अनिकेत; अश्वत्थ

......वडलांच्या अंगणातले नीलगिरीचे अजस्र झाड आणि असंख्य चांदराती. झाड चंद्रप्रकाशात किंचित भेसूर दिसायचं, सोसाट्याच्या वार्‍यात अक्षरशः चवर्‍या ढाळल्यासारखे वाकून, लवून जायचं. चंद्र मुजोर. चंद्रप्रकाश इतका की, चेहरे वाचता यावेत. रात्रीच्या उष्ण वार्‍याच्या झोतांचा जोर इतका की, महाकाय नीलगिरीच काय चंद्रालाही फराट्याने उडवून लावेल. अशा रात्री कल्लोळ घेऊनच यायच्या. डोक्याचा भुगा! चंद्रप्रकाशाने एखाद्याला वेड लागावं आणि नीलगिरीनं वाकून खिजवावं. पानांची सळसळ मांत्रिकाच्या हातातल्या झाडूसारखी सपासप. कधी चंद्रप्रकाशानं तलखी होणं ऐकलंय? पण व्हायची. अंगाची काहिली, डोक्याचीही. विचारज्वर चढत्या रात्रीबरोबर चढत जायचा. डास मारतानाचा आवाज ऐकून दचकायला व्हायचं. मिटलेल्या डोळ्यांसमोर चंद्रबिंबानं भयानक पेट घेतलेला असायचा.

border2.JPG

का

ळाशार विस्तीर्ण कातळ, वितळलेलाच भासणारा. एकाही झाडारोपट्याचे पान नव्हते भोवताली. सरळ चढण, सरळ सपाटी.

"बापरे, अजून.. किती अंतर.... चालायचे आहे?" अनु दमून धापा टाकत म्हणाली.
"तू मॅड आहेस का? सॅक दे म्हटलं की द्यायची." - आशुतोष.
"नो थँक्स.... मला... माझं सामान... धरता येतं."
"यायला पाहिजे. पण येत नाही ना? धाप लागून श्वास कोंडला आहे तुझा. काही झालं तुझ्या आडमुठेपणामुळे, तर जबाबदारी कोणाची? आमचा ट्रेक खराब करू नकोस. च्यायला, तरी मी सांगत होतो, पोरींना रात्रीच्या ट्रेकना आणू नका म्हणून. नुसता तोंडात जोर."
"स्टॉप इट, आशु. हद करते हो यार! वुई हॅव अबाऊट ट्वेल्व मोअर किलोमीटर्स टू गो. सामान दे दो, अनु. इट्स ओके. हम लोगोंको आदत है. तुम्हे भी हो जाएगी धीरे धीरे.' सौम्याने नेहमीप्रमाणे भांडण मिटवले आणि ती पाहता-पाहता आदित्यबरोबर झपाझपा पुढे निघून गेलीसुद्धा. ती तशी मोठी आणि खमकी. त्यामुळे सर्व भांडणांमध्ये हमखास तोडगा काढणारी.

आता मात्र अनुच्या पायांत गोळे यायला लागले आणि वरचा श्वास वर, खालचा खाली. श्वासागणिक पोटात/छातीत कळ येऊ लागली. त्यामुळे दिले सामान तिने गुमान चरफडत. कुठे थांबावे लागले तरी सर्वांत जास्त ट्रेक केलेला म्हणून हाच थांबणार बरोबर, यावर ती मनोमन वैतागली. नशीब! धाप लागल्यामुळे काहीही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. दर थांब्याला एक सिगरेट, याप्रमाणे त्याच्या एखाद डझन तशाच संपल्या होत्या. ('चिमनी है वो!' -सौम्या)
सिगरेटच्या वासाने डोकं दुखून अनुची मळमळ अजूनच वाढली.

"जोडे का काढलेस? मूर्ख! च्यायला नवीन लोकं म्हणजे..."

मूर्ख? हा मला मूर्ख म्हणाला? मगाशी मॅड म्हणाला! असह्य अपमानाने, भरून आलेल्या पायांनी अनुला संताप आवरेना.
"हे पहा, पाय सुजलेत नवीन बूट चावून चावून. त्यामुळे काढले. मी उरलेले अनवाणी चालेन आणि तुला माझ्याशी नीट बोलायचे नसेल तर बोलू नकोस, प्लीज! तुला थांबायचीही गरज नाही. मी माझं पाहून घेईन."

"काय पाहून घेशील तू? अनवाणी चालताना साप चावला ना, की त्याचा रंग येऊन सांग मला. तू आत्ताच्या आत्ता पायात जोडे घातले नाहीस, तर आपण आज रात्री इथेच बसणार आहोत, एवढं लक्षात ठेव."

Aniket_ashvattha.jpgहा काय धमकावतो? मुद्दाम बसकण मारली तिने. त्यानेही वैतागून मनातल्या मनात शिव्या घालत शांतपणे बसकण मारली. अनुने मोबाईल काढला सौम्याला फोन लावायला, तर रेंज इल्ले. कुठलीही यांत्रिक वस्तू वेळेवर दगा देते. आता काय? या भुताबरोबर बसण्यापेक्षा चाललेलं बरं. का आलो आपण या ट्रेकला? साधे पाच किलोमीटर कधी चाललो नाही ते थेट पंचवीस? सौम्याने सहज विचारलं, म्हणून 'हो' म्हटलं आणि आता रात्रीच्या गिच्च अंधारात या चढ्या कातळाच्या जंगलात या उर्मट प्राण्याबरोबर! चांगलं घरी गुरफटून झोपलो असतो. कपड्यांचा हा ढीग पडलाय घरी. रविवार लोळत/आवरत/गाणी ऐकत आरामात काढला असता. सोमवारपासून ऑफिस आहेच. दांडी मारणं शक्य नाही.

अनुच्या पावलांकडे आशुतोषचे सहज लक्ष गेले. ती रक्ताळली होतीच. ते पाहून त्याला थोडेसे वाईट वाटले. पण पुन्हा रागही उफाळून आला. च्यायला! हा शेवटचा ट्रेक. यापुढे ग्रूप नको आणि काही नको. एकटेच यायला हवे. फारतर एखादा मित्र. बेअक्कल नवीन लोकांना ट्रेकला येताना पायात नवेकोरे जोडे घालून येऊ नये, एवढंही समजत नाही? नशीब, बिनडोक पैंजण नव्हते दाक्षिणात्य मुलींसारखे पायात. एकतर पोरी असल्या, म्हणजे उगीच चांगलं वागायबोलायची शिक्षा. शांतपणे धड दारूही पिता येत नाही. फुकटची जबाबदारी आणि वरून यांचे नखरे आणि बडबड आणि पोरांची माकडं. हरामखोर साले, लाळ गाळणारे कुत्रे आणि त्या नटव्या पोरी. नशीब ही पोरगी जेवढ्यास तेवढी बोलते आणि नटवीही नाहीये. मूर्ख मात्र आहे.

