कृष्णविवर

असेच आत जात राहिलो तर दूर कुठेतरी पोचू ह्या विश्वासावर तो एकामागोमाग एक दारं उघडत आत जात राहिला. आत जात जात कुठेतरी खोल - अंधार्‍या - प्रचंड सन्नाटा भरलेल्या काळ्या थंड दगडी भिंतींच्या गुहेत तो जाऊन पोचला आणि तिथेच पाय मोकळे सोडून, थंडगार भिंतीला पाठ टेकवून शांतपणे बसला. थोडावेळ त्याला बाहेरच्या त्याची आठवण आली पण त्याच्यापासून सर्वांत दूर इथेच वाटत होतं. आता इथून उठायला नको. कायमचे इथेच बसू. बाहेरची हवा नको, आवाज नको, वास नको, प्रकाश नको, लोकं नकोत. हीच अवस्था अनादी-अनंत राहो. सुन्न.. थंड.. अंधारी पोकळी!

border2.JPG

"ये

क्या डॉक्युमेन्ट है? ये ऐसा डॉक्युमेन्ट भेजें क्या क्लायेन्ट को? हे काय इंग्लिश आहे? तुमच्या ट्रेनिंगमध्ये इंग्लिश पण ठेवायला पाहिजे." स्वत:च्या क्यूबिकलमध्ये बसून नीलेश जोरात कुणावरतरी खेकसला.
'भांग पिऊन कामं करतात की च्यायला कोण जाणे ही भिकारचोट पोरं' असं मनात म्हणत ज्याने ते डॉक्युमेन्ट बनवलं होतं त्याच्याकडे जाण्यासाठी उठला, तो त्याला आजूबाजूच्या क्यूबिकल्समध्ये आपापल्या कोपर्‍यातल्या कॉम्प्युटरांकडे तोंडं करुन कीबोर्ड बडवत बसलेली पोरं-पोरी दिसली. ते बघून एकदम त्याच्या डोक्यात त्या सगळ्यांच्या एकसुरीपणाची भयानक तिडीक आली आणि मग ती तिडीक त्याच्याच स्वत:च्या चिडीत विरून गेली. त्याच्या खेकसण्याने सगळे आकसून बसले होते. त्यामुळे नीलेशचा हात खांद्यावर पडल्यावर ज्याने ते डॉक्युमेन्ट बनवलं होतं, तो पोरगा एकदम दचकला. त्या क्यूबिकलमधले सगळे डोळ्याच्या कोपर्‍यातून आता पुढे काय खेकसाखेकशी होणार त्याची वाट बघू लागले.
नीलेश सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध, एकदमच म्लान झालेल्या आवाजात, "नीट बनवत जा रे. सिनिअर आहात तुम्ही लोक आता. हे असलं काम करणं कसं चालेल? आँ? काय?.. पाठवून दे परत नीट ड्राफ्ट करुन." असं त्याला म्हणून स्वतःच्या जागेवर परतला.

"हा आजकाल फार चिडचिडा झालाय रे."
"किचकिच मॅनेजर आहे च्यायला हा! तुम्ही कसे काय काम करताय रे याच्या बरोबर इतके दिवस? मी तर एकदा असला सॉलिड उलटा देणार आहे ना याला! च्यायला घरचं काम करतो काय आम्ही का शाळेपासनं शिकवलंय आम्हाला प्रोग्रॅमिंग. चूक होणार की कधीमधी."
"साल्या तुला माहिती नाही, यानं किती रात्री इथं घालवल्या आहेत. मागं एकदा त्या केळकरानं जाम च्युत्यागिरी केली होती. जाम एस्कलेशन झालं. तेव्हा चॅटर्जी अकाऊंट सांभाळत होता. चॅटर्जीनं जाम झापला याला. पण केळकरावर ब्लेम टाकला नाही याने. आम्हाला सगळ्यांना हात धरुन शिकवलंय."
"आजकाल काय झालंय कुणास ठाऊक. ए, तुझ्या मैत्रिणी नाहीत काय कोण लग्नाच्या? जुळवून दे की एक याच्या बरोबर. शांत होईल जरा."

नीलेश आपल्या जागेवर येऊन परत बसला, पण आता मूड गेलेला होता. डोक्यात ती नेहमीची ठणठण सुरू झाली होती. क्यूबिकलमधून येणारा आवाज खुसफुशीसारखा त्याच्या कानावर येत होता पण शब्द उमटत नव्हते. ती खुसफुस त्याच्याबद्दल चालू आहे, हे त्याच्या लक्षात आलं होतं. लक्ष देऊन ऐकावंसं मात्र काही त्याला वाटलं नाही. सगळं काम आटोपून तो ऑफिसमधून निघाला तोवर नऊ वाजत आले होते. तो निघाला तेव्हा ऑफिस बर्‍यापैकी रिकामं झालं होतं. एखाद-दोन तरुण पोरं अजून कीबोर्ड बडवत होती. त्याच्या बरोबरीचे सर्वजण पाचाच्या सुमारासच बस पकडायला धावत. मीटिंग/कॉन्फरन्स कॉल असला तर घरून घेत. संध्याकाळ-रात्रीच्या कॉल्समध्ये लहान मुलांच्या रडण्या-खेळण्याचे, कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज आता नेहमीची गोष्ट होऊन गेली होती.

