दौलू

सेना न्हावी या संतानंतर आमचा दौलू न्हावीच ! सेना न्हाव्याच्या काळात दौलू नव्हता म्हणून, नाही तर त्याने तेव्हाच जाहीर करून टाकलं असतं, 'दौलू हाच माझा आध्यात्मिक वारस आहे!' माझी खात्री आहे दौलूची संत-महात्म्यांवरची, धर्मावरची प्रवचनं तुम्ही ऐकली असती, तर तुम्हालादेखील माझं म्हणणं पटलं असतं.

या दौलूचा जन्म कुठं, कधी आणि कशासाठी झाला हे विचारायला माझ्या तोंडाला 'उघडीक’ कधी मिळू शकलीच नाही. वास्तविक मला हे विचारायचं कारणही नव्हतं ही गोष्ट खरी आहे. तरीही आता त्याच्यावर चार ओळी लिहायला घेतल्या आहेतच तर म्हणून वाटतं, की विचारलं असतं तर बरं झालं असतं; एव्हढंच !

मला लहानपणीच्या ज्या तीन गोष्टी प्रामुख्यानं आठवतात त्या म्हणजे, पहिली - वडिलांनी चुलीवरून पेटवून आणायला सांगितलेली आणि पेटवून घेऊन जाता जाता मधल्या खोलीत मी ओढलेली विडी, दुसरी - एकदा मीच कांगावा करून मोठ्या भावाला खायला लावलेला मार, आणि तिसरी - दौलू आमच्या घरी आमचे केस कापायला येत असे, तेव्हा त्याने मला म्हटलेले वाक्य, “काय ढाण्या वाघागत बसलायसा राव! काय डोई मारतोय का काय? नाव किस्नाचं हाय, बसा की वाइच किस्नावानी !” कृष्ण आपला 'बॉबकट' करून घ्यायला दौलूच्या पुढ्यात कसा बसला असेल हे दृश्य डोळ्यांपुढं आणायचा प्रयत्न करून मी सावरून बसलो, तेव्हा “हाम्बघा, आस्सं. बसा जरा नीट ताठ. शाब्बास पठ्ठे !” अशी शाब्बासकी दिली होती मला दौलूनं, ती.

असा हा आमचा दौलू. माझ्या लहानपणी तो दरएक महिन्यानंतर आमच्या घरी यायचा. बाहेरच्या खोलीत सतरंजी अंथरून, तीवर बसून घरातले सगळे पुरुष पाळीपाळीनं आपापलं डोकं दौलूच्या हवाली करायचे आणि दौलू त्यावर सफाईनं (म्हणजे जागोजागी रक्त काढत) हात आणि कात्री चालवायचा. तेव्हा त्याचा वस्तरा कानाच्या वरच्या भागावरील कोरीव काम करत फिरताना आपला कान कापला जायची मला इतकी भीती वाटायची, की माझी पाळी येताच मी घराबाहेर धूम ठोकायचा. पण 'मुकीनसायबांचा नंबर' अशी दौलूची आरोळी होताच, त्याच्या हातातून जीव बचावून सुटलेले आमचे मोठे बंधुराज आनंदाने, आपण एका मोठ्या गनिमाला पकडायला निघालो आहोत अशा आवेशात येऊन, मला धरून नेत आणि दौलूच्या हवाली करत. तिथं बसेपर्यंत माझी सुटकेसाठी धडपड चाले. पण एकदा का दौलूचा दणकट हात मानेवर पडला, की माझी मान आपण होऊन हलणे शक्य नसे (सबंध शरीराचे अंदाजे २०० पौंड वजन दौलू बसल्याबसल्या त्यावेळी त्या एका हातात कसे आणत असे हे मला अजूनही न उलगडलेले कोडे आहे). “हां, गडबडी करू नका साहेब, नायतर एकदम चम्मन करून टाकीन बगा” हा त्याचा दम मला पार थंड करून टाकत असे. कारण शेजारच्या शिरप्याच्या चम्मन केलेल्या डोक्यावर मी टपल्या मारलेल्या असल्याने, तो उट्टं फेडून घेईल ही भीती वाटे. (ओघानच आलं म्हणून लिहितो, तुळतुळीत हजामत केलेल्या डोक्याला मराठीत चमन का म्हणतात? हिंदीतल्या चमनमध्ये झाडंझुडुपं असतात तर मराठीतल्या या चमनमधील डोक्यावरील सारी वनश्री पार उडवून टाकलेली असते. त्यामुळे माझ्या अगाध हिंदीत बाते करताना मला 'बाग' या अर्थी 'चमन' हा शब्द वापरायला मराठीतल्या 'उजडे हुए चमनकी' याद येऊन कससंच वाटतं, तर मराठीत 'चमन' म्हणताना हिंदीतल्या बहरलेल्या बागेची आठवण येऊन हसायला येतं.)