एव्हाना वर पोचून खिचडी रटरट शिजवत ठेवली असती. सौम्या आणि आदित्यला तेवढी शुद्ध राहिली तर ठेवतीलही. अनायासे आपण नाही, म्हटल्यावर त्यांचं चांगलंच फावलं. त्यांच्या सध्या ओसंडून वाहणार्‍या प्रेमाने नाहीतरी बर्‍याच ट्रेक्सना वात आणला होताच. दोघांनीही 'नक्की कुठपर्यंत पोचले आहे प्रकरण?' याचा साला अजिबात सुगावा लागू दिला नाहीये अजून. लग्न करणारेत? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? आपल्या बापाचं काय जातं? पण आदित्यच्या चेहर्‍यावरचा सूक्ष्म माज पाहवत नाही. च्यायला! एवढ्या एकाच अनुभवामुळे त्याला माझ्यापेक्षा वरचढ वाटतं. आपण तर साला अजून कुठेच... काही नाही. एकाच वेळेस हवेसे आणि तिटकारा वाटणारे नकोसे, असे बरेच काही उद्दीपित का वाटते? सगळ्या जगाच्या चिंध्या कराव्याश्या वाटतात. स्वतःच्याही. स्वतःच्याच असल्या विचारांची साली भीती वाटते. नीलगिरीचे भुताट दिवस आठवतात... आजच भास्कर नाही आला, नाहीतर ही कार्टी त्याच्या भरवशावर सोडून मी तरी सुटलो असतो. भास्कर ढोरासारखं शनिवारी का काम करायला लागला आहे सारखा, कोण जाणे!

नाईलाजाने नुसतेच बसल्याबसल्या आशुतोषच्या मनातले सगळे विचार चंद्रप्रकाशात सैरावैरा धावत होते. ...शहरातील खुराड्यात आपला श्वास कोंडतो. उजाड माळरानातही. म्हणजे कुठेही जगात आपली अशी जागा नाही? सतत आत काहीतरी का तुटतं? काय तुटतं? आत काय सापडत नाही, जे आपण बाहेर शोधतो सतत? हरामखोर जग सालं स्वतःवर जाम खूष असतं. आपण तर दारूही पिताना मजबूरीसे पितो. पळे, दिवस, रात्री, वर्षे अशीच निघून जातील. आपण असेच कोरडेशुष्क! आपण नॉर्मल नाही, अशी बर्‍याच वर्षांपासून शंका वाटते. नॉर्मल लोकही तसे मॅडच वाटतात...

......वडलांच्या अंगणातले नीलगिरीचे अजस्र झाड आणि असंख्य चांदराती. झाड चंद्रप्रकाशात किंचित भेसूर दिसायचं, सोसाट्याच्या वार्‍यात अक्षरशः चवर्‍या ढाळल्यासारखे वाकून, लवून जायचं. चंद्र मुजोर. चंद्रप्रकाश इतका की, चेहरे वाचता यावेत. रात्रीच्या उष्ण वार्‍याच्या झोतांचा जोर इतका की, महाकाय नीलगिरीच काय चंद्रालाही फराट्याने उडवून लावेल. अशा रात्री कल्लोळ घेऊनच यायच्या. डोक्याचा भुगा! चंद्रप्रकाशाने एखाद्याला वेड लागावं आणि नीलगिरीनं वाकून खिजवावं. पानांची सळसळ मांत्रिकाच्या हातातल्या झाडूसारखी सपासप. कधी चंद्रप्रकाशानं तलखी होणं ऐकलंय? पण व्हायची. अंगाची काहिली, डोक्याचीही. विचारज्वर चढत्या रात्रीबरोबर चढत जायचा. डास मारतानाचा आवाज ऐकून दचकायला व्हायचं. मिटलेल्या डोळ्यांसमोर चंद्रबिंबानं भयानक पेट घेतलेला असायचा.
उष्णतेनं श्वास आणि अवयव इतके घेरायचे. तापलेल्या शरीराला पाण्यात लोटून त्यातच सुसरीगत पडून राहावंसं वाटायचं...

साला भास्कर XXXXXX! आणि आपण? आपण का काम टाकून रानोमाळ फिरतो सारखे? काय शोधत फिरतो? शिक्षणाची वर्षं गेली, नोकरी लागली तसे मोकाट सुटलो. नोकरी एकाच वेळी आवडते आणि नाहीही. सिस्टिम साली सडकीच असते. एका माणसाने तिथे काय फरक पडणार? कधी वाटतं, आपण एकटे बरंच काही बदलू शकतो. घरचे म्हणतायेत, बास झाली थेरं. 'अमेरिकेला जा. पुढे शिक.' यांना फक्त मुलगा अमेरिकेत गेला, म्हणून मिरवायला हवंय. अमेरिकेत जा, पण लग्न इथल्याच आमच्याच पसंतीच्या मुलीशी कर. का करू मी लग्न? अमेरिकेत जाऊन चांगली गोरी मुलगी गटवतो. नको! मग हे त्याच्यावरही भाव मारतील. मग काळी? नको, त्या हबशिणी दिसतात... चडफडत सभोवती पाहताना, सर्व विचारांचे तण एकत्र माजू लागले.

बसल्याजागी अनु जरासे इकडेतिकडे पाहू लागली. पाहण्यासारखे काही नव्हतेच. धाप कमी होऊ लागली होती, श्वास जरासा आटोक्यात येऊ लागला होता. आशुतोषकडे सोपवलेली सॅक तिने स्वतःकडे मागून घेतली, घटाघटा पाणी प्यायली.

हा कोण कुठला मुलगा? इथे कातळावर मी का लवंडले आहे अशी चांदण्यात? चांदण्यांच्या प्रकाशाने डोकं कसं काय दुखू शकतं? काय म्हणावं? ऊन लागतं, तसं शीतल प्रकाश लागला?
याच्या धूरकांड्या संपल्या वाटतं. बरं झालं! अशी निर्जन स्थळी एकटी, इथे एका मुलासोबत, रात्रीच्या वेळी... बापरे! धडधड वाढलीये! घरी कळलं, तर काही खैर नाही. आणि उगीचच बोंबाबोंब. होणार काहीच नाहीये खरंतर इथे. अश्या गोष्टी फक्त सिनेमात होतात. बहुतेक नक्की! मग सौम्या, आदित्य तिथे काय झिम्मा खेळतायेत का? यांना लाज कशी वाटत नाही? सौम्याला (आजीच्या भाषेत) दिवस राहिले आणि आपल्या घरी समजलं तर गहजब माजेल...