-------------------

त्याच्याबरोबर नोकरीला लागलेल्या जवळपास सर्वांची आता लग्नं होऊन मुलंबाळं पण झाली होती. अनेक ज्युनिअर पोरं/पोरी, ज्यांचे इंटरव्ह्यू त्यानं घेतले त्यांच्याही लग्नाची आमंत्रणं इनबॉक्समध्ये येऊन पडली. सुरुवातीला बरोबरीच्या जवळपास सर्वांच्या लग्नांत तो आवर्जून गेला होता. पुढे पुढे मात्र तो असल्या लग्नांना, मित्रमैत्रिणींच्या मुलांच्या वाढदिवसांना जाणे टाळू लागला. तेच ते प्रश्न. ह्याह्याह्या! ख्याख्याख्या! कुणाचीतरी बहीण, मैत्रीण - अजून शिल्लक - एखादी घटस्फोटित. ओळखी करून देताना 'मुद्दाम करून देत नाहीये' छापाचे मुद्दाम संवाद. एकटेपणा वाढत जाईल, अलग पडशील असे सल्ले. लग्न केल्याने वा जोडीदार कमावल्याने जाईल, असा एकटेपणा असता तर कधीच लग्न करुन मोकळा झालो असतो असं ओरडून सांगायची इच्छा दाबत नीलेश लोकांत जाणे टाळू लागला.
-------------------

ऑफिसमधून घरी परतल्यावर त्याला स्वयंपाक करायचा कंटाळा आला. तेच ते जेवण, एकट्यापुरतं. ख्याक्! तो स्वत:शीच हसला.
'एवढ्यासाठी तरी लग्न करायला पाहिजे होतं, नाही? दोन माणसांचा स्वयंपाक करण्यात तेवढीच मजा.'
'कसली मजा रे. एक दिवस तुला भाजी आवडणार नाही, एक दिवस तिला. करायचीयेत काय नसती लफडी?'
'होय, आणि फुकटच्या जबाबदार्‍या. त्यापेक्षा रोज हॉटेलात खाल्लेलं परवडेल. ख्याक्!'
'स्वतःशीच बडबड करायची सवय वाढते आहे नीलेशराव. कमी करा ती. चला बाहेर जाऊन जेवून येऊ या.' असं स्वतःशीच बडबडत नीलेश घराबाहेर पडला.

बाहेरच्या कोपर्‍यावरच्याच हॉटेलात त्याने थाळी ऑर्डर केली आणि जेवायला बसला. पण जेवण करूनसुद्धा गप्पा हाणत बसलेली पोरं-पोरी - ज्यात बहुतकरून जवळपासच्या इंजिनीअरिंग-एमबीए कॉलेजातली आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतली पोरं-पोरी होती - त्यांचे एकमेकांतील संबंध, त्या सगळ्यांचे आवाज, ती गर्दी, जेवण्यासाठी टेबल रिकामे होण्याची वाट बघत मागे लोक उभे असले तरी त्याकडे निव्वळ दुर्लक्ष करुन त्यांचं गप्पा हाणत बसणं, सगळ्याचाच त्याला एकदम राग आला. मग तो राग सगळ्या गर्दीवर पसरला, मग सगळ्या शहरावर आणि असं करत त्याला सगळ्याचाच प्रचंड राग येउ लागला. उठून सगळ्यापासून दूर पळत जावं, इतकं पळावं, इतकं पळावं की कुठे पळतोय याची पण जाणीव नष्ट व्हावी असा क्षणिक उत्साह त्याच्यात एकदम आला. आणि मग आपण हे कधीच करणार नाही आहोत, हे वास्तव कळल्यावर एकदम स्खलन झाल्यासारखा तो मनातनं गळून बसला. हात धुवून घरी येउन झोपला.

रात्री अचानक झोपेतून जाग आल्यावर त्याला पुढे मग झोप येईना. हात लावून त्याने कपाळ, मान, गळा चाचपून बघितलं. सगळीकडे घामाने ओलसर झालं होतं. वर फॅन गरगरा फिरत होता. हवाही थंड होती. काय स्वप्न पडलं होतं, हे आठवण्याचा त्याने प्रचंड प्रयत्न केला पण काहीच आठवेना.

पूर्वी त्याला स्वप्नं जशीच्या तशी आठवत. शाळा-कॉलेजात असताना त्याला कधी परीक्षेत नापास झाल्याची वगैरे स्वप्नं पडत नसत. त्याकाळच्या स्वप्नांत तो प्रचंड माळरानांवरून, भणाण वारा अंगाखांद्यावर घेत फिरत असे. नोकरी लागल्यावरची सुरुवातीची काही वर्षं बहुतेक बिनस्वप्नांचीच गेली असावीत. कारण त्या काळातली स्वप्नं त्याला आठवत नव्हती. पण मग मात्र त्याला उद्या परीक्षा आहे आणि अभ्यास करायचंच विसरुन गेलं, नोकरी लागली आणि इंजिनीअरिंगच्या दुसर्‍या वर्षीचा पेपर अजून सुटलाच नाहीये, परीक्षेचा फॉर्म भरायची पण वेळ टळून गेली अशी स्वप्नं पडू लागली. अश्या स्वप्नांनंतर प्रचंड घामाघूम होउन तो उठत असे. एकदा तर त्याला हृदयाचा ठोका चक्क थांबून काही अंतराने पुन्हा सुरु झाल्याचं लख्ख आठवत होतं. रीडर्स डायजेस्टसारख्या मासिकांतून येणारी हार्ट अ‍ॅटॅकची चिन्हं डोक्यात येऊन तो मग स्वतःशीच हसत असे. तळहातांना येणारा घाम, खांद्यातून येणारी चमक असली चिन्हं बघत मग तो आता आपल्याला झटका येईल, मग येईल अशी आशा बाळगत अंथरुणावर पडून राहत असे.

