आस्वाद : मनोहर सप्रे यांचे पत्रसंग्रह

मनोहर सप्रे एक व्यंगचित्रकार म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत, तेवढे लेखक म्हणून नाहीत, हे एक अनाकलनीय वास्तव म्हटलं पाहिजे. खरं तर त्यांनी नागपूरच्या 'तरुण भारत' मध्ये [मनमौजी या टोपणनावानं] आणि इतर नियतकालिकांत, दिवाळी अंकांतून अनेक स्फुटं, लेख लिहिले आहेत. व्यंगचित्रकलेवरच्या त्यांच्या लेखांचे 'आलस-कलस' [नील प्रकाशन, चंद्रपूर], 'फरसाण' [नील प्रकाशन, चंद्रपूर] आणि 'हसा की!' [राजहंस प्रकाशन, पुणे] असे तीन संग्रह प्रकाशित झाले आहेत. आजमितीला ती पुस्तकं 'आऊट ऑफ प्रिंट' असली, तरी त्यांच्या नवीन आवृत्त्या काढाव्यात असा सप्र्यांच्या चाहत्या वाचकांचा आग्रह आहे. ते घडून आलं, तर छानच होईल.

अभिव्यक्तीचं साधन म्हणून सप्र्यांनी विपुल प्रमाणात आणि मननीय स्वरूपाचं पत्रलेखन केलं आहे. कोणा एका व्यक्तीला उद्देशून पत्र लिहिलं असलं, तरी सप्र्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, "निमित्तमात्र कुठला तरी एक मायना असला, तरी मुळात तो स्वतःशीच संवाद वाटावा .. 'आधी मी आहे, मगच सारं आहे' हा त्यांचा अस्तित्ववादी पाया असतो. त्यातला प्रासंगिक दुतर्फीपणा सोडला, तर एकतर्फी संवाद हेच त्यांचं खरं विशेषण असतं... असल्या पत्रात ते कुणाला लिहिलेलं आहे यापेक्षा काय लिहिलं आहे यालाच जास्त महत्त्व असतं. याच युनिव्हरसॅलिटीमुळे असलं पत्र वाचणार्‍या वाचकाला जणू ते आपल्यालाच लिहिलेलं आहे असा भास होतो." सप्र्यांनी आपले आप्त, मित्र आणि काही ख्यातकीर्त व्यक्तींना लिहिलेल्या पत्रांपैकी काही निवडक पत्रांचे - 'सांजी' आणि 'रुद्राक्षी' असे दोन संग्रह आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतल्या विचारधनाची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे.

पाश्चात्य देशांत पत्रलेखन हा एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून मान्यता पावलेला आहे. थॉमस मान किंवा हर्मन हेस यांसारख्या लेखकांनी हजारोंच्या संख्येनं पत्रं लिहिली आणि त्यांचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. व्हिन्सेंट व्हॅन गॉग ह्या सुविख्यात चित्रकारानं आपला भाऊ थिओ ह्याला लिहिलेल्या पत्रांचा संग्रह सुविख्यात आहे. पंडित नेहरूंनी तुरुंगातून आपल्या मुलीला -इंदिरेला- लिहिलेल्या पत्रांचं पुस्तकही गाजलेलं आहे. त्यामानाने आपल्याकडे अशा प्रकारच्या पुस्तकांची संख्या कमी आहे. जी. ए. कुलकर्ण्यांच्या पत्रांचे चार खंड किंवा ना.धों. महानोरांनी पु.ल. देशपांड्यांना लिहिलेली पत्रं [आनंदाचे यात्री] असे काही सन्माननीय अपवाद जरूर असले, तरी एकंदरीत हा साहित्यप्रकार मराठीत उपेक्षितच राहिला आहे हे मान्य करावं लागेल. पण एवढ्या कारणाकरताच मला सप्र्यांचे पत्रसंग्रह महत्त्वाचे वाटत नाहीत, तर त्यांतल्या साहित्यिक मूल्यांमुळे आणि जाता जाता मांडलेल्या 'फिलॉसॉफिकल थॉट' मुळे मला ते लक्षणीय वाटतात.

व्यक्तीपरिचय
सप्र्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे, व्यंगचित्रं काय, कविता काय किंवा वात्रटिका काय, त्यांतले शब्द किंवा रेषा म्हणजे पापुद्रे असतात. त्यांचा खरा अर्थ आणि कलाकाराचं व्यक्तिमत्त्व त्यामागेच दडलेले असतात. वाचकाला तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे सावकाशीनं एकेक पापुद्रा सुटा-सुटा करत मागे जावं लागतं. सप्र्यांची पत्रं वाचताना हाच अनुभव येतो. त्या पत्रांमागे एक बहुढंगी, बहु-आयामी असा एक माणूस आहे. त्याचं आयुष्य अनुभवसंपृक्त आहेच, पण ते विविध अनुभव आणि त्यातून घडत गेलेलं स्वतःचं व्यक्तिमत्त्व ह्या दोहोंकडे चिकित्सकपणे पाहण्याची तटस्थ वृत्ती त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे आपले निष्कर्ष स्वच्छपणे शब्दांकित करण्याची विलक्षण प्रतिभासुद्धा आहे; त्यामुळेच ही पत्रं नुसती वाचनीय झाली आहेत असं नव्हे, तर वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद त्यांच्यांत आहे.

Sanji_Cover.png सप्र्यांना अगदी लहानपणापासूनच दारिद्र्याशी झगडत वाटचाल करावी लागली. वार लावून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. खांद्यावर कौटुंबिक जबाबदार्‍यांचं ओझं होतं, त्यामुळे पुढे शिकण्याऐवजी त्यांनी सरकारी ऑडिट खात्यातली बरीशी नोकरी पत्करली. त्यांना आय्.ए.एस्.च्या परीक्षेला बसायचं होतं म्हणून त्यांनी खात्याची रीतसर परवानगी मागितली, तर एका खडूस वरिष्ठांनी ती नाकारलीच, पण वरती, 'आपली औकात ओळखून वागत चाला' असा अनाहूत सल्लाही दिला. सप्र्यांनी ती नोकरीच सोडली! दुसर्‍या नोकरीच्या शोधात भटकंती करता करता, आय्.ए.एस्.ची परीक्षा द्यायचं राहूनच गेलं. त्यांनी चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नसलं, तरी अंगात कलागुण होतेच. 'मार्मिक'च्या सुरुवातीच्या काळात सप्र्यांनी तिथे व्यंगचित्रकार म्हणून काही दिवस काम केलं. मनाचा कल मार्क्सिझमकडे होता, त्यामुळे ट्रेड-युनियन चळवळीत काही दिवस पूर्ण-वेळ कार्यकर्ता म्हणून काम करून पाहिलं. [पुढे तर एकदा चक्क लोकसभेची निवडणूकही लढवली!] अशाच भटकंतीत केंव्हातरी त्यांनी एम्.ए.[तत्त्वज्ञान]ची पदवी संपादन केली आणि पुढची बावीस वर्षं [त्यांच्याच शब्दांत, यातनामय नाइलाज म्हणून] प्राध्यापकी केली. त्यांचा विषय नसलेली मुलं त्यांच्या तासाला गर्दी करतात, वर्गात जागा नसली तर बाहेर उभं राहून त्यांचं लेक्चर ऐकतात म्हणून प्राचार्यांनी सप्र्यांचीच कानउघाडणी केली, तेव्हा पुढचा-मागचा कोणताही विचार न करता, 'जपत किनारा शीड हाकणे नामंजूर' असलेले सप्रे त्या दिवशीच, राजीनामा देऊन बाहेर पडले![नोकर्‍या सोडण्याविषयीची आपली भूमिका आणि नोकरी सोडल्यानंतर उपजीविकेची साधनं शोधण्यासाठी केलेली पायपीट यांचं ह्रद्य वर्णन एका पत्रात आलं आहे- रुद्राक्षी, पृ.१६७-१६८].

पुढे त्यांनी आपल्या कलेच्या बळावर चरितार्थ चालवला आणि सगळ्या प्रापंचिक जबाबदार्‍या यथास्थित पूर्ण केल्या. व्यंगचित्रकाराप्रमाणेच एक अव्वल दर्जाचे 'डिझायनर' आणि काष्ठ-शिल्पकार अशीही त्यांची एक व्यावसायिक ओळख आहे. त्यांच्याकडे अनेकजण ड्रिफ्टवुड, नदीतले गोटे, बांबू, टेराकोटा अशा वस्तूंपासून कलाकृती बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन गेलेत. चंद्रपूरच्या जंगलांतल्या कित्येक आदिवासी मुलांना कलाशिक्षण देऊन त्यांनी पोटापाण्याला लावलं आहे; एवढंच नव्हे, तर त्यांच्या कलाकृती थेट फ्रान्समधल्या प्रदर्शनात मांडल्या आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांत त्यांना वक्ता म्हणून, तर सरकारी समित्यांवर तज्ज्ञ म्हणून बोलावलं जात असे. आताशा प्रकृतीच्या कारणामुळे [त्यांचं वय ७६ वर्षं आहे] त्यांनी दूरचे प्रवास करणं आणि 'लष्करच्या भाकर्‍या भाजणं' खूप कमी केलं असलं, तरी आजही त्यांचा दिनक्रम खूप व्यग्र असतो. त्यांना आलेल्या निवडक पत्रांचा एक संग्रह 'दहिवर' या नावानं प्रसिद्ध व्हायचा आहे, त्याचं संकलन-संपादन करण्यात ते सध्या गर्क आहेत. सप्र्यांच्या पत्रांचे पापुद्रे उलगडताना, त्यांच्या जीवनाची ही 'चित्तरकथा' वाचकाला उपयोगी पडेल म्हणून त्यांचा हा अल्पसा जीवन-परिचय करून देणं मला आवश्यक वाटलं.

