पिठाच्या करंज्या

पाककृती : मिनोती कुंदरगी
चित्रीकरण : मिनोती कुंदरगी

मायबोली दिवाळी अंकासाठी यावर्षी नक्की काहीतरी लिहायचेच असा विचार मी बरेच दिवस करत होते. दिवाळी अंकाची संकल्पना जाहीर झाली - 'महाराष्ट्र राज्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि मायबोलीचा १० वा दिवाळी अंक'. ही पर्वणी म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग म्हणतात ना, अशीच. मराठी माणूस दिवाळीत जितक्या उत्सुकतेने फराळ/फटाक्यांची वाट पहातो, तितक्याच, किंबहुना त्याहून जास्त उत्सुकतेने दिवाळी अंकाची वाट पाहतो असे म्हणल्यास वावगे ठरू नये. या अशा अगदी खाशा दिवाळीअंकासाठी आपणही काहीतरी खासा पदार्थ करावा असे मनात यायला आणि संपादकांची मेल यायला एकच गाठ पडली. मग चित्रीकरणाचा बेत आणि मुहूर्त पक्का केला आणि त्यासाठीची तयारी करुन ठेवली. ठरवल्याप्रमाणे चित्रीकरणदेखील पूर्ण झाले. थोड्या काटछाटीनंतर ही चित्रफीत पूर्ण झाली.

माझ्या आज्जीकडे आम्हा भावंडांची नेहेमी काहीतरी फर्माईश असे. दिवाळीच्या वेळेची महत्त्वाची फर्माईश म्हणजे बुंदीचे लाडू आणि गव्हाच्या पिठाच्या करंज्या. त्यासाठी मग आज्जीला लाडीगोडी लावणे, मम्मीला मदत करतो म्हणून सांगणे वगैरे वगैरे बरीच आश्वासने दिली जात आणि तिच्या धाकाने पाळली देखील जात. माझी ही आज्जी खरोखरच सुग्रण होती. कोंड्याचा मांडा करण्याची वेळ तिच्या आयुष्यात अनेक वेळा आली आणि त्यात तिचा सुग्रणपणा अतिशय लख्खपणे दिसला. गव्हाची खीर, जिलेबी, बुंदीचे लाडू वगैरे वेळखाऊ पदार्थ करण्यात तिचा हातखंडा होता. तिचीच ही गव्हाच्या पिठाच्या करंजीची रेसिपी -

[video:http://www.youtube.com/watch?v=5tzFGiq-k_0]

सारणासाठी साहित्य -
२ कप बारीक चिरलेला/किसलेला गूळ
१ कप गव्हाचे पीठ
१ कप कोरडे किसलेले खोबरे
१/२ कप बारीक रवा
१/२ कप तीळ
१ टीस्पून जायफळ-वेलचीची पूड
३ टेबलस्पून बदामाचे तेल

पारीसाठी साहित्य -
१ कप मैदा
१.५ टेबल्स्पून 'अर्थ बॅलन्स'
१.५ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
चवीप्रमाणे मीठ
लागेल तसे बर्फाचे पाणी

पारीचे पीठ तयार करण्याची कृती -
१. पिठात तेल, अर्थ बॅलन्स घालून ते नीट पिठाला चोळून घ्यावे.
२. त्यात अगदी थोडे थोडे करत बर्फाचे थंडगार पाणी घालून अगदी घट्ट भिजवावे. हे पीठ पुरीपेक्षाही घट्ट असते. या प्रकारे भिजवलेल्या पिठाला पाय क्रस्ट असेही म्हणातात.
३. आता हे भिजवलेले पीठ एका प्लास्टिक रॅपमधे गुंडाळून एका हवाबंद डब्यात कमीत कमी एक तास ठेवावे.