...गंमत म्हणजे सौम्याच्या घरी काहीच वाटणार नाही. तिची आई किंचित वेडसर, औषधांच्या अमलाखाली असली की, बरी असते. आपली आईही बेफाम रागात वेडसर असल्यासारखीच वाटते. तिचा राग कायमच आपल्या जन्माच्या कर्माला...
सौम्याच्या मते, "वो क्या बोलेंगे? वो खुद दोनो मैं पेटमें थी तब शादी बनाए. फिर पता नहीं क्या हो गया.. डैडी दारु पिने लगा और अम्मा नर्स की नौकरी करने लगी. याद नहीं, कबसे अलग रहने लगे... "
अशा वातावरणात ही मुलगी शिकली. आपली आपण नोकरी करते आहे. लफडंही. हा आदित्य शहा गुजराथी. मूलबाळ नाही, म्हणून एका श्रीमंत जोडप्यानं दत्तक घेतला. त्याची आई ही अर्धी ख्रिश्चन, परभाषिक सून पाहून हार्टअटॅकने मरून जाईल, असं हा रेडा तिला सांगत असतो. तिशीची सौम्या पंचविशीची दिसते फक्त. एकंदरीत 'मर्दोंकी जात'बाबत तिला त्यामानाने बरंच माहीत आहे. तिला आत्ता याक्षणी फक्त तो रेडा आदित्य आणि घर, मूल हवं आहे. 'कोणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं' असं आजीही म्हणायचीच.
सौम्याला आणि आजीला एवढे सगळे इतरांना मारायचे छद्मी शेरे माहीत असून त्यांनी नेमका स्वतःच्या बाबतीत उजेडच पाडला!

सतत बंद दाराआड हे दोघं नक्की काय करतात ? वैताग नुसता ! ऑफिसमधून लवकर घरी यायची म्हणून सोय नाही. खोलीचं दार बंद असतं. चुकून एकदोनदा आलो आपण लवकर, तर जिन्यात बसावं लागलं. बर्‍याच वेळानंतर दार उघडलं गेलं आणि चेहर्‍यावर ओशाळा आनंद... तेव्हापासून घरी लवकर यायचे नाही, हा कानाला खडा. ऑफिसात सतत उशिरापर्यंत बसून लोक लगटायला लागले, तसं घरी जायला भाग पडायला लागलं. रस्त्यावर, बागेत, रेस्तराँमध्ये, नेटकॅफेत बसून मग घरी यावं लागायचं. खूप श्रीमंत झाले की, स्वतःसाठी एक खोली घेणार, असं तेव्हाच ठरवून टाकलं. तिसरी रुमी साक्षी अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये. तिला एकदाही जागेपणी घरी येताना पाहिलं नाही. ती चुकून घरी असलीच, तर इतक्या कमी कपड्यांत असते की, मळमळायला लागतं. ती असली की, सौम्या रेड्याला घरी येऊच देत नसे. 'मर्दोंकी जात' म्हणे. साक्षीची मंद बडबड ऐकणे, भयंकर शिक्षा. तिच्या मागे कोण, कसं लागलं, याचीच वर्णनं ऐकावी लागतात... बाकी सौम्या आणि रेडा मांजरांसारखीच वागतात एकंदरीत.

आपण या घरात असेपर्यंत तरी सौम्याला दिवस नको राहू देत, अशी अनुने पुन्हा एकदा देवाला प्रार्थना केली. घर तसे मोक्याच्या ठिकाणी होते आणि पाण्याचा त्रास नव्हता. सौम्यामुळे हे घर सोडावे लागणे परवडणारे नव्हते. नेमकी उलट प्रार्थना सौम्या करत असे. (तरी बरं, देव वेगवेगळे असल्यामुळे नेमक्या विरुद्ध प्रार्थनांचे क्रॉसकनेक्शन होणार नव्हते.) एकदा का दिवस राहिले की, आदित्यला पळून जाऊन लग्न करण्यावाचून, घरी सांगण्यावाचून गत्यंतर उरणार नव्हते, असे तिला वाटत असे. तो रेडा लग्नाला तयार नाही झाला तर?
ही हिच्या आईसारखीच वेडसर होऊन मूल वाढवेल... बापरे!

सौम्याला दिवस राहिले, तर घरमालकीण आंटीला काय सांगणार, कप्पाळ? आंटीही थोडी मॅडच आहे. नवर्‍याच्या मालकीच्या घरांतील भाडेकरूंची बित्तंबातमी ठेवणे, दोन कुत्री, दोन पोरांच्या कागाळ्या सांगणे आणि कसले तरी प्राणायाम करणे हे तिचे छंद. 'क्या फरेस हो गई, बताऊं तुझे मैं' हे तिच्या गुरुमाँचे कौतुक ऐकावे लागत असे सतत.. आंटीच्या फासफूस श्वासांच्या आणि गुरुमाँच्या बोर गप्पांपेक्षा तर सौम्याची वेडसर आई चांगल्या गप्पा मारते.

एकदा सौम्याची वेडसर आई आली असताना अनु दोन दिवस प्रचंड तापाने फणफणलेली होती, तो प्रसंग तिला आठवला. सौम्याच्या वेडसर आईने अनुला तिखटजाळ रस्सम करुन दिले होते आणि डोक्यावरून हात फिरवला होता. आपल्या आईने जगाच्या अंतापर्यंत त्रागा करुन, तिचा सूड घ्यायलाच पोरगी आजारी पडली, असे म्हणून घर डोक्यावर घेतले असते, असे अनुला वाटले. मग आपल्या सततच्या आजारपणामुळे तिचा जीव कसा विटला, हेही नेहमीचे यशस्वी भाषण सतराशेबत्तीसवेळा केले असते आणि आपणही मुद्दाम तिच्यावर सूक्ष्म सूड उगवायला गोळ्या फेकून दिल्या असत्या. आपण आपल्या घरी नेहमी हवेसे असून नकोसे का असतो? की नकोसेच असतो?

