त्रिशंकू

लेकीचं आणि स्वत:चं जेवण आटपून मेघना जरा निवांत टेकते ना टेकते, तोच फोन वाजला. आठवड्यातून तीनदा न चुकता रात्री दहा वाजता वाजणारा फोन म्हणजे नक्की अभिजित ! रोजच्यासारखाच अंगावर आलेला एक गच्च दिवस, आताच्या चार मोकळ्या क्षणांना चपलेतल्या खड्यासारखे बोचणारे उद्याचे विचार आणि शेजारी झोपेला आलेली कुरकुरणारी पोर. किती वेळ आणि काय काय बोलता येणार आहे अमेरिकेत जाऊन बसलेल्या नवर्‍याशी ? आणि बोलण्यासारखं जिव्हाळ्याचं असं खरंच काही आहे का आपल्यात ? ... म्हणजे अर्थात सोनू सोडून. काहीशा कंटाळ्यानेच तिने फोन उचलला. "काय म्हणताय ?" पलीकडून ठरलेलाच प्रश्न आणि त्यावर मेघनाची ठरलेली उत्तरं. मग सोनूशी पाच मिनिटे त्याच त्या मुलाखतीचे प्रश्न काढल्यासारख्या शाळा काय म्हणते, आईला त्रास नाही ना दिला, आज काय जेवलीस-वाल्या आखीव गप्पा. सोनूशी बोलून झाल्यावर परस्पर फोन ठेवला जाणार हेही नेहेमीचंच. त्यामुळे ती कंटाळवाणी, अपरिहार्य पाच मिनिटं संपायची वाट बघत मेघना हातातल्या रिमोटशी चाळा करत उगीचच चॅनल्स बदलत राहिली. "आई, तुझ्याशी बोलायचंय बाबाला," असं म्हणून सोनूने समोर चाललेल्या दृश्यात नकळत गुंगलेल्या तिला हलवलं, तेव्हा तिला जरासं आश्चर्यच वाटलं.
"मी परत येतोय. बहुतेक या मंथ-एंड पर्यंत." हे वाक्य आज ना उद्या ऐकायचंच आहे हे माहीत असूनही किंचितसा धक्का बसलाच.
"इतकं अचानक?"
"अचानक काय आहे त्याच्यात. सॉफ्टवेअरमध्ये हे असंच चालायचं. प्रोजेक्ट संपला. नवीन मिळायला अजून दोनेक महिने तरी जातील. तोपर्यंत इथे कोण पोसणार आहे मला?"
फोन ठेवला आणि मनात हिशेब झाला झरकन् ... मंथ-एंड म्हणजे अजून पंधरा दिवस. फाशी मिळालेल्या कैद्याला अपूर्ण राहिलेल्या इच्छा सटासट आठवू लागतील, तसं होऊन गेलं तिचं. तब्बल सहा महिने मोकळे मिळाले. पण त्यातले पहिले दोन महिने तर अभिजितचे आईबाबा येऊन राहिले होते सोबतीला. त्यामुळे ते वजा. उरलेल्या चार महिन्यांत किती काय काय सुटून गेलं हातातून. सोनूला दोन दिवस आईकडे ठेवून मैत्रिणींना घरी राहायला बोलावणं.. जुने दिवस परत नव्या दमाने जगणं.. रोजच्या धबडग्यात मनातले बेत मनातच राहिले. अभिजितच्या मित्रांना साग्रसंगीत जेवणावळी घालण्यात वाया गेलेल्या असंख्य वीकएंड्सचा वचपा काढायचा होता प्रत्येक आठवड्याला एखादं मराठी नाटक, सिनेमा टाकून. अभिजितला आवडत नाही म्हणून घरात अजिबात न शिजणारं दाणे आणि कांद्याची पात घालून केलेलं वांग्याचं भरीत आणि उकडीचे मोदक अगदी मन भरेस्तोवर खाऊन घ्यायचे होते. आणखीही काही होतं राहून गेलेलं ... कधीही न बघायला मिळणारी नवाची सिरियल आणि