सारणाची कृती -
१. प्रथम खसखस, तीळ आणि खोबरे मंद आचेवर गुलबट रंगावर भाजून ठेवावे. हे भाजत असताना खमंग वास येत राहील. भाजून ठेवलेले खसखस, तीळ आणि खोबरे एकत्र करू नये. आपल्याला ते बारीक करायचे आहे आणि एकत्र केल्यास ते नीट बारीक होत नाही.
२. त्यानंतर रवादेखील कोरडाच गुलबट रंगावर भाजून घ्यावा. आता कढईत गव्हाचे पीठ घेऊन त्यावर बदामाचे तेल घालून मंद आचेवर पीठ खमंग भाजून घ्यावे.
३. गार झालेली खसखस, तीळ, आणि खोबरे एकापाठोपाठ मिक्सरवर बारीक करुन घ्यावे. बारीक करताना अगदी खूप बारीक करायचे नाही.
४. आता फूडप्रोसेसरला ’एस्’ आकाराचे ब्लेड लावून त्यामधे पीठ, गूळ, बारीक केलेले तीळ, खसखस, खोबरे, रवा, वेलची-जायफळाची पूड एकत्र करुन पल्स अ‍ॅक्शनमधे साधारण ८-१० मिनिटे फिरवावे. सारण नीट मिळून येईल. आपण कोरड्या खोबर्‍याचे सारण करतो तेव्हा जशी कन्सिस्टन्सी असते तीच कन्सिस्टन्सी असावी. सारणात गुळाचे मोठे खडे नाहीत ना ते पहावे. जास्तीत जास्त बारीक वाटाण्यायेवढेच गुळाचे तुकडे राहिल्यास हरकत नाही. मोदक वाफवायच्या चाळणीने सारण चाळून घेतल्यास उत्तम.

करंजीची कृती -
१. एका तासाभराने फ्रीजमधले पीठ बाहेर काढून जरा हलक्या हाताने मळून घ्यावे. त्याचे लहान पुरीइतके गोळे करुन गोळे ओल्या पंचाखाली ठेवावेत.
२. एकेक गोळा लाटून त्याची पुरी बनवावी.
३. पुरी हातात घेऊन कड एकाबाजूने चिमटून घ्यावी. त्यात साधारण दीड ते दोन चमचे भरून सारण घालावे. जिथे पारी एकमेकांना चिटकणार आहे तिथे सारण लागू देऊ नये. पारी चिटकायला त्रास होऊ शकतो.
४. आता पारी एकमेकाला चिटकवून १-२ वेळा नीट दाबून घ्यावी. आता कडेने दुमडून मुरड घालावी अथवा नेहेमी सारखी कड कापावी.
५. तयार झालेल्या करंज्या एका बेकिंग डिशवर नीट ओळीने ठेवाव्यात. त्यावरदेखील एक ओला पंचा झाकावा. यामुळे तयार झालेल्या करंज्या कोरड्या पडणार नाहीत.
६. साधारण निम्म्याहून जास्त करंज्या झाल्या की ओव्हन ३७५ डिग्री फॅरेन्हाईटला प्रीहीट करायला ठेवावा.
७. सर्व करंज्या झाल्यावर त्यावरचा पंचा काढून गरम झालेल्या ओव्हनमधे मधल्या रॅकवर त्या साधारण १५-१६ मिनीटे गुलबट रंगावर भाजाव्यात. साधारण १२ मिनिटांनी वगैरे एकदा रंग पहावा. त्यावर अजून किती वेळ ठेवावे लागेल याचा अंदाज येईल.
८. ओव्हनमधून बाहेर काढून थंड झाल्यावर खाव्यात किंवा डब्यात भरुन ठेवाव्यात. या करंज्या साधारण १५-२० दिवस सहज टिकतात.

टिप्स -
१. तुम्हाला पायक्रस्ट सारखे पीठ करायचे नसेल तर समप्रमाणात मैदा-रवा घेउन, त्यात मोहन घालून नेहेमी करंजीला भिजवतो तसे पीठ भिजवून तळलेल्या करंज्या कराव्यात.
२. अर्थ बॅलन्स मिळणार नसेल तर लोणी/मार्जरीन वापरू शकता.
३. पीठ भाजायला बदामाच्या तेलाऐवजी तूप वापरता येईल.
४. शक्य असेल तर करंज्या ओव्हनमधे ठेवण्यापूर्वी त्यावर दूध-पाणी समप्रमाणात एकत्र करुन ते ब्रशने करंजीला लावावे.
५. करंजीत सारण भरपूर भरावे. मोकळी जागा अजिबात रहाणार नाही हे पहावे.