सप्रे: एक वाचक

ह्या सगळ्या धकाधकीच्या वाटचालीत सप्र्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाचा व्यासंग मात्र कसोशीनं जोपासला. त्यांच्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांचा एक फार मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धावरची असंख्य पुस्तकं आणि छायाचित्रंही त्यात आहेत. चार्ली चॅपलीनसंबधीची पुस्तकं, लेख, छायाचित्रं, त्याच्या चित्रपटांच्या डी.व्ही.डी. यांचं असंच एक दुसरं समृद्ध दालन. त्यांचं चंद्रपूरचं घर म्हणजे पुस्तकं, लेखांच्या प्रती, नियतकालिकांचे अंक, छायाचित्रं, काष्ठशिल्पं, चित्रं, रेखाटनं, इतर कलावस्तू या सगळ्यांचा एक भलामोठा अजबखाना आहे! त्याचं खरं कारण म्हणजे हा माणूसच अजब आहे, असं मला वाटतं.

सप्र्यांनी त्यांच्या पत्रांत असंख्य आणि नानाविध विषय हाताळले आहेत. त्यात वारंवार त्यांच्या आवडत्या लेखकांच्या साहित्यकृतींचे उल्लेख आणि चर्चा येते. जी. ए. कुलकर्ण्यांच्या साहित्याचा खूप प्रभाव त्यांच्यावर आहे, हे सहजगत्या जाणवतं. त्याबाबत एका पत्रात सप्रे म्हणतात,"जी.ए. मला आवडतात याचं कारण साहित्याचा मी काही मोठा जाणता आहे हे तर नाहीच, तर अगम्य असणार्‍या प्रश्नांची तेवढीच अगम्य उत्तरं देऊन त्यांनी मला कायम पाठलागात व्यस्त ठेवलं म्हणून!" जी.एं.च्या 'स्वामी', 'विदूषक', 'पावशा भगत', 'अग्निस्रोत', 'माघारा', 'अनंत', 'प्रवास' अशा कित्येक कथांचे उल्लेख आणि चर्चा किंवा अवतरणं त्यांच्या अनेक पत्रांतून प्रसंगोपात वरचेवर येत रहातात. 'रुद्राक्षी'ची अर्पणपत्रिकाच जी.एं.च्या 'स्वामी' कथेतल्या अवतरणाची आहे-"ज्यातून सुटण्याचा मार्ग आपल्या हातात आहे ते आयुष्य कितीही निर्दय असलं, तरी ते आपल्याला चिरडू शकत नाही. कोणत्याही क्षणी हा खेळ संपवण्याची ताकद आपल्याजवळ असेल, तर मग ह्या खेळाला काय भ्यायचं? एक खेळ म्हणूनच तो खेळला पाहिजे."

त्यांच्या पत्रांत ज्यांचा उल्लेख वारंवार येतो असे त्यांचे अन्य काही आवडते साहित्यिक म्हणजे हर्मन हेस, रिल्के, आल्बर्ट कामू, सार्त्र, सिल्व्हिया प्लाथ, ओशो, गॅब्रियेल मार्क्वेझ, बर्ट्रांड रसेल, व्हिक्टर फ्रँकल, ग्रेस, खानोलकर, महेश एलकुंचवार इ. अनेक ठिकाणी इंदिरा संत, शांता शेळके, शरच्चंद्र मुक्तिबोध, बा.भ. बोरकर, आरती प्रभू इ.च्या कवितांची अवतरणंही अगदी सहजपणे येत राहतात. व्हिन्सेंट व्हॅन गॉगने त्याच्या भावाला - थिओला - लिहिलेली पत्रं, इसाडोरा डंकन आणि इन्ग्रिड बर्गमन यांची आत्मचरित्रं इत्यादी पुस्तकांची चर्चाही त्यांनी अनेक पत्रांतून आत्मीयतेनं केली आहे.

"स्वतःची स्वायत्त वाट गवसून देणारा असा एक दिव्य क्षण वाट्याला यायला भाग्य लागते. तो अनेकांच्या आयुष्यात येऊन जातो, पण अशांतले बहुसंख्य जनमान्य सुखाच्या मोबदल्यात त्याचा सौदा करून मोकळे होतात. अशात उरफाट्या प्रवासाला निघालेली इसाडोरासारखी एखादीच. या निर्णयाची किंमत म्हणून तिला चिरंजीवी यातना भोगाव्या लागल्या. त्यातून ती तगली. कारण तिनं अखेरपर्यंत आपलं आत्मभान आणि इमान कायम राखलेलं, म्हणूनच तिचं चारित्र्य चारचौघांच्या क्षुद्र मापानं मोजणं अन्यायाचं आहे. .... इसाडोरा वाचताना मला सारखा गौतम बुद्ध आठवत होता. अनादि कालापासून सारं जग ज्यांच्या पाठलागात आहे, त्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि संतती या गोष्टी पूर्वप्राप्त असतानाही स्वखुषीनं त्यांचा त्याग करून उफराट्या दिशेनं त्यानं आपला प्रवास का आरंभावा? मला वाटून गेलं, की खात्रीनं हे वेडेपण नसावं! जे आहे त्यापेक्षा आत्म्याला अधिक तृप्त करणारं कुठलं तरी थोरलं श्रेय असावं आणि त्याचा शोध घेणं, हेच आपलं जीवितकार्य त्याला वाटलं असावं. दोहोंतला फरक एवढाच, की आपल्या शोधात बुद्ध ज्ञानमार्गे गेला आणि इसाडोरा कला म्हणजे भावनामार्गे. मात्र साधक म्हणून उभयतां सारख्याच तोलामोलाचे! .. मी तर इसाडोराच्या आत्मचरित्राचा कायम ऋणी आहे.. अखेर प्रत्येकाला आपल्याच त्रिज्येच्या मापाचं वर्तुळ शक्य असतं. मात्र बरेचदा आपण ते गाठल्याच्या भ्रमात अलीकडेच थांबतो, असं होऊ नये म्हणून नव्या प्रयत्नांतून प्रत्यही स्वतःच्या क्षमतांची तपासणी करावी लागते. या प्रयोगात यातना अटळ होतात. यातनांचं हे मोल देण्याची ज्यांची तयारी नसते, त्यांना मध्येच प्रवास थांबवून सहज सुखी होता येतं. आपलं असं होऊ नये म्हणून माझ्यालेखी इसाडोरा हा ध्रुवतारा ठरला आहे " [रुद्राक्षी, पृ. ४४-४५].Rudraxi_Cover.png "प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या तरी एकाची अंतिम निवड करावी असे दोन वेगवेगळे रस्ते समोर येतात. हा क्षण जुगारी महत्त्वाचा असतो, कारण निवड झाली की परतीचा मार्ग नसतो. कोणताही एक पर्याय निवडला तरी लगेच दुसरा अधिक आकर्षक वाटतो. आपल्याला नक्की काय हवं आणि काय पेलण्याजोगं आहे, याचीच निश्चित कल्पना नसलेले लोक To be आणि Not to be यामधली म्हणजे somehow to be अशा अनिर्णित ओढाताणीतून जगत जातात. बहुसंख्य जे निखळ व्यवहारी असतात ते तारतम्यानं विचार करून कमीत कमी धोक्याचा आणि कष्टाचा मार्ग पत्करून रूढार्थानं सुखी होतात. त्यांच्या तुलनेत प्रत्येक समूहात काही शेलके असे असतात, की जे आयुष्याचा हमरस्ता सोडून जाणूनबुजून आडवाटेत शिरतात. त्यांना खाचखळगे, अडचणी, धोके याविषयी विलक्षण ओढ असते. अडचणी, आव्हानं स्वतःवर ओढवून घेऊन त्यातून त्यांना आपल्यातल्या खर्‍या 'स्व'चा शोध घ्यावासा वाटतो. त्यातच त्यांना जगावं आणि मरावसं वाटतं. नेमका हाच आशय इन्ग्रिड [बर्गमन]च्या जगण्यातून, म्हणून शब्दांतून व्यक्त झाला आहे. 'दुसर्‍यांचे दु:ख कळण्यासाठी दु:खाचा अनुभव घेणे आवश्यक असते. आयुष्यात चढउतार चालूच असतात. तुम्ही सदैव सुखात असूच शकत नाही. मी तर म्हणेन, की जो मनुष्य सदैव सुखात असतो तो प्रचंड कंटाळवाणा असतो' . मला इथे Yeats च्या 'We begin to live when we conceive life as a tragedy' ह्या वाक्याची आठवण झाली" [रुद्राक्षी, पृ. ५६-५७].

त्यांनीच एका पत्रात म्हटलं आहे, " आपण कलाकारात स्वतःचंच प्रतिबिंब शोधत असतो.ते ज्या क्षणी आढळतं, त्या क्षणी ती कलाकृती आपली होते आणि क्षणिक आपणच तो कलाकार होतो. तत्त्वमसि म्हणजे 'तूच तो आहेस' हा साक्षात्कार देणारं तादात्म्य म्हणजेच कलाकार-रसिक नातं. आपल्याला जे अभिव्यक्त करावसं वाटतं, पण क्षमतेअभावी करता येत नाही ते नेमकं कुणी सादर केलं की मनात तृप्तीची दाद उमटते". [रुद्राक्षी, पृ.२९].

