महाराष्ट्राची वृक्षसंपदा

वृक्षदेवता म्हणून ज्यांना महाराष्ट्रीय लोकांनी पिढ्यान् पिढ्या आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले - त्यांची ही ओळख.

सह्याद्रीतला समृद्ध निसर्ग हे महाराष्ट्राचं सर्वांत मोठं वैभव. 'अंजन-कांचन-करवंदीच्या, फुलांच्याही देशा' असं त्याचं यथार्थ वर्णन केलं गेलं आहे. इथल्या गडकोट-किल्ल्यांना, कोरीव लेण्यांना आणि बांधीव दुर्गांना वेढून राहिलेली घनदाट वृक्षराजी नितांत रमणीय आणि अभ्यसनीय आहे. कृष्णा-गोदा-भीमेच्या सकस खोर्‍यांनी या वृक्षराजीचं मायेने पालन पोषण केलं, रांगड्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर लुसलुशीत गवताची, चिमुकल्या रानफुलांची पखरण केली आणि महाराष्ट्राच्या रांगड्या राकट सौंदर्याला एकाच वेळी कणखर आणि नाजूक अशी परिमाणं बहाल केली.
सह्याद्रीत भटकंतीला बाहेर पडलेला आपल्यातला प्रत्येक निसर्गप्रेमी कधी कारवी, ऑर्किड्स, कधी रानसुरणाच्या पानांचे डोलारे, नाहीतर भिववून टाकणारे सापकांदे, पलाश, काटेसावरीची मनमोहक रंगसंगती, मोहाची, कदंबाची बहार, नारळ, फणस आणि आम्रवृक्षांची दाटी, पिंपळ, वडाची सावली , भीमाशंकर-लोणावळा, चिपळूणच्या अंधारात दीप्तिमान होणार्‍या वनस्पती, रायरेश्वर, रायगडाच्या माथ्यावरची सोनकी, कासच्या पठारावरचा लक्षफुलांचा उधळलेला खजिना, कोकणपट्ट्यातल्या प्राचीन देवराया, महाबळेश्वरातली घनदाट भव्य झाडी आणि त्यावरची शुभ्र अथवा रंगीत अळंबी, नाजूक नखरेल नेच्यांचे तुरे या वैविध्यपूर्ण हिरव्या वैभवाने कायमच भारावून गेलेला आहे.
निसर्गातील जीवन समृद्ध करणार्‍या घटकांना मान देणे ही आपली परंपरा. भारतीय संस्कृतीने वृक्षांना देव मानले आणि या संस्कृतीची परंपरा दैनंदिन जीवनातही खोलवर रुजली गेली. तुळस, वड, आम्रवृक्षाला धार्मिक सणविधींमध्ये मान मिळाला. मधुमालती, माका, बेल, दूर्वा, बोर, धोत्रा, शमी, आघाडा, कण्हेर, रुई, अर्जुन, विष्णुक्रांत, डाळिंब, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, हादगा या तर खास महाराष्ट्रात उगवणार्‍या वनस्पती आणि साहजिकच त्यांनी अष्टविनायकांच्या पूजापत्रींत स्थान मिळवले. यातील बहुतेक सर्वच वनस्पतींना औषधी महत्त्व आहे. निसर्गात फुलणार्‍या वृक्षजातींची संख्या हजारांत आहे. पण त्यातल्या मोजक्याच वृक्षजातींना आपल्या संस्कृतीत देवतेचे स्थान मिळाले. त्याच्यापाठीमागे निश्चित असा अभ्यास आहे. तुळस, कडुनिंब, औदुंबर, पळस, वड, पिंपळ, माड, केळी, आपटा असे अनेक वृक्ष महाराष्ट्रात धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व लाभलेले. त्यांच्या प्रत्येक फांदीवर इथल्या सण-उत्सव-समारंभाचे आणि एकूणच आठवणींचे पक्षी विसावलेले आहेत. महाराष्ट्राची लोकगीतं, काव्य, लोककला, भाषा समृद्ध करण्यात या प्रत्येक वृक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्रातल्या या काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची शास्त्रीय आणि त्याबरोबरच धार्मिक-सांस्कृतिक महत्त्व विशद करण्याचा हा प्रयत्न. पसरटपणाचा धोका बाळगूनही या लेखात लोककथांचाही समावेश काही ठिकाणी मुद्दाम केला आहे. अनादिकालापासून मानवाने वृक्षांबद्दल प्रेम बाळगले. वृक्ष मानवाचा मित्र आहे. दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे. लोककथांमधून वृक्ष आणि मानवाचे हे मैत्र फार लोभसपणे व्यक्त होते. 'एथनो-बॉटनी' हा वनस्पतीशास्त्रातला एक महत्त्वाचा विभाग. वृक्ष आणि मानवाचे साहचर्य या अशाच लोककथांमधून उलगडत जाते. संस्कृतीमध्ये जेव्हा एखादा वृक्ष स्थान मिळवतो, तेव्हा केवळ त्याची उपयुक्तता हा एकमेव घटक त्यामागे नसतो. त्या झाडाचं देखणेपण, त्याच्यातल्या काही थक्क करून टाकणार्‍या गोष्टी या सगळ्याच प्राचीन कालापासून मानवाला मोहात पाडत आलेल्या असतात. महाराष्ट्रातील आदिवासी समाजांमध्येही अशा अनेक चमत्कारिक लोककथा ऐकायला मिळतात. या लोककथांत काही वेळा एखादी व्यक्ती वृक्षाच्या रुपाने जिवंत राहून अमर होते, तर कधी एखादा वृक्ष माणसाचे रूप धारण करून माणसाला भेटायला येतो. या लोककथा अद्भुत आणि रोमांचकारक तर असतातच, पण त्यात वास्तवाचेही भान असते.

तुळस
शास्त्रीय नाव - Oscimum sanctum (ऑसिमम सँक्टम) (होली बेसिल)
काही भारतीय नावे - वृंदा (बंगाली), मंजिरी (संस्कृत), बिंदा, गग्गेरू( तेलुगू), भूतघ्नी, बहुमंजरी, अजेतराक्षसी, गौरी, अमृता, श्रेष्ठतमा.