रखरखीत रापलेला हात आणि खसाखसा घासून काढलेल्या म्हशीइतकी काळीशार तकतकीत त्वचा होती सौम्याच्या वेडसर आईची. दोरखंडाएवढे केस आणि पांढरे दात. खरंतर तिची आई, सौम्याला वाटे, तेवढी काही वेडी नाही, असे अनुला बहुतेक नक्की वाटे. ती असताना सौम्या अनुला हळूच सांगून गेली ऑफिसला जाताना, "अभी वैसे ठीक है उसका दिमाग, लेकिन यू टेक केअर, हाँ!" सौम्याची वेडसर आई सौम्याच्या आणि स्वत:च्या लहानपणीच्या असंबद्ध गोष्टी सांगत असे.
"माडम, ये लडकी देखो येकदम जिद्दी, चायल्डसे.. मेरेको, माडम, उसको हॅप्पी देखनेको मंगताय. मेरेको उसको नै होना था. मै बहुत बूँटी खाया, इसके लिये वो येकदम जिद्दी हुआ."
"आंटी, मुझे मॅडम मत कहिये, प्लीज! मै आपकी बेटीसे बहोत छोटी हूँ"
"माडम, मैं खाली टेन्थ पास डा, वो उसका कुत्ता डैडी भी. माडम आप येजुकेटेड, जरा सौम्या को बोलना मैं कितना प्यार करती उससे..." असे म्हणत गळा काढून ती रडत असे.

बापरे! बायका स्वतःचे मूल मारायला पाहतात आणि त्याच्यावरच प्रेम आहे म्हणतात? बाकी, सौम्याच्या वेडसर आईमुळे अनुला कसलेतरी अजोड शहाणपण मिळाले निश्चित! मनातला राग मेणबत्तीसारखा वितळू लागला. प्रचंड थकवा वाटला, तो न पेलवणार्‍या रागाच्या बोजड वजनाचा नव्हता. त्या वेडगळ बाईने इतके अश्रू गाळले आणि अनुने तिच्याबरोबर की, आतडी बाहेर येईलसे वाटू लागले तिला. दु:खावेगाची अतिरेकी झिंग चढली अनुला. त्या वेडसर बाईजवळ मनातले सल ओकून टाकून हलकेहलके वाटले. बाहेर रपारप पाऊस कोसळत होता आणि अनु आणि सौम्याची वेडसर आई प्राक्तनावर विसंगत अश्रू ढाळत होत्या. 'It was weirdly funny, except the joke was on us'... कित्येकदा वाटलेले अनुला पुन्हा वाटले. त्या वेड्या बाईने आपला राग दु:खात वितळवला. तो शरीराबाहेर आला.
काहीशी सूक्ष्म परतफेड म्हणून अनु सौम्याला नकार देईनाशी झाली.

आणि एका बेसावध क्षणी, कधी नव्हे ते पूर्ण शनिवार-रविवार एकटे रहायच्या भीतीने आपण ट्रेकला यायला होकार दिला. आता या भुताबरोबर इथे. हा रेड्याचा खास मित्र आहे आणि त्याच्याच बापाच्या कंपनीत आहे म्हणे! भूत तसा हुशार वाटतो, पण वागायबोलायला अतिउर्मट...
अर्धवट ग्लानीत तिने सॅक डोक्याखाली घेतली. डोळे आपोआप मिटले. लांब वेणी एखाद्या वेटोळ्या सर्पासारखी विसावली.

आशुतोष असे पाहणे योग्य नाही, असे स्वतःला बजावत, आणि तरीही हे कळून न कळल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. गव्हाळ वर्ण, शेलाटा बांधा, तरतरीत नाक, सरळ लांब केस. वेगळाच चेहरा. आपलाच उसासा त्याला अस्पष्टसा ऐकू आला. कूस बदलल्यासरशी तिच्या रेखाकृतीतले मुडपणारे कोन त्याला जाणवत राहिले. पुढे कित्येक वर्षं अनुचे हेच चित्र त्याच्या डोळ्यांसमोर झरकन येई. त्याचेही डोळे नकळत मिटले. किती वेळ झाला कोण जाणे. कधीतरी दोघांनाही व्यवस्थित जाग आली.

"चला जाऊ या पुढे?" दोघेही पुढे चालू लागली.
"केवढा उजेड आहे रात्र असूनसुद्धा. मला वाटलंच नाही कधी."
"तुझा पहिलाच ट्रेक ना? नंतर सवय होईल. चंद्रप्रकाश चांगला प्रखर असतो कधीकधी. आपल्याला घरबसल्या जाणवत नाही. अमावस्याही फार सुंदर असतात पण वे टू क्वाएट."
"आय कॅन इमॅजिन. तुला भयाण नाही वाटत?"
"नाही. सवय आहे. आवडही."
"सौम्या म्हणत होती, तू बर्‍याच ट्रेकना जाऊन आला आहेस", काहीतरी बोलायचे म्हणून तिने विषय काढला. फारसे तपशीलवार उत्तर अपेक्षित नव्हतेच.
"मला बॉर्डरलाईन ऋतू आवडतात. दोन ऋतूंच्या मधले. निसर्गाच्या मेंदू आणि हातांमध्ये तेव्हा सिंक्रोनायझेशन नसते." जागांबद्दल सांगता सांगता तो त्याच्याही नकळत वैशिष्ट्ये सांगू लागला.
"म्हणजे?"
"उदाहरणार्थ, अनंत चतुर्दशीनंतर छान हिरवंगार असतं. पाऊस कमी व्हायला सुरवात होते, आणि कुठेकुठे ऊन्हं चालू होतात. अंगावर ऊन आणि भोवती हिरवेपोपटी, काळेलाल रंग. फार वेगळं, अद्भुत वाटतं. रानफुलं फुललेली असतात असंख्य छोटीछोटी, पांढर्‍या, जांभळ्या, पिवळ्या रंगांची. मी सांगू नाही शकत नीट. तुलाच पाहायला पाहिजे ते."
उत्तर अपेक्षेबाहेर विस्तृत आले, तेव्हा तिने हळूच निरखून पाहिले. पण त्याचे हावभाव, बोलणे हे मुद्दाम छाप पाडण्यासाठी नाही वाटले तिला. संभाषण हळूहळू लय पकडू लागले, जराश्या परिचयाच्या सीमेवर येऊन ठेपले. एकमेकांच्या कामाच्या स्वरुपाची, जागा-शहरांची, घरादारांची औपचारिक, मोघम ओळख झाली. रेखाकृतीत तुरळक रंग भरले गेले.
______

"हाय आशुतोष!"
"येस?"
"मी अनु."
"सॉरी?"
"अनुराधा कुलकर्णी. सौम्याची मैत्रीण. आपण ट्रेकला भेटलो होतो."
"ओह! मी कामात आहे आत्ता. तुला नंतर फोन करतो. रात्री. उशीर होईल."
"चालेल."
रात्री फोन आला त्याचा साडेदहाला. सौम्या होतीच मलूल पडलेली. आता हिच्यासमोर कसे बोलणार? अनुही दिवसभराच्या कामाने दमली होती.
दबक्या आवाजात ती म्हणाली, " बोलायचे आहे महत्वाचे..."
"काही काम होतं का?"
"कॅन यू मीट मी टुमॉरो? माझे पर्सनल काही काम नाही. सौम्याबद्दल बोलायचे आहे. अर्जंट आहे."
"ऑफिसमध्ये भेटू शकतो आपण."
"नाही नाही, तिथे नको ...."

