सेमो म्हणे!

भावनांचा तीव्र, धसमुसळा आविष्कार आणि माध्यमांची रासवट, रांगडी हाताळणी यांमुळे त्याच्या शैलीला निओ-एक्स्प्रेशनिस्ट शैलीचे प्रतिनिधित्व करणारी चित्रकला म्हटले गेले. चित्रातली मांडणी, रंग आणि उस्फूर्तता व कौशल्य यांच्यात साधलेला समतोल यासाठी कलासमीक्षक त्याला नावाजू लागले. मानवी आकृत्या त्याच्या सर्व चित्रांच्या केंद्रबिंदू असत. मानवी आकृत्या, शब्द, काट मारलेले शब्द, विविध चिन्हं आणि वेगवेगळ्या रंगांनी झाकलेले पार्श्वभूमीतील निरनिराळे भाग हे त्याच्या बर्‍याचशा चित्रांमध्ये बघायला मिळतात.

border2.JPG

चि

त्रकारांसंदर्भात चित्रपट बघायला मिळत होते. चित्रकाराचं नाव होतं जाँ मिशेल बास्किया. नाव ऐकून वेगळ्याच अपेक्षा होत्या आणि समोर वेगळंच काही आलं. बर्‍यापैकी कानाखाली वाजवणारं आणि तरीही खिळवून ठेवणारं. समोर उलगडला ब्रूकलिनमधला, ग्राफिटीमधून पुढे आलेला, संपूर्ण विस्कटलेला आणि मजेशीर ब्लॅक चित्रकार. चित्रं आणि लिहिलेली चित्रं बनवण्याचं व्यसन असलेला.

Untitled_acrylic_and_mixed_media_on_canvas_by_--Jean-Michel_Basquiat--,_1984.jpg
चित्र १ - अनटायटल्ड (स्कल) १९८४
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि मिश्र माध्यम.
==Licensing== '''Fair use rationale:''' # This is a historically significant work that could not be conveyed in words. # Inclusion is for information, education and analysis onl

बास्कियाने १९८४ साली कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि मिश्र माध्यमात रंगवलेलं हे चित्र. बास्कियाने या चित्राला काही नाव दिलेलं नाही. त्याने त्याच्या बर्‍याच चित्रांना नावं दिलेली नाहीत. संदर्भासाठी संग्राहकांनी वा अभ्यासकांनी 'स्कल' (कवटी) असं या चित्राला नंतर दिलेलं नाव.

हो, हे पेंटिंगच आहे. ही एक कलाकृतीच आहे. ही कलाकृती आहे, म्हणजे चांगली अथवा वाईट आहे, असं म्हणता येणार नाही. पण ही कलाकृती आहे नक्की. कलाकृतीमध्ये सर्वसाधारणतः दिसणारं ठरावीक प्रकारचं सौंदर्य यात कदाचित दिसणार नाही. पण तरी ही कलाकृती आहे.

Untitled--Halo---1982.jpg
चित्र २ - अनटायटल्ड (हेलो), १९८२
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

हे बघा. रेघोट्यांसारख्या विचित्र रेषा, मध्येच अक्षरं, हुबेहूब नसलेलं सगळं काही, सवयीची नसलेली भडक रंगसंगती, रंगांची अर्थहीन वाटणारी सरमिसळ, असं बरंच काही बघितलंत? हे पण पेंटिंगच आहे. ही पण कलाकृतीच आहे.

पण मग ह्याला 'कला' म्हणायचं तर मग 'कला' म्हणजे काय? असा प्रश्न निश्चितच उमटला असेल तुमच्या मनात. मग काय करणार कलेची व्याख्या? कशी करणार? डोळ्यांना सुखावते ती कला, आनंद निर्माण करते ती कला, अनुभव देते ती कला, समजते किंवा कळते ती कला, प्रामाणिक व्यक्त होणं म्हणजे कला, भावनेला आव्हान देते ती कला, विचार पोचवते ती कला, अस्वस्थ करते ती कला. असे अनेक आडाखे किंवा अपेक्षांची यादी करता येईल. हे आडाखे एकेकटे किंवा एकत्र मिळून ठरावीक कलाकृतींच्या बाबत योग्यही असतील. पण तरी हे सगळे आडाखे मिळूनही कलेचा पूर्ण आवाका लक्षात येणार नाहीच. व्याख्या अपूर्णच राहील.