tulas-better-snap.jpgकुळकथा - ऑसिमम या संज्ञेचे मूळ ग्रीक शब्दात आहे. त्याचा अर्थ मधुर वनस्पती. सँक्टम म्हणजे पवित्र. तुलसी म्हणजे एकमेव, अद्वितीय. वृंदा म्हणजे फुलांचा घोस.
प्राचीन काळी मंदिरे ही पांथस्थांची आश्रयस्थाने होती. मंदिरांच्या प्रांगणांत तुळशी लावलेल्या असत. तृषा शमवण्याचा उत्तम गुणधर्म तुलसीपत्रात आहे. चार पाने जिभेखाली ठेवली, तर थकल्या-भागल्या, तहानलेल्या पांथस्थाची तहान कमी होते. काळाच्या ओघात तुळशीचा हा गुणधर्म स्मृतीआड झाला आणि मंदिरांच्या प्रांगणांत तुळशीला धार्मिक वनस्पती म्हणून महत्त्व आले.
तुळस ही एक लहानशी, उभी वाढणारी शाखायुक्त वनस्पती असून तिच्या सर्वांगावर लव असते. पानांच्या कडा दंतुर असून त्यावरील तैलग्रंथी ठिपक्यांसारख्या असतात आणि पाने चुरल्यावर त्यांना उग्र वास येतो. फांद्यांच्या टोकांशी पुष्पमंजिर्‍या येतात. फुले आकाराने लहान, फिकट गुलाबी जांभळ्या रंगाची असतात. फळे अतिशय लहान आकारमानाची असून बिया तांबूस तपकिरी असतात.
तुळस औषधी आहे. तिची पाने सर्दी, पडसे, खोकल्यावर गुणकारी असतात. बिया पचनसंस्थेच्या विकारांवर उपयोगी आहेत. पानांपासून निघणारे तेल जंतुघ्न असून त्वचारोगांत वापरतात. कीटकनिवारक, विशेषतः मलेरियाच्या डासांचा प्रतिकार करण्याकरता संपूर्ण वनस्पतीच सज्ज असते. ओझोनकर्ता, प्रदूषणहर्ता अशी तुळस आजूबाजूची हवा शुद्ध करते.
पर्यावरणीय आणि वैद्यकीयदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशा तुळशीला पूर्वजांनी मानाचं स्थान दिलं. फूल, फळ, छाया याबाबतीत दुय्यम असणारी तुळस सामान्यजनांकडून दुर्लक्षिली जाऊ नये म्हणून तिला धार्मिक अवगुंठन घालून त्यांनी नित्यपूजनीय ठरवलं. एक हजार एकशे आठ तुळशी वाहिल्याशिवाय श्रीकृष्णजन्माचा सोहळा पूर्ण होत नाही. नैवेद्य दाखवताना वरण-भाताच्या मुदीवर तुळशीचे पान ठेवले जाते, ते तिचा वातावरण शुद्ध राखण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन. या नाजूक रोपाला रोज पाणी मिळेल, त्याचे वृंदावनांत संगोपन होईल अशी व्यवस्था केली. कुठच्याही आडवेळी खुडण्यास मनाई केली.
हिंदुधर्मात श्रीविष्णूची पूजा करताना तुळस अत्यावश्यक मानली गेली आहे. पद्मपुराणात सांगितले आहे, की तुळशीच्या रोपाभोवतालची मातीसुद्धा पवित्र असते. जर एखाद्या प्रेताचे दहन करताना चितेवर तुळशीच्या काड्या घातल्या तर त्या माणसाचा आत्मा कायम विष्णुलोकात राहतो, त्याचा पुनर्जन्म होत नाही, अशी हिंदुधर्मात समजूत आहे. पूजेसाठी दिवा लावताना त्यात तुळशीची काडी घातली, तर लाखो दिवे लावल्याचे श्रेय लाभते.
तुळस म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मीचा अवतार. कृष्णाची राधा म्हणजे तुळसच. बालपणी कृष्ण मथुरेजवळच्या ज्या उपवनात राधेबरोबर क्रीडा करत असे, त्या उपवनाला वृंदावन असे म्हणतात. वृंदा म्हणजे राधा, म्हणून तुळशीला वृंदा असेही नाव आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल द्वादशीला तुळशीचे लग्न समारंभपूर्वक बाळकृष्णाशी लावण्यात येते.

कदंब
लॅटिन नाव - Anthocephalus cadamba (अ‍ॅंथोसिफॅलस कदंब)
इंग्रजी नाव - कदंब
काही भारतीय नावे - कदंब, कदम, अट्टुटेक, नीपा, मंजा.

कुळकथा - अ‍ॅंथॉस या संज्ञेचा अर्थ फुले. सिफॅलास म्हणजे शिर किंवा डोके. फुलांच्या चेंडूसारख्या गुच्छामुळे हे नाव या वृक्षाला पडले. कदंब एक भव्य वृक्ष असून तो पानगळी जातीचा आहे. याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात.
kadamb.jpgपानांची फांदीवरील रचना जोडीजोडीची असते. ती आकारमानाने मोठी, अंडाकृती व तळाशी हृदयाकार असतात. पाने तुकतुकीत असून त्यांवर थोडी लव असते. कोवळ्या पानांना तांबूस झाक असते. पानांवरील उपशिरा ठळक आणि समांतर असतात.
फुले आकाराने अतिशय बारीक आणि पिवळट सोनेरी असतात. त्यांची मांडणी चेंडूच्या आकारासारखी असते. फुलांतून बाहेर पडणार्‍या कुक्षीवृंतांची प्रभा फुलांच्या गुच्छाभोवती फाकते आणि एक वलय निर्माण होते. म्हणूनच 'सोनेरी किरणांची प्रभा म्हणजे एक अद्भुत खजिना' असे त्याचे वर्णन केले आहे.
फळे अतिशय बारीक असतात. फुलांप्रमाणेच त्यांचा घोस तयार होतो. मात्र हा गेंद काळ्या रंगाचा असतो.
प्लायवुड आणि आगकाड्या तयार करण्यासाठी कदंबाचे लाकूड वापरतात. त्याची साल जंतुघ्न म्हणून उपयुक्त आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र, विशेषतः कोकण विभागात तसेच मुंबईतही अनेक ठिकाणी कदंबाचे हे केशरी गोल दिवे लगडल्यासारखे दिसणारे देखणे झाड पाहायला मिळते. या झाडाचा डेरा फार सुंदर छत्रासारखा पसरलेला असतो. दुर्गाबाई भागवतांनी तर केवळ या फुलावर एक खूप सुंदर, लालित्यपूर्ण भाषेतलं, अभ्यासू पुस्तक लिहिले आहे.
संस्कृत वाङ्मयात कदंबाचे साहचर्य मोसमी पावसाळ्याच्या ऋतूशी जोडलेले आढळते. ढगांचा गडगडाट कानी आला, म्हणजेच कदंब फुलू लागतो. पावसाच्या संगतीने येणारा वारा कदंबाच्या फुलांचा सुवास घेऊनच वाहतो. म्हणून त्या वार्‍याला कदंबनील म्हणतात. पूर्ण बहरलेल्या कदंबवृक्षाच्या ठायीठायी जमून राहिलेले पावसाचे पाणी मधाने भरलेल्या पाण्यासारखे गोड लागते, म्हणून त्याला कदंबरी म्हणतात.
स्कंदपुराणामध्ये कृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत या कदंबांच्या चेंडूंशी खेळत असल्याचे मनोहारी उल्लेखही मिळतात. श्रीकृष्ण आपली बासरी वाजवत कदंबाखालीच उभा राहतो. अतिविषारी कालिया नाग कालिया दाह डोहात राहू लागला. त्याच्या फुत्कारांमुळे त्याच्यापासून काही मैलांच्या अंतरावर असलेले प्राणी, वृक्ष-वनस्पती जळून गेले. फक्त त्या डोहाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या भूप्रदेशावर एक कदंबवृक्ष मात्र जिवंत राहू शकला. त्याचे कारण स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि त्याने आपली चोच फांदीला घासली. तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले आणि त्याला अमरत्व प्राप्त झाले.
देवांनी अमरत्व दिलेल्या कदंबावर माणसांच्या राज्यात मात्र समूळ नष्ट होण्याची वेळ आली. महाराष्ट्रात गेली काही वर्षे विकासाच्या नावाखाली जी अनिर्बंध वृक्षतोड चालू आहे, त्यात कदंबाच्या वृक्षांवरही घाला आला आहे. काही वर्षांनी या सुंदर झाडांचे उल्लेख "कदंबतरूला बांधुनी दोले, उंच खालती झोले, परस्परांनी दिले घेतले गेले ते दिन गेले." अशा काव्यपंक्तींमध्येच करावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बेल
लॅटिन नाव - Aegle marmelos (ईगल मार्मेलॉस)
इंग्रजी नाव - वुड अ‍ॅपल, बेंगाल क्विन्स, गोल्डन अ‍ॅपल
भारतीय नावे - बिल्व, श्रीफल (संस्कृत/हिंदी), बिली (गुजराथी), विल्वम (तमीळ), मुरेडू (तेलुगू)
कुल - लिंबूकुळ