तर असा हा आमच्या लहानपणीचा दौलू. मी आणखी जरा मोठा झालो तोपर्यंत दौलूनं राजारामपुरीतच तिसर्‍या गल्लीत दुकान टाकलं (कोल्हापुरात ’गाळा’ घेऊन दुकान ’टाकायचं’ असतं, जागा घेऊन तीत दुकान सुरू करायचं नसतं.) आणि फिरती कारागिरी बंद केली. आम्ही सारे मग त्याच्या दुकानात जायला लागलो. 'श्रीराम हेअर कटिंग सलून, प्रोप्रायटर दौलत विठ्ठल टिपुगडे’' अशी रंगवलेल्या निळ्या पार्श्वभूमीवर पिवळ्या अक्षरांत लिहिलेली पाटी, म्हणजे 'नावाचा बोर्ड' त्याच्या दुकानावर होता. दौलूचा फिरता बिझनेस होता तेव्हाचा खाकी अर्धी चड्डी, बिनकॉलरचा झब्बावजा शर्ट आणि झाडून सार्‍या दूधवाल्या (म्हणजे दुधाचा 'रतीब' घालणार्‍या) आणि मंडईत भाजी विकणार्‍या बाया घालतात तसल्या दोन इंच जाडीच्या, नाल ठोकलेल्या वहाणा हा त्याचा पोषाख दुकानातही कायम राहिला. दौलूला मी कोल्हापुरी फेटा, धोतर, कोट अशा पोषाखात पाहण्याचे दिवसही अधूनमधून यायचे. पॅलेस थेटराच्या मागे असलेल्या खासबाग मैदानात (तोपर्यंत त्या दोन्ही 'लँडमार्क्सची’ नावे अनुक्रमे 'केशवराव भोसले नाट्यगृह' आणि 'शाहू स्टेडियम' अशी झाली नव्हती) जेव्हा कुस्त्यांची धमाल असे, तेव्हाचा दौलूचा हा पोषाख. कुस्तीच्या दिवसाच्या आधीचे दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस दौलूच्या दुकानात कुस्त्यांवर बौद्धिकं होत, दौलूचीच. मी त्याच्या खुर्चीवर असलो, तर तो जेव्हा सवयीने कंगवा धरलेला हात माझ्या डोक्यावर तसाच ठेऊन दुसरा कात्री धरलेला हात नाचवत, “सादिक पंजाब्याला गनपत आंदळकरानं धोबीपछाड लावाय नगो हुती; तेनंच समदा बावचा केला. पट काडून मग घिश्श्यात घेतला असता, तर तवाच सादिक चित हुईत हुता राव” अशी बहुमोल माहिती माझ्याकडं बघून पुरवत “क्काऽऽऽय?” असा होकार अपेक्षिणारा प्रश्न टाकत असे. तेव्हा त्याच्या कर्तन करायचं सोडून नर्तन करत असलेल्या कात्रीकडे केविलवाणा दृष्टिक्षेप टाकून मी “हं” म्हणत मान हलवायचा प्रयत्न करत असे. कारण त्याच्या त्या कंगवा धरलेल्या हातानं त्यानं माझं डोकं घट्ट दाबून ठेवलेलं असायचं. मध्येच दौलूची 'धाकली पोरगी’ दुकानाच्या मागच्याच बाजूला असलेल्या घरातून दुधाची चरवी – म्हणजे मोठा चकचकीत पितळी तांब्या – घेऊन यायची. मग दौलू कात्री बाजूला ठेऊन त्या चरवीतील शेरभर दूध तोंडात वरून ओतत 'घटघट' आवाज करत पिऊन टाकायचा. वरून ओतून पीत असताना त्याच्या गळ्याचे हाड (मणी) वरखाली होताना पहायला तेव्हा फार मजा वाटायची. त्याच्या हातातल्या ताकतीचं रहस्य या 'घटघट दुधातच' असावं. रिकामी केलेली 'श्रीहरी दौलुबा टिपुगडे' असे त्याच्या मुलाचे नाव घातलेली ती चरवी मुलीकडं देत तो “न्हे जा बाळ” म्हणायचा आणि डाव्या हाताच्या पालथ्या मुठीनं मिशांवर उडालेले थेंब पुसून टाकायचा.