कारण ही आडाख्यांची, अपेक्षांची यादी कलानिर्मितीच्या प्रवासाबरोबर वाढत जाणार. काही आडाखे कदाचित कालबाह्य होऊन यादीतून गळून जाणार. म्हणजे कलेच्या मर्यादा आणि कक्षा बदलत्या असणार. या प्रत्येक आडाख्याला धरून कला या संकल्पनेबाबत ठाम मते निर्माण होऊन बाजूने वा विरूद्ध वाद होणार. एकेका उदाहरणासकट एकेक नवीन आडाख्याची या यादीत वा व्याख्येत भर पडत जाणार. या सगळ्या चलनवलनामुळे कला ही संकल्पना समृद्ध होत राहणार.

अशा प्रकारच्या संकल्पनांना 'स्वभावतः वादग्रस्त संकल्पना' (एसेन्शियली कॉन्टेस्टेड कॉन्सेप्ट्‌स्‌) असं म्हटलं जातं. ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ वॉल्टर ब्रायस गॅलि यांनी १९५६ साली हा सिद्धांत मांडला. यामध्ये साहित्य, संगीत, दृश्य कला, नाटक, नृत्य अशा अनेकांचा समावेश होतो. तस्मात, वरची चित्रे तुम्हांला अनुभव देत असतील किंवा खिळवून ठेवत असतील किंवा गेलाबाजार त्रास तरी देत असतील, तर त्यांना कलाकृती म्हणायला हरकत नाही.

या कलाकृतींनी मला पहिल्या भेटीतच खिळवून ठेवलं. या चित्रांमध्ये गुळगुळीत गोड प्रतिमा नव्हत्या, सुखावणारे रंग नव्हते, सुंदर किंवा भीतीदायक पण अद्भुत असे स्त्रीपुरूष नव्हते, गोयाच्या चित्रांसारखं थरकाप उडवणारं क्रौर्य नव्हतं, माणसासारखा हुबेहूब माणूस आणि कुत्र्यासारखा तंतोतंत कुत्रा नव्हताच. पण असं काहीतरी जबरदस्त होतं की, हे सगळं नसताना त्या चित्रांकडे परत परत बघावसं वाटत होतं. अस्वस्थ केलं त्या चित्रांनी, भोवंडायलाही झालं कधीकधी, पण त्यापेक्षाही जास्त मौज आली. एखाद्या गोष्टीवर खवचट हसताना येते ना तशी मौज, आपला विस्कटलेला गाभा पूर्ण नागडा करून चार मित्रांनी एकमेकांवर खिदळावे तशी नागडी नशेदार मौज. त्याच्या चित्रांतल्या व्यक्त होण्यातल्या खरेपणाने, नागडेपणाने मला तरी झपाटलं. मग जिथे जसा जमेल तसा बास्किया शोधत राह्यले.

कोण होता बास्किया? अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी अंमली पदार्थांमुळे कारभार आटोपलेला, पण आधीच्या आठ-नऊ वर्षांत न्यूयॉर्क आणि युरोपच्या कलाजगतात प्रचंड गाजलेला असा एक गमतीशीर माणूस. उणीपुरी दहा वर्षांची कारकीर्द असलेलं 'तेजस्वी मूल', रस्त्यावर राहून मिळेल त्या वस्तूंनी मिळेल त्या पृष्ठभागावर चित्र काढणार्‍यापासून भरपूर पैसा आल्यावर $१०००चा अर्मानीचा सूट घालून पेंटिंग करणारा आणि पेंटिंगचे फटकारे सूटवर तसेच घेऊन सोहो[१] ते मॅडिसन अ‍ॅव्हेन्यू किंवा युरोपातल्याही बड्याबड्या पार्ट्यांमध्ये वावरणारा एक चित्रकार, की अजून काही?

हेशियन वडील आणि पोर्टोरिकन आईच्या पोटी एका मध्यमवर्गीय घरात २२ डिसेंबर १९६० साली जन्मलेला जाँ मिशेल चित्रकार बनण्याचं नशीब घेऊन आला होता. लहान असताना तो भरपूर चित्रं काढत असे. त्याच्या आईचीही इच्छा होती मुलाने चित्रकार बनावं. ती त्याला मॉडर्न आर्ट म्यूझियम आणि न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्यूझियम ऑफ आर्टमध्ये चित्रं दाखवायला नेत असे. जाँ मिशेल आठ वर्षांचा असताना त्याला रस्त्यावर एका गाडीने धडक दिली. त्या अपघातात त्याचा हात मोडला, प्लीहा काढून टाकावी लागली. या दरम्यान तो हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेत असताना त्याच्या आईने त्याला 'ग्रेज अनॅटमी' हे पुस्तक वाचायला आणून दिलं. चित्रं आणि चित्रकार यांच्यात रस असलेल्या त्याच्या आईला हे पक्कं माहीत होतं की, मिकलांजेलो आणि जगातल्या प्रत्येक महान चित्रकाराने शरीरशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. या पुस्तकातल्या चित्रांचा जाँ मिशेलवर परिणाम झालेला दिसतो. अपघातातून बरा व्हायला मदत झालीच पण त्याची स्वतःची अशी चित्रशैली निर्माण व्हायला या चित्रांचा उपयोग झाला. प्रसिद्ध चित्रकार होण्याच्या इच्छेनेही इथेच कुठेतरी जन्म घेतला. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर वडिलांच्या घरी रहाताना त्याची कुचंबणा होऊ लागली. मग सगळा राग, वैताग तो चित्रांतून बाहेर काढू लागला. प्रसिद्ध होण्याची प्रचंड इच्छा, चित्रं काढण्याचं व्यसन आणि साहसाचं आकर्षण या सगळ्यांच्या परिणामातून अंमली पदार्थांची नशा करू लागला.

