संप आणि जगूचे किश्शे...

ही गोष्ट आसा १९७७-७८ ची. साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात राज्य सरकारचे बहुतेक सगळे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले. सरकारी कर्मचार्‍यांबरोबर प्राथमिक, माध्यमिक, उच्च-माध्यमिक सगळ्या शाळातले, कॉलेजातले मास्तर आणि प्रोफेसर सुद्धा संपावर गेले. हो संप बरेच दिवस, म्हणजे सत्तावन्न दिवस, सुरू होतो. आता सगळे मास्तर, प्रोफेसर संपावर गेले म्हटल्यार शाळेतल्या पोरांची मजाच झाली. "आधीच उल्लास, आणि तेतूर परत फाल्गुन मास" - अशीच अवस्था झाली. पण आमच्या शाळेच्या (कुडाळ हायस्कूल - ज्युनियर कॉलेज) संचालक मंडळान एक महत्वाचो निर्णय घेतलो की, शाळेतल्या मुलांचा कुठल्याही प्रकारे नुकसान होता नये. खरा म्हणजे हो निर्णय घेतलो तो EBC च्या सवलतीत शिकणार्‍या मुलांसाठी, कारण तेंची ही सवलत बंद होता नये म्हणान. तेव्हा आमच्या तत्कालीन हेडमास्तरानी मोठ्या वर्गातल्या (म्हणजे दहावी, अकरावी आणी बारावी) काही हुशार मुलांका हाताक घेवन शाळा सुरू ठेवल्यानी. या हुशार मुलांच्यात आमची बहीण (इयत्ता बारावी - शास्त्र) आणि माझो मोठो भाव, विनय देसाई (इयत्ता दहावी), पण होते. आमी तेव्हा सहावीत होतंव. त्या संप काळातली ती शाळा म्हणजे आमची खरोखर मजा होती. कारण शिकवणार्‍या काही ठराविक मुलांव्यतिरिक्त बाकीचे म्हणजे फक्त हौशी मास्तर झाल्लले. म्हणजे माका आजुनय स्पष्ट आठावतां, एकदा आमच्या सहावीच्या वर्गाक एक कॉमर्सचो पोरगो - चुकलय मास्तर किंवा गुरुजी - येवन आमका डेबिट-क्रेडिट शिकवन गेल्लो. अशे बरेच अतिउत्साही मास्तर/ गुरुजी आमका त्या संपकाळात लाभले. बहुतेकजण मराठी किंवा समाजशास्त्र (तेतूर सुद्धा भूगोल) शिकवणारेच भेटले. म्हणजे कधी कधी एक दिवसात पाच तास मराठीचे आणि दोन तास भूगोलाचे असो प्रकार होय. चुकान माकान कधीतरी कोणतरी हिंदी (सिनेमा प्रमाण किंवा गोंधयाळी) किंवा इतिहास शिकवचा धाडस करून बघीत. इंग्रजीच्या वाटेक मात्र एक कोण जावक नाय (हो, 'वगीच झेंगाट नको' हो साधो सोपो विचार). तुमका सांगतय, त्या ५७ दिवसात आमच्या वर्गारच न्हय तर अख्ख्या शाळेत इंग्रजीचो एक सुद्धा तास होवक नाय. एक कोण म्हापुरुष इंग्रजी शिकवक तयार नाय.

आमची बहीण मात्र बहुतेक वर्गांक विज्ञान/ सामान्यविज्ञान आणि गणित हे विषय शिकवी. शिकवी म्हणजे खरोखर रस घेवन हे विषय शिकवी. आणि सगळी पोरांसुद्धा तिच्या शिकवण्याक मनापासून दाद देयत, अगदी माझ्यासकट सगळे. (मी बाईंचो ल्हानगो भाव म्हणान माका पेशल कन्सेशन नाय व्हतां). तर असो सगळो मजेचो मामलो चल्लेलो.

तर या संप काळातली एक गम्मत तुमका सांगतय. तुमका म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वर्गात काय नाय कायतरी मजेशीर घडान जाय. कारण कायय झाला तरी शिकवक येणार्‍यांचो अनुभव तो कसलो? सगळेच हौशी मास्तर झालेले. खालच्या ल्हान वर्गांका जरा वायंच पोजी मारून दाखवणारे (सध्याच्या भाषेत इंप्रेशान मारुक), बरेच मास्तर होते. आणि आमी शिकणारे तरी काय? व्वा! एकदमच स्कालर. सगळोच आनंदीआनंद. तर अशे ते संपाचे दिवस ढकला होते.