कुस्त्यांवरील भाष्य हे प्रसंगोपात असायचं. तसे दौलूचे मुख्य विषय म्हणजे अध्यात्म, देवधर्म आणि पुराणे. लहानपणी मी दौलूकडून पांडवप्रताप, हरिविजय ही पुस्तके वाचायला घरी नेली आहेत. श्रीकृष्णपरमात्मा हा दौलूचा प्रेमाचा, मोठा आवडता गडी ! "पांडव धर्मानं रहात. क्काऽऽऽय? म्हणूनच श्रीकृष्णपरमात्मा त्यांच्या बाजूला गेला. न्हाईतर कौरवांकडं काय संपत्ती न्हवती काय हो? माप्प पैसा, दासदाशी, शिर्मंती होती. पण भगवान गेले का त्यांच्याकडं? न्हाई. का? तर श्रीकृष्णभगवानांनीच एके ठिकाणी लिवलेलं हाय. तुमी वाचलयसा न्हवं का पांडवप्रताप? हाय बगा त्यात. क्काय? की भगवान म्हणतात, 'मला पैसा नको, मला आराम नको. मला पायजे भक्ती. जो कोणी खर्‍या प्रेमानं मला बोलिवतो, धर्मानं वागतो त्येच्याकडंच मी जाणार'. क्काऽऽय?" ही वाक्यं सांगताना दौलूचा आवेश असा काही असायचा, की ऐकणार्‍याला हे शब्द भगवानानं अर्जुनाला नव्हे, तर दौलूलाच विश्वासात घेऊन सांगितले असणार अशी नुसती शंकाच न येता पक्की खात्री पटायची. ताबडतोब दौलू आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ, दुर्योधन व अर्जुन श्रीकृष्णाला 'तू आमच्या बाजूला ये' असे सांगायला कसे गेले होते व कृष्ण तेव्हा कसा झोपलेला होता ते वर्णन करून सांगायचा.

त्याचा पांडवप्रताप हा विषय संपून संत तुकारामाबद्दलची बौध्दिके सुरू होईपर्यंत, म्हणजे दोन वर्षातील जवळजवळ चोवीस वेळा तरी, तीच गोष्ट आणि भगवंतांचे तेच म्हणणे मी मुकाट्याने ऐकले आहे. दौलू फक्त भगवान काय म्हणतात तेच सांगून गप्प बसायचा नाही. आज तुमच्या देशाची काय अवस्था आहे आणि ती तशी का आहे हेही सांगायचा. “त्यो गांधी, लई लुच्चा म्हतारा हुता. काय तर म्हनं अहिंसा ! अरं, व्हय ! अहिंसा तर अहिंसा. भगवान काय ऊटसूट हानामार्‍या करीत हुते काय? अवो, भगवानान्लाबी अहिंसा मंजूर हाय. पर ती आसली अहिंसा न्हवं ! आरं, तुमची अहिंसा भेकड मानसाची अहिंसा हाय ! न्याट न्हई तुम्च्यात. म्हनून अहिंसा-अहिंसा करतायसा. आरं, मनगटात जोर आसंल तेनंच अहिंसा सांगावी. रडतोंड्यानं अहिंसा म्हटली, तर तेला भ्याड म्हन्त्यात. तसला हुता त्यो म्हतारा. देशाची एक आख्खी पिढीच्या पिढी पार खलास करून टाकली त्येनं ! आरं, षंढ बनवलं त्येनं तुमाआमाला. क्काऽऽय?” हे दौलूचं मत गांधींच्या अहिंसेवरचं !