रात्रीच्या नकोशा कर्तव्यापासून सुटका झालेली असताना अंथरुणाला पाठ टेकताक्षणी बिनघोर झोप! ह्यातलं काहीच जमलं नाही. अगदी पाठ टेकताक्षणी झोपून जाणंही नाही. गाढ झोपलेल्या सोनूच्या केसांतून मायेनं हात फिरवताना तिला वाटलं... हवंहवंसं वाटणारं मनातलं आयुष्य हुलकावणी देतच राहिलं प्रत्यक्षात. कायमच. मग आताच्या या सहा महिन्यांबद्दल काय वाटून घ्यायचं एवढं? आणि असेल नशिबात, तर जमेल परत कधीतरी ... परत कधीतरी म्हणजे कधी? अभिजित दुसर्‍या प्रोजेक्टवर देशाबाहेर गेला तर? तिला लखकन् आठवलं,"नवीन प्रोजेक्ट मिळायला दोन महिने लागतील," असं काहीतरी म्हणत होता. म्हणजे विचार तरी काय आहे ह्याचा? आणि आल्याआल्या त्याने परत जावं हेच हवंय का आपल्यालासुद्धा? पण मग गेले सहा महिने सगळं निभावताना होणारी तारांबळ, चार वर्षांच्या अजाण मुलीला घेऊन एकटं राहताना रात्री दाटून येणारी असुरक्षितता आणि त्यापायी उडणारी झोप. तो इथे असतो तेव्हा त्याची मदत नसते हे खरंच. बरेचदा उपद्रवच असतो हेही तितकंच खरं. पण तो असतो. त्याच्या नुसत्या असण्यानेही फरक पडतो. आशाळभूतासारखे बोलायला येणारे शेजारचे कुलकर्णी, ज्याची नजर पुसता पुसली जात नाही अशा ओशट डोळ्यांचा ऑफिसातला नाईक, सोसायटीतला मख्ख चेहर्‍याचा वॉचमन, आणि रस्त्यात, स्टेशनवर धक्का मारुन जाणारे बिनचेहर्‍यांचे अनेक ह्या सगळ्यांना दाखवायला तरी तो असतो ... त्यांना शह द्यायला तरी तो हवाच! आपल्याला भले काही का वाटेना. स्वत:च्या कमकुवतपणाची जाणीव झाली, की मेघनाच्या ठिसूळ मनाचे तुकडे तुकडे होतात. नेहमीच. असलं कसलं हे दुभंग जिणं. आजही अटळपणे वाटलं... आशूशी लग्न झालं असतं आपलं, तर एकसंध आयुष्य जगता आलं असतं का?... हे असं वाटणंही नेहेमीचंच!

आशूला पहिल्यांदा पाहिलं ते कॉलेजच्या कॅंटीनमध्ये मित्रांच्या गराड्यात. ऐन पावसाळ्याचे दिवस. सकाळची ताजीतवानी वेळ आणि हिरवंगार झालेलं कॅंपस! कधी नव्हे ते मेघनाला लेक्चर बंक करुन बाहेरच्या थंड धुक्यात भटकायची आलेली लहर आणि मग त्यानंतर स्वाभाविकपणे वाफाळत्या चहासाठी कॅंटीनकडे वळलेली पावलं. दारापासच्याच मोठ्या चौकोनी टेबलाभोवती आठ-दहा मुलं दाटीवाटीने बसली होती. दर दहा सेकंदाला हसण्याचे कल्लोळ उठत होते. कुतूहल वाटलं म्हणून लक्षपूर्वक पाहिलं, तर साधासाच दिसणारा एक मुलगा कुठलीशी विनोदी कविता वाचत होता. विनोदाला सगळे हसले, की थांबून वर पाहायचा. हशा विरला, की परत पुढचं वाचन सुरु. तो काय वाचतोय यापेक्षा त्याच्या हसर्‍या डोळ्यांकडेच लक्ष लागून राहिलं तिचं. "आशुतोष... आशुतोष साने." मैत्रिणीने माहिती पुरवली.
"तुला काय माहित ?"...
