चांगदेव चतुष्टय

चांगदेव पाटलाचा उल्लेख आला की हमखास पांडुरंग सांगवीकरशी गल्लत होते. अनेकांना चांगदेव हा 'कोसला'तील पांडुरंगचाच पुढला प्रवास वाटतो. याचे प्रमुख कारण म्हणजे नेमाडे आणि 'कोसला' हे समीकरण अतिशय घट्टपणे डोक्यात बसलेले असणे आणि दुय्यम कारण म्हणजे पांडुरंग आणि चांगदेव ही खणखणीत मातीच्या रंगाची नावे असलेले नायक. पण या दोन व्यक्तिरेखा एकमेकांपासून सहस्र योजने दूर आहेत.

border2.JPG

image_copy.jpg

सी.

ए. पाटील. चांगदेव पाटील. खेड्यात, भल्या मोठ्या वाड्यात, खंडीभर माणसांच्या कुटुंबात, अर्धवट लुच्च्या पण कष्टाळू आणि धूर्त-व्यवहारी पण पोकळ प्रतिष्ठेच्या मागे असणार्‍या बापाचा, मुंबईत जाऊन विदेशी - म्हणजे खरंतर पाश्चिमात्य व्यक्तिवादी - मूल्यांच्या आधारे इंग्रजीत एम.ए. केलेला मुलगा. एम.ए.ची मुंबईतली दोन वर्षे व त्यानंतर नोकरीची - तीन वेगवेगळ्या गावी घालवलेली - तीन वर्षे, असा पाच वर्षांचा एकूण प्रवास म्हणजे चांगदेव चतुष्टय. मुळे घट्टपणे शेतीत, खेड्यात, प्रचंड अडगळीच्या वस्तूंनी भरलेल्या संस्कृतीत रुतलेली तर पौगंडावस्थेपासून अतिशय संवेदनशील मनावर विविध कलाविष्कारांच्या, विशेषतः साहित्याच्या, माध्यमातून ओळख झालेल्या विविध संस्कृती, त्यांतील विचारधारा, त्यांतली मूल्ये यांचा झालेला संकर, यांनी चांगदेवला हलवून-भेलकांडून सोडलेला. त्यातच स्वातंत्र्य फोल ठरवत, जातींची गुंतवळ घट्ट करत जाणारी राजकारणाची दिशा, समाजात पडणारे तिचे प्रतिबिंब, अव्यावहारिक शिक्षण देणारी धंद्यासाठी काढलेली खंडीभर कॉलेजं आणि असली कॉलेजं चालवायला लागणारे खंडीभर मास्तर पैदा करणार्‍या यंत्रणेत पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून आणि नंतर मास्तर म्हणून चांगदेव आपल्याला बिढार-हूल-जरीला-झूल ह्या चार कादंबर्‍यांतून भिडत जातो.

