संत आनंदाचे स्थळ

ऐसा ह्रदयामध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ॥
-ज्ञानेश्वरी ९-६०

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या नॅन्सी एटकॉफ या गेली १५ वर्षे मानवी मानसशास्त्र, प्रवृत्ती आणि सुख-समाधान यांवर संशोधन करत आहेत. त्यांनी सादर केलेला एक शोधप्रबंध नुकताच पाहण्यात आला. सुखाचे शास्त्र अशा आशयाच्या त्या प्रबंधात त्यांनी बर्‍याच संशोधनांती हे मत मांडले, की जितकी सुखाची भौतिक साधने अधिक, तितके सुख अधिक हे सर्वमान्य गणित काही तितकेसे खरे नाही. आपण जरी सुखसोयींनी युक्त युगात जगत असलो, तरी जगात निराशेचे प्रमाण वाढत चालले आहे. पण त्याबरोबरीनेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुख मिळावे, या माणसाच्या मूलभूत इच्छेचा काही अंत झालेला नाही.

आता हे सांगण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज का पडावी, हा खरंतर प्रश्नच आहे!

आदिम काळापासून माणसाचा सुखाचा शोध अव्याहतपणे चालूच आहे. मग इतकी औद्योगिक प्रगती करूनही, इतकी भौतिक 'सुखाची' साधने समोर हात जोडून उभी असताना आजही माणसे दु:खी का असतात, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा प्रश्न जसा नॅन्सी एटकॉफ यांना पडला, तसा तो आपल्यालाही पडतो. हाच प्रश्न आपल्यापूर्वीही बर्‍याच जणांना पडला होता. नॅन्सी एटकॉफांनी त्यावर स्वत: संशोधन करायचे ठरवले, त्यासाठी त्यांनी आधुनिक मानसशास्त्राच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले, पूर्वतयारी म्हणून त्यांनी मानसशास्त्रातल्या विशेष परीक्षा दिल्या. आज त्यांचे या विषयांवरील ज्ञान नक्कीच कौतुकास्पद आहे. पण तरीही त्यांना अजून पूर्ण सुखी होण्याचा मार्ग सापडलेला नाही. मग प्रश्न असा येतो, की याआधी कुणी असे संशोधन केले आहे का? याआधी कुणी सुख कशाला म्हणावे, ते कसे मिळवावे, ते मिळाल्यावर काय होतं, काय होत नाही, हे अनुभवानिशी सांगितले आहे का? तर त्याचे उत्तर, फार लांब न जाता, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित संतसाहित्यातच मिळते.

भारतीय तत्त्वज्ञान हे सुखाच्या, इतकेच नव्हे तर पूर्णत: सुखरूपतेच्या भोवती विणले गेले आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द किंवा सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा अशा विषयांवर, त्याभोवती विणलेल्या घटनांवर अवलंबून नसलेला आनंद हाच मोक्ष, असे ते तत्त्वज्ञान निक्षून सांगते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांवर आधारलेल्या या तत्त्वज्ञानात मोक्ष या सर्वांत महत्त्वाच्या प्राप्तव्याची, म्हणजेच परमार्थाची, व्याख्याच 'सकलकारणांसह दु:खनिवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती' अशी जिथे केली आहे, त्यावरून आपल्या संस्कृतीत आनंदाला दिलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येईल.

संपूर्ण भारतवर्षाच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या विभूतींनी या व्याख्यांचा, त्यांच्याकडे नेणार्‍या मार्गांचा योग्य तर्‍हेने अभ्यास करून, त्यांतून अनुभव घेऊन आपल्या समकालीनांना व पुढे येणार्‍या पिढीला उपयोगी पडेल, अशा कालानुरूप शब्दांत या शास्त्राचा विकास केला आहे. पण विशेषत: महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या संतांनी, वर उल्लेखिलेल्या त्या सच्चिदानंद परब्रह्माचे ओतीव रूप युगानुयुगे 'उभे विटेवरी, कर कटावरी, ठेवोनिया' असे आहे, हे आपल्याला सांगितले आणि मराठी जनमानसाला हजारो वर्षांचा उज्ज्वल इतिहास असलेल्या वैदिक परंपरेची एका हव्याहव्याशा, प्रेमळ आणि सात्त्विक रूपात ओळख आपल्या साहित्यातून करून दिली.

