सुसूत्र

"माईक टेस्टिंग झालं ना सगळ्यांचं? चला तर मग सुरू करा. आधीच उशीर झालाय." ही सूचना ऐकली आणि मला पुढे सरसावावंच लागलं.
"अहो, अहो, मी उरलेय. मला माईकच काय, पण बसायला जागाही नाही हो मिळाली."चेहर्‍यावरचा केविलवाणा भाव माझ्या सुरातून व्यक्त झालाय याची मला खात्री असते.

"काय करत होतीस मग इतका वेळ? एरवी नको तेवढी बडबड करत असता तुम्ही लोक स्टेजवर आणि आता नको तिथे मागेमागे!" माईकवाले जोशीकाका 'इनोद' करतात आणि स्टेजवरची न् त्या स्टेजपर्यंत पोचलेली माणसं दिलखुलास हसतात. इतर वेळेला, म्हणजे अगदी लावणीचा ठेकाही मख्ख चेहर्‍याने वाजवणारा सदानंद जेधेही त्यांना अगदी टाळी वगैरे देतो. मग मीपण हसून वेळ मारून नेते. पण 'अरे, याच्या शतांशानं जरी माझ्या निवेदनाला दाद दिली असतीत तर..!' हा विचार माझ्या मनात न बोलावलेल्या समीक्षकासारखा आपला येतोच!

मला मिळालेल्या लेपल माईकची वायर लूज असते, तो एका विशिष्ट अँगललाच चालतो, तेव्हा "कायम मानेचा अँगल त्याला सूट करूनच बोल" हा सल्ला मी पक्का ध्यानात ठेवते. 'काय करणार, कार्यक्रम सुसूत्र करण्याची जबाबदारी घेतलीय ना आपण!' अशी साखरपेरणी मनात करून. म्हणजे बघा, साधारण सीन हा असा असतो, दोन मुख्य गायक आणि पेटी-तबला या 'सुपरस्टार्स'ना अनुक्रमे मध्यभागी आणि दोन कोपरे अशी ठळक जागा दिली जाते. मग व्हायोलिन, झांज, मुरली आणि दुसर्‍या फळीचे गायक-गायिका उरलेल्या जागेत अर्धवर्तुळाकार बसतात. होता होता सगळं स्टेज भरतं. मग त्याला छोट्या स्टुलाचं एक एक्सटेन्शन जोडलं जातं. त्याची उंची स्टेजसाठी वापरलेल्या टेबलांइतकी होत नाही, म्हणून एक उशी, एक जाड पुस्तक वगैरे लावून आणि वरून कसलंतरी रंगीत कापड सोडून माझ्यासाठी खास अ‍ॅरेंजमेंट करण्यात येते आणि हातातली कागदांची चळत सांभाळत मी स्थानापन्न होते!

"जरा डुगडुगतंय का?" या माझ्या प्रश्नाला मानेनंच "काही नाही, ठीक आहे" असे इशारे करत आमच्या मराठी कलासाधना मंडळाच्या अध्यक्षीणबाई, ज्या आवाजासाठी आणि आपल्या आवाजाची काळजी घेण्याच्या बाबतीत आमच्या भागात सुप्रसिद्ध असतात, त्या मुख्य गायिकाबाईंकडे वळतात.

"गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहेच, चहा मध्यंतरात आणून देईन."
मुख्य गायिकाबाई नुसती मान हलवतात.

