सब कुछ सीखा हम ने, ना सीखी होशियारी

सं पाहिलं तर दिल्लीला एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला मुकेशचंद माथुर चित्रपटांच्या मायावी दुनियेत येण्याचं काही खास कारण नव्हतं. पण बहिणीला गाणे शिकवायला गुरुजी घरी यायचे तेव्हा शेजारच्या खोलीत बसून या महाशयांची संगीतसाधना सुरु असायची. साहजिकच, एकदा सुरांचं वेड लागल्यावर रूढ शिक्षणात कुठली गोडी वाटणार! त्यामुळे दहावीनंतर शिक्षण सुटलं आणि PWD मध्ये नोकरी करत असताना एकीकडे गाण्याचा आणि चित्रपटात काम करण्याचा ध्यास जोपासायला सुरुवात केली. प्रख्यात चित्रपट-कलाकार मोतीलाल हे मुकेशचे दूरचे नातेवाईक. मुकेशचा आवाज ऐकल्यावर आग्रहाने आपल्या घरी मुंबईला घेऊन आले आणि पं. जगन्नाथ प्रसादांकडे रीतसर गाण्याच्या शिक्षणाची सोय केली. सुदैवाने लवकरच 'निर्दोष' या चित्रपटात नलिनी जयवंतबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. चित्रपटात काम करण्यासारखं व्यक्तिमत्त्व तर होतंच. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही चित्रपटात भूमिका केल्याही. पण मुकेशचं लहानपणापासूनचं दैवत म्हणजे सुप्रसिद्ध गायक-नट कुंदनलाल सैगल. त्यामुळे मुकेशच्या सुरुवातीच्या गायकीवर सैगलची छाप अगदी जाणवण्यासारखी होती - इतकी की 'पहली नज़र' चित्रपटात संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे मुकेशनी एक गाणं गायलं, जे अतिशय लोकप्रिय झालं - 'दिल जलता है तो जलने दो' आणि असं म्हणतात की सैगलनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की हे गाणं आपण कधी म्हटलं ते आठवत कसं नाही! शेवटी त्यांच्याबरोबर असणर्‍या कोणीतरी सांगितले की हे त्यांनी म्हटलेले नसून मुकेश म्हणून एक नवीन गायक आहे त्याने म्हटले आहे. हळूहळू पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी तर वाढतच होती शिवाय कामही खूप येऊ लागलं तशी दुर्दैवाने गायन आणि अभिनय यांत निवड करण्याची वेळ आली. सुदैवाने मुकेशनी गायनाची निवड केली, नाहीतर कितीतरी अजोड गाण्यांना आपण मुकलो असतो! एकदा पूर्णपणे पार्श्वगायन करायचं ठरवल्यावर मात्र नौशादच्या मदतीने मुकेशनी स्वतःची अशी गायकी निर्माण केली.

मुकेशनी कुणासाठी पार्श्वगायन केलं नाही? दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शशी कपूर, मनोज कुमार, संजीव कुमार... किती म्हणून नावं घ्यावीत! पण मुकेशचा आवाज सगळ्यांत जास्त भावला राज कपूरसाठी पार्श्वगायन करताना - इतका, की मुकेशच्या अकाली निधनानंतर राज कपूरने श्रद्धांजली वाहताना म्हटले की मी आज आवाज गमावला! बरं ही सगळी कारकीर्द करताना तलत, रफी, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार - हे बिनीचे कलाकार बरोबरीने चित्रपटसृष्टी गाजवत होतेच! पण तरी मुकेशचा आवाज इतका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा होता की अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र, मदन मोहन, रोशन, हेमंत कुमार, शंकर-जयकिशन, सचिन देव बर्मन, ओ. पी. नय्यर, सलिल चौधरी, जयदेव, कल्याणजी-आनंदजी, खय्याम, चित्रगुप्त, लक्ष्मीकांत-प्यारेलाल - थोडक्यात त्या कालावधीतल्या सगळ्या नावाजलेल्या संगीतकारांना या आवाजाची भुरळ पडली. अर्थात यात आश्चर्य ते काय? स्वच्छ उच्चार, शुद्ध वाणी, गाण्यातल्या भावाशी एकरुप होण्याची नैसर्गिक देणगी, जोडीला भरपूर रियाज आणि कष्ट - हे सगळं असल्यावर पाणीदार मोत्यासारखी गाणी त्या गळ्यातून बाहेर पडत राहिली आणि रसिकांना रिझवत राहिली; इतकी की जिवंतपणी मरण भोगायला लावणाऱ्या चित्रपटाच्या या मायावी दुनियेला या आवाजाचा मोह मृत्यूनंतरही सुटला नाही! चार वेळा फिल्म फेअर पुरस्कार आणि 'रजनीगंधा' चित्रपटातील 'कई बार युँ भी देखा है' या गाण्यासाठी पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेच पण त्याहूनही जास्त मोलाची गोष्ट मुकेशनी मिळवली ती म्हणजे चाहत्यांचं अजोड प्रेम! मृत्यू होऊन जवळपास सदतीस वर्षं होऊनही रसिकांच्या मनात मुकेशची जागा कोणालाच घेता आलेली नाही - अगदी बराचसा तसाच आवाज असलेल्या मुकेशच्या मुलाला - नितीन मुकेशलाही!

Mukesh.jpgमुकेश हे नाव उच्चारलं की बर्‍याच वेळा आपल्या कानात आपल्याही नकळत 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना' हे किंवा अश्या प्रकारचं मनाचा ठाव घेणारं एखादं गाणं वाजायला लागतं. पण खरं तर अशी मनातलं दु:ख ओठांवर आणणारी गाणी मुकेशनी गायली, अगदी मनापासून आणि प्रभावीपणे गायली; पण मुकेशची एक पार्श्वगायक म्हणून ओळख या अश्या गाण्यांपुरतीच मर्यादित नाही. लंबकाच्या दुसर्‍या टोकाला असावी तशी प्रेमात आपलं सर्वस्व समर्पित करणारी भावनाही तितक्याच ताकदीने या आवाजाने आपल्याला दिली आणि आश्चर्य म्हणजे 'जो तुम को हो पसंद वोही बात करेंगे' हा प्रेमाचा वसंत मुकेशच्या आवाजात जितका आपल्या मनावर प्रेमाची जादू करतो तोच आवाज 'कहीं दूर जब दिन ढल जये' असा मनाचा थंडीने गोठून बर्फ करतो तरी तितकाच भावतो, नव्हे झपाटतो. आज मुकेशच्या आवाजातला हा दु:खाचा बर्फाळ हिवाळा आणि प्रेमाचा वसंत या दोन सकृतदर्शनी परस्पर विरोधी पण खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू बघायचा विचार आहे.

अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये

हिवाळ्यातली एखादी गोठलेली संध्याकाळ असावी. बाहेर केव्हाच अंधार पडलाय! खरं तर उठून घरात एखादा तरी दिवा सुरु करावा. पण त्यानी काय होईल? मनात दाटलेला एकटेपणा, आठवणींचा ससेमिरा त्याने थोडाच दूर होणार आहे? नेमकं घरी कोणी नसतं अश्या वेळी. अर्थात, असतं तरी काही बोलावंसं वाटलं असतं याची खात्री नाहीच. हे असं एकट्यानीच आठवणींत हरवणं बरं का वाटतंय? भुरभुरणारा बर्फ नक्की बाहेरच पडतोय ना? असं एका जागी बसायचाही कंटाळा येऊन उठावं आणि गाणी लावावीत तर ती नेमकी मनातल्या तालाशी जुळवून घेतात. बरोबर, ही तर मुकेशच्या आवडीच्या गाण्यांची प्ले-लिस्ट... एकेका आवाजात उपजतच दर्द असतो! त्या आवाजात इतरही अनेक प्रकारची गाणी आपल्याला आवडतात. त्यात त्याच आवाजातली प्रेमगीतं असतात, द्वंद्वगीतं असतात - ती ही छान प्रेमाची, उडत्या चालीची असतात, तशीच विरहाचीही, भजनं असतात, गज़ल असतात, देशभक्तीपर गीतंही असतात. कधी चक्क शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणंही ऐकायला मिळतं तर बऱ्याच वेळा जीवन-मरणाच्या खेळावर, तत्त्वज्ञानाने भरलेलीही गाणी असतात. थोडक्यात काय, तर कोणत्याही हरहुन्नरी पार्श्वगायकाकडून चोखंदळ श्रोत्याची ज्या अपेक्षा असतात, त्या सगळ्या तो आवाज अगदी समर्थपणे पार पाडतो, ते ही कित्येक दशकं - अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! मुकेशची गायकी मला सगळ्यांत जास्त भावते ती त्याच्या या दर्दभऱ्या गाण्यांसाठी. तशी मुकेशच्या आवाजात वर म्हटलेली सगळ्या प्रकारची गाणी आहेत, अगदी माझ्या आवडीचीही! पण तरी माझ्या मनाला भिडतो तो त्या आवाजातला दर्दच. बहुतेक मनाची आंदोलनं तो दर्द अचूक पकडतो, मनात भरुन राहिलेल्या हिवाळ्याला आपल्या आवाजाच्या दुलईत लपेटून टाकतो म्हणून असेल.