या काव्यमय साहित्यामुळेच बहुधा, संतांना बर्‍याचदा महाराष्ट्राचे गुह्यवादी कवी (मिस्टीक पोएट्‌स) असे संबोधले जाते. असे संबोधन केवळ चूकच नाही, तर दिशाभूल करणारेही आहे. कवी कल्पनाविहार करतो पण संतांकडे, या वाङ्मयामध्ये, सत्यदर्शनाचा, परतत्त्वाचा स्पर्श होता. त्यामुळे त्यांना फक्त गुह्यवादी कवी न म्हणता संतच म्हटले पाहिजे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे मुकुटमणी असलेल्या संत ज्ञानदेवांच्याच सांगण्याप्रमाणे,
वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्त्व । स्पर्शु जैसा ॥

या आत्मतत्त्वाचा अनुभव आपल्याला संतवाङ्मयात जागोजागी येतो. किंबहुना सकळ संतसाहित्याचेही मुख्य प्रतिपाद्य उपनिषदांनी प्रतिपादलेला आत्माच आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भागवतपरंपरेचा एकन्‌ एक वैष्णव ज्या ग्रंथाला माऊली म्हणून ह्रदयाशी कवटाळतो, त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत,
ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥
असे सांगून पुढे
किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥ ज्ञाने. ११.१३१ ॥
(जेव्हा जीव आत्मस्वरूप होतो, अंत:करण वृत्ती शांत होऊन आत्मरूप होते, तेव्हा जे काही होते त्यालाच सुख म्हणतात)
- अशी सुखाची व्याख्या केली आहे. त्यामुळेच जे त्यांनी दाखवलेल्या वाटेने गेले त्यांना
'सोलीव जे सुख अतिसुखाहूनी । उभे ते अंगणी वैष्णवांच्या ॥' हा अढळ अनुभव आला आहे.

महाराष्ट्रातील संतांनी इतक्या वर्षांपासून आणि इतक्या सातत्याने हे लोकमार्गदर्शनाचे कार्य केले आहे, की या अखंड वाहणार्‍या, समाजाच्या वेगवेगळ्या थरांमधून येणार्‍या संतपरंपरेकडे बघून अचंबित व्हायला होते. शके १२०० पासून ते १२७५ च्या पाऊण शतकांत तर महाराष्ट्राचे भाग्य खर्‍या अर्थाने उजळले. शके १२१२ मध्ये भावार्थ-दीपिका, अर्थात ज्ञानेश्वरी, लिहून झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर पंढरपुरास जाऊन भक्तशिरोमणी नामदेवांस भेटले. ज्ञान आणि भक्ती यांचे अभूतपूर्व मीलन झाले! ज्ञानेश्वरांनी नामदेवांना अद्वैतज्ञानाची दीक्षा दिली आणि आग्रहाने त्यांच्याकडून नवविधा भक्तिगुह्य जाणून घेतले. या काळात महाराष्ट्र संतवैभवाच्या शिखरावर डोलत होता असेच म्हणावे लागेल. या दोघांना अजून संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांशिवाय चोखामेळा आणि त्यांची पत्नी सोयराबाई, गोरोबाकाका, संत कान्होपात्रा, जोगा परमानंद, ज्ञानेश्वरांचे शिष्य परिसा भागवत, संत जनाबाई आणि त्यानंतरच्या शतकांतही ही परंपरा कायम ठेवणारे नाथमहाराज, तुकोबाराय, समर्थ रामदास, अक्कलकोटस्वामी, गजाननमहाराज, स्वामी स्वरूपानंद, संत बहिणाबाई हे आणि इतर अनेक ईशकृपेचे मेघ येऊन मिळाले अन्‌ उभ्या महाराष्ट्रात अद्वैतभक्तीचा जो धबाबा स्रोत उसळला, तो आजतागायत अखंड वाहत आहे!