दौलूनं समग्र तुकाराम अभ्यासला होता. अभ्यासलेल्या प्रत्येक विषयापैकी एक प्रमुख सूत्र धरून तो ते नेहमी सांगत असायचा. पांडवप्रतापाच्या अभ्यासानंतर जसा त्यानं भगवानाच्या धर्मप्रेमाचा ध्यास घेतला होता, तसा तुकारामाच्या अभ्यासात त्याने तुकोबाचे सारे अभंग वाचून त्यातून 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा हाणू काठी’ हा अभंग आपल्या संभाषणाचे सूत्र म्हणून पकडला होता. त्यातूनही तो गांधीबाबावर घसरे. “त्यो म्हतारा काय म्हन्तो ? म्हनं भले तरी द्या लंगूटी आनि नाठाळ असला तरीबी द्या कंबरेची लंगूटी फेडून, शिवाय काटी द्या त्येच्या हातात आनि म्हना, 'हान बाबा आम्च्या टक्कुर्‍यात’ ! आयला काय चेष्टा हाय व्हय ? आरं, आसं म्हन्तासा म्हनून तुमचा देश आज आसा कचर्‍यावानी पडलाय. जीव न्हई त्येच्यात, प्रानच र्‍हायला न्हई ! क्काऽऽय?”

हे प्रवचन चालू असताना मध्येच दौलूला कामाची आठवण होई. मग तो कात्री सफाईनं चालवत बारीक आवाज काढून विचारी, "वरचे केस उडवायचे न्हवे? आं? र्‍हाऊ द्यात न्हाई तर. उबे र्‍हातील. पुडल्या म्हैन्याला जरा करू बारीक". मी कधीच त्याला केस कापायसंबंधी काहीएक सूचना द्यायचो नाही. जायचो, त्याच्या खुर्चीवर कोणी माणूस असला तर नंबरासाठी बाकावर बसायचो आणि जुनेपाने 'रसरंग', 'मराठा', 'आलमगीर', 'सकाळ', 'लोकसत्ता' वगैरे अंक चाळायचो. तेही चाळून संपले म्हणजे दौलूच्या टेबलामागच्या भिंतीवर लावलेल्या गोपीवस्त्रहरणाच्या फोटोकडं किंवा श्रीरामाच्या, हात, पाय, दंड, कपाळ, छाती – जिथं जिथं म्हणून शक्य असेल तिथं तिथं गंध, अष्टगंध लावलेल्या फोटोकडं पाहत दौलूच्या 'क्काऽऽय?’ या प्रश्नाला मान डोलवीत बसून राहायचो. नंबर आल्यावर डोके त्याच्या हवाली करून बसायचो. बसताना हळूच पुटपुटायचो, "दौलू जरा लवकर हं, घाई आहे." दौलू "व्हय व्हय" म्हणायचा आणि सुरुवात करायचा – कटिंगला आणि प्रवचनाला !

मध्यंतरी पाच-सहा वर्षं आम्ही घर बदलून दुसरीकडे राहायला गेलो होतो, तेवढा काळ दौलूकडे जाणे जमले नाही. पण त्यानंतर योगायोगाने पुन्हा राजारामपुरीत राहायला जाण्याचा योग आला आणि पूर्ववत 'श्रीराम हेअर कटिंग सलून'मधे जायला लागलो. या काळात दौलूचा तुकाराम अभ्यासून संपला व समग्र विवेकानंदही झाला असावा. त्याच्या दुकानात आता कृष्ण-गोपी, प्रभू रामचंद्र, संत ज्ञानेश्वर, तुकाराम व शिवाजीमहाराज यांच्या जोडीला पाश्चात्य राष्ट्रातली रमणीय वनश्री, रशियन अंतराळवीर युरी गागारिन, सफेद दंतपंक्ती दाखवीत हसणारी एक मोहक नवयौवना आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो लागले होते. दुकानाच्या आतल्या कोपर्‍यात रेडिओ आला होता. मी साधारणपणे सकाळीच केस कापायला जायचो, तेव्हा हमखास रेडिओ सिलोन स्टेशन लागलेले असायचे. त्या स्टेशनवर तिन्ही त्रिकाळ चालू असलेल्या प्यार, मुहब्बत, इष्क, प्रीती यांच्या अभंगांच्या साथीत दौलूचं विवेकानंदाख्यान चालू व्हायचं. "आख्ख्या दुनियेत विवेकानंदासारखा नंबर एकचा माणूस झाला न्हाई राव ! क्काऽऽय? त्याचीबी अहिंसा हुती, पर ती बलवान माणसाची अहिंसा हुती. तुमच्याआमच्यासारकी भेकड अहिंसा न्हवती ती ! आरं, त्याच्या मनगटात जोर हुता म्हनून त्याला अहिंसा म्हनायला शोबलं. क्काऽऽय ??" त्याच्या मनगटात जोर होता हे सांगताना दौलूला आपल्या हातातला जोर आजमावायची हुक्की यायची की काय कोणास ठाऊक, तो गिर्‍हाइकाचे डोके जोराने खाली दाबायचा.