एक दिवस काय झालां, इयत्ता पाचवीच्या वर्गावर एक बाई (तेंची इयत्ता होती अकरावी - कला) वेळापत्रकाप्रमाणे गेले. कधी न्हय त्या बाईनी हिंदी विषय शिकवचो ठरवल्यानी. या भाषा विषयांचा एक बरा असतां. जर तुमका क्रमिक पुस्तकातले धडे, कविता शिकवक जमले नाय, तरी काय्येक बिघाडना नाय. 'भाषा विषय' या लेबलाखाली तुम्ही इतर मान्यताप्राप्त गोष्टी करुक शकतात, जशे निबंधलेखन, पत्रलेखन, कधीतरी शुद्धलेखन, गोष्ट लिहिणे, कविता म्हणणे, पाठ करून घेणे वगैरे वगैरे. तर त्यांप्रमाणे बाई वर्गावर गेले. वर्गात जावन आदी अंदाज घेतल्यानी (वगीच कोणतरी खरोखर हुशार विद्यार्थी भेटलो तर पंचायती होवक नको), आणि हिंदी शिकवचो मनाशी पक्को निर्णय घेतल्यानी. बाईंका स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होतो. तेच्यामुळे बाईनी 'हिंदी में पत्र लेखन' हो प्रकार निवडल्यानी, आणि पुढची ३५ मिनिटां त्येच्यावर निभवन नेल्यानी. तास संपता संपता बाईनी आज जे काय शिकवल्यानी त्याच्यावर उद्यासाठी पोरांका गृहपाठ दिल्यानी - 'अपने चाचा को हिंदी में पत्र लिखे!' आणि तास संपलो, शाळा पण सुटली.

आता 'हिंदी भाषेत मराठी किंवा इंग्रजीतसून पत्र कसा काय लिहितले?', हो तुमचो प्रश्न येतलो हेची माका कल्पना आसा. तुमका मागेच म्हटल्याप्रमाणे, या संपकाळातल्या मास्तरांचा हिंदी म्हणजे - एकतर शिनेमातसून शिकलेला किंवा गोंधयाळी. तेच्याचमुळे बाईनी असो गृहपाठ दिलो. आणि बाईंची तरी चूक कित्याक म्हणाची आम्ही? याच नावाजलेल्या शाळेत हिंदी हो विषय शिकवणार्‍या नेहमीच्या एकूण मास्तर लोकांच्यात आमका एक मास्तर अशे भेटले, जेणी एकदा "और चिता में आग पेटने लगी!" अश्या हिंदी शब्दांत आमका कायतरी शिकवलेल्याचा आज सुद्धा स्पष्ट आठावतां. खरा सांगाचा तर या गुरुजींचो हिंदी हो शिकवचो विषय नव्हतो. तेंचे शिकवचे विषय दोनच होते - शारीरिक शिक्षण आणि चित्रकला. पण हे दोन विषय शिकवचे सोडून, तेंका हिंदी शिकवची भयंकर हौस होती. तशे शारीरिक शिक्षणातले बहुतेक सूचना हिंदीतच असतत, इतकोच काय तो तेंचो हिंदीशी संबंध होतो. थोडा विषयांतर झाला खरा, पण काय करुया? काही गोष्टींसाठी करुचा लागता.

झाला, दुसर्‍या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे हिंदीचे बाई पाचवीच्या वर्गार गेले, आणि काल दिलेलो गृहपाठ तपासूक सुरुवात केल्यानी (गृहपाठ तपासण्यात बर्‍यापैकी वेळ निभावन जाता, हो साधो सोपो विचार). सुरुवातीचे काही ठराविक ७-८ वह्ये तपासून झाल्यावर पुढच्या बहुतेक वह्यात तोचतोचपणा जाणवाक लागलो. तसा तेतूर चुकीचा काय नाय व्हता, पण पत्राच्या सुरुवातीच्या मायन्यातल्या एका वाक्यान बाईंचो लक्ष वेधून घेतल्यान, आणि बाईंका समजयना कोणाचा काय चुकताहा ता. आपला काय चुकला की पोरां काय गोंधळ घाल्तहत? पत्रलेखनाच्या नमुन्याप्रमाणे पोरांनी लिवन आणलेला पत्र असा होता -

'प्रिय चाचाजी,
सविनय प्रणाम,
आपका पत्र मिला! पत्र पढकर बडा संदेश हुवा!.....' इत्यादि.
आणि सगळ्यात शेवटी -
'आपका प्यारा भतीजा
संदेश |'

