देवी

वार्‍याच्या झोतानं दार किंचितसं करकरत उघडलं, तसा भोवतालच्या शांततेवर एक चिरत जाणारा ओरखडा उमटला. कोपर्‍यातल्या जुनाट घड्याळानं हात लांबवून चाराच्या पुढे टेकवला, तशी स्वयंपाकघरात झोपलेली जनूची म्हातारी आई जागी झाली. राम-राम पुटपुटत तिनं आपली थकलेली कुडी आवरून घेतली अन् पोचे आलेल्या, काळ्याकुट्ट तपेलीमधे चहाचं आधण ठेवलं.
"जनू, ए जनू, उठतोस ना रे बाबा...चहा घेऊन जा तुझ्या भावासाठी......"
एरवी दुपारच्या झोपेत व्यत्यय आला, की आईवर करवादणारा जनू एका हाकेतच विजेचा झटका बसल्यासारखा पूर्ण जागा झाला. त्याच्या त्या दचकून उठण्यानं त्याच्या डाव्या हाताची उशी करून झोपलेली त्याची लहानगी पुतणी किंचित चाळवली. तसं तिच्या डोक्यावर थोपटत, तिची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत, जनू हलकेच तिच्याजवळून उठला. चूळ भरून, त्यानं खुंटीवरचा शर्ट चढवला नि आईनं पुढे केलेला पितळी पेला नि झाकण हातात घेत त्यानं पायात चपला अडकवल्या.
"जाऊन येतो गं. जरा पोरीकडे लक्ष असू दे..."
"अरे, सायकल नाही का घेऊन जात?''
"आता एका हातात पेला धरून कसा चालवू गं...?" जरा चिडक्या आवाजातच तो म्हातारीवर खेकसला. मग तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावरचे अपराधी भाव पाहिल्यावर जरासा वरमून जात म्हणाला,
"ही इथे कोपर्‍यावरच तर आहे पोलीसचौकी...आलोच. तू घे चहा. मग पोरगी उठली, की काम नाही करू देणार तुला."

धावतपळत, चहा घेऊन तो चौकीत पोचला, तशी ड्यूटीवरच्या हवालदाराच्या कपाळावर आठी उमटली.
"काल तुला सांगितलं ना... इथे सगळं मिळतंय तुझ्या भावाला. परत परत भेजा खायला आलास, तर तुला पण अडकवीन आत."
"नाही साहेब, एकदाच घ्या ठेवून. उन्हाचा आलोय मी..." तो गयावया करत म्हणाला, तसा हवालदार अजूनच तापला. हातवारे करत खेकसला,
"कोणी सांगितलं होतं यायला? आज एकवेळ सोडून देतोय. उद्यापासून भेटीच्या वेळेशिवाय आलास, तर याद राख. खुन्याचे लाड करत बसायला वेळ नाहीये इथे कोणाला. हरामखोराला बायकोच्या डोक्यात काठी घालताना लाज नाही वाटली... नि आता चोचले होताहेत खाण्यापिण्याचे..."
पुढच्या आणखीन शिव्या कानावर पडू नयेत, म्हणून तो मुकाट्याने वळला. चटचटतं ऊन अंगावर घेत, घामानं निथळत घरी आला. पुतणी झोपेतून जागी झाली होती नि दुधासाठी हट्ट करून म्हातारीचं डोकं पिकवीत होती.
"दे तो पेला विसळून मला... थोडं दूध आणतो बारकीसाठी.." जनू म्हणाला.
"पैसे रे? आधीचेच थकले आहेत. सारखा तगादा लावतोय दूधवाला..."
म्हातारीच्या बोलण्याकडे लक्ष न देता जनूनं पुतणीचा हात हातात धरला नि तिला घेऊन तो दाराबाहेर पडला. आज ना उद्या दुकानावर बसायला जावंच लागणार होतं. या पोलिसांच्या भानगडी सुरू झाल्यापासून दुकानाला टाळंच लागलं होतं. तशी तिथली कमाईही यथातथाच होती, पण निदान दोन्ही वेळचं जेवण निघत होतं.