विवेकानंदांचा मनोनिग्रह केवढा दांडगा हे सांगताना मोठ्या भक्तिभावाने दौलू सांगायचा, "येवढा मोठ्ठा माणूस. खिशात दमडीसुध्दा नसताना गेला राव अमेरिकेला, क्काऽऽय? तितं जवा का तितल्या बायानी बगितला का न्हाई ! ह्यॅ: ! मोटा राजबिंडा गडी , तेजवान चेहेरा, कपनी घातल्याली, डोईला फेटा, आनि असा रुबाबदार गडी ! लोक सारे बगत्यात टाकमाक टाकमाक करून ! आनि ह्ये आपलं बोलत्यात…. आमचा हिंदुधर्मच श्रेष्ठ म्हणून. भाषण संपल्यावऽऽर, क्काऽऽय?. तेनला एका बाईनं घरला बोलवून न्हेलं. क्काऽऽय? लई शिरमंत बाई हुती, आनि रुपवान तर अशी म्हनतासा ! तरणीबांड हुती राव. आनि राव, न्हेलं त्येना घरला आनि खायाला प्याला दिलं. पिला न्हाई गडी ह्यो. काय कुटं चार फळं खाल्ली असतील तव्वर ती बाई नुसती ह्येंच्याकडं डोळं भरून बगतच र्‍हायलेली. तिच्या मनात पाप आलं राव ! वासना उबी र्‍हायली तिच्या मनात. क्काऽऽय ? आन तशी ती ह्येनला म्हणली, 'मला तुमच्यावानी येक मुलगा असावा वाटतोय.’ क्काऽऽय. म्हंजे तिला काय म्हनायचं हुत? का माज्या पोटात तू तुज्यासारका येक मुलगा दे. विवेकानंदानी येक डाव तिच्याकडं बगितलं आनि तिला म्हणाले, 'आई, मी हाय की तुजा मुलगा. माज्यासारकाच का, मीच तुजा मुलगा समज की.’ ग्ग्गार झाली राव ती बाई तवा तितं ! क्काऽऽय? आसा मनोनिग्रव पायजे. न्हाई तर तुमी आमी असतो तर ? म्हनलो असतो, 'चल, तू माजी बायको, मी तुजा न्हवरा. येक का? धा पोरं देतो तुला !' खरं का न्हाई? व्हय. पोरं काडायला काय अक्कल लागतिया ? आरं, म्हन्तानाच तर आपला ह्यो हिंदुस्तान देश लई लोकानी भरलाय. आयला भार झालाय नुस्ता धरतीला. विवेकानंदाचा आदर्श डोळ्याम्होरं ठेवा, चाट दिशार देश म्होरं जाईल राव ! क्काऽऽय?"