चांगदेव पाटलाचा उल्लेख आला की हमखास पांडुरंग सांगवीकरशी गल्लत होते. अनेकांना चांगदेव हा 'कोसला'तील पांडुरंगचाच पुढला प्रवास वाटतो. याचे प्रमुख कारण म्हणजे नेमाडे आणि 'कोसला' हे समीकरण अतिशय घट्टपणे डोक्यात बसलेले असणे आणि दुय्यम कारण म्हणजे पांडुरंग आणि चांगदेव ही खणखणीत मातीच्या रंगाची नावे असलेले नायक. पण या दोन व्यक्तिरेखा एकमेकांपासून सहस्र योजने दूर आहेत. पांडुरंग ही 'एका विशीतल्या, खेड्यातून शहरात येऊन शिकतानाच्या झंझावातात आयुष्याचा अर्थ शोधत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या व पराभूत होऊन आत ओढल्या गेलेल्याची' गोष्ट आहे. ती अत्यंत स्वकेंद्रीत, केवळ पांडुरंगाच्या मनोव्यापाराचा शोध घेत व आजूबाजूच्या घटनांचा, स्थळकाळाचा केवळ तदनुषंगाने (incidental) आधार घेत पुढे गेलेली कहाणी आहे. चांगदेव याविरुद्ध जगाला भिडत, झगडत, आयुष्य स्वत:च्या निकषांवर तपासत, तत्त्वांवर तोलत जगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्याच्याच अर्धवट संस्कृती-संयोगातून वाढलेल्या मूल्यव्यवस्थेत तो भरडला जातो. 'जरीला'मध्ये येणारा त्याचा मुलगी बघायला जाण्याचा प्रसंग हा या सगळ्याचा परिपाक आहे. तिशी जवळ आलेल्या त्याच्या शरीराला सहन होत नसलेली स्त्रीसुख-स्त्रीसहवासाची अनुपलब्धता, कुटुंबव्यवस्थेच्या, लग्नसंस्थेच्या पायावर घट्ट उभ्या असलेल्या समाजव्यवस्थेमधले त्याचे कारेपण हे त्याच्या मनाला लग्नासाठी तयार करत जाते. पण मुलगी बघायला गेलेला असताना त्याच्या आत्याच्या नवर्‍याचे फुकट एका रात्रीचा मुक्काम उपटण्यासाठी बकाल ठिकाणी राहणे, घाणेरडे-अस्वच्छ गाव, त्यात राहणार्‍या लोकांना त्याचे काहीच वाटत नसणे याची त्याला चीड येऊ लागते. आणि शेवटी 'एकदा बघून, केवळ सुंदर आहे म्हणून, झोपायला हक्काची व बरोबर कुणी हवे म्हणून करुन घ्यायची बायको' या दाबून ठेवलेल्या विचारांनी उसळी मारता तो हादरून जातो. आपल्या अवताराकडे मुद्दाम दुर्लक्ष करत, ढगळ मनिला आणि चुरगळलेली पँट घालून तो ती मुलगी पहायला जातो व स्वत:चे हसू करून घेतो. आता हा मनिलासुद्धा त्याने चांगले कापड विकत घेऊन मुद्दामहून बाजारातल्या एका साध्या शिंप्याकडून, ज्याच्याकडे पायजमे-सदरे शिवणे व चोळ्यांना दंड लावून देणे यापलीकडे इतर काही काम होत नाही, तो शिंपी नाही-नाही म्हणत असताना शिवून घेतलेला. त्या शिवून घेण्यामागे चांगदेवला असलेला मोठ्या चकचकीत दुकानांचा राग, त्या शिंप्याचे रस्त्यावरून उंच आत दिसणार्‍या सोप्यावरचे मशीन, त्या मशीनच्या सभोवताली असलेले त्याचे कुटुंब आणि त्यातला रोमँटिकपणाच जास्त कारणीभूत आहे. खेड्यातली साधी राहणी त्याला रोमँटिक वाटत राहते तर तिथल्याच जातीपातींनी बरबटलेल्या समाजजीवनाचा तो मनापासून तिरस्कार करत राहतो. अशा अनेक अंतर्गत विरोधाभासांनी तो पार वैतागून, झिजून जातो.