तर दुसर्‍या एका पत्रात ते म्हणतात,"साहित्य हा कल्पिताचा म्हणून निव्वळ मनोरंजनाचा प्रांत आहे असा एक सर्वसाधारण समज आहे, म्हणून ते स्वतःशी ताडत वाचण्याचा प्रयोग सहसा होत नाही. अभिजात लेखक जसा स्वतः पात्र होऊन कथानक लिहितो, तसंच स्वतःही 'पात्र' होऊन वाचकानं वाचन केलं तर त्या तादात्म्यातून इतरांविषयीची, तसंच स्वतःविषयीची समज वाढते. त्यातली पात्रं मग आपल्या रक्तामांसाची होतात" [रुद्राक्षी, पृ. ५५].

"जी.एं. प्रमाणेच सार्त्र, काफ्का, कामू, हर्मन हेस, स्ट्रेनबर्ग, लव्रेन्चे, नॉर्मन मेलर, टेनेसी विल्यम्स आदी मंडळींना माझ्यासाठी तरी मी माझीच रुपे मानतो. तीर्थाटन करून आलेल्या वारकर्‍याचे पाय धरून बसल्या जागी वारीचे पुण्य लाटणार्‍या पांगळ्यासारखाच हा प्रकार आहे. यात आत्ममग्नतेचा एखादा दुर्मिळ क्षण मिळालाच, तर मी स्वतःच्या चार-दोन ओळी लिहितोदेखील, पण ते गायनशाळेत झाडलोट करणार्‍याने चोरटा आलाप घ्यावा, तसलेच." [सांजी, पृ.१०३].

"मी साहित्याला अंतिम उत्तराचं साधन मानत नाही, कारण 'अखेरचा शब्द' नावाचं काही अस्तित्वात असंत नाही. वास्तव हा त्यापलीकडचा नेणिवेचा प्रांत आहे. तरीही जे साहित्य आपल्याला जाणिवेच्या सीमेपाशी पोचवतं, तेच सबल मानावं लागतं हा माझा तरी समज आहे. अस्तित्वविषयक [existential] समस्यांच्या उत्तरांचा शोध हाच महत्त्वाचा असल्यानं साहित्याबाबत माझ्यात 'strong likes and dislikes' आहेत." [रुद्राक्षी, पृ.१०७].

हे सर्व वाचताना एक वाचक म्हणूनही सप्रे किती असामान्य आणि साक्षेपी आहेत याची प्रचिती येत राहते.

केवळ अभिजात नव्हे, तर अगदी आधुनिक साहित्याचं वाचनही सप्रे असंच तादात्म्यानं करताना दिसतात. ग्रेस, शिवाजीराव सावंत, माधव आचवल, विजय तेंडुलकर, ग.वा.बेहेरे यांसारख्या प्रथितयश साहित्यिकांना त्यांनी लिहिलेली पत्रं जितकी मनमोकळी आहेत, तितकीच मेघना पेठे, विजय पाडळकर, अनिल कुसुरकर, भारत सासणे, श्याम पेठकर, रामदास फुटाणे, संभाजीराव कदम, शरणकुमार लिंबाळे, लोकनाथ यशवंत आदी 'ताज्या दमा'च्या लेखक-कवींना त्यांनी लिहिलेली पत्रं म्हणजे आस्वादक समीक्षेची उत्तम उदाहरणं आहेत. गमतीचा भाग असा, की सप्र्यांना स्वतःला समीक्षा हा प्रकार भावत नाही! "खूप वर्षांपूर्वी वाचलेला इंग्रजीतला ब्रॅडले आणि मराठीतले माधव आचवलांचे 'जास्वंद' सोडल्यास साहित्यावरच्या चर्चाग्रंथांचे माझे वाचन शून्य आहे आणि हे शून्य मी कटाक्षाने जपत आणले आहे. ... गायनेकॉलॉजीवरच्या ग्रंथवाचनाने गर्भधारणा होते, असं मानण्याइतपत ते खुळेपणाचं आहे!" [सांजी, पृ.१०२]

कला आणि व्यवहार

एक कलाकार आणि एक रसिक या नात्यानं सप्रे साहजिकच अनेक कलाकारांच्या संपर्कात आले. अडिवरेकर, बी.विट्ठल, धर्मापूरकर, पंडितजी आदींना लिहिलेल्या पत्रांतून त्यांनी कला आणि व्यवहार याविषयीची आपली मतं अतिशय प्रांजळपणे मांडली आहेत.

एके ठिकाणी ते लिहितात, "सामान्य स्थितीतून वर येणार्‍यांच्या मनांत खोलवर तळाशी एक सूक्ष्मसा न्यूनगंड असतो. धाडसी निर्णयाच्या क्षणी नेमका तो आपल्याला मागं खेचत असतो. एकेकाळी माझ्यातही तो होता, पण संघर्षाच्या रियाझात तो नाहीसा होऊन माझ्यात जादाच अहंगंड आला. वाचन, मनन, संवादी भाषा, वागण्याची रीती, मानसशास्त्रीय निरीक्षण आणि अंदाज, बहुश्रुतपणा या जमांच्या आधारे मी पुढे आक्रमकपणे वागू शकलो. मात्र या तथाकथित श्रेयातून माझी एकच शोकांतिका झाली, ती म्हणजे, जगण्याच्या या वेगात माझ्यातल्या कलाकाराचा मात्र बळी गेला. ऑपरेशन यशस्वी झालं, पण रोगी दगावला असं सारं विपरीत झालं." [रुद्राक्षी, पृ १५].

व्यंग-विनोद

सप्रे एक नाणावलेले व्यंगचित्रकार असल्याने, व्यंगचित्रं आणि उपहासात्मक विनोद याबाबतची त्यांची मतं महत्त्वाची ठरतात.

"माझ्या मते विनोदाला आधारभूत असलेल्या विसंगती महत्तमपणे राजकारणातच आढळतात, हा एक मोठा गैरसमज आहे. खरं तर, पृष्ठभागावरच्या दृश्य राजकारणाला तोलणारे अदृश्य आधार समाजजीवनाच्या तळाशीच आढळतात; म्हणून मी त्यांनाच लक्ष्य बनवून व्यंगचित्रं रेखाटत गेलो. समाजजीवनाच्या एकूण सगळ्या पातळ्यांवर ज्या विसंगती आढळतात, त्या व्यंगोपहासाने नाहीशा होणं शक्य नसलं, तरी निदान त्यांना expose करून त्या जाणवून देण्याचं अमाप सामर्थ्य त्यात आहे असा माझा विश्वास आहे. पाश्चात्य जगतात व्यंगचित्रांसह एकूण विनोद हा समाजजीवनाचा आरसा म्हणून त्याला विलक्षण महत्त्व आलेलं आहे. आपल्याकडे असं काही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकलं नाही. कारण आम्हाला त्या विसंगती नाहीशा करण्याऐवजी त्या उदात्तीकरणातून [sublimation]जपाव्याशा वाटतात.म्हणून आम्ही अधिमान्यतेद्वारे [validation] त्यांना प्रतिष्ठित केलं आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय समाजजीवनाला एक अभूतपूर्व दांभिकपण येत गेलं. ....ऑलिंपिकमधे भारतीयांचे हात रिते राहतात, म्हणून दरवेळी चिडणार्‍यांपैकी कुणा एखाद्याचा बारावीत पंच्याण्णव टक्के गुण मिळवणारा मुलगा अ‍ॅथलीट वा खेळाडू होतो म्हणाला, तर मेडिकलला किंवा इंजिनियरिंगला जा म्हणून आडवे पडणारच! व्यवहारांप्रमाणंच धार्मिक श्रद्धाही त्याला अपवाद नाहीत. पूजेच्या म्हणून बाजारात मिळणार्‍या स्वस्त खारका-सुपार्‍या आणि लांडे देवीचे खण याचंच उदाहरण. ... समाजाकडून माझी एखाद्या ऑडिटरसारखी 'बोले तैसा चाले' एवढीच अपेक्षा आहे. त्याच दृष्टीनं मी सभोवतालच्या परिसराकडे बघतो. बोलण्यातून चालणं वजा केलं, की व्यंग बाकी उरतं हेच एकमेव सूत्र मला यातून गवसलं आहे."[रुद्राक्षी, पृ.९३].

"आपल्या जाणिवेच्या कडांना जे जे स्पर्शून जातं, त्याची नोंद घेण्याचा आणि त्याला स्वीकृत माध्यमातून अर्थवाही करण्याच्या प्रयत्नाला मी कलाप्रकार मानतो. व्यंगचित्रकार म्हणून विसंगतीच्या शोधार्थ मी मानवी जीवनाकडे पाहत गेलो. यात मला विरोधाभासांआड दडलेलं तडजोडीतलं कारुण्य आढळलं. या कारुण्यातही एक लोकविलक्षण सौंदर्य असल्याचा साक्षात्कार मला चार्ली चॅप्लीननं दिला. प्रकाशानं उजळलेल्या परिसरात एका अंधार-चौकटीत कुणीतरी कुणाचीतरी वाट पाहत उभं असावं; छायांच्या पावलांनी आलेल्या रात्रवेळी अत्यंत शांत असलेलं तळं त्यात फेकलेल्या दगडानं कापरं-कंपित व्हावं; आपल्या आयुष्याची ही शेवटची संध्याकाळ आहे हे उमगून आलेल्यानं खिडकीबाहेर तांबडं-पिवळं आभाळ आपल्या थिजत्या नजरेवर अखेरचं नोंदवावं; चिंध्यात गुंडाळलेल्या अर्भकाला स्पर्श करताना राजपदाला तुच्छ करणारा एक क्षण भिकारणीला पकडता यावा; एखाद्या मुग्धेनं कुणालाही ज्ञात नसणार्‍या एका आठवणीनं स्वतःशीच लाजावं; स्मशानातला चाफा भरगच्च फुलून यावा; नक्षत्रांच्या एकाकी छताखाली देवपुत्रानं आपले उष्ण श्वास संपवत मानेवरचा ताबा सोडावा; समर्पणाच्या तयारीनं कोसळताना एकाएकी समोरच्या देहावर कोडाचा डाग आढळावा; चविष्ट मटण खाताना अचानक बोकडाचा देह आठवावा; आयुष्यभर साथ देणार्‍या पत्नीची चिता पेटवताना शालीला गाठ मारलेल्या भरजरी पैठणीचा पदर मिरवणार्‍या एका नवयौवनेची आठवण यावी; यांसारख्या विरोधाभासांतून जीवन उधळत, ओसंडत, गळत, ठिबकत प्रवाही होत असतं. अभिव्यक्तीला हे सारंच आव्हान असतं. तुम्हां-आम्हां सार्‍यांच्याच जीवनात असले विरोधाभास आले असणार. सामान्य माणूस म्हणून त्यातले जे माझ्या वाट्याला आले, त्यांचंच कलात्मक भाषांतर करण्याचा माझा अव्याहत प्रयत्न राहिला." [ रुद्राक्षी,पृ.१२].