एव्हाना तबला-पेटीवाले आपापल्या वाद्यांच्या पाठी हात धुऊन लागलेले असतात. "चढा लागलाय, थोडा उतरलाय" वगैरे अगम्य भाषेइतकीच अगम्य खाडखूड चालू असते. "काळी चार की पांढरी दोन" याची खात्री होत असते. त्यात काही गायक मंडळी ही 'झेब्रा' असतात. त्यांना तिसर्‍या गाण्याच्या दुसर्‍या कडव्याच्या पाचव्या ओळीला एक पट्टी, तर बाकी वेळेला वेगळी पट्टी लागणार असते. मी मागे एकदा 'त्यापेक्षा काळी एक ते दहा आणि पांढरी एक ते दहा अशा पेट्या का नाही आणून ठेवत?' असा अत्यंत आगाऊ प्रश्न विचारून त्या ग्रूपमध्ये माझं नाव ब्लॅक लिस्टमध्ये टाकून घेतलेलं असल्यामुळे, या वेळी मी तोंडात गुळणी धरून राहते. हातातली कागदांची चळत सांभाळत असताना, निवेदकाला 'मास्टर ऑफ सेरेमनी' हे बिरूद देणार्‍याचं मी मनात खूप कौतुक करते. केवळ या बिरुदानेच मला हा रोल करायला उत्सुक ठेवलेलं असतं ना!

"नमस्कार रसिकहो", मी सुरुवात करते.. आणि बघते तर काय, समोरचा हॉल निम्माच भरलेला आढळतो.
अध्यक्षीणबाई तर "हाऊसफुल्ल आहे" असं गाजवत होत्या. पण पहिल्या गाण्याच्या निवेदनाच्या अखेरीला लोक एकदम आत येतात. आमच्या सुप्रसिद्ध गायिकाबाई 'ओंकार स्वरुपा'च्या 'आऽऽऽ'पर्यंत पोचतात आणि त्यांना पसंतीची जोरदार दाद मिळते, ती खरंच 'हाऊसफुल्ल' प्रेक्षागृहाकडून! मग मला आठवतं, मागे एकदा मी ऐकलेलं असतं याविषयी -

"आम्ही ना पहिलं गाणं सुरू झालेलं ऐकू आल्यावरच यूज्वली आत येतो. पहिल्यांदा एनीवे नुसतं बोलतात ना!"
"पण मग ते बोलणं का नाही ऐकत?"
"त्यात काय ऐकायचंय? त्या स्वागता-बिगतात आपल्याला नाही बुवा इंटरेस्ट!"

केवढा हा प्रांजळपणा!
पण खरंतर हा प्रांजळपणा मला फार पूर्वीपासून भेटलेला असतो. म्हणजे काय होतं, की कार्यक्रमाचं ठरतं आणि गायक, गायिका, वादक वगैरेंचा होकार मिळाला, की मग माझ्याकडे निवेदनाचं प्रपोजल येतं.
"अं, यावेळी जमेल असं वाटत नाही!"
"असं काय! अजून पंधरा दिवस अवकाश आहे. करून टाक की एवढं प्लीज!"
"गाणी ठरली का?"
"छे! म्हणजे साधारण दोन-तीन नेहमीची यशस्वी आहेत. बाकीची ठरतील हळूहळू. आपले गायक एकदम तरबेज आहेत."
"पण माझं काय? मला जोडावी लागतील ना. ठरवायला हवीत गाणी लवकर."
"त्यात काय एवढं जोडायचंय! तूपण कमालच करतेस हां!"
"म्हणजे काय? त्यात एक समान सूत्र हवं ना, म्हणून म्हणते."
"चालेल!"
"चालेल?!"
"हो, अगं जनरल काहीतरी तयार असेल ना तुझ्याकडे, तेच बोलून टाक म्हणजे झालं. ते बोलणं कुणी एवढं ऐकत नाही गं!"
आता ही प्रस्तावना मी होकार द्यावा या सद्हेतूनं झालेली आहे, अशी समजूत घालून घेऊन त्यांचं बोलणं ऐकूनही मी मनावर घेत नाही!

तर, मी होकार देते, तेव्हा 'ओंकार स्वरूपा' आणि 'सागरा प्राण तळमळला' ही दोन गाणी मला सांगितली जातात. हळूहळू 'प्रिया आज माझी' आणि 'रुपेरी वाळूत', नंतर नवीन हवीत म्हणून संदीप खरेचं 'अल्कोहोल', अवधूतचं 'कांदेपोहे' आणि स्वप्नीलचं 'राधा ही बावरी' ही तीन गाणी अ‍ॅड होतात. आणि हे कमी म्हणून की काय, अध्यक्षीणबाईंची नात 'Hot and Cold' म्हणणार आहे, असंही माझ्या कानावर येतं!