असंच बराच वेळ पडून राहिल्यावर व मग अशक्य झाल्यावर तो उठून एका भिंतीला टेकून उभा राहिला. बराच वेळ काहीही हालचाल न करता तो तसाच भिंतीला टेकून उभा होता. डोकं अजून जड जड होत गेलं. मग 'ठण्, ठण्' असे घणाचे घाव डोक्यात पडू लागले. जणू काही सगळ्या डोक्यात, मेंदू आणि कवटीच्या मध्ये निराशा गच्च भरुन राहिली आहे, इतकी की मेंदू पार चेंदला जातोय. हळूहळू त्याच्या मेंदूवर दाब इतका वाढला की फुटून चेंदा-मेंदा होऊन जाऊ दे एकदाचे म्हणून नीलेश विव्हळू लागला. ठण् ठण् ठण् ठण्. घणाचे घाव सुरूच होते. रोमन नाहीतर ग्रीक संस्कृतीत डोकेदुखीवर उपचार म्हणुन कवटीचा एक तुकडा उडवत असत असे त्याने कुठतरी वाचले होते. त्या उपचाराप्रमाणेच एक छिन्नी घ्यावी आणि आपल्याच या ठणकत्या कवटीचा एक तुकडा 'टक्' करुन उडवावा, म्हणजे टायर पंक्चर होते त्याप्रमाणे फुसदिशी कवटी रिकामी होईल आणि डोकं हलकं होऊन जाईल असं त्याला वाटलं. छिन्नीने टवका उडवण्याच्या त्या कल्पनेने त्याच्या अंगावर शहारा आला. पण त्याचवेळी त्याला एकदाचं डोकं रिकामं होऊन जाईलश्या कल्पनेने नैराश्यीउत्साहीपण वाटू लागले.

संपून जाईल एकदाचे, संपून जावे एकदाचे - भिंतीला टेकून मग तो बराच काळ तसाच उभा होता.

-----------------------

नीलेश तसा सुखवस्तू घरात मोठा झालेला होता. वडील यशस्वी सीए होते. आई बॅंकेत नोकरीला. एक बहीण. घरात मागेल ते मिळेल असं लाडाकोडाचं वातावरण नसलं तरी मूलभूत गरजा भागवल्या जात होत्या. आपले वडील हे त्यांच्या शिस्तीमुळे, कामाच्या पद्धतीमुळे यशस्वी झालेले आहेत हे नीलेशच्या डोक्यात फार लवकर बसलं होतं. इतर मुलांना नेहरू म्हटल्यावर मुलं आवडणारे, खिशाला गुलाब लावणारे चाचा नेहरू आठवत तर नीलेशला मात्र दिवसाचे वीस-वीस तास काम करणारे नेहरू डोळ्यासमोर येत. कारण नेहरूंचा विषय निघाल्यावर वडिलांकडून त्याने तेच ऐकलं होतं. खूप काम करणं, आखून ठरवलेल्या दिनचर्येप्रमाणे वागणं हे त्याच्या मनावर बिंबवले गेलेले सर्वोच्च गुण होते. त्याप्रमाणे जगणारी माणसं ही त्याच्यावर लादलेल्या आदर्श व्यक्ती होत्या. पण स्वत: नीलेशच्या डोक्यातले विचार मात्र विस्कळीत असत. दिलेल्या विषयावरच का निबंध लिहायचा हे त्याला पटत नसे. मग स्वत:ला हव्या त्या विषयावर निबंध लिहिल्यावर भर वर्गात सरांनी 'तू काय स्वत:ला पेपरसेटर समजतोस काय?' असं विचारल्यावर त्याला भिरभिरत असे. नागरिकशास्त्रातली सरकारी कर्तव्यं सरकारने नाही केली तर काय शिक्षा असं विचारल्यावर, 'हे परीक्षेत येणार आहे का?' असं मास्तरांनी म्हणणं आणि सगळ्या वर्गाने फिदीफिदी करत हसणं याची त्याला चीड यायची. दिनचर्येतली सकाळी संडासला जाणं, हीच एक गोष्ट फक्त रोज करणं शक्य आहे असे त्याला वाटत असे. पण आपल्याला चांगले मार्क मिळायलाच पाहिजेत, चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळालाच पाहिजे, मग पुढे चांगली नोकरी मिळालीच पाहिजे नाहीतर आपल्या आईवडिलांना लोक काय म्हणतील ही भावनादेखील त्याच्या मनात घट्ट होत होती. अमुक-तमुकला चौर्‍याण्णव टक्के पडूनसुद्धा अ‍ॅडमिशन नाही, हे संवाद जेवताना कानावर पडू लागले होते.