"जे जे क्षणिक ते ते उथळ म्हणजेच गांभीर्याचा अभाव असलेले व म्हणून मनावर घेण्याजोगे नसते हा एक समज आपणा सर्वांच्या मनावर फार खोलवर रुजवण्यात आला आहे. म्हणूनच गांभीर्याचे आवाहन करताना 'हसण्यावारी नेऊ नका' असला शब्दप्रयोग केला जातो. मला जे जाणवते ते नेमके याच्या उलट. .... प्रयत्नपूर्वक चढवलेल्या गांभीर्याच्या मुखवट्याला हास्यास्पद करणे हे विनोदाचे प्रयोजन आहे. म्हणून विनोदाने सांगितलेले नुसतेच वास्तव असत नाही, तर अतिवास्तव असते. ते निखळ स्वरूपात सहन करणे अशक्य असते, म्हणून त्याला हसण्यावारी नेले जाते. ... व्यवस्थेचे सरप्रतीक असलेल्या राजसिंहासनासमोर सत्य फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात, जिवाचे मोल द्यायला तयार असलेला क्रांतिकारक किंवा विदूषक." [सांजी, पृ.८०].

राजकीय-सामाजिक व्यवस्था

शरणकुमार [सांजी, पृ.१००]आणि शा.शं.रेगे [सांजी, पृ.८१] यांना लिहिलेल्या पत्रांत त्यांनी दलित साहित्य आणि 'आंबेडकरी' चळवळ यांची केलेली मीमांसा जितकी मार्मिक आणि वास्तववादी आहे, तितकीच सहानुभूतीपूर्ण आहे.

शंकरराव जाधव [सांजी, पृ.११७], अण्णा हजारे [रुद्राक्षी, पृ.४७], श्रीपाद [रुद्राक्षी, पृ.१७७], शंकरराव शास्त्री [रुद्राक्षी, पृ.९१] प्रभृतींना लिहिलेल्या पत्रांत त्यांनी भारतीय समाजजीवनाचं आणि राजकीय व्यवस्थेचं नेटकं विश्लेषण केलं आहे.

आर्.के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रं [रुद्राक्षी, पृ.१२१] असोत किंवा बाबा आमट्यांचं आनंदवन [सांजी, पृ. १९] असो, प्रस्थापित मतप्रवाहाविरुद्ध जाऊन आपली सडेतोड मतं तर्कशुद्ध रीतीनं मांडायला सप्रे कचरत नाहीत.

"सर्वसामान्यांत स्वतःच्या अपुरेपणाची आणि मर्यादांची एक कायम खंत असते म्हणून उदात्त ध्येये त्यांना आकृष्ट करून जातात. आकृष्ट करण्याचे हे कसब एकदा का आत्मसात झाले, की मानवाचा महामानव व्हायला वेळ लागत नाही आणि हलकेच हा महामानव एक संस्था बनतो. केवळ राजकारणातच हे होते आणि चालते हा एक गैरसमज आहे. राजकारण, धर्मकारण, अर्थकारण आणि समाजकारण यांचे मुखवटे वेगवेगळे असले तरी त्यामागला चेहरा तोच असतो. महामानवाची खोळ एकदा स्थिरावली, की त्याच्याभोवती हितसंबंधांचे जाळे निर्माण होते. हे हितसंबंध व्यवस्थाबद्ध झाले की संस्थेचे संस्थानात रूपांतर होते. ... आनंदवनातला मित्रमेळावा संस्थान आणि संस्थानाधिपतींच्या गौरवासाठी भरवल्या जातो. म्हणूनच करमणुकीचे कार्यक्रम सोडल्यास त्यात जयजयकाराखेरीज काहीच नसते. आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांशी कुणाचाही संपर्क येऊ दिला जात नाही. तसेच कार्यात्मक योजनांबाबत कोणतीही सार्वजनिक चर्चा होत नाही. .... ध्येयवादाचे जाडजूड कवच बाजूला केले, तर आनंदवनात एक प्रचंड क्षुद्रत्व आढळून येते. .... मला खंत एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे माझ्यासारख्या धाकट्या माणसात जे क्षुद्रत्व आहे ते बाबांसारख्या थोरांतही असावे याची." [सांजी, पृ.१९].

स्वातंत्र्यचळवळीत कित्येकांनी सर्वस्वाचा होम केला. पण स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सक्रिय राजकारणातून स्वेच्छेने निवृत्ती पत्करली. वैयक्तिक लाभाच्या अभिलाषेने सत्ता स्वीकारली, की त्यागाचं पावित्र्य संपतं या गृहितातून, सत्तालोभ नसणे म्हणजे निरपेक्ष त्याग असं एक समीकरण दृढ झालं. मात्र तेवढ्यावरून, निष्क्रिय अलिप्तपणा काही समर्थनीय ठरत नाही असं सप्रे ठामपणे मांडतात. त्यांच्या मते, सत्ताबदल झाल्याखेरीज म्हणजेच उपर्‍या ब्रिटिश सत्तेच्या जागी स्वकीय सत्ता आल्याखेरीज 'सुराज्य' शक्य नाही हे स्वातंत्र्यचळवळीच्या मागचं आद्य गृहित होतं. ज्यांनी ही कल्पना जनमानसात रुजवली त्यांना नेते म्हणून जनतेने उचलून घेतलं. "चळवळीच्या वाढीत एके क्षणी चळवळीच्या नेत्यांनी सत्ता हस्तगत करणं आणि दिल्या गेलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी ती वापरणं अपेक्षित होतं. ..काहींनी सत्तेचा स्वीकार केला; पण स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारा एक फार मोठा समूह त्यागाच्या सबबीखाली सत्ताविन्मुख झाला. प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्तेत प्रत्यक्ष सहभाग शक्य नसला, तरी चळवळीच्या अखंडतेतून सत्तेशी संलग्नता मात्र सगळ्यांना शक्य होती. सत्तेवर अंकुश ठेवून तिला निर्धारित दिशेवर कायम राखणं यातून सहज शक्य झालं असतं. .... गांधीजींसारखे स्वातंत्र्यचळवळीचे अग्रणी स्वतः सत्तेत सामील झाले नसले, तरी त्यांनी सत्तेशी संलग्नता कायम ठेवली होती. स्वातंत्र्यानंतर लगोलग त्यांचा अंत झाला नसता, तर सत्तेच्या पुढल्या बेलगाम वापराला निश्चितच आळा बसला असता. या प्रयत्नात स्वराज्यातला तुरुंगवास भोगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. स्वतःला गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी म्हणवणार्‍यांनी त्यांच्या जाण्यानंतर लगेचच संन्यास पत्करला. 'निष्काम कर्म' ही खुद्द गांधीजींचीच जीवननिष्ठा होती. ती न पेलता आल्यामुळे, तीतला 'कर्म' हा घटक बाजूला सारून 'निष्काम' या एकांगी मुद्द्याला कवटाळून ही मंडळी विरक्त होऊन बसली. .... मकदूर नसणे हा या निष्क्रियतावाद्यांचा गुन्हा नाहीच; मात्र मकदुराच्या या अभावाला स्वार्थत्यागाचा मुलामा देऊन त्याला गौरवास्पद करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच आक्षेपार्ह आहे." [सांजी,पृ.८३].

सप्र्यांची अशी विवेचनं सर्वांनाच पटतील असं नाही. परंतु त्यांचा परखडपणा मात्र सर्वच थरांतल्या वाचकांना आवडावा.

शक्यतोवर चित्रपट पाहणं टाळणार्‍या सप्र्यांना कुणीतरी आग्रहानं 'मुन्नाभाई एम्.बी.बी.एस.' ह्या चित्रपटाला नेलं. सप्र्यांना त्यातल्या 'सटायर'मध्ये सद्य समाजस्थितीवरची गंभीर कॉमेंट आढळली आणि खूप आवडलीही. त्याबद्दल ते म्हणतात,"जगातील सगळ्यात मोठी, सर्वांत भ्रष्ट आणि अकार्यक्षम लोकशाही ही गेल्या साठ वर्षांतली आमची उपलब्धी आहे. ज्यांना पोलिसांनी साखळीबंद करावं, तेच आता माननीय म्हणून झेड सिक्युरिटीतनं मिरवताहेत. निवडणुकांत पुढारी जिंकताहेत, ते मतदारांचा पराभव करूनच... बलत्कारितांचं वय विशीवरून पाचावर येऊन ठेपलंय आणि पोलिसांवरच संरक्षण मागण्याची पाळी येते आहे हे सगळे याचेच मासले. दुर्दैव म्हणजे आम्ही हे सारं विझत्या रक्तानं, थिजल्या डोळ्यांनी बघतो आहोत. हे सारं केव्हातरी एखाद्या चमत्कारानं नाहीसं होईल या भाबड्या समजुतीबरोबरच हा चमत्कार करणारा कुणी अवतार जन्मण्याची वाट आम्ही अधू डोळ्यांनी बघतो आहोत.... तात्पर्य, गांजलेले आम्ही जनसामान्य एका नव्या महात्म्याच्या शोधात आहोत." [रुद्राक्षी, पृ.१८०].