हिंदू धर्माचा दौलूला फार अभिमान. हिंदू धर्मच मूळ आणि त्यातनंच बाकी सारे धर्म निर्माण झालेत हे त्याचं ठाम मत होतं. तरूण पिढीत जी पाश्चात्य संस्कृतीची आवड आणि तिच्यातल्या गलिच्छ गोष्टींचीच उचल करण्याची जी प्रवृत्ती असते, तिच्याबद्दल दौलूची तीव्र नापसंती होती. वाईट गोष्टींच्या संपर्कात राहिलं, तरी त्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडू देणं योग्य नव्हे, चांगल्या गोष्टींच्या प्रभावासाठी मात्र आपलं मन मोकळं ठेवलं पाहिजे हे मला दौलूनं एकदा उत्तम दृष्टांत देऊन सांगितलं होतं. "वाइटाच्या संगतीत आपण चांगल्या मनानं गेलो, तर कायबी परिणाम होणार न्हाई आपल्यावर. गंगेच्या पाण्यानं भरलेली घागर जर दारूच्या पिंपात बुडवली, तर एक थेंबबी दारूचा घागरीत शिरायचा न्हाई. घागर रिकामी असंल, तर मात्र ती लगेच दारूनं भरंल. तवा, वाइटांच्या जवळ जाताना आपलं मन पयलं चांगल्या विचारानी भरलेलं असाय पायजे. आनि तेच, जर दारूनं भरलेली घागर गंगेच्या धारंत शिरली तर? गंगेचं पानी तिच्यात जाईल का? नाव नको. क्काऽऽय? म्हंजे सद्गुणांच्या संगतीत जाताना आपलं मन कसं रिकाम्या घागरीवानी असाय पायजे, कोर्‍या पाटीवानी असाय पायजे. तरच शेजारपाजारच्या चांगल्या गोष्टी आपल्यात येतील. आमचं मनच वासनांनी लडबडलंया आनि आमी मोट्या साधुसंतांच्या शेवेला लागलो, तर आमी सुद्द होऊ म्हन्ता काय? कवा सुदीक न्हाई होनार. क्काऽऽय? तसंच हाय त्ये !"

तर असा आमचा दौलू ! दौलूला दोन भाऊ. मोठा भाऊ गावाकडं शेती करायचा. दौलूला शेतीतलं काही कळायचं नाही (त्याचीच भाषा वापरायची तर 'झ्याट काय कळायचं न्हाई') – म्हणजे प्रत्यक्ष शेती करण्यातलं – कात्री चालवताना उसाच्या साखरेचा उतारा वाढवायला सल्फेट चांगलं की युरिया की 'मिक्चर', हे मात्र तो व्यवस्थितपणे समजावून द्यायचा. दौलूचा धाकटा भाऊ दौलूकडंच त्याच्या चार पोराबाळांसंगं आणि 'मंडळी’संगं राहायचा. सहज ओघानं आलं म्हणून या भावाच्या ज्ञानाची माहिती सांगतो. भारतावरल्या चिनी स्वारीच्या वेळची गोष्ट. दौलूच्या दुकानातही राजकारण रंगणं स्वाभाविकच होतं. दौलूनं नेहमीप्रमाणं राज्यकर्त्यांवर घसर काढली. "ह्यो चीन ह्यो आसा उरफाट्या चालीचा आणि आमचा श्याना न्हेरू काय म्हणतो तर चीनला युनोत घ्या ! कशाला? आ? म्हणजे त्येनं व्हेटू का काय त्ये वापरायचं आनि आपली वाट लावायची. व्हय का न्हाई? क्काऽऽय?" यावर कोणी एका महाभागानं, "आ त्तस्सं न्हवे दौलुबाऽऽ..." म्हणत चीनला युनोत का घ्यायला पाहिजे ते सांगायला सुरवात केली. नेहमी आपल्याला हटकणार्‍या मोठ्या भावाच्या विरुध्द बाजू घ्यायला मिळते आहे, या विचारानं दौलूचा हा धाकटा भाऊ मध्ये घुसून म्हणाला, "तर काय राव. घ्यायलाच पायजे. आनि न्हाई घ्येतलं तर त्यो चीन काय गप र्‍हाईल वाटतंय व्हय तुमास्नी? आवो हिकडं कशी फौज पाटवली, तशीच तिकडं बी धाडून दील आणि पयले युनोच काबीज करून टाकील. येवढा मोट्टा हिंदुस्तान हाय, त्येच्यावर हाल्ला कराय डरला न्हाई त्यो. मग युनो-युनो काय हाय? आपल्या राजारामपुरीयेवडं तरी हाय का? चवथ्या गल्लीयेवडंबी नसल. दोन दिवसात युनोबी जिंकल आनि डयरेक्ट हिकडं यील. तवा समजंल ह्येनास्नी ! हां !"