दहावीत असताना परीक्षेच्या काही दिवस आधी तो एकदम कंटाळला. पुस्तकाला लाथा मारुन त्यावर मनसोक्त नाचावे आणि नागड्याने नदीत पोहायला जावे ही तीव्र इच्छा होण्याची आणि तसे करता येणे शक्य नाही हे कळल्याने प्रचंड अंधारुन-जडशीळ डोक्याने सुन्न होण्याची ती त्याच्या आयुष्यातली पहिली वेळ. आख्खी संध्याकाळ अशी सुन्न गेल्यावर मात्र तो एकदम घाबरला. आई बॅंकेतून आली होती आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. तो जेवणाच्या टेबलवर जाऊन बसला. आईने 'चहा करून देऊ का?' असे प्रेमाने विचारले, तो त्याने एकदम तिच्या कमरेला मिठी मारली.

"आई, मला कंटाळा आलाय गं."
"बाहेर जाऊन येतोस का थोडा?"
"मी देत नाही परीक्षा ह्यावेळी. मरूदे! नकोसं वाटतंय. भीती वाटते आहे. काहीतरी चुकतंय असं वाटतंय."
आई चपापली.
"तिन्हीसांजेला काय बडबडतोयस असं नीलेश! काही होत नाही. उगाच डिप्रेस होऊ नकोस. हा चहा घे. वर जाऊन पड थोडावेळ."

रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळेजण शांत होते. आईने सगळ्यांना वाढलं आणि जेवण सुरू करण्यापूर्वी आपली खुर्ची ओढून ती बसली. तिच्या बसण्यातून आणि तिने नीलेशची नजर टाळण्यातून नीलेशला कळले की आई वडिलांशी बोलली आहे. वडिलांनी एका टोकाला खुर्चीवर आपल्या रोजच्या जागेवर बसून सगळ्यांकडे नजर टाकली.
"हे जे डिप्रेशन आणि टेन्शन वगैरे जी खुळं आली आहेत ना आजकाल ह्या मानसशास्त्रवाल्यांची, त्यात अजिबात अर्थ नाही. फॅडं आहेत सगळी. आळशी माणसांचे कामं न करण्याचे बहाणे आहेत हे. हे डिप्रेशन, निराशा ह्या सगळ्याच्या मुळाशी आळस आहे, आळस! कामं करा दिवसभर, अभ्यास करा मान मोडून, कसं येतं डिप्रेशन बघू ते."
विषय तिथेच संपला.

इतर अनेकांप्रमाणे नीलेश इंजिनीअर झाला. इतर अनेकांप्रमाणे त्याला नोकरी मिळाली. अनेकांपैकी थोड्यांप्रमाणे त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अर्थात अनेकांपैकी थोड्यांना त्याच्यापेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होतीच. अनेकांप्रमाणे नीलेश कामाला लागला. अनेकांप्रमाणे मान मोडून दिवसचे दिवस काम करायला लागला.

पण मधूनच कधीतरी त्याला सगळ्यापासून दूर पळून जायची प्रचंड ऊर्मी येत असे. हे सोडून काहीतरी वेगळं... मग कधी तो स्वत:ला प्राथमिक शाळेत मुलांना शिकवताना तर कधी युनिव्हर्सिटीच्या भल्याथोरल्या ग्रंथालयात बसून, समोर पुस्तकांची रास मांडून आपल्याला हव्या असलेल्या एखाद्या विषयाचा खराखुरा अभ्यास करतानाची दिवास्वप्नं बघत असे. शाळेत असताना नीलेशला चित्र काढण्यात फार रस होता. आपण सुंदर चित्रं काढावीत, रंगवावीत असं त्याला खूप मनापासून वाटत असे. पण कागदावर चित्र मात्र कधीच चांगलं उमटत नसे. राखीपौर्णिमेच्या चित्रातले बहीण-भाऊ भिंतीवर कागद चिकटवल्याप्रमाणे दिसत. वर्गातली काही मुलं इतकी सुरेख चित्रं काढत की, यांनाच का अशी चित्रं जमतात याची रुखरूख त्याच्या मनात राहत असे. पुढे कॉलेजमध्ये गॅदरिंगला कुणी उत्तम नाच करत असे, तर कुणी गाऊन भाव खाऊन जात असे. जिममध्ये रोज डंबेल्स मारणारी पोरं फॅशन शोमध्ये कॉलेजच्या सगळ्या सुंदर मुलींबरोबर फिरून घेत.

मग कधी नीलेशला प्रचंड व्यायाम करुन शरीर कमवावंसं वाटे तर कधी तो स्टेजवर माईक घेऊन गाणी गात असे. ह्या सर्व कल्पनाभरार्‍यांमध्ये अनेक लोक त्याचं समोर, पाठीमागे, एकमेकांशी बोलताना प्रचंड कौतुक करत असत. अर्थात ही स्वप्नं जितक्या वेगात इमले बांधत त्याच्या डोक्यात बनत तितक्याच वेगात बदलत असत. ही स्वप्नं मोडल्यावर येणारी मानसिक विकलांगता त्याला इंजिनीअरिंगमध्ये असताना पहिल्यांदा जाणवू लागली. संध्याकाळ झाली की बुडणारा सूर्य बघत बॉइज हॉस्टेलच्या गच्चीवर बसत तो ही स्वप्ने रचे व मोडल्यावर सुन्नपणे पडे.