पालक-पाल्य संबंध

एका कुटुंबवत्सल गृहस्थाचे आपल्या मुलांशी संबंध कसे असावेत याविषयीही सप्रे विचार करतात. "मुलाबाळांवर अवाजवी माया करताना आपण नकळत त्यांना भावनात्मकदृष्ट्या आपल्याशी बांधून ठेवतो. असली माया उत्तरोत्तर वाढवण्याच्या मुळाशी उतारवयातला स्वार्थ दडलेला असतो. पुढल्या विकलांग जगण्याचा आधार म्हणून कुणालातरी धरून ठेवण्याची निकड त्यात असते. उतारवयात शारीरिक परावलंबित्व येणे तसे अटळ असले, तरी तत्पूर्वी मायालोभातून मानसिक परावलंबित्व येणे घातक असल्याचे मला जाणवू लागले आहे. असे करताना नकळत आपण आपले स्वातंत्र्य गमावत असतो. एका इष्ट क्षणी मुलाबाळांच्या संदर्भापासून सुटे होण्यातून आपण स्वतःचे स्वातंत्र्य पुनःप्राप्त करत असतो." [सांजी, पृ.६८].
या संदर्भात सप्र्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना काही कारणपरत्वे लिहिलेली पत्रे समाविष्ट झाली आहेत,[सांजी, पृ.३७, रुद्राक्षी, पृ.१३५] ती पत्रं आणि त्यांनी आपल्या सुनेस तिच्या पहिल्या प्रसूतीच्या वेळेस लिहिलेलं पत्र [सांजी, पृ.५३] मुद्दाम वाचण्यासारखी आहेत.

स्त्री-पुरुष संबंध

"ज्यातून जगण्याचे प्रयोजन प्राप्त होते, पण ज्यातला बिघाड आयुष्य नासवायला पुरेसा होतो असा हा विलक्षण संबंध आहे. वयाच्या वाढीबरोबर एकदा स्त्रीविषयक जाण आली, की सारे आयुष्य स्त्रीप्रतिमेने व्यापले जाते. तारुण्याच्या उंबरठ्यावर मनात अशी स्वप्नील प्रतिमा साकार झाली, की तिचा शोध सुरू होतो. हा शोध सदैव चुकामूक व्हावी अशी एक शिवाशीव आहे. या शोधात सगळे भटकून झाल्यावर एका हताश क्षणी ती अवचित खुणावताना दिसते. फार पलीकडच्या डोंगरमाथ्यावरून, हिरव्या मखमाली नदीकाठी तिच्या पैंजणांचा अस्फुट आवाज येतो, पण मध्ये नदी आडवी असते. कधी मावळतीच्या समुद्रकाठी तिच्या ओल्या पाऊलखुणा दिसतात, पण त्यात परतीची एकही पाऊलखूण नसते. क्वचित क्षणी श्वासांचा स्पर्श व्हावा इतकी ती निकट येते, पण सामोर्‍या झालेल्या हातांची स्वदेहालाच मिठी बसते."[सांजी, पृ. ५८].

स्त्री-पुरुष संबंध आणि विवाहसंस्था यांबाबतची काहीशी विक्षिप्त वाटावी इतकी धाडसी मतं सप्रे नि:संकोचपणे मांडताना दिसतात.
"विवाहात मांगल्य आणि पावित्र्य वगैरे काही असते हे फालतू गैरसमज मी कधीच जोपासले नाहीत. समान गरजांच्या पातळीवर सहकाराला परस्परांनी दिलेला होकार यापलीकडे विवाहात एक संस्था म्हणून फार थोरले तथ्य आहे असे मला वाटत नाही. सुखाच्या गुणाकाराला आणि दु:खाच्या भागाकाराला एक बाहेरचा आकडा लागतो ही विवाहसंबंधातली निकड असते. या दृष्टीने पाहिल्यास जीवशास्त्रीय लैंगिक गरज सोडली, तर विवाह आणि इतर मानवी संबंध यात फारसा फरक नसतो आणि हे असे असावे यात काही गैर वा चूक नाही; कारण ते एक वास्तव आहे. या वास्तवाला निर्भेळ स्वरूपात स्वीकारणे मानवी मनाला सहज शक्य नसते, म्हणून त्याला मांगल्य आणि पावित्र्य या वर्खांनी मढवले जाते. विवाहातले 'मांगल्य' स्वार्थी गरजेला मुलामा देण्यासाठी शोधले गेले आहे तर, गरजपूर्तीचा हा मार्ग अखंड आणि अढळ राहावा यासाठी घेतलेल्या खबरदारीतून 'पावित्र्य' उद्भवले आहे. बहुतेक विवाह मोडून पडले नाहीत या अर्थाने यशस्वितेचा भास देत असले, तरी खर्‍या अर्थाने ते विफल झालेले असतात. पर्यायांच्या अभावातून निर्माण झालेली अपरिहार्यता, हेच बहुसंख्य विवाह टिकून असण्यामागचे एकमेव कारण असते असे माझेतरी निरीक्षण आहे. घटस्फोट आणि पुनर्विवाह हे तसे अपवादात्मक असले, तरी ते असावेत ही बाब याला पुष्टी देणारी आहे."[सांजी, पृ.३१].

"विवाहाला वधू-वरांच्या उभयपक्षी संमतीला समाजमान्यता मिळताच अभावितपणे व्यक्तिस्वातंत्र्यालाही मान्यता मिळाली. अर्थात असं होऊ नये याचे समाजाकडून कसोशीचे प्रयत्न झालेत. विवाहाला परस्पर संमती एवढाच आधार पुरेसा मानला तर त्याच न्यायानं परस्पर विसंवाद हा घटस्फोटाचाही आधार होऊ शकतो, हे समजण्याइतपत आमचे पुराणपुरुष धोरणी होते. म्हणून हिंदू लॉत घटस्फोटाची कायदेशीर तरतूदच नाही. .... एकूण विवाहसंस्थेसंदर्भात दोन परस्परविरोधी मतांचा संघर्ष सुरू असल्याचं जगभरात चित्र आहे. एकानुसार विवाह म्हणजे स्वर्गात बांधली गेलेली गाठ असल्यानं कोणत्याही परिस्थितीत अतूट आहे आणि दुसर्‍यानुसार युगलबंध हा केवळ लैंगिक आकर्षणातून आणि परस्पर मर्जीतून निर्माण होत असल्यानं तो परस्पर मर्जीपुरताच मर्यादित असावा. वस्तुतः ही दोन्ही मतं अतिरेकी आहेत व म्हणूनच त्याज्य आहेत. मात्र त्यात सुवर्णमध्य गाठणं हेही अतिअवघड आहे. .... सार हे की, वैवाहिक समस्या इतक्या वैयक्तिक, विविध आणि गुंतागुंतीच्या आहेत की, त्यावर कुठलीही एकसुरी उपाययोजना सांगणं अशक्य आहे. मुस्लिमांसारख्या अतिकठोर नियमांनी त्या पूर्णतः सुटलेल्या नाहीत, तसंच अमेरिकी मुक्त संबंधांनीही सुटल्या नाहीत. या संदर्भात ओशोंनी मोठ्या मार्मिक शब्दांत म्हटलं आहे - "अधिक प्रगल्भ समाजात घटस्फोट सोपे असतील, मात्र विवाह अवघड असतील. या दृष्टीनं लग्नात महत्तम अडथळे असतील अशी व्यवस्था हवी. युगुलाने लग्नापूर्वी दोन वर्षे एकत्र काढावीत आणि मगच विवाहनोंदणी कार्यालयात जावं. मग बहुदा कोणी येणारच नाही." ओशोचा हा आशावाद बिनतोड असला, तरी तो फारतर अधिक मानसिक जाण असलेल्यांनाच शक्य आहे. ... मात्र दुर्दैवानं मानवी समाज सर्वस्वी एकजिनसी नाही. मानवी समूहात निखळ व्यवहारवादी सामान्यजन बहुमतात आहेत. न्याय-नीतिसहित व्यवस्थेची सारी सूत्रं त्यांच्या हातात आहेत. .... विवाहरेषेच्या मध्यबिंदूशी एकवटलेला हा टिकाऊ समूह असतो. फक्त रेषेच्या दोन्ही टोकांना असणारेच यातनांचे धनी होतात."[रुद्राक्षी, पृ.१८७-८९].

"स्त्री-पुरुषांची विवाहबाह्य मैत्री वा भावनिक जवळीक हा समाजानं व्यभिचार म्हणून फटक्यासारखा निकालात काढलेला प्रकार. तो केवळ शारीरिक असेल तर स्वैराचार म्हणून मीही तो त्याज्य मानीन, पण त्यात जर वेगळी अशी उदात्तता असेल तर मात्र या अपवादाची न्याय्य फेरतपासणी व्हावी असंच मी म्हणेन."[रुद्राक्षी,पृ.१६].