bel-Aegle.jpgकुळकथा - ग्रीक कथांत हेस्पेरिडेस नावाच्या तीन भगिनी वर्णिलेल्या आहेत. ग्रीक देवता हेरा हिचा झ्यूस या देवाशी विवाह झाल्यावर तिला सुवर्ण सफरचंदाची भेट मिळाली. एका ड्रॅगनच्या मदतीने हेस्पेरिडेस भगिनींपैकी ईगल नावाची एक अप्सरा या सुवर्ण सफरचंदाचे रक्षण करते. त्या अप्सरेच्या नावावरुन ईगल हे नाव लॅटिन भाषेत बिल्ववृक्षाला मिळाले. पोर्तुगीज भाषेत संगमरवरी म्हणजे मार्मेलोस्ड. त्यावरुन मार्मेलॉस ही संज्ञा आली. श्रीफल या संस्कृत नावाचा अर्थ लक्ष्मीचे फळ, पवित्र फळ.
बेल हा एक मध्यम उंचीचा पानगळी वृक्ष आहे. याची साल खडबडीत, राखाडी रंगाची असते. तपकिरी रंगाच्या फांद्यांवर जवळजवळ एक इंच लांबीचे काटे असतात. पाने एकांतरित आणि त्रिदली असतात. लंबगोलाकार आणि टोकदार पर्णिकांवर पारदर्शक तैलग्रंथींचे ठिपके असतात. फुले हिरवट पांढरी आणि सुवासिक असतात. फळे आकाराने मोठाली, गोल असतात. बाह्य कवच लाकडासारखे टणक, पांढुरके हिरवट असते. आतला गर केशरी भगवा असून त्यात धाग्यांत गुरफटलेल्या अनेक बिया असतात.
बेलफळाच्या गरापासून सरबत बनवतात. अतिसारावरचा तो एक खात्रीशीर उपाय. बेलतेलाचा वापर लाकडाला झिलई देण्यासाठी करतात. कीडरोधक म्हणूनही हे तेल उपयोगी असते. लाकूड घरबांधणीसाठी आणि हत्यारे बनवण्यासाठी वापरतात. कच्च्या फळांच्या कवचापासून पिवळा रंग निघतो तो कापडावरील छपाईसाठी वापरतात. पाने डोळ्यांवर पोटीस म्हणून बांधतात. वातविकारावरील दशमुळांपैकी बेलमूळ एक महत्त्वाचा घटक आहे.
बेलाच्या पानांत पार्‍याचा अंश असतो असे म्हणतात आणि या पार्‍यामुळे बिल्वपत्र ज्यात असते ते पाणी कधी खराब होत नाही. म्हणूनच कदाचित अभिषेकाच्या तीर्थात बिल्वदलं घातली जातात.
लोककथा - महादेवाच्या पूजेअर्चेत बेल वाहणे हा विधी अत्यंत आवश्यक मानला गेला आहे, त्यामुळेच शंकराच्या देवळाजवळ एकतरी बेलाचे झाड असतेच. बेलाच्या लाकडाचा दंड महादेवाने हातात धरलेला असतो, त्यामुळे महादेवाला 'बिल्वदंडिन्' असेही एक नाव आहे.
belphaL.jpgबेपर्वा माणसांबद्दल बोलताना-" बेल पकल कौआ के बोप ला का" (बेलाची फळे पिकली तरी कावळ्याला त्याचे काय?) सगळ्या पिकल्या फळांवर कावळा चोच मारतो, परंतु बेलाचे फळ इतके टणक असते, की कावळ्याची चोच त्यात घुसूच शकत नाही. त्यामुळे बेलफळ पिकले तरी कावळ्याला त्याचे सोयरसुतक काही नाही.
बेलाचे झाड आणि बोरीचे झाड जर एखाद्या जागेवर शेजारीशेजारी वाढली असतील, तर त्या जमिनीखाली झरा असणार असे समजतात.
एका तांत्रिक लोककथेमधे अशी गोष्ट सांगितली जाते, की लक्ष्मी एकदा गायीचे रूप घेऊन पृथ्वीवर आली. पवित्र गायीच्या शेणातून एक बेलाचे झाड उगवले. माणसाच्या कृत्याचे फळ लक्ष्मी त्याला देते, याचे प्रतीक म्हणून डाव्या हाताच्या तळव्यात बेलफळ घेतलेल्या लक्ष्मीचे दर्शन भुवनेश्वरीच्या तंत्रामध्ये दाखवले आहे.
नवीन कार्याच्या शुभारंभी लोक बेलास प्रदक्षिणा घालतात, कारण बेल नवे कार्य यशस्वी करून देतो असे म्हणतात.

केळी

लॅटिन नाव - Musa paradisiaca / Musa sapientum (मुसा पॅराडिसियाका/मुसा सॅपिएंटम)
इंग्रजी नाव - बनाना, प्लँटेन, अ‍ॅपल ऑफ पॅराडाईझ
भारतीय नावे - बाळे (कानडी), कदली, केला(हिंदी), वझह (मल्याळी), मोच, रंभा (संस्कृत), आरती (तेलुगू),
कुल - केळी कुल