जागा ठरली एकदाची. भर वस्तीतले ठिकाण, पुरेसा पण फारसा नसलेला एकांत, खूप विचार करुन तिने जागा सुचवली.
नेहमीपेक्षा बर्‍याच बर्‍या अवतारात अनु तिथे पोचली. अनुला पाहताक्षणी आशुतोषला वाटले, हिचा चेहरा अगदी हिचा आहे. हा चेहरा हिलाच शोभून दिसतो.
एवढे लक्षात आल्यामुळे तो संकोचून तुटकपणे म्हणाला, "बोल, काय काम होतं?"
त्याच्या तुटक सुराने अनुचा अगदी संताप झाला. तिने मनातील सर्व योजिलेले संभाषण गिळले आणि अतित्रासिक त्रोटक सुरात म्हणाली, "सौम्या बहुतेक प्रेग्नंट आहे, असे मला वाटते आहे. तुला काही कळले का आदित्यकडून?"
"........"
त्याचा फाडकन मुस्काटात बसल्यासारखा झरकन पडलेला चेहरा पाहून तिला जरा सूक्ष्म समाधान मिळाले.
थोडे सावरून, बर्‍याच वेळानंतर आणि चारेक सिगरेटींनंतर त्याने विचारले, "तुला नक्की माहिती आहे?"
"हो. बहुतेक नक्की. म्हणजे पुस्तकं वाचून वगैरे.... मला थोडीशी खात्री आहे.."
"हिंदी सिनेमांसारखे नाही ना काही तुझ्या डोक्यात?"
"तेवढी अक्कल आहे मला आशुतोष!"
"ओके चिल..!"
"मॉर्निंग सिकनेस, फोलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, प्रकृतीची काळजी घेणे.. वगैरे पाहून मला वाटते आहे. आणि ती जास्त खाऊ शकत नाहीये.... खूप विचित्र वागते सध्या. कधीही चिडते, रडते... आदित्यशी भांडते. फार अस्वस्थ असते. मग पुन्हा रडत बसते. इट्स हॉरिबल. मी तिला असं कधीच पाहिलं नाहीये... आदित्य लग्न करेल ना रे तिच्याशी? अशा अवस्थेत काय करेल बिचारी...."
"अनु, यातली अर्धीतरी लक्षणं सर्वच मुलींना लागू होतात, च्यायला!"
"व्हेरी फनी!"
"लग्नाचे मला काय माहीत? मला तर प्रकरण इथपर्यंत पोचले हे ही माहीत नव्हते", दूर इतर लोकांकडे पाहत तो म्हणाला.
"आशुतोष, तू विचारशील का त्याला?"
"पण ती प्रेग्नंट नसली तर?"
"अरे पण प्रेग्नंसीचा इथे काय संबंध? आदित्य तिला फसवेल, याची मला फार भीती वाटते आहे."
"पण तिला अक्कल नको का? तू यात कशाला पडतेस अनु ?"
"आणि आदित्यची अक्कल? त्याची काहीच जबाबदारी नाही?"
"अगं पण त्याचे काय जाते मजा मारायला?"
"आय कांट बिलीव यू सेड धिस, आशुतोष..."
"ओके. सॉरी. मला असे म्हणायचे नव्हते.."
"तुला तसेच म्हणायचे होते आणि ते तू म्हटलेस. अँड दॅट वॉज चीप."

रागारागाने स्वतःचे पैसे टेबलावर ठेवून ती निघून गेली. आशुतोष पहात राहिला. सौम्याच्या बातमीने अश्वत्थाच्या फांद्यांवर सणसणीत प्रहार व्हावा, तसे त्याचे झाले होते. भकाभक वीसएक सिगरेटी फुंकून झाल्या आणि अखेर त्यालाच असह्य झाले, तेव्हा तो उठला. पुढची सगळी कामं रद्द करुन तो इकडेतिकडे फिरत राहिला. गर्दीची, महानगरांची, मानववंशसातत्याचीच त्याला किळसमिश्रित कीव आली. सगळीच चिवडाचिवड चाललेली होती. अजून त्याला स्वतःचेच काही प्रयोजन नीटसे आकळत नव्हते. त्यात या पोरीने अजून बाँब टाकला. आयला! मरेनात का सौम्या-आदित्य! हिला काय करायचे आहे?

लहान बाळं ही तशीही त्याला झुरळांसारखी कटकट वाटत असत. पण असे म्हटले, तर लोकं दुखावत, म्हणून त्याने म्हणणे सोडून दिले होते. ज्यांच्या मोठ्या बहिणी घरी बाळंतपणाला येत, त्यांचे विस्कळित अनुभव ऐकून त्याची किळस अजूनच पक्की झाली होती. आपण सगळे जग बंद काचांआडून मूक पाहत बसतो आणि तरी कसलेतरी दु:ख करतो, हे त्याला प्रामाणिकपणाच्या एखाद्याच झटक्यात स्वतःशी कबूल करता येत असे. अर्भकाची वाढ ते स्त्री-पुरूष हा विस्तारित पट त्याला समजूच शकत नव्हता. त्याच्या लेखी सगळे विलग होते. एकाशी दुसरे कसलेही, काहीही गुंफलेले नव्हते.

अनुला प्रचंड, अतोनात संताप आला. तरातरा निघून आली असली, तरी 'जायचे कुठे?' हा प्रश्नच होता. आशुतोषच्या कोडगेपणाने ती भ्यायली. त्याने बोलून दाखवलेले सर्व विचार तिच्याही मनाला स्पर्शून गेलेच होते, पण सौम्याच्या येणार्‍या बाळाची या सगळ्यांत काय चूक, त्याचे आयुष्य काही केल्या खराब होता कामा नये, असे तिला प्रकर्षाने वाटू लागले होते. का, ते तिलाही नीट सांगता आले नसते. नुसतेच डोळ्यांसमोरची सौम्याची असह्य तडफड पाहत राहण्यापेक्षा आपण काहीतरी.. काहीही केले पाहिजे, एवढेच तिला समजले होते. सौम्याच्या मानाने, कितीही नाही म्हटले तरी, आपल्या घरचे वातावरणही तसे बरे होते, असेही तिला कुठेतरी जाणवत चालले होते. सगळे प्रश्न अनुभोवती फेर धरून मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारल्यासारखे घोंघावत होतेच, पण त्यांची उत्तरं शोधायची ताकद तिच्यात नव्हती. शिवाय सौम्याचे पोट वाढेल, तसतसे लोक काय म्हणतील, ही भीती आणि त्याचा सर्वांत जास्त त्रास तिलाच होणार होता... या सगळ्या गोंधळात तिला प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल, मुलांबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं हा विचार करताच येत नव्हता. त्या खर्‍याखोट्या कडुगोड कल्पना आणि हे थेट वास्तव यांची सांगड घालता येत नव्हती. हे वेगळं आणि ते वेगळं इतपतच तिची झेप होती !