खरं तर माझा स्वभाव काही फार गंभीर वगैरे नाही. 'चुपके चुपके' पासून 'टॉम अँड जेरी' पर्यंत सगळ्या प्रकारचे आणि वयोगटासाठीचे विनोदपट पाहताना मी डोळ्यांतून पाणी येऊन पोट दुखायला लागेपर्यंत हसू शकते. 'अवघाचि संसार' मधली निरागसता मोहवते. 'आनंद मठ' किंवा अगदी 'बॉर्डर' पाहतानाही विदेशी शत्रूला हरवायच्या जिद्दीने माझ्या मुठी आवळल्या जातात. 'वोह कौन थी', 'बीस साल बाद' किंवा 'कोहरा' कितीही वेळा पाहिला तरी त्यातला थरार आजही जाणवतो. 'गॉन विथ दि विंड', 'कॅसाब्लांका' किंवा 'दि लास्ट सामुराई' पाहताना त्या पात्रांबरोबर मी ही तो प्रवास करते आणि नकळत अंतर्मुखही होते. 'आनंद', 'खामोशी' सारखे चित्रपट वेगळ्या अर्थाने डोळ्यांतून पाणी काढतात, पण तरी ते परत-परत पहावेसे वाटतात. पण तरी गाणी ऐकताना नकळत दर्दभऱ्या, मन व्याकुळ करणाऱ्या गाण्यांची प्ले-लिस्ट आपोआप लावली जाते. क्वचित कधी विचार करण्याचा प्रयत्न केला, की अशी दर्दभरी गाणी आपल्याला का आवडतात जास्त? आधी म्हटले तसे माझा स्वभाव गंभीर तर नाहीच, पण माझं आयुष्यही चार-चौघांसारखंच आहे की! सगळ्यांच्याच आयुष्यात येतात तसे दुःखाचे क्षण माझ्याही आयुष्यात आलेच, पण गोळाबेरीज केली तर सुखाचे क्षण कणभर जास्तच भरतील... मग असं असेल का? ही अशी गाणी या मुळात चांगल्या कविता असतात; मग त्याला तशीच चपखल चाल आणि असा अंतर्बाह्य हलवून टाकण्याची ताकद असलेला आवाज लाभला तर आपसूकच ती गाणी मनाला नुसती स्पर्शून जात नाहीत, तर आपली हक्काची जागा मनात निर्माण करतात! अशी ही काही माझ्या मनात स्वतःची हक्काची जागा घेऊन राहिलेली मुकेशची गाणी.

कहीं दूर जब दिन ढ़ल जाये (आनंद) - पूर्ण गाणं म्हणजे एक तरल भावशिल्प आहे... कविता, कविता म्हणतात ती हीच! १९७१ सालचा हा चित्रपट म्हणजे हसू आणि आसू यांचं अजब मिश्रण आहे! चित्रपट सुरु झाल्यावर काही मिनीटांतच आपल्याला कळतं की चित्रपटाचा नायक आनंद याचा मृत्यू झालेला आहे. चित्रपट सुरु होतो फ्लॅशबॅकने. कॅन्सरमुळे मोजके आयुष्य राहिलेला आनंद शेवटचे दिवस मुंबईत काढावेत आणि आपला जीवलग मित्र डॉ. कुलकर्णी (रमेश देव) याला भेटावे या हेतूने मुंबईला येतो. पण हे हाती राहिलेले मोजके क्षण आनंदला 'जगायचे' असतात. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याकडून मिळते प्रेम आणि हसू याची देणगी. इतकी, की अतिशय गंभीर वृत्तीचा आणि आजार टोकाला गेलेल्या प्रत्येक पेशंटचं दुःख जणू आपल्या खांद्यावर वहात असावा असा डॉक्टर भास्कर बॅनर्जीही हळूहळू सैलावत जातो, आनंदमध्ये गुंततो. दिग्दर्शक हृषिकेष मुखर्जींचा हा चित्रपट 'आवर्जून पहायलाच हवा' अश्या कोणत्याही यादीत अगदी सहज स्थान मिळवतो. 'बाबू मोशाय' ही हाक या चित्रपटाचा जणू ट्रेड-मार्क बनली. संगीतकार सलिल चौधरी आणि गीतकार योगेश या दोघांच्याही कारकिर्दीला 'आनंद'ने जणू संजीवनी दिली.

KahiiDoor1.jpgकोणाही सोबत असताना सतत हसणारा आणि हसवणारा आनंद एकटा असताना मात्र अंतर्मुख होतो, आपलं दुःख जणू तो फक्त स्वतःबरोबरच वाटून घेतो. हे सगळं अतिशय नेमकेपणाने या गाण्यात येतं. ते ही इतकं हळुवारपणे की जणू आपल्या मनाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही ही आपली घालमेल, मनाचं कोलमडणं दिसू तर नयेच, पण जाणवूही नाही.

कहीं तो ये दिल कहीं मिल नहीं पाते
कहीं निकल आये जनमों के नाते
है मीठी उलजझन, बैरी अपना मन
अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये

KahiiDoor2.jpgआणि अचानक जाणीव होते की जगाला आपण कितीही फसवलं, तरी आपल्या मनाला नाही फसवू शकत. ती भंगलेली स्वप्नं, ते दुःख आपल्या मनाच्या सोबतीला कायमच असणार आहेत कारण तेवढेच तर आपले स्वतःचे, आपले एकट्याचे आहेत...

दिल जाने, मेरे सारे, भेद ये गहरे
हो गये कैसे मेरे, सपने सुनहरे
ये मेरे सपने, यहीं तो है अपने
मुझ से जुदा ना होंगे इनके ये साये, इनके ये साये

हे गाणं ऐकल्याशिवाय राहवत नाही आणि ऐकलं की दर वेळी एक अनामिक हुरहुर लागुन राहते. कधी सकाळी जाग येते तेव्हा हे गाणं डोक्यात वाजायला आधीच लागलेलं असतं आणि मग पूर्ण दिवस ती हुरहुर पाठलाग करत राहते. गाण्यात म्हटलंय, अगदी तशी अवस्था होते - 'है मीठी उलझन, बैरी अपना मन । अपना ही होके सहे दर्द पराये'. मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द गाण्याचे भाव असे काही टिपतो की तो आवाज आणि गाणं जणू एकच होतात. असं वाटतं की हे एवढं एक गाणं म्हणण्यासाठी जणू मुकेशचा जन्म झाला असावा!