'सांजी'मधलं 'प्रिय सोना' हे नितांतसुंदर पत्र [पृ.१२०] विवाहबाह्य संबंधातली उदात्तता स्पष्ट करतं. एका अप्रकाशित लघुकथेतलं हे पत्र असं त्यावर नमूद केलं आहे. हे पत्र काल्पनिक आहे वा कुणा हाडामासाच्या व्यक्तीला लिहिलेलं आहे या एका वाचकाच्या पृच्छेला 'हा प्रश्न लेखक म्हणून माझ्यासंदर्भात महत्त्वाचा असला, तरी साहित्यिकदृष्ट्या तेवढासा मोलाचा नाही' असं म्हणत सप्र्यांनी बगल दिली आहे [रुद्राक्षी, पृ.७३]. पुढे जाऊन 'त्या' पत्रातल्या भूमिकेचं सुंदर साहित्यिक अंगानं निरूपणही केलं आहे. पण ते पत्र वास्तव की काल्पनिक हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. कदाचित एका पत्रातल्या पुढील परिच्छेदातून थोडासा 'क्लू' मिळू शकतो.: "ऐन विशीत नोकरीदरम्यान एका छोट्या शहरी दौर्‍यावर गेलो असताना, मी संध्याकाळचं फिरायला म्हणून गावाबाहेरची वैराण टेकडी निवडली. तिच्या माथ्यावर मला ढासळत आलेलं एक संगमरवरी थडगं आढळलं. शतकापूर्वी क्षुल्लक आजारानं दगावलेल्या एलिसा नामक कुणा एका इंग्रज किशोरीच्या निधनाची त्यावर नोंद होती. ती वाचताच क्षणात माझ्या नजरेसमोर तलम शुभ्र वसनातली, शेलाट्या अंगाची एलिसा उभी झाली आणि विशेष म्हणजे ती चक्क ओळखीचं हसली. त्या गावी आठवडाभर असेस्तोवर ती मला टेकडीवरून खुणावत राहिली. गाव सोडताना योगायोगानं आदल्या रात्री पौर्णिमा होती. निरोपादाखल मी टेकडी तुडवत थडग्यापाशी पोहोचलो. त्यावेळी प्रथमच मी चंद्रकिरणांतून स्त्रवणारं संगीत ऐकलं. आयुष्यात पुढं केव्हातरी ही एलिसा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला भेटणार आहे ही श्रद्धा त्या क्षणीच मनात रुजली आणि खूप नंतर ती भेटली तेव्हापासून पौर्णिमा हा माझ्यापरीस उत्सव झाला." [रुद्राक्षी, पृ.३०].

याच संदर्भात, जेम्स वॉलरच्या 'दि ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी' या नितांतसुंदर कादंबरीविषयी सप्र्यांनी केलेलं भाष्यही महत्त्वाचं आहे.

व्यक्ती - समाज संबंध

केवळ कुटुंबसंस्था किंवा विवाहसंस्थाच नव्हे, तर बहुतेक सर्व मानवी समस्यांचे मूळ व्यक्ती-समाज संबंधांच्या विरोधात्मक स्वरूपात साठवलेलं असतं असं सप्रे मानतात. याबाबतची आपली भूमिका सप्र्यांनी अनेक पत्रांत नोंदवली आहे. उदा. "व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच मान्य केल्याशिवाय व्यक्तीचा सामाजिक स्वीकार होत नाही आणि समाजाशी संघर्ष पत्करल्याखेरीज व्यक्तिस्वातंत्र्याचा विस्तार शक्य होत नाही असा हा पेचप्रसंग असतो. कुठल्याही समाजव्यवस्थेची सगळी मूल्ये, यशापयशाच्या कल्पना आणि नीतिमूल्ये सामान्यांना सोयीची आणि लाभाची अशीच असतात. यामुळेच प्रस्थापित व्यवस्था अबाधित राहावी असे त्यांना सतत वाटत असते आणि प्रस्थापितांचे नियम प्रत्येकाने बिनतक्रार पाळावेत हा सगळ्याच व्यवस्थांचा आग्रह असतो. या आग्रहातूनच सामाजिक धमक्या आणि शिक्षा यांचा उगम होतो. समूहाच्या तुलनेने व्यक्ती सदैव दुबळी असली, तरी व्यवस्थेला सतत आव्हाने मिळणे इष्ट नसते. म्हणूनच अशी आव्हाने उद्भवणारच नाहीत, अशा एखाद्या उपाययोजनेच्या शोधात सगळ्याच व्यवस्था असतात. 'कंडिशनिंग' अथवा संस्कार ही असलीच एक पण अत्यंत प्रभावी आणि टिकाऊ अशी उपाययोजना आहे. व्यवस्थेच्या बिनतक्रार स्वीकाराची सवय ही संस्काराची व्याख्या या दृष्टीने चूक ठरू नये. सामान्यांना अनिष्ट वाटणारी कुठलीही बाब 'पाप' आहे ही धारणा संस्कारांच्या माध्यमातून अल्पवयातच रुजवली की पुढे व्यवस्थेविरुद्ध वागणे व्यक्तीला अशक्य होते. पण इतके सगळे करूनसुद्धा व्यवस्थेला सतत आव्हाने मिळतच असतात, कारण आपले निर्धारित क्षेत्र सोडून व्यक्तीच्या खाजगी जीवनावर सातत्याने आक्रमण करण्याचा व्यवस्थेचा प्रयत्न असतो, तर आपल्या प्राप्त वाट्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य मिळवण्याचा व्यक्तीचा प्रयत्न असतो. अशा परिस्थितीत व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि तिचे कर्तव्य याचा समतोल करून व्यवस्था आपले अस्तित्व अबाधित राखण्याचा प्रयत्न करत असते. या प्रयत्नातूनच सामाजिक-राजकीय सिद्धांत जन्माला येतात. व्यक्ती आणि समाज यांच्या सीमारेषा आखण्यावरून भेद आणि तणाव निर्माण होतात. हे तणाव असह्य झाले की क्रांत्या-प्रतिक्रांत्या होतात. आजवरचा सगळा मानवी इतिहास हा व्यक्ती-समाज संबंधांतल्या तणावांचा इतिहास आहे." [सांजी, पृ. ५०-५१].

"प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणार्‍या येशूला शिक्षा म्हणून क्रूसावर चढवल्यावर, पुढे त्याच हौतात्म्यावर उभारल्या गेलेल्या नव्या व्यवस्थेने त्याची मंदिरे बांधावीत हा विरोधाभास नसून व्यवस्थेचा जय आहे....चौकटीशी संघर्ष करत असताना तिच्या आतच मृत्यू येणे हे न टळणारे वास्तव असले, तरी हा संघर्ष करावासा वाटणे हे मोलाचे ठरते." [सांजी, पृ.६१]. याच पत्राला जोडलेलं 'चौकट' शीर्षकाचं एक टिपण अतिशय प्रभावी आणि विचारप्रेरक आहे. तीत सप्रे म्हणतात, "आपल्यातल्या प्रत्येकाभोवती एक पारदर्शक चौकट आहे. निरोपाची आसवे तिच्या अदृश्य सीमारेषांशी थांबतात, तसेच बाहेरून सामोरे झालेले हातही. काचेच्या या तुरुंगात एकच स्वातंत्र्य आहे, ते म्हणजे नजरेनेच निरोप घेण्याचे आणि स्पर्शाशिवाय धीर देण्याचे".

कलाकृती-निर्मिती आणि रसास्वाद

कलानिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल आणि सौंदर्य-आस्वादाबद्दल अनेक पत्रांतून चर्चा आली आहे.

"मृत्युभयाने पछाडलेल्या आदिमानवाने आपल्या गुहेतल्या एकांतक्षणी स्वतःशी अनुरक्त होऊन शिलाखंडावर उमटवलेल्या ओबडधोबड आकृतीतून सौंदर्याची एक परिभाषा उमटली आहे. मला तीच तेवढी कळते आणि त्याच कसोटीवर सौंदर्य आणि सौंदर्यसदृशता यातला भेद मी ओळखतो. ... तसे पाहिल्यास प्रत्येकच कलाकार कुठे ना कुठे अभिव्यक्तीची सीमारेषा गाठतो. त्यापलीकडे अनाकलनीयतेचा प्रांत सुरू होतो. चित्रकाराचे बाबतीत या रेषेपलीकडे डोळ्यांनी न दिसणारा रंग असतो, तर संगीतकाराचे बाबतीत केवळ स्पंदनातून जाणवावी अशी एक लय असते."[सांजी,पृ.१३].

"सत्य हे की यातना आणि समस्या हे कलाकारी जीवनाला मिळालेले वरदान आहे. त्याला उत्तेजित करणारी उत्तेजके त्यातच साठवलेली असतात. तारा छेडून आपण सतारीला 'डिस्टर्ब' करतो, तेव्हाच कुठे तिच्यातून स्वर निघतात. विचलित झाल्यामुळेच किरणांतून सप्तरंग निघतात ना? .... व्यक्तिमत्त्वाचा एक भाग समस्याग्रस्त व्हावा आणि दुसर्‍या भागावर याचे प्रतिबिंब उमटावे असे द्वैत निर्माण होण्यातूनच कलाजीवन साकार होते. समस्या हे निर्मितीचे आदिद्रव्य आहे."[सांजी,पृ.६७].

"आस्वाद आणि रसिकत्वाखेरीज कलकृतीला पूर्णत्व येतच नाही हा माझा समज आहे.या दृष्टीनं कलेला मी 'form of communication' मानतो. कलेची अभिव्यक्ती ही कलाकाराच्या बाजूनं त्याची आंतरिक निकड असली, तरी तिला प्रयोजनात्मक निमित्त म्हणून कुठलंतरी बाह्य उत्तेजक [outside reference] लागतंच. जिथं कधीच कुणी येणार नाही अशा एखाद्या निर्जन बेटावर कलाकाराला निर्मितीची निकड भासणारच नाही. माझ्या मते कलाकृती ही कलाकार आणि रसिक यंची संयुक्त निर्मिती असते. कलाकाराप्रमाणं रसिकही कलाकृतीत नवनवे अर्थ ओतून तिला आपल्यापरीनं नवे आयाम देत तिला सार्थ वा समृद्ध करत असतो. म्हणूनच रसिकता ही एक कलाच ठरते." [रुद्राक्षी,पृ.१५०].