ह्या नमुन्यामधल्या 'पत्र पढकर बडा संदेश हुवा' या एका वाक्यान बाईंचा लक्ष वेधून घेतल्यान. ह्याच एक वाक्य कोणी 'पत्र पढकर बडा राजन हुवा' असा लिवलेला होतां, तर कोणी 'पत्र पढकर बडा विजय हुवा' असा लिवलेला, तर कोणी 'पत्र पढकर बडा गणेश हुवा' असा लिवन ठेवलेला. मुलींच्या बाजूक 'पत्र पढकर बडा रागिणी हुवा', 'पत्र पढकर बडा लता हुवा' असो प्रकार होतो. बाईंका समजयना 'हो काय प्रकार?'. एकीकडे बाईंक पोटातसून जोरदार पेटके येय होते, पण त्याच वेळा बाईंका स्वतःबद्दल खात्री नाय होती. न जाणो, आपलाच काय चुकत असला तर नको ता अपशाराण कपाळार येयत. अख्खो तास बाईनी पत्र तपासणीत घालवल्यानी, आणि तास संपलो तशे बाई तरातरा स्टाफरूमात येवन बसले.

हिंदीच्या बाईनी हो सगळो प्रकार आमच्या बहिणीच्या कानावर घातल्यानी आणि आपली काळजी व्यक्त केल्यानी; 'म्हणजे माझं काही चुकलं तर नाही ना?' वगैरे. हिंदीच्या बाईनी हो सगळो प्रकार आमच्या बहिणीच्या कानावर घालण्याचा खरा कारण असा होता की, आमच्या बहिणीचा सुरुवातीचा शिक्षण हिंदी आणि इंग्रजी माध्यमात्सुन (५०-५०%) झालेला. शिवाय वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे बरोचसो हिंदुस्तान सुद्धा फिरान झालेलो. त्यामुळे तिचा व्यावहारिक बोली भाषेतला हिंदी आणि कागदोपत्री कामकाजातला हिंदी खूप चांगला होता. त्यामुळे हिंदीच्या बाईनी आपली चिंता आमच्या बहिणीक बोलान दाखवल्यानी. आमच्या बहिणीन सुद्धा त्या बाईक धीर दिलो. शेवटी संपकाळातली शाळेच्या पोरांनी चालवलेली शाळा, कोण फासार देतलो होतो? आमच्या बहिणीन झाल्लो प्रकार आयकान घेतलेन आणि घराकडे येवन आमका सगळ्यांका सांगितलेन. घरात आमची सुद्धा भरपूर करमणूक झाली.

खरो प्रकार झालेलो तो असो: - इयत्ता पाचवीच्या वर्गात संतोष पालव नावाचो एक बर्‍यापैकी हुशार विद्यार्थी होतो. नेहमी प्रत्येक परीक्षेत चांगल्यापैकी मार्क मिळवन व्यवस्थित पास होय. तर तेणा आपल्या सद्सद्विवेक बुद्धिक स्मरून बाईनी गृहपाठासाठी सांगितलेला 'अपने चाचा को हिंदी में पत्र' लिवान दुसर्‍या दिवशी शाळेत घेवन ईलो. आता गावाकडचे शाळा आणि शाळेत लांबसून येणारे इतर गावातले विद्यार्थी हे काय तुमका ठावक नाय? बहुतेक मुलांनी दिलेलो गृहपाठ करूकच नाय होतो. रोजची शाळा सुरू होवच्या अगोदर लवकर शाळेत येवन हुशार मुलाच्या वहीतलो गृहपाठ उतरवणा, ह्या एकाच गोष्टीचां आज्ञाधारकपणे पालन करून बाकीच्या मुलांनी संतोषच्या वहीतला 'अपने चाचा को हिंदी में पत्र' जसाच्या-तसां उतरवन घेतल्यानी. मात्र ह्या पत्र उतरवन घेताना ज्या ज्या ठिकाणी 'संतोष' हो शब्द इलो, त्या त्या प्रत्येक जागेर बाकीच्या मुलांनी स्वतःचा नाव टाकल्यांनी. कोकणी माणसाचा लॉजिक किती पर्फेक्ट आसा हेचो उत्तम नमुनो. बाकी सगळा पत्र अगदी काना, मात्रा, वेलांटी सकट जश्याच्या तसा व्यवस्थित उतरवन घेतल्यानी. आणि तेच्यामुळेच 'पत्र पढकर बडा राजन हुवा', 'पत्र पढकर बडा विजय हुवा', 'पत्र पढकर बडा गणेश हुवा', 'पत्र पढकर बडा रागिणी हुवा', 'पत्र पढकर बडा लता हुवा' हो प्रकार झालेलो.