"हे कुठलं गाणं आहे?"
"काही कल्पना नाही. पण 'केटी पेरी' का कोण, तिचं आहे म्हणे."
"पण एकच इंग्लिश गाणं कशाला?"
"मग काय झालं? हल्ली सलील कुलकर्णीसुद्धा म्हणतो की इंग्लिश गाणं!" - इति कार्यक्रमाचे निर्माते!
मग होता होता ड्युएट हवं म्हणून 'गोमू संगतीनं', क्लासिकल बेसचं हवं म्हणून 'हे श्यामसुंदरा', असे एकेक मोहरे सामील होतात आणि माझ्या निवेदनाच्या थीमचे रूळ सटासट बदलत जातात!

राष्ट्रप्रेम, प्रियकर-प्रेम, प्रेयसी-प्रेम, संगम, विरह असं करत करत शेवटी 'ल.सा.वि.' काढावा, तसा मी 'नुसतंच आपलं प्रेम' असा टॉपिक निवडते. कारण सुरुवातीला "सूत्र-बित्र काही लागत नाही" म्हणणारे संयोजक आता "असं काहीतरी बोल, की एक गोष्टच चाललेली आहे असं वाटलं पाहिजे" असं म्हणत असतात.

कधी नव्हे ते त्यांचं इतकं अटेन्शन मिळाल्यामुळे मी पण भुरावते! आणि मग, "मंडळी, ती दूर गेलेली आहे...आणि झाकोळून आलेल्या आभाळासारखे त्याच्या मनात विरहाचे ढग आलेले आहेत" वगैरे वगैरे बोलण्याशिवाय पर्यायच उरत नाही!

अर्थात 'असून अडचण, नसून खोळंबा' या निवेदकाच्या अवस्थेला निवेदक लोक काही प्रमाणात जबाबदार आहेतच. नको इतका खोटा आवाज काढून 'मान वेळावूनी धुंद' बोल बोलणारी नटलेली निवेदिका दिसली, की कार्यक्रमातून थेट डोक्यात जाते! बोलायची वेळ झाली की कागद उलटे-पालटे करणारे शोधक निवेदक, पाठांतर न करता मान खाली घालून वाचत राहणारे विनम्र निवेदक, मराठीतला 'फ' इंग्रजी 'f' सारखा उच्चारणारे बहुभाषिक, विनोदी विनोदी बोलायची जबाबदारी घेतलेले, बोल बोल बोलून काव आणणारे असे निवेदकांचे सतराशे साठ प्रकार आहेतच.

एकदा एका कार्यक्रमाची तालीम चालू होती. संयोजक माझाजवळ आला आणि म्हणाला, "ए, तू जरा कमी आवाजात बोलशील का? काय होतं, की तू बोलत राहतेस आणि मग तबला लावताना ऐकू येत नाही त्यांना."
"हो का? सॉरी हां, माझ्या कसं लक्षातच आलं नाही हे!" मी माझ्या मते तिरकस उत्तर दिलेलं!
"हो ना! आणि तबला लावायला वेळ मिळावा म्हणून निवेदनही थोडं वाढवावं लागणार आहे त्या गाण्याच्या आधीचं. लेन्थ वाढव आणि व्हॉल्युम कमी कर."

याला म्हणावं कस्टमायझेशन! निवेदन कुठे कमी आणि कुठे जास्त याचं लॉजिस्टिक्स अनेक कारणांनी ठरतं. यांमध्ये एका ग्रूपमधल्या ढोलकीवाल्या काकांना त्यांच्या गाण्याच्या जस्ट आधी 'जाऊन' यावं लागतं हेही एक कारण असतं, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छिते!

कार्यक्रमात निवेदक असणार आहे, तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी एक प्रबळ इच्छा सगळ्या संयोजकांना असतेच.