'आळस! आळसातून येतं हे सगळं! ऊठ. अभ्यास कर. गॅदरिंग गाजवून, पोरी फिरवून काही नाही होणार. नोकरी मिळाली पाहिजे. आळस झटका. जग इंजिनीअर होतं. सगळेच जन्मजात इंजिनीअर नसतात. होतात पण. नोकरीपण करतात. आळस सोडा. डिप्रेशन वगैरे जे आहे ना, ते आळसातूनच येतं.'
त्याची स्वतःशी बडबड करण्याची सुरुवात साधारण इथूनच झाली.

दिवस सरत होते. महिने सरत होते. वर्षं सरत होती. जात्या दिवसागणिक करत असलेल्या कामातला, मिळणार्‍या पैशातला आणि आजूबाजूच्या वातावरणातून मिळणारादेखील आनंद सरत गेला. ऑफिसला बसमधून येताना-जाताना, हिंडताना, एखादं पुस्तक वाचताना, मीटिंगमध्ये, पिक्चरमध्ये मधूनच एकदम त्याला त्याचं असणं, बाकी लोक असणं, हे सर्व जग असणं हे सगळंच फोल वाटू लागे. मुळातच काहीही कारण नसताना उत्पन्न झालेल्या ह्या विश्वात त्याहूनही काही कारण नसताना उत्पन्न झालेल्या ह्या ग्रहावरच्या जीवसृष्टीची त्याला मग एकदम चीड येई. जर कशाचाच कशाला अर्थ नाही तर कशासाठी हे सगळं? मग रोज उठून ऑफिसला जाऊन तेच काम आपण का करतो, का पैसे कमावतो, का असेच जगतो, हवं ते आपण का केलं नाही आणि जे केलं नाही आणि जे केलं त्या सगळ्याला आपणच जर जबाबदार तर मग आपण स्वत:वरच का चिडतो?, अशा एकामागोमाग येणार्‍या बिनउत्तरी प्रश्नांनी त्याचे डोके भंडावून जात असे. डोकं दोन्ही हातात गच्च दाबून गळा फाडून ओरडायची अनावर इच्छा त्याला व्हायची. अशा एखाद्या क्षणी तो एकदम आजूबाजूच्या जगाशी जागा झाला की त्याला निराशेच्या खोल गर्तेत - जिथे प्रचंड वर बघितलं तरी प्रकाशाचा कवडसादेखील दिसणार नाही, अशा ठिकाणी - उभं असल्यासारखे वाटे. त्या प्रचंड विहिरीच्या तळाशी उभा राहून तो स्वतःला नेमकं काय करायचं होतं असं विचारे. उत्तर मिळणार नाहीये हे माहीत असल्याची चिडचिड प्रचंड होऊन तो वैतागत असे. पुनःपुन्हा त्याच त्याच त्या प्रश्नचक्रात गुरफटून जात असे.

'हे असे प्रश्न आपल्याला पडत नसते तर, आपण सुखी आयुष्य जगलो असतो? चार पैसे कमवण्यात, घर घेण्यात, लग्न करण्यात, मुलंबाळं होण्यात सुख लाभलं असतं. पण नाही जमलं. आजवर कुठलीच गोष्ट प्रचंड इर्ष्येने, लालसेने का नाही करता आली? काय करायचं हेच का गवसलं नाही? वडील यशस्वी झाले ते त्यांनी पाळलेल्या कामाच्या शिस्तीने. त्यांना खरंच सीए व्हायचं होतं का? त्यांना कविता आवडत असतील का शाळेत? पण त्यांनी आळस झटकला. आयुष्यभर त्यांच्या ऑफिसमधले खोडरबर उजव्या ड्रॉवरच्या मागच्या बाजूसच राहिले. टाइमटेबल पाळलं त्यांनी. का त्यांनाही प्रश्न पडले असतील कधी, ज्यांना बगल द्यायला ते शिकले असतील? मी त्यांच्यापेक्षा जास्त कमावतोय. आयुष्यभर काम करत राहिलो तर, अजून जास्त कमवेन. मी पण कुठेतरी आळस झटकलाच की. त्याशिवाय का आज पगार मिळतोय? पण मग कुठे गंडलं? कुणी सांगेल का मला, कुठे काय गंडलं? की ही वांझोटी झवझव मी जन्माला घेऊनच आलोय. सगळं मिळतंय, सगळं मिळालं म्हणून ही भरल्या पोटची बकवास का? आळस, डिप्रेशन, काम, अजून काम, पगार, पैसा. सगळं भंकस. बिनबुडाचं. बिनकारणाचं. पेटून उठून प्रकाशाच्या वेगाने झेपावावं. मग शरीराचा अणू न् रेणू सुट्टा होऊन संपून जाईल.'

ठाण् ठाण्. छिन्नीने टवके उडवून, कवटीला भोकं पाडून ही ठण् ठण् एकदाची....