बस पकडून ती समुद्राकाठी येऊन बसली. डोळ्यासमोर लाटांचे लवलवते अथांग दिसले की, तिला नेहमी काहीतरी सुचत असे. कळकट, राखाडी समुद्राची (लाटासुद्धा 'आदतसे मजबूर' म्हणून आदळत!) सवय इतकी की, कुठल्याही जाहिरातीतल्या चित्रांतला स्वच्छ सूर्यप्रकाश, तकतकीत ऊन, निळेशार आकाश, रजनील पाणी तिला तद्दन खोटे वाटत. गचगच घामट गर्दी, वाहनांचा कोलाहल या अविरतात तिला आपल्या अस्तित्त्वाची तेवढी भीती वाटत नसे. घाणीच्या, कागदाप्लॅस्टिकच्या बोळ्यांच्या, विष्ठांच्या, कावळ्यांच्या शाळांच्या, कलकलाटांच्या, भेळेच्या चाळवणार्‍या चवीच्या महानगरी बकालियतेच्या खारट तुरट संध्याकाळी तिला आश्वासक परिचयाच्या वाटत. भगभग दिवे पेटायला लागले रस्त्यावरचे की, चला एक दिवस संपला, आता उद्या.. ही जाणीव प्रबळ होई. कालरथचक्राच्या विराट आवर्ताचे एखाद इंच पुढे सरकल्यासारखे तिला वाटे. तिच्या सगळ्या कॅलेंडरांवर फुल्या असत.
सौम्या म्हणे, "अनु, रोज क्यूं क्रॉस लगाती हो कॅलेंडरपे?"
"ऐसेही.. आदत है.."
______

अश्वत्थाची सगळी फांद्यामुळं उघड्यावर बोडकी पडली होती, झुरतवाळतझगडततडफडत होती आतल्याआत, अस्वस्थ सळसळत होती, रुजवात कशाचीच नव्हती. आयुष्याची आजवरची तशी सरळसोट गणितंच कशीबशी सुटत होती तिथे अचानक एक नवी मिती... अनु आणि आशुतोषला जीव तोडून, दातओठ खाऊन काहीही समजत नव्हते, हाती लागत नव्हते.

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा
गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसंततानि
कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥१५- २॥
______

Anu, I'm sorry
Tx 4 the msg
लोक असे धेडगुजरी लिहित, तेव्हा आशुतोषला अत्यंत अस्वस्थ वाटत असे. तरीही त्याने पुढे लिहिले.
Can you meet me tomorrow?
N
Day after?
Wht 4
Please..
या पूर्ण लिहिलेल्या शब्दाने गंमत वाटून अनुने शेवटी होकार दिला. नाहीतरी तिला मनातून त्याला भेटायची इच्छा होतीच. अलिकडे सौम्याच्या कोरड्या उलट्यांचे आवाज वाढले होते (साक्षीच्यासुद्धा लक्षात आले होते!) आणि तिला रात्रीपासूनच सकाळची भीती वाटू लागली होती. आपल्यापरीने थोडी मदत म्हणून अनुने स्वयंपाकाचे काम रोज करायचे अंगावर घेतले होते. तिला इंटरनेटवर गर्भारपणातील आहाराविषयी वाचताना पाहून टीममधले लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. 'मेरी बहन... गाँव में है... उसके लिये' अशी थाप तिने मारली. शेवटी एका कायम घरी लवकर जाणार्‍या आणि सतत कामांना टांग मारणार्‍या भोचक, चप्पवेणी काकूने तिला ३-४ पाककृती दिल्या. या बाईचा अनुने इतका रागराग केला होता की, तिला मनोमन फारच शरम वाटली. आपल्याला सर्वस्वी अपरिचित जगाच्या विराट व्याप्तीची झलक तिच्यापुढे उभी ठाकली. तशी, व्यक्तींना अनेक मिती आणि कंगोरे असतात, याची तिला पुसटशी जाणीव झाली. मग 'हाच न्याय आपल्याही घरातील व्यक्तींना लागू होऊ शकतो का?' या प्रश्नाने तिला कापरे भरले. छे! आपल्यावर मात्र अन्यायच झाला, पूर्वीचे सगळे नकोच ते काहीही.. आपला अख्खा भूतकाळ आपण एका फटक्यात पुसून टाकू शकतो. भूतकाळाची तशीही काही गरज नसते...

______

एकदम कानांपर्यंत कापलेले केस. रोजच्या पाहणीतल्या चित्रातले सारे रंग एकदम बदलून जावे, एवढा धक्का त्याला बसला.
त्याचा चेहरा पाहून, दया येऊन तिने 'कापून टाकले' एवढेच सांगितले. मनातून तिला स्वतःलाही कापलेले केस पाहून प्रचंड रडू फुटले होते. 'नक्की कापायचे आहेत? घरी विचारले आहे का' असं आगाऊपणे विचारणार्‍या बाईमुळेच खरंतर इरेला पेटून, तिने रागारागाने 'शक्य तेवढे कमी करा' असे ठणकावून सांगितले. घरी हाहा:कार माजेल आणि मजा येईल, हेही तिच्या डोक्यात होतेच. आणि असे सर्व सूक्ष्म सूड मनाजोगते उगवूनही पुन्हा मनात ती 'लाटांची अविरत लपलप' का होते, ते तिला समजत नसे. पण थांबवावे, असे ठरवूनही थांबता येत नसे. आणि असे वागूनही आपल्या वाट्याला कौतुक यावे, या स्वत:च्याच अपेक्षेचाही तिला रागराग येई.

"मॅड आहेस का तू? का कापलेस पण?", असे फटकन निघून गेले त्यासरशी तो चपापला. बापरे! आता ही पुन्हा उठून जाणार की काय?
पण अनु कुठल्यातरी विचारात गुंगलेली वाटली त्याला. म्हणूनच बहुतेक आपण वाचलो, हेही त्याला जाणवले.