बहारों ने मेरा चमन लुटकर (देवर) - लहानपणचं जग किती वेगळं असतं ना! निरागस मैत्री, छोट्याश्या कारणावरुन होणारी भांडणं, 'मी तुझ्याशी कध्धी कध्धी बोलणार नाही जा!!!' असं म्हणून रागवून घरी पोहोचायच्या आत कधी एकदा भेटून एकदम आठवलेली आणि सांगायची राहिलेली गंमत सांगतो असं होणं... पण खरं तर प्रेमिकांचं जगही अगदी असंच असतं ना? त्यातून लहानपणच्या जीवलग मैत्रीचं रुपांतर मोठं झाल्यावर आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीत झालं तर! नशीबही असं की नेमका तिचाच रिश्ता येतो, पण घराण्याची रीत अशी की लग्नाआधी मुलाने मुलीला पहायचे नाही. मग यावर उपाय? तो तर घरातच असतो! त्यामुळे नायकासाठी सांगून आलेली मुलगी पहायला त्याचा मामेभाऊ जातो आणि नायक आपल्या या भावासाठी सांगून आलेली मुलगी पहायला. फरक इतकाच, की नायकाच्या डोक्यात हे पक्कं असतं की आपण जी मुलगी पाहतोय ती भावासाठी, पण भावाला मात्र होणारी भावजय पाहून तिच्या सौंदर्याचा आणि गुणांचा मोह होतो; ही मुलगी आपली भावजय न होता आपलीच पत्नी व्हावी यासाठी तो दोन्ही घरी रिश्ता ठरत असलेल्या मुलाचे अवगुण वर्णन करणारे पत्र पाठवतो. आणि त्याला हवी असलेली मुलगी त्याची पत्नी होते.

Devar1.jpgदुर्दैवाने नायकाचे लग्न मात्र शिकलेल्या पण श्रीमंतीमुळे गर्वीष्ठ मुलीशी होते आणि जेव्हा तिला कळतं की आपला नवरा इंग्रजी अजिबात शिकलेला नाही, तेव्हा ती हे लग्न नाकारुन माहेरी परत निघुन जाते. इकडे नायकाला आपली भावजय हीच आपली बालपणीची मैत्रीण आणि नंतर जिचं स्वप्न पाहिलं आणि जिच्याशी आपलं लग्नही होणार होतं तीच असल्याचं कळतं. शिवाय मामेभावाने लिहीलेली ती दोन्ही पत्रेही मिळतात. त्यामुळे चिडून तो त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जातो आणि तिथे या गाण्याच्या रुपात आपली कैफियत मांडतो.

बहारों ने मेरा चमन लुटकर खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया
किसी ने चलो दुष्मनी की मगर, इसे दोस्ती नाम क्यों दे दिया

गाण्याचे दुसरे कडवे फार सुरेख आहे. चित्रपटाची कथा लक्षात घेऊन गीतकार आनंद बक्षींनी या गीताचे लेखन केले होते हे अगदी ठसठशीतपणे आपल्यासमोर येते.

Devar2.jpg

मुझे क्या पता कभी इश्क में रक़ीबों को क़ासिद बनाते नहीं
खता हो गयी मुझ से क़ासिद मेरे तेरे हाथ पैग़ाम क्यों दे दिया

अतिशय अर्थपूर्ण कडवं आहे. रक़ीब म्हणजे प्रेमातला आपला प्रतिस्पर्धी आणि क़ासिद म्हणजे निरोप्या. थोडक्यात, नायक, आपल्या भावाला स्पष्टपणे जाणीव करुन देतो की जे काही केले ते आपल्याला कळलेले आहे. विश्वासाने ज्याला आपल्या वतीने स्वतःसाठी मुलगी पहायला पाठवली, त्यानेच कट-कारस्थान करुन आपला विश्वासघात केला आणि आपल्या प्रियतमेशी लग्न करुन मोकळा झाला.

संगीतकार रोशननी अतिशय सुरेल पण तरीही थोडी गंभीर अशी चाल गीताला दिली आहे. मुकेशनीही नेहमीपेक्षा थोड्या वरच्या पट्टीतलं हे गाणं इतकं सुरेख म्हटलं आहे की वरचे सुर असुनही, वाव असुनही गाणे कर्कश किंवा चिडखोरपणाचे न वाटता, नायकाच्या मनातलं विश्वासघाताचं दुःख, प्रेयसी गमावल्याचं दुःख, आणि या सगळ्यामुळे होणारी मनाची घुसमट टोकदारपणे आपल्यापर्यंत पोहोचते.

जो प्यार तुम ने मुझको दिया था (दुल्हा दुल्हन) - जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ती निराधार असताना तिला आधार दिला, रहायला जागा दिली, लोक काही-बाही बोलु लागल्यावर तिच्याशी लग्न केलं, ती नेमकी दिवाळीच्या रात्री सोडून निघून जावी, तिला शोधुन काढलं, तर तिने ओळखणं तर दूरच, पण तिला आठवावं म्हणून ती आपली पत्नी असल्याचं तिला सांगितल्यावर तिने चक्क थप्पड मारावी! हे असं तुकडे-तुकडे झालेलं मन घेऊन कुठे जायचं? तिच्या आयुष्यातून दूर हे तर नक्की, कारण जिला शोधण्यासाठी आपलं घर-दार, काम-धंदा सोडला तिलाच जर आपली ओळख पटत नसेल तर तिच्या मूळच्या श्रीमंती आयुष्यात आपल्याला कशी जागा असेल? पण हा खेळ खेळायला नियतीला आपणच का मिळालो? का ती आपल्या आयुष्यात आली? का गेली?

हम को खबर भी होने नहीं दी
किस मोड़ पर लाके दिल तू ने तोड़ा
अपना बनाना रहा दूर, तू ने
अौरों के हो जाये, ऐसा न छोड़ा
तेरी जफ़ा का चर्चा ही कैसा
अपनी वफ़ा पे मैं शरमा रहा हूँ

DulhaDulhan.jpg१९६४ सालच्या 'दुल्हा दुल्हन' या चित्रपटाचे नायक-नायिका होते राज कपूर आणि साधना. नियतीचे फासे असे काही पडतात की जहागीरदार बापाची मुलगी असलेली साधना लग्नावरुन वडिलांशी वाद घालते. बाप-लेकीचे भांडण विकोपाला जाते आणि अचानक वडलांचा हात आपल्या लाडक्या लेकीवर उठतो. तेव्हा पडल्यामुळे आणि त्या धक्क्याने स्मृतीभ्रंश झाल्याने साधना घर सोडून जाते. सैरभैर होऊन वैतागून जीव द्यायला जाते तेव्हा राज कपूर तिला वाचवतो आणि आपल्याबरोबर मुंबईला घेऊन येतो, चाळीतल्या एका खोलीतल्या आपल्या घरात. तिच्या तो आणि ती त्याच्या केव्हा प्रेमात पडतात, दोघांनाही कळत नाही. लग्न होतं आणि अचानक दिवाळीच्या दिवशी तिची स्मृती परत येऊन ती वडलांकडे परत जाते. तो तिला भेटायला जातो पण दुर्दैवाने त्या मधल्या काळातले काहीच तिच्या लक्षात नसते. नाईलाजाने नायकाला नियतीचा ही क्रूर चेष्टाही स्विकारायला लागते. पण मनाचं काय? त्याची समजूत कशी आणि कोणी घालायची? तिच्यावर जे निस्सीम प्रेम केलं त्याचं काय करायचं? गीतकार इंदीवर आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी हे सगळं अचूक पकडलं - जेमतेम दोनच कडवी, पण नायकाची पराभूत प्रेमाची कहाणी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. एकही शब्द - छे, एकही अक्षर, एकही सुर आवश्यकतेपेक्षा जास्त नाही की कमी नाही. आणि आवाज मुकेशचा असला तरी ते आपलं गाण्याची माहिती छापण्यासाठी. कारण राज कपूरचा गाण्याचा आवाज म्हणजेच मुकेशचा आवाज. इतकं तादात्म्य पावलेले कलाकार विरळाच.