दौलूनं आम्हाला अगदी लहानपणापासून पाहिलेले आहे. त्यामुळे आम्ही सगळी भावंडे एवढे शिकलो सवरलो, बरेवाईट कसेही दिवस निभावून नेऊन सुस्थितीत आलो याचं त्याला कौतुक वाटायचं. मधून मधून तो ते बोलूनही दाखवायचा. वेळोवेळीच्या त्याच्या तत्कालीन आराध्यदैवताचा आदर्श डोळ्यापुढं ठेवायचा आम्हाला उपदेशही करायचा आणि मधूनच एखादी खास 'फेव्हर' म्हणून आमच्या आधी नंबर असलेल्या शेंबड्या पोराला, आम्ही न बोलताही, "जरा दम धर बाळ, सायबाना लवकर जायचंय" म्हणून आम्हाला खुर्चीवर बोलवायचा.

माझा मोठा भाऊ - भाई - तेव्हा नोकरीनिमित्त गोव्यात असायचा. गोवा पोर्तुगीज जोखडाखालून मुक्त झाल्यावर, तिथं वस्तरे आणि धार लावायचे दगड फॉरेनचे आणि स्वस्त किंमतीत मिळतात असे कोणीतरी सांगितल्यावरून, एकदा दौलू गोव्याला गेला. तिथं भाईला त्याच्या ऑफिसात जाऊन भेटला आणि त्याच्या साहेबाला त्यानं भाई 'न्हानपनी' केस कापताना कसा आरडाओरडा करीत असे ते कौतुकाने सांगितलं. भाईनंही त्याचा पाहुणचार व्यवस्थित केला. त्याला गोवा दाखवायची व्यवस्था केली. लोकानी विचारल्यावर हा आमचा 'चाइल्डहूडमधला बार्बर' अशी ओळख करून दिली. चार दिवस राहून दौलू कोल्हापूरला परतला. परत आल्यानंतर त्याने भाईला पत्र पाठवलं:

'प्रीय भाईराव,
स.ण.वि.वि.,
तुम्ही मला पावलू बार्देसकराच्या दुकानातून तुमच्या नावावर घेऊन दिलेली फॉरेनची रेजर मशीनं आणि धारेचा दगड बेल्जमचा यांची रक्कम रुपये १३५ मी सवडीने जसी होईल तसी पाठवून देत आहे. मुलाना आसीरवाद. तूमचे दादा व बाकी सगळी मंडळी ठीक आहेत. कळावे. जीवाला जपून रहावे. कळावे
आपला दौलत विठ्ठल टिपुगडे'

पाकिटात पत्रासोबत दहा रुपयांची एक नोटही होती, पहिला हप्ता म्हणून.

मी पुढे मध्यपूर्वेला येऊन जवळजवळ स्थायिक झाल्यासारखा राहत असल्याने कितीतरी वर्षे सवडीने राहायला असा कोल्हापूरला जाऊ शकलो नाही. दोनएक वर्षांपूर्वी तसा योग आला, तेव्हा आवर्जून दौलूकडेच केस कापून घ्यायचे म्हणून राजारामपुरीत त्याचे दुकान शोधत गेलो. तिसर्‍या गल्लीतून आता 'श्रीराम हेअर कटिंग सलून’ चौथ्या गल्लीत 'वरलीकडच्या अंगाला हाय बगा' असा ठावठिकाणा मिळाल्यावर तिथे गेलो. दुकान मोठे पॉश झालेले दिसले. भिंत भरून असलेल्या अखंड आरशासमोर ओळीत मांडलेल्या चार अगदी आधुनिक खुर्च्या होत्या, कारागीर पांढरे धोप एप्रन घालून होते. एकाने मला, 'या साहेब' असे बोलावून त्यातल्या एका खुर्चीवर बसवले. इकडे तिकडे पहात मी दौलूला शोधू लागलो. तेवढ्यात समोरच्या आरशात मला मागच्या भिंतीवरल्या, टवटवीत फुलांचा हार घातलेल्या फोटोतून भगवा फेटा बांधलेला आणि मिश्किल डोळ्यानी हसणारा दौलू दिसला. डोळ्यांनीच म्हणाला, "काय मुकिनसाहेब, काय शोधतायसा? कारागीर माजा नातूच हाय. घाबरू नकासा. डोई मारतोय काय आपलं आसं समजून काय बसलायसा राव? दुबईतनं आलायसा, बसा की जरा नीट शेखावानी रुबाबात. बसा जरा नीट, हाम्बघा आस्सं !"

- mkarnik