चतुष्टय लिहिले गेले सत्तरच्या दशकात. लक्षात घ्या की, तेव्हा मंडलचा उगम व्हायचा होता, मराठा-दलित अशी ब्राह्मणविरोधी युती करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू व्हायचे होते. पण या दिशेने होणारा प्रवास, त्यामागची विविध जातींतील, थरांतील लोकांची भूमिका नेमाड्यांनी फार बारकाईने आणि मुख्य म्हणजे अचूकतेने मांडली आहे. नेमाडे एक लेखक म्हणून कुठेही प्रचारकी भूमिका घेत नाहीत, तर केवळ एक प्रेक्षक बनून ते सर्व मते वेगवेगळ्या पात्रांमार्फत पुढे ठेवत जातात. अर्थात हे मांडताना कुठेही 'बघा मी कशी सर्व मते निष्पक्षपातीपणे मांडतोय' असाही अभिनिवेश नाही की चतुष्टयाचा त्यापायी माहितीपटही होत नाही. इथे नेमाड्यांनी घेतलेली शैलीवरची (craft) मेहनत दिसून येते. संपूर्ण कादंबरीत वर्णने, संवाद कुठेही अडखळत नाहीत, अवघडत नाहीत. त्यांचा प्रवाह अगदी नेमका आहे. एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर केवळ एका मध्यवर्ती पात्राच्या दृष्टिकोनातून चार कादंबर्‍या उभ्या करणे हे सोपे नाही. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतले लोक, त्यांचे बोलीभाषेतले हेल, खास शब्द, प्रत्येकाची जातीनुसार, शिक्षणानुसार बदलणारी भाषा या बारीकसारीक गोष्टी एकूण कलाकृतीला समृद्ध करतात. बोडसाचे उलट क्रमाने अक्षरे लावत बोलणे, गायकवाडचे 'असं बोललं तर वावगं ठरणार नाही', पाटील बहुसंख्य असलेल्या कॉलेजातले 'ओ सी.ए., तुम्हाला एस.जीं.नी बोलावलंय असा पीपींनी निरोप द्यायला सांगितलाय' छापाचे संवाद, मिश्रा-अगरवाल-भल्लासारख्या बाहेरच्या प्रदेशांतून महाराष्ट्रात आलेल्या लोकांची बोली असे अनेक बारकावे चतुष्टयात जाणवत राहतात.

समीक्षक नेमाडे लेखक नेमाड्यांवर कुरघोडी करत नाहीत, हे या चतुष्टयाचे फार मोठे यश आहे. भले भले लेखक स्वत:च्या साहित्यविषयक-जीवनविषयक भूमिकांचे जाणतेअजाणतेपणी प्रचारक होतात. मग अ‍ॅन रँडसारखी बाई पानेच्या पाने प्रचारकी थाटात लिहिते, तर अल्बेर कामीसारखा लेखक अप्रत्यक्षरीत्या का होईना पण आपल्या पात्रांमार्फत आपले तत्त्वज्ञान पुढे रेटतो. समीक्षक नेमाडे आपला देशीवाद, विध्वंसक टीकाकारगिरी यांचा प्रभाव चांगदेवच्या व्यक्तिमत्त्वावर टाकत नाहीत. ते चांगदेव जसा असेल तसा त्याला वाढू देतात. त्याच्यावर झालेल्या विदेशी मूल्यांच्या संस्कारांमुळे त्याला हिणकस ठरवत नाहीत. त्याची असलेली साध्या राहणीची/खेड्यांबाबतची आवड ही त्यामागील 'रोमँटिकपणा' अधोरेखित करून आपल्यासमोर ठेवतात.

मुंबईत बी.ए.ची पहिली काही वर्षे चांगल्या मार्कांनी पास होत, आईवडिलांना अभिमान, आशा वाटायला लावत शिकत निघालेला चांगदेव तिसर्‍या वर्षी नापास होत बिढारला सुरुवात होते. लघुनियतकालिकांची चळवळ, मुंबईतल्या कार्‍या, काहीतरी महान लिहिण्याची आशा बाळगत (आणि थोडीफार कुवतदेखील बाळगत) जगणार्‍या, एकप्रकारे आपल्याच विश्वात रममाण असलेल्या तरुणांचं चित्र नेमाडे ह्यात उभे करतात. अर्थात 'बिढार'मधली काही पात्रे फार साचेबद्ध वाटतात. कुळकर्णी प्रकाशक, सारंग - शंकर - कुळकर्णी प्रकाशक यांच्यातले संबंध, रामराव व त्यांची प्रेस, नारायणचे कम्युनिस्ट कार्यकर्ता असणे व एकदम व्यावसायिक जगात यशस्वी होणे आणि त्याच जगातली एक बायको करणे वगैरे फार नाटकी होते. पण त्याच जोडीने चांगदेवचा कुष्ठरोगसदृश आजार आणि त्या आजाराचे कुठेही सहानुभूती निर्माण करणारे व भयाण वर्णन करणारे प्रसंग न आणता केवळ चांगदेवची त्यात होणारी घुसमट, चांगदेव व त्याच्या वडिलांमधील तणाव, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी 'बिढार'मध्ये फार ठामपणे उभ्या राहतात. चांगदेवचा father-complex त्याच्या संपूर्ण जडणघडणीत फार प्रभाव टाकतो. नेणिवेच्या पातळीवर, अगदी लहानपणापासून 'वडील' आदर्श असणे, मोठे होत गेल्यावर त्यांचा आत्यंतिक स्वार्थीपणा पण घरासाठी उपसलेले कष्ट, बहिणी-पुतण्यांची लग्ने जुळवताना खाल्लेल्या खस्ता, पण एका बाजूला भावांना शिक्षणासाठी पण पैसे न देणे, आणि या सगळ्या आर्थिक विवंचनांतून चांगदेवला शिकण्यासाठी मुंबईला पाठवणे, त्याच्यावर इतरांच्या हिश्शातला खर्च करणे, या सगळ्याचे एक प्रचंड पश्चात्तापदग्ध 'बिढार' चांगदेव पाठीवर बाळगत राहतो. 'बिढार'चा अर्थ त्याच्या शेवटी असा संपूर्णपणे उलगडतो.