मेरे टुटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे (छलिया) - १९६० सालचा 'छलिया' हा फाळणीवर आधारीत चित्रपट. नूतन, राज कपूर, प्राण, रहमान अशी तगडी स्टार कास्ट अक्षरशः वाया घालवणं केवळ मनमोहन देसाईंनाच जमू शकतं असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होऊ नये! खरं तर १९६० साली अजून फाळणीचं दुःख पूर्णपणे विसरलं गेलं नव्हतं. कथेचा गाभाही काही वाईट नाही. नूतन आणि रहमान लाहोरमध्ये रहात असतात, दोघेही चांगल्या सुस्थितीतल्या घरचे, शिकले-सवरलेले. एकमेकांना पसंत करुन, मोठ्या धुमधड्याक्यात लग्नही होतं. पण तेवढ्यात फाळणीचा भडका उडतो आणि दोघांची ताटातूट होते. आपलं शील वाचवत, गुंडापासून कसातरी आपला बचाव करत ती लपून छपून भारताच्या दिशेने यायचा प्रयत्न करत असते. अश्या वेळी तिला आसरा मिळतो एका अनपेक्षित ठिकाणी! अब्दुल अहमान नावाचा गुंड तिला वाचवतो, आपल्या घरी बहिण मानून आसराही देतो. तेव्हाच तिला ती गर्भवती असल्याचं कळतं तिला मुलगा होतो, पण तिला आणि तिच्या मुलाला वाचण्यासाठी तो मुलाला शिकवतो की कोणी नाव विचारले तर 'अब्दुल रहमान' म्हणून सांगायचे. थोडे शांत झाल्यावर तो तिला आणि मुलाला दिल्लीच्या गाडीत बसवून देतो. सुदैवाने दिल्लीत तिची आपल्या नवऱ्याशी भेटही होते. ती भेटल्यावर त्याला आनंद होतो, पण तो फार वेळ टिकत नाही, कारण ती जेव्हा त्यांच्या मुलाशी ओळख करुन देते आणि तो मोठ्या आनंदाने मुलाला हृदयाशी कवटाळून त्याचे नाव विचारतो, तेव्हा तो शिकवल्याप्रमाणे सांगतो 'अब्दुल रहमान'. झालं - एका क्षणात बायको भेटल्याचा आनंद तिच्यावरच्या संशयाने मिटून जातो आणि तो तिला नशीबाच्या हवाल्यावर सोडून मोकळा होतो. तिची अवस्था रामायणातल्या सीतेसारखी होते. ती मुलाला अनाथाश्रमात सोडून मिळेल ते काम करुन पोट भरु लागते. तिला रहायला जागा आणि आसरा देतो एक गुलहौशी स्वभावाचा पण गरज पडल्यास गुंडगिरी करणारा छलिया. ती आपल्याबद्दल काहीच सांगत नाही... कुठल्या तोंडानी सांगणार होती की नवऱ्याने भलता संशय घेऊन तिला आणि मुलाला वाऱ्यावर सोडले होते! तिच्या सालस आणि शांत स्वभावावर तो लुब्ध होतो आणि आपले प्रेम व्यक्त करुन तिच्याशी लग्न करण्याबद्दल बोलू लागतो तेव्हा मात्र नाईलाज होऊन ती विवाहीत असल्याचे सांगते. क्षणार्धात प्रेमभंग झालेला गुलहौशी छलिया आपल्या तुटलेल्या हृदयाची व्यथा सांगतो -

मेरे टूटे हुए दिल से होई तो आज ये पूछे
के तेरा हाल क्या है, के तेरा हाल क्या है

Chhaliya.jpgकल्याणजी-आनंदजींच्या संगीतात एक वेगळीच जादू आहे. ऐकायला मधुर आणि सोप्या चाली, गाण्याची जात आणि पडद्यावरचे कलाकार पाहून त्याप्रमाणे चपखल अशी गायकाची योजना यामुळे गाणं अलगद आपल्या मनात कधी ठाण मांडतं ते आपल्यालाही कळत नाही. कमर जलालाबादींनी छलियाचं व्यक्तिमत्त्व आणि त्याची मनोवस्था हे दोन्ही ध्यानात घेऊन गीताचे शब्द लिहीले आहेत. हे पहिलंच कडवं पहा ना -

किस्मत तेरी रीत निराली
अो छलिये को छलनेवाली
फूल खिला तो टुटी ड़ाली
जिसे उल्फ़त समझ बैठा, मेरी नज़रों का धोखा था
किसी की क्या खता है, किसी की क्या खता है

पडद्यावर राज कपूरने गावं तर ते मुकेशच्याच आवाजात हे या अश्या गाण्यांमुळे जास्तच अधोरेखित होतं.

हम ने अपना सब कुछ छोड़ा प्यार तेरा पाने को (सरस्वतीचंद्र) - १९६८ सालचा हा चित्रपट पडद्यावर झळकलेला अखेरचा कृष्ण-धवल चित्रपट. मूकपटापासून सुरुवात केलेला हिंदी चित्रपट असंख्य बरी-वाईट वळणं घेत विविध रंगांत स्थिरावला त्यालाही आता कित्येक दशकं होऊन गेली. अगदी 'सरस्वतीचंद्र' ज्या वर्षी प्रकाशित झाला त्या आधीच रंगीत चित्रपट रुळायला सुरुवात झाली होती. पण तरी दिग्ददर्शक गोविंद सरैयांनी 'सरस्वतीचंद्र' या गोवार्धनराम त्रिपाठींच्या गुजराथी महाकादंबरीवर जेव्हा चित्रपट पडद्यावर आणायचं ठरवलं तेव्हा त्यासाठी कृष्ण-धवल कॅनव्हास निवडला. नायिकेच्या भूमिकेत नूतनची निवड केल्यावर नायक कोण याने फारसा फरक पडत नाही कारण कोणताही चित्रपट, कोणतीही भूमिका आपल्या खांद्यावर पेलण्याचं सामर्थ्य तिच्या आभिनयात होतं. या चित्रपटाचं नाव हे खरं तर चित्रपटाच्या नायकाचं नाव! तेव्हा नायकाच्या भूमिकेत एखादा प्रस्थापित आणि खंदा अभिनेता असणं स्वाभाविक झालं असतं. कोणत्याही अभिनेत्याला आव्हान वाटावे इतके सामर्थ्य या भूमिकेत नक्कीच आहे. पण तरी सरैयांनी निवड केली नवोदित अभिनेता मनीष याची. उच्चविद्याविभूषित, उच्चकुलीन, श्रीमंत घरातील तरुण पण मनात इच्छा मात्र लोकसेवेत जीवन घालवण्याची. वडिल लग्न ठरवतात तेव्हा नाईलाजाने तो मुलीला पहायला जातो आणि सुंदर आणि सुशील नूतनच्या प्रेमात पडतो. सगाई होते, दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवायला लागतात, एकमेकांना पत्र लिहून आपलं मन मोकळं करतात. पण नायकाची आजी मरताना तिची सगळी इस्टेट नायकाच्या नावे करते आणि त्याला आधीच पाण्यात पाहणाऱ्या त्याच्या सावत्र आईला हे सहन होत नाही. वडिलांना क्षोभ होऊ नये आणि घरातील सौख्य टिकावे म्हणून तो नूतनला आणि तिच्या घरी पत्र लिहून घरातील परिस्थितीमुळे लग्न करता येत नसल्याचे कळवतो. नाईलाजाने तिचे वडिल दुसऱ्या ठिकाणी तिचे लग्न ठरवतात. इकडे मित्राच्या आग्रहामुळे सरस्वती तिला भेटायला यायला निघतो - निष्कांचन असला तरी ती त्याच्याशी लग्न करु इच्छिते का हे विचारण्यासाठी, पण वादळात बोट उलटल्यामुळे तो तिच्या घरी पोहोचतो तोवर तिची डोली निघत असते. ते पाहून विषण्ण अवस्थेत नायक म्हणतो,

हम ने अपना सब कुछ खोया, प्यार तेरा पाने को
छोड़ दिया क्यों प्यार ने तेरे दर-दर भटकाने को

गीतकार इंदीवर यांनी नायकाची मनोवस्था अतिशय सुरेख पकडली आहे गीतात. गुजराथी पार्श्वभूमी असल्यामुळे कल्याणजी-आनंदजींचं संगीत या चित्रपटात अगदी खास खुललं आहे हे खरंच, की तो माझ्या मनाचा खेळ कुणास ठाऊक!