kel-1.jpgकुळकथा - ऑक्टेव्हियस ऑगस्टस सीझर याचा जो वैद्य होता, त्याचे नाव होते अँटोनियो मुसा. त्याचेच नाव केळीला दिले गेले. 'पॅराडिसियाका'चा अर्थ स्वर्गीय. केळी स्वर्गातून इथे आल्या असे मानले जाते. ईडनच्या उद्यानात केळी फोफावल्या होत्या. अ‍ॅडम आणि ईव्ह यांनी केळीची पाने वस्त्रे म्हणून परिधान केली होती. मोच या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो रसाळ, दुसरा अर्थ विरागी. ज्याने इहलोकाच्या आशाआकांक्षांवर पाणी सोडले आहे असा. आश्चर्याची बाब म्हणजे सॅपिएन्टमचा अर्थसुद्धा शहाणा किंवा साधू असाच आहे. कदली म्हणजे ध्वज किंवा पताका. केला या हिंदी शब्दाचा अर्थ हलणारे किंवा थरथरणारे.
kel-2.jpgदारात केळीचा खांब रोवलेला दिसला. की शुभकार्याची आपसूक वार्ता मिळते. केळफुलाच्या किरमिजी पाकळ्यांच्या पदराआडून डोकावणार्‍या केळीच्या फण्या म्हणजे सुबत्तेचं, भरभराटीचं, वंशवाढीचं प्रतीक.
केळीचं झाडं दिसतंही किती शुभलक्षणी. पानं हिरवीगार, लुसलुशीत, सदा टवटवीत. ही एक बहुवर्षायू औषधी वनस्पतीच आहे. ती अतिशय जोमाने वाढते आणि एका वर्षात फळे देते. केळीचे खोड म्हणजे खरे खोड नव्हेच, खरे खोड एका कंदाच्या स्वरूपात असते. वरचे खोड म्हणजे पर्णतळाच्या एकात एक अशा बंदिस्त रचनेतून निर्माण होणारा खोडासारखा भास.
केळी, म्हणजे या वनस्पतींची फळे म्हणजे जणू लांबलचक, लवलवती, रसरशीत बोटेच. त्यांच्या साधारणतः १०-१२ फळांच्या फण्या असतात. प्रत्येक झाडाला अशी अनेक फळे येतात. फळाची साल अपरिपक्व अवस्थेत हिरवी जाडसर असते. पिकल्या फळाची साल मात्र पिवळी, कधी गुलाबीही असते. गर मधुर, बिनबियांचा असतो.
फळात अनेक खजिने असतात. लोह, कॅल्शियम, पोटॅशियम. त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. बालकाचा पहिला घन आहार म्हणून केळे देण्याची प्रथा आहे. कारण ते पचायला सोपे असते. कच्च्या केळ्यांची भजी, भाजी करतात. पाने जेवणासाठी वापरतात. रानकेळीची लागवड शेतीच्या बांधावर केली, की वाळवीचा उपद्रव कमी होतो.
लोककथा - केळी हा पार्वतीचा अवतार आहे, कारण केळीची पुनरुत्पत्ती स्त्रीबीज व पुंबीज यांच्या मीलनाशिवायच होते. गडचिरोलीतील आदिवासी लोकांमध्ये एक लोककथा आहे यासंदर्भात. पाच बहिणी होत्या. आंबा, चिंच, केळी, अंजीर आणि जांभूळ. इस्पुर देव त्यांचा पिता. तो काळजीत पडून त्यांच्यासाठी वर शोधत होता. इतर बहिणींना पती आणि खूप मुले हवी होती. पण केळीला आपल्या सौंदर्याचा नकोइतका अभिमान होता. ती म्हणाली मला पती नकोच आहे, मुलं पण थोडीच हवीत. मला लवकर म्हातारं आणि बोजड दिसायचं नाही. तसंच झालं. बहिणींना इतकी मुलं झाली, की मोजदादसुद्धा करता येईना. त्यांचं करता करता त्या मरून गेल्या आणि त्यांची झाडं झाली. त्यांचे केस त्यांच्या फांद्या झाल्या आणि मुलांचं रूपांतर फळांत होत राहिलं. केळीला नवरा नकोच होता आणि मुलं अगदी कमी. ती तजेलदार, सदा टवटवीत राहिली. वर्षातून एकदाच तिला फळे येत राहिली.

पळस उर्फ वनज्योत

लॅटिन नाव - Butea frondosa / Butea monosperma (बुटिया फ्राँडोसा, बुटिया मोनोस्पर्मा)
इंग्रजी नाव - फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, पॅरट ट्री
भारतीय नावे - पलाश, ढाक, किंशुक (संस्कृत), परासु (तमीळ), मोडुगा (तेलुगू)
कुल - पतंगरूप कुल, शिंबी कुल

कुळकथा - पळसाचे बुटिया हे नाव जॉन स्टुअर्ट दि अर्ल ऑफ बुट या नावावरुन दिले गेले. सद्गृहस्थ, इंग्लंडचे पंतप्रधान, वनस्पतीप्रेमी होते. मोनोस्पर्मा म्हणजे एकबीजधारी आणि फ्राँडोसा म्हणजे पर्णयुक्त. किंशुक या संस्कृत नावात 'अरे, हा पोपट की काय?' असा आश्चर्योद्गार आहे. 'अहाहा! काय तजेलदार?' असाही एक अर्थ होतो. पलाश म्हणजे पाने आणि देखणेपणा, सौंदर्य.
palas.jpgपळस हा एक मध्यम आकाराचा पानगळी वृक्ष आहे. याचे खोड आणि फांद्या वेड्यावाकड्या असतात. साल खडबडीत, राखाडी रंगाची असते. मात्र कोवळ्या फांद्या गडद हिरव्या रंगाच्या, मऊ मखमली असतात.
पाने त्रिदली, आकाराने मोठी, काहीशी कडक असतात. कोवळी पाने तांबूस हिरवी असतात व त्यांवर मखमली लव असते. सर्व पाने गळून गेल्यावर पळसाला फुलांचे धुमारे फुटतात. आणि फुले फुलल्यावर संपूर्ण रूपच पालटून जाते. ग्रीष्माच्या सुरुवातीला महाराष्ट्राचा काळा, रांगडा कातळ या लालजर्द पलाशांनी रंगून गेल्यावर इतका कमालीचा देखणा दिसतो! फुले साधारण तीन तीन गुच्छांमध्ये येतात. त्यांचा रंग ज्वालेसारखा लालसर केशरी भगवा असतो. गुच्छ काहीसे ताठ, पाकळ्या मऊ मुलायम, चंदेरी लव असल्याने सूर्यप्रकाशात चमकणार्‍या असतात. पाकळ्या मागेच वळलेल्या असतात. त्यापैकी दोघींची बाकदार चोच बनते, म्हणून तर हा पॅरट ट्री.
फळ लांबट शेंगेच्या आकाराचे. परिपक्व फळ शुष्क तपकिरी आणि फळाच्या टोकाला एकच बी असते.
पळसाच्या लाल, खोडापासून स्त्रवणार्‍या डिंकाचा उपयोग कातडे कमावण्यासाठी करतात. लाखेचे किडे पळसाच्या कोवळ्या फांद्यांवर पोसतात. ही लाख रंगांत, सीलिंग वॅक्स म्हणून वापरतात. पानांच्या पत्रावळी बनवतात आणि क्वचित इरली बनवायलाही त्यांचा वापर होतो. मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांचे दोर होतात. लाकूड पाण्यातही टिकून राहते, म्हणून होड्या बनवण्यासाठी वापरतात.
हा वृक्ष जेव्हा ऐन बहरात असतो, तेव्हा क्षितिजावर लखलखीत चमकणार्‍या ज्वालेसारखा दिसू लागतो. कवी कालिदासाने 'ऋतुसंहार' या आपल्या काव्यात पळसाचे वर्णन फार सुरेख केले आहे. तो म्हणतो, 'त्या वृक्षाची अरण्ये म्हणजे देदिप्यमान अग्नीच होत! या अरण्यामुळे सृष्टी म्हणजे लाल वस्त्रे परिधान केलेल्या वधूसारखी दिसत आहे.' कवी अमीर खुश्रूने पळसफुलांची तुलना सिंहाच्या रक्तरंजित पंजाशी केली आहे.
लोककथा - देवांची मदिरा म्हणजे सोमरस. त्याची उत्पत्ती चंद्रापासून होते. एकदा बहिरी ससाण्याने आपली पिसे सोमरसात बुडवली, त्यावेळी त्यातले एक पीस पृथ्वीवर पडले. त्या पिसापासून पळस निर्माण झाला, जो चंद्राला अतिशय प्रिय आहे.
आदिवासी लोकांमध्ये एक अंधश्रद्धा आहे, की अश्विनी नक्षत्राच्या काळामधे (सप्टें-ऑक्टो.च्या सुमारास) पळसाच्या मुळाचा एक भाग तोडून एखाद्या माणसाच्या हाताला बांधून ठेवल्यास, तो माणूस ज्या स्त्रीला स्पर्श करील, ती स्त्री त्याच्या प्रेमात पडते.
लोककथा - कारापुत आदिवासी लोकांच्या पेंगू, भग, मुरिया अशा तीन टोळ्या होत्या. चैतू भगताच्या मुलीचे लग्न त्याने आपल्या टोळीतल्या एकाबरोबर लावून दिले, ज्याच्यावर तिचे प्रेम नव्हते. मुरिया टोळीतल्या एका काळ्या सरदारावर तिचे मन जडले. टोळीतल्या लोकांना हे समजल्यावर त्यांनी तिच्या नवर्‍याला सावध केले आणि एक दिवस शिकारीला गेलो असे खोटे सांगून त्याने चैतू भगताच्या मुलीला त्या सरदाराबरोबर बोलत असताना पकडले. तो भयकंर संतापला आणि त्याने दोघांना ठार मारून त्यांची प्रेते जंगलात फेकून दिली. त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्त एकमेकांत मिसळून एक झरा तयार झाला आणि त्यातून हा वृक्ष जन्माला आला. तरुणीचे लाल आणि तिच्या प्रियकराचे काळे रक्त. म्हणून पळसाची फुले काळपट लाल रंगाची झाली.