काव्यास्वाद

कविता हा सप्र्यांना अतिशय जवळचा आणि भावणारा साहित्यप्रकार आहे हे त्यांच्या पत्रांतून पानोपानी जाणवतं.

"तंत्रात्मकदृष्ट्या व्यंगचित्राचे 'कविता' या प्रकाराशी गहिरे आणि विलक्षण साम्य आहे. अन्य सगळे कलाप्रकार विस्तारातून आकार घेतात, तर व्यंगचित्र आणि कविता हे दोनच प्रकार तेवढे संकोचातून [compression] जन्मतात; किंबहुना या प्रकारे त्रोटक होण्यामुळेच त्यांच्यात प्रखरता येते." [सांजी, पृ.९९].

"आशयाला वेढून घेताना माध्यमाच्या सर्व अंतर्गत शक्ती पणाला लागल्या आहेत असं वाटत नाही, तोपर्यंत कविता ही पूर्णत्वानं सिद्धच होत नाही. भाषा हा संस्कृतीचा गाभा आणि कविता हा भाषेचा गाभा. ... माझ्या दृष्टीने तर कवितेनं केवळ असणंच ग्रेट. कवितेला काळवेळ नसतो तसेच नियमही नसतात. उलट संदर्भाची सगळी बंधने तुटतात तेव्हाच ती जन्माला येते. अत्यानंदाचा चीत्कार अथवा वेदनेचा हुंकार ही तिची जातकुळी आहे. देहातून विजेसारखी शिरशिरी निघून जावी, तशी एखादी दाहक संवेदना जाणिवेतून क्षणात आरपार निघून जाते. तिला पकडताना हाती येणारा खंडित आशय म्हणजेच कविता. संवेदनेतली दाहकता हीच तिच्या मागची कारकशक्ती. ही दाहकता जेव्हा स्फोटाचा बिंदू गाठते, तेव्हा तिचा उत्सर्ग होऊन तो कवितेचे रूप घेतो. उत्सर्गाचा हा कालखंड अतित्रोटक असल्यानेच कवितेला संक्षिप्त रूप येते आणि त्यानेच तिच्या आशयाला कवितापण येते." [सांजी, पृ.३८].

"कविता म्हणजे त्रोटक शब्द नव्हेत की खंडित वाक्ये. ती असते एक अखंड अनुभूती. ती संपूर्णपणे कधीच अभिव्यक्त करता येत नाही आणि करू गेल्यास आशयाचे फक्त तुकडेच हाती येतात. म्हणून कवितेचा आस्वाद घेणे म्हणजे ती वाचणे नव्हे. कवितेच्या अखंड शब्दरूपातून आरपार जाऊन तिच्या मागच्या या अखंड आशयाची अनुभूती घेणे म्हणजे कविता समजणे." [सांजी, पृ.६४].

"अभिव्यक्तीची आत्यंतिक निकड हे जातिवंत कवितेचं एकमेव कारक असतं. म्हणूनच तुम्ही नित्य कविता करणं, त्या प्रसिद्धिलायक असणं, तसंच इतरांना त्या रूचणं या बाबी बाह्य म्हणून गैरलागू ठरतात. रिल्के हा कवी म्हणतो, 'कलेचं सुख इतरेजनांच्या प्रतिसादात असत नाही, ते तिच्या निर्मितीप्रक्रियेतच दाटून असतं. कलेचा आविष्कार हा आंतरिक गरजेतून होत असतो'."[ रुद्राक्षी, पृ.१४५].

जेव्हा कविता अपरिहार्य व्हावी अशा काही क्वचित क्षणीच सप्रे कविता लिहितात. पण त्यामुळेच त्यांच्या कविता 'अस्सल' उतरतात आणि वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. अशा काही कविता त्यांच्या पत्रांतून अधूनमधून उद्धृत होत राहतात आणि आपल्याला वाटत राहतं की सप्र्यांनी आणखी कविता लिहायला हव्या किंवा त्यांच्या पत्रांत आणखी कविता समाविष्ट करायला हव्या होत्या! केवळ नमुनादाखल म्हणून खालील काव्यपंक्ती पाहाव्यात :

"कुणाच्याही भेटीला जायचं तर
रिवाज असतो, पोशाख बदलण्याचा
पण कुणी असंही असतं की
भेटायचं म्हटलं तर चक्क देहच बदलावा लागतो
" [रुद्राक्षी, पृ.३१].

कित्येकदा सप्र्यांचं गद्यलेखनही काव्यमय उतरतं, कारण तेही 'अभिव्यक्तीच्या अपरिहार्यते'तूनच आलेलं असतं. वर उद्धृत केलेल्या गद्य अवतरणापैकी 'मानवी जीवनातले विरोधाभास' किंवा 'स्त्री-प्रतिमा' ह्या विषयावरचे वेचे म्हणजे काव्यात्मक गद्याचे उत्तम नमुने आहेत.

आत्मपरीक्षण

आपली पत्रं म्हणजे स्वत:शी केलेला संवाद अशी सप्र्यांची भूमिका असल्यामुळे, भोवतालच्या समाजजीवनाविषयी आपली निरीक्षणं आणि मतं नोंदवताना सप्रे जेवढा रोखठोकपणा दाखवतात, तितक्याच प्रांजळपणे ते स्वतःविषयी लिहितात.

"मागल्या वर्षी मी रक्तदाबाने अचानक आजारी पडलो आणि तीन दिवस हालचालीविना दवाखान्यात पडून होतो. आता याला मी सुदैव म्हणतो, कारण त्यामुळेच मला माझ्याशी सुसंवाद साधता आला. आत्मपरीक्षणाच्या पहिल्याच प्रयत्नात एक प्रकारची सुन्न विकलता येणे स्वाभाविक आणि अपरिहार्य होते. मी स्वतःत ओणवून जे जे बघितले ते सारेच धक्कादायक होते. आपल्यात बरेचसे अवगुण आहेत हा जसा एक धक्का होता, तसाच स्वतःत जे काही थोडेफार बरे आहे ते आपण उपेक्षित ठेवले आहे हाही एक धक्का होता. या दुहेरी जाणिवेने माझा पुनर्जन्म झाला... कलेच्या पातळीवर स्वतःशी संवाद साधणे आणि व्यवहाराच्या पातळीवर गरजेपुरते इतरांशी तादात्म्य साधणे ही माझ्या नवजीवनाची दिशा आहे. यातून काय निघेल ते या क्षणीतरी अज्ञात आहे" [सांजी, पृ.५].

"अपार दारिद्र्य सोबतीला घेऊन मी जन्माला आलो आणि पदोपदी नकार घेत वाढत गेलो. यात आपण इतरांपेक्षा गुणांनी वरचढ असूनही केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे डावलले गेलो आहोत, ही माझी दुखरी खंत होती. जन्मकुंडलीवरील श्रद्धेच्या आधारे प्राप्त ते स्वीकारून हतबलतेत समाधान शोधणे हा सहजसोपा पर्याय माझ्यासमोर असूनही, मी मुद्दाम बंडखोरीचा अवघड पर्याय निवडला. मग वर्षानुवर्षांच्या अपार कष्टांनी नाकारलेले एकेक मी हिसकावून आणले आणि स्वतःला अपेक्षित ते अंतिम टोक गाठले. आश्रित म्हणून जेवायला गेलेल्या ठिकाणी एक सन्माननीय पाहुणा म्हणून माझे स्वागत झाले, त्या क्षणी माझ्या यशाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. पण हे एका बाजूने जसे पूर्णत्व आहे तसेच ते दुसर्‍या बाजूने एक शून्यही आहे ही नवी जाण मला आली, तसे माझ्यातले अवसान संपले आणि माझ्या बेमुर्वत लढ्याचा अंत 'मी जिंकलो-मी हरलो' ह्या पराभूत नाटकात झाला. हवे ते मिळवले यात मी जिंकलो, पण ज्यांच्या विरोधात मी जिवाचे रान केले त्यांनी माझा स्वीकार करताच मी नकळत त्यांच्यातलाच एक होऊन बसलो आणि यातच मी हरलो. बलात्कार करणार्‍याशीच लग्न करून अब्रू वाचवण्यासारखा हा प्रकार घडला. .... " [सांजी, पृ.४७].

"जन्मखुणेप्रमाणे दोन मर्यादा माझ्या कायम सोबतीला आहेत. एक म्हणजे गाढ आणि तृप्त झोप लागल्याची पुसटशीसुद्धा आठवण मला नाही आणि दुसरे म्हणजे डोळ्यांत पाणी येईस्तोवर निर्व्याज हसणे मला कधीच शक्य झाले नाही. संपूर्ण थिएटर हास्यकल्लोळात बुडाले असताना विनोद न समजलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर एक निर्बुद्ध हास्य उमटते, तसे माझे हसताना होते. असल्या माणसाच्या नियतीत व्यंगचित्रकाराचा व्यवसाय यावा हे साखर कारखानदाराला मधुमेह असण्यासारखे विपरीत आहे. असे का असावे याचे कारण आजवर शोधूनही मला गवसलेले नाही." [सांजी, पृ.७८].