"अनु, सौम्याचे आपण काय करूया?"
('आपण' म्हणे!) हा राग गिळून तिने त्याला सौम्याच्या तब्येतीचे हालहवाल सांगितले.
"तू घर बदलतेस का?"
"आँ?" (हा विचार बर्‍याचदा स्वतःच केल्यामुळे तिला आशुतोषवर अप्पलपोटेपणाचे आरोप करवेनात.)
"तू आदित्यशी बोललास का?"
"अं S नाही.. मला वाटतं आपण यात पडायला नको."
"हे सांगायला तू मला इथे बोलावलंस?", तिचा जरासा रडकुंडीला आलेला सूर पाहून आशुतोष जरा वरमला. खरं म्हणजे त्यालाही काही कळत नव्हतं नीटसं. त्यानेही इंटरनेटवर भरपूर माहिती वाचण्याचा प्रयत्न केला होता. "क्या कर रहा है साले तू? तेरी तो बहोत तरक्की हुई यार. आजकल तू वैसे भी चकाचक दिखने लगा है. क्या बात क्या है...", वगैरे शेरे यायला लागले, तेव्हा त्याने वरमून वाचणे बंद केले होते. मग आदित्यचे बोलणे, भांडणे तो कान देऊन ऐकू लागला. आदित्यचे बाहेर जाऊन फोन करणे वाढले. फोन न घेण्याचेही प्रमाणही वाढले. सौम्याचे फोन अधूनमधून "आदित्य दिसतो आहे का केबिनमध्ये?" असे विचारण्यासाठी आशुतोषला येऊ लागले. आदित्यची चांगलीच फाटल्याचे त्याला जाणवू लागले. आदित्यच्या हेतूंविषयी विचार करकरून त्याचे डोके शिणू लागले. आणि आदित्यने दगा दिलाच तर आपण नक्की काय केले पाहिजे, हे त्याला कळेनासे झाले.

मध्येच त्याला आई आठवू लागली. आपण पाहिलेली नात्यांतली शेवटची गर्भार बाई कोण, हे आठवायचा तो प्रयत्न करु लागला. त्याला काहीच नीट आठवेना. झरझर झरझर आपला गोतावळा, लग्नमुंजीबारशीकंटाळे त्याला आठवू लागले. हे ते सर्व आपलेच घराणे? नक्की? मग आपल्याला कोणाबद्दलच विशेष काही का वाटत नाही?
अश्वत्थाने आपली फांद्यामुळे तपासून नक्की जागेवरच आहेत की नाही याची खात्री करावी, असे त्याचे झाले. आईचा आपण पोटात असतानाचा डोहाळजेवणाचा कृष्णधवल फोटो त्याला आठवला. खरं म्हणजे ती त्यात मॅड दिसायची, असे त्याला वाटे. पण नेमका हाच कित्येक वर्षांत न पाहिलेला फोटो त्याच्या डोळ्यांसमोर आला. पाठोपाठ आई... आणि तिची सततची लगबग, धडपड त्याला आठवली. अतिशय तीव्रतेने! आईच्या आठवणीने घेरल्यामुळे अस्वस्थ होऊन त्याने अनुला एसेमेस केला. हे सगळे अर्थातच तो तिला सांगणार नव्हताच. काही झाले तरी आईचे लग्न झाले होते तेव्हा. त्याला नैतिकतेचा एक क्षीण आणि सोयिस्कर झटका आला. च्यायला! आपला कधीपासून लग्नावर एवढा विश्वास? आणि काही झाले तरी सौम्याला एकटे कसे सोडणार? हे जाणवताच मात्र तो सुरुंगाच्या स्फोटाच्या आसपास असावासा अंतर्बाह्य दचकला. विचारानेच कानठळ्या बसल्या त्याच्या.
"अनु, ऐक.. हे... बरोबर, म्हणजे.. मॉरल... नाही."
"कोणासाठी? फक्त सौम्यासाठी? आणि आदित्यसाठी रे? त्याने टांग मारली तर त्याला म्हणशील का हेच?"
"पण त्रास कोणाला होणार शेवटी? मुलीनेच जपून रहावे... नाही म्हणजे.. असे म्हणतात ना आपल्याकडे.", हे वाक्य त्याच्या स्वतःच्याच कानाला इतके गुळमुळीत लागले की, यावेळेस आपणच इथनं तडक चालते व्हावे, असे त्याला वाटू लागले.

अनुचा फोन वाजला, तसा त्याने पुन्हा सुटकेचा नि:श्वास टाकला. तिच्या बोलण्यावरून कुठल्यातरी घरदलालाचा फोन वाटत होता. म्हणजे, ही खरंच घर पाहते आहे? पण मग सौम्याचे काय होईल? अशी लख्खं भीती उभी कापून गेली त्याला.
तिकडे ती म्हणत होती, "मैं अभी नहीं आ सकती, आपने थोडा पहले बोलना चाहिये था."
"अनु, त्याला सांग आम्ही येतो."
"अरे पण..."
"सांग. मीही येतो तुझ्याबरोबर."
संभाषण संपवून ती उठली.
"तू आलंच पाहिजेस, असं काही नाही आशुतोष. डोन्ट फील ओब्लाईज्ड. मी जाईन एकटी.."
"मला तसेही काही काम नाहीये. मी येतो. रस्त्यात बोलू या."

रिक्षेच्या आवाजावर आवाज काढून, गोंगाटाच्या वर ओरडून बोलण्यात दोघांनाही रस नव्हता. अनुचे कापलेले केस वार्‍याने उडून पिंजारले होते. तिच्याशी वाढत्या परिचयाची तशीही त्याला ओढमिश्रित कटकट वाटू लागली होती अलीकडे, तशी पुन्हा वाटली. पिंजारल्या केसांच्या मुलींबद्दल आईचे मत काही चांगले नव्हते. ते आशुतोषला आठवले. हिचे आडनाव काय? म्हणजे तशी ठीक वाटते.. अशा विचारांकडे जाणार्‍या मनाला त्याने फटकारले. अनुसमोर 'गर्भपात' हा विषय कसा काढायचा, याचीही चिंता होती. त्यात ते आडनावाचे मागे पडले..

घर आले. तुपट चेहर्‍याचा घरदलालही खोटं हसत आला. चिंचोळा जिना, अपुरा प्रकाश, भगभग बल्ब. दाखवायच्या खोलीला कुलूप लावून ठेवलेलं. त्या खोलीव्यतिरिक्त तिथे तीन खोल्या आणि तीन टोणगेही.
त्यांना पाहूनच आशु-अनु हबकले.
"आईये मॅडम. चकाचक पूरा अलग कमरा हैं, देखिये.", कुलुप काढता काढता घरदलाल म्हणाला.
तेवढ्यात तिघा धटिंगणांपैकी एकाने अनुला वरपासून खालपर्यंत व्यवस्थित पाहून, खास जोखून घेतल्याचे आशुतोषच्या लक्षात आले. त्याच्या डोक्यात तीव्र तिडीक उठली .
"नहीं चाहिये ये कमरा", असे म्हणून तो तावातावाने खाली उतरला. अनुही त्याच्यापाठोपाठ खाली उतरली. एकीकडे त्याच्या बोलण्याने किंचित सुखावली आणि एकीकडे तिला वाटले, याला डिवचायला तरी खोली व्यवस्थित पाहायचे नाटक करायला हवे होते. ती स्वतःही खरं म्हणजे चांगलीच घाबरली होती...
"मी तुला घरी सोडतो. रस्त्यात बोलू."