"हे बघ, काही अनाउन्समेंट्स करायच्या आहेत तुला. एक म्हणजे पुढच्या महिन्यात नाटक आहे आमच्या संस्थेचं, पण तिकिटं जात नाहीयेत. बाहेर बूथ लावलाय, तेव्हा तिकिटांचा आग्रह कर." किंवा "गेल्या महिन्यात संक्रांतीच्या कार्यक्रमाला काही बायका अखेरपर्यंत राहिल्या नाहीत. त्यांची वाणं आज पिकअप करता येतील, असं घाल कुठेतरी निवेदनात.." असलं काहीतरी दरवेळी असतंच!

निवेदकाच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये "additional duties to be performed as needed" ही लाईन फार महत्त्वाची! कार्यक्रमाची नियोजित वेळ केव्हाच मागे पडली आहे, पाऊण तास उशीर झालाय तो पेटीवाले काका आले नाहीत म्हणून, हे मला माहीत असतं. पण मला सांगितलं जातं, "असं सांग, की म्हणावं पार्किंगचा प्रॉब्लेम झालाय थोडा - म्हणून केवळ प्रेक्षकांच्या सोयीसाठी आम्ही कार्यक्रम उशिरा सुरू करणार आहोत."

स्टेजवरून बोलायचं खोटं बोलणं हा एक स्वतंत्रच विषय आहे! एका कार्यक्रमाच्या मध्यंतरात मला बाहेरच्या फूडस्टॉलचे मालक येऊन भेटले.
"तुम्हीच ना त्या घोषणा देताय.."
"नाही हो! मी कशाला देईन घोषणा?"
"मग कोण आहेत त्या बोलणार्‍या बाई?"
"तुम्ही निवेदनाबद्दल बोलताय का?"
"तेच ते! तुम्हीच ना त्या?"
"हो!"
"तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. काय झालंय, की मी तीनशे इडल्या आणल्या होत्या. नेहमी जातात तेवढ्या. पण आज बर्‍याच उरल्यात."
मला मध्यंतरात चहाबरोबर एक इडली देण्यात आलेली होती, तिची चव आठवून मी म्हटलं,
"बरोबर आहे!"
"आँ, बरोबर काय आहे? तुम्ही एक करा, 'इडल्या संपत आल्यात, तेव्हा भ्रमनिरास टाळण्यासाठी त्वरित बाहेर जाऊन इडल्या घ्याव्यात' अशी घोषणा देऊन टाका." अशी मला आज्ञावजा विनंती करून गेलेले ते काका कदाचित जाहिरात कंपनीशी संबंधित असावेत, असा एक तर्क मी मनाशी बांधला आणि माझ्या थीममध्ये इडली कशी घुसवावी याचा मनापासून विचार करत बसले.

बाकी अन्नपदार्थ आत आणू नयेत, कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटींग करू नये अशा नेहेमीच्या सूचनांमध्ये आजकाल अजून एकीची भर पडली आहे, "सेल फोन्स बंद ठेवावेत." हे दरवेळी विनोदी भाषेत सांगण्याची जबाबदारी ज्याच्यावर पडली आहे, तोच ह्यामागचं कारुण्य जाणू शकेल.

पण हे सगळं खरं असलं, तरी निवेदकाचा एक स्वतंत्र प्रांत असतो हे मात्र नक्कीच. कार्यक्रमात निवेदन असणं हा प्रथेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. कार्यक्रमात गायक, गायिका, नट-नट्या, वक्ते अनेक असतात. पण निवेदक मात्र एक किंवा फार तर दोन! (अर्थात, निवेदक दोन असले, की त्यांचं आपापसांत 'दोन बोक्यांनी आणला हो आणला..' हे द्वंद्वगीत चालू राहतं हा भाग अलाहिदा).

म्हणून तर, "काही काळजी करू नकोस, कोणीसुद्धा ऐकत नाही निवेदन, बिनधास्त हो म्हण!" अशा प्रेमळ आग्रहाला मी हमखास बळी पडते आणि कागदांची चळत सांभाळत सुरू करते, "नमस्कार रसिकहो.."

- hems