SaraswatiChandra.jpg

का कोणास माहीत हे गाणं एकीकडे नायकाच्या मनातील दुःख तर दाखवतेच पण शिवाय कुठेतरी त्याला कडवटपणाची झालर आहे असं वाटत राहतं. कारण दुसऱ्या कडव्यात नायक भारतीय परंपरेला अनुसरुन विवाह झाल्यावर आता पतीशी एकनिष्ठ रहा अशी इच्छा मनाशी व्यक्त करतो खरी, पण त्याच वेळी प्रेमाची वेदी ही आपल्यासाठी चिता झाल्याचं शल्यही त्याच्या मनात आहे.

उसकी रहे तू, जिसकी हो ली, तुझको मुबारक प्यार की ड़ोली
बैठ गये हम ग़म की चिता पर, ज़िंदा जल जाने को
प्यार तेरा पाने को

मुकेशबद्दल बोलताना पुष्कळ वेळा त्याच्या आवाजातील त्रुटींचा उल्लेख केला जातो. आवाज बरेच वेळा एकसुरी वाटतो, शास्त्रीय धर्तीची गाणी पेलत नाहीत... मला यातलं फारसं काही कधी जाणवत नाही. तसे असेलही; पण माझ्या मते हे त्याच्या आवाजाचे विश्लेषण झाले. आणि मी गाणी मनाने ऐकते, डोक्याने नाही. त्यामुळे जी गाणी माझ्या मनाला भिडतात ती मला आवडतात. कुठे तरी त्या गाण्यांशी माझिया मनीचे नाते जुळते. ती गाणी आठवली की दिवसभर माझी पाठ धरतात, भुताने झाड धरावं तशी - आणि मला ते खूप आवडतं... म्हणूनच मला मुकेशच्या आवाजातल्या या त्रुटींचा त्रास होत नाही. माझ्यासाठी जमेच्या पारड्यात बरंच काही आहे. ज्याच्या आवाजातला दर्द मला भिडतो, ज्याच्या आवाजातला धीरगंभीर पण संयमित शोक मला हलवून सोडतो, त्याला समजा शास्त्रीय धर्तीची गाणी देणं संगीतकारांना आवडत नसेल तर नसो! माझं काहीच अडत नाही त्यामुळे. माझ्यासाठी 'अपना ही होके सहे दर्द पराये' हेच पुरेसं बर्फाळ सत्य आहे.

तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे

काय गंमत आहे पहा! आत्ताच मी म्हणत होते की मुकेशच्या आवाजातला उपजत दर्द मला भावतो आणि त्यामुळे त्याच्या आवाजातली मन व्याकुळ करणारी गाणी मनात ठाण मांडून बसतात. ते लिहिताना, ती गाणी एकीकडे मनात वाजत असतनाच माझं दुसरं मन मुकेशचीच अगदी दुसऱ्या टोकाची गाणी गुणगुणत होतं - प्रेमाच्या परमोच्च आविष्काराची गाणी! कडाक्याच्या थंडीनंतर हळूच वेलीवर उमलणार्‍या कळीने किंवा दुरुन कानावर पडणार्‍या कोकिळेच्या सुरावटीने वसंताची चाहूल द्यावी, तितक्याच अलगदपणे मनात प्रेम उतरतं, नव्हे अगदी ठाण मांडून बसल्याचं आपल्यालाच सांगतं. कारण वेलीवर फुललेलं फूल काय, कोकिळेची लकेर काय किंवा अचानक जाणवलेलं प्रेम काय - या सगळ्या वसंताच्या करामती एकट्यासाठी नसतातंच; हे सगळं वैभव वाटून घ्यायचं असतं. विशेषतः प्रेम! आणि गंमत म्हणजे ही गाणीही म्हणावीत तर मुकेशनीच. एकाच आवाजात पराकोटीचे दुःख आणि तितकेच उत्कट प्रेम या दोन्ही भावना अगदी सार्थपणे व्यक्त करण्याच सामर्थ्य असावं असं फार कमी होतं. पण मुकेशच्या आवाजात ही किमया फारच सहज वाटते. पण नमनाला घडाभर तेल कशाला? आपण वानगीदाखल काही गाणीच बघुया ना...

मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने (आनंद) - ज्या चित्रपटात मुकेशनी 'अपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये...' सारखी चित्रपटाचा नायक आनंद याच्या अंतर्मनातल्या भावना व्यक्त करणारी, अप्रतिम काव्यरचना सादर केली, त्याच चित्रपटात 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने' सारखे निख्खळ प्रेमाची, आनंदाची भावना व्यक्त करणारे गाणेही तितक्याच प्रसन्नपणे सादर केले. 'कहीं दूर जब दिन ढ़ल जाये' म्हणून आपल्यातच हरवलेला आनंद तो हाच का? त्या आनंदचे दुःख आपल्या आवाजात सहज मिसळणारा हाच का तो मुकेशचा आवाज? कसं शक्य आहे?

MaineTereLiye.jpg या गाण्याची सुरुवातच 'मैने' अशी थोडीशी प्रोजमध्ये पण खोडकर आवाजात मुकेश करतो - जणू पुढे येणाऱ्या एका सुंदर गाण्याची प्रस्तावनाच त्या एका शब्दात होते. संगीतकार सलिल चौधरींबद्दल काय लिहीणार? त्यांची संपूर्ण कारकीर्द या आणि अश्या असंख्य गाण्यांनी सजलेली आहे. या गाण्यातही आनंदचं जीवनावरचं प्रेम, त्याचं झोकून देणं सुरांत छानपैकी येतं. पडद्यावर राजेश खन्नाने आणि गीतकार गुलजारनी या एका गाण्यात जणू आनंदचे पूर्ण व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. आपला अटळ मृत्यू क्षणाक्षणाने जवळ येतो आहे पण त्याआधीचे लाखो क्षण 'जगायचं' आहे हा ध्यास गाण्यात प्रकर्षाने जाणवतो. हेच कडवं बघा ना -

रुठी रातें, रुठी हुई रातों को मनाया कभी
तेरे लिये बिती सुबह को बुलाया कभी
तेरे बिना भी, तेरे लिये ही
दिये जलाये राहो में

मुकेशचा आवाज असा काही खुलतो या गाण्यात की वाटतं या आवाजात दुःख व्यक्त करणारी गाणी कशी शोभतील? एका सच्च्या पार्श्वगायकाचं यश याहून निराळं काय?


तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं (दिल ही तो है) - १९६३ सालचा हा चित्रपट त्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय असलेल्या मुस्लिम वातावरणावर आधारित होता. राज कपूर, नूतन, प्राण मुख्य भूमिकांमध्ये, रोशनचं संगीत, साहिरच्या लेखणीतून उतरलेली गीतं - खरं तर चित्रपट लोकप्रिय आणि स्मरणीय होण्यासारखं बरंच काही होतं. पण चित्रपटापेक्षा त्यातली गाणीच जास्त गाजली. साहजिकच आहे! मुळात, गीत-संगीताची बाजू भरभक्कम होतीच; जोडीला लता, आशा, मुकेश, मन्ना डे यांसारखे नावाजलेले गायक... त्यामुळे 'निगाहें मिलाने को जी चाहता है', 'लागा चुनरी में दाग', 'भूले से मुहोब्बत कर बैठे', 'चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना', 'तुम्हारी मस्त नज़र गर इधर नहीं होती' आणि 'तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं' यांसारखी एकाहून एक सरस गाणी आजही चोखंदळ श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. (जाता-जाता सहज आठवलेली एक गोष्ट म्हणजे पुढे थोडे-फार संगीत-दिग्दर्शन स्वतंत्रपणे करणारे सोनिक-ओमी या चित्रपटात रोशनचे सहाय्यक होते.)