---------------------------

’तू साल्या आळशी झाला आहेस. काम नकोय तुला. सुख दुखतंय.’
तीच आर्ग्युमेंट्स. तेच प्लीडिंग.
’जग भिकारचोट आहे सालं. आईबाप पांढरपेशे म्हणून आम्हांला पांढरपेशे व्हायला पाहिजे. आमची आयुष्यं त्यांच्या व्याख्येने आणि त्यांची आयुष्यं आमच्या व्याख्येने जग मोजणार.’
’मग हाण की जगाच्या गांडीवर लाथ.’
’नाय ना हिम्मत साली भ्यांचोद. आम्ही असेच सडणार.’
’मग कशाला रडतो. बाकीचे सुखानं जगतायतच की.’
’म्हणून मग मी पण तेच करू?’
’वेगळं काय केलंस तू आजवर? काय केलंस वेगळं? काय?’
--------------------------

बर्‍याच दिवसांनी नीलेश मित्राकडे जेवायला गेला होता. बरीच जुनी मित्रमंडळी त्याला भेटली. जुन्या एका वर्गमैत्रिणीबरोबर बोलताना जुन्या गप्पा झाल्या.
"भाचे मोठे असतील ना रे तुझे आता?"
चर्रकन त्याला आठवणी कापून गेल्या. गेल्या चार-पाच वर्षांत आई-वडील-ताई यांच्याशी संबंध संपल्यातच जमा होता. हळूहळू त्याने त्या सर्वांशी बोलणे-भेटणे कमी कमी करत आता जवळपास संपवलंच होतं. खरं तर तो कुणाशीच भांडला नव्हता. त्याचं वागणं विक्षिप्त होत गेलं इतकंच. सुरुवातीला आई 'लग्न कर' म्हणून मागे लागत असे. ते देखील हळूहळू बंद झालं. त्यानेच केलं.
'ताईला वाईट वाटलं असेल खरं. पण हा असा मी त्यांना अधिक असह्य झालो असतो.'
'ताईची काय चूक होती? आईची काय चूक होती? बाबांची काय चूक होती?'
'तशी कुणाची चूक होती म्हणा! आई-वडिलांनी भल्यासाठीच उपदेश केले होते. त्यांच्या पैशावरच निर्धोकपणे शिक्षण झालं होतं.'
'तू वैताग आयुष्य जगत राहिलास, बाकीच्यांना वैताग देत राहिलास, वैताग जगतो आहेस, वैताग देतो आहेस. तू पळालास, तू पळतो आहेस.'
'कुणापासून पळतोय? आँ? कुणापासून? तू माझ्याबरोबर नेहेमी आहेस. अजून काय करू शकलो असतो मी? करतोय, शिकतोय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय इतकंच जाणवत होतं. तू कधी काही सुचवलंस?
'अमुक एक गोष्ट करायची आहे, शिकायची आहे असं स्वतःला तरी कधी आतून वाटलं का तुला? झोकून देउन काय केलंस रे तू? नोकरी मिळाल्यावर झालेला आनंद खराच होता ना? पैसे मिळत होते त्या प्रत्येक वेळचा आनंद खरा होता ना? अतिसमृद्धीतून येणारी उदासीनता आहे भडव्या तुझी! प्रचंड लालसेने कुठली गोष्ट मिळवावी असं तुला कधी वाटलं होतं?'
'नाही रे. तसं नाही. मला माहिती नाही नक्की असं का झालं, पण अतिपैशाची सूज नव्हे ही.'

आपण चुकून मोठ्याने तर बोलून गेलो नाही ना ह्याची खात्री करायला नीलेशने एकदम चमकून आजूबाजूला पाहिलं. उरलेले थोडे आपापसांत गप्पा मारत होते. आपण नेहेमीप्रमाणे स्वतःशीच गप्पा मारत होतो, कदाचित मोठ्याने पण बोलून गेलो असू. पण कुणाला इथे फिकीर पडलीये. छद्मीपणे त्याने हसून घेतलं.
स्कूटर काढून तो निघाला तेव्हा बर्‍यापैकी रात्र झालेली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. चौकातला सिग्नल चालूच होता. चौकात कायम बसणारं भिकार्‍यांचं भलंथोरलं कुटुंब झोपण्याच्या तयारीला लागलं होतं. एक नागडं पोरगं डिव्हायडरच्या जाळीशी बसून त्याच्याकडे बघून हसलं. दोन मोठ्या पोरी अर्धवट फाटक्या कपड्यात, राठ केसांच्या गाठींतून बोटं फिरवत डिव्हायडरवरच टाकलेल्या चिरगुटावर पहुडल्या होत्या. भिकारी आणि त्याची बायको सिग्नलखालच्या कट्ट्यावर चिरगूट टाकून पडले होते. मुले निर्माण होणार होती. संसार वाढणार होते. एकाला दुसरा चिकटणार होते.

चौकातून पुढे निघून स्कूटर चालवता चालवताच त्याचं डोकं जड जड होत गेलं. स्कूटरच्या हॅंडलवर दोन्ही हात त्याने जोरात आवळले आणि जबडा जेवढा फाकवता येइल तितका फाकवून तो जोरात ओरडला आणि मग बराच वेळ जोरात ओरडत राहिला.