याच संप काळातली दुसरी एक गम्मत तुमका सांगतंय. रोजरोज ताच ताच शिकवन आमचे मास्तर आणि ताच ताच शिकान आम्ही सुद्धा कंटाळलेलव. फक्त समाधान एकाच गोष्टीचा होता. ता म्हणजे स्वाध्यायाचे, निबंधाचे आणी इतर वह्ये रोजच्या रोज भरुचे लागत नाय व्हते. तेव्हा एक दिवशी आमच्या बहिणीन विचार केल्यान, आणि वर्गातल्या मुलांचा सामान्यज्ञान तपासुचा ठरवल्यान. झाला, दुसर्‍या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे बहीण सातवीच्या वर्गावर गेली, आणि सांगीतलेन की, 'आज मी तुमच्यासाठी सामान्यज्ञानाचो तास घेतलंय, तेव्हा फक्त विचारलेल्या प्रश्नांची नीट विचार करून उत्तरां द्या'. पोरांक सुद्धा जरा गम्मत वाटली. जरासा गेम-शो सारखां वाटला (पण त्या काळात 'पोरांक गेम-शो' ह्यो शब्दच म्हायत नाय होतो. मुळात टी.व्ही. चा आगमनच होवक नाय होता, 'थय गेम-शो' हो शब्दच खूप लांब होतो. कोकणात टी.व्ही. चा आगमन झाला १९८२ मधी, एशियाडच्या वेळाक). झाला, सामान्यज्ञानाची प्रश्नोत्तरां सुरू झाली. बरीचशी प्रश्नोत्तरां बरोबर मिळत गेली. काही थोडी चुकत गेली, ती दुरुस्त होवन पोरांपर्यंत पोचत गेली. बर्‍याच प्रमाणात पोरांच्या ज्ञानात भर पडली. दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टीमुळे बहिणीच्या ज्ञानात काही प्रमाणात भर पडली. तर असो तो तास मजेमजेत चल्ललो. मधी आमच्या बहिणीन एक साधोसो प्रश्न विचारलेन,
'एस. टी. प्रवासात अर्धे किवा निम्मे तिकीट कुणाला पडते?'
वर्गातल्या बर्‍याच पोरांनी उत्तरासाठी हात वर केल्यानी. तेतूर आमच्या जगू कुडतरकराचो हात वर बघून आमच्या बहिणीक आश्चर्ययुक्त समाधान वाटला. कारण कायम पाठीमागच्या बाकावर बसान संपूर्ण वर्गापासून अलिप्त रवनारो प्राणी म्हणजे जगू कुडतरकर. तशे तेचे अधीमधी टिवले बावले सुरू असत, पण खयच्याय मास्तरांनी तेचो त्रास करून घेवक नाय होतो. तेव्हा जगूक उत्तर देवची संधी देवया, ह्या विचारान बाईनी जगूक उत्तर देवक सांगल्यानी.

जगूचा उत्तर, "बाईनू, ... कंडक्टर..."

सगळो वर्ग खो-खो करून हसलो, आणि बाईंक फेफरा येवची वेळ इली. उत्तर दुरुस्त करून बाईनी जगूची समजूत घातल्यानी. तास संपलो. शाळा सुटली. बाईनी घरात येवन हो किस्सो सांग्ल्यानी. आमची सगळ्यांची घटकाभर करमणूक झाली. तसो जगू आणि तेच्या घरातले सगळे आमका बर्‍यापैकी म्हायतीचे होते. तेच्यामुळे जगूच्या उत्तराचा स्पष्टीकरण आमच्या वडिलांनी दिला, तां असा होता -
'जगुचो अक्खो दिवस एस.टी स्टँडार सरबत विकणे हेतुरच जाय. तेच्यामुळे जगूची बर्‍याचश्या ड्रायवर, कंडक्टर बरोबर घनिष्ट मैत्री झालेली होती. कंडक्टर लोकांचे हिशेबातले Adjustments हळूहळू जगूक सुद्धा समजाक लागले. बरा प्रवास करुचो झालोच तर स्टँडवरचे बहुतेक रिक्षावाले, ट्रकवाले ओळखीचे होते, त्यामुळे 'मो. वा. नि. क्र. ११२ (१)(२) अनुसार ३ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांस प्रवासाचा अर्धा आकार पडेल' ह्या वाक्य जगूच्या नजरेक कधी पडलाच नाय. कधीमधी चुकानमाकान एस.टी चो प्रवास केलोच तर कंडक्टर लोकांच्या Adjustment मधी सगळा भागान जाय, आणि एसटीत लावलेले नियम वाचूचे थोडेच असतत? असो सगळो प्रकार झालेलो. कधी जर संपाचो विषय निघालो, तर जगूचो हो किस्सो अगदी हटकून आठावता...