पिंपळ
लॅटिन नाव - Ficus religiosa (फायकस रिलिजिओसा)
इंग्रजी नाव - बो ट्री, पीपल ट्री
भारतीय नावे - जारी (गुजराथी), अश्वत्थ, बोधद्रुम (संस्कृत), अवसाई/आरासू (मल्याळी)
कुल - वट कुल

कुळकथा - फायकस म्हणजे अंजीरवर्गीय, रिलिजिओसा म्हणजे पूजनीय. 'अश्वत्थ' या संस्कृत शब्दाचा अर्थ घोड्यासारखा उभा राहणारा. बोधद्रुम म्हणजे ज्या ठिकाणी माणसाला शाश्वत सत्य उमगते, ती जागा. पिपळ नावाचा उगम वेगळाच आहे. पॉप्लरवृक्षांच्या पानांचीही सळसळ होते. आर्य भारतात आले तेव्हा पिंपळाला पाहून त्यांना उत्तरेच्या प्रदेशाची आठवण झाली. पॉप्लरासारखा म्हणून त्याचे नाव पॅप्पल्-पिंपळ झाले. इटलीमध्ये आजही लागवड केलेल्या पिंपळाला भारतीय पॉप्लर किंवा पॉप्युलो डेले इंडी म्हणतात. भारतीय वनश्री ग्रंथात अगदी प्रारंभीच्या वर्गात पिंपळाचे वर्णन पॉप्लरासारखी पाने असलेल्या अंजीरवृक्षासारखा वृक्ष म्हणतात.
ficus-pimpaL.jpgपिंपळ, वड, उंबर हा भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या वृक्षांचा संच. पिंपळाच्या तर नावातच धर्म. पिंपळ वृक्षात तारुण्य आणि प्रौढत्व यांचे एक अजब मिश्रण आढळते. हा एक विशालकाय वृक्ष. त्याची साल फिकट राखाडी आणि गुळगुळीत असते, तशीच खवल्या-खवल्यांचीही असते.
कोवळ्या फांद्या मृदू, चकचकीत असतात. पाने तर पिंपळाचे वैभव. ह्रदयाकृती निमुळत्या, लांबलचक पानांचा देठही लांबसडक असतो. कोवळी पाने लालचुटूक, गुळगुळीत आणि चिवट असतात. वार्‍याच्या लहानशा झुळकीनेही ती 'बोलू' लागतात. पिंपळपानांची सळसळ हा निसर्गसंगीतातला एक मनोहारी राग. पिंपळपानाची थोरवी महान. श्रीकृष्णाला जोजवणारं हे पान. प्रतिभावंत ज्ञानेश्वरांसाठी हा पिंपळ सोन्याचा होऊन सळसळतो.
फांदी आणि पान यांच्या बेचक्यात फुलांचे पेले येतात. हे पेले जोडीने येतात. या पेल्यांत येणारी फुले अगदीच बारीक, बिनरंगी असतात. कच्चे फळ हिरवे, तर पिकलेले फळ जांभुळके असते. पक्षी, वाघुळे या फळांसाठी पिंपळावर वस्ती करून राहतात. पिंपळाचा पाला उंट आणि हत्तींचे आवडते खाद्य आहे. सालींत टॅनिन असते आणि काही वेळा कातडे रंगवायला ते वापरतात. त्यापासून तांबडा रंगही बनवतात.
पिंपळाची साल, पाने, फळे प्रत्येकाचं आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी महत्त्व आहे. वात, रक्तविकार, गर्भस्थापनेसाठी या फळांचं चूर्ण देतात. जेथे बीज पडेल, तेथे वृक्ष उत्पन्न करणारा हा पिंपळ म्हणून हे महत्त्व असावे. भिंतीच्या फटींतून उगवलेली पिंपळाची रोपटी याचे पुरावे आहेत. धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे पिंपळ कधीच तोडला जात नाही. त्यामुळे आपोआप त्याचे संवर्धन आणि संरक्षण होत असते.
वैदिक काळामध्ये चकमकीचा वापर करून विस्तव तयार करण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरत असत. या काळात चित्राद्वारा ग्रथित केलेले पहिले झाड पिंपळ हेच आहे. हिंदू धर्मातील त्रिमूर्तींशी पिंपळाचा संबंध आहे. पिंपळाची मुळे म्हणजे ब्रह्मदेव, त्याचे खोड म्हणजे विष्णू आणि त्याचे प्रत्येक पान म्हणजे एकेका दैवताची वास्तव्याची जागा आहे, असे अश्वत्थस्तोत्रामध्ये म्हटले आहे. एका दंतकथेत असे वर्णिले आहे, की विष्णूचा जन्म पिंपळाच्या वृक्षाखाली झाला. दुसर्‍या एका दंतकथेत म्हटले आहे, की एकदा शंकर-पार्वती खेळ खेळत असताना इतर देव तिथे आले. पार्वतीला राग आला. तिने त्यांना शाप दिला, की ते सर्व पृथ्वीवर झाडांचा जन्म घेतील. ब्रह्मदेव पळस वृक्ष झाला, रुद्र अंजीरसदृश झाड झाला आणि विष्णू पिंपळ झाला.
पिंपळ हे झाड 'ब्राह्मण' वृक्ष समजले जाते आणि ब्राह्मण त्याच्याखाली बसून प्रार्थना करतात. त्याला ते जानवेही घालतात. पिंपळ तोडला, तर ब्राह्मणकुटुंबाचा वध केला असे मानले जाते आणि तसे करणाराही लवकरच मरण पावतो असे समजतात. पिंपळाचा विवाह पुष्कळदा केळी किंवा लिंबू या झाडांशी भारतातल्या अनेक जमातींमध्ये लावण्यात येतो. अशी दोन झाडे एकत्र वाढत असली, तर त्यांना पती-पत्नी समजून एकांत दिला जातो. बोधगया येथील एका पिंपळाखालीच राजपुत्र सिद्धार्थाला साक्षात्कार झाला आणि तो 'बुद्ध' झाला असे म्हणतात. चिनी प्रवासी ह्युएनसंग याने त्यावेळी या वृक्षाबद्दल माहिती लिहून ठेवली आहे. गौतम बुद्ध हयात असताना हा वृक्ष शेकडो फूट उंच होता, असे तो म्हणतो. या वृक्षाची पाने सबंध वर्षभर तजेलदार हिरवी असतात, पण बुद्धनिर्वाणाच्या दिवशी मात्र ती सुकलेली व निर्जीव दिसल्याचे वर्णन असंख्य प्रवाशांनी लिहून ठेवले आहे.