१९७७च्या आसपास जाँ मिशेल आणि अल दियाझ असे दोघं मिळून न्यूयॉर्कच्या सोहोमधल्या इमारतींवर ग्राफिटी काढू लागले. 'सेमो' (सेम ओल्ड शिट) या नावाची, खोटे तत्त्वज्ञान, खोटा धर्म विकून आपली उपजीविका करणारी व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केली. सेमोच्या वाक्यांनी सोहोमधल्या भिंती भरून जाऊ लागल्या. कॅपिटलमध्ये एस - ए - एम - ओ लिहून त्यापुढे किंचित खाली कॉपीराइट चिन्ह असल्यासारखा गोलात 'सी' अशी या सेमोची सही किंवा टॅग होता. हा असा - SAMO© .

'सेमो इज अ‍ॅन एन्ड टु माइण्डवॉश रिलिजन, नोव्हेअर पॉलिटिक्स अ‍ॅण्ड बोगस फिलॉसॉफी' (डोकं धुवून टाकणारा धर्म, कुठेही थारा नसलेलं राजकारण आणि खोटं तत्त्वज्ञान यांचा सेमो हा शेवट आहे), 'सेमो सेव्हज इडियटस्' (सेमो मूर्खांना वाचवतो), 'प्लश सेफ ही थिंक' (गुबगुबीत, आलिशान जे, ते सुरक्षित असं तो म्हणतो) अशी काही त्याची वाक्यं होती. हे एक उदाहरण.

imgC1.jpg
चित्र ३ - ग्राफिटी
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

याबद्दल त्याला विचारलं असता 'दांभिकपणाची टर उडवणे' हा हेतू असल्याचं बास्किया स्पष्ट करी. त्याच्या चित्रांच्या विषयांबद्दल विचारलं असता 'रॉयल्टी (राजेमहाराजे), हिरोइझम (शौर्य) आणि स्ट्रीट्स् (रस्त्यावरचं जग) असं तो सांगे. हा सेमोचा प्रकल्प काही दिवस चालला. 'सेमो इज डेड' (सेमो मेला आहे), असं सोहोमधल्या भिंतींवर जाहीर करून हा प्रोजेक्ट संपला.

visual_samo.jpg
चित्र ४ - ग्राफिटी
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

या सेमो प्रकाराने सबवे ट्रेन्स आणि इतर भूमिगत जगात बास्कियाला प्रसिद्धी मिळाली. दरम्यान १९७८च्या सुमारास त्याने शाळा सोडली, घर सोडलं आणि तो मित्रांबरोबर राहू लागला. उपजीविकेसाठी तो टीशर्ट रंगवून विकणं, हाताने बनवलेली पोस्टकार्ड्‌स्‌ विकणं असे उद्योग करत असे. सोहोमधल्या एका उपहारगृहात त्यानं प्रत्यक्ष अ‍ॅण्डी वॉरहॉलला[२] असं पोस्टकार्ड $१ ला विकलं होतं.

१९८०मध्ये पहिल्यांदा जाँ मिशेल बास्कियाची चित्रं 'टाइम्स स्क्वेअर शो' या प्रदर्शनात घेतली गेली. त्याच्याबरोबर अनेक महत्त्वाच्या चित्रकारांची चित्रं या ठिकाणी होती. जाँ मिशेल हा या सगळ्यांमध्ये वयाने लहान होता. यानंतर १९८१मध्ये रने रिकार्द या कवी आणि कलासमीक्षकाने जाँ मिशेल बास्कियावर 'रेडियंट चाइल्ड' या शीर्षकाचा लेख लिहिला. या लेखाने जाँ मिशेल बास्कियाला 'ग्राफिटी आर्टिस्ट' आणि 'ग्राफिक आर्टिस्ट' या शिक्क्यांपलीकडे जाऊन 'फाइन आर्टिस्ट' अशी मान्यता मिळाली. न्यूयॉर्कनंतर मग युरोपमधल्या काही गॅलर्‍यांमध्येही त्याची चित्रे दाखवली गेली. कलासंग्राहक आणि दलाल, विक्रेते अशा सगळ्यांनीच त्याची शैली नावाजली.

