संयुक्त महाराष्ट्राचे दोन महान क्रिकेटपटू

यंदाचे वर्ष म्हणजे आपल्या प्रिय संयुक्त महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्याप्रीत्यर्थ या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन क्रीडाक्षेत्रात मोलाचे योगदान केलेल्या काही महान खेळाडूंचा परिचय करून द्यायच्या उद्देशाने एक लेख लिहायला मी माझी लेखणी हातात घेतली. लेख लिहायला सुरुवात केली व माझ्या मनात अनेक नावे फेर धरू लागली.

अर्थातच त्यामध्ये महाराष्ट्रातल्या पुणे शहरात ज्या खेळाची सुरुवात झाली, अशा बॅडमिंटनच्या खेळात ५० व ६० च्या दशकात सहा वेळा अखिल भारतीय विजेतेपद मिळवून अखंड भारतात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणार्‍या नंदू नाटेकरांचे नाव आले, कुस्तीमध्ये १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिक्समध्ये भारताला पहिलेवहिले पदक मिळवून देऊन महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला सर्व जगात गौरव मिळवून देणार्‍या खाशाबा जाधवांचे नाव आले. आणि कुस्तीमध्येच हिंदकेसरी हा किताब पटकावून महाराष्ट्राची शान वाढवणार्‍या गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने व दादू चौगुले या कोल्हापूर व सांगलीसारख्या शहरांमधून आलेल्या आणखी काही नामवंत कुस्तीगिरांची नावे माझ्या मनात आली. बुद्धिबळात ग्रँड मास्टर किताब मिळवलेला प्रवीण ठिपसे आठवला. झालंच तर हुतूतूमध्ये अखिल भारतात नावाजलेले मधू पाटील यांचे नावही मनात येऊन गेले. तसेच टेनिसमध्ये अखिल भारतीय विजेतेपद मिळवणारा नंदन बाळही आठवला.

पण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या क्रीडापटूंमध्ये महाराष्ट्राचे नाव भारतातच नाही, तर सर्व जगात जर कोणामुळे सर्वांत जास्त दुमदुमले असेल, तर ते म्हणजे इथे जन्माला आलेल्या मराठी क्रिकेटपटूंमुळे! काय एकेक नावे! रंगा सोहोनी, खंडू रांगणेकर, दत्तू फडकर, विजय हजारे, सुभाष गुप्ते, बाळू गुप्ते, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, रमाकांत देसाई, दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुधीर नाईक, रामनाथ पारकर, सुरू नायक, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, संजय मांजरेकर, विनोद कांबळी, अजित आगरकर आणि न भूतो न भविष्यति असे महाराष्ट्राचे दोन लखाखणारे हिरे - दोन तळपते सूर्य, अर्थातच सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर!

या माझ्या लेखाच्या शीर्षकावरून ९९ टक्के वाचकांनी आतापर्यंतचा माझा लेख वाचून हाच अंदाज बांधला असेल, की हा लेख अर्थातच सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर या महाराष्ट्राने जगाला दिलेल्या दोन महान क्रिकेटपटूंवरच असणार! पण एक टक्का चाणाक्ष वाचकांच्या हेही लक्षात आले असेल, की वर नमूद केलेल्या मराठी क्रिकेटपटूंमध्ये मी जाणूनबुजून दोन नावे नमूद केलेली नाहीत! अर्थात सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर ही दोन नावे क्रिकेटमध्ये सर्व जगात अजरामर आहेत यात वादच नाही. त्यांच्या महानतेवर मी या लेखात प्रकाश टाकणे म्हणजे सूर्याला मशाल दाखवल्यासारखे होईल. त्या दोघांबद्दल व त्यांच्या क्रिकेट पराक्रमाबद्दल आतापर्यंत खंडीभर लिखाण जगभरच्या लेखकांनी केलेले आहे आणि तशा लिखाणाला ते पात्रही आहेत यात किंचितही संदेह नाही. पण संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मी लिहीत असलेल्या या लेखात मला अशा दोन मराठी क्रिकेटपटूंचा उल्लेख करायचा आहे की ज्यांची संपूर्ण क्रिकेट-कारकीर्द उपेक्षितच राहिली आहे. आणि हे लक्षात घ्या, की त्या दोघांच्या कारकिर्दीची बेरीज जर केली, तर ती जवळजवळ ७० वर्षे भरेल! निदान संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या या मायबोलीवरच्या दिवाळी जल्लोषात तरी या दोन खेळाडूंवर दोन शब्द लिहून हे दोघे खेळाडू उपेक्षित राहू नयेत, हीच या लेखाची माफक अपेक्षा.