गावाच्या बाजारात जनूचं आणि त्याच्या मोठ्या भावाचं पितळेची भांडी आणि इतर सटरफटर स्वयंपाकाच्या वस्तूंचं दुकान होतं. शिवाय गावातल्या देवळांमधल्या पितळी मूर्ती उजळून देण्याचा जोडधंदा जनू फावल्या वेळात करत असे. दुकान दोघांचं असलं, तरी राबायचं जनूनं नि बहुतांशी पैशावर हक्क मोठ्या भावाचा हा शिरस्ताच होता. जनूलाही तो अमान्य असायचं कारण नव्हतं. एकतर त्याच्या नि भावाच्या वयांत अंतर बरंच होतं नि शिवाय शंकरचा, त्याच्या मोठ्या भावाचा दराराच तसा होता. सिल्कचा कुर्ता-पायजमा, तोंडात सतत पानाचा तोबरा नि शिव्या... तांबरलेले डोळे नि चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर भाव असं त्याचं रूपडं होतं. नवा माणूस जरा दचकूनच बाजूला व्हायचा नि जुने जाणते दुरूनच रामराम करून मोकळे व्हायचे. दुकानाच्या मोडकळीला आलेल्या धंद्याची त्याला विशेष पर्वा नव्हतीच, कारण इतरही बरेच काळे धंदे तो करत होता. त्याचे पैसे मात्र त्याच्या स्वतःच्याच शौकांवर तो उधळत होता. नाही म्हणायला चुकूनमाकून कधीतरी सज्जनपणाच्या लहरीत असलाच, तर म्हातारीच्या हातावर काही नोटा ठेवायच्या नि बायकोला एखादं पातळ आणायचं, की संपलं.
दादाची बायको....

शारदावहिनीच्या आठवणीबरोबर जनूच्या काळजात एक जीवघेणी कळ उठली. इतक्यात विसरलो आपण वहिनीला? पुरते दोन महिनेही झाले नाहीत तिला जाऊन.... सावळ्या सतेज वर्णाची, बोलक्या डोळ्यांची, कपाळावर रुपयाएवढं कुंकू नि गळ्यात फक्त एक काळी पोत मिरवणारी आपली वहिनी... नुसतीच वहिनी नव्हे तर मैत्रीणच होती ती आपली. ती या घरात आली नि गेली सात-आठ वर्षं कशी वर्ख लावल्यासारखी रुपेरी होऊन गेली. तिचं नि आपलं नातं नुसतं दीर-भावजयीचं नव्हतं.. आणखी काहीतरी तरल, रेशमी कड होती त्या नात्याला.. कधी ती आपली वहिनी व्हायची, तर कधी बहीण. कधी आईच्या मायेनं वागायची, तर कधी चेष्टेखोर सखी व्हायची. सखी... कृष्णाच्या द्रौपदीसारखी..

हा विचार मनात आला नि जनूच्या उभ्या अंगाला आग लागल्यागत झालं.
सखी? कोणाची सखी? द्रौपदीच्या लज्जारक्षणासाठी तो घननीळ धावत आला होता. असेल तिथून, असेल तसा. नि आपण? का नाही दादाचा हात धरला? निदान त्याच्या काठीचा घाव रोखायचा होता.. स्वतःवर तरी घ्यायचा होता.. असे कसे थिजल्यासारखे उभे राहिलो आपण तेव्हा? जन्मभर दादाच्या डोळ्यांतल्या अंगाराला घाबरत राहिलो. दबत राहिलो. का नाही पेटली निदान एक ठिणगी आपल्या उरात त्या क्षणी? खाली पडलेली वहिनी पाहिली नि मग शुद्ध आली आपल्याला. रक्तानं माखलेले तिचे काळेभोर केस, निष्प्राण देह नि ते तिचे विझलेले डोळे... अजूनही स्वप्नात आपल्याला जाब विचारणारे..

दूधवाल्याच्या दुकानासमोर आला, तशी जनूची तंद्री भंगली. मोडक्यातोडक्या, फसव्या शब्दांत दूधवाल्याचं समाधान करून, एक तारखेला पैसे द्यायचा वायदा करून त्यानं पावशेर दूध घेतलं नि पुतणीला घेऊन तो परत फिरला. येतायेता मारुतीच्या देवळाच्या पायर्‍यांवर पुतणी जराशी रमली... तशी हातातला पितळी पेला सांभाळत जनूनंही खाली बसकण मारली. शारदावहिनीच्या आठवणींत त्याचा दुखरा जीव पुन्हा रमून गेला. म्हातारीच्या दूरच्या नात्यातली कोणाचीतरी मुलगी शारदा. खरंतर इतक्या सुबक चेहर्‍याची नि नीटस नाकाडोळ्यांची ही पोरगी शंकरसारख्या जहाल माणसाच्या गळ्यात पडावी, हा एक चमत्कारिक योगच म्हणायचा... किंवा शारदेचं दुर्दैव. तसेही आपल्याकडे पोरीच्या लग्नाच्या काळजीनं पिचलेले म्हातारे नि गरजू बाप कमी नाहीतच. शारदेचा बापही त्यातलाच एक. पोरीला उजवल्याच्या आनंदात तिच्या लग्नानंतर दोन वर्षांतच त्यानं राम म्हटला नि शारदावहिनीचं उरलंसुरलं माहेरही संपुष्टात आलं.

