दिवाळी अंकांची शंभरी

पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील गजबजाटात एका जुन्या दगडी इमारतीत शासकीय ग्रंथालयाचा 'नियतकालिके विभाग' आहे. या दुमजली वाड्याच्या खालच्या मजल्यावर कायम कसलीशी प्रदर्शंनं भरलेली असतात. वळणावळणाचा, रुंद जिना चढून गेलं की पहिल्या मजल्यावर एक खूप प्रशस्त असा हॉल आहे. एका बाजूला दहा-बारा टेबल-खुर्च्या मांडून ठेवल्या आहेत. बाकी सगळीकडे उंचच उंच शेल्फं. या शेल्फांत १८८० सालापासूनची नियतकालिकं रचून ठेवली आहेत. त्यांवर बसलेली धूळ फार लांबूनही लगेच दिसते. शेल्फांत आहेत तेवढीच नियतकालिकं खाली जमिनीवर अस्ताव्यस्त पडली आहेत. मासिकांच्या एका ढिगावर एक कबुतर मरून पडलं आहे. तिथेच कुठेतरी मला हवा असलेला 'मनोरंजन'चा १९०९ साली प्रसिद्ध झालेला दिवाळी अंक आहे. हा मराठीत प्रसिद्ध झालेला पहिला दिवाळी अंक. कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी संपादन केलेला.

मात्र 'काशिनाथ मित्र', 'मनोरंजन' ही नावंही या ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना ठाऊक नाहीत. तिथे असलेली बहुतेक नियतकालिकं सुरू झाली, प्रकाशित झाली, लोकप्रिय होऊ शकली, ती काशिनाथ मित्र यांच्यामुळेच. मराठीतील पहिला दिवाळी अंक सुरू करण्याचा मानही त्यांचाच. गडकरी, बालकवी, कोल्हटकरांपासून कुसुमाग्रज, पुलं, दुर्गाबाई,जीए, मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, करंदीकर, अनिल अवचट, मंगला गोडबोले, प्रकाश नारायण संत, गौरी देशपांडे या सार्‍या लेखक-कवींचं वाचकप्रिय ठरलेलं सारं लिखाण सर्वप्रथम दिवाळी अंकांतच प्रसिद्ध झालं, बहुतेक सर्व पुस्तकांची निर्मिती दिवाळी अंकांतून झाली. 'मनोरंजन' आणि त्याचा दिवाळी अंक नसता तर इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी साहित्य निर्माण झालं असतं का, ही शंकाच आहे. त्यामुळे अर्वाचीन मराठी साहित्याचा इतिहास लिहिताना 'मनोरंजन'चा कालखंड हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरतो.. पण त्या पसार्‍यात ही नावं पूर्णपणे हरवली आहेत.

कर्मचार्‍यांची संख्या कमी म्हणून तो दिवाळी अंक मलाच शोधायचा आहे. ग्रंथालयातील सूचीनुसार दिलेले क्रमांक उपयोगाचे नाहीत, कारण एकही अंक जागच्या जागी ठेवलेला नाही. गेल्या महिन्यात एका मराठी दूरचित्रवाहिनीने तिथे चित्रीकरण केलं. दिवाळी अंकांना यंदा शंभर वर्षं पूरी होत आहेत, म्हणून या वाहिनीवर एक खास कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. त्यासाठी सगळे जुने दिवाळी अंक बाहेर काढले गेले, आणि वाट्टेल तसे हाताळून इतस्ततः फेकून दिले. एकंदरीतच बेपर्वा वृती, आणि आपला सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्यासाठी आपणच घेतलेला पुढाकर आपल्याला फारच सवयीचा झाल्याने त्या नियतकालिकांची दुरवस्था कोणालाच खटकत नाही.

तीन - चार तास तो ढीग उपसल्यावर मला 'मनोरंजन'चा १८९७ सालचा एक अंक सापडतो. मुखपृष्ठावर संपादक म्हणून काशिनाथ रघुनाथ मित्र यांचं नाव दिलं आहे. कागद पिवळा पडलेला. बोट लावलं तरी तुकडा पडतो. पहिल्या पानावर संपादकांनी लेखकांना दिलेली सूचना आहे, 'उदार विचारांचा प्रसार, सत्पक्षाचा पुरस्कार, सामाजिक अन्याय - जुलूम यांचा निषेध, समता, भूतदयादि उच्चमनोवृत्तींचे पोषण करणारें लेखांचें धोरण असावें.' त्यानंतर वाचकांचा पत्रव्यवहार. अनेकांना हा अंक वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. इंदूरच्या श्री. रघुनाथ सिंह यांनी 'मनोरंजन'चं कौतुक करणारं पत्र हिंदीत लिहिलं आहे. त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. काशिनाथ मित्र त्यावर उत्तर देतात, 'बेलाशक हिंदीत लिहा! हिंदीतील आशय आह्मीच काय, हिंदुस्थानातींल कोणीही मनुष्य, सहज समजूं शकेल! हिंदी बंधूंनी हिंदींत, गुर्जरबंधूंनी गुजराथींत, बंगाली बाबूंनी बंगालींत, व मराठ्यांनी मराठींतच, नेहमी पत्रव्यवहार करावा; इंग्रजींत नको! देशी भाषा उत्तमप्रकारें जाणणार्‍या एखाद्या गोर्‍यानें, कोणा देशी गृहस्थाशीं पत्रव्यवहार करतांना आपली स्वभाषा - इंग्रजी - सोडून, देशी भाषेचा उपयोग केला आहे काय? मुळीच नाही! मग आपणच स्वाभिमानशून्य कां व्हावें? इत्यत्तर तरी आपण आपली चूक सुधारूंया!'

लगेच पुढे पुण्याच्या श्री. पितळे यांनी इंग्रजीत लिहिलेले पत्र छापले आहे. संपादक लिहितात,'पुष्कळ इसम इंग्रजींतच लिहित असतात! आपण स्वभाषेचा असा अनादर कां करावा? परकी भाषा आह्मांला इतकी प्रिय कां वाटावी? आह्मांला ती नको. आह्मी आमच्या हितचिंतकांस आणि आश्रयदात्यांस प्रार्थना करितो, की आमच्याशीं पत्रव्यवहार करतेवेळीं प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचाच उपयोग करावा!'

आतमध्ये भरपूर कविता, कथा आणि चित्रं. एका पानभर व्यंगचित्रात पुण्याच्या दांभिक ब्राह्मणांची रेवडी उडवली आहे. मग हळूहळू इतर अंक सापडत जातात, आणि आणि एका विलक्षण बुद्धिमान, दूरदर्शी, साहित्यप्रेमी संपादकानं आणि त्याचा कित्ता गिरवणार्‍या रॉय किणीकर, शं. वा. किर्लोस्कर, दीनानाथ दलाल, श्री.पु. भागवत यांसारख्या विचक्षण संपादकांनी केलेली अभूतपूर्व कामगिरी समोर उभी ठाकते.

इंग्रजी राजवट सुरू झाल्यावर मुद्रणकला भारतात आली. १८०६ साली तंजावर येथे सरफोजीराजे भोसले यांनी इसापनीतीचे भाषांतर करवून घेऊन 'बोलबोधमुक्तावली' नावाचं पहिलं मराठी गोष्टींचं पुस्तक छापलं. मराठी वाङ्मयविकासाची दिशा त्यामुळे बदलत गेली. मराठी भाषेच्या विकासाचं खरं श्रेय मात्र नियतकालिक - मासिकांच्या निर्मितीला द्यायला हवं. मराठी गद्यशैलीला वळण या नियतकालिकं - मासिकांनी दिलं. १८३२ साली 'दर्पण' या पहिल्या मराठी नियतकालिकाचा जन्म झाला. काळाचा, प्रबोधनयुगाचा परिणाम असेल कदाचित, पण ज्ञानवृद्धीचाच हेतू नियतकालिकांचा होता. दर्पण, दिग्दर्शन, ज्ञानप्रकाश, विविध ज्ञानविस्तार, ज्ञानोदय ही सुरुवातीच्या नियतकालिकांची नावंही हेच सुचवतात. एतद्देशीयांचं अज्ञान संपवणे, शास्त्रीय विषयांचे ज्ञान वाढवणे, धर्मरक्षण करणे, धर्मप्रचार करणे, कायदेविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, जुनी मराठी कविता प्रकाशित करणे, समकालीन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवणे असे हेतू या प्रकाशनांमागे स्पष्टपणे जाणवतात. नियतकालिकांच्या प्रेरणेतूनच मासिकांना आकार प्राप्त होत गेला. मासिकांचं स्वरूप नियतकालिकांपेक्षा वेगळं होतं. मासिकात बातम्यांना स्थान नव्हतं. सर्वस्वी लेखांवर भर होता. मोठ्या लेखांना क्रमशः प्रसिद्धी मिळत असे. अधूनमधून ललित वाङ्मयाला स्थान दिलं जाई. चार आणे किंमतीच्या 'ज्ञानप्रसारक'मध्ये 'विक्रमोर्वशीय' नाटकाचं भाषांतर किंवा 'जिपोलीची गोष्ट'सारखी दीर्घकथा बघण्यास मिळते. रूढार्थाने 'दिग्दर्शन' हे पहिले मासिक. १८४० साली याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. रा. ब. राघोबा जनार्दन याचे संपादन करीत पण पहिल्या अंकावर मात्र संपादकाचं नाव छापलेलं नाही. 'सर्व विषयांचा संग्रह' याच उद्दिष्टानं हे मासिक चालवल्या गेलं. 'ज्ञानोदय'ने ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चालवलं होतं. त्याला प्रतिकार म्हणून 'उपदेशचंद्रिका' हे मासिक सुरू झालं. 'दंभहारक' हे मासिकही वैशिष्ट्यपूर्ण होतं, कारण लेखनशुद्धतेवर यात भर दिला जाई.

काशिनाथ रघुनाथ आजगावकर या तेवीस वर्षांच्या पत्रकार तरुणानं १८९५च्या जानेवारीत ललित साहित्यावर भर देणारं नियतकालिक काढण्याचं धाडस केलं. गुजरातीतून त्याकाळी 'मासिक मजाह' या नावाचं छोटेखानी मासिक निघत असे. तेच 'मासिक मनोरंजन'चे स्फूर्तिस्थान. खरं तर आजगावकरांना या मासिकाचं नाव ठेवायचं होतं 'मौज'. पण 'मासिक मजाह'शी हे नाव खूप मिळतंजुळतं असल्यानं त्यांनी नाव ठेवलं 'मनोरंजन'. जुन्या-नव्याचा योग्य मिलाफ करून, काळानुसार समाजजीवनात होणारे बदल लक्षात घेऊन वैयक्तिक व सामाजिक विकासाला पोषक असे वाङ्मय वाचकांपुढे ठेवणे हे मासिक मनोरंजनचे ध्येय होतं. राजकारण, समाजकारण, धर्म अशा रोजच्या जगण्याशी निगडीत असणार्‍या विषयात लोकांना काही नवीन विचार द्यावेत आणि त्यांच्या विचारांना योग्य ती दिशा दाखवून द्यावी हाच हेतू समोर ठेवून मनोरंजनचा जन्म झाला. केसरी, सुधारक अशा मराठी व स्ट्रँड, लंडन मॅगझिन अशा इंग्रजी नियतकालिकांचा आदर्श समोर ठेवून मनोरंजनची वाटचाल सुरू झाली. आपलं मासिक लोकप्रिय करण्यासाठी आजगावकरांनी ललितलेखनाचं माध्यम निवडलं होतं, आणि अल्पावधीतच मासिक मनोरंजन वाचकप्रिय बनलं. अगदी विदर्भ - मराठवाड्यापर्यंत मनोरंजनचा वाचकवर्ग पसरला होता. केप टाऊन, टोकिओ या शहरांतही त्याकाळी मनोरंजनचे मराठी वाचक होते. साक्षरतेचा फारसा प्रसार नसलेल्या त्या काळात अवघ्या वीस वर्षांत या मासिकाच्या वर्गणीदारांची संख्या वीस हजारांवर पोहोचली होती, आणि ती तीस हजारांवर नेण्याचे संपादक का. र. मित्र यांचं स्वप्न होतं. 'मराठींत पहिल्याप्रथमचें सचित्र, मनोरंजक, आणि अति स्वस्त मासिक पुस्तक' अशी ते आपल्या मासिकाची जाहिरात करत.

