहीर बंदी घालावी लागते. (खाजगीत ती लागू नसते तो भागही वेगळा)

पुन्हा एकदा मुद्दा भरकटला पण मुद्दे हे भरकटण्यासाठीच असतात नाही का? भलत्या ट्रॅकवर गाडी घातली तर अपघाताची शक्यता ९९.९९% नी वाढते म्हणतात (हे असे टक्के बिक्के लिहीणं हे 'मस्ट' असतं - तुमचा अभ्यासबिभ्यास असल्याचा फ़ील निर्माण करायला!) तर पुन्हा एकदा असोच. मुद्द्याला भरकटू द्यायच्या आधीच बोलूयात.

तर मुद्दा होता पपू जाधवचा. तर हे वाक्य फक्त आणि समस्त स्त्रीवर्गाकरता वापरणाऱ्या इसमाचा खरंतर राग वगैरे आलेला. त्याला 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' लिहून झाडावं का? असा विचार करत होतो पण सध्या आम्ही झाडझूड, धू-पूस ही कामं आऊटसोर्स केली आहेत. शिवाय दुसऱ्याच पानावर "सोशल कंडिशनिंग म्हणजे ऑलरेडी एस्टॅब्लिश केलेलं सॉफ़्टवेअर होय" असा उल्लेख वाचून जीव हलका झाल्याने आम्ही तो विचार बाद ठरवला. हे सॉफ्टवेअरचं उदाहरण आम्हाला आवडलं.

प्रोग्रॅमिंगच्या डिफॉल्ट सेटींगमुळे समस्त बाया, बाप्ये हे असे वागतात. म्हणजे परंपरा पाळणे, बायांनी अमुक करणे, बाप्याने तमुक न करणे हे सगळं त्या प्रोग्रॅमचा परिणाम आहे. ओके! म्हणजे आम्हांला बदल हवे असतील तर कोणीतरी प्रोग्रॅमरने हे बदल प्रोग्रॅमिंग करतानाच करायला हवेत. प्रोग्रॅमिंग बदललं तर सगळंच बदलेल. पण आता हा प्रोग्रॅमर शोधायचा कुठे आणि कोणी? त्याचा तेवढा विचार व्हायला हवा. बरं, बदल करणारा प्रोग्रॅमर आला तरी सुरवातीला ट्रायल-एरर मेथडनेच कामकाज होणार. तर सॅम्पल रन होताना खडखडाट होणार काय? झाल्यास किती? बग्ज सोडणारेही प्रोग्रॅम तज्ञच असतात म्हणे. ह्या सगळ्याचा एकदा निवांत विचार करायला हवा पण तरीही हे उदाहरण आवडलेच आम्हाला. प्रोग्रॅमिंग म्हटलं की अपडेटेड वर्जन्स आली, बग्ज आले, अपडेटेड वर्जन्स सपोर्ट करणारं नवीन किंवा मॉडिफाईड इन्फ़्रास्ट्रक्चर आलं. आमचं जुनं इन्फ़्रास्ट्रक्चर नवीन प्रोग्रॅमला सपोर्ट करेल का? की आमच्या ऑफ़िसातल्या संगणकप्रणालीसारखं इथेही 'सिस्टीम एरर..' येईल? तसं असेल तर ऑफिसने सिस्टीम्स अपडेट केल्या तसंच आम्हालाही करावे लागेल काय? आणि करावं लागल्यास ऑफिसने त्या डेबीट खर्चाच्या बदल्यात बोनस मधून वजावट केली तसं आम्हांला करावे लागेल काय? आणि कसे?

आता खरं तर हे प्रोग्रॅमिंग का काय त्यातलं विशेष सोडा पण बेसिकसुद्धा आम्हाला कळत नाही. पण नुकताच "तुमची रुटीन मोनोटोनस कामं" हलकी होतील असं सांगत आमच्या ऑफिसने एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम खरेदी करुन आमच्या मशीनवर टाकला. त्याकरता जो जास्तीचा खर्च झाला त्यामुळे आमचा बोनस कमी झाला
ह्यावरुन आम्ही 'आमच्या फायद्याच्या गोष्टीकरता किंमतही आम्हालाच चुकवावी लागणार' असा बोध घ्यावा काय? तसं असेल तर मग ह्या सोशल कंडिशनिंगचा, जुन्या नव्या प्रोग्रॅमिंगचा नि त्याच्या त्याच्या किंमतीचा आलेख मांडायला हवा बॉ एकदा निवांत.

एकदा असंच निवांतपणे ह्या सोशल कंडिशनिंगवर विचार करायला हवा. तूर्तास मिळालेला वीस मिनिटांचा निवांत वेळ भस्सकन वहायला लागलेल्या नळामुळे संपुष्टात आल्यामुळे आम्ही पाणी भरणे ह्या कामाला लागलो.