त्रयस्थाच्या नजरेनं पाहिलं तर शारदेला तसं काही कमी नव्हतं. सासू कजाग नव्हती. मायाच करत होती सुनेवर. धाकटा दीर जणू धाकटा भाऊच होता. तीन वर्षांत छोटीचंही आगमन झालं होतं. बापाच्या घरी दोन्ही वेळच्या जेवणाची वाण होती ती तरी या घरी नव्हती. पण मुलगी झाली नि शंकरचा जुना स्वभाव उफाळून वर येऊ लागला होता. मुळात तो तापट नि एककल्ली होताच. त्यात नसत्या शौकांची नि बाहेरख्यालीपणाची भर पडली. मग काय... बायकोला बडवणं नि घरादारावर रुबाब दाखवणं रोजचंच होऊन बसलं. त्याच्या उग्र स्वभावासमोर म्हातारीचं नि जनूचंच काही चालत नव्हतं, तर बिचारी शारदा काय करणार होती? थोडक्यात, सगळं चांगलं असूनही मुख्य माणूसच धड नसल्यामुळे एखादा सुंदर हार असावा, पण त्यातलं पदक गळून गेल्यामुळे त्याची जशी व्हावी, तशी शारदेच्या संसाराची अवस्था झाली होती.

मागच्या अंगणातल्या तुळशीसमोर बसून, कितीदातरी तिनं भरल्या डोळ्यांनी जनूसमोर आपली कर्मकहाणी मांडली होती. अर्थात जनूला सारं दिसत होतंच. पण आजवर दादासमोर नजर वर करून बघायची हिंमत न करणारा जनू... तिला काय मदत करू शकणार होता? तो स्वतःच असहाय होता. अन् रोजच्यारोज वहिनीच्या अंगावर हात टाकणारा दादा वहिनीचा काळ ठरेल ही कल्पना त्याच्या स्वप्नातही आली नव्हती. दोन महिन्यांपूर्वीचा तो काळा दिवस जनूला मनावर जणू कोणीतरी तापती सुरी घेऊन कोरावा, तसा अजूनही स्वच्छ आठवत होता... भरपूर पिऊन शंकरदादा घरी आला होता. वहिनी त्याची वाट बघत जागीच होती. पोरगी आतल्या खोलीत म्हातारीच्या कुशीत गाढ झोपली होती. जनूही त्यांच्या बाजूला आडवा झाला होता. आल्याआल्या पिठलं भाकरीचं जेवण बघून शंकरचं पित्त खवळलं होतं. 'कोंबडीचा रस्सा का केला नाहीस?' म्हणून तो बायकोला शिव्याशाप देत होता. वहिनीचं दबल्या आवाजातलं बोलणं जनूला आत ऐकू येत होतं. बाहेरच्या आवाजांमधे झटापटीची भर पडलेली ऐकू आली, म्हणून जनू नि म्हातारी दारात आले. काठीच्या प्रहारांनी कळवळणारी वहिनी बघून जनू थोडा पुढे सरकणार, तोच दादाच्या हातातली काठी तिच्या डोक्यात, अगदी वर्मी बसली. एखादा ओंडका कोसळावा तशी वहिनी खाली कोसळली. पापणी लवायच्या आत हे सगळं घडलं होतं. नेहमी काठीचे पाच-सहा फटके मारून शांत होणारा शंकरचा राग शारदेचा बळी घेईल ही कल्पना कोणालाच आली नव्हती.

मग पोलीस, पंचनामा, या सार्‍यात होरपळणारं घर, हवालदिल म्हातारी नि आईच्या आठवणीनं रोज रडणारी लहानगी पुतणी, या सगळ्या दुष्टचक्रात जनू पुरता अडकला होता. शंकर गुन्हा साफ नाकारून मोकळा झाला होता. काठी त्यानं पोलीस यायच्या आधीच गायब करून टाकली होती. जनू नि म्हातारी या दोघांपैकी कुणाचीच त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची हिंमत नव्हती. पण पोलिसांना खात्री होती त्याच्या अपराधीपणाची नि म्हणूनच त्यांनी त्याला अडकवून ठेवला होता. रोज येऊन जनूला नि म्हातारीला चौकशी करून ते बेजार करत होते. शंकर मात्र सरकारी पाहुणचार झोडत होता. पोलिसांच्या थर्ड डिग्रीचाही त्याच्यावर काही उपयोग न झाल्याने सत्य बाहेर आणणं हे त्यांच्यासमोर एक आव्हानच होऊन बसलं होतं.