संपादक म्हणून या मासिकावर नाव होतं का. र. मित्र. हे आजगावकरांचंच नाव. पण ते टोपणनाव नव्हतं, तर बंगाली भाषेवरच्या प्रेमापोटी त्यांनी मित्र हे आडनाव स्वीकारलं होतं. आणि पुढे तीच त्यांची कायमची ओळख बनली.

रावसाहेब गोविंद माधवराव डुकले हे मित्रांचे घनिष्ट स्नेही. त्यांनी मित्रांची लंडनच्या 'टाईम्स लिटररी सप्लिमेंट'शी ओळख करून दिली. नाताळात त्यांची विशेष पुरवणी असे. अशीच 'नाताळ विशेष' पुरवणी 'टाईम्स ऑफ इंडिया'सुद्धा काढत असे. असं काहीतरी वेगळं, लोकांना उत्तम वाङ्मयीन खाद्य देणारं मासिक मराठीत असावं, असं मित्रांना वाटलं, आणि त्यांनी 'मनोरंजन'चा दिवाळी अंक काढायचं ठरवलं.

स्वतंत्र दिवाळी अंकाचा मान 'मनोरंजन'कडे जात असला तरी १९०५ साली याच प्रकारचा एक प्रयत्न झाला होता. श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' या मासिकाने खास दिवाळी अंक काढला होता. 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख या मासिकावर होता. नियमितपणे दिवाळी अंक काढावे हा त्यांचा उद्देश होता की नव्हता, हे निश्चित नसलं तरी दिवाळीनिमित्त वाचकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं वाचायला द्यावं, ही त्यांची भूमिका मात्र जरूर होती. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पानं मराठीत आणि ८ पानं इंग्रजीत होती.

१९०९चा 'मनोरंजन'चा पहिला दिवाळी अंक मात्र अतिशय आकर्षक स्वरूपात छापण्यात आला होता. ललित वाङ्मयाच्या जोडीला शास्त्रीय, सामाजिक, राजकीय विषयांवरील लेखही प्रसिद्ध करण्यात आले होते. या दिवाळी अंकात महामहिम्न सौ. चिमणाबाई गायकवाड, सौ. काशीबाई कानिटकर, काशीबाई हेर्लेकर, माणकबाई कोठारे, क्षमाबाई राव, लक्ष्मीबाई टिळक, गिरिजाबाई केळकर, कु. मथुराबाई जोशी, डॉ. कृष्णाबाई केळवकर या स्त्रियांचा सहभाग होता. याशिवाय डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, ना. गोखले, रँग्लर परांजपे, श्रीमंत बाबासाहेब प्रतिनिधी (चीफ ऑफ औंध), लेफ्टनंट कर्नल कीर्तिकर, श्री. महाजनी, प्रो. धर्मानंद कोसंबी अशा विद्वानांचे लेख या दिवाळी अंकात प्रकाशित केले होते. रेव्ह. ना. वा टिळक, माधवानुज, गोविंदाग्रज, चंद्रशेखर इ. कवींचे लेख व कविता त्यात समाविष्ट केल्या होत्या. 'ओवाळणि घाली भाई' ही बालकवींची पहिली कविताही याच अंकात छापली गेली होती. लक्ष्मीबाई टिळकांची कविताही होती. शिवाय नामांकित स्त्री-पुरुषांची शंभराहून अधिक छायाचित्रे या अंकात दिली होती. १९२ पानांच्या या अंकाची किंमत होती एक रुपया. वाचकांनी जरी या अंकाचं अभूतपूर्व स्वागत केलं तरी खुद्द 'मनोरंजन'कारच असमाधानी होते. त्यांनी लगेच पुढच्या वर्षाच्या अंकाची आखणी केली.

१९१०चा मनोरंजनचा दिवाळी अंकही याच प्रकारचा होता. त्यात मुखपृष्ठास दर्शनी चित्र असं म्हटलं होतं. मुंबईच्या एम. व्ही. धुरंधर यांनी हे चित्र काढलं होतं. लेख व कवितांसोबतच महराष्ट्राला वंदनीय अशा व्यक्तींची चित्रेही या अंकात होती. या चित्रांची स्वतंत्र अनुक्रमणिकाही होती. गोपाळ गणेश आगरकर, राजा रविवर्मा, महात्मा फुले, बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या चित्रांचा समावेश होता. मुख्य म्हणजे या छायाचित्रांबरोबरच त्यांचा जन्म, मृत्यू, जन्मस्थान, त्यांचे कार्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण यांबाबतचे टिपणही दिले होते. या अंकाची सजावटही छान होती. प्रत्येक कथेच्या, लेखाच्या आशयाला साजेशी अशी चित्रं होती. अतिशय सुंदर, आशयपूरक अशी चित्रे देण्यासाठी 'मनोरंजन'ची ख्याती होतीच. औंधचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रेखाटलेले 'शकुंतला निरोपा'चे चित्र या अंकात होते. हौशी छायाचित्रकारांनी कॅमेर्‍यात टिपलेली चित्रेही होती. दादोबा पांडुरंग तर्खडकर, भाऊ दाजी लाड, बद्रुद्दीन तय्यबजी अशा मान्यवरांवरील परिचयांत विशेष परिचयपर लेख होता तो बंगाली कवयित्री मोहिनी दत्त यांच्यावर. याच अंकात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची 'पति हाच स्त्रीचा अलंकार' ही कथा प्रसिद्ध झाली होती. शिवाय 'पतीची निवड' ही वामनसुता यांची दीर्घकथा होती. अंकात परिसंवादाचा विषय होता -'वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा काय असावी? व का?' या परिसंवादात सीताराम नारायण पंडित, नामदार श्री. केशवराव, काशीबाई कानिटकर, म. धोंडो केशव कर्वे, लक्ष्मीबाई चंदावरकर, रंगनाथ मुधोळकर, रमाबाई रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी आपली मतं मांडली होती.

छोट्या मुलांसाठीही दोन पानं राखून ठेवली होती. त्यात गंमतीशीर कोडीही होती. 'कर्ण' असून ऐकत नाही असा कोण? (चौकोन), मुंबईत बिनपाण्याचा तलाव कोणता? (धोबी तलाव) असे काही प्रश्न होते. विविध विषयांवरील ज्ञानवर्धक, माहितीपर, चर्चात्मक लेखही या व पुढच्या अंकांत होते. 'इंग्रज लोकांची गृहस्थिती' (श्री. ल. आजरेकर) हा लेख इंग्लंडातल्या चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करणारा असा लेख होता. 'बालबोधमेवा' हे लहान मुलांसाठीचे मासिक चालवणार्‍या एमिलीबाई यांनी लहान मुलांच्या दृष्टीने त्यांचे काही प्रश्न एका लेखात उपस्थित केले होते.

१९०९ सालच्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिली होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न विचारला होता -

"मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे
तव भर्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?"

या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१०च्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी 'पति-पत्नी' ही कविता उत्तर म्हणून लिहिली. ही दीर्घकविता लिहिताना केवळ उत्तर देणे हाच हेतू नव्हता. आईकडून मुलीला मिळणार्‍या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्रीपर्यंतचे सर्व वर्णन या कवितेत येतं. तत्कालीन पति-पत्नीच्या संबंधांचं स्वरूपही त्यातून लक्षात येतं.

लग्न नव्हे ते, प्रेम केले एकीकरण जीवांचे
त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे
असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण
पत्नीवाचुन पती पांगळा, तीही तशी पतिवीण

असा समजावणीचा सूरही उमटतो.

'मनोरंजन' मासिकाने दिवाळी अंक काढून एक उत्तम पायंडाच पाडला. उद्बोधन, मनोरंजन यांसारखे हेतू याच्या मुळाशी होते. का. र. मित्र यांची ही दृष्टी समकालीन मासिकांनी स्वीकारली आणि मग या सुरुवातीच्या काळातच टप्प्याटप्प्याने दिवाळी अंक बाजारात येऊ लागले. म्हणजे का. र. मित्र यांनी नुसतीच दिवाळी अंकाची सुरुवात केली नाही तर तो कसा असावा याचाही या अंकाने वस्तुपाठ घालून दिला. तोच पुढे व्यवस्थित गिरवला गेला आणि जो तो आपला अंक अधिक मनोरंजक कसा होईल, हेच बघत गेला.

दिवाळी विशेषांकासारखाच वासंतिक अंकही 'मनोरंजन'नेच प्रथम सुरू केला. हा अंक खास ललित साहित्याला वाहिलेला असे. पहिल्याच वासंतिक अंकात 'मनोरंजन'ने आपल्या सर्व लेखक-लेखिकांची छायाचित्रे दिली होती. मनोरंजनने मराठी वाचकांना ललित वाङ्मयाची गोडी तर लावलीच, पण या वाङ्मयीन व्यासपीठावरून एकाहून एक सरस असे प्रयोगही केले. हे प्रयोग करत असताना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मनोरंजनचा एक अंक 'दिल्ली दरबार विशेषांक' होता. ३५० पानांच्या या अंकात १८७७ आणि १९०३ सालच्या दिल्ली दरबाराची सचित्र माहिती दिली होती. मनोरंजनने बरेचसे व्यक्तीविशेषांकही काढले. आगरकर, महर्षि कर्वे, ह. ना. आपटे अशा महनीय व्यक्तींचे विशेषांक काढून मनोरंजनने त्यांना खास साहित्यिक मानवंदना दिली.

त्याकाळी बंगालमधून निघणारे 'प्रवासी' ही मासिक प्रतिष्ठेचे मानले जाई. या मासिकानेसुद्धा आपल्या अंकातून 'मनोरंजन'च्या कार्याची जाहीर प्रशंसा केली. मनोरंजनच्या विलक्षण कामगिरीचा क्रम लावायचं ठरलं तर कथेच्या बाबतीत या मासिकाने बजावलेल्या भूमिकेला अग्रक्रम द्यावा लागेल.

त्यापूर्वीच्या मासिकांत छापून येणार्‍या कथांना दुय्यम स्थान होतं. बर्‍याच कथा दोन-तीन महिन्यांच्या टप्प्याने छापून यायच्या. त्यावर लेखकाचं नाव छापणं अनावश्यक समजलं जाई. कारण 'कथा' या प्रकाराकडे कोणी फारसं गांभीर्याने बघत नव्हतं. कादंबरीचेच एक 'बाय प्रॉडक्ट' अशी कथेकडे बघण्याची सगळ्यांची दृष्टी होती. 'मनोरंजन'ने मात्र हा समज पुसून आपल्या अंकात कथेला मानाचं स्थान दिलं. एकाच अंकात संपूर्ण कथा हा प्रकार 'मनोरंजन'पासूनच सुरू झाला. गो. गं. लिमये, आनंदीबाई शिर्के, वा. रा. जोशी, गं. ना. सहस्रबुद्धे, मालतीबाई दांडेकर, काशीबाई कानिटकर अशा कितीतरी कथालेखकांना घडवण्याचं श्रेय 'मनोरंजन'कडे जातं. वि. स. खांडेकरांनी आपली पहिली कथा 'मनोरंजन'साठीच लिहिली. १९१३ सालापासून तर कथालेखिकांसाठी स्वतंत्र विभागच मासिकात सुरू करण्यात आला.