या स्रोताचा उगम बाराव्या शतकात संत नामदेव आणि ज्ञानोबारायांच्या या ज्ञान आणि भक्तीच्या जोडीपासून झाला. मोक्षार्थ्यांना सहज वाट सापडावी, म्हणून प्राकृत भाषेत गीतेवर टीका लिहून ज्ञानदेवांनी आणि 'नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥' असे म्हणणार्‍या नामदेवांनी भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवून मुमुक्षूंना एका गरुडध्वजाखाली एकत्र केले. त्याचेच रूप असणारी, गेली सातशे वर्षं अव्याहतपणे चालू असणारी, लाखो लोकांस प्रत्येक वर्षी पंढरपुरास पालवणारी यासारखी जगात दुसरी परंपरा नाही.

पण फक्त स्थानिकांचाच उद्धार बघतील, तर ते संत कसे? ज्ञानदेव आणि नामदेवांच्या या भक्तिज्ञानाच्या अद्वितीय जोडीने उत्तर भारताची तीर्थयात्रा केली. नामदेवांनी भागवत धर्माची ही पताका त्यावेळच्या पंजाब प्रांतापर्यंत नेली. २० वर्षे अद्वैतज्ञान व ज्ञानपर भक्तीचा त्यांनी तिथे प्रसार केला. गुरु ग्रंथसाहिबात त्यांचे जे अभंग समाविष्ट आहेत, त्याला 'मुखबानी' असे नाव आहे. या मुखबानीमध्ये विश्वभावाची अतिशय सुंदर कल्पना आपल्याला पाहायला मिळते -
आनिले कुंभ भराईले उदक । ठाकुरको इस्नान करौ ।
बईआलिस लख जी मल महि होते । बीठलू भैला काई करौ ।
जत्र जाऊ तत्र बीठल भेला । महाआनंद करे सद्‌ केला ।

(देव्हार्‍यातील देवांची विधिवत् पूजा करावी म्हणून जलाने भरलेले कुंभ आणले आणि ध्यानी आले की त्या पाण्यात लक्षावधी जीव आहेत आणि ते ही विठ्ठलरूपच आहेत. मग मी स्नान कुणाकुणाला घालावे?)

अशा प्रासादिक आणि भगवद्‌भक्तिपूर्ण अभंगांनी तिथल्या जनमानसावर प्रभाव न पडता तर नवल! नानक संप्रदायात अद्वैताची जी लक्षणे दिसून येतात, त्यांचे मूळ आपल्याला नामदेवांच्या या साहित्यामध्ये आढळते. त्यांच्या कार्याचे फल म्हणूनच गुरू नानक, तुलसीदास आणि कबीर यांनी जे कार्य उत्तरेत केले त्याचा इस्लामी लाट थोपवली जाण्यात लक्षणीय वाटा आहे.

वारकरी पंथाची कीर्तनपद्धती ही नामदेवांची आणि त्यांच परंपरेतल्या पुढच्या संतांची, अजून एक देणगी. नारदीय कीर्तनकलेपेक्षा वेगळी असलेली ही पद्धत आज गावोगावी बघायला, ऐकायला मिळते. या कीर्तनांतून महाराष्ट्रांतल्या प्रत्येक गावागावांत ज्ञानदेव, नामदेव, तुकारामांचे अभंग, एकनाथांची भारुडे गायली जातात. याचा सूक्ष्म का होईना, पण मराठी मनांवर परिणाम झालेला दिसून येईल. गेली ७०० वर्षे डोलणारी भागवत धर्माची पताका आणि तिला असलेली अद्वैतज्ञानाची पार्श्वभूमी, नाथांची भारुडे आणि संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधून कोपरखळ्या देत दाखवलेला सत्शील जीवनाचा मार्ग, गोंदवलेकर महाराजांसारख्या विभूतींनी आपल्या विहित कर्मांपासूंन न चुकण्याचा सतत दिलेला संदेश आणि त्यांत समर्थ रामदासांनी सुरू केलेली बलोपासना या सर्वांनी एक सक्षम, सुदृढ समाजनिर्मिती करण्यास योग्य वातावरण निर्माण केले, यात शंका नाही.