भावनांचा तीव्र, धसमुसळा आविष्कार आणि माध्यमांची रासवट, रांगडी हाताळणी यांमुळे त्याच्या शैलीला निओ-एक्स्प्रेशनिस्ट शैलीचे प्रतिनिधित्व करणारी चित्रकला म्हटले गेले. चित्रातली मांडणी, रंग आणि उस्फूर्तता व कौशल्य यांच्यात साधलेला समतोल यासाठी कलासमीक्षक त्याला नावाजू लागले. मानवी आकृत्या त्याच्या सर्व चित्रांच्या केंद्रबिंदू असत. मानवी आकृत्या, शब्द, काट मारलेले शब्द, विविध चिन्हं आणि वेगवेगळ्या रंगांनी झाकलेले पार्श्वभूमीतील निरनिराळे भाग हे त्याच्या बर्‍याचशा चित्रांमध्ये बघायला मिळतात.

Italian.jpg
चित्र ५ - इन इटालियन १९८३
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक, ऑइलस्टिक आणि मार्कर.
द स्टेफनी अ‍ॅण्ड पीटर ब्रांट फाउंडेशन, ग्रीनविच, कनेटिकट

बास्कियाने वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, शब्द, रंग आणि प्रतिमा कोलाजमध्ये आणल्यासारख्या एकत्र आणल्या. या दृश्य कोलाजबरोबर खरोखरीचं कोलाजही त्याच्या चित्रांमध्ये बघायला मिळतं. सुरूवातीच्या काळातल्या काही चित्रांमध्ये त्याने कागदाचे कपटे चित्राच्या पृष्ठभागावर चिकटवून वेगळा पोत निर्माण केल्याचं दिसून येतं. १९८४-८५ दरम्यान केलेल्या काही चित्रांमध्ये स्वतःच्याच रेखाटनांना आणि त्यांच्या रंगीत फोटोकॉप्यांना एकत्र चिकटवून चित्रनिर्मिती केल्याचं दिसतं. संपूर्ण कॅनव्हासवर आधीच्या चित्रांच्या रंगीत फोटोकॉप्या लावून त्यावर मग मुखवट्यासारखी दिसणारी गायी आणि उंदरांची डोकी रंगवून काही चित्रे त्याने केली होती. या कोलाजिंगमध्ये अजून सुबकता आणण्यासाठी बास्कियाने सिल्कस्क्रीनिंग (स्क्रीनपेंटींग) तंत्राचा वापरही केलेला दिसतो. त्याने सिल्कस्क्रीन केलेल्या प्रतिमा कॅनव्हासवर डकवण्यासाठी वापरल्या.

माध्यमांचे वेगवेगळे प्रयोग करताना त्याने एकाच कॅनव्हासवर दोन प्रकारचे रंग तर वापरलेच पण त्या त्या प्रकारच्या रंगांच्या तंत्रांमध्येही प्रयोग केलेले दिसून येतात. 'नोटरी' या चित्रात त्याने कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंग अशाप्रकारे वापरले आहेत की जेणेकरून रंगांचे ओघळ स्पष्टपणे दिसतील. ऑइल पेन्टस्टिक नावाचं एक प्रकरणही त्याने कॅनव्हासवर आणि इतर चित्रांवर लिहिण्यासाठी वापरलं. तैलरंगांनी भरलेला एक मोठा खडू असं काहीसं या वस्तूचं स्वरूप होतं.

notary.jpg
चित्र ६ - नोटरी, १९८३.
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक, ऑइल पेन्टस्टिक व पेपर कोलाज. शॉर (Schorr) कुटुंबियांचा संग्रह. सध्या प्रिन्सटन युनिव्हर्सिटी आर्ट म्यूझियममध्ये.

सुरूवातीच्या काळात सोहोमधल्या इमारतींच्या भिंतींपासून कशावरही रंगवल्यामुळे कुठलाही पृष्ठभाग चित्र काढण्यासाठी तो वापरू शकत असे. दुसर्‍यांच्या चित्रांच्या मागे, दारांवर, शेल्फवर, मैत्रिणीच्या ड्रेसवर अशा अनेक ठिकाणी त्याने चित्रं काढून बघितलेली आहेत.