'मनोरंजन'ने मराठी कथेला स्वतःचा चेहरा दिला असं दोन्ही अर्थाने म्हणता येईल. कारण 'मनोरंजन'मध्ये कथा प्रथमच सचित्र झाली. पन्नास वर्षांच्या कालखंडात 'मनोरंजन'ने एकंदर ८२७ कथा प्रसिद्ध केल्या. ऐतिहासिक, पौराणिक, अद्भुतरम्य, रहस्यरंजित, प्रेमकथा, अनुवादित कथा, विनोदी, सामाजिक समस्याप्रधान असे कथावाङ्मयाचे विविध प्रकार मनोरंजनमधून हाताळले गेले. 'मनोरंजन'च्या पहिल्या पंधरा-वीस वर्षांच्या कालखंडातील कथांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर याच कालखंडात कथालेखनाचं तंत्र हळूहळू विकसित होत गेल्याचं दिसतं.

आपल्या अंकातून क्रमशः कादंबरी प्रसिद्ध करून मनोरंजनने मराठी वाचकांना या वाङ्मयप्रकाराचीही गोडी लावली. स्वतः का. र. मित्र हे बंगाली भाषेचे परमभक्त. आणि बंगालीत त्यावेळी कादंबरीलेखनाचा सुकाळच होता. त्यामुळे मित्रांनी अनेक बंगाली कादंबर्‍या मराठीत आणल्या. 'मनोरंजन'मध्ये प्रसिद्ध होणार्‍या कादंबर्‍यांच्या विषयांतही हळूहळू बदल होत गेले. कौटुंबिक व प्रेमकथांचे प्राबल्य वाढले. तत्त्वप्रधान, वैज्ञानिक, आत्मवृत्तपर, अध्यात्मिक अशा वेगळ्या वाटेवरचे विषयही 'मनोरंजन'च्या कादंबरीलेखनातून हाताळले गेले. कादंबरीलेखनातील मैलाचा दगड असं जिचं वर्णन करता येईल ती श्री. वामन मल्हार जोशी यांची 'रागिणी' ही कादंबरी १९१५पासून 'मनोरंजन'मध्ये क्रमशः प्रसिद्ध झाली. या कादंबरीत धर्म, नीती, वेदांत, कला, वाङ्मय, राजकारण, समाजकारण अशा विविध पैलूंतून त्या काळातील समाजाचं व विचारप्रवाहाचं दर्शन घडतं.

कथा आणि कादंबरीप्रमाणेच कवितेलाही 'मनोरंजन'मध्ये महत्त्वाचं स्थान होतं. मनोरंजनच्या जवळजवळ प्रत्येक अंकात गोविंदाग्रजांच्या कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय लक्ष्मीबाई टिळक, केशवसुत, बालकवी, कवि अनिल, यशवंत, बी, काव्यविहारी या त्या काळातल्या प्रथितयश कवींची हजेरीही असे. मनोरंजनातला विनोदही खास होता. आपल्या पहिल्याच वर्षाच्या बाराव्या अंकात 'मनोरंजन'ने 'नवरे कसे तयार करावेत?' हा चटकदार लेख प्रसिद्ध केला होता. मराठी वाचकांत नियतकालिकांचं स्थान दृढ झाल्यावर तरुण पिढीने विनोदविषयक नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अर्थातच 'मनोरंजन' हे त्यांचे महत्त्वाचं व्यासपीठ होतं. श्री. का. ना. पटवर्धन यांनी क्रमशः लिहिलेली 'नाटक्यांचे तारे' ही दहा लेखांची मालिका तर विनोद कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण ठरेल. नाट्यव्यवसायातील प्रवृतींवर आणि बारकाव्यांवर भाष्य करताना त्यांनी उपहास, उपरोध, अतिशयोक्ती, वक्रोक्ती या सर्व प्रकारांचा आधार घेतलेला दिसतो.

पहिली काही वर्षं 'मनोरंजन'च्या प्रत्येक अंकात अनिष्ट सामाजिक रुढींवर ताशेरे ओढणारी कमीतकमी एक पानभर तरी व्यंगचित्रं असायची. 'विदुषकांचे साम्राज्य' या सदरात निव्वळ विनोदी लेखन असे. आजच्या आपल्या 'संता-बंता'सारखी 'जॉन-स्मिथ' वगैरे मंडळी असत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व बाळकराम (राम गणेश गडकरी) यांनी तर 'मनोरंजन'च्या अनेक अंकांत अफलातून विनोदी कलाकृती घडवल्या. प्रवासवर्णनं, चरित्रे, आत्मचरित्रे हे लेखनप्रकारही या मासिकात कायम हाताळले गेले. महर्षि धोंडो केशव कर्वे यांचं आत्मचरित्र १९१४ सालापासून क्रमशः प्रसिद्ध झालं. अवंतिकाबाई गोखले यांनी आपल्या इंग्लंड प्रवासाबद्दल लिहिलं. 'प्रौढविवाह' या विषयावर न. चिं. केळकर यांच्या कन्या गिरिजाबाई केळकर व सौ. कमलाबाई देशपांडे यांनी दीर्घ लेख लिहिले.

वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी 'मनोरंजन'ने केलेलं कार्यही अफाट आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र या विषयांतील सुंदर, सोप्या भाषेतले लेख 'मनोरंजन'मध्ये नियमितपणे छापून येत असत. 'एरोप्लेन व एअरशिपमधील फरक', 'झेपेलिन म्हणजे काय?', 'प्रोपेलर कसे काम करते?', 'बाष्परथरोधकाचे कार्य' असे लेख १९१५ सालानंतर नियमितपणे प्रसिद्ध होत असत.

या साहित्यिक अंगांबरोबरच इतर बाबतीतही 'मनोरंजन'ने आपली खास वैशिष्ट्ये जपली होती. पहिली सहा वर्षं 'मनोरंजन'चे अंक पूर्णपणे जाहिरातविरहीत होते. बहुतांश साहित्य हे सचित्र असे. निवडक प्रसंगाच्या पानभर चित्रासाठी वेगळा कागद वापरला जाई. दर वर्षाअखेर आपल्या वर्गणीदारांना एक कादंबरी भेटीदाखल देण्याची प्रथा 'मनोरंजन'ने पाळली होती.

'मनोरंजन'च्या अंकात 'एडिटरचे टेबल' नावाचं एक सदर होतं. त्यात मित्र आपल्याकडे आलेल्या लेखांना आपण पसंती - नापसंती का दिली याबद्दलची कारणमीमांसा करत असत. लेखकांचा 'मनोरंजन'वरील विश्वास वाढायला या सदराची मदत झाली. आपल्या वाचकांची व लेखकांची आर्थिक कोंडीही 'मनोरंजन'ने कधी केली नाही. त्यांच्या अंकांची किंमत आणि वार्षिक वर्गणी जशी सर्वसामान्य वाचकांना परवडणारी होती, तसेच लेखकांना मानधनही यथायोग्य होते. स्पर्धेतील कथा किंवा लेखांसाठी रोख बक्षीसं तर असायचीच, पण जर एखादी स्त्री विजेती ठरली तर बक्षिसाची रक्कम दुप्पट केली जायची.

एकूणच मित्रांनी आपल्या मासिकात आणि साहित्यजगतात लेखिकांना वेगळी ओळख मिळवून दिली. 'मनोरंजन'मुळेच अनेक स्त्रिया लिहू लागल्या. या मासिकातल्या सर्व साहित्यात स्त्रीची प्रतिमा संकटाला सोशीकपणे आणि धैर्याने सामोरी जाणारी, अन्यायाचा प्रतिकार करणारी आदर्श व सुशिक्षित स्त्री अशीच रंगवली होती. मुखपृष्ठावरही सुशिक्षित, विचारी स्त्री दाखवली जाई. 'मनोरंजन'चं एक मुखपृष्ठ मला फार आवडतं. न्या. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सायकलवर स्वार होऊन प्रगती करणार्‍या स्त्रिया' त्यात दाखवल्या आहेत. १९०९ सालापासून मुखपृष्ठावर 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' हे ब्रीदवाक्य यायला लागले. त्याच्याशी प्रामाणिक राहण्याची संपादकांची भूमिका आणि मजकुराची निवड करतानाही स्त्रीसुधारणाविषयक चळवळींना पाठिंबा देण्याचे त्यांचे धोरण 'मनोरंजन'चा कोणताही अंक चाळताना स्पष्टपणे जाणवून येते.

'मनोरंजन'चे अंक वाचताना मित्रांचं संपादनकौशल्यही लगेच लक्षात येतं. सर्वसामान्य वाचक, बुद्धिप्रधान वाचक आणि केवळ माहितीपूर्ण लेखन वाचणारा उच्चशिक्षित वाचक या तीन टोकांवरच्या ग्राहकांना खूश करण्याचं पुरेपूर कसब मित्रांच्या संपादनात होतं. १८९५ ते १९३५ हा मनोरंजनचा कालखंड. या चाळीस वर्षांच्या अवधीत 'मनोरंजन'ने बारा पानी अंकापासून सुरुवात करून शंभर पानी अंकांपर्यंत मजल मारली. मराठी वाङ्मयाला वेगळी दिशा दिली. मराठी साहित्यात बहुमोल भर घातली आणि अनेक पिढ्यांतील मराठी वाचकांना भरभरून आनंद दिला.

पण तरीही 'मनोरंजन'च्या पाठोपाठ त्याची री ओढणारे दिवाळी अंक प्रसिद्ध झाले, असं नाही. 'मनोरंजन'नंतर साधारणतः दहा वर्षांनी सुरू झालेल्या आणि अजूनही टिकून असलेल्या 'किर्लोस्कर'ने आपल्या डोळ्यांसमोर जी उद्दिष्टे ठेवली होती त्यातील दोन प्रमुख होती - मासिक चटकदार तर असावंच, पण त्याचबरोबर वाचकांच्या ठायी स्वावलंबन, महत्त्वाकांक्षा, साहस या गुणांचे रोपण करण्याचं कार्य त्याने करावं. आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रुढी बोकाळलेल्या दिसताहेत त्यांना आळा घालण्याचं कार्य हे मासिक करील, अशी 'किर्लोस्कर'च्या संपादकांची धारणा होती. म्हणूनच एकीकडे ना. सी. फडके तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर या दिवाळी अंकात नियमितपणे लिहीत होते. ना. सी. फडके यांची 'युगप्रवर्तक' कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण झाली ती याच काळात. 'किर्लोस्कर'चा दिवाळी अतिशय लोकप्रिय होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील तीन मराठी पिढ्यांचा सामाजिक व औद्योगिक सुधारणेचा विचार व वाङ्मयकलांविषयीची अभिरुची त्यांनी घडवली होती.

त्याच काळात 'विविधवृत्त', 'यशवंत', 'अरुण', 'ज्योत्स्ना', 'प्रतिभा', 'चंद्रिका', 'पारिजात' असे दिवाळी अंक प्रसिद्ध झाले खरे, पण खर्‍या अर्थाने दिवाळी अंक बहरले ते स्वातंत्र्योत्तर काळात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीयच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत मुक्ततेचं, आत्मप्रत्ययाचं, मोकळ्या आत्माविष्काराचं वातावरण आलं आणि मराठी साहित्याचं रूप पालटण्यास प्रारंभ झाला. यास कारणीभूत ठरले ते दिवाळी अंकच. आणि त्यातही आपला ठसा उमटवला तो दीनानाथ दलाल आणि रॉय किणीकरांच्या 'दीपावली' या दिवाळी अंकानं. 'दीपावली' हा पहिला दिवाळी-वार्षिक विशेषांक.

मराठीतील उत्तमोत्तम साहित्य 'दीपावली'त प्रसिद्ध झालंच पण उत्कृष्ट चित्रे, मुखपृष्ठे, चित्रकलाविषयक चर्चात्मक लेखही दिले. रॉय किणीकर यांनी अकरा वर्षं 'दीपावली'चं संपादन केलं. जुने अंक पाहिले की त्यांच्या साक्षेपी संपादनाचा प्रत्यय येतो. संपूर्ण अंक हा दिमाखदार आणि दर्जेदारच असायला हवा, हा त्यांचा दृष्टीकोन होता. अनेक मान्यवर लेखकांना 'दीपावली' दिवाळी अंकात लिहिण्याचं आमंत्रण हा अभिमानाचा विषय होता.