केवळ आला मनात विचार, उतरवली कादंबरी आणि मग तिला उत्स्फूर्त वगैरे लेबल लावून समर्थन केले असा प्रकार नेमाडे करत नाहीत. बिढार, जरीला आणि झूल. शीर्षकेसुद्धा किती विचारपूर्वक आणि समर्पक निवडली आहेत. चांगदेवच्या लहानपणी एक मांग चांगदेवच्या घरातल्या जरीला नावाच्या एका धष्टपुष्ट बैलाच्या अंडांना लोणी चोळतो व मग जरीलाला आडवे पाडून त्याची आंडे दगडावर दगडाने ठेचून फोडतो. पुढे हा जरीला बैल मरेपर्यंत शेतावर राबराब राबतो. हा प्रसंग खरेतर येतो 'बिढार'मध्ये. संपूर्ण 'जरीला' कादंबरीत कुठेही याचा उल्लेखसुद्धा येत नाही. पण जेव्हा 'जरीला' वाचून होते आणि हा संदर्भ लक्षात येतो तेव्हाची वाचकाची अनुभूती केवळ अवर्णनीय असते.

'जरीला' हे माझ्या मते चतुष्टयातले सर्वांत उंचीवर पोचलेले पुस्तक. यात चांगदेव सर्वांत जास्त झटून शिकवतो, मुख्य प्रवाहात, समाजाच्या जंजाळात येण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो आणि स्वतःशीच झगडत अधिकाधिक उघडानागडा होतो. शैलीच्या व भाषेच्या दृष्टीनेसुद्धा 'जरीला' काही अंगुळे वरती आहे. त्याचा 'कोळी' मित्र, जत्रेतला पोपटांचा खेळ, जनरेटर उडाल्याने सहा महिने गावात वीज नसणे, तो राहत असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावरचे नुकतेच लग्न झालेले जोडपे, चौधरी व त्यांचे एकारलेपण असे एकसे एक प्रसंग, पात्रे 'जरीला'त येतात. 'कोसला'मध्ये जसे मनीच्या मृत्यूनंतरचे 'अजंठा' प्रकरण एका वेगळ्या उंचीवर जाते त्याप्रमाणे धाकटा काका कामाला असलेल्या साखरकारखान्याच्या आवारातल्या सी-क्लास क्वार्टर्समधल्या त्याच्या एका खोलीच्या संसारात जेव्हा तो आठवड्याभरासाठी सुट्टीत जातो, तेव्हा त्याला जाणवलेली 'ओल' यावर जे भाष्य येते ते केवळ अप्रतिम.