नंतर पोटपूजा ह्या महत्त्वाच्या कार्यात गढून गेल्याने आणि उतू जाणारं दूध, वाया जाणारा गॅस ह्यातलं काही एक परवडण्यासारखं नसल्याने आम्ही स्वयंपाकघर व्यवस्थापनासारख्या गहन विषयात व्यस्त झालो. (व्यवस्थापन आणि व्यवस्थापक हे दोन शब्द वापरले की ऐकणारा आणि वापरणारा दोघांनाही भारी फील येतो म्हणतात.)

सांग्रसंगीत जेवण प्रोग्रॅम आटोपून मागचं आवरताना आम्ही अहोंना विडा आणायच्या कामगिरीवर पिटाळलं. जाण्यापूर्वी माळ्यावरुन मोठं पातेलं खाली काढून घेतलं! (आता आलीय ना दिवाळी जवळ मग चिवड्यासाठी लागणारच की आणि हवाच ना पुरुषांचा सहभाग कामामधे).

'स्वत:नी' (अहोंनी)आणलेला विडा खाऊन एक हलकीशी हक्काची डुलकी घेण्यापूर्वी सोशली कनेक्टेड रहावं म्हणून आम्ही आमचं फेसबूक अकाउंट ओपन केलं. चेतन भगत नामक तरुणाईच्या एका आवडत्या लेखकाचं 'इंडियन विमेन'वरचं एक आर्टिकल कोणीतरी आमच्या टाईमलाईनवर शेअर केलेलं, तेच आम्ही देखील शेअर केलं, लाईक केलं. ई-पत्रातून आलेलं 'विमेन पॉवर'वरचं इमेल वाचून प्राऊड वाटून घेतलं. त्याच सद्गदीत मूडमध्ये असताना दुसऱ्या एका साईटवर चाललेल्या सनातन स्त्री विरुद्ध पुरुष युद्धात उडी घेऊन जिंकू किंवा मरू म्हणत तुटून पडलो.

हे सगळं बौद्धिक घेऊन होईपर्यंत साडेतीन वाजत आले. मग काय झोपून फायदा? 'तिकडून चहाऽऽ असं फर्मान येईल आता' असं मनाशीच पुटपुटत आम्ही स्वयंपाकघराच्या दिशेने कूच केलं. चहा देता देता संपलेल्या टोस्टची आठवण 'स्वत:' ना करुन देत ते मात्र "त्यांनीच आणले पाहिजेत" असं ठणकावून सांगितलं. (म्हणजे काय? - समानता आहे ही, कामाची वाटणी ही हवीच बॉ!)

त्यात आणि आज आमच्या महिला मंडळाचा पाचवा वर्धापन दिन होता. ह्यावेळी काहीतरी इंटेलेक्च्युअल कार्यक्रम हवा होता. "नेहमीचे हळदी कुंकू कार्यक्रम, उखाणे, नाचगाणी नि खेळ नक्कोत बाई" असं आम्ही गेल्याच मिटींगला बजावलं सगळ्यांना! म्हणून ह्यावेळी वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्यात होत्या. 'चूल आणि मूल ह्यात अडकून न पडलेली आजची आधुनिक स्त्री' हा अस्मादिकांचा भाषणाचा विषय होता. आमच्या मंडळातल्या अर्ध्याहून अधिक बायका ह्या निव्वळ गृहिणीपद भूषवण्यात धन्यता मानतात. त्यांचं बौद्धिक घ्यायची नामी संधी आम्ही थोडीच सोडणार होतो अशी सहजासहजी?

तिकडून यायला अंमळ उशीर होणार होता आम्हांला. तेव्हढे ३-४ तास आमचं कन्यारत्न आमच्याशिवाय राहिलं म्हणजे मिळवलं! काय आहे ना, इतर दिवशी ऑफिसमुळे नसतो ना आम्ही घरी! मग विकांतावर हक्क सांगणारच ना ही मुलं! तशी समजूतदार आहे हो बाळी आमची. तिचं संध्याकाळचं खाणं काढून डायनिंग टेबलावर ठेवलं होतं. रात्रीचा स्वयंपाकही तयार होता. आम्हाला उशीर झालाच तर तो तेव्हढा मायक्रोवेवमधे गरम करुन घ्यावा लागला असता इतकंच. तिथे जाईपर्यंत ह्या सगळ्या विचारांनी आमची पाठ पुरवली. मात्र तिथे गेल्यावर आमच्यात त्या भाषण करायच्या कल्पनेनेच वीरश्री संचारली.