रॉय किणीकर हे एक भन्नाट प्रकरण होतं. जबरदस्त, दैवी प्रतिभा, पण जोडीला असलेलं त्यांचं भणंगपण. त्यांनी एक अंक काढला होता, 'चिमुकली दिवाळी' या नावाचा. या अंकाचं मुखपृष्ठ म्हणजे जणू एक स्लेट पाटीच होती. त्यावर पेन्सिलीने लिहिता येऊ शकत होतं! या अंकाला पाने होती बावन्न. बावन्न पत्ते म्हणून बावन्न पाने. प्रत्येक पत्त्याला धरून किणीकरांनी चार ओळी लिहिल्या होत्या. मुलांना अभिनव पद्धतीनं मुळाक्षरांची ओळख करून देण्यासाठी भारतीय संस्कृती, इतिहास, थोर व्यक्ती, निसर्ग इ.मधील उदाहरणांचा उपयोग केला होता, आणि त्यासाठी चारोळ्यांचा वापर केला होता.
उदा. ए - एकनाथ एकनाथ हे एकच संत
दलितांसाठी वाटे खंत.
ब्राह्मण महार आम्ही एक.
एकच आम्ही जरी अनेक!

किंवा,

ट - टाटा टाटांच्या टाटानगरीत
किमया करती हजार हात.
लोखंडाची बघा कोंबडी
घालितसे सोन्याची अंडी.

'संपादन ही क्रिएटीव्ह प्रोसेस असते आणि म्हणूनच संपादक हा एक क्रिएटीव्ह आर्टिस्ट असतो,' असं ते म्हणत. विविध वाद्यसुरांतून संगीतकार एक सिंफनी तयार करतो, ती त्याची स्वतःची अशी असते. विविध प्रकारच्या लेखनांतूनसुद्धा दिवाळी अंकात एक लय निर्माण करावी लागते आणि ती त्या संपादकाची असावी लागते,असं त्यांचं मत होतं. म्हणूनच काही अंक हे संपादकांचे दिवाळी अंक म्हणून ओळखले जातात, जात. 'अभिरुची' (पु. आ. चित्रे), 'नवयुग' (आचार्य अत्रे), 'मौज', 'सत्यकथा' (श्री. पु. भागवत - राम पटवर्धन), 'वीणा' (उमाकांत ठोमरे), 'हंस', 'नवल', 'मोहिनी' (अनंत अंतरकर) अशी काही उदाहरणं सांगता येतील.

दिवाळी अंकांच्या प्रांतात 'मौज'ने केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे. १९२२ साली 'मौज'चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. संपादक होते अ. ह. गद्रे. मौजेच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या ६२००, दुसर्‍या दिवाळी अंकाच्या ८२०० प्रती निघाल्या होत्या. तिसरा दिवाळी अंक १९२४चा. त्याच्या मुखपृष्ठावरच प्रतींची संख्या १२,२०० अशी नोंदवली आहे. दिवाळी अंकांची वाढती लोकप्रियता यावरून लक्षात यावी. मौजेच्या काही दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर काही नंबर टाकलेले असत. त्या त्या नंबरचे अंक कार्यालयात आणून देणार्‍यांना बक्षीस देण्याची पद्धत होती. एकूण १२ बक्षिसं दिली जात. सर्व बक्षिसांची एकूण रक्कम होती रुपये १०१.

ज्ञानवर्धनाचा हेतू नेटानं जोपासण्याचं काम मौजेच्या, आणि सत्यकथेच्या सार्‍या अंकांनी केलं. त्यातील लेखांचं वैविध्य लक्षणीय होतं. स. ह. शुक्ल, वि. वा. हडप, ग. त्र्यं. माडखोलकर, र. धों. कर्वे ही मंडळी नेमानं मौजेच्या दिवाळी अंकांत लिहीत असत. याशिवाय चित्रसंच अंकातून देण्याची पद्धत होती. बालगंधर्वांशिवाय विलायत खाँ यांच्या शिष्या इंदिराबाई, हिराबाई बडोदेकर, नटवर्य कृष्णराव शेंडे यांची छायाचित्रे १९२४ सालच्या अंकात आहेत. मुखपृष्ठावरील छायाचित्रातच चित्रकाराचं नाव आणि सही असे. १९३० सालच्या दिवाळी अंकात 'कृतज्ञतेची पुष्पांजली' या संपादकीयात चित्रकार मुळगावकर, नेराय (ब्लॉकमेकर्स), कन्हैयालाल वकील यांच्याविषयी स्वतंत्र कृतज्ञता व्यक्त केली आहे.

काही विचक्षण आणि विलक्षण मजकुराने पुरोगामित्वाची विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न का. र. मित्र यांनी आपल्या मासिकात केला होता. तसाच प्रयत्न मौजेतही केला गेला. अनेक स्त्रियांनी दिवाळी अंकांतून त्या काळी धाडसी ठरेल असं लिखाण केलं. स्त्री प्रश्नांबाबतची जाणीव अतिशय परखड शब्दांत र. धों. कर्वे यांनीही अनेकदा मांडली.

पुढे भागवत कुटुंबाकडे मौजेची मालकी आली, आणि १९४५ सालापासून श्री. पु. भागवत यांनी मौजेचा दिवाळी अंक संपादित करण्यास सुरुवात केली. जोडीला सत्यकथेचा दिवाळी अंक होताच. श्रीपुंनी अक्षरशः अनेक लेखक घडवले. अनेक कथा-कविता त्यांनी पुनःपुन्हा लिहून घेतल्या होत्या. दिवाळी अंकासाठी श्रीपुंच्या संपादनाचं मार्गदर्शन मिळावं म्हणून काल-आजचे ख्यातनाम लेखक उमेदवारी करायचे. विद्याधर पुंडलिक, दि. बा. मोकाशी, आनंद विनायक जातेगावकर यांसारखे लेखक त्यांनीच पुढे आणले. वि. स. खांडेकर, वि. द. घाटे, कुसुमावती देशपांडे, अनिल, बोरकर-कुसुमाग्रजांपासून अरुणा ढेरे, सानिया, मिलिंद बोकीलांपर्यंत लेखकांच्या अनेक पिढ्यांना श्रीपुंचं साक्षेपी संपादन लाभलं. मौज-सत्यकथेनं साहित्य-कलांतील नव्या-जुन्याच्या सत्त्वशील परंपरेचं भान कायम जागतं ठेवलं. मौज-सत्यकथेचे जुने अंक बघितले तर एकाच वेळी गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, अरविंद गोखले, सदानंद रेगे यांच्या कथा, मुक्तिबोध, मर्ढेकर, पाडगावकर, वासंती मुझुमदार यांच्या कविता, वा. ल. कुलकर्णी, दि. के. बेडेकर, कुसुमावती देशपांडे, रा. भि. जोशी यांची समीक्षा यांचं संमेलनच आढळतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर १९५५ सालच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात गोनीदांची 'कुणा एकाची भ्रमणगाथा', पुलंचं 'भ्रमणमंडळ' आणि दुर्गाबाईंचं 'संध्यारंजित कार्तिक' एकाच वेळी प्रकाशित झाले होते. शिवाय हुसेन, हेब्बर, सातवळेकर यांची चित्रं होती.
पुलंचं सर्वोत्कृष्ट समजलं जाणारं 'मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास' 'मौज'च्या दिवाळी अंकातच प्रसिद्ध झालं होतं. 'बटाट्याची चाळ'ही दिवाळी अंकांतूनच बांधली गेली. 'व्यक्ती आणि वल्ली'ही. सुनीताबाई देशपांडे यांचे लेख, पत्रं केवळ 'मौज'मुळेच वाचकांपर्यंत पोहोचू शकली. गौरी देशपांडे, सानिया यांच्या तर बहुतेक सर्वच कादंबर्‍या अगोदर 'मौज'च्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाल्या.
१९८२ साली सत्यकथा बंद पदलं. पण दर्जेदार दिवाळी अंकांच्या यादीत मौज आजही अग्रभागी आहे.

१९३८ साली 'धनुर्धारी'चा पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला. कृष्णाजी नारायण सापळे यांचे हे मासिक. या मासिकाचं पूर्वीचं नाव 'महाराष्ट्र शारदा' असं होतं. वसंतराव लाडोबा म्हापणकरांनी 'धनुर्धारी' हे नाव सुचवलं होतं. दिवाळी अंकांत वार्षिक भविष्य देण्यास म्हापणकरांनी 'धनुर्धारी'पासून सुरुवात केली. आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हापणकरांनी 'धनुर्धारी'त भविष्य लिहिलं. 'धनुर्धारी'चा दिवाळी अंक तेव्हा २०० पानांचा असे. यात पन्नासहून अधिक पानं 'हे वर्ष कसं जाईल' या भविष्यकथनासाठी दिलेली असत. 'माझ्या लेखनातील एकाही अक्षराची काटछाट न करता मी पाठवलेले भविष्य जसेच्या तसे छापले जावे,' अशी अट म्हापणकरांनी 'धनुर्धारी'च्या संपादकांना घातली होती. वाचक भविष्य वाचतात, हे लक्षात घेऊनच म्हापणकर भविष्य लिहीत. दिवाळी अंकातील त्यांचे भविष्यलेखन हा इतर विषयांप्रमाणेच आनंदाचा भाग होता. म्हणूनच दिवाळी अंकातील भविष्य वाचणार्‍यांचाही एक खास वर्ग तयार झाला होता. वाचकांना भविष्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, दैववादी बनविण्यापेक्षा त्यांना प्रयत्नवादी बनवणे हे म्हापणकरांचे वैशिष्ट्य होते. राशीनुसार स्वभावदर्शन घडविण्याचे कसब या भविष्यकथनात होतं. त्यात खुबीने संतवचने पेरलेली असत. त्यामुळे म्हापणकरांच्या भविष्यकथनावर भविष्य कमी व इतर अवास्तव गोष्टी जास्त, असा आक्षेपही घेतला गेला. पण तरीही हे वाचकांचं आवडतं सदर होतं आणि हे सदर लोकप्रिय करण्याचं काम 'धनुर्धारी'ने केलं. आज भविष्यासाठीही स्वतंत्र अंक निघतात. म्हापणकरांचे भविष्य ही त्यामागची प्रेरणा आहे. १९४४ सालापासून म्हापणकरांनी 'मौज'मध्येही लिहायला सुरुवात केली.

'हंस', 'मोहिनी', 'नवल' या दिवाळी अंकांनीही स्वतःचा एक वाचकवर्ग तयार केला. 'हंस'मध्ये कथा, ललित वाङ्मय, समीक्षा यांवर भर होता. 'नवल'मध्ये विविध प्रकारच्या अनुवादित कथा, भयकथा, रहस्यकथा दिल्या जात. 'मोहिनी'मध्ये नाट्य-चित्रविषयक घडामोडी आणि विनोदी साहित्य असे. 'हंस'ने विविधता जपण्यासाठी सतत नवे प्रयोग केले. गूढकथा, कूटकथा, कल्पनाकथा असे वैविध्य ठेवले. श्री. द. पां. खांबेटे, ग. ल. ठोकळ, पु. भा. भावे यांच्या कथा प्रत्येक अंकात असत. पुलंनीही 'हंस'साठी विपुल लेखन केलं. अनुवादित कथा, चरित्र असे अनेक विषय जी. ए. कुलकर्णी, शांताबाई शेळके अशा नामवंतांच्या लेखणीतून वाचकांसमोर आले. एकंदर 'कथा' या वाङ्मयप्रकाराला 'हंस'ने महत्त्वाचं स्थान दिलं.