शाल्मली
लॅटिन नाव - Bombax malabaricum (बाँबॅक्स मलबारिकम)
इंग्रजी नाव - रेड सिल्क कॉटन ट्री
भारतीय नवे - रक्तशिमुल (गुजराथी), सेमुल (हिंदी), यमद्रुम, शाल्मली (संस्कृत), इलावम, पुलाई( तमीळ).
कुल - शाल्मली

bombax-savri.jpgकुळकथा - बाँबॅक्स या नावाचे मूळ ग्रीक आहे. त्याचा अर्थ रेशमाचा किडा, मलबारिकम नावामुळे मलबार हे या वृक्षाचे मूळ स्थान असल्याचे सूचित होते. महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर जंगलांत, तसेच नागरी भागांत हा वृक्ष आढळतो. शाल्मलीचा वृक्ष महाकाय, पानगळीच्या जातीचा असून त्याची वाढ जोमाने होते आणि तो अनेक वर्षे जगतो. त्याच्या शाखा नियमित मंडले तयार करतात. त्या विस्ताराने पसरतात. एखाद्याने बाहू पसरावेत, तसा त्याचा आकार दिसतो. खरं म्हणजे संपूर्ण झाडाचा पसारा म्हणजे उपडे ठेवलेले शमादानच वाटते. कोवळ्या झाडाची साल हिरवी असते. तिच्यावर असंख्य टोकदार काटे असतात. झाड जुने झाले, की ती फिकट राखाडी होते. पाने हाताच्या पंजासारखी, संयुक्त प्रकाराची असतात. प्रत्येक पर्णिका भालाकृती आहे. फुले येण्यापूर्वीच सर्व पाने गळून पडतात.
बहुदा फुलांचा रंग लालभडक असतो. पण ती काळपट लाल, भगवी पिवळी किंवा फिकट जांभळीही असू शकतात. फुले फांद्यांना चिकटून वाढतात. ती अतिशय मोठाली, काहीशी मांसल, आणि सर्वांगावर मऊ लव ल्यालेली असतात.
फळ लांबट असते. काळपट तपकिरी बिया कापसासारख्या मऊ धाग्यांच्या वेष्टनांत असतात. फळ तडकले, की बिया रानोमाळ पसरतात.
या वृक्षाचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. लाकडापासून आगकाड्या आणि पेट्या बनवल्या जातात. लाकूड अतिशय हलके असल्याने पाण्यावर तरंगते, म्हणून त्याचे ओंडके मासेमारीच्या जाळ्याला बांधतात. बियांपासून कापूस मिळतो. या झाडाच्या डिंकाला मोचरस म्हणतात आणि तो जखमा भरून येण्यासाठी आदिवासी लोक नेहमी वापरतात. कोवळी फुले उकडून खाल्ली जातात.
असे म्हणतात, की प्रजापती ब्रह्मदेव चराचर सृष्टी निर्माण केल्यावर दमून याच शाल्मलीवृक्षाखाली विसावा घेण्यासाठी पडून राहिला. महादेवाला या वृक्षाची फुले फार आवडतात. ही फुले कपाच्या आकाराची असतात. यांना जेव्हा बहर येतो, तेव्हा धनाची देवता असलेल्या लक्ष्मीशी त्यांची तुलना करतात. श्रीलक्ष्मी देवी दोन्ही हात लांब करून आणि तळहातांवर प्रज्वलित दीप धारण करून उभी असावी, असे या वृक्षाचे स्वरूप दिसते.
संस्कृत भाषेत या वृक्षाला यमद्रुम म्हणजे पाताळातला वृक्ष म्हणतात. कारण हा जरी फुलांमुळे सुशोभित दिसत असला, तरी त्याची फळे खाण्यास योग्य नसतात. सात नरकांपैकी एका नरकामध्ये पापी माणसाला टोचून त्याला छळण्यासाठी या वृक्षाचे काटे वापरतात असे महाभारतात म्हटले आहे.

केवडा

लॅटिन नाव - Pandenus tectorius (पॅंडेनस टेक्टोरिअस, पॅंडेनस ओडोराटिसिमस)
इंग्रजी नाव - स्क्रू पाईन
भारतीय नावे - केया(बंगाली), केतकी (संस्कृत), तालेमारा ( कानडी), थाझाई (तमीळ), मुगली ( तेलुगू)
कुल - केतकी कुल