या सार्‍या प्रकारानं जनूला दोन महिने दुकानही धड उघडता आलं नव्हतं. आता मात्र पैशाची चणचण भासू लागली होती. तसेही सणासुदीचे दिवस जवळ येत होते. आता ही कोंडी फुटायलाच हवी होती. विचार करतकरतच दूध घेऊन तो घरी पोचला, तेव्हा संध्याकाळच्या सावल्या पसरायला सुरुवात झाली होती. म्हातारी चुलीवर भाकरी भाजत होती.

पुतणीला दूध-भाकरी खायला देऊन तो म्हातारीच्या जवळ सरकून बसला.
"आई, ते आले होते का गं?"
"कोण? पोलीस? ते तर रोजचेच पाहुणे. मघाशीच येऊन गेले. खरं सांगितलं नाही, तर दोघांनाही अंदर करतो म्हणत होता हवालदार."
"मग... काय करायचं गं आई?"
त्याच्या डोळ्यातल्या प्रश्नानं म्हातारी नखशिखांत थरारली.
"अन् तो तुझा भाऊ... आपल्या दोघांनाही जिवंत ठेवेल का नंतर?"
"पण तो सुटला तर? ते तरी बरोबर आहे का गं? वहिनीचा खूनच केलाय त्यानं."
"गप रे माझ्या लेकरा...कोणी ऐकलं तर..."

म्हातारीच्या आवाजात भीतीबरोबरच अपराधीपणाची छटाही दाटली होती.
जेवून जनू अंगणातल्या मोडक्या खाटेवर पहुडला. पुतणी जवळच थोडावेळ खेळली नि मग डोळ्यातली पेंग पापण्यांवरून सांडू लागली, तशी काकाजवळ येऊन गाढ झोपी गेली.
"उद्या दुकानही उघडतो गं आई थोडावेळ. किती दिवस बंद ठेवणार? देवीच्या देवळातल्या पुजार्‍याचाही निरोप आलेला. मूर्ती उजळायला बोलावतोय कधीचा."
"जाऊन ये रे बाबा... पोटाला तर लागतंच. या पोरानं तर कधी चार दिवस सुखाचे दिसू दिले नाहीत नि आता या पोरीची जबाबदारी टाकून गेला. सोन्यासारखी सून... पण तिचंही वाटोळं केलं मेल्यानं..."
डोळ्याला पदर लावीत आई म्हणाली, तसा जनूनं पोरीच्या अंगावरून, गालावरून मायेनं हात फिरवला.
"असू दे गं आई. आपल्याच रक्तामासाची बाहुली आहे ती. मी सांभाळेन तिला. नि तू तर आहेसच..."
म्हातारीचं थकलेलं शरीर गाढ झोपेच्या आहारी गेलं, तरी जनू मात्र आभाळातले तारे मोजत बराच वेळ जागा होता. कुशीत झोपलेल्या लहानगीच्या गालांवरून झरणारं चांदणं एकटक निरखत होता.

सकाळ झाली, तसा जनू उठून तयार झाला. आज भेटीचा दिवस होता पोलीस चौकीत. दादाला भेटून, पुढे बाजारात जाऊन दुकान उघडायचं नक्की केलं होतं त्यानं. बाहेर पावसाची भुरभुर सुरू होती. कोपर्‍यातली जुनाट, विटकी छत्री उचलून घेत त्यानं म्हातारीला आवाज दिला. पुतणी अजूनही झोपेतच होती.
ड्यूटीवरच्या हवालदाराच्या नजरेतला विखार झेलतच तो आत गेला. भावाकडे त्याला नेऊन, चार दोन शेलक्या शिव्या हासडून हवालदार बाहेर जाण्यासाठी वळला. त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत शंकर जनूकडे सरकला.
"माझ्या डोक्यात एक लई नामी गोष्ट आलीय जन्या... ऐक. लवकरच बाहेर पडणार बघ मी...."
जनूच्या कानाशी लागून, हलक्या आवाजात शंकर कुजबुजला.
तो बोलत होता नि त्याचा एकेक शब्द जनूच्या कानात उकळत्या शिसासारखा घुसत होता. उभ्या अंगाचा भडका उडावा... पण तोंडात बोळा कोंबून कोणीतरी आवाजच दाबून ठेवावा, तशी जनूची अवस्था झाली होती.
"पण वहिनी...शारदावहिनी.. ती तर किती चांगली..."
"असेल.. त्याचं काय आता? ती तर मेलीये. पण मला तर सुटायचं आहे का नाय?"
भेटीची वेळ संपली तसा जड डोक्यानं नि थरथरत्या पावलांनी जनू पोलीसचौकीच्या बाहेर पडला. वाट फुटेल तिकडे, पाऊल नेईल तसा भरकटत तो जात होता. मारुतीच्या देवळाजवळच्या पारावर बराच वेळ तो बसून राहिला.