अगदी सुरुवातीच्या काळात, मासिकं जेव्हा प्रकाशित व्हायला सुरुवात झाली तेव्हा 'आजकालच्या गोष्टी' या नावाने कथा प्रसिद्ध होत. कादंबरीला 'मोठ्या गोष्टी' असं म्हणत. कथा आणि कादंबरी यांचं स्वरूप लेखकांनाही पुरेसे स्पष्ट झालं नव्हतं. कथा म्हणून लिहिल्या गेलेल्या मजकुरात अनेक प्रकरणं असत. या प्रकरणांना नावंही दिली जात. कथांची शीर्षकं त्यांचा आशय स्पष्ट करणारी असत. उदा., अपकाराची फेड उपकारांनी, थोड्या चुकीचा घोर परिणाम, दुष्काळातील एक करुण गोष्ट इ. मात्र दिवाळी अंकांमधून कथा प्रसिद्ध होऊ लागल्या आणि नियतकालिकांबरोबरच कथावाङ्मयाचाही विकास होत गेला. लेखकांनाही लेखनासाठी व्यासपीठ मिळालं. वाचकांचा तर कथेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत होता. या सर्वच गोष्टी परस्परपूरक ठरल्या. आरंभीच्या काळात 'मनोरंजन', 'किर्लोस्कर', 'यशवंत' या दिवाळी अंकांनी कथेच्या संदर्भात महत्त्वाचं कार्य केलं. मराठी कथा हळूहळू तंत्रप्रधान बनू लागली. ह. ना. आपटे, फडके, खांडेकर, य. गो. जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्या दिवाळी अंकांतील कथा वाचकांनी डोक्यावर घेतल्या. चिं.वि. जोशी यांच्या विनोदी कथाही त्याच काळात बहरल्या.

१९४५च्या सुमारास मराठी कथेनं पुन्हा कात टाकली. वास्तव चित्रण, मनोविश्लेषण, आशयानुरूप अभिव्यक्ती या वैशिष्ट्यांसह कथालेखन होऊ लागलं. नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगुळकर, अरविंद गोखले, शांताराम यांच्या कथा दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. ग्रामीण जीवनाचं चित्रण असलेलं कथालेखन अधिक प्रभावीपणे होऊ लागलं. शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथांना शहरी वाचकही लाभले. १९६०-७०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या कथांमध्ये विज्ञान कथांचाही समावेश आहे. अनेक भारतीय, परदेशी भाषांमधील कथांचे अनुवादही दिवाळी अंकांत येऊ लागले. यानंतरच्या काळात आनंद पाटील, मिलिंद बोकील, राजन खान, राजन गवस, प्रकाश नारायण संत, सुबोध जावडेकर, पंकज कुरुलकर, सुमेध वडावाला, गौरी देशपांडे, सानिया, प्रिया तेंडुलकर, माधुरी शानभाग असे कथालेखक पुढे आले. कथांची विशेषतः दिवाळी अंकांतील लोकप्रियता पाहून खास कथेसाठी असलेला 'कथाश्री' हा दिवाळी अंक सुरू झाला. या सार्‍याचा परिपाक म्हणजे वरील लेखकांची 'झेन गार्डन', 'वनवास, 'शारदा संगीत', 'पंखा', 'झुंबर', 'जन्मलेल्या प्रत्येकाला' अशी अप्रतिम सुंदर पुस्तकं मराठी साहित्याला मिळाली.

दिवाळी अंकांमुळे उत्तमोत्तम कादंबर्‍याही लिहिल्या गेल्या. चि. त्र्यं. खानोलकर यांच्या 'गणुराया' आणि 'चानी', जयवंत दळवी यांच्या बहुतेक सर्व कादंबर्‍या अगोदर दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या. श्री. ना. पेंडसे, दि. बा. मोकाशी, व. पु. काळे, ज्योत्स्ना देवधर, व्यंकटेश माडगुळकर ('बनगरवाडी' मौजेत प्रसिद्ध झाली होती) यांनी आपल्या बहुतेक कादंबर्‍या या दिवाळी अंकांसाठीच लिहिल्या. संपूर्ण कादंबरी दिवाळी अंकांत देता येईनाशी झाली, तेव्हा मग लघुकादंबरी आणि दीर्घकथा वाचकप्रिय झाल्या. सानिया व गौरी देशपांडे यांच्या सार्‍या लघुकादंबर्‍या अशा लिहिल्या गेल्या.

'मौज', 'दीपावली', 'दीपलक्ष्मी', ना. सी. फडके यांनी सुरू केलेलं 'अंजली, 'लोकसत्ता' अशा दिवाळी अंकांतून दर्जेदार कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. 'मौज', 'सत्यकथा' यांच्या प्रत्येक दिवाळी अंकात एक लघुकादंबरी असे. कमल देसाई यांच्या 'रात्रंदिन आम्हां', 'काळा सूर्य', 'हॅट घालणारी बाई' ('सत्यकथा' दिवाळी अंक), आशा बगे यांची 'रुक्मिणी' ही पहिली कादंबरी ('सत्यकथा' दिवाळी अंक), गदिमांची 'वेग', दळवींच्या 'बॅरिस्टर' आणि 'चक्र', प्रभाकर पेंढारकरांची 'रारंगढांग' ('दीपावली' दिवाळी अंक), 'वाघरू', 'त्रिशंकू', 'शोधयात्रा', 'मध्य लटपटीत' अशा कितीतरी.

दिवाळी अंकात प्रसिद्ध होणार्‍या सर्वच कादंबर्‍यांची एक मर्यादा असते. ती म्हणजे त्यांचं लघुत्व. दिवाळी अंकात कादंबरीला मिळतात जास्तीत जास्त चाळीस पानं. म्हणजे पुस्तकाची फार तर ऐंशी-नव्वद पानं. म्हणून विषय लहान घ्यावा लागतो. पात्रं, प्रसंग, घटना कमी लागतात. त्यामुळे बरेचदा दिवाळी अंकात आलेली कादंबरी पुस्तकरूपाने छापण्याआधी लेखक ती पुन्हा संपूर्णपणे लिहितात. बरेचदा शीर्षकही बदलून घेतात.

चंद्रकांत काकोडकर हे (तेव्हाच्या) तरुण पिढीचे आवडते लेखक होते कारण त्यांच्या गुलछबू कादंबर्‍या. शंकरराव कुलकर्णी यांनी 'चंद्रकांत' दिवाळी अंक सुरू केला. त्यात काकोडकरांच्या एकदम चार कादंबर्‍या असत. तोपर्यंत अंकात कादंबरी ही प्रथा अर्थातच सुरू झाली होती पण एका अंकात एकच कादंबरी असे. 'चंद्रकांत'ने चार कादंबर्‍यांची प्रथा सुरू केली. हा प्रयोग सात-आठ वर्षं चालू होता. पण नंतर काकोडकर आणि शंकरराव कुलकर्णी यांचं देण्याघेण्यावरून बिनसलं. तेव्हा काकोडकरांनी चंद्रकांतमध्ये लिहायचं सोडून स्वतःच दिवाळी अंक सुरू केला. या अंकाचं नाव होतं 'काकोडकर'! त्याच सुमारास दिवाळी अंकातील 'सबकुछ' एकाच लेखकाचे असावे या कल्पनेतून चक्क 'बुवा'ही अवतरला. या अंकात कथा, कादंबर्‍या, लेख असं सगळं वि. आ. बुवा हे एकटाकी लिहून काढत. मुखपृष्ठ मात्र शि. द. फडणीस यांचं असे. हा अंकही पाच वर्षं सुरू राहिला. श्री. एस. एम. काशीकर यांच्या 'सूर्यकांत'मध्ये एकटाकी लिहिलेल्या चार रहस्यमय कादंबर्‍या असत. सूर्यकांत भोसले उर्फ धूमकेतू हा त्या कादंबर्‍यांचा गाजलेला हीरो. त्याचंच नाव या अंकाला दिलं होतं. काशीकरांनीच नंतर चार शृंगारिक कादंबर्‍या असलेला 'उर्वशी' हा अंक लिहायला सुरुवात केली. ए. के. चटर्जी उर्फ अजगर, त्यांची मुलं - अजय व अचला, त्यांचे मदतनीस तक्षक, वासुकी या सार्‍यांच्या कथा 'धनंजय'च्या दिवाळी अंकात प्रचंड गाजल्या. राजा पारगावकर यांच्या या अफलातून कादंबर्‍यांवर वाचक फिदा होते. त्यांच्या चार कादंबर्‍यांचा 'अजगर' हा अंक निघे. अरुण ताम्हणकरांच्या चार भयकथांचा अंक 'भयकथा' या नावानं प्रसिद्ध होई. लेखकाच्या कादंबर्‍या असलेला दिवाली अंक भरपूर खपतो हे पाहून श्रीकांत सिनकरांनी दिवाळी अंक काढला. नाव अर्थातच 'श्रीकांत'. सिनकरांच्या चार कादंबर्‍या त्यात असत. त्यातील 'म्हातारी' ही कादंबरी खूप गाजली. आचार्य अत्रे यांनी 'मराठा'तून त्या कादंबरीवर कडाडून हल्ला केला. सिनकरांवर अश्लील साहित्य लिहिलं म्हणून खटला भरला गेला. त्यांना दंड झाला आणि हा दिवाळी अंक बंद पडला. 'अलका' हा दिवाळी अंकही वैशिष्ट्यपूर्ण होता. कवी श्री. श्रीकृष्ण पोवळे हे या अंकाचे संपादक, प्रकाशक, लेखक. काही वर्षं या अंकाचा खप जबरदस्त होता. एके वर्षी दिवाळीत 'अलका'च्या अंकांवर अत्तराचा फाया मारला होता. 'सुगंध' या दिवाळी अंकातही एक सुगंधी पान असे.

पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत वाङ्मयीन मासिकांचा खूप मोठा वाचकवर्ग होता, आणि त्यात कवितेला कथेच्या बरोबरीनं जागा होती. हल्ली असते तशी ती पानपूरक म्हणून अंकात नसे. 'हंस', 'अभिरुची', 'सत्यकथा' या मासिकांत पानंच्या पानं कवितांसाठी राखून ठेवलेली असत. एरवी कविता न छापणारी मासिकंही आपल्या दिवाळी अंकात कवितांसाठी जागा राखून ठेवायची. दिवाळी अंकांतील कवितांची वाचकांकडून खास दखल घेतली जाते असं वाटून कवीही आपली खास कविता दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. नवोदित कवींना दिवाळी अंकात प्रवेश करण्यासाठी वाट पहावी लागायची. १९८२ साली 'सत्यकथा' बंद पडलं आणि हळूहळू एकूणच मराठी मासिकं लुप्त होऊ लागली. 'मौज', 'दीपावली'सारखे अंक त्या आधीपासूनच दिवाळी वार्षिक होते. दैनिके, साप्ताहिकेही आपले दिवाळी अंक काढू लागले आणि नव्या कवितांच्या प्रसिद्धीसाठी फक्त दिवाळी अंकांचेच माध्यम उरले. 'अंतर्नाद', 'अनुभव' यांसारखी तगून राहिलेली मासिकं अधूनमधून कविता प्रसिद्ध करत असतात. 'कवितारती', 'अनुष्टुभ' यांसारखी द्वैमासिकं, कवितांसाठी मिघणारी लघु अनियतकालिकं, काही दैनिकांच्या साप्ताहिक पुरवण्या कविता प्रसिद्ध करतात. पण मराठी कवितांच्या प्रसिद्धीचं मुख्य माध्यम आज दिवाळी अंकच झाले आहेत. त्यामुळे दिवाळी अंकांतील कविता म्हणजेच एकूण मराठी कविता, असं म्हटलं तर अतिशयोक्त होणार नाही. आता काही कवींच्या कविता थेट त्यांच्या संग्रहांतूनच समोर येतात. पण बहुतांश कवींच्या कविता आधी दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होतात आणि नंतर त्यांच्या काव्यसंग्रहात संग्रहित होतात. काही काव्यसंग्रहात जात नाहीत. एका कवीच्या कवितांचा संग्रह प्रकाशित व्हायला अनेकदा अनेक वर्ष लागतात. त्यामुळे आज कवी काय लिहीत आहेत ते त्या वर्षीच्या दिवाळी अंकांतून दिसून येतं.