किल्ली फेकून, कपडे अस्ताव्यस्त टाकून तो कॉटवर आदळला. बाहेर रस्त्यावरच्या उंच निऑनच्या दिव्याचा प्रकाश खिडकीतून आत पाझरत होता. त्याने डोळे मिटले तरी पापण्यांच्या आतल्या बाजूला तो केशरी प्रकाश त्याला दिसत राहिला. असह्य होत असलेल्या त्या प्रकाशापासून पळून जायचे सुद्धा त्राण त्याच्यात शिल्लक नव्हते. कॉटवर पडलेला असताना त्याला तोच त्याच्यातून बाहेर पडताना जाणवला. पण बाहेर पडणारा तो एकदम छोटासा होता. बाहेर पडलेला तो आता त्याच्या डोक्याशी उभा होता. त्याच्याकडे पाहून हसत त्याने त्याच्या डोक्यात असणारा एक दरवाजा उघडला आणि क्षणभरच मागे वळत बाहेर बघून तो आत शिरला. पापण्या मिटल्या तरी जर डोळे उघडे असतील तर, बाहेरचा प्रकाश जसा दिसतो त्याप्रमाणे दार उघडून आत गेलं तरी, बाहेरचा केशरी प्रकाश आत येतच होता. त्या प्रकाशाने आतली खोली भगभगून गेली होती. खोलीच्या दुसर्‍या टोकाला एक दार होते जे उघडून तो अजून आत गेला. प्रकाश थोडा कमी झाला होता. पण अजूनही बुबुळांना बोचतच होता. ठण् ठण् ठण् ठण्. असेच आत जात राहिलो तर दूर कुठेतरी पोचू ह्या विश्वासावर तो एकामागोमाग एक दारं उघडत आत जात राहिला. आत जात जात कुठेतरी खोल - अंधार्‍या - प्रचंड सन्नाटा भरलेल्या काळ्या थंड दगडी भिंतींच्या गुहेत तो जाऊन पोचला आणि तिथेच पाय मोकळे सोडून, थंडगार भिंतीला पाठ टेकवून शांतपणे बसला. थोडावेळ त्याला बाहेरच्या त्याची आठवण आली पण त्याच्यापासून सर्वांत दूर इथेच वाटत होतं. आता इथून उठायला नको. कायमचे इथेच बसू. बाहेरची हवा नको, आवाज नको, वास नको, प्रकाश नको, लोकं नकोत. हीच अवस्था अनादी-अनंत राहो. सुन्न.. थंड.. अंधारी पोकळी!

तो उठला तेव्हा त्याला दरदरून घाम फुटलेला होता. कित्येक दिवसांनी त्याला एकदम आईला फोन करावासा वाटला. पुन्हा एकदा तिच्या मांडीवर डोकं टेकून झोपावंसं वाटलं. बाजूलाच पडलेल्या मोबाईल फोनवर त्याने दोन-चार वेळा घरचा फोन नंबर दाबला. मिटवला. दाबला. मिटवला.

------------------------
Vivar copy_1 copy.jpg

असं स्वत:शीच मोठ्याने बोलणं कधी वाढत गेलं, त्याला कळलं नाही. आजूबाजूच्या क्यूबिकलमधली जनता कधीतरी वाकून हा कुणाशी बोलतो आहे, ते बघत असे. कुणीच नसे. सुरुवातीला त्याला ते लक्षात येई. ते लक्षात येणंही हळूहळू कमी होत गेलं. खरं तर त्याने कमी करत नेलं. कुणाशी तरी वांझोटं बोलण्यापेक्षा स्वतःशी हवं तेच बोलणं त्याला बरं वाटू लागलं. कधीतरी मित्र भेटत. हळहळत. त्याला समजत असे पण तो दुर्लक्ष करे. मध्येच कधीतरी त्याला मित्रमंडळींबरोबर केलेली जेवणं आठवत. रात्ररात्रभर खेळलेले पत्त्यांचे डाव उलगडत. सुरुवातीला कुठेही कामासाठी, फिरण्यासाठी बाहेरगावाहून परतताना भाच्यांसाठी आणलेली खेळणी आठवत, आई-वडील आठवत. आठवणींनी डोळे कातावत.
'सालं आपण कुणालाच सुख नाही देऊ शकलो आयुष्यात.'
'तुझं आयुष्य जगलास की बेट्या. पैसे मिळवलेस. हात पसरायला नाही लागला ना. कुणाला झोपण्यापुरतं बायको करून घेण्याएवढं खाली घसरला नाहीस हे काय कमी आहे.'
'हात् साल्या. गांडू आयुष्य. खरं तर फुकटच गांडूगिरी झाली. ह्याह्याह्या. असलं काही तरी फुकट ओझं न घेता जगलो असतो तर बरं झालं असतं.'
'बरं झालं असतं? कुणाचं बरं झालय? काय मिळालं बरं करून तरी लोकांना? का आले, कुठे जाणार, सगळंच अनिश्चित. आणि उगाच छाती फोडून पळायचं. काहीच माहीत नसताना.'