त्याच्या ग्राफिटीच्या दिवसांतल्या आणि नंतरही काही चित्रांमध्ये दिसणार्‍या सेमो या सहीबरोबरच एक चिन्ह त्याच्या चित्रांमध्ये सतत दिसतं, ते म्हणजे मुकुटाचं. हे चिन्ह त्याच्या नंतरच्या चित्रांमध्येही सतत दिसतं. शूर आणि महान अशा व्यक्तींसाठी हे चिन्ह तो राजचिन्ह या अर्थी वापरतो. बास्कियाला त्याच्या चित्रांतल्या विषयांबद्दल विचारले असता तो 'रॉयल्टी (राजेमहाराजे), हिरोइझम (शौर्य) आणि स्ट्रीट्स (रस्त्यावरचं जग) हे माझे महत्त्वाचे विषय आहेत, असं तो सांगे. त्यामुळे हे मुकुटाचं चिन्ह वारंवार येणं साहजिकच वाटतं.

JMB_panelofexperts.jpg
चित्र ७ - पॅनेल ऑफ एक्स्पर्ट्स
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

बास्कियाच्या चित्रांमध्ये सगळीकडे अक्षरं, शब्द दिसतात हे आपण बघितलंच. ग्राफिटीपासून सुरुवात झालेली असल्याने चित्रात शब्द असणं हे साहजिकच आहे, असंही म्हणता येईल. पण चित्रात शब्द असण्याचं तेवढंच कारण पुरेसं वाटत नाही. बास्कियाने आपल्या ग्राफिटीला कधी पेंटिंग मानलं नाही, पण त्याच्या चित्रांतून येणारे शब्द हे शब्दांपेक्षा कुंचल्याचे फटकारे असल्यासारखे वापरल्याचं त्याने नेहमीच सांगितलं. बास्कियाच्या चित्रांमध्ये अनेकदा त्याने शब्द लिहून त्यावर काट मारलेली असे. त्यासंदर्भात 'तुम्ही जे जास्त करून वाचावं/ बघावं असं मला वाटतं, त्यावर मी काट मारतो; जेणेकरून विद्रूप केल्यामुळे तुमचं लक्ष तिकडे अधिक जाईल', असा बास्कियाचा विचार असे. बास्कियाच्या पोर्टोरिकन पार्श्वभूमीमुळे त्याच्या चित्रांमध्ये स्पॅनिश भाषेतले शब्दही बरेच असत. त्याच्या चित्रातले वा ग्राफिटीमधले शब्द वाचताच येणार नाहीत इतपत विचित्र कधी नसत. नेहमीपेक्षा लक्ष वेधून घेतील असे, पण तरीही साधेपणाने लिहिलेले असे ते शब्द असत. उदाहरणार्थ, ग्राफिटीमध्ये लिहिताना कॅपिटल 'ई' या अक्षराची उभी रेघच तो देत नसे. त्याच्या ग्राफिटीतल्या शब्दांना, सेमोच्या वचनांना आणि नंतर चित्रांत वापरलेल्या शब्दांनाही काही जणांनी 'व्हिज्युअल पोएट्री' (दृश्य काव्य) असं संबोधलं होतं.

त्याच्या चित्रांमध्ये मानवी आकृत्या अतिशय महत्त्वाच्या असत, हे आपण बघितलं. प्रत्येक वेळेला अखंड संपूर्ण मानवाकृती असेलच असं मात्र नाही. कधी एखादाच अवयव तर कधी सुटे सुटे काही अवयवही त्याच्या चित्रांमध्ये येत असत. डोकं आणि कवटीचं चित्र आपल्याला बर्‍याच ठिकाणी दिसतं. पूर्ण मानवाकृती वा सुटे अवयव असले तरी ते हुबेहूब खर्‍यासारखे कधीच नसत. बाह्य आवरण काढून टाकून मानवाचा, डोक्याचा, पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न कायम असे. त्वचेच्या आवरणाखालच्या नसा, स्नायू आणि आतला सांगाडा उघडा करून दाखवलेला असे. आतलं आणि बाहेरचं एकाच वेळी दाखवणारी क्ष-किरण दृष्टी असल्यासारखं असं काहीतरी चित्रात दिसे. लहानपणी वाचून काढलेल्या 'ग्रेज अनॅटमी' या पुस्तकातल्या आकृत्यांचा प्रभाव या ठिकाणी सहज दिसतो. जेवढं वरवर दिसतंय त्याच्यापेक्षा इथे बरंच काही दडलेलं आहे असा काहीसा भाव या प्रकारच्या चित्रात असावा, अशी शक्यता वाटते. स्वतः बास्किया हा वरवर शांत दिसला तरी भावनिक पातळीवर सतत असंतोष, वैताग, विचार, प्रश्न, असुरक्षितता इत्यादी नेहमी खदखदत असत. त्याचंच हे प्रतिबिंब असणं सहज शक्य आहे (चित्र ८).