गांभीर्यानं कविता छापणार्‍या आणि आजमितीसही प्रसिद्ध होत असलेल्या दिवाळी अंकांतील सर्वांत जुना अंक आहे 'मौज'चा. अगदी १९३० सालापासूनचे अंक बघितले तरी त्या काळच्या अव्वल कवींच्या कविता त्या वर्षीच्या दिवाळी अंकात एकत्र आलेल्या आढळतात. ग. ल. ठोकळ, वा. रा कान्त, ना. घ. देशपांडे, ग. दि. माडगुळकर, कुसुमाग्रज, पद्मा गोळे, कृ. ब. निकुंब, शांता शेळके, पुरुषोत्तम पाटील, पु. शि. रेगे, सदानंद रेगे, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, इंदिरा संत, ना. धों. महानोर, नारायण सुर्वे, शंकर रामाणी, संजीवनी मराठे, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर, वसंत आबाजी डहाके, ग्रेस या सार्‍या दिग्गज कवींनी कायमच मौजेच्या दिवाळी अंकात हजेरी लावली. वेगवेगळ्या पिढ्यांतील हे दिग्गज एकाच अंकात पाहून अक्षरश: स्तिमित व्हायला होतं. या कवींच्या कवितांतला बदलही लक्षात येण्याजोगा आहे. सुरुवातीच्या काळात छंदोबद्ध असलेली कविता नंतरच्या काळात मुक्त होत गेली. कवितांचे विषयही बदलले. प्रेम किंवा स्त्री-पुरुष संबंध हे विषय थोडे बाजूला पडले, आणि सामाजिक समस्यांनी त्यांची जागा घेतली.

मात्र तत्कालीन घडामोडींचं प्रतिबिंब या दिवाळी अंकांतील कवितांत अभावानेच पडलेलं दिसून येतं. फार थोड्या कविता वर्तमानाचं भान दाखवतात. दुसरं महायुद्ध, स्वातंत्र्य चळवळ हे विषय अभावानेच हाताळले गेले. १९४७ सालच्या मौजेच्या दिवाळी अंकात केवळ मर्ढेकरांच्या कवितेत स्वातंत्र्यप्राप्तीचा संबंध आहे. बाकी कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, पु. शि. रेगे या सार्‍यांच्या प्रेमकविताच आहेत. पानशेतचा प्रलय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती हे विषयही अभावानेच हाताळले गेले. कोयनेच्या, किल्लारीच्या भूकंपानंतर निसर्गकोपावरच्या काही कविता दिवाळी अंकांत आल्या, पण त्या लगेच विसरल्याही गेल्या. आणीबाणीला विरोध करणारी कविताही दिवाळी अंकात आली नाही. पाडगावकरांची 'साधी सोपी कविता' ('महाराष्ट्र टाईम्स'चा दिवाळी अंक) हा एक अपवाद वगळता इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरुद्ध कोणीच निषेध नोंदवला नाही.

मराठी कवितेतले अनेक नवे प्रयोग आणि प्रवाह दिवाळी अंकांतूनच प्रकट झाले. अनिलांच्या दशपद्या, पाडगावकरांची बोलगाणी, वात्रटिका, विंदा करंदीकरांची तालचित्रे - विरुपिका, नारायण सुर्वे यांच्या स्वगत शैलीतील कविता, वसंत बापटांच्या प्रवासाच्या कविता, सदानंद रेग्यांच्या विक्षिप्त कविता, रॉय किणीकरांच्या रुबाया, सुरेश भटांच्या गझला, ग्रेस यांच्या गूढकविता दिवाळी अंकांतूनच रूढ झाल्या. विट्ठल वाघांच्या वर्‍हाडी, वसंत सावंतांच्या मालवणी, वाहरू सोनवण्यांच्या अहिराणी या वेगवेगळ्या बोलीभाषेतील कवितांची ओळखही दिवाळी अंकांनीच करून दिली. आबा गणपती, बाबा मोहम्मद अत्तार, विवेक मोहन राजापुरे यांसारख्या कवींनाही दिवाळी अंकांतूनच प्रसिद्धी मिळाली.
'मौज', 'सत्यकथा', 'कवितारती', 'अनुष्टुभ' यांच्या दिवाळी अंकांतून कविताविषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. 'कवितारती'ने मराठी काव्यक्षेत्रातल्या अनेक दिग्गजांवर विशेषांक काढले आहेत. 'कवितारती'च्या २००५ सालच्या दिवाली अंकात विंदा करंदीकरांच्या वेगवेगळ्या कवितांची मर्मग्रहणे समीक्षक व इतर कवींनी केली आहेत. कुसुमाग्रजांनी 'आपण कवी कसे झालो', ते 'हंस'च्या १९५१च्या दिवाळी अंकात आणि 'ललित'च्या १९६५ व १९६८च्या दिवाळी अंकात सांगितले आहे. 'हंस'च्या १९६४च्या दिवाळी अंकात त्यांनी 'काव्यातील आई कुठे गेली?' हा लेख लिहिला होता. विंदा करंदीकरांनी मर्ढेकरांच्या कवितेचे मूल्यमापन १९६५च्या 'सत्यकथे'च्या दिवाळी अंकात केले आहे. १९९६च्या 'मौज' दिवाळी अंकात मंगेश पाडगावकरांनी कबीरावर मुक्त चिंतन केले आहे. बोरकरांनी 'रचना'च्या दिवाळी अंकात पाडगावकरांच्या 'धारानृत्य' या काव्यसंग्रहाचं समीक्षण केलं होतं. याच अंकात एक चित्र देऊन कवींना त्यावर कविता करण्यास सांगितलं गेलं होतं.

दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होणार्‍या कवितांची दखल वाचकांकडून कितपत घेतली जाते? कधीकाळी ती घेतली जात असे. १९४६ सालच्या 'अभिरुची'च्या दिवाळी अंकात बा. सी. मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता प्रसिद्ध झाली आणि मराठी वाचक दचकले. आचार्य अत्र्यांनी नवकवितेवर टीकेची झोड उठवली, तर गंगाधर गाडगीळ यांनी नवकवींची बाजू लावून धरली. पुढे मर्ढेकरांवर अश्लीलतेच्या आरोपावरून खटलाही भरला गेला आणि ते त्यातून निर्दोष सुटले. या सार्‍या घटनांचं आढावा घेणारं पत्र मर्ढेकरांनी पु. आ. चित्रे यांना लिहिलं होतं. त्यात मर्ढेकर लिहितात, 'पिपात.. मुळे खळबळ खूपच झाली आहे. तीच मराठी वाचकांच्या रसिकतेचा जिवंतपणा सिद्ध करते. पण दुर्बोधता कुठे आहे आणि काय उकलायचे?' हे पत्र १९५७ सालच्या 'अभिरूची'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालं. १९७७ सालच्या 'हंस'च्या दिवाळी अंकात ग. दि. माडगूळकरांची 'नागडी नातवंडे' ही कविता प्रसिद्ध झाली आणि १९७८ साली पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवतांनी या कवितेतील 'संन्याशाच्या मस्तकात मदिरेची धुंदी चढत आहे' या ओळी जयप्रकाश नारायण यांच्यावर आहेत, असं म्हणून तिचा निषेध केला. आज मात्र दिवाळी अंकात (किंवा कुठेही) प्रसिद्ध होणार्‍या कवितेकडे कोणी गंभीरपणे पाहताना दिसत नाही.

असंच काहीसं वैचारिक वाङ्मयाबाबतही घडतं आहे. गेल्या वीस वर्षांत दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेलं वैचारिक वाङ्मय बघितलं तर अत्यंत मूलगामी विचार मांडणारं लेखन हाती येत नाही. उत्तम परिसंवाद, मुलाखती यांची वानवाच दिसून येते. श्री. म. माटे, प्रभाकर पाध्ये, श्री. दा. सातवळेकर, दुर्गाबाई भागवत यांचा अपवाद वगळता वरच्या दर्जाचं वैचारिक लेखन कोणीही केलेलं नाही. आचार्य अत्रे यांनी सुरू केलेला 'नवयुग'चा दिवाळी अंक मात्र याला अपवाद होता. खुद्द अत्रे यात लिहीत असत. शिवाय उत्तम चर्चा, परिसंवाद घडवून आणले जात. मात्र अत्रे, श्री. म. माटे, दुर्गाबाई, तेंडुलकर यांचा वैचारिक वारसा दिवाळी अंकांतून चालवला गेलेला दिसत नाही. शिवाय बहुजन समाजही या दिवाळी अंकांच्या खटाटोपापासून दूर गेला आहे.

'सत्याग्रही', 'अनुभव' यांसारखे काही दिवाळी अंक उत्तम वैचारिक वाङ्मय देण्याचा प्रयत्न करतात, पण हे अंक फारसे वाचकप्रिय नसल्याने हे विचारमंथन दुर्लक्षितच राहतं. मुलाखतींच्या बाबतीतही हेच घडतं. अतिशय वरवरचे प्रश्न, मुलाखतकाराचं अज्ञान यांमुळे उत्तम मुलाखतीही दिवाळी अंकांतून गायब झाल्या आहेत. शिवाय बहुतेक मुलाखती या चित्रपट-नाट्य क्षेत्रातील व्यक्तींच्या असल्याने एकप्रकारचा तोचतोचपणा या मुलाखतींत जाणवतो. 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात मात्र गेली अनेक वर्षं उत्तम मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. दुर्गाबाई भागवत, डॉ. श्रीराम लागू, सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड यांच्या उत्कृष्ट मुलाखती अनेकांच्या संग्रही आहेत.

बरेचदा दिवाळी अंकातील आपल्याला आवडलेली कविता किंवा कथा आपल्या संग्रही राहत नाही. ही कविता कोणी लिहिली होती, कुठल्या दिवाळी अंकात आली होती जे अजिबात आठवत नाही. दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेले चांगले साहित्य निसटून जाऊ नये या उद्देशाने १९८० सालापासून विश्वकर्मा प्रकाशनाने 'अक्षर दिवाळी' नावाचा संग्रह प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेले त्या त्या वर्षीचे उत्कृष्ट साहित्य निवडून त्या पुस्तकात संग्रहित केले जायचे. य. दि. फडके, दिनकर गांगल, डॉ. अरुणा ढेरे ही मंडळी संपादक होती. १९८३पर्यंत विश्वकर्मा प्रकाशनाने असे संग्र्ह काढले. हे बंद झाल्यावर १९८५, ८६ साली मॅजेस्टिक प्रकाशनानेही 'अक्षर दिवाळी' प्रकाशित केले. पण हा उपक्रम पुढे चालू राहिला नाही. मात्र जे वि. ग. माटे व मॅजेस्टीक प्रकाशनाला जमलं नाही, ते जमलं 'ऋतुरंग'चे अरुण शेवते यांना. अरुण शेवते यांनी विवक्षित दृष्टी ठेवून 'ऋतुरंग' दिवाळी अंक काढायला लागले आणि अल्पावधीतच हा अंक अतिशय वाचकप्रिय बनला. या अंकांतील लेखांच्या संकल्पना ध्यानात घेऊन निवडक लेखांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध झाली. 'त्यांच्याविषयी' या पुस्तकाचं तर प्रचंड स्वागत झालं. अनेक उत्तम लेख या पुस्तकांमुळे वाचकांपर्यंत पोहोचले. मात्र का. र. मित्र यांनी हा प्रयोगही खूप पूर्वी करून बघितला होता. आपल्याच मासिकात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट कथांचं एकत्रीकरण करून 'दोन घटका मनोरंजन' या नावाचं वार्षिक ते काही वर्षं काढत असत. लंडन मॅगझिनच्या तोडीचा हा अंक असावा, अशी त्यांची इच्छा होती.