तर मंडळी, तुमची उत्कंठा अजून ताणून न धरता तुम्हांला ती दोन नावे मी सांगतो. ते दोन महान क्रिकेटपटू म्हणजे पुण्याचे प्राध्यापक दिनकर बळवंत देवधर व मुंबईचे पद्माकर काशिनाथ शिवलकर! ही नावे ऐकून झालात ना एकदम आश्चर्यचकित? अहो, पण या दोन महान क्रिकेटपटूंची माहिती वाचल्यावर याहीपेक्षा जास्त आश्चर्य तुम्हांला याचे वाटेल, की या दोघांनाही कसोटी क्रिकेटमध्ये एकदाही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले नाही!

१. प्राध्यापक दिनकर बळवंत देवधर

प्राध्यापक देवधर हे म्हणजे भारताच्या आद्य क्रिकेटपटूंमध्ये मोडणारा पहिला हिरा! इ.स. १८९२मध्ये पुण्यात जन्म झालेल्या या माणसाने वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून, म्हणजे १९११पासून क्रिकेट या खेळात, प्रथम तिरंगी सामन्यांमध्ये हिंदूंचे प्रतिनिधित्व करून आपल्या यशस्वी व प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. ही त्यांची कारकीर्द १९४७-४८ सालापर्यंत सुरू होती. म्हणजे प्राध्यापक देवधर हे वयाच्या ५६व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होते! या ३७ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुरुवातीला तिरंगी (हिंदू, पारसी व युरोपीय संघ), मग चौरंगी (हिंदू, मुस्लिम, पारसी व युरोपीय संघ) व त्यानंतर रणजी सामने, असे मिळून एकूण ८१ प्रथम दर्जाच्या सामन्यांत भाग घेतला. त्यांतल्या अर्ध्यांहून अधिक सामन्यांत त्यांनी कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या हाताखाली खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विजय मर्चंट, विजय हजारे, कर्नल सी. के. नायडू, अमरसिंग, मोहम्मद निस्सार, कमल भांडारकर, दत्तू फडकर, खंडू रांगणेकर, रंगा सोहोनी, हेमू अधिकारी, रूसी मोदी, विनू मंकड व चंदू सरवटे असे सर्व नामांकित खेळाडू मोडतात! त्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी फलंदाजीत जवळजवळ चाळिशीची सरासरी राखली. प्राध्यापक देवधर जरी मुख्यतः मधल्या फळीतले फलंदाज होते, तरी संघाच्या जरुरीनुसार आघाडीपासून ते आठव्या क्रमांकापर्यंत ते फलंदाजी करत असत. अर्थात आजच्या क्रिकेटला भयंकर व्यावसायिक स्वरूप आल्यामुळे ३७ वर्षांत फक्त ८१ प्रथम दर्जाचे सामने ही आकडेवारी जरा अविश्वसनीय वाटेल. पण हे ध्यानात घ्या, की प्राध्यापक देवधरांच्या कारकिर्दीत त्यांच्या दुर्दैवाने दोन महायुद्धे होऊन गेली व त्यावेळी क्रिकेटला आजच्यासारखे व्यावसायिक स्वरूप आलेले नव्हते.