याच जगू कुडतरकराच्या व्यवहारज्ञानाचो एक धमाल किस्सो तुमका सांगतंय.

संप मिटलो. शाळा पूर्वपदावर येवन व्यवस्थित सुरू झाली. वार्षिक परीक्षा पार पडान इयत्ता सातवीतसून आम्ही आठवीत सुखरूपपणे गेलव. आमच्यावांगडा जगू कुडतरकर सुद्धा आठवीत ढकाललो. ह्यां असां म्हणाचा कारण, जेव्हा केव्हा सवड गावात, किंवा अगदीच वैताग इलो तर जगू शाळेत येवन हजेरी लावी आणि ती सुद्धा पावसाचे ३-४ महिने. नायतर इतर वेळी एस.टी.स्टँडवर दिवसभर सरबत विक्री करणे, रात्री बहुतेक वेळा जत्रेत हजेरी लावणे किंवा शिनेमा थेटरात हजेरी लावणे हो नित्याचो दिनक्रम. कधीमधी शाळेत इल्यावर जां काय लिवक घालतीत तां लिवन घेणे किंवा फळ्यावर जां काय असात तां उतरून घेणे इतकोच काय तो शाळेतलो तेचो अभ्यास. पण एक होतां, जगूचा हस्ताक्षर तेच्या इतर भावंडांच्या तुलनेत बर्‍यापैकी सुवाच्य होतां. म्हणजे आमचे वेतुरेकर सर सुद्धा तेच्या अक्षराबद्दल कायम खुश असत.

सातवीतसून आठवीत इल्यावर आमच्या सामान्य विज्ञानाचा रुपांतर विज्ञानात झाला आणि भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), आणी जीवशास्त्र (Biology) हे तीन वेगवेगळे पेपर झाले. भौतिकशास्त्रासाठी वेतुरेकर सर, रसायनशास्त्रासाठी बर्डे सर, आणि जीवशास्त्रासाठी वैद्य सर अशी नेमणूक झाली. यथावकाश पहिली तिमाही जाहीर होवन व्यवस्थित पार पडली आणि तपासलेल्या पेपरच्या स्वरूपात आमची प्रगती समजाक लागली. इतर सगळ्या विषयांचे पेपर मिळान गेले. सगळ्यात शेवटी वेतुरेकर सरांनी भौतिकशास्त्राचे पेपर तपासून निकाल सांगाक सुरुवात केल्यानी. सुरुवातीचे ८-१० पेपर वाटून झाल्यावर एका पेपरावर सर थांबले आणि सरांनी सांगाक सुरुवात केल्यानी (शुद्ध कोकणीत), "माझ्या हातात आता जो पेपर आसा, तो पेपर एका अतिशय व्यवहार्य मुलाचो आसा. मी तुमका एकच सांगतय की, हो पोरगो पुढे भविष्यात अतिशय यशस्वी होतलो". असा म्हणान सरांनी जगूचो पेपर जगूक देवन टाकल्यानी. खरां तर जगूक त्या पेपरात २५ पैकी फक्त ४ गुण पडलले. मग सरांनी असा कित्याक म्हटला?. मधल्या सुट्टीत आम्ही आमचा कुतूहल बर्‍यापैकी भागवन घेतला.

झाल्लेला काय, त्या भौतिकशास्त्राच्या पेपरात एक प्रश्न इलेलो - "चुका आणी त्रुटी यामधील फरक स्पष्ट करा" (Differentiate Between Errors and Mistakes). आणि आमच्या जगून नेमक्या त्याच प्रश्नाचा उत्तर, आपल्या व्यवहार-ज्ञानाक स्मरून लिवन ठेचलेल्यान. जगून उत्तरपत्रिकेत लिहिलेला उत्तर अक्षरशः खाली लिहिल्याप्रमाणे लिवन ठेवलेल्यान: -

चुका: रंगाने काळ्या असतात; त्रुटी: रंगाने पांढर्‍या असतात
चुका: लोखंडाच्या बनवलेल्या असतात; त्रुटी: रासायनिक पदार्थाच्या बनवलेल्या असतात
चुका: टोकदार असल्यामुळे चपलांत वापरतात; त्रुटी: हजामत केल्यावर दाढीला लावतात

आज होच जगू कुडतरकर अक्षरशः एक यशस्वी माणूस बनलेलो आसा. अशी कधीतरी आठवण झाली काय वेतुरेकर सरांचे शब्द खरे ठरलेल्याचो प्रत्यय येता.

- vivekdesai66