दिवाळी अंकांची मुखपृष्ठं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मुखपृष्ठ आकर्षक असायला हवं, प्रत्येक अंकाची अस्मिता जपणारं असावं. त्याला 'शेल्फ अपील' आणि 'काउंटर अपील' असावं लागतं. यासाठी चित्रकार आणि मुद्रण तज्ज्ञाचं कौशल्य पणास लागलेलं दिसतं. दिवाळी अंक म्हटला की मुखपृष्ठावर मोहक अशा स्त्रीचं चित्र हवंच, असा संकेत ठरून गेलेला दिसतो. अर्थात बाजारात मागणी कशाला आहे, याची कल्पना संपादकांना असते. मुखपृष्ठ आकर्षक असेल तर अंक लगेच विकला जातो, हे मालक मंडळींना पुरेपूर ठाऊक असतं. त्यामुळे मुखपृष्ठावर हसरी, मोहक स्त्री असणं अपरिहार्यच होऊन बसलं.

दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर या दोघांनी दिवाळी अंकांसाठी स्त्रीची असंख्य वेगवेगळी रूपं रेखाटली. 'दीपावली'च्या पहिल्या अंकापासून जवळजवळ पंचवीस वर्षं प्रत्येक अंकाला दलालांचं मुखपृष्ठ होतं आणि आत चित्रमालिका होती. एका चित्रकारानेच हा चित्रमय सजावटीचा प्रघात रूढ केला आणि तो आजही टिकून आहे.

त्याकाळी दिवाळी अंक म्हणजे दलालांची खास शैलीतली अतिशय सुंदर तजेलदार अशी मुखपृष्ठं व आतील प्लेट्स. त्याच काळात मुळगावकरांनी स्वतःची अशी शैली विकसित केली होती. 'वसंत' दिवाळी अंकाची त्यांची मुखपृष्ठे मुख्यत्वे देवदेवता, पुराण, रामायण या विषयांवरील असत. दलाल - मुळगावकरांच्या सुरुवातीच्या चित्रांनी काही चित्रकारांना प्राणवायू पुरवला. तर काही चित्रकारांनी आपली स्वतंत्र शैली प्राणपणानं जपली.

त्याच काळात एका वेगळ्याच शैलीतली श्री. शि. द. फडणीस यांची चित्रं म्हणजे एक क्रांतीच होती. विषयाचं आकलन रेषेतून दाखवणं ही त्यांची खासियत होती. 'हंस', 'नवल', 'मोहिनी'ची अनेक मुखपृष्ठ त्यांनी चितारली. सुभाष अवचटांनी प्रकाशन क्षेत्रातील चित्रकलेत खूप चांगले बदल घडवून आणले. त्यांनी काढलेली कथाचित्रे त्या कथेत काय लिहिले आहे, ते सांगून जात. 'पारिजात', 'हंस', 'नवल' या दिवाळी अंकांची अवचटांनी काढलेली मुखपृष्ठ अतिशय देखणी असत. ज्ञानेश सोनार, प्रभुदेसाई यांची 'आवाज'मधली खिडकीचित्रंही बरीच गाजली. श्री. रवी परांजपे 'सामना'ची मुखपृष्ठं रंगवत. 'सकाळ'च्या दिवाळी अंकातील त्यांची चित्रंही अप्रतिम असतात. श्री. वसंत सरवटे यांच्या व्यंगचित्रांनीही अनेक दिवाळी अंकांना उत्तम दर्जा मिळवून दिला आहे. 'आवाज'ची चित्रंही गाजली. बाळासाहेब ठाकरे, दीनानाथ दलाल यांनी ती चित्रं काढली असावीत, यावर मात्र विश्वास बसत नाही.

मुखपृष्ठावर पोर्ट्रेट देण्याची पद्धत सुरुवातीला 'मौज' आणि 'किर्लोस्कर' या मासिकांनी अंगीकारली असली तरी नंतर 'स्त्री', 'केसरी', 'दीपावली' (दलाल यांच्या मृत्यूनंतर), 'साप्ताहिक सकाळ' अशा अनेक दिवाळी अंकांनीही ती वापरली. बाबूराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, गोपाळ देऊसकर, माधव सातवळेकर, जॉन फर्नांडीस, संभाजी कदम अशा अनेक चित्रकारांनी यासाठी पोर्ट्रेट्स तयार केली आहेत. 'मौज'ने १९५० सालापासून उत्कृष्ट चित्रंही आपल्या अंकात द्यायला सुरुवात केली. सुझा, हेब्बर, अतुल डोडीया, रझा, हुसेन, गणेश पाईन, जहांगीर सबावाला असे अव्वल चित्रकारांची चित्रं या अंकात असत. वाचकांवर उत्तम संस्कार करण्याचाच तो भाग होता. पद्मा सहस्रबुद्धे, आलमेलकर, सडवेलकर हे दिग्गज चित्रकार अंकाची सजावट करत. एकंदरीत जे जे उत्तम ते ते 'मौज'च्या अंकात बघायला मिळे, मिळतं.

आज दरवर्षी एकूण ४५०-५०० दिवाळी अंक निघतात. एकूण उलाढाल १२-१३ कोटींच्या घरात असते. प्रत्येक दिवाळी अंकाचा एक वेगळा वाचकवर्ग असला तरी लहान मुलं व स्त्रियांसाठीही वेगळे दिवाळी अंक काढले गेले.

१९२७ साली सुरू झालेल्या 'गृहलक्ष्मी' या मासिकाच्या संपादिका होत्या तारा टिळक (लक्ष्मीबाई टिळकांच्या कन्या) व पिरोज आनंदकर (आपल्या नावापुढे त्या कु., सौ., श्रीमती इ. उपाधी लावत नसत). उपसंपादक होते श्री. वसंत मराठे. स्त्रियांनी चालवलेल्या एका मासिकाचा उपसंपादक एक पुरुष असणं, ही त्या काळी नवलाची गोष्ट होती. या मासिकात कथा, कविता आणि स्त्रियांमध्ये त्यांच्या प्रश्नांविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूनं केलेलं लिखाण असे. मालतीबाई बेडेकर 'कटुसत्यवादिनी' या नावाने एक सदर चालवत. स्त्रियांना भेडसावणार्‍या सामाजिक प्रश्नांचा त्यात उहापोह केलेला असे. या मासिकाच्या दिवाळी अंकात कथा, स्त्रियांची गाणी, ललितकला, चित्रकला यांना स्थान दिले गेले होते. १९२९ साली माई वरेरकरांनी 'महिला' हे मासिक सुरू केलं. त्यांच्या दिवाळी अंकात माहितीपूर्ण लेख असत. कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची माहिती असे.

स्त्री संपादकांची एक पिढीच तेव्हा कार्यरत होती. शारदा मराठे यांचं 'जननी', नलिनी शिंदे यांचं 'महिला विश्व', इंदिरा तेलंग यांचं 'शारदा', सुमतीबाई शहा यांचं 'जैन महाराष्ट्र महिला' या मासिकांचे दिवाळी अंक अतिशय वाचनीय असत.
त्यानंतर प्रदीर्घ काळ चालू राहिलेले व मराठी शहरी मध्यमवर्गीय स्त्रीला ज्या मासिकानं बौद्धिक खाद्य पुरवले, ते म्हणजे शंकरराव किर्लोस्करांनी सुरू केलेलं 'स्त्री'. शंकररावांनी पहिल्या अंकात म्हटलं होतं, 'फुरसतीच्या वेळी स्त्रियांचं मनोरंजन करण्याबरोबरच आपला संसार अधिक सुखदायक करण्यास त्यांना उपयुक्त कल्पना पुरवणे, स्त्रियांचं समजातील स्थान व त्यांचे हक्क यांची त्यांना जाणीव करून देणे, स्त्रिया अबला आहेत ही भ्रामक समजूत दूर करणे आणि स्त्रियांना आपले विचार व आकांक्षा व्यक्त करण्यास साधन उपलब्ध करून देणे, ही या मासिकाची उद्दिष्टं आहेत.' किर्लोस्करवाडीहून १९५८ साली पुण्यात आल्यावर मुकुंदराव किर्लोस्कर संपादक झाले, पण शांताबाई किर्लोस्कर व ६४ सालापासून त्यांना संपादकीय कामासाठी मदत करणार्‍या विद्या बाळ या दोन स्त्री चळवळीतील विचारवंत स्त्रियांनी 'स्त्री' मासिकाची आदराची प्रतिमा उंचावली. शरीरविक्रय करून जगणार्‍या स्त्रिया, घटस्फोट, विषम विवाह, घरकामाबद्दल स्त्रीला मोबदला देण्याचा प्रश्न, सपत्निकांचे दुसरे विवाह, साहित्य संमेलनातील स्त्रियांचा सहभाग, हुंडाबळी, नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या समस्या अशा अनेक विषयांवर या मसिकाच्या दिवाळी अंकांतून चर्चा झाली.

गेल्या पन्नास वर्षांत अनेक मासिके खास स्त्रियांची म्हणून निघाली. मानिनी, अनुप्रिता, गृहलक्ष्मी, रागिणी, ललना वगैरे. या सार्‍या मासिकांच्या दिवाळी अंकांचा साचा ठरलेला आहे, असे. चार-पाच लोकप्रिय लेखिकांच्या कथा, एखादा लेख, एक मुलाखत, रांगोळ्या, भरतकामाचे नमुने, केशरचना, पाककृती इ. शैलजा राजे, योगिनी जोगळेकर, सुमन भडभडे, मंदाकिनी गोगटे, नयना आचार्य अशा कितीतरी मध्यमवर्गीय लेखिका या मासिकांतून लिखाण करून पुढे आल्या. एका बाजूला एकदम 'बायकी' अशा सुंदर, लाजाळू, अबोल, संवेदनाशील, रडक्या, कमनीय बांध्याच्या, विनयशील, गोड आवाजाच्या आणि स्वभावाच्या नायिका तर दुसर्‍या बाजूला विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या, स्वतःला 'मुक्त' समजणार्‍या नायिका, या दोन टोकांमध्ये बेतलेली कथा या मासिकांनी लोकप्रिय केली.

'माहेर'चा दिवाळी अंकानं मात्र गंभीरपणे स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा प्रयत्न केला, करतो. मंगला गोडबोले, दुर्गाबाई भागवत यांचं दर्जेदार लिखाणही या अंकात वाचायला मिळत असे. स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीचे मुखपत्र म्हणता येईल असं प्रामुख्यानं डाव्या चळवळींनी प्रेरित झालेलं लिखाण प्रसिद्ध करणारं 'बायजा' ग्रामीण स्त्रियांच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधून घेतं. विद्या बाळ यांच्या संपादनाखाली 'मिळून सार्‍याजणी' या मासिकानंही आपला ठसा उमटवला आहे. 'स्वतःशी नव्यानं संवाद निर्माण करणारं मासिक' असं बोधवाक्य घेऊन नवनव्या मुखपृष्ठ कल्पनांनी हे मासिक, स्वतःचा एक वेगळा चेहरा घेऊन आलं.