"माझ्या काकांच्या समोरच राहतो. या वर्षीच आपल्या इथे घेतली ऍडमिशन... आधी रुईयाला होता."

त्या वेळी मेघनाला तरी कुठे माहित होतं, की इतक्याशा धाग्याची किती घट्ट वीण बांधली जाणार आहे ते? एकदा दिसल्यावर, मग तो दिसतच राहिला. कधी कॅंटीनमध्ये. कधी टीचर्स-रुमच्या बाहेर. कधी लायब्ररीत. कधी कॅंपसमधल्या तिच्या आवडत्या बकुळीच्या झाडाखाली. ओळख व्हायलाच पाहिजे ह्याच्याशी असं तीव्रतेने वाटू लागलं आणि मग तिनेच मैत्रिणीला मध्ये घालून ती करुनही घेतली. आशुतोष एक वर्ष पुढे होता तिच्या. आर्टसलाच. तिच्यासारखाच. मराठी घेऊन पीएच्.डी. करायचं म्हणणारा. मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणारा. हळुवार कविता लिहिणारा! तपकिरी डोळ्यांचा, हळव्या मनाचा आशू.... एकदा त्याच्या ग्रूपमध्ये टूम निघाली. पृथ्वी थिएटरला कुठलंसं प्रायोगिक नाटक बघायला जायची. त्यांची मैत्री होऊन वर्ष उलटून गेलं होतं. त्याच्या सहवासात राहायची एकही संधी ती सोडत नव्हती. मैत्रिणींबरोबर पिक्चरला जाते असं सांगून धडधडत्या काळजाने आजही त्याच्याबरोबर आली होती. तिच्या सुदैवाने पहिल्या अर्ध्या तासातच तोही कंटाळला नाटकाला. आणि मग दोघंच बाहेर पडले. वेळ होता हाताशी म्हणून जवळच असलेल्या जुहूबीचवर जाऊन पोहोचले. त्यावेळीही हवा पावसाळीच होती नेमकी. सूर्यास्त कधीचा होऊन गेला होता. क्षितिजावर पसरत चाललेला काळोख आणि किनार्‍यावर फोफावणारा दिव्यांचा झगमगाट. ते बसले होते त्या पावभाजीच्या टपरीवर लागलेलं ए.आर. रेहमानचं तरल गाणं. आणि ती धून अजूनच हळुवारपणे खोलवर झिरपवणारी समुद्राची गाज. "घनू, मला तुला काही विचारायचंय," एवढंच बोलला आशू. पुढचं सारं त्या तपकिरी डोळ्यांतच वाचलं होतं तिनं. आणि त्याची ती ’घनू’ हाक ! पावसाने ओथंबलेल्या ढगासारखी. "मला कळलंय आशू तुझं म्हणणं." ती ही एवढंच बोलू शकली होती त्यावेळी. त्याचे ओलसर डोळे हसरे झाले आणि तिला पटलं की ह्या ह्रदयीचं त्या ह्रदयी पोचलं. आधी पावसात भिजलेली आणि मग आठवणीत भिजून राहिलेली ती उत्कट संध्याकाळ! ... एक संध्याकाळ आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी त्या क्षणांना जीवेघेणं कापत गेलेली जुहूबीचवरचीच दुसरी संध्याकाळ...

अभिजित आणि तिचं नुकतंच लग्न झालं होतं. रविवारच्या एका सुंदर संध्याकाळी समुद्रावरचा सूर्यास्त पिऊन घ्यायची अनिवार इच्छा झाली मेघनाला. त्याला यायचंच नव्हतं खरं तर. घरात पाय पसरुन आरामात एखादा इंग्लिश पिक्चर बघत बसायचं सोडून ही सनसेट वगैरेची काय भानगड! म्हणजे असं स्वच्छ शब्दांत ऐकवलंच होतं त्याने. आताची ती असती, तर त्याच्या भानगडीत पडली नसतीही. पण तेव्हाचं वेगळंच सगळं... त्याच्या मनाविरुद्ध तिने त्याला जुहूला नेलंच. समोरच्या अपार पाण्याकडे डोळे लावून जगाकडे पाठ करुन बसलं, की मेघनाला कसलं भानच नाही उरत. तेव्हाही अशीच हरवली ती एकटक. गुडघ्यात मान खुपसून शांतपणे समोरचं बिंब बुडण्याची वाट बघत. आणि सूर्य क्षितिजाखाली उतरला न उतरला, तोच अभिजितचे शब्द ओरखाडून गेले, "बघितला ना सूर्यास्त, उठा आता!" हतबुद्धच व्हायला झालं एकदम. एक क्षण उमजलंच नाही काही. त्याच्याकडे पाहिलं आणि कळलं त्याने मजा वगैरे काही केली नव्हती ... ही मेन्ट इट ! मगाशी मनात भरुन राहिलेली ती शांतता आणि आता पाटीवर अणकुचीदार नखांनी ख्ररवडल्यासारखे हे कर्र शब्द. तो आवाज सहनच होईना मेघनाला. वाटलं, आज रात्रीच्या बेगडी झगमगाटातच यायला हवं होतं इथे... आणि त्यावेळी आशूबरोबर सूर्यास्ताच्या आधी! आयुष्य कदाचित वेगळंच झालं असतं... कदाचित!

आशूबरोबर जगलेली ती जुहूवरची संध्याकाळ. त्या सोनेरी क्षणांनी उजळूनच टाकलं तिला. एकोणिसाव्या वर्षी केलेलं आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेम. आणि ते ही कुणा ऐर्‍यागैर्‍यावर नव्हे. आशूसारख्या उमद्या, गुणांनी लाख असलेल्या मुलावर. विनोदी कविता वाचून कॅंटीन हशाने दणाणून टाकणारा आशू.. घरी, कॉलेज सगळीकडे मित्रमंडळाचा लाडका आशू. राज्य निबंधस्पर्धेत पहिलं बक्षिस जिंकून आणणारा.. विलक्षण बांधिलकीतून आंधळ्या मुलाचा लेखनिक होणारा.. ग्रेसच्या कविता वाचताना डोळ्यांत पाणी येणारा आणि रुसलेल्या तिची समजूत काढतानाही डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसणारा आशू.. कधीतरीच रागावणारा, पण रागावला की मुका होऊन जाणारा आशू... आशूकडे पाहिलं की कधी कधी फार कोतं वाटायचं मेघनाला. सर्वार्थाने सामान्य वकुबाची ती. आशूसारख्याने आपल्यावर प्रेम करावं इतकी लायकी आहे का आपली, अशी अपराधी शंका वेढून राहायची. "काय पाहिलंस रे तू माझ्यात ?" असं हजारदा तरी आलं असेल मनात; पण विचारायचं राहूनच गेलं शेवटापर्यंत. अभिजितला मात्र विचारलं होतं तिने लग्न ठरल्यावर, " काय आवडलं माझ्यात म्हणून पसंत केलंस ?" आशूने दिलं असतं तसं काव्यात्म उत्तर यायची अपेक्षा नव्हतीच; पण अभिजितने जेव्हा... "आपली घरची बॅकग्राऊंड सारखी... ते... आईबाबांनाही पसंत आहेस, म्हणजे सगळं चांगलंच असणार," असं छापील उत्तर दिलं होतं, तेव्हा तिने तेही गोडच मानून घेतलं होतं. ठरवून केलेली लग्नं अशीच असतात अशी स्वत:ची समजूत घालून. आशूला तोडलंस ना मग आता हे लग्न जितकं चांगल्या प्रकारे निभावून नेता येईल तितकं न्यायलाच हवं. तेच आपलं प्रायश्चित्त! कोरड्याठाक स्वभावाच्या अभिजितला तिने तेव्हा तरी आपलंच मानलं होतं. आशूशी लग्न होऊ शकणार नाही हे स्वीकारायला कित्येक दिवस लागले होते. पण एकदा ते स्वीकारल्यावर आपण लग्न न करता राहू शकणार नाही हे सत्य त्यामानाने लवकरच पचवलं मेघनाने. बाबांनी आणलेलं पहिलंच स्थळ अभिजितचं. अभिजित कर्णिक ... सॉफ्टवेअर इंजिनियर. वय, उंची, जात, पगार, घरचं वळण. सगळंच आकर्षक होतं. पहिल्यांदा घरी आला बघायला, तेव्हा तिलाही चक्क आवडला. फक्त एकदा वाटून गेलं बाकी काही नसेल तरी निदान त्याचे डोळे आशूसारखे हवे होते... टचकन भरुन येणारे. भरुन येणारे डोळे नव्हते त्याचे आणि मनात तरी ती भरली होती की नाही, कुणास ठाऊक? पण लग्न झालं. लग्नानंतर जोडीने गणपतीला गेल्यावर तिने अगदी कळवळून विनवलं होतं देवाला..."बाबा रे, मागेही एकदा असंच साकडं घातलं होतं तुला. त्या वेळी विघ्नहर्ता होऊन नाही आलास माझ्यासाठी. या वेळी तरी ये. इथून पुढे कुठलंही विघ्न नको आयुष्यात!"

वंशपरंपरेने चालत आलेला देवातला गणपती असायचा आशूकडे. चांगला दहा दिवस. त्याचे वडील भिक्षुकी करायचे, त्यामुळे गौरी-गणपती म्हणजे बडंच प्रस्थ असायचं सान्यांकडे. आशूकडे पहिल्यांदा जायचं त्याच्या घरच्यांना भेटायला ते गणपतीच्या उपस्थितीत. मेघनाला शकुनच वाटला तो. "तिसर्‍या-चौथ्या दिवशी सकाळचीच ये. त्यावेळी वर्दळ नसते लोकांची. जेवायला थांबशील ना? तसं सांगूनच ठेवीन आईला. जमलं तर साडी नेसून ये, येशील ना?" त्याच्या आर्जवी भाषेची मेघनाला गंमत वाटायची आणि प्रचंड कौतुक. नाहीतर तिचं बोलणं म्हणजे हुकूमशाही नुसती. हुकूम करा राणीसरकार, हुजरे आहेतच झेलायला तय्यार... त्याचं पेटंट वाक्य होतं तिच्याबाबतीतलं. त्याचं साधं "हे कर, ते सांग, ते ठेव" सुद्धा "करशील, सांगशील, ठेवशील जमलं की," असं मुलायम होऊनच यायचं. गुलबक्षी रंगाची साडी आणि त्यावर पाणीदार मोत्यांची माळ! आशूचे डोळे जणू आरसा झाले होते त्या दिवशी आणि त्याच्या तपकिरी डोळ्यांत तिचंच प्रतिबिंब दिसत होतं तिला सतत. चाळीतलं दोन खोल्यांचं त्याचं छोटं, नीटनेटकं घर. नि त्या साध्या घरात राहणारी ऐसपैस, मोकळ्या स्वभावाची माणसं. "ही घनू." आशूने ओळख करुन दिल्यावर लाजूनच गेली मेघना. असं सगळ्यांसमोर घनू म्हणायचं म्हणजे! "आम्ही पण घनू म्हटलं तर चालेल ना?" त्याच्या आईची थेट त्याच्यासारखीच आर्जवी भाषा आणि हसताना अगदी तस्सेच ओले झालेले डोळे. हरखून गेली मेघना. काय नशीब काढलं होतं म्हणून अशा माणसांशी बंध जुळणार आहेत असं मनात आल्यावाचून राहिलं नाही. गणपतीसमोर उभं राहिल्यावर एकच मागणं मागितलं होतं... आशूशी लग्न होऊ दे, लवकरात लवकर! पण तिच्या मनातलं ऐकूच गेलं नाही देवाला... सांगायच्या आधीच घरी कळलं आणि आधीच तापट असणार्‍या तिच्या वडिलांचं पित्तच खवळलं. "कसले भिकेचे डोहाळे लागले म्हणून त्या चाळीतल्या दीडदमडीच्या भटुरड्याशी लग्न ठरवलंस? मराठीचा प्रोफेसर व्हायचंय म्हणे. सरकारी ब्राह्मणांच्या जमान्यात कोण नोकरी द्यायला बसलाय ह्याला? फिश मिळत नाही म्हणून गुरुवारचं जेवण घशाखाली न उतरणारी तू. लग्नानंतर हरताळका करुन राहणार आहेस का रोज?" रागाने आंधळ्या झालेल्या बाबांना आशूचे गुण दिसत नव्हते आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या तिला बाबा काढत असलेला एकही दोष! वादावादीत हात उठला तिच्या अंगावर तेव्हा मग आई मध्ये पडली. काळानिळा गाल घेऊन रात्रभर धरण फुटल्यासारख्या रडणार्‍या मेघनाला कळतच नव्हतं जास्त दु:ख नक्की कशाचं झालंय?... आशू दुरावणार ह्याचं की बाबांची वक्तव्य ऐकून ते कायमचे मनातून उतरले ह्याचं!

आईनं घट्टपणे सावरलं त्या काळात आणि वास्तवाचं भानही आणून दिलं तिला. बाबांच्या बोलण्यातला वाईट भाग सोडून दे मेघा आणि शांत मनाने विचार कर त्यांच्या प्रश्नांवर, आई म्हणाली होती. जखम चिघळल्यासारखं घरातलं वातावरण आणि मनाला लागलेला असह्य ठणका. मार्ग तर हवाच होता काढायला. अबोलपणे धुमसत राहणारे बाबा पाहिले, की मनाची चलबिचल व्हायची. नक्की कसं वागायला हवं अशा परिस्थितीत? आपण काही चुकीचं केलेलं नाही ह्याची खात्री वाटत असूनही असं अपराधी का वाटत राहतं वावरताना. तशी गरज पडलीच, तर मागचे बंध संपूर्णपणे तोडून नवे बंध जोडण्याची हिंमत आहे आपल्यात? आशूचं शिक्षण संपणार कधी, त्यानंतर नोकरी लागणार कधी... आणि नाहीच लागली तर? साताठ वर्षं थांबायची तयारी आहे?... आतापर्यंत हे प्रश्न पडलेच नव्हते. पडले नव्हते म्हणून उत्तरं शोधायची गरज वाटली नव्हती. आता उत्तरं कळून चुकली होती मनोमन आणि प्रश्नांना बगल देऊन तसंच पुढे निघून जावंसं वाटत होतं. मोकळ्या आकाशात अचानक ढग गोळा होऊन सगळं अंधारुन जावं, तसं दिवसेंदिवस भेकड दुबळेपणाची जाणीव तिचं मन व्यापत चालली होती. तरीही एकदाचं आशूशी बोलायला हवं, बोलायलाच हवं. उसनं बळ जमवलं कसंतरी कित्येक दिवसांनी प्रथमच त्याला सामोरं जाण्याचं.
"काय करायला हवं आता आपण ?" तिने काकुळतीला येऊन विचारलं होतं.
गंभीर, स्तब्ध आशू आधी एवढंच म्हणाला होता, "घनू, जे काही करायचं ते घरच्यांना न दुखावता."
मग सावकाश म्हणाला, "वर्तमान नुसता सुटा नसतोच कधी ... त्याला एक गतकाळ तर असतोच; पण आज जसं वागू त्यावर उद्याचा वर्तमानही ठरणार असतो. त्या दोन्हीचं ओझं वागवत आजची पावलं माझ्याबरोबर टाकणं जमेल तुला ? खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायचायस घनू."
आणखीही दिलासा देणारं असं बोलला असावा तो. पण मेघनाला त्या क्षणी तरी फक्त दोनच गोष्टी जाणवल्या. आशूचं असामान्यत्व आपल्याला झेपणारं नाही ... आणि आपण सुटंच चालत राहिलो आजपर्यंत. मागचापुढचा विचार केलाच नाही. कँपसमधल्या बकुळीच्या झाडाखाली दोघं कितीवेळ उभी होती कुणास ठाऊक. "नाही आशू, नाही जमणार ...." दुबळेपणाची ही दरी ओलांडायला पहाडासारखं निधडं काळीज हवं.... आशूने डोळ्यांनीच टिपलं तिचं उत्तर. त्याच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी तिला सांगून गेलं, की या वेळीही ह्या ह्रदयीचं त्या ह्रदयी पोचलं.

अभिजितशी लग्न झालं आणि आशूचा कप्पा मेघनाने समंजसपणे बंद केला. जे घडलं त्याचा विचार अजिबात करायचा नाही, तिने निक्षून बजावलं स्वत:ला. तसा अभिजित वाईट नव्हता. मारझोड करणारे, बाहेर भानगडी करणारे नवरे वाईट. मग हा लौकिकार्थाने चांगलाच म्हणायचा. शिवाय ज्या मुद्द्यांवर आशूबरोबर पावलं टाकायला ती बिचकली होती, ते सगळंच खणखणीत देत राहणार होता तो. पैसा, पत, आरामशीर आयुष्य. सुखाची धुंदी अलगद चढलीही असती. गतकाळाचं ओझं मागे राहून गेलंही असतं. परत तसंच सुटं सुटं चालता आलं असतं. समाजमान्य, भौतिक सुखाच्या पांघरुणाखाली कमकुवत मन नेहमीच ऊब शोधतं. तिनेही शोधली असती. पण एखाद्या सुंदर चित्रावर शाईचा डाग पडावा आणि पुसायच्या आत तो भरभर पसरत जावा तसं घडत गेलं हळूहळू... लग्न नवीन असताना मित्र आले होते एकदा घरी जेवायला आणि प्यायला. लग्नाच्या आधीपासूनच दर शनिवारची 'क्लेंझिंग पार्टी' रुटीनच होती म्हणे. त्यात तिला वावगं वाटायचं काहीच कारण नव्हतं. सावलीला बसून गायी रवंथ करतात, तसं ए.सी.त बसून तळलेल्या काजूचे बकाणे भरत चबडचबड चाललेल्या त्यांच्या रटाळ गॉसिप्समध्ये मात्र तिला काडीचाही रस नव्हता. खाणं वाढल्यावर आतल्या खोलीत निवांत पुस्तक घेतलं हातात. त्यातल्या कथेत अशी पार रंगून गेली, की तंद्रीत अभिजितने मारलेल्या दोन-चार हाका पोचल्याच नाहीत कानापर्यंत. "पापड तळून दे ताबडतोब!" पुढ्यात उभं ठाकलेल्या त्याला बघून दचकलीच ती. "खूप छान वळणावर आलीय रे गोष्ट. एवढं पान वाचते आणि देते." ती अजूनही गोष्टीतल्याच विश्वात! "दिवसभर लोळत असतेस ना घरी नवर्‍याच्या जीवावर तेव्हा वाच पुस्तकं. आत्ता मी सांगतो ते कर." ... बाबांनी गालावर मारलेली चपराक परत नव्याने सणसणत गेली. उठून स्वयंपाकघरात जाताना त्याच्या मित्रांची प्रतिक्रिया आजमावण्याचा धीर नाही झाला. नंतर कित्येक दिवस मन हुळहुळत राहिलं. पण चार पेग पोटात गेल्यावरच नाही... वरणभाताचं सात्विक जेवण जेवूनसुद्धा हा असंच बोलणार हे हळूहळू अंगवळणी पडलं. पाडून घ्यावंच लागलं. सोनूचा जन्म झाला, तेव्हा बाळ पहिल्यांदा हातात घेतानाचा त्याचा अभिमानाने फुललेला चेहेरा पाहून आशेचे कोंब तरारले होते पुन्हा एकदा. वाटलं होतं की जन्म देताना तुटलेली नाळ आपल्याला आणि अभिजितला नव्याने जोडून देईल. नऊ दिवसांची नवलाई लवकरच ओसरुन गेली. कळून गेलं की सरणार्‍या काळाबरोबर फक्त देहात स्थित्यंतरं होतात. स्वभाव, मन, विचार, विकार आपापल्या जागीच राहतात. अभिजित आणि आपल्या नात्यात तरी हेच खरं! मग सोनू तीन वर्षांची थोडी सुटी झाल्यावर कुठल्याशा कंपनीत तिने एक डोक्याला ताप न देणारी टुकार पार्टटाईम नोकरीही घेऊन टाकली. हो, उगीच चारचौघांत तिच्या निरुद्देश लोळण्याचा उद्धार नको व्हायला! संसार सुरळीत चालू राहिला. सोन्यासारखी मुलगी, कर्तबगार नवरा. आशूशी लग्न झालं असतं, तर कदाचित कधी चाखायला मिळाली नसती अशी सुखं. आणि कधीच चाखावी लागली नसती अशी दु:खंही! ... पाण्यावर तरंगणार्‍या तेलासारखा अतृप्तीचा एक तवंग तेवढा थरथरत राहिला मनावर. कुठल्याशा अतीव दुखर्‍या क्षणी निग्रहाने खोल-खोल गाडलेल्या आठवणी तिला न जुमानता मनभरुन पसरल्या ... पँडोराच्या बॉक्ससारख्या. आणि मग त्यामागून तलखीतल्या झुळकेसारखी आलेली ती पुसटशी आशा. परत तोच सुटं चालण्याचा वेडा खेळ. आशूच्या मनात अजूनही आपल्याबद्दल काही उरलं असेल का ? ... प्रवाहपतितासारखं इतकं पुढे निघून आल्यावर, अजूनही ? वर्तमानाचं बोट सोडून कधीही न घडणार्‍या कल्पनेतल्या भविष्याच्या मागे धावत राहिलीही असती ती अशीच. फुलपाखराच्या मागे उनाडणार्‍या मुलासारखी. पण मग मध्येच कधी कानावर आलं. आशूने मुंबई सोडली. सोलापूरला कुठलंसं नवीन कॉलेज निघायचं होतं, तिथे मराठीची प्रोफेसरकी करण्यासाठी. त्यानंतर काही काळाने ओघानेच मग त्याचं लग्न झाल्याचंही कळलं. कल्पनेतलं लुटूपुटीचं भविष्य नजरेच्या पार पल्याड गेलं. कानात गुणगुणणारी आशेची परी अंतर्धान पावली. आठवणींचे डंख तेवढे उरले.

आणि मग एक दिवस अभिजितचं अमेरिकेचं जायचं झालं. पॅरोलवर सोडलेल्या कैद्यासारखं हायसं झालं मेघनाला. चाकोरीत तर राहायचं पण मुक्त... काच नको त्यातला. लग्नानं देऊ केलेली सुरक्षितता हवी; पण त्यासाठी शरीर मनावरचे बोचरे स्पर्श सोसणं नको. नवरा हवा होता... पण तो आशूसारखा. त्यामुळे होणारी फॅंटसीतल्या काल्पनिक नवर्‍याची आणि प्रत्यक्षातल्या अभिजितची रोजची झटापट पाहणं नको. आता काही महिनेतरी फक्त वर्तमानात जगायचं. भविष्याची चिंता करुन वर्तमानाशी फारकत घेणं नको. आणि वर्तमानकाळ विसरण्यासाठी भूतकाळाला बिलगून बसणं नको. नवी उमेदच आली जणू. आणि असं म्हणता म्हणता अभिजित परतायची वेळ येऊन ठेपली सुद्धा? धावत्या ट्रेनमधून टिपलेलं दृश्य डोळ्यांत साठवे-साठवेपर्यंत मागच्यामागे सांडून जातं. अगदी तसंच! मेघनाला काही सुचेचना. आता जुना अध्याय परत नव्याने. धरु म्हटलं, तर धरता येत नाही. सोडू म्हटलं, तर सोडताही येणार नाही. आता गतकाळ काही उरलाच नाही आणि भविष्याचंही ओझं नाही ... पण तरीही वर्तमानात सुटं चालण्याचं सुख नाही ते नाहीच! मिट्ट अंधारात मेघना सुन्न बसून राहिली.

- Ashwini.Gore