1395_jean_michel_basquiat_warri.jpg
चित्र ८ - वॉरियर, १९८१ न्यू यॉर्क, यू एस ए
source: Magazine www.egodesign.ca

बास्कियाला जॅझ आणि हिप-हॉप संगीत आवडत असे. या संगीतातली तालबद्धता आपल्याला बास्कियाच्या चित्रांमध्येही दिसते. एखादी गोष्ट परत येणे, वेगवेगळ्या रेषांनी एकमेकांना छेदणे, रंग, आकृत्या, शब्द या सगळ्यांतून चित्राला एक गतिवानता आलेली दिसते (चित्र ९).

1387_jean_michel_basquiat_antho.jpg
चित्र ९ - अ‍ॅन्थनी क्लार्क, १९८५ न्यू यॉर्क, यू एस ए
source: Magazine www.egodesign.ca

या प्रकारच्या संगीताची आवड ही बास्कियाच्या ब्लॅक असण्याशी अर्थातच जोडता येते. बास्किया हा हेशियन आणि पोर्टोरिकन आईवडिलांच्या पोटी जन्मलेला आफ्रिकन अमेरिकन माणूस होता. ब्लॅक माणूस चित्रांत आणणे, तो त्याच्या चित्रांचा नायक असणे हे बास्कियाच्या बर्‍याचशा चित्रांमध्ये दिसून येतं. स्वत:च्या ब्लॅक असण्याबद्दलची जाणीव त्याच्या चित्रांतून, तो वापरत असलेल्या चिन्हांतून स्पष्ट दिसून येते. कधी माहितीवजा पातळीवर, कधी असंतोष म्हणून, कधी वर्णभेदावर तिखट प्रतिक्रिया म्हणून तर कधी औपरोधिक पातळीवर. आफ्रिकन संस्कृतीचं जन्मस्थान प्राचीन इजिप्त मानलं जातं. बास्कियाचं एक महत्त्वाचं चित्र आहे ज्याचं नाव आहे 'द नाइल'. हे चित्र इजिप्तमधील नाइल नदीशी संबंधित आहे. प्राचीन इजिप्शियन चित्रांतील काही चिन्हे (डोळा व लाटा) आणि चित्रलिपीमधील (हिरोग्लिफ) खुणा 'द नाइल'बरोबरच इतर अनेक चित्रांतही दिसून येतात (चित्र १०).

JMB_TheNile83.jpg
चित्र १० - द नाइल १९८३
कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक आणि ऑइलस्टिक. लाकडी सपोर्ट्‌स्‌वर चढवलेले.
एनरिको नवारा (Enrico Navarra) संग्रहातून

ब्लॅक असण्याच्या जाणिवेबरोबरच कुणाही माणसाच्या शहरी वास्तवातल्या अनेक गोष्टी मुद्दे बनून त्याच्या चित्रांत आलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, डांबर, तेल, जुने पत्रे, सोनं या सगळ्याला धरून येणार्‍या समस्या. याचबरोबर आर्थिक विषमतेबद्दलही बास्किया त्याच्या चित्रांतून भाष्य करतो. सामाजिक न्याय, वंशभेद, चंगळवाद, शोषण हे विषय त्याच्या चित्रांमध्ये पुनःपुन्हा येतात. यावर भाष्य करण्यासाठी टोकाच्या विरूद्ध गोष्टी तो एकाच चित्रात दाखवतो. उदाहरणार्थ, अतिगरिबी आणि अतिश्रीमंती. यासंदर्भातलं हे 'पर कॅपिटा' या शीर्षकाचं चित्र (चित्र ११).

JMB_percapita.jpg
चित्र ११ - पर कॅपिटा
क्रिएटिव्ह कॉमन्स, http://www.smartwentcrazy.com

या जाणिवेपोटी किंवा अजून कशामुळे असेल, असं म्हणतात की बास्किया काही बाबतींत खूप उदार होता. त्याने सुरूवातीच्या काळात हाती करून विकलेली पोस्टकार्ड्स, सोहो इमारतींची पॅनेल्स किंवा सेमोच्या वचनांची ग्राफिटो असलेली कुठलीही वस्तू या सगळ्याला बास्कियाचं नाव झाल्यावर मोठा भाव आला होता. अनेक लोक आर्ट डीलरकडे ह्या वस्तू घेऊन पोचत. ग्राफिटी आणि तत्सम वस्तू असल्याने खरोखर की बनावट हे ठरवणे त्यांना अवघड जाई. खात्री करण्यासाठी बास्कियाला विचारले असता तो शहानिशाही न करता वस्तू बनावट नाही, अशी ग्वाही देई. आपल्या नावावर आपल्या रस्त्यावरच्या मित्रानेही थोडे पैसे कमावले तर बिघडलं कुठे, असा त्याचा दृष्टिकोन असे.