kevada-pandanus-adoratissimus.jpgकुळकथा - पांदन म्हणजे काठीवाला असा मूळ मल्याळी शब्द आहे. त्याच्या लॅटिनीकरणातून पॅंडेनस हे वानसशास्त्रीय प्रजातीवाचक नाम तयार झाले. केतकी कुलातील सर्वच सदस्यांना हे मल्याळी नाव आहे. टेक्टोरिअस या जातीविशेषणाचा अर्थ आच्छादन असा आहे. ओडिराटिसिमस याचा अर्थ सुगंधी असा होतो.
संस्कृत प्राचीन वाङ्मयात केवड्याचा उल्लेख वारंवार येतो. समुद्रकिनार्‍यावरच्या मासळीच्या वासाला उतारा म्हणून केवड्याची बने फ़ुलतात, असा त्यात संकेत आहे. फुलांचा आकार काहीसा हंसासारखा असतो. आणि ती केसांत माळतात. किनार्‍यावरच्या खेड्यांतून केवड्याचे कुंपण घालतात.
केवड्याची बेटे असतात. ही एक मध्यम उंचीची वनस्पती आहे. खोडाला फांद्या फुटतात आणि आधारासाठी मजबूत हवाई मुळे येतात. पाने तलवारीच्या पात्यांसारखी असतात. पाने जवळजवळ एक मीटरभर लांब असतात. आणि त्यांची खोडावरची रचना सर्पिल असते.
फुले दोन प्रकारांतील असतात : नर आणि स्त्रीपुष्पे. नरपुष्पांच्या कणसांना पिवळट सोनेरी छद असतो आणि ते सुगंधी असतात. स्त्रीपुष्पांना वास नसतो.
फळ काहीसे अननसासारखे, भरभक्कम बाठयुक्त, गोलाकार आणि वस्तुत: अनेक फळांचे बनलेले संयुक्त फळ असते. ते प्रथम पिवळे आणि पिकल्यावर रक्तवर्णी होते.
केवड्याच्या पानांच्या चटया विणतात. तसेच त्यापासून कागद तयार करता येतो. पानांपासून निघणार्‍या धाग्यांची मासेमारीसाठी जाळी विणतात. ब्रशचे झुबके करतात आणि हवाई मुळांपासून मिळणार्‍या धाग्यांपासून टोपल्या, टोप्या अणि ब्रश करतात. नरपुष्पांच्या छदापासून अत्तर काढतात. मिठाईतही तो वापरतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी कालव्यांच्या कडेने केवड्यांची लागवड करतात.
जहांगीर बादशहाने 'तुझुक-ई-जहांगिरी' या पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यामध्ये भारतातील प्रमुख फुलांविषयी लिहिताना केवड्याबद्दल त्याने म्हटले आहे, "या फुलाचा सुगंध अत्यंत उग्र, दूरवर दरवळणारा असतो. इतका, की कस्तुरीचा वासही त्याच्यापुढे फिका पडतो."
कोकणच्या किनारपट्ट्यांवरील मुसलमान कोळ्यांच्या वस्त्यांत एक अत्यंत सुंदर लोकगीत म्हटले जाते. त्याचा अर्थ असा ,"केवड्याच्या झाडांमागून सूर्य उगवत आहे, चंद्र डोळ्यांत सुरमा लावतो आहे, सौम्य चंद्रप्रकाशाने रात्र न्हाऊन निघाली आहे."

लोककथा - विष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद जुंपला. शंकर म्हणाले, "या वादाचा निकाल मी एक सोपी परीक्षा घेऊन लावतो. माझे पाय किंवा माझे डोके तुम्हां दोघांपैकी जो आधी शोधून काढेल, तो श्रेष्ठ." इतकं बोलून शंकर गुप्त झाले.
त्यानंतर शंकरांनी एवढे विशाल रूप धारण केले, की त्यांचे पाय किंवा डोक्याचा थांगच लागेना. विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही खूप गोंधळून गेले.
मग त्यांनी वेगवेगळ्या दिशांना जाऊन शोध घ्यायचे ठरवले. डुकराचे रूप धारण करून विष्णू पाताळातील सर्वांत खालच्या भागात गेले. त्यांनी रागारागात जमीन खणली, तरी त्याला शंकरांचे पाय काही सापडेनात.
इकडे ब्रह्मदेव हंसपक्ष्यावर बसून उंच उंच उडून आले, पण त्यांनाही शंकरांचे डोके काही सापडले नाही.
निराश होऊन दोघे अरण्याकडे परतत असताना एक केवड्याचे पान आभाळातून खाली पडताना ब्रह्मदेवांना दिसले. शंकर नेहमी कपाळावर केवडा धारण करतात, हे ब्रह्मदेवांना ठाऊक होते. त्यांनी ते पान पकडले आणि विष्णूकडे जाऊन ते म्हणाले, "मला शंकरांचे डोके सापडले आहे. पुरावा म्हणून मी त्यांच्या कपाळावरील हे पान उचलून आणले आहे." विष्णूचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसेना. ते केवड्याला म्हणाले, "हे खरे आहे काय?"
केवड्याने ब्रह्मदेवांची बाजू घ्यायला बढाई मारत सांगितले, "हो खरे आहे. मीच शंकरांच्या कपाळावरील केवड्याचे पान." शंकरांनी ते ऐकले आणि संतापून त्यांनी या खोटेपणाबद्दल केवड्याला शाप दिला आणि त्यांच्या देवळाच्या आसपासही केवड्याला प्रवेश करायला बंदी घातली. तेव्हापासून केवड्याला इतका अलौकिक सुवास येत असूनही त्याचे पान शंकराला कधीही वाहत नाहीत.

डाळिंब

लॅटिन नाव - Punica granatum (प्युनिका ग्रानाटम)
इंग्रजी नाव - पोमग्रेनेट
भारतीय नावे - दाडम (गुजराथी), अनार (हिन्दी), डालिम (बंगाली), मदलई(तमीळ), डारिम्मा(तेलुगू),
कुल - दाडिम कुल

कुळकथा - प्लिनी याने 'प्युनिका ग्रानाटम' असे डाळिंबाचे नामाभिधान केले. कार्थेज येथील सफरचंद उर्फ शास्त्रीय नाव 'मॅलम प्युनिकम' याचा अर्थ दाणेदार ऍपल. आतील दाणेदार बियांचा संकेत या नावात आहे. पोम हा शब्द मूळचा फ्रेंच. त्याचा अर्थ सफरचंद. गार्नेट म्हणजे मौल्यवान खडे.
संस्कृतात असा वाक्प्रचार आहे, 'दाडिम मणि दंश' डाळिंब सोलणे हे एक अनाहूतपणे चालून आलेले कठीण कर्म आहे.
डाळिंब म्हणजे सर्जनाचे प्रतीक, भरभराटीचा, वैभवाचा संकेत. अनेक मंदिरांतून डाळिंबाचे शिल्पांकन केलेले आहे. ईश्वराचा प्रेषित महंमद याने आपल्या अनुयायांना डाळिंब भक्षण करण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यामुळे सैतान लांब राहतो.
पारशी समाजात डाळिंबांच्या फांद्यांपासून पवित्र झाडू करतात. त्यांच्या व्रतबंध समारंभांत डाळिंबाच्या दाण्यांच्या अक्षता उधळतात. त्यामुळे दुष्ट शक्ती दूर होतात, असे मिथक आहे. अंतिम घटका मोजणार्‍याच्या मुखात डाळिंबाचा रस घालतात.
डाळिंबाचे झाड हे एक छोटेखानी गोलाकार झुडूप असते. त्याच्या निमुळत्या कडक फांद्या अणकुचीदार असतात. बुंधा किंवा खोड उभे, तांबूस, तपकिरी असते. नंतर ते राखाडी होते. डाळिंबाची काही झाडे सदाहरित, तर काही पानगळी प्रकाराची आहेत.
पाने काहीशी झुबक्यांनी येतात. ती आकारमानाने लहान, काहीशी भाल्यासारखी अरुंद, चकचकीत आणि चिवट असतात. कोवळी पालवी तांबूस हिरवी असते. पण पाने जून होताना हा रंग गडद होत जातो.
लालसर छटा असलेली भगवी, शेंदरी फुले चांगली मोठी असतात. पाकळ्या सुरकुतलेल्या, चुणीदार असतात. तांबूस रंगाचे मांसल निदल फळावरही शिल्लक असतात. फुले फांद्यांच्या टोकाला येतात.
फळे गडद लाल रंगाची असतात. साल कठीण आणि जाड असते. फळात अनेक बिया असतात. प्रत्येक बीभोवती तांबूस, तजेलदार, मांसल आवरण असते. फळ परिपक्व झाले म्हणजे ते उकलते.
डाळिंबाची पाने गणेशाच्या पूजेत पत्री म्हणून वाहतात. आयुर्वेदात डाळिंबाची साल अत्यंत उपकारक मानली गेली आहे. खरंतर झाडाचा प्रत्येक भागच औषधी आहे. लाकडाचा उपयोग शेतीच्या अवजारांसाठी करतात.