--------------------------

आई गेली तेव्हा मात्र नीलेशला अनेक बंध तुटल्याचे जाणवले. बाकी कुणाचं जाणं, संबंध संपणं त्याला इतकं जाणवलं नाही, जितकं आईचं जाणं जाणवून गेलं. तसं अनेक वर्षं तो तिच्याशी बोलला नव्हता. घरी गेला नव्हता. तिला स्वतःच्या घरी घेऊन आला नव्हता. पण आपण तिला नेहमी दु:खच दिलं, हे त्याला पक्कं माहिती होतं. त्याला तिला दु:ख देण्यात काहीच आनंद नव्हता. खरतर कुणालाच दु:खी करण्यात त्याला काही आसुरी आनंद मिळत नव्हता. कुणाला सुखी-समाधानी करायची जबाबदारी मात्र आपल्यावर असू नये, इतपतच त्याची इच्छा होती.
आई असेपर्यंत तिकडे जायला त्याचं मन कचरत असे.
ती गेल्यावर मात्र वाद रोजचेच होऊ लागले. लांब कुठेतरी शांतपणे बसलेला दुसरा तो त्याला बोलवत असे. तिकडे म्हणे सगळंच शांत असे.
'आत ये. बाहेरची गजबज, बजबज नाही इथे.'
जेव्हा तो तिकडची वर्णनं सुरू करायचा तेव्हा नीलेश त्याला झिडकारत, झुंजत बाहेर रहायचा. आतल्या आळश्याला शिव्या द्यायचा.
'बाहेर राहून जगेन, पण साल्या तिथे येऊन लो़ळागोळा होऊन नाही पडणार'.
'अरे ये तर खरा. येऊन तर बघ.'
'भक् साल्या. आळश्यासारखा आत बसून असतोस. सुख कशाला दुखतंय तुला.'
'तू काम करायचास की मानेवर दगड ठेवून. काय झालं?'
हळूह़ळू मात्र ही बाहेर राहायची ऊर्मी क्षीण होत गेली. अधूनमधून तो आत जाऊन येत असे. ती एक प्रचंड खोल, अंधारी - समुद्रातल्या मरिना गर्तेसारखी - काळोखी जागा होती. तो खूप आत जात नसे. टोकालाच थांबे. पूर्वी स्वत:च्याच डोक्यात असलेल्या त्या थंड गर्भगृहासारखं वाटे. इथे त्याची भांडणं होत नसत. पण मग बाहेरची खेच सुरु होई.
'ह्यातून बाहेर पडायचं' तो उचल खाई. पण त्याच जोराने आतला अंधार अजून हवाहवासा वाटे.

-----------------------

एका खोक्यात - दोन वह्या, पेन, कॅलेंडर - ते सुद्धा काही वर्षं जुनं, टीमबरोबर काढलेले काही जुने फोटो एवढे टाकून नीलेश बाहेर निघाला. घरी येउन सामान एका कोपर्‍यात टाकलं. अनेक वर्षांचा जमाखर्च आणि बँक बॅलन्स.
'चाळिशी नाही आली की रे तुझी. ग्रॅज्युइटी, इपीएफ सगळ्याची गोळाबेरीज करुन बसलास. ख्याख्याख्या.'
'ह्म्म. बरचसं सहनच केलं म्हणायचं यांनी. माझ्यासारख्या तुझ्यासारख्याशी बडबड करणार्‍याला किती दिवस ठेवणार ते तरी. लोकं वाकून वाकून बघत. त्यांना तेवढीच गंमत. हं.'
'तू काय कमी नाही राबलास. काम, पैसा. बरोबर कोण राहिलं तुझ्या, बघितलंस कधी?'
'महिन्याच्या महिन्याला पगार देत राहिले. दिवस तरी गेले त्यात. आता काय माहिती नाही.'
बडबड, बडबड. त्याच्याबरोबर बडबड पण त्याला आता नकोशी झाली होती. पण इतरांना आयुष्यातून कमी करून टाकलं तसं याला करणं अशक्य होतं. तसंही आत खोल विवरातून त्याला तो सारखं बोलावत असेच. कधी कधी तो थोडासा आत जाऊन बसत देखील असे. फक्त आताशा आत गेल्यावर त्याला बाहेर यायला खूप वेळ लागू लागला. दिवसचे दिवस त्याला आत बसावंसं वाटे. असं टोकालाच न थांबता, त्या काळ्याशार विवरात कायमचं झोकून द्यावंसं वाटे.

'मारून टाक उडी एकदाची. काय करणार आहेस तसंही बाहेर थांबून? आई-वडील-ताई-मित्र-स्कूटर-कंपनी-नोकरी-मुली-बँकेतले पैसे-पीपीएफ-घर-भांडी-पुस्तकं-खिडकी-पडदे-सूर्य-चंद्र-कुलूप. सगळे आपापले आले, जगले. काही आहेत. काही गेले. काही तसेच राहतील. काही फरक पडणार नाही. काही फरक आजवर पडला पण नाहीये. ये, आत ये. खूप झुंजलास. तुझा पिंड नव्हता तो.'

विवराच्या टोकाशी उभा राहून तो आत बघत होता. स्प्रिंगप्रमाणे त्या काळ्याशार विवराला वळ्या होत्या. थोडी मान तिरकी केली तर त्या वळ्या सतत फिरत आहेत, असे वाटत होते. हळूहळू त्या फिरणार्‍या वळ्या त्याच्याभोवती वर वर चढू लागल्या की तो खाली जाऊ लागला त्याला कळेना. खालून 'ये' म्हणून तसंही तो बोलावतच होता.

त्याचा जोर कमी पडत होता. पाय वेगाने आत ओढत होते. शेवटी आत बसलेल्या त्याच्या बोटाशी त्याच्या बोटाचा स्पर्श झाला आणि प्रचंड वेगाने तो आणि तो एक होऊन त्या विवराच्या केंद्राशी खेचले गेले. आता फक्त सुन्न शांतता होती. प्रकाशाचा किरणसुद्धा गिळंकृत करणार्‍या त्या कृष्णविवराच्या बेंबीशी गर्भातल्या अर्भकाप्रमाणे पाय पोटाशी घेऊन नीलेश बिनविचारांचा होऊन गेला होता.

- टण्या