बास्कियाच्या चित्रांमध्ये विविध प्रकारच्या कलाजाणिवांचा मेळ दिसतो. त्या एकत्र आलेल्या दिसतात. पण हा मेळ काही एका सामाजिक, राजकीय दृष्टिकोनाला धरून येतो. ह्यामुळे काही कलासमीक्षकांनी बास्कियाला निओ-पोस्ट-मॉडर्निस्ट असंही म्हटलं आहे. अशा प्रकारच्या जाणिवांनी झपाटून जाऊन बास्किया चित्रनिर्मिती करत होता. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याची चित्रं दाखवली जात होती. त्याच्या काही चित्रांनी कलाबाजारातल्या आर्थिक उलाढालींचा उच्चांक गाठला होता. नाव, स्टेटस यांबरोबरच केवळ तीनचार वर्षांत अन्नान्नदशेपासून पैशात लोळण्यापर्यंत त्याची आर्थिक स्थितीही बदलली.

या दरम्यान १९८२मध्ये बास्किया आणि अ‍ॅण्डी वॉरहॉल आर्ट कोलॅबोरेटर्स म्हणून एकत्र आले. चारच वर्षांपूर्वी सोहोमधल्या एका उपहारगृहात अ‍ॅण्डी वॉरहॉलला गाठून बास्कियाने आपण बनवलेली पोस्टकार्ड्स प्रत्येकी $१ला विकली होती. प्रत्यक्ष अ‍ॅण्डी वॉरहॉलने आपली पोस्टकार्ड्स घेतली यामुळे वाटलेल्या धन्यतेबरोबर रस्त्यावर रहाणार्‍या जाँ मिशेलला त्या विक्रीतून पोट भरण्यासाठी थोडेफार पैसे मिळाले असावेत. आता परिस्थिती वेगळी होती. अ‍ॅण्डी वॉरहॉल पॉप आर्टचा[३] बादशहा होता. जाँ मिशेल बास्कियाला त्याच्या कलेबद्दल, प्रसिद्धीबद्दल प्रचंड औत्सुक्य होतेच, पण आता तो स्वतःही थोडक्या कालावधीत जगभर गाजलेला चित्रकार असल्याने अ‍ॅण्डीलाही त्याच्याबद्दल कौतुक, उत्सुकता होती. गाढ मैत्री आणि कलेतली पार्टनरशिप या दोन्ही पातळ्यांवर हे नातं वाढलं. दोघांनी एकत्र मिळून बरेच मोठे मोठे कॅनव्हास केले. दोन प्रतिभावान व्यक्तींमधला चित्रसंवाद म्हणता येईल असं त्या कॅनव्हासेसचं रूप होतं. दोघांच्या आपापल्या शैली एकमेकांना पूरक म्हणून आलेल्या या चित्रांमध्ये बघायला मिळतील. ही पार्टनरशिप १९८७पर्यंत म्हणजे अ‍ॅण्डी वॉरहॉलच्या मृत्यूपर्यंत टिकली.

जाँ मिशेलच्या इथपर्यंतच्या सगळ्या प्रवासात अंमली पदार्थांची साथ फारशी सुटली नव्हती. उलट ती सवय वाढतच गेली होती. अ‍ॅण्डीच्या सांगण्यावरून त्याने ही सवय सोडण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण ते सगळे प्रयत्न अल्पजिवी ठरले होते. अ‍ॅण्डी वॉरहॉलच्या मृत्यूनंतर जाँ मिशेल बास्किया कमालीचा एकटा पडला. अंमली पदार्थांचा वापर वाढत गेला. १९८८मध्ये स्वतःच्या मृत्यूशी सामना झाल्याचं चित्र त्यानं रंगवलं होतं. या चित्राचं नाव होतं 'रायडिंग विथ डेथ' (मृत्यूबरोबर सवारी!). http://4.bp.blogspot.com/_7UHICy8Etfo/S-BvBtlTS5I/AAAAAAAAJ0Q/B-c_hWIp1B... या ठिकाणी हे चित्र बघायला मिळेल. आयुष्यात त्याने केलेलं हे शेवटचं चित्र. यानंतर थोड्याच दिवसांत अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला. 'डाय यंग अ‍ॅण्ड लीव्ह अ ब्युटिफुल कॉर्प्स बिहाइंड!', (तरूणपणी मरून सुंदर प्रेत मागे सोडा!) हे ब्रीदवाक्य असल्यासारखा तो जगला.