"अनु, तू सौम्याबरोबर डॉक्टरकडे का जात नाहीस?"
"कशासाठी?.. तशी ठीक वाटते आहे तिची तब्येत."
"अबॉर्शन", ऐनवेळेस इंग्रजी शब्दाने त्याला तारले. मराठीत बोलायची हिंमत नव्हती त्याची, "ते पेनलेस असतं म्हणे. मी वाचलं इंटरनेटवर."
"मीही वाचलं. पण... ते बरोबर नाही. सौम्या कधीच तयार होणार नाही. तसेही त्यांच्यात पोटातलं बाळ मारत नाहीत.."
"ते बाळ नसतं.. म्हणजे तितकं मोठं झालेलं नसतं.. फीटसला काही जाणवत नाही..", आता आशुतोषला याहून जास्त जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देणे अशक्य झाले... फीटसबद्दल विचार करणेच त्याने टाळले. शिवाय अनुला ते किंचितही पटलेलं दिसत नव्हतं.
पुढे बोलण्यासारखं काही नव्हतं. दोघेही आपापल्या विचारात आणि वाहनांच्या गोंगाटात घरापर्यंत न बोलता आले.

अनु त्याला धन्यवाद देऊन उतरली आणि रेड्याची गाडी दिसली, म्हणून पुन्हा येऊन रिक्षात बसली.
"आशुतोष.. आदित्य असणार घरी आत्ता. मी जाऊ शकत नाही"
शेवटी दोघं एका हॉटेलात बसली.
"तू काय केलं असतंस रे?"
"मी? मी असल्या भानगडीत पडलोच नसतो. तू?" हे म्हणतानासुद्धा आपल्याला आदित्यच्या डेरिंगबाबत किंचित आदरमिश्रित भय आणि सूक्ष्म असूयाही वाटते, हे त्याच्या लक्षात आले.
"अंSS नक्की नाही सांगता येत."
"काहीही काय उत्तर देतेस? तूही असल्या भानगडीत पडली नसतीस."
याला काय माहीत दीडशहाण्याला, असे तेवढ्यातल्या तेवढ्यातही तिला वाटलेच. थोड्याफार इकडतिकडच्या गप्पा ओढूनताणून मारणे चालू होते.
"तू सौम्याला कधीपासून ओळखतेस?"
"फार नाही.. आठएक महिने. या घरात रहायला आले तेव्हापासून. तू?"
"आमच्याच तर ऑफिसमध्ये होती. आदित्यच्या बा.. वडलांची साहाय्यक होती. त्या दोघांचे जमले, तेव्हा त्याच्या वडलांना कळले. त्यांनी थयथयाट केला. मी आदित्यला बरीच मदत केली त्याच्या वडलांच्या नकळत. सौम्यालाही नवीन नोकरी शोधायला मदत केली."
"मग तू एवढा ओळखतोस तर बोल ना त्याच्याशी सरळ."
"पाहूया.."
______

मध्ये महिना गेला. चॅट, एसेमेस वाढत चालले होते. वाढते भवबंध ...'केवळ सौम्यासाठीच' अशी सोयिस्कर समजूत सहेतुक कायम केली जात होती.
अचानक एक दिवस आशुतोषचा फोन वाजला.
"हाय आशुतोष, मला महिन्याभरासाठी देशाबाहेर जावं लागतं आहे. आत्ताच सांगण्यात आलं. तसेही तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट आज सांगायची होती."
"तू एकटी कशी जाशील?"
"आशुतोष... कमॉन!"
"ओके सॉरी. म्हणजे..."
"ते जाऊ दे. फार महत्त्वाची बातमी सांगायची होती तुला. सौम्याने... काल मला सरळ सांगितलं की, ती प्रेग्नंट आहे. तीन महिने झालेत म्हणे. आदित्यने तिला प्रॉमिस केलं आहे की, तो लवकरच घरी सांगणार आहे आणि घरच्यांनी ऐकले नाही, तर घर सोडणार आहे. त्या दोघांनी गुपचुप लग्न केलंय म्हणे, पण काही कागदपत्रं नाहीत..."

धोधो वृत्तांत त्याच्या कानी आदळला. एकाच वेळेस सगळी विचारचक्रं, सगळे संभ्रम.. वावटळ. त्यातली अर्धी वाक्यं निसटून गेली.
".......मी परत येईपर्यंत तू सौम्याला मदत करशील का? तिची काळजी घेशील? प्लीज?"
"कोण? मी? अगं पण.."
पुढे बोलण्याआधीच तिला कोणीतरी हाक मारली. "आशुतोष, अजिबात वेळ नाही. आपण इमेल करतच राहू. मला खूप धावाधाव करायची आहे. I am counting on you to take care of Soumya. OK?"
"अजून तुला जायला तर दोनतीन दिवस असतील ना. भेटायला हवे."
"खरंच वेळ नाही रे. व्हिसा, परकीय चलन, धावाधाव, सामान आणि घरीही जाऊन यायचे आहे तेवढ्यात."
"घरी काय सांगणार आहेस?"
"..अं.. सध्यातरी काही नाही."
"मग देशात परत आल्यावर? किती दिवस लपवणार?"
"माहीत नाही. सध्या काहीच ठरवलं नाही.... नंतर पाहू.. पण आपले तरी मदत करायचे ठरले ना नक्की?"

नक्की कसे ठरले, ते दोघांनाही सांगता आले नसते. I doubt, therefore I think, therefore I am! सौम्यासाठी जमेल तसे काहीतरी करायचे ते निव्वळ तिच्यासाठी, तिच्यात रुजलेल्या अंकुरासाठी, अगदीच गळ्याशी आलेल्या निरुपायाचा नाईलाजाने स्वीकार म्हणून, एकमेकांच्या किंचित सहवासाच्या सुप्त ओढीसाठी की आणखी कशासाठी ? ठरले खरे! नीतीअनीतीलोकापवादाचे सोयीस्कर घोंगडे बाजूला पडले थोडेसे.. सर्व संभ्रमांसकट नवीन मिती नाईलाजाने गवसली...

- रैना