प्राध्यापक देवधरांच्या संपूर्ण कारकिर्दीत भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता. १९३२पर्यंत भारताचा स्वतःचा असा कसोटी संघ नव्हता. पण प्राध्यापक देवधर, सी. के. नायडू, अमरसिंग व मोहम्मद निस्सार यांसारख्या खेळाडूंची गुणवत्ताच १९३२ साली भारताचा स्वतःचा कसोटी संघ निर्माण करण्यास कारणीभूत ठरली होती. भारत स्वतःचा कसोटी संघ उभारू शकतो का, ही पाहणी करायला १९२६ साली सर आर्थर गिलिगनच्या नेतृत्वाखाली एम. सी. सी.चा संघ भारतात आला होता. त्या संघाविरुद्ध प्राध्यापक देवधरांनी १४८ धावांची अप्रतिम खेळी केली होती. ती खेळी व त्याआधीच्या सामन्यातली कर्नल सी. के. नायडू यांची ११२ मिनिटांत बारा षटकारांसह केलेली १५२ धावांची झंझावाती खेळी पाहून सर आर्थर गिलिगनची पूर्ण खात्री पटली, की भारताकडे आता स्वतःचा कसोटी संघ स्थापायला पुरेशी गुणवत्ता आहे. त्याच्याच शिफारशीमुळे १९३२मध्ये मग जागतिक क्रिकेट परिषदेने भारतीय कसोटी संघ स्थापण्यास हिरवा कंदील दाखवला. पण १९३२पर्यंत प्राध्यापक देवधर यांनी वयाची चाळिशी गाठली होती. त्यांचा वैयक्तिक क्रिकेट-फॉर्म जरी तोपर्यंत टिकून राहिला होता, तरी निव्वळ त्यांचे वय चाळिशीचे असल्यामुळे ते भारतीय संघात स्थान मिळण्यापासून वंचित राहिले. खरं तर एखाद्याने त्यामुळे नाउमेद होऊन क्रिकेटमधून संन्यास घेतला असता. पण क्रिकेट खेळावरच्या निस्सीम प्रेमामुळे त्यांना कसोटी संघातून डावलणार्‍यांच्या नाकावर टिच्चून ते त्यानंतर तब्बल सोळा वर्षे क्रिकेट खेळत राहिले. एवढंच नव्हे, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्थापण्यात सिंहाचा वाटा उचलून १९३४पासून १९४६पर्यंत महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. १९३९-४० व १९४०-४१च्या रणजी मोसमांत विजय हजार्‍यांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्राला लागोपाठ दोन रणजी विजेतेपदेही मिळवून दिली. १९४०-४१च्या रणजी उपांत्य फेरीत उत्तर भारताविरुद्ध वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी केलेल्या १९६ धावांच्या तडाखेबंद खेळीने सगळ्यांना तोंडात बोटे घालायला लावली. त्यापेक्षाही कहर म्हणजे १९४४मध्ये वयाच्या ५२व्या वर्षी नवानगरविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात १०५ व दुसर्‍या डावात १४१ धावा करुन, ते चाळिशीचे झाले म्हणून कसोटी संघात स्थान न देणार्‍यांना त्यांनी सणसणीत चपराकच दिली होती!

खरं म्हणजे वयाच्या चाळिशीच्या आसपास व नंतरच प्राध्यापक देवधरांची फलंदाजी अजून बहरात आली होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. उदाहरणेच द्यायची तर १९३०मध्ये कोलंबोला महाराजा ऑफ विझीच्या संघातर्फे त्यांनी युरोपीय संघाबरोबर पहिल्या सामन्यात नाबाद १०० धावा केल्या. महाराजा ऑफ विझीच्या संघात त्यावेळेला जगप्रसिद्ध सर जॅक हॉब्ज खेळत होते . दुसर्‍या सामन्यात सर जॅक हॉब्ज यांनी शतक ठोकले होते व त्या सामन्यात प्राध्यापक देवधर यांनी ७० धावा केल्या. त्या करताना त्यांनी सर जॅक हॉब्जबरोबर सहाव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली . त्या भागीदारीच्या दरम्यान व आधीच्या सामन्यातले प्राध्यापक देवधरांचे शतक बघून खुद्द सर जॅक हॉब्ज म्हणाले होते, की प्राध्यापक देवधरांसारखी गुणवत्ता असलेले फलंदाज भारताकडे असताना भारताला कसोटी दर्जा मिळायला काहीच अडचण येऊ नये! पुढे मग १९३७मध्ये लॉर्ड टेनिसनच्या एम. सी. सी . संघाविरुद्ध त्यांनी ११८ धावा केल्या, १९४० साली पश्चिम भारताविरुद्ध नाबाद १५७ धावा केल्या व त्याच वर्षी रणजीच्या उपांत्य फेरीत मुंबईविरुद्ध पुणे क्लब मैदानावर २४६ धावांची दणदणीत खेळी केली. तसेच १९४१मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर बंगालविरुद्ध त्यांनी १०६ धावा केल्या.