शमी

लॅटिन नाव - Prosopis spicigera (प्रोसोपिस स्पिसिजेरा)
भारतीय नावे - जम्बी(कानडी), खेजडी, जंड(हिन्दी), शमी(सम्स्कृत), पेरुम्बे(तमीळ), जम्मि(तेलुगू)
कुल - शिंबी/शिरिष कुल
कुलकथा -प्रोसेपिस या ग्रीक नावाचा अर्थ संदिग्ध, अस्पष्ट. स्पिसिजेरा हे नाव मात्र १६व्या शतकातील एक विख्यात चिकित्सक अँड्रियन फॉन डर श्पीगेल याच्या नावावरुन पडले. शमी या संस्कृत नावाचा अर्थ शेंगाधारी.
वेदांनी शमीला अग्नीची अधिष्ठात्री वृक्षदेवता मानली आहे. वैदिक कथा असे सांगते, की पुरुरव्याने शमीची आणि पिंपळाची फांदी एकमेकांवर घासून पहिला अग्नी निर्माण केला. पुरुरवा हा सोमवंशी राजा होता, म्हणजे कौरव-पांडवांच्या वंशातील.
शमीची आराधना करून प्रभू रामचंद्राने सीतामुक्तीसाठी आपल्या सैन्यासह प्रयाण केले, म्हणून शमीचा मान फार मोठा आहे. राजपुतांचा नायक अथवा राजा नवरात्र संपल्यावर दसर्‍याच्या दिवशी मिरवणुकीने जाऊन शमीपूजन करतो आणि रामाचा पवित्र पक्षी जय याला मुक्त करतो.
शमीचा वृक्ष मध्यम आकारमानाचा असतो. या सदाहरित वृक्षाचा संभार विरळ असतो. खोड फारच क्वचित सरळ रेषेत वाढते. फांद्यांच्या सर्वांगावर अणकुचीदार काटे असतात.
पान पिच्छाकृती असते. पर्णिका गडद हिरव्या असतात. पाच पाकळ्यांची पाने अतिशय लहान आणि पिवळट रंगाची असतात. शेंगा लांबट निमुळत्या असून त्या मण्यांच्या माळेसारख्या दिसतात. आतला गर कोरडा असला, तरी गोड असतो. त्यात बिया असतात. दुष्काळी प्रदेशांत गुरांना चारा म्हणून हा वृक्ष मोलाची कामगिरी करतो.

लोककथा - महादेवाचे वसतीस्थान शमीवर असते, म्हणून त्याचे एक नाव 'शमीरोह' (शमीवर चढणारा) असे आहे.
दसर्‍याच्या दिवशी शमीपानांची पूजा करतात. तसेच या पानांना गणेशाच्या पत्रींत महत्त्वाचे स्थान आहे. या झाडावर पवित्र 'जय' पक्षी अडकून पडला आहे, असा अनेक आदिवासी जमातींचा समज असतो. महाराष्ट्रात काही जमाती शमीची खाली पडलेली पाने डोक्यावर खोचतात.
पांडवांनी अज्ञातवासात असताना शमीवृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्रे लपवून ठेवली होती, असा समज आहे.

--------------------------------------------------------------

महाराष्ट्रातल्या संतांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले आणि जनांनी त्यांचे अनुकरण केले, ही गोष्ट झाली काही शतकांपूर्वीची. महाराष्ट्रातली वृक्षसंपदा तेव्हा ऐन बहरात असणार. मग कधीतरी लाकूडफाटा अन् कोळशाच्या लोभानं, मिळणार्‍या पैशांच्या मोहाने अवघे डोंगरमाथे उजाड होत गेले. महाराष्ट्राचं वैभव समजले जाणारे गर्द रानातले असंख्य पक्षी, प्राणी बेघर होऊन गेले. कितीतरी वनस्पती आणि वन्यजीवांच्या जाती आज महाराष्ट्रातून अस्तंगत झाल्या आहेत. सह्याद्रीमध्ये नियमित भटकंती करणार्‍यांनी तर फार मागे नाही, फक्त गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्येही सह्याद्रीच्या अंगखांद्यांवर एकेकाळी सुरक्षित असणारी वृक्षराजी आता कशी सिमेंटच्या थडग्यांमधे चिणून जात चालली आहे, हे रोज उघड्या डोळ्यांनी पाहिले. महाराष्ट्राचे पूर्वीचे वनवैभव पुन्हा प्राप्त करायचे, तर त्यासाठी पुन्हा आपल्या सांस्कृतिक जीवनाची नाळ या वनसृष्टीसोबत जोडून घ्यावी लागेल. जंगले, झाडे ही फक्त मानवाच्या फायद्यासाठी, उपयोगासाठी नाहीत, त्यांना त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि जगण्याचा मानवाइतकाच, नव्हे त्यांच्यापेक्षा जास्त हक्क आहे, आपल्या पुराणांमध्ये देवांनी तो त्यांना दिलेला होता, आपणही द्यायला हवा हे मान्य केले पाहिजे. खूप कठीण काम आहे हे. पण केल्यावाचून आता इलाजही राहिलेला नाही.

द. भा. धामणस्करांनी एक अतिशय सुंदर 'सावलीचा निरोप घेताना..' नावाची कविता लिहीली आहे. या लेखाचा समारोप त्यानेच करूया :

झाडाच्या सावलीचा निरोप घेताना, प्रथम
आदिपुरुषाकडे डोळे भरुन पाहावे;
त्याच्या पानापानांचे कृतज्ञ अवघ्राण करावे;
दणकट निबर खोडासही एका
कोवळीकेने स्पर्शावे, जसे
स्पर्शतो आपण एखादे फूल.
शेवटचे पाऊल उचलताना
हरेक फांदीशी
आपल्या हातांची अदलाबदल करावी, जशी
निरोप घेताना आपण
अनेकदा केलेली असते.
हे सगळे पवित्र मंत्रविधीसारखे घडले की
आपले दुबळे शरीरही खोडासारखे
प्रचंड मजबूत होते,
उन्हे अचानक सौम्य, आणि
अमृतचे झरे कुठून कुठून
आपल्या आतून
वाहू लागतात...

- sharmilaphadke

[लेखातील काही संदर्भांसाठी आभार- महाराष्ट्र दर्शन, अवर ट्रीज (यास्मिन सिंह)]
छायाचित्रे - dineshvs यांच्या मायबोलीवरील संग्रहातून साभार.