नायिका जमीला हिचा आवडता गायक चाँद, पण तिने प्रत्यक्ष कधी त्याला पाहिलेले नाही. मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना एका युवकाशी तिची टक्कर होते. तिचा राग तर तिच्या चाफेकळीसारख्या नाकावर फणकारा होऊन सदाचाच मुक्कामाला. एका रुप-गुण-ऐश्वर्यवतीच्या मागे लागणाऱ्यांची काय कमी? त्यामुळे त्या टक्कर झालेल्या युवकालाही त्यातलाच एक समजून ती नुसती वैतागून जाते पण तिला काय माहीत की त्या फणकाऱ्यानेही तो घायाळ झालाय? जणू त्यांची मंज़िल एकच असल्यासारखे दोघे पाठोपाठ वाढदिवसाच्या समारंभात पोहोचतात. त्याला बघून तिचा पारा आणखीच चढतो आणि तिला तिथे बघून तो जास्तच घायाळ होतो. मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती काही शेर ऐकवते आणि मग मैत्रिणीचा भाऊ मैफिलीसाठी खास बोलावलेल्या प्रसिद्ध गायक चाँद याला गाण्यासाठी आमंत्रित करतो. ती उत्सुकतेने पहायला लागते की आपला आवडता गायक एकदाचा आपल्याला दिसणार - तर काय! ज्याच्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लालेलाल झालेला तोच नेमका चाँद निघावा! बरं, त्यानी गाणं तरी काय निवडावं?

तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी अौर को चाहोगी तो मुश्किल होगी

पुढे जाऊन तो असंही म्हणतो -

तुम हंसी हो, तुम्हे सब प्यार भी करते होंगे
मैं जो मरता हूँ तो क्या, अौर भी मरत होंगे
सब की आँखों में इसी शौक़ का तूफ़ाँ होगा
सब के सीने में यहीं दर्द उभरते होंगे
मेरे ग़म में ना कराहो,
मेरे ग़म में ना कराहो तो कोई बात नहीं
तो कोई बात नहीं
और के ग़म में कराहोगी तो मुश्किल होगी

DilHiToHain.jpg

प्रथमदर्शनी प्रेमात पडलेल्या, अगदी पार बुडालेल्या नायकाची मनोवस्था मुकेशनी फारच गोडपणे गायली आहे. त्यामुळे नूतनच काय - अशी प्रेमळ धमकी दिल्यावर आपलीही अवस्था 'निगाहें मिलाने को जी चाहता है' अशी झाली नाही तरच नवल. ही अशी सुंदर प्रेमगीतं, प्रेमाचा हक्क सांगणारी गाणीही किती छान वाटतात मुकेशच्या आवाजात! कल्याण रागात बांधलेलं हे गाणं ऐकायला कितीही गोड वाटलं तरी अतिशय शांत पण संयमित स्वर, तशी बऱ्यापैकी मोठी कडवी, पडद्यावरच्या राज कपूरच्या भूमिकेचा बाज - हे सगळं लक्षात घेतलं तर जाणवतं की गाणं गायला तितकं सोपं नाही; मधुनच पेरलेली लयीची, समेची गंमत गाण्याचा गोडवा आणखीच वाढवते - आणि हे सगळं सांभाळून लय, सम, ताल कुठेही न ढळू देता, गाण्यातले भाव हरवणार नाहीत याची काळजी घेऊन गाणं आज चाळीस वर्षांनंतरही आपल्या ओठांवर खेळते यात मुकेशच्या गायकीचा वाटा फार मोठा आहे.

जिस गली में तेरा घर ना हो बालमा (कटी पतंग) - कटी पतंग फार पूर्वी कधी तरी पाहिला होता. तेव्हा त्यातला कथेचा भाग समजण्याची अक्कल नव्हती, पण तरी गाणी मात्र आवडली होती. नंतर चित्रपट परत पहायचा योग यायच्या आधी गुलशन नंदांची मूळ कादंबरी वाचायचा योग आधी आला. तोवर थोडी फार समज आली असावी कारण पुस्तक वाचल्या वाचल्या चित्रपट पहायची ओढ लागल्याचं आजही स्पष्टपणे आठवतंय. राजेश खन्ना सुपरहिरो असण्याच्या काळातला हा चित्रपट. साहजिकच, चित्रपटात हिरोला झुकतं माप मिळणं सहज शक्य होतं, शिवाय त्याची भूमिकाही सतत प्रेक्षकांची सहानुभूती मिळत राहिल अशी; पण तरी आता चित्रपट पाहताना त्यातली आशा पारेखची मधू/ पूनमही तितकीच लक्षात राहते.

KatiPatang2.jpgविवाह-मंडपातून पळून आपल्या प्रियकराकडे गेलेली मधू ते मरताना आपल्या मैत्रिणीला दिलेल्या वचनासाठी लग्न न होताच विधवा झालेली, एका बाळाचं आईपण स्विकारुन आणि लग्नाला विरोध असलेल्या, कधी न पाहिलेल्या सासरी निघालेली पूनम हा स्त्रीचा प्रेयसी, मुलगी, मैत्रिण, सून, आई या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्यातला प्रवास पडद्यावर फारच छान आणि हृद्यपणे दाखवला आहे. मैत्रिणीच्या सासरी तिची जागा घेऊन राहताना तिची भेट होते ती नेमकी त्या कुटुंबाचा स्नेही असलेल्या आणि तिच्याशीच एके काळी लग्न ठरलेल्या कमलशी. त्या दोघांची कधी भेट न झाल्याने त्याने तिला ओळखायचं काहीच कारण नसतं. या एकाकी, दुःखी, विधवा पूनमच्या तो प्रेमात पडतो. इतका की -

जिस गली में तेरा घर न हो बालमा,
उस गली में हमें से हमे तो गुजरना नहीं
जो ड़गर ते द्वारे से जाती न हो,
उस ड़गर पर हमें पांव रखना नहीं

KatiPatang1.jpgकथा-कादंबऱ्यांतून स्त्रीच्या प्रेमाच्या शक्तीचं, तिच्या आपल्या प्रियकरावरच्या/ पतीवरच्या श्रद्धेचं, भक्तीचं वर्णन, उदात्तीकरण आपण पुष्कळ वेळा वाचतो आणि त्याचवेळी पुरुषाच्या भ्रमरवृत्तीचंही. पण इथे गीतकार आनंद बक्षींनी एका पुरुषाच्या ठिकाणीही तेच प्रेम, तीच एकात्मता दाखवुन प्रेमाचं अत्युच्च टोक पुरुषही गाठू शकतो हे दाखवून अतिशय उत्तम समतोल साधला आहे. संगीतकार राहुल देव बर्मनची कारकीर्द शिखर गाठण्याच्या काळात मुकेश दुर्दैवाने या दुनियेतही नव्हते. त्यामुळे त्याच्या संगीतरचनेला मुकेशचा स्वर लाभण्याच्या संधी तशा फारशा आल्या नाही. या चित्रपटातही राजेश खन्नाच्या तोंडी असलेली इतर सगळी गाणी किशोर कुमारनी म्हटली. चित्रपटामधलं एकूण एक गाणं चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण हे असं मनाच्या आत-आत उतरणारं गाणं गायला मात्र मुकेशचाच स्वर निवडला गेला आणि तो निर्णय किती योग्य होता, हे गाणं ऐकताना अगदी पहिल्या सुरापासूनच लक्षात येतं. या रचनेला न्याय देण्यासाठी लागणारी गळ्याची जात आणि गाण्याची समज केवळ मुकेशलाच लाभली होती.

ज़िंदगी में कई रंग-रलिया सहीं,
हर तरफ़ मुस्कुराती ये कलिया सहीं
खुबसुरत बहारों की गलिया सहीं
जिस चमन में तेरे पग में काँटें चुभेँ
उस चमन से हमें फूल चुनना नहीं

गीत-संगीत-सुर यांची त्रिवेणी किती जादू करते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. आणि गाणं अधिक उंची गाठतं ते माझ्या मते मुकेशच्या आर्त, शब्द-सुरांची जाणीव असलेल्या आवाजामुळे.

जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे (सफ़र) - एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांना नियतीच्या एका इषाऱ्यानिशी वेगळ्या वाटेने चालणं भाग पडतं - ते ही केवळ त्याच्या इच्छेखातर. त्याला कॅन्सर झाल्याचं कळल्यावर तो खचतो, पण ती मात्र तरीही खंबीर असते, आपल्या निर्णयावर ठाम राहते, जितकी पावलं चालायची ती दोघांनी हातात हात घेऊनच. पण त्याला मात्र तिचं हे रोजचं मरण मान्य नाही; आपल्या विधीलिखिताशी तिने स्वतःचं नशीब बांधण्यापेक्षा तिने आपलं आयुष्य जगावं, फुलवावं. दोघांच्याही मनात खरं तर एकच इच्छा आहे - दुसऱ्याचं आयुष्य होता-होईतो आपल्यामुळे चांगलं जावं - पण कधी-कधी या दोन चांगल्या इच्छा एकमेकांना छेद देतात त्या या अशा! शेवटी तिला त्याच्या इच्छेखातर, त्याचे उरलेले दिवस त्याला जे हवंय ते द्यावं यासाठी दुसऱ्याशी लग्न करणं भाग पडतं. मेडिकल कॉलेजचा खर्च एकट्या भावावर पडू नये म्हणून ती एका श्रीमंत घराण्यातल्या मुलाची शिकवणी घेत असते. त्याचा मोठा भाऊ खरं तर पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलेला. शेवटी कुणाशी तरी लग्न करायचंच तर त्याच्याशी केलं तर काय फरक पडतो या भावनेने ती लग्न करते आणि नवऱ्याचं अख्ख आयुष्य जणू उजळून निघतं!

Safar1.jpg

जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे

Safar2.jpg जिच्यावर अबोल प्रेम केलं तीच आपली झाली म्हटल्यावर त्याच्या मनाची अवस्था अशी झाली तर ते साहजिकच ना? इतकं जीवापाड प्रेम की यापुढे तिला जे आवडेल तेच करायचं, तिचं मन रिझवेल तेच फक्त बोलायचं, अगदी दिवसाढवळ्या ती म्हणाली की किती छान चांदणं पडलंय तर आपणही म्हणायचं, खरंच, किती सुंदर रात्र आहे! इतकं प्रेम फार थोड्या भाग्यवान लोकांनाच लाभतं.

देते ना आप साथ तो मर जाते हम कभी के
पूरे हुए हैं आप से, अरमान ज़िंदगी के
हम ज़िंदगी को आपकी सौगात कहेंगे

१९७० चा हा चित्रपट. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ही पडद्यावरची अत्यंत लोकप्रिय जोडी. पण चित्रपटात हे गाणं मात्र आहे तिच्या नवऱ्याच्या भूमिकेतील फिरोज़ खानवर चित्रित केलेलं. फिरोज़ खानच्या चित्रपटातील भुमिकेशी हे गाणं अत्यंत सुसंगत आहे. याचं श्रेय गीतकात इंदीवर यांना. कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताबद्दल वेगळं काय सांगणार? इतक्या गंभीर चित्रपटातलं प्रत्येक गाणं लोकप्रिय करण्याची करामत ते करु शकतात यातच सगळं आलं. हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्ण कारकीर्द करुनही कुठल्याही व्यसनापासून, वाईट सवयींपासून - इतकंच कशाला तर कुठल्याही वादंगापासून दूर राहिलेले लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. या गुर्जर बंधूंवरचे संस्कार इतके पक्के होते की त्यांच्याशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. हे सगळं टाळूनही मोठी आणि दर्जेदार कारकीर्द कशी करावी याचं आदर्श उदाहरण आहे ही संगीतकार द्वयी.

मुकेशच्या आवाजाचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं. हाच का तो आवाज, 'मेरे टुटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे' म्हणून आपल्या असफल प्रेमाची फरियाद आपल्यापुढे मांडतो? मग त्याच आवाजात 'तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे' यातलं प्रेमाचं समर्पण, तादात्म्य कसं आपल्याला पटतं? बरं, आवाज फार वेगळा लावलाय असंही नाही आणि नुसती शब्द-सुरांची जादूही नाही - ती आहेच, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतं, अगदी थेट आपल्या हृदयात; ते मुकेशच्या आवाजातच.

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे (पूरब और पश्चिम) - १९७० सालचंच, इंदीवर यांनी लिहीलेलं आणि कल्याणजी-आनंदजींनीच संगीत दिलेलं हे गाणं. गाण्याचा गाभाही तसाच - आत्यंतिक प्रेम आणि त्यासाठी काहीही करायची तयारी. इथे फरक इतकाच, की त्याला कळलंय आपलं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे; पण तिला मात्र त्याची जाणिवच नाही. ती रुपगर्विता, पाश्चात्य संस्कारात वाढलेली - तिला याचं साधंभोळं पण जीव ओतून केलेलं प्रेम मुळी समजतच नाही. त्याला याची कल्पना आहे आणि तिला ते कळेपर्यंत थांबण्याचा संयमही त्याच्याजवळ आहे. तिला जरी आज आपल्या रुपाच्या, श्रीमंतीच्या भ्रमामुळे उद्याची कल्पना करवत नसली तरी त्याला समजतंय की आज जे तिच्या अवतीभवती रुंजी घालताहेत, ते उद्या यौवनाचा भर ओसरल्यावर, रुपाची झळाळी कमी झाल्यावर तिच्याजवळपासही फिरकणार नाहीत.

अभी तुमको मेरी ज़रुरत नहीं, बहुत चाहनेवाले मिल जायेंगे
अभी रुप का एक सागर हो तुम, कँवल जितने चाहोगे खिल जायेंगे
दर्पन तुम्हें जब ड़राने लगे, जवानी भी दामन छुड़ाने लगे
मेरा सर झुका है, झुका ही रहेगा, तुम्हारे लिये

कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तब तुम मेरे पास आना प्रिये,
मेरा दर खुला है, खुला ही रहेगा, तुम्हारे लिये

तेव्हा तिला आपल्या प्रेमाची खात्री पटेल या भरवशावर तो लागेल तितकी वाट पहायला तयार आहे.

KoiJabTumhara.jpg

'जंगली' चित्रपटामधली सायरा बानू रुपगर्विता म्हणून सहज पटते, पण तिथे ती अस्सल भारतीय संस्कारात वाढलेली, मुग्ध युवती आहे. इथे मात्र विदेशी अंश दाखवण्यासाठी विग घातलेली, तंग, अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेली, सहजगत्या सिगरेट पेटवणारी सायरा बानू रुपगर्विताही वाटत नाही आणि विदेशी म्हणून शोभतही नाही. इतकं सुंदर गाणं मुकेशला मनोज कुमारसाठी गायला लागलं. थोडक्यात, हे फक्त ऐकण्याचं आणि भाग्यवान असलात तर अनुभवण्याचं गाणं आहे. मुकेशच्या आवाजाच्या जादूने थोडा काळ का होईना हा अनुभव ऐकणारा घेतोच.

तर हा असा प्रेमाचा वसंत फुलवणारा मुकेश. प्रेमाची किती विविध रुपं असतात! अगदी एकतर्फी प्रेमापासून ते असफल प्रेमापर्यंत... पण दोन जीव जेव्हा एक होतात किंवा प्रेम जेव्हा समर्पणाचं रुप घेतो तेव्हा ते परमोच्च बिंदू गाठतं. केवळ आवाजातून ही भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं महाकठीण! काही भाग्यवंतांनाच ही किमया साधते. सुदैवाने मुकेशला ते सहज जमतं आणि वर लिहीलेली आणि अशीच इतर काही गाणी चिरंतन होतात. जोपर्यंत प्रेम आहे, जोवर आपल्यासारखे रसिक आहेत, तोवर या गाण्यांची आठवण काही कारणाने किंवा कधी कारणाशिवायही येतच राहणार.

- प्रिया

प्रतिसाद

मनाला भिडणारी गाणी... आणि लेखसुद्धा.

प्रिया, खूप छान विवेचनात्मक लेख. एकदम नॉस्टाल्जिक वाटलं.