गेली दोन वर्षं शोधायचा प्रयत्न करत राहिल्यानंतर हाताशी आलेला हा थोडासा जाँ मिशेल बास्किया. भारतात तशा अपरिचित असलेल्या एका मनस्वी कलाकाराची आणि त्याच्या कलेमधल्या योगदानाची ही धावती ओळख आहे. हा लेख म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची भलावण नव्हे. हा लेख म्हणजे ह्या प्रकारची कलाच श्रेष्ठ, असं काही पटवण्याचा अट्टहासही नव्हे. बास्कियाचा कलाप्रवास, त्याची चित्रं, यांची ओळख करून घेतल्यावर कलेसंबंधीच्या आपल्या जाणिवा थोड्यातरी किलकिल्या झाल्या, बास्कियाच्या कालखंडाबद्दल, त्या अनुषंगाने असलेल्या वेगवेगळ्या कलाप्रवाहांबद्दल कोर्‍या आणि मोकळ्या मनाने समजून घ्यावं, असं वाचकांपैकी एकाला जरी वाटलं, तरी बरीच मोठी मजल मारल्यासारखं आहे.

तळटिपा -

[१] सोहो - साउथ ऑफ ह्यूस्टन(स्ट्रीट) ही शब्दाची फोड. १९व्या शतकाच्या मध्यात हा भाग औद्योगिक भाग म्हणून उदयास आला. अनेक प्रकारची वर्कशॉप्स इथे होती. नंतर दिवसा कामकरी लोकांची वर्दळ तर रात्री या कामकरी लोकांना रिझवणारे सर्व प्रकारचे वैध-अवैध धंदे इथे चालू झाले. २०व्या शतकाच्या मध्यात इथले उद्योग कमी झाले आणि रिकाम्या झालेल्या या गाळे प्रकारच्या स्वस्त जागा अनेक दृश्य कलेच्या कलाकारांनी आपले स्टुडिओ आणि घर एकत्र थाटण्यासाठी निवडल्या. १९६८च्या दरम्यान 'आर्टिस्ट इन रेसिडन्स' या शीर्षकाखाली त्यांनी शासनाकडून मान्यता आणि सवलतीही मिळवल्या. यामुळे या भागाचं रूप पालटलं.

[२] अ‍ॅण्डी वॉरहॉल (१९२८-१९८७) - अमेरिकन चित्रकार, ग्राफिक आर्टिस्ट, फिल्ममेकर इत्यादी. पॉप आर्ट या दृश्यकलाप्रवाहातील एक महत्त्वाचे नाव.

[३] पॉप आर्ट - १९५०च्या दशकात आधी ब्रिटन आणि मग अमेरिकेत हा दृश्यकलाप्रवाह सुरू झाला. पारंपरिक चित्रनिर्मितीला या प्रवाहाने छेद दिला. मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा उत्पादित होणार्‍या वापराच्या वस्तूंशी संबंध असलेल्या प्रतिमांचा वापर दृश्य कलेत केला गेला. या प्रतिमा त्यांच्याशी संलग्न असलेल्या वस्तूंपासून, संदर्भांपासून बाजूला काढून एकेकटी प्रतिमा किंवा अशा अनेक प्रतिमा एकत्रित घेऊन, आपलं म्हणणं मांडण्यासाठी एका चित्रात आणल्या गेल्या.

[४] गोया - गोया हा स्पॅनिश, रोमँटिक शैलीतील चित्रकार होता. - http://en.wikipedia.org/wiki/Francisco_Goya
गोयावर केलेल्या चित्रपटाविषयी इथे बघा - http://www.imdb.com/title/tt0455957
------------------------------------------------------------------------------------
संदर्भसूची -
१. Basquiat - 1996 biopic/drama film, directed by Julian Schnabel
२. ARTFORUM Magazine :: Volume XX No. 4, December 1981. p.35-43
The Radiant Child by Rene Ricard
३. Basquiat Obitury: Jean Basquiat, 27, An Artist of Words And Angular Images
by CONSTANCE L. HAYS
४. http://www.smartwentcrazy.com/basquiat/index.html
५. Basquiat: A Quick Killing in Art by Pheobe Hoban
६. http://www.brooklynmuseum.org/exhibitions/basquiat/street-to-studio/engl...
७. Jean-Michel Basquiat - SAMO the shooting star
http://www.egodesign.ca/en/article.php?article_id=92&page=1
८. http://en.wikipedia.org/wiki/Jean-Michel_Basquiat
९. http://www.gagosian.com/artists/jean-michel-basquiat/?gclid=CLTOs4K7s6QC...

- नीरजा पटवर्धन

Taxonomy upgrade extras: