गड आला, पण सिंह गेला

"पण स्टेजवर पोटात तलवार खुपसल्यावर रक्त कसं काढायचं महश्या?" हातातली काठी तलवारीसारखी फिरवत एसआर हायस्कूलच्या बोळातून चोरवाटेने गुळवणी बोळाच्या तोंडावर बाहेर पडताना मी महश्याला म्हटलं. अशा अनेक चोरवाटा आम्ही शाळेतून परत येताना हुडकून काढल्या होत्या. एक चोरवाट तर आमच्या वाड्यातल्या मागच्या अंगणातल्या संडासाच्या पाठीमागून निघून अण्णेगिरींच्या वाड्यातून रस्त्यावर बाहेर पडायची. शिवाजीचे सैनिक ह्याच चोरवाटेने हिंडत असणार, अशी माझी आणि महश्याची खात्री होती. पण एकदा भाव्यानं - हा भाव्या एकदम गोरा आणि घार्‍या डोळ्यांचा असल्यानं त्याला सगळे इंग्रज गोरा अधिकारी म्हणत - 'ह्या असल्या बारक्या चोरवाटेवरनं मावळे घोड्यावर बसून जाणं शक्य आहे का?' विचारत आम्हाला चूक ठरवायचा प्रयत्न केला. पण महश्या हुशार असल्यानं त्यानं त्याला लगेच उत्तर दिलं होतं, की बालशिवाजीचे सैनिकपण बालसैनिक होते आणि बालसैनिकांचे घोडे पण बालघोडे होते आणि बालघोड्यावरनं ह्या चोरवाटेने जाता येते.

"पण रक्त काढण्यासाठी पोटात तलवार खुपसल्यावर दुखणार नाही का?" एरंडोली गेटच्या पोलिस चौकीच्या शेजारच्या उघड्या गटारात शू करत महश्यानं विचारलं.

"हं... भाऊंना विचारूया काय करायचं ते. तू ये दुपारी घरी. मग ठरवूया."

***

गॅदरिंग पंधरा जानेवारीला आहे आणि 'ह्यावर्षी चौथीच्या वर्गानं नाटक बसवायचं आहे,' असं आज शाळा सुटता सुटता कुलकर्णीबाईंनी सांगितलं. आता आमच्या वर्गात मीच नेहमी मुलांत पहिला येत असल्यानं, नाटक मीच बसवणार हे नक्की होतं. आणि मुलींना कोळीनृत्य नाहीतर राधा-कृष्ण नृत्य ह्याशिवाय अजून काही येत नसल्यानं, त्या काय नाटक बसवतील असं वाटत नव्हतं. मधल्या सुट्टीत शिवाजी-शिवाजी खेळताना आज गोर्‍या अधिकार्‍याला उगाचच जास्त बडवला नाटकाच्या खुशीत. नाटक शिवाजीचं असणार हे नक्की, पण शाहिस्तेखानाच्या गोष्टीवर करायचं की अफझलखानाच्या की सिंहगडाच्या ते ठरवायचं होतं. शाळेतून घरी परतताना ह्यावरच चर्चा झाली. शेवटी आमच्या वाड्यात दुपारी सगळ्यांनी जमायचं ठरलं. मग परतताना पहिले मोठा पश्या, मग बारका पश्या, मग गोरा अधिकारी, मग महश्या असं सगळ्यांच्या घरांवरून एकेकाला सोडत मी घरी परतलो.

घरी आलो, तर भाऊ कुठेतरी बाहेर गेले होते. आजीनं मला वाढलं आणि ती भजनाला गेली. मी पटापट जेवण संपवलं आणि मग घरचा अभ्यासही संपवला. पुस्तकं-वह्या दप्तरात सारून मी अंगणात आलो, तर पिंट्या लुंगी लावून गाडगिळांच्या मुक्याबरोबर क्रिकेट खेळत होता. पिंट्या दरवर्षी कॉलेजमध्ये नापास होतो असं आजी म्हणते. आम्ही दुपारी क्रिकेट खेळायला लागलो, की हा लुंगी दुमडत 'सहा बॉलवर सहा सिक्स लावतो बघ,' असं म्हणत यायचा, पण एकदासुद्धा त्याला सहा सिक्स मारता आल्या नव्हत्या. उगाचच टिंग्या लावायचा. एकदा तर विटीदांडूत त्याने उडवलेल्या विटीचा मी कॅच घेतला आणि मग माझ्या डावाला तिबल घेऊन, हे टिप्पिरा दिला होता, की सिंगलवर शंभरतीन दांडू बसले होते. तेव्हापासनं माझ्यावर जरा खार खाऊनच होता तो. त्यांच्याबरोबर खेळायला जावं की नाही, असा विचार करत असतानाच भाऊ आले. हातात खाकी रंगाची पिशवी होती म्हणजे बाजारात जाऊन माइनमुळा नाहीतर रताळी असलं काहीतरी सकाळी बाकीची भाजी घेताना बघितलेलं घेऊन आलेले असणार.

"ह्यावेळच्या गॅदरिंगला नाटक करणार आहोत आम्ही."

"अरे वा! कुठलं नाटक?"

"शिवाजीचं! शाहिस्तेखानाचं करूया की सिंहगडाचं?" आमच्या वर्गात अफझलखानाएवढा उंच कुणीच नसल्यानं अफझलखानाचा वाघनख्यांनी कोथळा बाहेर काढलेल्या धड्याचं नाटक बसवता येणार नाही, हे माझ्या मगाशीच लक्षात आलं होतं. आता दुपारी सगळे जमल्यावर त्यांना हे सांगायला पाहिजे.

"जरा पाठीवर उभा राहा पाहू." भाऊ नेहरू शर्ट खुंटीला टांगून वरच्या खोलीत गादीवर आडवेदेखील पडले होते. "भानुंकडे जिरेटोप, पगड्या वगैरे आहेत. त्यांना सांगून ठेवायला पाहिजे तुमच्या नाटकासाठी."

"होय. आणि सुरवार-सदरासुद्धा आणायला पाहिजे नवीन. पण भाऊ, पोटात तलवार खुपसल्यावर स्टेजवर रक्त कसं दाखवायचं हो?" तोपर्यंत भाऊ घोरायला लागले.

दुपारी महश्या, दोन्ही पश्या आणि सुन्या माझ्याकडे आले. वाड्यात सगळे दुपारचे झोपलेले असतात, म्हणून आम्ही तालमीच्या ग्राउंडवर गेलो. काशीकर मंगलच्या मागं सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या मधूनसुद्धा आम्ही चोरवाट शोधून काढली होती. पण ही इमारत आत्ताच बांधायला घेतली असल्यामुळे, शिवाजीचे मावळे ह्या चोरवाटेने कधी गेलेले नसणार असं महश्याचं म्हणणं होतं. तिथनं जाताना माझ्या लक्षात आलं, की जुन्या चोरवाटाही शिवाजीच्या वेळी जे नवीन वाडे बांधले होते, ते बांधतानाच निर्माण झालेल्या असणार. मी त्याला सांगणार, एवढ्यात सुन्या एका वाळूच्या ढिगामागं जाऊन 'हर हर महादेव' करत 'परमवीरचक्र'मधल्यासारखे हातगोळे फेकू लागला. मग आम्ही वाळूत रचलेल्या विटांच्या आडोशाने परमवीरचक्रच खेळलो बराच वेळ. शेवटी तिथल्या वॉचमनने हाकलल्यावर तालमीच्या ग्राउंडवर गेलो.

"शाहिस्तेखानाच्या नाटकात शिवाजी आणि शाहिस्तेखान एव्हडी दोनच पोरं लागतील. जास्तं पोरं लागणारं नाटक करूया."

"पन्हाळ्याहून सुटका केलं तर? त्यात बालशिवाजी, जिजामाता, बाजीप्रभू... आणि मावळे आहेत."

"प्च.. 'गड आला, पण सिंह गेला' करूया. त्यात मग बालशिवाजी, जिजामाता, तानाजी मालुसरे, सूर्याजी, शेलारमामा, सुभेदार उदयभान एव्हडे सगळे आहेत."

"होय होय. 'गड आला, पण सिंग गेला'च करूया."

"तानाजीचं काम मी करणार." सगळ्यांचं मत 'गड आला, पण सिंह गेल्या'वर आल्यावर मी लगेच म्हणालो. "आणि मी शिवाजी होणार" महश्याने पण लगेच सांगितलं. खरंतर आमच्या दोघांचं दुपारी आधीच असं करायचं हे ठरलं होतं गुपचूप.

"तानाजीचं काम मी करणार. मी उंच आहे." मोठा पश्या म्हणाला. "बरोबर आहे. पश्या उंच आहे तुझ्यापेक्षा." त्याच्या मागोमाग लगेच बारका पश्या म्हणाला. त्याला नेहमी मोठ्या पश्याबरोबर राहायची खोड होती.

"उंचीचा आणि तानाजीचा काय संबंध? मी नेहेमी वर्गात पहिला येतो. तानाजी मीच होणार."

"तानाजी काय वर्गात पहिला यायचा काय?" इतका वेळ गप्प बसलेला सुन्या कुठूनतरी विलायती चिंचा पैदा करून येऊन म्हणाला आणि मग शांतपणे चिंचा खात बसला.

"मग उद्या कुलकर्णीबाईच ठरवू देत कोण काय व्हायचं ते."

"त्या तुझंच नाव घेणार. म्हणून तू म्हणतोयस रे. त्यांना ठरवू देत ते. मी आमच्या आईलाच घेऊन येतो उद्या शाळेत. आणि नेहमी तूच गॅदरिंगमध्ये असतोस. दरवर्षी मुकुट घालून आणि पायावर पाय तिरपा घालून नुसता उभा असतोस स्टेजवर कृष्ण होऊन आणि बाजूला गोल करून मुली नाचतात. तानाजी होणार म्हणे हा!"

"होय होय. मीही आईला घेऊन येतो उद्या शाळेत." बारक्या पश्याने लगेच मोठ्या पश्याच्या मागोमाग री ओढली आणि दोघे तरातरा निघून गेले.

"मीही भाऊंना घेऊन येईन उद्या. बघूया बाई काय ठरवतात ते. पण त्या मलाच तानाजी करणार."

"होय, उद्या भाऊंना यायलाच सांग रे. माझं पण शिवाजीचं नक्की करून टाकूया."

***

"आम्ही 'गड आला, पण सिंह गेला' करायचं ठरवलंय." रात्री जेवताना मी भाऊंना म्हणालो.

"वा! तू काय काम करणार आहेस?"

"तानाजीचं."

"छान. मी पगडी आणून ठेवतो भानुंकडून तानाजीची. कधी आहे गॅदरिंग?"

"पंधरा तारखेला."

"ह्म्म.. दहाच दिवस आहेत. नीट तालीम करा."

"अहो तालमीचं गॅदरिंग नाहीये काय. शाळेचं गॅदरिंग आहे. तालमीत काय करणार बोंबलायला."

"आँ... नीट बोल. काय काय शब्द तोंडात बसलेत ह्याच्या." आजीनं बाकी काय ऐकलं नसलं, तरी 'बोंबलायला' तेवढं वेचून मला ओरडली.

"जाऊदेत. भोसडीचे ऐकतात कायतरी इकडं तिकडं." भाऊंनी माझ्यापेक्षा भारी बॉल टाकला म्हटल्यावर आजी त्यांच्यावरच घसरली.

मी भाऊंना उद्या शाळेत बरोबर यायचं सांगायला विसरलोच त्या सगळ्यांत.

***

"बाई, आम्ही 'गड आला, पण सिंह गेला' करायचं ठरवलंय," 'गॅदरिंगला कोण कोण काय करणार हे ठरवलं का' असं विचारल्यावर मी लगेच उभा राहून सांगितलं.

"पण बाई, तानाजीचं काम मी करणार. हा दरवर्षी कृष्ण होतो. आणि मी उंचही आहे," पश्या आईला वगैरे काही घेऊन आला नव्हता.

"बाई शिवाजीचं काम मी करणार," महश्या माझी बाजू घ्यायच्या आधी स्वतःचं पात्र पक्कं करत बसला.

"आणि उदयभानाचं काम कोण करणार?" बाईंनी विचारल्यावर सगळेच गप्प झाले.

मग बाईंनी 'गड आला, पण सिंह गेला'मध्ये कोण कोण पात्रं आहेत, ह्याची यादी केली. आणि कोण कोण काय काम करणार हेपण त्यांनीच ठरवलं. तानाजीचं काम पश्या करणार होता. महश्या शिवाजी. सुन्या सूर्याजी. गोर्‍या अधिकार्‍याला उदयभानाचं काम दिल्यावर गोर्‍या चिडला, पण बाईंनी त्याला हे करायचंच असं सांगितल्यावर त्याला तयार व्हायलाच लागलं. जिजामातेचं काम ढोली अश्विनी करणार होती. मला तानाजीच्या मामाचं, शेलारमामाचं पात्र बाईंनी दिलं. सगळी नावं पक्की झाल्यावर, "ह्या नाटकाचे संवाद लिहिणं आणि दिग्दर्शनाचं काम तू करायचं आहेस," असं बाईंनी म्हटल्यावर माझा राग जरा कमी झाला. आता नाटक लिहायला काय फार अवघड नव्हतं. धडा पाठ केला, की झालं. पण दिग्दर्शन म्हणजे काय, ते मला माहीत नव्हतं. शाळा सुटल्यावर बाईंनी मला थांबायला सांगितलं.

"हे बघ, धड्यात नुसती माहिती आहे. संवाद सगळे नाहीयेत. स्टेजवर सगळ्यांच्या तोंडी संवाद यायला पाहिजेत. आणि दिग्दर्शन म्हणजे कुणी कुठला संवाद कसा म्हणायचा, ड्रेस कुठला घालायचा, स्टेजवर कधी यायचं, कधी बाहेर जायचं, कुठे उभं राहून संवाद म्हणायचे, हे सगळं तू ठरवायचंस. तेव्हा तू उद्या येताना संवाद लिहून आण. आज तुला बाकी घरच्या अभ्यासातून सूट. लगेच उद्यापासून नाटकाची तयारी सुरू करायची आहे."

***

मी घरी येऊन लगेच संवाद लिहायला घेतले. पण म्हणजे काय करायचं, ते माझ्या लक्षात येईना. मग भाऊंनी मला एका वहीत,

'जिजामाता : शिवबा, हा समोर जो गड दिसतो आहे, तो आपला असायला हवा.'

असं लिहून दाखवलं. मग माझ्या लगेच लक्षात आलं. मला इतिहासाच्या पुस्तकातला धडा तसाही पाठच होता. मी फटाफट संवाद लिहिले.

'शेलारमामा, हा गड जिंकायचा आपण. स्वारीची तयारी करा.’

'हा गड जिंकू शकेल, असा कोण मावळा आहे आपल्याकडे?'

'पण महाराज, तानाजीच्या मुलाचे लग्न आहे.’

'मामा, लढाईवर आम्ही खुद्द जाऊ.’

'सूर्याजी, आधी लगीन कोंढाण्याचं!'

'महाराज, आम्ही असताना तुम्ही लढाईवर जाणार, तर आमचा काय उपयोग ?’

'शेलारमामा, घोरपड आणा.'

'पळता काय भ्याडांनो ? परतीचे दोर मी कधीच कापून टाकले आहेत.'

'गड आला, पण सिंह गेला.'

उदयभानाला एकपण संवाद नव्हता. त्याला फक्त शेवटी लढाईच करायची होती. आणि जिजामातांनाही पहिले दोन-तीन संवादच होते.

***

संध्याकाळी महश्या आल्यावर तोसुद्धा म्हणाला, की तसंही त्या जाड्या अश्विनीला फार काय पाठ झालं नसतं. आणि शेवटच्या लढाईसाठी वीसतरी मावळे स्टेजवर आणले पाहिजेत, त्याशिवाय मजा येणार नाही असं माझं आणि महश्याचं मत पडलं. आमच्या वर्गाततर एवढी मुलंच नव्हती. त्यामुळे तिसरीच्या वर्गातल्या छोट्या मुलांना मावळे आणि शत्रूचं सैन्य म्हणून घ्यायचं असं ठरलं. पश्याला तानाजी केल्यामुळे माझा अजून त्याच्यावरचा राग गेलेला नव्हता. त्यामुळे त्याला मी नाटक दाखवायला बोलवलं नव्हतं. रात्री भाऊंनी मला भानुंना चौदा आणि पंधरा तारखेला पगडी भाड्याने पाहिजे म्हणून सांगून आल्याचं सागितलं. पण गॅदरिंग फक्त पंधरा तारखेला होतं, असं म्हटल्यावर, 'रंगीत तालमीला नको का पगडी' असं ते म्हणाले. रंगीत तालीम म्हणजे स्टेज रंगवून तालीम करत असतील, असं मला वाटलं. पण माहीत असल्याचं दाखवून मी त्यांना 'म्हणजे काय' ते विचारलं नाही. त्यांनीच ओळखून मला सांगितलं, की गॅदरिंगच्या आदल्या दिवशी खरेखुरे नाटकाचे कपडे वगैरे घालून, मेकप करून संपूर्ण नाटकाचा एकदा सराव करायचा. त्याला रंगीत तालीम म्हणतात.

***

'म्हणजे सगळ्यांचे ड्रेस, तलवारी वगैरे तोपर्यंत तयार पाहिजेत. आणि संवाददेखील पाठ झालेले असले पाहिजेत.' वाड्यात मी, महश्या, सुन्या, दोन्ही पश्या बसून ठरवत होतो. सकाळी बाईंनी नाटकाचे संवाद बघून त्यात थोडे फेरफार करून पक्का मसुदा तयार केला होता. त्यांनी मग 'सगळ्यांनी मिळून सराव करा,' असं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही दुपारी वाड्यात सरावासाठी जमलो. ढोल्या अश्विनीला एकच संवाद असल्याने तिला बोलावलं नव्हतं. तिला तिच्या वहीतच तिचा संवाद लिहून दिला आणि पाठ करायला सांगितलं. तसंही ती काय सरावासाठी आली नसती. ती नेहमी अभ्यासच करत बसलेली असायची. आणि तिची आईपण एकदम खत्रूड होती. तिचं घर शाळेतून परतायच्या वाटेवर होतं, पण कधी पाणी प्यायला जरी तिच्या घरात गेलो, तरी तोंड वाकडं करायची आणि बाहेरच उभे करवून पाणी बाहेर आणून द्यायची.

***

दुपारी सगळे जमल्यावर प्रत्येकाने खाली सलवार, वरती कमरेच्या खाली लांबवर येणारा कुर्ता, कमरेला शेमला असं घालायचं ठरलं. शिवाजीने जिरेटोप आणायचा होता. तानाजीने इतिहासाच्या पुस्तकात दाखवलेली तशी दोन टोकं असलेली आडवी पगडी घालायची होती. जिजामातांनी नऊवारी साडी नेसून यायचं होतं. बाकी मावळ्यांनी जमलं तर पगड्या मिळवायच्या होत्या. नाहीतर रुमालही चालतील असं ठरलं. उदयभान आणि त्याच्या सैनिकांनी कोळीनृत्यात बांधतात तसा रुमाल बांधायचा, म्हणजे ते वेगळे दिसतील असंही ठरवलं. प्रत्येकाने बसून संपूर्ण नाटक आपापल्या वहीत लिहून घेतलं. 'उद्या रविवारची सुट्टी, तेव्हा सोमवारी सगळ्यांचे संवाद पाठ पाहिजेत,' असं मी सांगितलं. तसंच सलवार-कुर्ते-पगडी वगैरे भाड्याने घेण्यासाठी घरात सांगायचं असंही ठरलं. भाऊंनी माझ्यासाठी आधीच पगडी सांगितली आहे, हे मी मुद्दामच बोललो नाही.

गोर्‍या अधिकार्‍याला उदयभान केल्यामुळे आणि संवाद नसल्याने तो आधी चिडला होता. पण आता त्याला पगडी आणायची नाही म्हटल्यावर तो खूष झाला. एक नंबरचा कंजूस होता तो. त्याला कधीकधी कंजूस अधिकारी पण म्हणायचे. रोज मधल्या सुट्टीत सगळे जण आपापला डबा वाटून खायचे. पण फक्त हा डब्याचे झाकण अर्धवट उघडून एकेक घास करत खायचा. खरंतर दररोज तो फक्त तूप-साखर-पोळीच आणायचा. कुणाची पेन्सिल जर घरी विसरली असेल, तरी स्वतःची पेन्सिल झिजेल म्हणून द्यायचा नाही.

तलवारी आणि ढाली कशा करायच्या हे मात्र सुचत नव्हतं. 'वाडीला सोनेरी वर्ख लावलेल्या तलवारी मिळतात' असं बारका पश्या म्हणाला. पण एक तलवार पाच का दहा रुपयांना होती. सुन्या म्हणाला, की त्याला घरातून एक पैसासुद्धा मिळणार नाही. गोर्‍या अधिकार्‍याने स्वतःच घरी सांगितले नसते. मी सांगितले असते, तर भाऊंनी किंवा आईने मला तलवार आणून दिली असती, पण एकतर भाऊ आधीच पगडी भाड्याने आणणार होते आणि मी तानाजीपण नव्हतो. आणि वर तिसरीतल्या मावळ्यांसाठीही तलवारी आम्हांलाच आणाव्या लागल्या असत्या. कारण त्या लहान मुलांना त्यांच्या घरातल्यांनी काय तलवारी दिल्या नसत्या. शेवटी महश्याला आयडिया सुचली, की नुसत्याच काठ्या आणून त्यांना घोटीव, नाहीतर सोनेरी ताव लावूया. मग त्या शेमल्यात खोचल्या, की खर्‍या तलवारींसारख्या दिसतील.
'म्यान कशाचं करायचं पण?' कारण पश्याला 'आधी लगीन कोंढाण्याचं' म्हणताना म्यानातून तलवार बाहेर काढायची कृती करायची होती. "नुसतीच शेमल्यातनं खेच की तलवार बाहेर. इथं तलवारी होईनात आणि ह्याला म्यान पाहिजे." सुन्या वैतागला. "माझ्याकडे मागच्या नवरात्रातल्या जत्रेत घेतलेलं धनुष्य आहे, सोनेरी रंगाचं. मी ते घेऊन येऊ का?" बारक्याला सगळ्यांनी वेड्यात काढला. ढालींचा विषय मागेच राहिला.

***

सोमवारी आम्ही वर्गातच नाटकाचा पहिला सराव केला. तिसरीच्या मुलांना नाटकाच्या दोनच दिवस आधी सरावासाठी घ्यायचं असं ठरलं, कारण त्यांना फक्त युद्धच करायचं होतं. सर्वांचेच सगळे संवाद बर्‍यापैकी पाठ झाले होते. फक्त सुन्यानं काहीही पाठ केलेलं नव्हतं. त्याला खरंतर घोरपड लावताना एक आणि नंतर तानाजी धारातीर्थी पडल्यावर 'दोर कापून टाकले आहेत', असे दोन-तीनच संवाद होते. पण तेसुद्धा त्यानं नीट म्हटले नाहीत. अजून कुणी कुठे उभं राहून काय म्हणायचं हे ठरत नव्हतं. महश्याला सुरुवातीला तानाजी मालुसरे येऊन मुजरा करून युद्धावर जातो तो, आणि शेवटी 'गड आला, पण सिंह गेला' हा प्रसंग सोडल्यास अजून काही काम नव्हतं. पण मी स्टेजवरनं जाणार नाही असं त्यानं ठणकावून सांगितलं. महश्या माझा खास दोस्त असल्याने मी मग स्टेजच्या एका कोपर्‍यात शिवाजी-जिजाऊंचा महाल केला. त्यामुळे अख्ख्या नाटकात त्याला त्या कोपर्‍यात थांबता आलं असतं. मी आणि महश्या, सिंहासन भाड्यानं मिळतं का, ते विचारायला पहिले भानुंकडे गेलो, तर त्यांनी 'मूर्ख आहात काय' म्हणून हाकलून दिलं. "तुमच्याकडून जिरेटोप भाड्यानं घेत नाही जा," हे मात्र महश्या निघता निघता ओरडलाच.
मग जुळणी कट्ट्यावरच्या इस्त्रीवाल्याकडं गेलो, कारण त्याच्या दुकानात 'जिरेटोप-पगडी-फेटे भाड्याने मिळतील' असं लिहिलेलं होतं. "सिंहासन कशाला पाह्यजे रे, शाळेतल्या खुर्च्या काय टोचतात काय गांडीला?" पिंट्याला उद्योग नसल्यानं तो इथं कट्ट्यावर पडीक असतो, असं नाहीतरी आजी म्हणायचीच. पण इस्रीवाल्याकडचा जिरेटोप मात्र महश्यानं वीस रुपयाला नक्की केला. 'बाबा देतील, आई नाही म्हटली तरी पैसे.' महश्यानं हिशोब केला होता. आता सिंहासन मिळतच नाहीये म्हटल्यावर बाई बसतात तसल्या दोन खुर्च्या, सोनेरी रंगाच्या दोन चादरी घालून, शिवबा आणि जिजामातांसाठी सिंहासन म्हणून ठेवूया असं मी आणि महश्यानं ठरवलं. पण माझ्याकडं आणि त्याच्याकडं दोघांकडेही सोनेरी रंगाची चादर नव्हती. भाऊंना विचारूया असं ठरवून दोघेही घरी परतलो.

***

ते दोन्ही-तिन्ही दिवस शाळेतून येता-जाता तलवारींसाठी योग्य होतील अश्या काठ्या आम्ही गोळा करून वाड्यात आणून ठेवत होतो. पण सगळ्या काठ्या एकसारख्या काय दिसत नव्हत्या. शेवटी शाळेतच एका बाजूला बांबू ठेवलेले होते, त्यातला एक उचलायचा आणि त्याचे तुकडे करून तलवारी करायचं ठरवलं. त्याप्रमाणे शाळा सुटल्यावर एक बांबू, पुढनं मी, मागनं पश्या आणि मध्ये महश्यानं उचलला आणि मागच्या दरवाजानं बाहेर न्यायला लागलो. पण तेवढ्यात कायम एक डोळा लाल असणार्‍या, मुलींच्या मोठ्या शाळेच्या शिपायानं आम्हाला बांबू नेताना बघितलं. त्यामुळे तो तिथेच टाकून पळायला लागलं. रक्त कसं काढायचं हा प्रश्न अजून सुटलेलाच नव्हता. त्यामानानं आज सराव चांगला झाला होता. पण एकाचा संवाद संपला, की दुसर्‍याचा सुरू करायचा हे नीट सगळ्यांना जमत नव्हतं. आजच्या सरावात सुन्यानं संवाद सगळे नीट म्हटले, पण तानाजी धारातीर्थी पडायच्या आतच 'गडाचे दोर मी कधीच कापून टाकले आहेत,' असं म्हणून टाकलं. गुरुवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस राहिले होते. शनिवारी तर गॅदरिंग. दुपारी मी आणि महश्या रक्त कसं काढायचं ह्यावरच मग आयडिया काढत बसलो.

"रंगपंचमीच्या फुग्यांत लाल रंगाचं पाणी भरून पोटाला बांधलं तर?"

"पण मग पोटं फुगलेली नाही का दिसणार?"

"एकाच्या पोटाला एकच बांधायचा रे."

"तिसरीच्या पोरांना नेम धरून बरोबर फुग्यांवर मारता येईल का पण? त्या चिल्यापिल्यांना अक्कल नसते नाहीतरी."

"अरे आपल्या लोकांना कुठे बांधायला लागणार आहेत? आपल्यापैकी फक्त पश्याच धारातीर्थी पडणार ना. बाकी सगळे मरणार, उदयभानचे सैनिक आणि गोरा अधिकारी. त्यांच्या पोटाला बांधूया."

"पण आत्ताच्या आत्ता तसले फुगे कुठे मिळणार?"

"तोरवीच्या दुकानात जाऊन बघूया आहेत का ते. पण एक सांग, एव्हडा लाल रंग कुठनं आणायचा? तेलकट खडू दगडानं भुकटी करून टाकला तर?"

पण तेलकट खडूचा प्रयत्न लगेचच फसला आणि माझा आणि महश्याचा, दोघांकडचाही लाल रंगाचा खडू गायब झाला. तेवढ्यात महश्याच्या डोक्यात कुंकवाचं पाणी करायची आयड्या आली. त्यामुळे आम्ही उत्साहाने बाबूच्या दुकानात फुगे आणायला गेलो, तर रंगपंचमीलाच तसले फुगे मिळतील असं बाबू म्हणाला. पण मग घरातल्या प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरून गाठ मारून महश्याच्या शर्टात आत ठेवून बघितलं, तर सगळं पाणी एका मिनिटात गळून गेलं आणि महश्या सगळा ओला झाला. तेवढ्यात दोन्ही पश्या त्यांच्याकडच्या जमलेल्या काठ्या घेऊन आले. हस्तव्यवसायासाठी लागणारे सोनेरी रंगाचे उरलेले कागद घेऊन सगळे बसलो. मी आतनं एक कोयती आणली. काठ्यांचे नीट एक-दोन तुकडे केले. पण डिंक लावून सोनेरी कागद काठीला नीट चिकटेना. बराच वेळ झाला, तरी काठ्या काय तलवारींसारख्या दिसत नव्हत्या. दोन्ही पश्यातर जामच वैतागले. तेवढ्यात दुपारच्या चहासाठी भाऊ आले. आम्ही काय करतोय हे त्यांनी विचारलं आणि मग हसत बसले. खरंतर ते नेहमी कोर्टातून येऊन चहा घेऊन लगेच ऑफिसला जातात. पण मग त्यांनी कोट काढून ठेवला, बॅग आत ठेवली आणि आतनं खिळ्यांचा डबा आणि हातोडी घेऊन बाहेर येऊन बसले.
भाऊंनी जुईच्या वेलासाठी आणलेल्या बांबूचे फटाफट फूट-दीड फुटाचे तुकडे केले. मग ते मधनं चिरले आणि टोकाच्या राहिलेल्या तुकड्यांचे अजून छोटे छोटे तुकडे केले. मग एक छोटा तुकडा मोठ्या तुकड्याच्या थोडा खालच्या बाजूला लावून ख्रिश्चनांच्या क्रॉससारखा क्रॉस केला आणि खिळा मारून तो पक्का केला. मग बांबूला सोनेरी कागद पटापट लावता आला. बघता बघता आमच्या पंधरा-वीस तलवारी झाल्या. तेवढं बनवून भाऊ ऑफिसला गेले. आता उद्या रंगीत तालमीसाठी ड्रेस तयार करून ठेवा असं सांगून सगळे घरी गेले.

संध्याकाळी उशिरा जेव्हा भाऊ फिरून आले, तेव्हा त्यांच्या हातांत पगडी होती. तिला दोन बाजूंना दोन अणकुचीदार मोठ्ठाली टोकं होती. आणि पूर्ण पगडीभर पाटीवर सरस्वती काढतात, तशी सोनेरी बारीक धाग्यानं जाळी केलेली होती. पगडीचा रंग जरा विटला होता आणि कापड एक-दोन ठिकाणी फाटलं होतं पण स्टेजवर खूप लांबून काय लोकांना एवढं दिसलं नसतं.

"उद्या ना रंगीत तालमीसाठी आणायची होती पगडी?"

"अरे, तो भानु रस्त्यातच भेटला आणि म्हणाला घेऊनच जा. आता बाकी शाळांची पण गॅदरिंग आहेत ना. उगीच कुणाला म्हातार्‍याने चुकून दिली असं व्हायला नको म्हणून लगेच घेऊन आलो."

***

रात्री जेवताना आमच्या रक्त काढण्याच्या आयड्या ऐकून भाऊ म्हणाले, की 'त्यापेक्षा हातात थोडं थोडं कुंकू ठेवा आणि अगदी मरताना उडवायचं थोडं स्टेजवर. म्हणजे होईल लाल-लाल सगळीकडे.'

ही एकदम भारी आयड्या होती. आणि तिसरीतल्या बारक्या पोरांना घरातल्यांनी पण कुंकू नक्की दिलं असतं.

***

रात्री पश्या एकटाच आला. पश्याला घरातल्यांनी पगडी भाड्याने घ्यायला पैसे दिले नव्हते. म्हणजे सूर्याजीकडे पगडी आहे, शेलारमामाकडे पगडी आहे, शिवाजीकडे जिरेटोप आहे पण तानाजीकडेच पगडी नाही. मी, आजी आणि भाऊ जेवायला बसणारच होतो. पश्याचं ऐकून भाऊ उठले आणि मला आणि पश्याला घेऊन भानुंकडे गेले. पण सगळ्याच शाळांत गॅदरिंग सुरू होते, त्यामुळे सगळ्या पगड्या भाड्याने दिलेल्या होत्या. जुळणी कट्ट्याच्या इस्रीवाल्याकडे पण सगळ्या पगड्या संपल्या होत्या. त्याच्याकडे एक फेटा शिल्लक होता. भाऊंनी फेटा भाड्याने घेतला आणि आम्ही घरी परतलो. वरती ठेवलेली पगडी भाऊंनी पश्याला दिली आणि पश्या गेला. मी जाम चिडलो. जेवताना मी काहीच बोललो नाही. गाद्या घातल्या. झोपायला वर गेलो.

नाटक आहे 'गड आला, पण सिंह गेला'. त्यात सिंह आहे तानाजी. तो नीट दिसला, तर बाकी नीट दिसतील. नाहीतर सगळेच बुजगावण्यासारखे दिसतील. तरी मी रागातच झोपलो.

***

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी रंगीत तालीम होती. मी, महश्या, दोन्ही पश्या, सुन्या, गोरा अधिकारी सगळे सलवार-कुर्ता घालून, हातांत तलवारींचे गठ्ठे घेऊन निघालो. महश्याने जिरेटोप घातला होता, मला तालमीतल्या अजयदादाने फेटा घट्ट बांधून दिला होता, सुन्या-पश्याने पगडी. पश्याने माझी पगडी घातल्यामुळे मला अजूनही रागच होता, त्यामुळे मी त्याच्याशी बोललोच नव्हतो. सगळेजण आम्हांला रस्त्यावरनं जाताना वळून वळून पाहत होते. आम्ही मुद्दामूनच एकही चोरवाट न पकडता रस्त्यावरून चाललो होतो. शाळेत स्टेजवर वेगवेगळ्या इयत्तांतल्या मुला-मुलींच्या रंगीत तालमी चालल्या होत्या. तिसरीच्या मुला-मुलींचे कोळीनृत्य झाल्यावर कुलकर्णीबाईंनी आम्हांला हाक मारली. स्टेजवरच्याच दोन खुर्च्या उचलून सिंहासन केले. तिसरीच्या पाच-दहा मुलांना उदयभानचे सैनिक म्हणून तयार केलं. त्यांचे कोळीनृत्याचे रुमाल होतेच डोक्यावर. मी लढाईत असणारच होतो आणि मरणारही नव्हतो. मी युद्ध असं हळूच म्हटलं, की त्यांनी स्टेजच्या मागून 'दुश्मन दुश्मन' असं ओरडत यायचं आणि युद्धाला सुरुवात करायची.

पहिल्यांदा शिवाजीचे मावळे म्हणजे चौथीतलेच दोन-तीनजण आणि तानाजी पडणार होते. पण आमच्या वर्गातलं तानाजी सोडून मरायला कोणीच तयार होईना. मग तिसरीतल्याच दोघांना मरणारे शिवाजीचे सैनिक केलं आणि आमच्यातल्या दोघा-तिघांना तिकडे दिलं. एकदा का तानाजी पडला आणि सूर्याजीनं गर्जना केली, की परत युद्ध सुरू करून तिसरीतल्या उदयभानाच्या सैन्यानं हळूहळू करत एकेकानं पडायचं. शेवटी मी हळूच 'बास' असं म्हटलं, की उदयभानानं मरायचं आणि मग उभ्या असलेल्या त्याच्या सगळ्या सैन्याने मरायचं असं ठरवलं. सगळ्यांना परत एकदा सगळं समजावून सांगितलं. तोपर्यंत ढोली अश्विनी साडी वगैरे नेसून आली. सगळ्यांनी संवाद एकदम नीट म्हटले. फक्त लढाईत जरा सगळ्यांना जोर चढला. पण मी 'युद्ध, थांबा' वगैरे म्हटल्यावर तिसरीतलेही नीट थांबले. एकुणात नाटक मस्तच बसले होते. बाईंनीसुद्धा कौतुक केले. बाईंनी गॅदरिंगचा कार्यक्रमपण सांगितला. आमचे नाटक सर्वांत शेवटी होते.

***

दुसर्‍या दिवशी सकाळी शाळेत अभ्यास काही नव्हताच. बक्षीस समारंभ - ज्यात मला शाळेत दुसरा आल्याबद्दल, खरं तर मुलांच्यात पहिला, पण सगळ्यांत दुसरा, चित्रकलेत तिसरा, वक्तृत्वात पहिला वगैरे बक्षिसे मिळाली. आणि अल्पोपाहारही चांगला होता. घरचा अभ्यास वगैरे नसल्याने आम्ही सगळे दुपारभर विटीदांडू खेळलो. खरंतर क्रिकेटच खेळणार होतो. पण कुलकर्ण्यांच्या म्हातारीने बॉल त्यांच्या घरात गेल्यावर, विळीवर कापून बाहेर फेकला. त्यामुळे क्रिकेट तिथेच संपले. मग दुपार कलता कलता सगळे आपापल्या घरी परतले. आज शाळेत गॅदरिंग बघायला सगळ्यांचे आई-वडीलपण येणार होते.

***

मी एकटाच कपडे, तलवार वगैरे घेऊन आणि कालच बांधून घेतलेला फेटा तसाच उतरवल्याने तो नीट हातांत घेऊन शाळेत गेलो. भाऊंना, 'आई ऑफिसमधून आल्यावर तिच्याबरोबरच या,' असं सांगून आलो. थोड्या वेळाने गॅदरिंग सुरू झालं. मोठ्या मुलींच्या शाळेच्या मधोमध ग्राउंड होतं आणि स्टेज ग्राउंडच्या एका टोकाला होतं. शाळेतली मुलं डाव्या हाताला एकेका वर्गाची एक रांग अशी बसली होती आणि सगळ्यांचे आई-वडील-आजी-आजोबा उजव्या हाताला बाक मांडलेले होते, त्यांवर बसले होते. आमचं नाटक शेवटी असल्यानं आम्ही सगळे प्रेक्षकांमध्येच पण थोडे बाजूला बसलो होतो. म्हणजे अर्धा कार्यक्रम झाला, की आवरा-आवरीला आत जायला सोपं जावं. माझ्या डोक्यात नुसतं नाटकच घुमत होतो. आमचं नाटक बघताना कसे सगळे टाळ्या वाजवतील, खालच्या वर्गांतली पोरं लढाई बघून कशी घाबरून जातील वगैरे चित्रं माझ्या डोळ्यांसमोर नाचत होती.

***

गॅदरिंग अर्धं झाल्यावर आम्ही आत गेलो. स्टेजच्या मागचे दोन वर्ग नटण्या-सजण्यासाठी दिलेले होते. पुढचा कार्यक्रम असलेल्यांची कपडे घालण्याची आणि आधीचा कार्यक्रम झालेल्यांची कपडे काढण्याची हूं झुंबड उडालेली होती. पण आम्ही मोठी मुलं असल्याने बाजूला एका कोपर्‍यात नीट आपापले कपडे काढून सलवारी चढवायला लागलो. खरेतर सगळ्यांचे रात्री झोपायचे पायजमेच होते. त्यांनाच खाली घोट्यांशी सुतळ्या बांधून घट्ट केले. फक्त महश्याने कुठूनतरी खरीखुरी चुण्या पडणारी सलवार मिळवली होती. ढोल्या अश्विनीचे एक गाणे होते, ते तिने जिजामातेच्या वेषातच म्हटले. त्यामुळे तीही तयार होती. आम्ही कपडे बदलल्यावर आईने सगळ्यांना लाली लावून पावडर लावली. मग एका काळ्या रंगाच्या तेलकट खडूसारख्या खडूने सगळ्यांना मिश्या काढल्या. पश्याच्या म्हणजे तानाजीच्या मिश्या जास्तच मोठ्या आणि आकडेबाज होत्या. पण पश्या काळा असल्याने त्या नीट दिसत नव्हत्या. उलट गोर्‍या अधिकार्‍याच्या मिश्याच झोकदार दिसत होत्या. महश्याला त्याच काळ्या खडूने दाढी काढली. त्याचा कुर्तादेखील रंगीबेरंगी होता. बाकी सगळ्यांचे पांढरेच होते. त्यामुळे जिरेटोप चढवल्यावर तो खरंच शिवबासारखा दिसू लागला.

खुर्च्यांवर सिंहासन करायला टाकण्यासाठी चादरी आणायचे दोघेपण विसरलो होतो, त्यामुळे आता नुसत्याच खुर्च्या ठेवायला लागणार होत्या. तू नीट कामं करत नाहीस, म्हणून मी महश्यावर चिडलो. पण तेव्हडंच. खरंतर आम्ही दोघं कधी भांडायचो नाही. पण आज झालं. तेव्हड्यात तिसरीची मुलं कोळीनृत्य करून आली. त्यांना डोक्याचे रुमाल न काढता लगेच स्टेजच्या मागे उभे केले आणि हातांत एकेक तलवार दिली.

***

तोपर्यंत आमच्या नाटकाची वेळ झाली आणि सुन्याला 'शू'ला लागली. तो स्टेजच्या इथेच जरा झाडाच्या मागच्या बाजूला गेला. पण त्याच्या पायजम्याची नाडीच सुटेना लवकर. कसाबसा आटपून तो जेमतेम वेळेत आला. इकडे स्टेजवर खुर्च्या मांडून शिवबा आणि जिजामाता बसले होते. मला संवाद नीट ऐकूच येत नव्हते. सारखं समोर बसलेली मुलं-मुली-पालक हेच दिसत होते. पाय थरथरत होते. पण तेव्हड्यात महश्यानं मला हळूच तलवारीनं मागं ढोसलं आणि मला संवाद म्हणायचं लक्षात आलं. त्यानं तलवारीनं मला ढोसल्याचं पुढच्या काही लोकांच्या लक्षात आल्याने ते हसलेपण.

'तो आपल्या मुलाच्या लग्नाला गेला आहे महाराज.'

'शेलारमामा, मग लढाईवर आम्ही स्वत: जाऊ. लढाईची तयारी करा’.

'पण महाराज, तुम्ही असताना आम्ही लढाईवर जाणार, तर तुमचा काय उपयोग?’

खालून मला प्रेक्षक जोरजोरात हसल्याचा आवाज आला, पण का हसत आहेत तेच कळेना.

'मी तानाजीला लगेच बोलावून घेतो.' माझं वाक्य पुरे होता-होताच पश्या 'आधी लगीन कोंढाण्याचं' म्हणत स्टेजवर आला. मात्र गर्जना करताना कमरेला शेमल्यात अडकवलेली तलवार जोरात ओढल्यानं, तलवारीचा सोनेरी कागद तर फाटलाच, पण बांबूची कुसं अडकल्यानं त्याचा कमरेला गुंडाळलेला शेमलाही फाटला.

gad aala pan.jpg
तानाजी घोरपड वगैरे लावून चढल्याचं बाईंनी मागून अंधारात निवेदन करूनच लोकांना सांगितलं, कारण घोरपड स्टेजवर आणून त्यानं चढणं वगैरे शक्यच नव्हतं. पण परत दिवे आल्यावर मी हळूच 'युद्ध' म्हणून ओरडलो. ते ऐकताच स्टेजच्या मागचे आमच्या वर्गातले मावळे आणि तिसरीची शत्रुसैन्यातली मुले जोरजोरात ओरडत स्टेजवर आली व जोरदार युद्धाला सुरुवात झाली. एव्हड्या स्टेजवर सगळ्या लोकांसमोर आल्याने बरेचसे बावरले व तलवारी जास्तच जोरात हलवू लागले. बारक्या पश्याच्या मनगटावर दुसर्‍याच्या तलवारीचा फटका बसल्यानं तो 'च्यायला' म्हणून शेवटपर्यंत ऐकू जाईल एव्हड्या जोरात ओरडला. खालनं हसण्याचे आवाज यायला लागले. पण आता युद्ध सगळ्यांच्याच अंगांत भिनलं होतं. कोणीच मरायला तयार होईना. मी 'तानाजी पड, तानाजी पड' असं म्हटलं, तरी पश्या आणि गोरा अधिकारी बांबूवर बांबू हापटून युद्ध बंदच करेनात. शेवटी मीच पश्याच्या शेजारी जाऊन 'पश्या मर आता' असं ओरडल्यावर पश्या पडला. पश्या पडल्यावर गोरा अधिकारी 'हुर्रे हुई' करून जोरात ओरडला. तिसरीतल्या काही मावळ्यांना तानाजी पडला, की मरायचं म्हणून सांगितलं होतं. लढाईच्या गोंधळात कोणी पडायचं आणि कोणी जिवंत राहायचं हे लक्षात न राहिल्यानं, एक-दोघं जण मेल्यावर, मग उभे असलेले सगळेच मेले. त्यामुळे स्टेजवर एका कोपर्‍यात शिवबा आणि जिजाऊ आणि मध्ये शेलारमामा, उदयभान आणि सूर्याजी एव्हडेच जिवंत उरलो. मी सुन्याला हळूच 'सुन्या गर्जना' म्हणून सांगितलं.

सुन्यानं आजूबाजूला बघितलं, पण त्यानं संवाद म्हटल्यावर लढायलाच कोण शिल्लक राहिलं नव्हतं. त्या सगळ्या गोंधळानं तो हडबडला आणि जोरात 'पळता काय भ्याडांनो'च्या ऐवजी 'पळता काय भाड्यांनो' म्हणून ओरडला. तो 'भाड्या' म्हणताच लढाई बघताना हसून हसून थकलेल्या खालच्या प्रेक्षकांनी पुन्हा हसायला सुरुवात केली.

आता कुणीतरी लढलं पाहिजेच म्हणून महश्या सिंहासनावरून उठून, त्याच्या खुर्चीच्या आसपास, स्टेजवर जरा मागच्या बाजूला मेलेल्या सैनिकांना 'ए उठा, उठा, युद्ध करा' म्हणून उठवायला गेला. पण त्यानं उठा उठा म्हणताच तानाजी सोडून स्टेजवर मेलेल्या सगळ्या मावळ्यांनी आणि शत्रुसैन्याने खाडदिशी उठून पुन्हा लढाईला सुरुवात केली. आता खालचे हसण्याचे आवाज पार वरपर्यंत येत होते.

परत लढायला मिळाल्यानं सगळ्यांना चांगलाच त्वेष आला. बारक्या पश्यानं परत कुणाच्यातरी तलवारीचा मार खाल्ला. तिसरीतलं एक पोरगं 'कुसळ घुसलं हातात' असं ओरडत स्टेजच्या मागे गेलं. आता 'मरा मरा' असं ओरडत मी हळूच खिशातनं कु़ंकवाची पुडी काढून ती उधळली, तर 'तुझ्यामायला नाकात कुक्कु गेलं की' म्हणत सुन्या अजूनच जोरात ओरडला. मी 'मरा मरा' असे ओरडूनसुद्धा कुणी युद्ध करायचे थांबेचनात. फाट् फाट् असे सटासट बांबूंवर बांबू हापटल्याचे आवाज येत होते. त्यात माझा फेटा, जवळपास सगळ्यांचे रुमाल आणि सुन्याची पगडी तलवारी लागून उडून पडली होती. शेवटी मी 'आता बास' असं ओरडत आणि एकेकाला खाली दाबत, पाडत युद्ध संपवले. आणि हाश्श हुश्श करत महश्याला जाऊन, गड जिंकल्याची पण तानाजी धारातीर्थी पडल्याची बातमी सांगितली. खाली बसलेली सगळी पोरं-पोरी आणि पालक हसणं थांबवतच नव्हते. 'अरेरे, गड आला, पण सिंह गेला' हा संवाद महश्यानं म्हणेपर्यंत बाईंनी स्टेजवरचे दिवे मालवून अंधार केला होता.

***

सोमवारी, 'तू कुंकू उधळलंस अन् डाग पाडलेस म्हणून आईने मला हाणलं' म्हणून सुन्या मला सांगत आला. तिसरीतली आणि आमच्या वर्गातली मावळे-सैनिक झालेली पोरं भरपूर लढायला मिळालं म्हणून खूष होती. दिवसभर बारका-मोठा पश्या, मी, महश्या, सुन्या असे सगळेजण पेन्सिलीला धारदार टोक करून हातात घुसलेली कुसळं काढत होतो.

- tanyabedekar

रेखाटन - Palli