'निर्मळ रानवारा', 'आनंद', 'छावा', 'किशोर', 'टॉनिक', 'छात्र प्रबोधन' या बालमासिकांनी मुलांसाठी उत्तम साहित्य दिलं आहे. मात्र तरीही नावीन्यपूर्ण, दर्जेदार साहित्य देणारे दिवाळी अंक कमीच आहेत. 'आनंद' मासिकाचा जन्म १९०६ सालचा. वा. गो. आपटे हे त्याचे पहिले संपादक. १९०९ साली 'मनोरंजन'चा दिवाळी अंक येण्यापूर्वी १९०७, १९०८ या सालांत ऑक्टोबर महिन्यातील 'आनंद'च्या अंकांत दिवाळीनिमित्त अनेक खास लेख प्रसिद्ध झाले होते. रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी दिवाळीच्या निमित्तानं वेगळे लेख, कथा मुलांना द्याव्यात, हा उद्देश होताच. भा. रा. तांबे, राम गणेश गडकरी, बालकवी, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके अशा अनेक कवींनी 'आनंद' मासिकात कविता लिहिल्या. 'छावा' हा दिवाळी अंकही महत्त्वाचा. १९८५ साली इंदुताई टिळकांनी तो सुरू केला. या अंकाचं मुखपृष्ठ वैशिष्ट्यपूर्ण असतं. जाड अशा या कव्हरमधून दिवाळीसाठी खास वस्तू बनवता येतात. १९९०च्या दिवाळी अंकाचं कव्हर म्हणजे एक छान आखून दिलेला किल्ला आहे. ९१ सालचं कव्हर अयोध्येच्या राम मंदिराचं आहे. २००० सालचा आकाशकंदिलही मस्त. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने 'कुमार' मासिक सुरू झालं. या दिवाळी अंकात नाटिका, कोडी, खेळ, क्रिडाविषयक लेख, विज्ञानविषयक माहिती असा भरगच्च मजकूर असतो. मात्र या सार्‍यांत उठून दिसतो तो 'छात्र प्रबोधन'चा दिवाळी अंक. विज्ञान आणि ज्ञान, मनोरंजन, साहित्य व इतर कला, उपक्रमशीलता यांचा उत्तम मेळ या दिवाळी अंकात असतो.

एखाद्या समाजाची संस्कृती, मूल्यं ही नेहमी भाषेतून व्यक्त होतात. भाषाव्यवहार जेवढा समृद्ध, तेवढी संस्कृती समृद्ध आणि हेच साहित्यिक - सांस्कृतिक रूप दिवाळी अंकाच्या निमित्तानं समोर येत असे. दिवाळी अंक हे वर्षभरातल्या उत्तम साहित्याचं शिखर. त्यामुळेच त्याच्याविषयी उत्सुकता अधिक आणि त्याचं मोलही अधिक.

आज आपल्या जगण्यातलं सगळंच फार झपाट्यानं बदललं आहे. आपलं अर्थकारण, राजकारण, समाजकारण बदललं. जीवनशैली, कुटुंबपद्धती, मूल्यं, भाषा यांतही प्रचंड बदल झाले. या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटणं अगदी स्वाभाविक होतं. अर्थातच दिवाळी अंकांचं स्वरूप बदलणंही अपरिहार्य होतं.

अनेक बाजूंनी दिवाळी अंकाचं स्वरूप बदललं. आशय बदलला, दृश्यरूप बदललं, छपाई बदलली, वाचकवर्गही बदलला. दिवाळी अंक काढण्याचा हेतू बदलला. तो अधिक नफाकेंद्री झाला. निव्वळ जाहिराती मिळतात म्हणून दिवाळी अंक काढायचा व वीस-पंचवीस हजार रुपये नफा मिळवायचा, असंही सुरू झालं. पण सगळेच बदल वाईट होते असंही नाही. मुद्रणकलेत जे बदल झाले, त्याचा फायदा दिवाळी अंकांना नक्कीच झाला. पानांची मांडणी आकर्षक झाली. अंकात भरपूर चित्रे, फोटो टाकता येऊ लागले. मांडणीत लवचिकता आली. अंक देखणे, डोळ्यांना सुखावणारे झाले.

दिवाळी अंकातील साहित्यात झालेला बदल हा सर्वांत महत्त्वाचा आहे. पूर्वी अंक पूर्णपणे वाङ्मयीन बाजाचा होता, आता तसा तो राहिलेला नाही. स्वातंत्र्यानंतर जोमाने लिहिणार्‍या लेखक-कवींनी ८०च्या दशकात लिखाण थांबवलं आणि दिवाळी अंकांचा दर्जा घसरला. पाडगावकर, करंदीकर, महानोर, डॉ. अनिल अवचट, मंगला गोडबोले, सानिया, आशा बगे, मिलिंद बोकील यांचा अपवाद वगळता दर्जेदार लेखक दिवाळी अंकांत दिसत नाहीत. त्यामुळे साहजिकच जीवनानुभवांना महत्त्व प्राप्त झालं आहे. आयुष्याच्या कसोटीच्या तावूनसुलाखून काढणार्‍या घटना, एखादा प्रकल्प तडीस नेताना झालेली परवड, एखाद्या पोलीस अधिकार्‍याचे अनुभव, एखाद्या समाजसुधारकाची प्रेरणादायक कहाणी, मोठ्या मुलाखती, अशा साहित्याला अंकात आवर्जून स्थान दिलं जातं आणि ते आवडीनं वाचलंही जातं. शिवाय वाचकांच्या थेट उपयोगी पडेल असा मजकूर देण्याकडे कल वाढल्यानं आरोग्य, पाककृती, बालसंगोपन अशा एकाच विषयाला वाहिलेले अंक मोठ्या प्रमाणावर निघायला लागले आहेत. अशा अंकांचा साहित्य, सामाजिक वास्तव- अनुभव यांच्याशी थेट संबंध मुळीच नसतो.

मात्र दिवाळी अंकात कल्पनाही केली नव्हती असे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता अशा गोष्टींना आवर्जून स्थान मिळतं. विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञांनाही आता दिवाळी अंकाचे लेखक म्हणून मानाचं स्थान मिळू लागलं आहे. कथा, कविता यांच्याबरोबरीनं असे लेख आवडीनं वाचले जातात. एखाद्या विषयाचा नीट अभ्यास करून लिहिलेल्या वृत्तांतांना चांगला वाचकवर्ग मिळतो. डॉ. अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकाचं उदाहरण इथे घेता येईल. 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात याच नावानं त्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याला एवढा प्रतिसाद मिळाला, की ते बीज वाढवून त्याचं यशस्वी पुस्तक झालं. 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकांत असे अनेक उत्तम लेख वाचायला मिळतात. शोभा भागवत, किरण पुरंदरे, सुमित्रा भावे, डॉ. पोळ अशा विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांचे उत्तम लेख गेल्या काही वर्षांत या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले.

शिवाय विशिष्ट विषयाला वाहिलेले नवीन अंकही सुरू झाले. डॉ. अरविंद संगमनेरकरांनी सुरू केलेलं 'शतायुषी' हे वार्षिक आरोग्याला वाहिलेलं आहे. लहान मुलं, मोठी माणसं, स्त्रिया, वृद्ध, ग्रामीण, शहरी अशा सर्वांनाच उपयोगी पडतील आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत माहिती असेल असे वेगवेगळे विषय घेऊन त्यावर नामवंत डॉक्टरांकडून लेख लिहून घेतलेले असतात. 'सृष्टी'चा चालता-बोलता दिवाळी अंक, 'फुलोरा'चा ब्रेल दिवाळी अंक अशा लिखित दिवाळी अंकांपासून प्रेरणा घेऊन केलेल्या विशेष प्रयत्नांनीही जम बसवला आहे.

मात्र आज काही अपवाद वगळता दिवाळी अंक बकाल होत चालले आहेत. जाहिरातींचं वाढतं वर्चस्व हे या र्‍हासाला कारण आहे. जाहिरातदारांना सोयीचे असे विषय दिवाळी अंकांत आल्याने, ते आपलं मूळ स्वरूप गमावून बसले. बाजारपेठेला शरण जाऊन अंकांचं नियोजन होऊ लागलं. अजिबात नावीन्य नसलेल्या कथा, शब्दबंबाळ, उथळ ललित, रेखाचित्र - कथाचित्रांमध्ये दिसून येणारं अज्ञान यांमुळे एकंदरीत सर्वच भडकपणाला जोपासणारे दिवाळी अंक बाजारात येत आहेत. या सार्‍या अंकांमध्ये रंजकतेवरच भर असतो. कथा विनोदी वा भावनाप्रधान, कविता सजावटीपुरत्या, हास्यचित्रेही त्यासाठीच, आणि एखादी कादंबरी. मग माहितीपर लेखन. त्यात प्रवासवर्णनासारखे ललितप्रकार. त्यानंतर थोडंसं वैचारिक लेखन. हे लेखनही चुरचुरीत हवं. सर्व क्षेत्रातल्या / थरातल्या नामवंतांची नावं जाहिरातीसाठी आली पाहिजेत. विषयसुद्धा रंजक / सनसनाटी हवा. भ्रष्टाचार, दहशतवाद व आपण, परदेशी नागरिकांची घुसखोरी, युवकांची व्यसनाधीनता, स्त्रीदेहाचे व्यापारीकरण / शोषण / प्रदर्शन, माध्यमांचा गोंगाट, माहितीची क्रांती, अंधश्रद्धा असे बहुतेक विषय असतात.

वाचनसंस्कृती रोडावत चाललेल्या सध्याच्या काळात दिवाळी अंकांचा वाचक तुलनेनं कमी नाही. पण वाचनसंस्कृतीच्या तुलनेत 'लेखनसंस्कृती' मात्र जास्त जोर धरताना दिसत आहे. 'दिसामाजिं काहीतरी ते लिहावे..' याचा प्रभाव अधिक दिसतो. त्याच्यामागे 'प्रसंगी अखंडित वाचीत जावे |' ही परंपरा बळकट करण्याची गरज आहे. या दिवाळी अंकांच्या प्रवासाकडे बघताना एक दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे ती अशी, की मुळात मराठी साहित्यालाच अवकळा प्राप्त झाली आहे का? प्रयोगांना मर्यादा पडली आहे का?

बंगालात दरवर्षी दुर्गापूजेच्या वेळी खास अंक प्रकाशित होतात. त्यांना 'पूजाबार्षिकी' किंवा 'पूजा संख्या' असं नाव आहे. उत्कृष्ट कथा, कादंबर्‍या, ललित, कविता असं या अंकांचं स्वरूप असतं. आपल्या दिवाळी अंकांसारखंच. मग या अंकांमधील सर्वोत्कृष्ट वाङ्मय 'बोईमेला'च्या म्हणजे कोलकात्याच्या पुस्तक जत्रेच्या वेळी प्रकाशित केली जातं. लोक रांग लावून पुस्तकं विकत घेतात. आजही ही मासिकं आपलं शुद्ध वाङ्मयीन रूप टिकवून आहेत. राणी मुखर्जी, बिपाशा बसू मुखपृष्ठांवर दिसताच तमाम वाचकांनी निषेध नोंदवला होता. कर्नाटकात, केरळातसुद्धा उगादी, ओणमच्या निमित्तानं असे अंक काढले जाऊ लागले आहेत, आणि या अंकांनीसुद्धा आपलं साहित्यिक रूप राखलं आहे.

'मनोरंजन'चा पहिला अंक प्रसिद्ध झाला तेव्हा का. र. मित्र यांनी लिहिलं होतं, "आह्मी कशाकरिता अवतार धारण केला आहे व पुढे काय काय कामे करणार आहो, हे स्वमुखाने सांगण्यापेक्षा आमच्या सर्वांगाचे परिशीलन केल्याने हळूहळू आमचे उद्देश्य आमच्या प्रेमळ आश्रयदात्यांच्या लक्षात येतील असे आह्मांस वाटतें. आह्मांस जे करावयाचे आहे ते सवडीसवडीप्रमाणे आह्मी करून दाखवू एवढेच!"
काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी दिवाळी अंकांच्या रुपानं महाराष्ट्राला एक अमोल ठेवा दिला. यंदाचं हे दीपशतीचं वर्ष रॉय किणीकरांच्या जन्मशताब्दीचंही वर्ष आहे. या दोघांनी आणि श्री. पु. भागवतांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली होती. त्यांचं ऋण आपण मान्य करायलाच हवं.

(या लेखासाठी संदर्भ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती नीलिमा शिकारखाने, डॉ. स्वाती कर्वे, डॉ. मृणालिनी गडकरी व शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे - ३० यांचे मनःपूर्वक आभार)

- chinoox