आनंदचं वर्णन खूप आवडलं!

प्रत्येक गाण्यासोबत चित्रपटाचा कथाभाग अनावश्यक वाटली. "कही दूर जब दिन ढल जाये" बद्दलच्या तुमच्या स्वतःच्या भावनांशी सहमत! its one of my most fav too.. :)

हे 'ऋतुरंग' साठी सहजपणे रिलेट नाही झालं! (वैम)

अप्रतिम लेख आहे. गाणी छान निवडली आहेत.

"मी गाणी मनाने ऐकते, डोक्याने नाही. त्यामुळे जी गाणी माझ्या मनाला भिडतात ती मला आवडतात. कुठे तरी त्या गाण्यांशी माझिया मनीचे नाते जुळते. ती गाणी आठवली की दिवसभर माझी पाठ धरतात, भुताने झाड धरावं तशी - आणि मला ते खूप आवडतं.....माझ्यासाठी जमेच्या पारड्यात बरंच काही आहे. ज्याच्या आवाजातला दर्द मला भिडतो, ज्याच्या आवाजातला धीरगंभीर पण संयमित शोक मला हलवून सोडतो" - क्या बात है!!! I could not agree more with you. Mukseh has been my favorite for so long and very rarely, I have come across Mukesh fans who I can relate with for their choices of Mukesh's songs. I felt as if, I wrote this article, while reading many lines as I share and reciprocate the same feelings about pretty much everything written in this article. Good job!!

गाण्यांचं सुंदर विश्लेषण, चित्रपटातले प्रसंग, मुकेशजींच्या आवाजातल र्दं वगैरे... सुंदर जमलाय लेख.<"मी गाणी मनाने ऐकते, डोक्याने नाही. त्यामुळे जी गाणी माझ्या मनाला भिडतात ती मला आवडतात. कुठे तरी त्या गाण्यांशी माझिया मनीचे नाते जुळते. ती गाणी आठवली की दिवसभर माझी पाठ धरतात, भुताने झाड धरावं तशी - आणि मला ते खूप आवडतं.>>
ह्यासाठी प्रिया, तुला हज्जारो गावं इनाम.माझ्यासारखीच वेडी दिसतेस :)

क्षमस्व, पण ऋतुरंगशी संबंध नाही कळला .

ऋतूचं काय ते मला पण नाही कळलं.

प्रिया... खूप मस्त वाटलं. ही सर्व गाणी लहानपणापासून पाठपुरावा करतच आली आहेत, पण ती ऐकतांना आता तुझी- या लेखाची आठवण येत राहणार. मुकेश यांच्या गाण्यातल्या विविध ऋतूंना फुलवल्याबद्दल धन्यवाद.

मुकेश बद्दलचा लेख... निवडलेली गाणी.. सर्वच छान!
पण "ऋतूरंग" मात्र तितकेसे दिसत नाहीत..

लेख छान आहे. आवडला.

मुकेशचा साधासरळ आवाज कित्येक गाण्यातून मनाला स्पर्शून जातो. अशा गाण्यांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मुकेश काही फारसा आवडत नाही अगदी मोजकी गाणी वगळता .. तेव्हा लेखाबद्दल फार बोलत नाही .. :)

लेखाचं प्रूफ रिडींग नीट झालेलं नाही .. संपादक बाईंचा स्वतःचा लेख म्हणजे काकणभर जास्त अपेक्षा होत्या ..

जर "ऋतू रडवा" हे "ऋतूरंग" मध्ये बसतं तर हाही लेख बसतो .. :)

प्रेमातील असफलतेच्या, आयुष्याने दिलेल्या नकाराच्या बोचर्‍या शीतलहरी आणि पहिल्या प्रेमाची, खरं तर त्याच्या अभिव्यक्तीची वासंतिक पालवी हे दोन ऋतुरंग हिंदी चित्रपटगीतांच्या लहरींवरून पोचतात की. हिंदी चित्रपटगीतांवर पोसलेल्यांना आयुष्यातला प्रत्येक रंग या गाण्यांत दिसत राहतो.
मुकेश हा आवडत्यांच्या यादीत न शिरू शकणारा, त्यामुळे काहीश्या अनुत्सुकतेनेच लेख वाचायला घेतला. पण तुमच्या नेहमीच्या शैलीत गाण्यांच्या हिंदोळ्यांवर फिरताना मजा आली.
"हिवाळ्यातली एखादी गोठलेली संध्याकाळ असावी..." या वाक्याने सुरू होणार्‍या परिच्छेदाचा उत्तरार्ध आणि पुढला परिच्छेद वाचायला छान वाटले तरी अस्थानी वाटले. तसंच 'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे' यात प्रेमाचा वसंत आहे की शिशिर असा प्रश्न पडला.

मंडळी - लेख वाचून प्रामाणिक आणि मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया वाचून खरंच खूप बरे वाटले. छान-छान अश्या(च) प्रतिक्रिया अजिबात कधीच अपेक्षित नसतात मला.

मुळात लिहिताना हे दोन वेगळे लेख लिहिले होते, पण ऋतूरंग साठी म्हणून जुळवून घ्यायचा प्रयत्न केला - माझ्यासाठी हा एक प्रयोग होता; दोन तयार लेख - ज्यात एकमेकांशी अजिबात न जुळणारी गाणी आहेत, असे लेख एकत्र गुंफता येतात का बघणे. तसं सरधोपटपणे बघितलं तर वियोगाच्या गाण्यातलं दु:ख आणि हिवाळा तशीच प्रेमात बुडून गेलेली गाणी आणि वसंत एकत्र जातात (निदान माझ्या मनात). पण त्याही पलिकडे जाऊन वियोगाचं दु:ख आणि बाहेर कडाक्याची थंडी, घरात आपण एकटेच असणं यातलं एकाकीपण माझ्या मनात जास्त घर करतात. जणू तो विरह मनात ती बाहेरची थंडी घेऊन मुक्कामालाच येतो. तसेच प्रेमाची गाणी - इथे मी जी गाणी निवडली ती प्रेमात एखाद्याने अगदी पूर्ण समर्पित होणं आहे, बहुतेक गाण्यात प्रेमविषयाची तीच भावना आहे असे नाही, किंबहुना नाहीच! पण तरी एकतर्फी असले तरी ते प्रेम तितकेच उत्कट, स्वत:चे पूर्ण व्यक्तिमत्त्व दुसर्‍यात विलीन करुन टाकणारे आहे - वसंतात फुलणार्‍या फुलासारखे. ते फूल कोणासाठी म्हणून फुलत नाही, त्याला वाटले की फुलते.

गाण्यांबरोबर कथाभाग का? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण बरेच वेळा गाण्याची पार्श्वभूमी त्या कथाभागात असते आणि माझ्या जवळची गाणी ही हल्लीच्या मापदंडाने फारच जुनी गाणी आहेत, त्यामुळे वाचकाने ते चित्रपट पाहिलेले असतीलच याची खात्री नसते.

दिनेश, मिलिंदा, बित्तु, आनंदयात्री, फेरफटका, दाद, चिन्नु, योग, नंदिनी, भरत - तुम्हांला लेख/ त्यातला काही भाग तरी आवडला आणि तुम्ही ते सांगितलेत - खूप बरे वाटले.

दाद - गावं इनाम नकोत - तुझी मैत्री मिळाली तर ते जास्त अनमोल आहे. :)

भारती, सिंडरेला, योग - माझ्या मनातले थोडे इथे लिहिले आहे.

सशल - लेख संपादिकाबाईंनी लिहिलेला नाही (थोडक्यात, इतर लिखाणाच्या चाळण्या यालाही लागल्या ;) ) तर गाणंवेड्या प्रियाने लिहिला आहे :) आणि मुद्रित शोधनाचे कामही मी केलेले नाही. किंबहुना माझा लेख म्हणून मी त्याच्याकडे अजिबातच बघितले नाही.

भरत - प्रेमातलं समर्पण एकदा झालं की त्याला शिशिर मानायचं की वसंत हे सापेक्ष आहे असं मला वाटतं.