प्राध्यापक देवधर हे एक तडाखेबंद फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या तशा फलंदाजीमुळेच १९७३पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्राध्यापक देवधरांचा आदर, उशिरा का होईना, राखण्यासाठी त्यांच्या नावाने देवधर करंडक या नावाने ५० षटकांची एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा आयोजित केली. गेली ३७ वर्षे त्यांच्या नावाची ही मर्यादित षटकांची स्पर्धा अबाधित चालू आहे. आजच्या झटपट पैसे कमावण्याच्या क्रिकेटयुगात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ५० षटकांच्या स्पर्धाही त्यांच्या पैसे कमवण्याच्या उद्देशात आडव्या येत आहेत. २० षटकांच्या सामन्यात झटपट रग्गड पैसे कमावता येत असल्यामुळे त्यांना आता ५० षटकांच्या स्पर्धाही नकोशा झाल्या आहेत व अलीकडेच त्यांनी प्राध्यापक देवधरांच्या नावाने चालणारी देवधर करंडक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठे ते प्राध्यापक देवधर, ज्यांनी त्यांच्या क्रिकेटप्रेमामुळे वयाच्या ५६व्या वर्षापर्यंत क्रिकेटला आपले आयुष्य दिले व कुठे आजचे हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे निव्वळ पैशासाठी हपापलेले व्यापारी! क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणार्‍या व १९९३मध्ये वयाच्या १०१व्या वर्षी निधन पावलेल्या या महान क्रिकेटपटूला ही पैशाची हाव बघून खरोखरच खंत वाटली असती, याबाबत माझ्या मनात किंचितही संदेह नाही.

२. पद्माकर काशिनाथ शिवलकर

गेल्या शतकातला पूर्वार्ध प्राध्यापक देवधर यांनी कसोटी सामने न खेळूनही आपल्या फलंदाजीने जसा गाजवला, तसाच त्या शतकाचा उत्तरार्ध महाराष्ट्राच्या अजून एका सुपुत्राने एकही कसोटी सामना न खेळता आपल्या फिरकी गोलंदाजीने गाजवला! तो सुपुत्र म्हणजे मुंबईचे पद्माकर काशिनाथ शिवलकर! प्राध्यापक देवधर यांना खेळताना बघायचे भाग्य मला मिळाले नाही; पण पद्माकर शिवलकर यांची मंदगती डावखुरी फिरकी गोलंदाजी बघायचे सौभाग्य मात्र मला मिळाले होते. ६० व ७०च्या दशकात ज्यांनी ज्यांनी भारतातले क्रिकेट पाहिले आहे, त्यांपैकी कोणीच पद्माकर शिवलकर यांना विसरू शकणार नाही! १९७३-७४च्या दरम्यान जेव्हा नुकतीच मला समज यायला लागली होती, तेव्हा लहानपणी वडिलांबरोबर मी शिवाजी पार्कवर कांगा लीगचे सामने पाहायला जात असे. त्या वेळेला शिवाजी पार्क जिमखाना व दादर युनियन क्लब यांच्यातच कांगा लीगची फायनल व्हायची. का नाही होणार? त्या वेळेला, म्हणजे ६०च्या दशकाच्या शेवटी शेवटी व ७०च्या दशकाच्या सुरुवातीला, शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे रमाकांत देसाई, अजित वाडेकर, विजय मांजरेकर, विशू बोंद्रे, मनोहर हर्डीकर, पद्माकर शिवलकर, अब्दुल इस्माइल व संदीप पाटील यांसारखे मातब्बर खेळाडू खेळायचे. तर दादर युनियनतर्फे सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, विठ्ठल पाटील यांसारखे अतिरथी, महारथी खेळाडू खेळायचे. अशाच एका सामन्यात मी पद्माकर शिवलकरांना प्रथम पाहिले. त्यांचा तो तीन पावलांचा स्टार्ट व त्यांच्या त्या डावखुर्‍या मंदगती फ्लायटेड अचूक गोलंदाजीने सुनील गावसकरसारख्या माझ्या दैवताला असंख्य वेळेला चकवताना व बाद करताना पाहून मी शिवलकरांच्या गोलंदाजीच्या प्रेमातच पडलो.

पद्माकर शिवलकर यांचा जन्म मुंबईमध्ये १९४० साली झाला. १९६२पर्यंत त्यांनी आपल्या गोलंदाजीने बोर्ड अध्यक्षीय संघात स्थान मिळवले. तो संघ त्यावेळी भारताला भेट देणार्‍या आंतरराष्ट्रीय संघाबरोबर सामना खेळणार होता. त्या आंतरराष्ट्रीय संघात रिची बेनॉ,एव्हर्टन विक्स, बॉबी सिंप्सन व कॉलिन काउड्रे यांसारखे मातब्बर खेळाडू होते. त्या पहिल्याच सामन्यात शिवलकर यांनी पहिल्या डावात पाच बळी गारद केले. त्या सामन्यात त्यांनी एव्हर्टन विक्सला दोन्ही डावांत बाद करून आपल्या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीची चुणूक सर्व जगाला दाखवली. पण गंमत अशी बघा, की त्यावेळेला मुंबई रणजी संघात स्थान मिळायला इतकी स्पर्धा होती की पद्माकर शिवलकरांसारख्या उत्तम फिरकी गोलंदाजाला मुंबई संघातही स्थान मिळणे अवघड होते! कारण? कारण त्यावेळी मुंबईच्या संघात आधीच एक डावखुरा फिरकी गोलंदाज होता. तो म्हणजे बापू नाडकर्णी! बापू नाडकर्णी हे थोडीफार चांगली फलंदाजीसुद्धा करू शकत असल्यामुळे भारतीय संघातही ६०च्या दशकातल्या पूर्वार्धात पद्माकर शिवलकरांच्या ऐवजी बापू नाडकर्णी यांचीच वर्णी लागत होती. त्यामुळे १९६७-६८पर्यंत पद्माकर शिवलकर यांना मुंबईचा बारावा गडी म्हणूनच बहुतेक वेळा खेळावे लागले. पण त्यादरम्यान ज्या काही तुरळक संधी शिवलकरांच्या वाट्याला आल्या त्यांचे त्यांनी अगदी सोने केले होते. उदाहरणार्थ, १९६५च्या सिलोनविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात त्यांनी परत एकदा पाच गडी एका डावात गारद केले होते. शिवलकरांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते एकूण १२४ प्रथम दर्जाचे सामने खेळले. त्यांपैकी ४२ सामन्यांत, म्हणजे तीनपैकी एका सामन्यात त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तेही १९ धावांच्या सरासरीने! आता बोला.

१९६८मध्ये बापू नाडकर्णी यांच्या निवृत्तीनंतर शिवलकर यांची मुंबई संघात तर वर्णी लागली, पण भारतीय संघात मात्र आता बिशनसिंग बेदी हे नाव चमकू लागले होते. वयाच्या विशीत असल्यामुळे व त्याचीही शैली साधारणपणे शिवलकरांसारखीच असल्यामुळे २८ वर्षांच्या शिवलकरांना त्यावेळी डावलण्यात आले व बेदीला संधी देण्यात भारतीय निवडसमितीने शहाणपणा मानला. सत्तरीच्या पूर्वार्धातही शिवलकरांचे नशीब बदलले नाही, कारण त्यावेळी मग एकनाथ सोलकर याला भारतीय संघात स्थान मिळाले. कारण सोलकर फलंदाजी चांगली करू शकत होता व त्याची डावखुरी मध्यमगती गोलंदाजी बेदीसारखी नव्हती. म्हणून बेदी व तो भारतीय संघात एकाच वेळेला खेळू शकत होते. हे सगळे बघत असताना शिवलकरांच्या मनाला किती यातना होत असतील? पण त्यांनी एकदाही तक्रारीचा सूर न काढता, आपल्या मंदगती डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीने भारतातल्या व भारताला भेट देणार्‍या परदेशी संघांतल्या फलंदाजांना आपल्या बोटांच्या जादूने व आपल्या फ्लायटेड लूपने अक्षरशः नाचवले! १९६१ ते १९७३ अशी सलग १३ वर्षे मुंबईला रणजीविजेते बनवण्यात शिवलकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्याची साक्ष द्यायला अनेक सामन्यांतील शिवलकरांच्या गोलंदाजीची आकडेवारी मला तुमच्यासमोर देता येईल, पण मी इथे एकाच रणजी अंतिम सामन्याची गोष्ट थोडक्यात लिहितो.

१९७२-७३चा रणजी करंडक अंतिम सामना मुंबई व तामिळनाडू यांच्यात मद्रासला चेपॉक मैदानावर झाला. तामिळनाडूकडे त्या वेळेला व्ही. व्ही . कुमार हा जबरदस्त लेग ब्रेक गुगली गोलंदाज व श्रीनिवास वेंकटराघवनसारखा अव्वल दर्जाचा ऑफ ब्रेक गोलंदाज असल्यामुळे तामिळनाडूने होम फिल्डचा फायदा करुन घेण्याचे ठरवले. मुद्दामच फिरकी गोलंदाजीला अनुकूल अशी धावपट्टी बनवली. पहिल्या डावात गावसकर, सुधीर नाईक, अजित वाडेकर, अशोक मांकड, दिलीप सरदेसाई व एकनाथ सोलकर असे खंदे फलंदाज असलेला मुंबईचा संघ जेव्हा केवळ १५१ धावांत गारद झाला, तेव्हा तामिळनाडूचा कर्णधार वेंकटराघवन मनात मांडे खाऊ लागला. पण त्याने व तामिळनाडूने तशी धावपट्टी बनवताना एका गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते - मुंबईकडेसुद्धा शिवलकरांसारखा अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज होता. पद्माकर शिवलकर यांनी मग तामिळनाडूच्या पहिल्या डावात आपल्या फिरकीची कमाल दाखवत १७ षटकांत फक्त १६ धावा देऊन तामिळनाडूचे आठ गडी बाद केले व तामिळनाडूचा पहिला डाव अवघ्या ८० धावांत गुंडाळला. पण मुंबईची दुसर्‍या डावातसुद्धा घसरगुंडी उडाली व त्यांचा दुसरा डाव ११३ धावांत संपुष्टात आला. आता विजयासाठी तामिळनाडूला फक्त १८४ धावा करायच्या होत्या. पण तामिळनाडूच्या दुसर्‍या डावातही शिवलकर यांनी परत एकदा १५ षटकांत फक्त १८ धावा देउन ५ गडी बाद केले व तामिळनाडूचा ६१ धावांत खुर्दा केला! मुंबईने तो अंतिम सामना १२३ धावांनी जिंकला व आपला लागोपाठचा तेरावा रणजी करंडक परत एकदा शिवलकर यांच्या फिरकीच्या जादूच्या बळावर जिंकला!

१९७८-७९मध्ये पाकिस्तानच्या झहीर अब्बासने जेव्हा बिशनसिंग बेदीची कारकीर्द संपवण्यास हातभार लावला, तेव्हाही भारतीय क्रिकेट निवडसमितीने परत एकदा शिवलकर यांना डावलले व बंगालचा डावखुरा फिरकी गोलंदाज दिलीप दोशी याला भारतीय संघात स्थान दिले. नंतर १९८१मध्येही रवी शास्त्री या डावखुर्‍या गोलंदाजाची निवड शिवलकर यांच्या पुढे केली गेली. पण प्राध्यापक देवधर यांच्याप्रमाणे शिवलकर यांनीही नाउमेद न होता क्रिकेट खेळणे चालूच ठेवले. १९८८मध्ये, म्हणजे वयाच्या ४८व्या वर्षापर्यंत ते शिवाजी पार्कवर कांगा लीग व मुंबईतर्फे रणजी सामने खेळतच राहिले. सध्या पद्माकर शिवलकर हे मुंबई क्रिकेट निवडसमितीचे अध्यक्ष या नात्याने व शिवाजी पार्क जिमखान्याचे फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून आपले निस्सीम क्रिकेटप्रेम जोपासत आहेत.

पद्माकर शिवलकर यांच्या फिरकीच्या जादूने सुनील गावसकर इतका प्रभावित झाला होता, की त्याने नंतर त्याच्या एका पुस्तकात लिहिले होते की त्याचा ऑल टाइम भारतीय संघ पद्माकर शिवलकर यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही! झालंच तर टाटा कंपनीनेही, ज्यांच्यातर्फे शिवलकर खेळायचे, पद्माकर शिवलकर यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला आहे. हे लक्षात घ्या, की टाटातर्फे आतापर्यंत मायकेल फरेरा, गीत सेठी, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, रवी शास्त्री व पुलेला गोपीचंद यांसारखे जागतिक कीर्तीचे खेळाडू खेळले आहेत. त्यांच्यापैकी कोणाचाच असा गौरव टाटा कंपनीने अजूनपर्यंत केलेला नाही!

तर मंडळी, असे हे संयुक्त महाराष्ट्राचे दोन महान क्रिकेटपटू व त्या खेळातले दोन अनमोल हिरे. यंदाच्या हितगुज दिवाळी अंकातील महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त काढलेल्या विशेष पुरवणीतला हा लेख वाचून तुम्ही त्या दोघांचा एकप्रकारे सन्मानच केला आहे, त्याबद्दल धन्यवाद!

- mukund