नियतीवाद आणि अस्तित्ववाद

सप्रे वरचेवर जी.एं.च्या साहित्याचे दाखले देत असल्याच्या संदर्भात एका पत्रलेखकाने सप्र्यांना 'तुमच्या बोलण्या-लिहिण्यावर नियतिवादाची आणि नैराश्याची जबरदस्त छाया असल्याचं' म्हटलं. त्याला उत्तर देताना सप्रे लिहितात, "नियतीला मानणारा रूढार्थानं दैववादी मानला जातो. कारण जगताना अगदी बारीकसारीक बाबीसुद्धा नियत असल्यासारख्या घडतात, तेव्हा कर्ता म्हणून आपण गैरलागू [irrelevant] आहोत हा आपला समज रूढावतो. मग घडायचं ते घडू द्यावं, आपण स्वस्थ असावं या धारणेतून माणूस निष्क्रिय व्हायला लागतो. खात्रीनं मी यातला नाही! उलट, ठरवणं संपूर्णपणे आपल्या हाती असलं तरी ते होणं मात्र सर्वस्वी आपल्या हाती नसल्यानं, अपयश गृहित धरूनच ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही माझी धारणा [ethos] आहे. म्हणून, होणं किंवा न होणं, यापेक्षा ते करण्याच्या प्रयत्नांशी मी माझं समाधान निगडीत ठेवत आलोय. या अर्थानं 'Dare to fail' हीच माझी ईर्ष्या राहत आली आहे. आणि नवनवे प्रयोग चालू ठेवणं हीच माझ्या जगण्याची व्याख्या झाली आहे. ... नियतीनुसार गणिताचं उत्तर अखेर शून्य येणार असलं, तरी ते कळायला आधी ते सोडवायला लागतं हा न्याय मी जगण्याला लागू करतो." [रुद्राक्षी, पृ.१०२]. केवळ आपल्या स्वतःबाबत नव्हे, तर अप्रत्यक्षपणे जी.एं.संबंधातल्या एका गैरसमजाला अशा प्रकारे सप्र्यांनी समर्पक उत्तर दिलं आहे. 'रुद्राक्षी'च्या अर्पणपत्रिकेत त्यांनी जी.एं.चं जे अवतरण उद्धृत केलं आहे, तेही या दृष्टीनं बोलकं आहे.

"सर्वम् दु:खम् हे मानवी जीवनाचं सार सांगताना बुद्धानं दु:खाचा तिरस्कार तर केला नाहीच, उलट त्या वास्तवालाच अनुभवसमृद्धीचं साधन मानून त्याकडे सहानुभूतीनं बघितलं. सुख आणि दु:ख यांच्याकडे समभावानं बघणं म्हणजेच निर्वाण हीच त्याची आम्हाला मिळालेली देणगी आहे. 'करुणा' या एकाच शब्दात ती बद्ध आहे. मला तर बुद्धाची 'करुणा' हे मानवतेचं एक अतिभव्य रूप वाटतं... जी.एं.नीही जवळपास असंच सांगितलं आहे. ते म्हणतात, 'जीवनातल्या चक्रव्यूहातून जाताना अकस्मात समोर उभी राहिलेली दु:खे, जेथे आधारासाठी विश्वासाने वळावे तेथेच आढळणारा घात आणि वंचना, फसव्या सुखाचे रूप घेऊन येणारी मानवी दु:खं, उत्कट सुख वाट्याला आले तरी त्याची जाणवणारी दाहक क्षणभंगुरता, अशी जीवनाची विविध रूपे मला खुणावतात आणि मग यातून मानवाला अनंतकाळापासून जाणवत असलेले अनेक प्रश्न नागाच्या फण्यासारखे उभे राहतात. या सार्‍याचा अर्थ काय? हे दु:ख केवळ माझीच शिक्षा आहे की मानवी जीवनाचा तो भाग आहे? याचा अर्थ मानवाला कधी समजेल का? आणि समजला तरी तोच अंतिम अर्थ खरा आहे, हे ओळखायला मानवाजवळ काय निकष आहे? ' माझ्या मते जी.एं.चं सगळं साहित्य म्हणजे याच प्रश्नचिन्हांची विविधरूप मांडणी आहे. हाच प्रश्न रंगात रुपांतरित झाला की त्याचं व्हॅन गॉगचं पेंटिंग होतं, बेगम अख्तरच्या स्वरांत उमटला की त्याचं 'आखिर इस दर्दकी दवा क्या है?' हे करुणाष्टक होतं. दूर कशाला, तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांनीसुद्धा जराही स्वतःत डोकावून बघितलं तरी आपणही त्यातलेच आहोत ही खात्री पटेल." [ रुद्राक्षी,पृ.३६]

सप्र्यांनी विविध पत्रांत केलेली विवेचनं पाहता, त्यांच्या personal philosophy वर अस्तित्ववादाचा मात्र दाट पगडा असल्याचं जाणवतं. कामूची 'द फॉल' ही कादंबरी आणि सार्त्रच्या 'Man is born alone, he has no mission to save what he creates for himself' या विधानाच्या संदर्भात, 'जी.एं.चं लिखाणही त्याच प्रकारात मोडतं' असं आपलं मत त्यांनी नोंदवून ठेवलं आहे.[सांजी, पृ.२३-२४].

वृद्धत्व आणि मृत्यू यांसंदर्भात त्यांनी विविध पत्रांत केलेली चर्चा [सांजी, पृ.६८;, रुद्राक्षी, पृ.१४१; रुद्राक्षी, पृ.१०३] अस्तित्ववादाच्या वळणानेच जात असली तरी वाचकाला एक सकस जीवनार्थ देऊन जाते.
"मला 'Tuesdays with Morrie' हे पुस्तक मिळालं. केवळ सतरा-अठरा महिन्यांचंच आयुष्य बाकी असल्याचं जाहीर झाल्यावर खचून न जाता स्वतःच्या मरणाला तटस्थ अभ्यासाचा विषय बनवणार्‍या एका धीरोदात्त माणसाची ही बुलंद कहाणी आहे. या वास्तवकथेनं कुणाचंही मरणभय संपावं! मरणालाच असं सुसह्य केलं, तर बाकी सगळीच दु:खं ठेंगणी होतात. मात्र तशी मानसिकता तयार व्हायला आयुष्यभराचा रियाझ लागतो. तो महागडा असल्यानं बहुसंख्यांना परवडत नाही. म्हणून ते कायम मरणभय जगतात. ज्यांच्या जन्मानं बेरीज होत नाही अशांनी वजाबाकीला भ्यावं हा एक अजब विनोद आहे." [रुद्राक्षी, पृ.१०३].

समारोप

'सांजी'तल्या पत्रांचा काळ १९७९ ते १९९१ आहे. रुद्राक्षी'मधली पत्रे २००६ पर्यंतची असली, तरीही 'रुद्राक्षी'मध्ये त्यांनी १९८२ ते १९९१ या काळातली काही पत्रं मुद्दाम समाविष्ट केली आहेत. अर्थात या दोन्ही पुस्तकांत आलेल्या पत्रांत विषयांची थोडीशी द्विरुक्ती झाली असली, तरी स्वतंत्रपणे त्यातलं कोणतंही एक पुस्तक वाचणार्‍याची सोय त्यातून साधली गेली आहे. शिवाय विषय एकच असला, तरी निरनिराळ्या व्यक्तींना लिहलेल्या पत्रांतल्या विवेचनांत दर खेपेस एक वेगळा पैलू मांडला गेल्यामुळे आणि वेगळे संदर्भ दिले गेले असल्यामुळे अशी द्विरुक्ती पूरक आणि म्हणूनच स्वागतार्ह वाटते. कोणत्याही विषयाचं विवेचन तुकड्या-तुकड्यांनी होत असलं, तरी त्यांतून एक एकसंध चित्र अवतीर्ण होताना अनुभवता येतं.

व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पत्रसंग्रहाला मार्क रस्किलनं लिहिलेल्या प्रस्तावनेतलं एक वाक्य सप्र्यांनी एका पत्रात उद्धृत केलं आहे. "जीवनातला दृश्य [visual] अनुभव आणि त्याचा तात्त्विक आणि चिरंतन अर्थ यांची त्यानं इतकी intense परस्पर गुंफण केली आहे, की तिची तुलना जगातल्या वन्य अथवा आदिम जमातीच्या 'लाकडी पर्जन्यदेव' म्हणजेच पाऊस या नितांत श्रद्धेशी व्हावी" [रुद्राक्षी, पृ.४१]. खुद्द सप्र्यांनी त्यांच्या पत्रांतून विविध विषय हाताळले असले, तरी त्या सर्वांमागे हेच एक सूत्र आढळतं आणि त्यांनी अशीच गुंफण विलक्षण प्रभावीपणे केली आहे.

आपली अनुभवविश्वं समान नसतात आणि आपल्यातल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी प्रश्न आणि समस्या भेडसावत असतात. आपापल्यापरीने आपण सर्वच जण त्यांच्याशी झुंजत जगत असतो. आपल्या अनुभवांना आणि समस्यांना काही विशिष्ट प्रासंगिक संदर्भ असले आणि स्थल-कालानुरूप स्वतंत्र 'विशेषनामं' असली, तरी प्रयत्न केल्यास त्यामधून काहीएक समान सूत्र शोधता येण्यासारखं असतं. आपली personal philosophy आपल्याला विकसित करता येऊ शकते आणि तिच्या आधारे आपण आपलं समस्याग्रस्त आयुष्य सुसह्य करू शकतो, हाच माझ्या मते सप्र्यांच्या पत्रांचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. 'अखेरचा शब्द' नावाचा पदार्थ नसतो असं ते स्वतःच ठासून सांगतात, पण तरीही त्यांची शोधयात्रा वाचकांना निश्चितच मार्गदर्शक ठरावी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'परीक्षेच्या हॉलमधे शिरताना आपल्यासारखेच इतर अनेकजण परीक्षार्थी आहेत ही भावना दिलासा देणारी असते'. हाच अमृतानुभव आपल्याला देणारे हे दोन पत्रसंग्रह आहेत.

- pkarandikar50