'आलीया भोगासी' वृत्तीकडे सरकत अंगावर झूल पांघरून चांगदेव तिसर्‍या नोकरीत तिसर्‍या गावी धडकतो. पुन्हा एकदा कॉलेजातले राजकारण - ख्रिश्चन कॉलेज झाले, मराठा कॉलेज झाले - आता ब्राह्मण कॉलेज आणि चांगदेवचे नव्या गावी उत्साहाने जाणे व फुग्यातली हवा निघून जावी तसा त्याचा उत्साह कमी कमी होत जाणे, हेच पुन्हा की काय असा प्रश्न 'झूल'च्या सुरुवातीला पडतो. पण 'झूल'मध्ये नेमाडे शहरातले जातीय राजकारण, खेड्यातल्या लोकांचे शहराकडे स्थलांतर, त्यात पुन्हा पददलितांची त्यातली भूमिका इत्यादी गोष्टी चांगदेवला प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवून भोळेप्रभृती पात्रांकरवी मांडतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्तर ते आजवरचा कॉंग्रेस-शिवसेना-शिवधर्म-मनसे असा वळणावळणांनी झालेला प्रवास बघताना त्याची मुळे किती नेमकी एका ललित (फिक्शन) कलाकृतीत आलेली आहेत हे दिसून येते.

चतुष्टयात जशी विविध पुरुषपात्रे ठळकपणे उभी राहतात तसे कुठलेच स्त्रीपात्र येत नाही. अर्थात स्त्री-पुरुष संबंधच जिथे झाकून होतात तिथे चांगदेवला मुद्दाम एक मैत्रीण देणे थोडेसे कृत्रिम वाटले असते. 'झूल'मधली टुरिझम डिपार्टमेंटमधली 'राजेश्वरी' अशी थोडीशी ओढूनताणून आणल्यासारखी वाटते. त्यातल्या त्यात सविस्तरपणे येते ती पारू सावनूर. चांगदेवचा एकूण बाज बघता पारूचे ख्रिश्चन असणे, ख्रिश्चन असली तरी इथल्याच मातीत रुतलेली मुळे आणि परधर्म यांमुळे पारुला आलेले एक विचित्र उपरेपण आणि ते उपरेपण समजण्याची कुवत, तिची रोमँटिक उदासी, एक प्रकारचे प्रौढत्व हे सगळे खरेतर चांगदेवला अगदी साजेसे. तोदेखील ते उमजून एकदम चांगल्या शहरातल्या कॉलेजात नोकरीसाठी अर्ज टाकायला लागतो. आंतरराष्ट्रीय नियतकालिकात टीकालेख पाठवतो. त्या मुलीसाठी आहे त्या सिस्टीममध्ये तडजोड करुन जगण्यासाठी तो तयार होतो. पण पारूचे आणि चांगदेवचे अलग होणे फार कमकुवतपणे येते - फार अ-चांगदेवी वाटते. हा एक कच्चा दुवा या चतुष्टयात राहून गेलाय असे वाटते. पवारांची आई, धाकट्या काकाची बायको आणि तिची गुजराती शेजारीण, बोडसांची बायको व तिची दूध आणि अंडी माठात ठेवण्याची युक्ती वगैरे प्रसंगांतून इतर स्त्रिया मात्र फार सहजतेने नेमाडे रंगवून जातात.

ज्याप्रमाणे दलित लेखकांनी त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांनी मराठी साहित्य समृद्ध केले त्याचप्रमाणे सत्तरच्या दशकातले बदलते राजकारण, समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था व तिचा एका संवेदनशील - स्वत:च्या मूल्यांबाबत, विचारांबाबत जागृत आणि विश्लेषकी असणार्‍या कार्‍या तरुण शिक्षकाच्या आयुष्यावर होत गेलेला परिणाम, हा जो एक मोठा पट चतुष्टयात मांडला गेलेला आहे तो केवळ एक रंजक ललित कलाकृती नसून मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा ठेवा आहे.

- टण्या
(लेखातल्या बोधचित्रात पुस्तकांची मुखपृष्ठे वापरण्यास अनुमती दिल्याबद्दल पॉप्युलर प्रकाशनाचे आभार.)

Taxonomy upgrade extras: