म्हाद्याचं कलाट

बँडवाले क्लॅरनेट ह्या वाद्याला कलाट म्हणतात. बहुतेक वेळेला बँडचा मालकच कलाट वाजवतो. बँडच्या आकारमानानुसार त्यात कधी दोन ट्रंपेटवाले तर कधी चार ताशावाले असतील. पण कलाट हा फक्ट बॅंडच्या नायकाचा अधिकार असतो. जर बँडमधल्या सगळ्यांचा 'झिरमिळ्या लावलेल्या लाल रंगाचा' पोशाख असेल तर कलाट वाजवणारा मात्र काळ्या रंगाचा कोट घालून मध्यभागी दिमाखात उभा असतो. गणपतीच्या वरातीत 'सुखकर्ता दु:खहर्ता'ची सुरुवात असो किंवा 'कुहू कुहू बोले कोयलिया'ची तान असो, ती कलाटवाला हुबेहूब उतरवतो आणि मग मागाहून इतर वादक आपले वादन सुरू करतात.

खालील लघुकथा चेकॉव्हच्या 'रॉथ्सचाइल्ड्स फिडल' ह्या लघुकथेवरुन स्फुरलेली आहे. ही कथा जर चांगली झाली असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय हे चेकॉव्हला आहे. जर काही त्रुटी, उणीवा राहिल्या असतील तर तो माझा दोष समजावा.

====

सकाळच्या उन्हात उंबरठ्यात बसून बिडी पिताना म्हाद्याला बोळाच्या कोपर्‍यावर, त्याच्याच घराकडे येणारा पाप्या दिसला. म्हाद्यानं मनातल्या मनात पाप्याला शिव्या देत बिडीचं टोक जमिनीवर घासलं. म्हाद्याला दारातच बघून पाप्या जरा लांबच थांबला. एका पायावरुन दुसर्‍या पायावर शरीराचा जोर देत, नजर जमिनीकडं लावून, पाप्या म्हाद्याला म्हणाला,
'रसूलचाचा बुलारा रे तेरे को. टाकळीमे शादी होता. बजाना है. आधे घंटे मी जीप निकलता देख.'
'ए पाप्या, फुकनीच्या', रस्त्यावर पचकन थुंकत म्हाद्याने पाप्याला शिव्या घातल्या.
'रसूलला सांग मी काय न्हाय येणार ये. कामं हायती मला.'
पाप्याला काय बोलावं ते कळेना. थोडा वेळ तो तिथेच उभा राहिला.
'अरं जा की तुझ्या मायला. पळ.' असं म्हाद्याने डाफरल्यावर तो उलटपावली पळाला

पाप्याचे आई-बाप कोण हे आख्ख्या रेवणीत कुणालाच माहिती नव्हतं. पाप्या रेवणीत रहायचा पण नाही. स्टँडजवळ वेश्यांच्या वस्तीच्या आसपासच्या दुकानाच्या पायरीवर पाप्याची झोपायची जागा ठरलेली होती. दिवसभर मात्र रेवणीत 'इब्राहिम ब्रास बँड'च्या ओसरीत पडीक असायचा. लहानपणी झालेल्या खाण्यापिण्याच्या आबाळीमुळं पाप्या दिसायला मरतुकडा, मुडदुश्या होता. आई-बाचा पत्ता नसल्यानं, म्हाद्या पाप्याचा उल्लेख करताना, 'अक्करमाश्या, फुकनीचा, रांडंची औलाद' अश्या शब्दांनीच करायचा. पाप्याचा चेहरा मात्र कायम हसतमुख असायचा. गणपतीच्या आधी किंवा लग्नाच्या हंगामाच्या आधी, बँडच्या तालमी सुरु व्हायच्या. तेव्हा चहा-बिड्यांची व्यवस्था करणे, साथीचा खुळखुळा वाजवणे, असली सगळी पडीक कामं पाप्या करायचा. कधी एखाद दिवशी कोणी हजर नसेल तर त्याचं वाद्य - मग ट्रंपेटपासून ताश्यापर्यंत - काहीही वाजवायचा. कधी कधी बँडचा म्हातारा मालक रसूल, त्याला आपलं जुनं क्लॅरनेटपण वाजवू द्यायचा. ऑर्केस्ट्राचं किंवा कॉलेजच्या गॅदरिंगचं काम मिळालं की त्यात पाप्याचा मिमिक्रीचा आयटम नक्की असायचा. दादा कोंडके आणि निळु फुलेच्या कुत्र्यांचं भांडण हा पाप्याचा खास आयटम. उरुसात दहा दिवस पाप्या जादुगाराच्या नाहीतर हसर्‍या आरश्यांच्या स्टॉलच्या बाहेर उभा राहून गर्दी खेचायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. तिथे मग जळती बिडी तोंडात आत उलटी घेणे, जिभेवर काडेपेटीची काडी विझवणे असली कला दाखवायचा. आणि काहीच नसेल तेव्हा स्टँडच्या आसपास पत्त्याचा जुगार आणि संध्याकाळच्या आकड्याची उत्सुकता ह्यावर दिवस घालवायचा.

म्हाद्याला पाप्या मुळीच आवडत नसे. का ला काही फार अर्थ नव्हता. कधी म्हाद्याला पाप्या कायम हसत असायचा म्हणून चीड यायची तर कधी त्याच्या अनौरस असण्याची तर कधी उगीचच. म्हाद्याचा खरं तर सगळ्या जगावरच राग होता. लहानपणापासून म्हाद्या रेवणी गल्लीत राहात होता. पण त्याला ना कुणी मित्र होता ना म्हाद्या कधी कुणाशी एक शब्द नीट बोलला असेल तर शप्पथ. भावकीत भांडणं होऊन म्हाद्याचा बाप शिंपी गल्ली सोडून रेवणीत राहायला आला तेव्हा म्हाद्या दहा-बारा वर्षांचा असेल. रेवणी गल्ली म्हणजे, मार्केटच्या दुकानांच्या मागच्या बाजूला असलेली गोडाऊनं आणि किल्ल्याचा खंदक, यांच्यामध्ये वसलेली वस्ती. रेवणीत मधोमध गाडीतळासाठी मोकळी जागा होती आणि बाजूनं बैलगाडीच्या चाकाच्या आर्‍यांप्रमाणं गोल सात-आठ गल्ल्या पसरल्या होत्या. रेवणीचं वैशिष्ट्य म्हणजे रेवणीत हिंदू-मुसलमान आणि त्यातसुद्धा सगळ्या जातीच्या लोकांची घरं होती. खंदकाच्या बाजूच्या गल्ल्यात मुसलमानांची वीस-पंचवीस घरं होती तर उरलेल्या गल्ल्यातनं हिंदूंची. त्यात रेवणीतले मूळचे लोहार, कोकणातनं देशावर आलेले मजूर, म्हाद्यासारखा एखादा शिंपी असे सगळे होते. रेवणीवर एक जुनाट शेवाळ्यासारखी घसरडी हिरवट कळा होती. तीच कळा आता म्हातारा झालेल्या म्हाद्याच्या अंगा-खांद्यावर पसरली होती. त्याच्या चेहर्‍यावर सदैव एक अत्यंत त्रासिक अवकळा होती.

खंदकाकडच्या मुसलमानांमध्ये रसूलचा 'इब्राहिम ब्रास बँड' होता. बाहेरच्या खोलीत ऑफिस, तालमीची जागा, वाद्यं ठेवण्यासाठी कपाटं आणि मागं रसूलचं घर. रसूलचा बाप सर्कशीत कलाट, ट्रंपेट असली वाद्य वाजवायला शिकला आणि नंतर त्याने गावात येउन स्वत:चा बँड सुरु केला. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, कॉलेजची गॅदरिंगं असल्या सगळ्या ठिकाणी हा बँड वाजवत असे. रसूलला बापानंच कलाट वाजवायला शिकवलं. रसूलच्याच वयाच्या आसपासचा म्हाद्यापण इब्राहिमकडून कलाट वाजवायला शिकला. शिंप्यांच्यात उपजत असलेला संगीताचा कान आणि म्हाद्याच्या बोटातली कला ह्या मुद्दलावर म्हाद्या उत्तम कलाट वाजवू लागला. पण म्हाद्या लहरी होता. एखाद्या दिवशी जर दोन सुपार्‍या असतील तर एका पार्टीबरोबर रसूल आणि दुसर्‍याबरोबर म्हाद्या अशी योजना रसूल करायचा. पण म्हाद्या येईल का नाही, येईल का नाही अशी शेवटपर्यंत रसूलला धाकधूक वाटत असायची.

म्हाद्याचा शिंप्याचा धंदापण कधी फार चालला नव्हता. म्हाद्याचं दुकान म्हणजे जिन्याखालची एक खोली होती. तिच्यामागं आत त्याचं घर म्हणजे एक छोटीशी खोली - त्यातच एक पडदा लावून केलेलं न्हाणीघर. बाहेरच्या खोलीतून वरती रहाण्यार्‍या बिर्‍हाडाचा जिना गेला होता. त्या जिन्याखालच्या त्रिकोणी जागेत म्हाद्याचं मशिन होतं आणि बाकी सगळीकडं चिंध्या पसरलेल्या असायच्या. सुरुवाती सुरुवातीला रेवणीतली लोकं त्याला ईद-दिवाळीचे कपडे शिवायला देत होती. पण म्हाद्यानं वेळेवर कधीही कपडा मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतल्याने त्याच्याकडं लंगोट, तालमीतल्या कुस्ती-मल्लखांब खेळणार्‍या पोरांच्या हनुमान चड्ड्या आणि म्हातार्‍यांचे सदरे-पायजमे किंवा लहान पोरांचे शाळेचे शर्ट ह्याख्रेरीज अजून कुठलं काम आलं नाही.

त्यादिवशी पाप्याला हाकलून लावल्यावर म्हाद्याकडं करायला फारसं काही काम नव्हतं. पण आज वाजवायचंच नाही अशी लहर- त्यामुळे तो गेलाच नाही. दिवसभर नुसतं बिड्या फुंकत मशीनवर बसला. संधाकाळी रसूल तणतणत म्हाद्याच्या घरी आला आणि म्हाद्याला म्हणाला की, दोन दिवसानी आणखी एक सुपारी आहे. त्यादिवशी जर आला नाहीस तर परत कधीही वाजवायला बोलावणार नाही. म्हाद्यानं निर्विकारपणे रसूलचं बोलणं ऐकलं आणि रसूल गेल्यावर शांतपणे उठून आत घरात गेला.

चुलीशी सगळी भांडी रिकामी बघून 'आज गिळायला काय न्हाय काय?' असं म्हणत म्हाद्या बायकोला शिव्या घालत वळला. तरुणपणाच्या जोशात म्हाद्यानं कित्येकदा असल्या बारीक-सारीक कारणांवरून बायकोला लाथा घातल्या होत्या. वय झालं तसं म्हाद्याचे हात-पाय कमी आणि तोंड जास्त चालायला लागलं होतं. म्हाद्या वळला आणि त्याला म्हातारी जमिनीवर सतरंजी अंथरुन सांजेचंच झोपलेली दिसली. 'आयला, काय अवदसा आठवली म्हातारीला' असा विचार करत म्हाद्या तिच्याजवळ गेला तर तिच्या घशातून क्षीणसा कण्हण्याचा आवाज येत होता. त्यानं तिच्या कपाळाला हात लावला तर चटका बसेल एव्हड्या तापानं म्हातारी फणफणली होती. संतरजीच्या आत पाय पोटाशी दुमडून म्हातारी पडली होती. तिची अवस्था बघून म्हाद्याला घाबरून आलं.

तिला एका हातानं आधार देत त्यानं उभं केलं आणि जवळच्या डॉक्टरकडे घेवून गेला. तिथं बाहेरच्या खोलीत, बारक्या-सारक्या आजारांवर कंपाऊंडरच लोकांना औषध देत होता, सुई टोचत होता. म्हाद्याच्या बायकोला बघताच कंपाऊंडरच्या लक्षात आलं की हिचा काय फार वेळ आता उरलेला नाही. त्यानं एक-दोन गोळ्या पुडीत बांधून म्हाद्याला दिल्या आणि त्याला जायला सांगितलं.
"अवो, म्हातारी तापानं फणफणलीया-कण्हतीया बघा कशी. जरा आत मोठ्या डाक्टरास्नी दाखवू दे की. न्ह्यायतर सुई तरी टोचा एक." म्हाद्या काकुळतीनं कंपाऊंडरला म्हणाला.
"काय उपयोग न्हाय रं तेचा. तू घीऊन जा बघु म्हातारीला हतनं', असं म्हणत कंपाऊंडरने म्हाद्याला दवाखान्याबाहेर हाकलला.

'पैसेवाल्यास्नी लगीच आत सोडतूया. माज आलाय समद्या रांडेच्यास्नी' असं बडबडत आणि सगळ्या जगाला शिव्या घालत म्हाद्या म्हातारीला घेउन घरी आला. म्हातारीला सतरंजीवर झोपवून त्यानं चूल पेटवायला घेतली.
'देवीला जाउन नवस फेडला असता तर आज पोरगी जगली असती बघा आपली. तेव्हडं काय तुमच्या हातनं झालं न्हाय', म्हातारी ग्लानीत बडबडत होती. 'एव्हड्या नवसानं पोर झाली. एक वरीस काय बघितलं न्हाय तिनं.'
'कुटली पोरगी. याड लागलय तुला. झोप तू गुमान', असं म्हणत आणि चूल पेटवायचा नाद सोडून म्हाद्या बाहेर जाउन मशीनवर बसला. थोडा वेळपर्यंत त्याला आतनं म्हातारीची 'पोरगी, देवी, नवस, आई, अक्का' अशी बडबड ऐकू येत होती. हळूहळू तिचा आवाज लहान होत गेला आणि ती परत ग्लानीत गेली.

म्हाद्याला कळेना की म्हातारी तापात खुळ्यागत बडबडायला लागलीये की त्याला खरच एक मुलगी झाली होती. म्हाद्याला लग्न होवून घरात आलेली म्हातारी आठवली. लग्न झालं तेव्हा म्हाद्याचा बाप जिवंत होता. तो आणि म्हाद्या मिळून बर्‍यापैकी पैसे कमवत होते. म्हाद्याचा लग्नानंतर त्याच्या बापानं आपलं अंथरुण मशीनच्या बाजूला बाहेरच्या खोलीत हालवलं. म्हाद्या दिवसभर बापाबरोबर काम करत असे आणि कधी कधी रात्र-रात्र बँडवाल्यांबरोबर घालवत असे. सुरुवाती सुरुवातीला म्हाद्या एखाद दिवशी बायकोला घेऊन देवळात गेला होता. पहिल्या वर्षी जत्रेला म्हाद्या बायकोबरोबर पाळण्यातसुद्धा बसला. पण दिवस सरतील तसे म्हाद्याचा वेळ घरी कमी आणि कलाट-बँडमध्ये जास्त जाऊ लागला. पुढं बाप गेला आणि म्हाद्याचा लहरीपणा पण वाढीला लागला. इकडे लग्नानंतर बरीच वर्षं पोर होत नाही म्हणून म्हातारी दिसेल तिकडं नवस बोलत होती, देवळांच्या-मठांच्या पायर्‍या झिजवत होती. पुढे तिला एक अतिशय अशक्त, चिरक्या आवाजात रडणारी मुलगी झाली खरी. म्हातारीला मुलीचं कोण कौतुक. पण म्हाद्यानं पोरीला कधी हातात घेतलं नाही की पोर झाल्याच्या आनंदात चार शब्द गोड बोलला नाही. म्हातारी 'देवीला जाऊन नवस फेडू या' म्हणुन म्हाद्याच्या मागं लागली. पण म्हाद्या काय तिला घेउन कधी देवीला गेला नाही. पुढं वर्षाच्या आतच पोरगी मेली. तसंही फारसं न बोलण्यार्‍या म्हातारीनं म्हाद्याशी बोलणंच टाकलं. म्हाद्यालाही त्याचं काही वाटलं नाही. तो आपल्याच तंद्रीत जगत होता. कधी म्हातारीशी दोन शब्द बोलला नाही की तिला एक नवीन लुगडं-चोळी, एखादा डाग त्यानं आणला नाही. जे काय पैसे हातात पडत होते ते चहा-बिड्या, बँडवाल्यांबरोबर कधीतरी छटाक-पावशेरमध्ये म्हाद्या घालवत होता. म्हातारीनं जवळच्या व्यापार्‍यांच्या घरात कामं धरली. घरात धान्य, बाकी किडुक-मिडुक म्हातारीच आणत होती. लोकांकडं धुणी-भांडी करुन म्हातारीनंच घर चालवलं. एखाद्या दिवशी रात्री देशी मारुन आल्यावर कालवणात तिखटच कमी आहे नाहीतर भाकर्‍याच केल्या नाहीत म्हणून म्हातारीच्या पेकाटात लाथ हाणणे ह्याखेरीज म्हाद्यानं घराच्या आणि म्हातारीच्या बाबतीत अजून काही केलं नाही. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीचं पाणी आटतं तशी म्हातारी हळूहळू खंगत आकसत गेली

डोक्याला त्रास देऊनसुद्धा म्हाद्याला शेवटचं कधी म्हातारीशी दोन शब्द बोलल्याचं आठवत नव्हतं. रात्रभर तो मशीनवरच बसला.

पहाटेला चहा टाकायला म्हणून म्हाद्या आत गेला तर म्हातारीचा खेळ आटोपला होता. तांबडं फुटल्यावर आजूबाजूच्या चार लोकांना घेउन तो घाटावर जाउन पुढचं उरकून आला. पुढचे चार-पाच दिवस म्हाद्या खिन्नपणे बाहेरच्या खोलीत बिड्या फुंकत बसला. मग पाचव्या दिवशी संध्याकाळी त्यानं आतल्या खोलीतनं फळीवर ठेवलेलं कलाट खाली उतरवलं, फडक्यानं स्वच्छ पुसलं आणि बाहेरच्या खोलीत खाली बसून सूर लावला. म्हाद्या आज आपलंच काहीतरी वाजवत होता. शेजारी-पाजारी दाराशी घोळका करुन ऐकू लागले. त्याच्या कलाटातून आज त्याचे सूर बाहेर पडत होते. म्हाद्या वाजवत राहिला. लोकं ऐकत राहिली.

'म्हाद्या उद्याच्या सुपारीला येतो का बघ' म्हणून रसूलने पाप्याला म्हाद्याकडे धाडला होता. पाप्या दबकत-दबकत गर्दी सारुन दरवाज्यातून आत आला तेव्हा म्हाद्याचे कलाट बोलत होते. म्हाद्या स्वतःच्याच नादात कितीतरी वेळ वाजवत राहिला. तो थांबला तेव्हा त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. म्हाद्या थांबल्याचं बघताच, हा आता आपल्यावर खेकसणार, असं लक्षात येउन पाप्या चटकन उडी मारुन उंबर्‍याशी पोचला. पण म्हाद्या पाप्याकडं बघून फक्त हसला. पालथ्या हातानं त्यानं आपले डोळे पुसले आणि आपलं कलाट पाप्याला देऊन तो आतल्या खोलीत निघून गेला.
.
.
.
म्हाद्या त्यानंतर परत कधीही बँडमध्ये वाजवायला गेला नाही. तो हळूहळू संपला. पाप्या शेवटपर्यंत बँडची पडीक कामं करत बँडबरोबरच राहिला. एखाद्या रात्री बँडची नवीन गाण्यांची तालीम संपली किंवा दुसर्‍या कुठल्यातरी गावची सुपारी संपवून सगळे एसटी स्टँडवर बसची वाट बघत बसले असले की ते पाप्याला म्हाद्याचं कलाट वाजवायला सांगायचे. पाप्या म्हाद्यानं जी शेवटची चाल आळवली होती ती तशीच्या तशी कलाटामधून उतरवायचा. पण उभ्या आयुष्यात पाप्यानं कधी कलाटामधून अजून काही वाजवलं नाही.

- tanyabedekar