वहिनीबद्दल असं सांगणाराय दादा? तिचं दुसर्‍याशी प्रकरण होतं म्हणून? त्या रागावर तिला संपवली असं सांगायचं? किती अभद्र विचार हा? तिचा जीव घेऊन समाधान नाही झालं, म्हणून आता तिच्यावर असे शिंतोडे उडवायचे? नि मग कदाचित सुटेलही तो यातून. पण हा इतका गलिच्छ नि वर खोटा आरोप? वैर्‍यावरसुद्धा करू नये असा आरोप आपल्या बायकोवर करताना जीभतरी कशी धजावतेय त्याची? त्याचा हात धरून घरात आलेल्या लक्ष्मीबद्दल, त्याच्या लेकीच्या आईबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही याला? याच्यापेक्षा राक्षसही परवडला.

शारदावहिनी तर बिचारी मरून गेली. पण आता तिच्याबद्दल काय काय वावड्या उठतील गावात? जन्मभर कोणाकडे डोळासुद्धा वर करून न बघणारी आपली वहिनी.. तिच्या चारित्र्याची मेल्यानंतर अशी भयंकर विटंबना? अशी चिखलफेक??

विचारांच्या भोवर्‍यात तो गरगर फिरत होता. भावाला आपल्या दुष्कृत्याची लाज तर नाहीच. पण वहिनीचा जीव गेल्याचीही पत्रास नाही. अजून कुठल्या कुठल्या मर्यादा ओलांडून जाणार आहे हा माणुसकीशून्य नराधम? बराच वेळ विचार करून जनू उठला. पण आता त्याची पावलं दुकानाच्या दिशेनं वळली नाहीत. मनाशी काहीतरी निश्चय करूनच तो चालायला लागला.

थोड्याच वेळानंतर पोलीसचौकीत बसलेला जनू मोठ्या साहेबांना - इन्स्पेक्टर साहेबांना सगळं सांगत होता. बाजूलाच बसलेला हवालदार ते लिहून घेत होता. जबाब देऊन संपला, तसा तो खुर्चीवरून उठला... नि परत एकदा खाली बसला.
"साहेब, साक्षात आईसारखी होती माझी वहिनी. अगदी निर्मळ. तिचा काहीच अपराध नव्हता हो..."
नि मग बसल्या जागीच त्याला अनिवार रडू कोसळलं. शर्टाच्या बाहीनं तोंड नि भरून आलेले डोळे पुसतच तो चौकीबाहेर पडला. तिथून मात्र सरळ तो दुकानाच्या रस्त्याला लागला. त्याचं चित्त आता विलक्षण शांत झालं होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्यावर असलेलं मणामणांचं ओझं एकदम हलकं झालं होतं. पाऊस अजूनही भुरभुरत होता. पण आता त्यानं छत्री उघडली नाही. उलट ते थेंब अंगाखांद्यांवर झेलत, पिसासारखा हलका होत तो रस्त्यानं चालत होता.

बाजाराच्या रस्त्याला लागला तोच देवीच्या देवळातल्या पुजार्‍यानं त्याला मध्येच अडवलं.
"अरे जनू, नवरात्राचे दिवस जवळ आलेत की. कधी येतोस? देवीची मूर्ती उजळायची आहे ना?"
त्याच्याकडे बघत जनू कितीतरी दिवसांनी अगदी प्रसन्न हसला.
"हे काय, आत्ताच तर आलो देवीला उजळून..."
अन् त्याच्याकडे वेडा का खुळा अशा नजरेने बघणार्‍या पुजार्‍याकडे साफ दुर्लक्ष करून तो दुकानाच्या दिशेनं झपाझप चालू लागला.

- supermom