तिथलं आमचं भाषण इतकं आवडलं ना अध्यक्षीण बाईंना! दर दोन वाक्यानंतर माझ्याच भाषणाचा उल्लेख करत होत्या त्यांच्या भाषणात. त्या सातपुतणीचा असला जळफळाट झाला ना आम्हाला पहिलं बक्षिस दिलं तेव्हा. आम्हाला मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेल्यासारखं वाटलं दोन क्षण. पण मेला कार्यक्रम उशीरा सुरू झाला आणि खानपान सेवा सुरु होईपर्यंत ८ वाजत आले तसा आमचा जीव काही तिथे राहीना. कसेबसे चार घास खाल्ले नि घराकडे निघालो. घरी आलो तेव्हा लेक आईच्याच हातून जेवणार म्हणून थांबून राहिलेली, म्हणून तिला भरवून घेतलं."अश्श नाई कलायचं ले शोन्या, जेवायचं बाबाच्या हातून पण" असं भरवता भरवता बोलताना एकीकडे मनात मात्र बच्चा पार्टी आपल्यावर अवलंबून असल्याचं सुख वाटत राहीलं. तिला भरवताना मध्येच बाकीच्यांची जेवणं आटोपून आत आलेल्या सासूबाई म्हणाल्या "कसली गं त्या बापटांची सून!. बाहुली नुसती. 'एक गोरी नि शंभर गुण चोरी' म्हणतात त्यातली गत तिची. दोन कामं नाही केली तर गळपटते नुसती. मी म्हटलं बापटीण बाईला आमच्या सूनबाई बघाऽऽ!! घरदार, आला-गेला, नोकरी, ३ वर्षाची छोकरी, सणवार, कुळाचार सऽऽगळं व्यवस्थित करते."

अहाऽऽहा!!! साक्षात सा.बाईंचं प्रशस्तिपत्रक म्हणजे विद्यापीठात डीनकडून सुवर्णपदकच!. त्या कौतुकात न्हाऊन निघत आम्ही अंगावर चढलेलं मूठभर मांस जाळायला जास्तीची कामं काढली. शेवटी असं मांस चढत गेलं तर बेढब नाही का होणार आम्ही!

आमचे 'स्वत:' भारी प्रेमळ हो!! रात्रीच्या जेवणानंतर मागचं आवरायला आपण होऊन मदत करतात. आमची कामं हलकी व्हावीत म्हणून जातीने लक्ष घालतात. आता हेच बघा ना - आम्हाला पाणी भरा, ते गाळा, तुरटी फिरवा, झालंच तर ते चांगलं २० मिनिटं उकळून घ्या असले सोपस्कार करत बसायला लागायचे - विशेषत: पावसाळ्यात! कित्ती वेळखाऊ काम हो हे. आमचे स्वत: आमच्या कष्टाचा सन्मान करणारे हो अगदी. म्हणून तर गेल्या महिन्यात ते पाणी शुद्धीकरणाचं यंत्रच आणून बसवलेलं त्यांनी घरात. आता सुरुवातीला शंकाच यायची त्यातून ग्लासात पडणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची. उकळून घेणे हीच तेवढी एकमेव योग्य पद्धत वाटायची. जुनं ज्ञानच योग्य मधला 'च' अनलर्न केला तेव्हा कुठे नवीन सिस्टिम पण योग्य आहे हा साक्षात्कार झाला. असं मधेच नाही हो आठवलं हे आम्हाला. कुठेतरी गेल्या आठवड्यात वाचलेला "लर्निंग अनलर्निंग रिलर्निंग" चा फंडा आणि ह्या पपू जाधव नि प्रोग्रॅमिंगचा काहीतरी संबंध आहे असं उगाचच राहून राहून वाटतंय झालं. डोक्याला एक प्रकारचा भुंगा लागल्यासारखं झालंय खरं.

ते तेवढं सोशल कंडिशनिंग, माईंड सेटिंगविषयी विचार करायचं राहूनच गेलं बाई आज आमचं! इतका व्यस्त गेला ना दिवस आमचा, इतकी महत्वाची कामं होती आज समोर, तर रहाणारच ना?. ही काही अशी गोष्ट नाही एका सेकंदात केला विचार. ही कशी अत्यंत सखोल गोष्ट आहे त्यावर विचार करायचा म्हणजे तेवढा निवांत वेळच हवा. एकदा निवांतपणे या सगळ्याला तो "लर्निंग अनलर्निंग रिलर्निंग" वाला फंडा लावून बघायला हवं. आता उद्या ट्रेनमधेच विचार करावा म्हणते त्यावर. तर असो आता शुभरात्री. भेटू उद्या.

- कविन

प्रतिसाद

भारी लिहिलय :)

लेखातला एकंदरीत विचार चांगला आहे.. पण मधे मधे लेख मुद्द्यापासून भरकटल्यासारखा वाटला.. कंसातली वाक्य काही ठिकाणी फार annoying वाटली...

भारी लिहिलाय लेख. आवडला.

कंसातली वाक्य नसती तरी चालली असती.

:-) खरंय

आवडला लेख! भारीच जमलाय!

आवडला...

चिमटे जमलेत ;)

:)

मस्त !

छान लिहिलंयस :-)

लेख आवडला.

छान लिहिलंय. चिमटे, कोपरखळ्या, गुदगुल्या भारी.

छान आहे ..