यांतील प्रत्येक संताने कालबाह्य रूढींचा अव्हेर करून समाजकल्याणासाठी योग्य दिशा दाखविली आहेच, पण तो काही संतसाहित्याचा मुख्य उद्देश नाही हे ध्यानात घेणं अतिशय आवश्यक आहे. संतसाहित्य हे मुख्यत: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनाच वाहिलेले आहे. धर्म, देश, न्याय, समता, सदाचार, नीती अशा मूल्यांना यांत सामाजिक संदर्भापेक्षा पारमार्थिक संदर्भ खूपच अधिक आहे. गेल्या काही वर्षांत या गोष्टींतील सामाजिक संदर्भाला महत्त्व आल्याने संतसाहित्याचा मूळ हेतू दृष्टीआड होण्याची शक्यताही वाढत आहे. मोक्षाच्या पूर्वतयारीसाठी वैराग्य, मोक्षाचे स्वरूप कळण्यासाठी वेदान्त तत्त्वज्ञान व तत्त्वज्ञानाचा अनुभव देण्यासाठी भक्ती असे या तिन्हींचे परस्परावलंबित्व लक्षात ठेवले पाहिजे. तरच संतसाहित्याचा यथायोग्य अभ्यास करणे व त्यांतून त्यांना अपेक्षित असणारा परिणाम मिळविणे शक्य होईल.

वेदांतातील वर उल्लेखिलेले तत्त्वज्ञान सांगताना महाराष्ट्रातील बहुतेक संतांनी श्री शंकराचार्यांचे केवलाद्वैत मतच पुरस्कारले आहे. या पूर्ण परंपरेकडेच ऐतिहासिक संदर्भासहित बघितल्यास, त्यांच्यात आश्चर्यकारक सूत्रबद्धता आढळते. त्यामुळे या मंडळातील प्रत्येक संताच्या साहित्याचा वेगळा विचार करण्याऐवजी त्यांच्या साहित्याचा एकत्रित परिणाम, त्यांतील सुसूत्रता यांचा संदर्भ बघणे सयुक्तिक होईल. या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आलेख मांडला असता, चार निश्चित काल दिसतील,
१. उपनिषत्‌काल - उपनिषदे, महाभारत, योगवासिष्ठ, ब्रह्मसूत्रे यांतून अद्वैत तत्त्वज्ञान आणि तदंतर्गत भक्ती सांगितली गेली.
२. आचार्य शंकराचार्यांचा काल - ज्यांत आचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुनरुत्थान केले आणि भक्तीची महिमाही गायली. पण नंतरच्या काळात काही टीकाकारांनी ज्ञानाचेच महत्त्व प्रतिपादले आणि भक्तीच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष केले.
३. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क यांचा काल - यांनी द्वैतभक्तीचेच प्रतिपादन केले, पण अद्वैतज्ञानास महत्त्व दिले नाही.
४. श्रीसंत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांचा काल ते आजपर्यंत - या अतिशय महत्त्वाच्या काळात संतांनी वेदप्रामाण्य मान्य करून वेदनिष्ठा नाकारली आणि उपनिषत्‌कालीन अद्वैतज्ञान व भक्ती पूर्ववत् प्रतिपादली.
बौद्ध धर्माचा भारतात र्‍हास होत गेल्यावर साधारणपणे गेल्या एक हजार वर्षांमध्ये यज्ञसंस्थेचा विलय होत गेला आणि गीताधर्माचा उदय झाला. त्यांतल्या त्यांत वेद व यज्ञ यांचा नाजूक हातांनी फेरविचार केला गेला, जे अपेक्षितच होते. संतांनी ही प्रक्रिया संघर्षरहित रीतीने पूर्णत्वास नेली आहे. संतांनी ज्या भागवत महापुराणाचा फार मोठ्या प्रमाणात आश्रय घेतला, त्या भागवताच्या माहात्म्याच्या पहिल्या अध्यायात जणू वेदनिष्ठेची अखेर झाली व वेदातील ज्ञानकांडे किंवा वेदान्त, म्हणजे उपनिषदे, यांचे प्रामाण्य अबाधित राहिले आहे याचा उद्घोष केला गेला. समर्थ रामदास म्हणतात,
वेदशास्त्रांचे भांडण । शास्त्री तोडे ऐसा कोण । निवडेना साधूवीण । कदापीही ॥ दास. ५-६-२९॥
(सर्व वेद ज्या एका तत्त्वाकडे बोट दाखवितात, ते अनुभवाने जाणलेला साधूच वेदशास्त्रांमध्ये सामान्य माणसाला दिसणारे मतभेद मिटवू शकतो. ते तत्त्व जाणले असता वेद गौण ठरतात आणि फक्त ज्ञानकांड प्रमाण राहते.)

हेच संतांना अपेक्षित आहे. अहिंसक यज्ञसुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निष्फळ ठरविला आहे,
तीळ जाळीले तांदूळ । काम क्रोध तैसेचि खळ ।
(यज्ञाच्या निमित्ताने आहुतींत तीळ व तांदूळ जाळले खरे, पण काम आणि क्रोध हे दुष्ट विचार तसेच राहिले तर त्याचा काय उपयोग?)

एकनाथमहाराज हिंसायुक्त यज्ञाची वासलात लावतात,
स्त्री आमिष मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवी घडे पतन । ते वेदनिधान नेणती मूर्ख ॥
वेदींच्या अर्थवादासरिसा । मनी बांधोनि भोगाशा । यज्ञमिसें पशु हिंसा । भोगलिप्सा करू धावती ॥
(ना.भा. ५-२६०-२६१)
(संभोग, मांसाशन, मद्यपान ह्या वेदांनीच विहित म्हणून सांगितलेल्या भोगांनी पतन कसे होईल, असे जे विचारतात त्या मूर्खांना वेदांचे खरे निधान समजत नाही. मनात दडलेल्या भोगांच्या वासनांना ते प्रतिष्ठा देण्यासाठी यज्ञ करून, पशू मारून, मांसाशनादी भोग भोगविण्यासाठी उतावीळ होतात. कारण वेदांनी स्तुतिप्रधान अतिशयोक्तीचा (अर्थवादाचा) मोठ्या प्रमाणात वापर केला आहे, हे ते समजून घेत नाहीत.)

संत ज्ञानेश्वरही यांहून दुसरे काही म्हणत नाहीत
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धी देख सर्वथा । तया वेदवादरता । मनी वसें ॥ ज्ञा. २.२२५॥
(स्वर्गसुखासाठी आसुसलेले व भोगातुर झालेले असे वैदिक आत्मघातक असतात.)

त्यामुळे वेदांमध्ये जे सत्यस्वरूप ब्रह्म सांगितले आहे, त्याचा वेध घेण्यासाठी आणि त्या आनंदप्राप्तीसाठी यज्ञकेंद्रित वेदनिष्ठा नाकारून वेदांच्या फक्त काही भागाचा उपयोग आहे, हेच संतांनी सांगितले - तेच वेदप्रामाण्य.

यास्काचार्यांनी केलेली निरुक्त टीका ही वेदांवरील अधिकारी टीका मानली जाते. त्यांचे हेच म्हणणे आहे
'स्थाणुरयं भारहार: किलाभूदधीत्य वेदं न विजानाति योऽर्थम्‌।'
(वेदाध्ययन करून त्यांचा अर्थ - त्यांतले प्राप्तव्य जो जाणीत नाही, तो ओझे वाहणार्‍या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे समजावा!)

हे प्राप्तव्य काय आहे हे तुकाराम महाराजांकडून कळते.
वेद अनंत बोलला । अर्थ इतुकाचि साधला । विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ॥

वेदांच्याच ऐन भरभराटीच्या काळात बंड करणार्‍या याज्ञवल्क्यासारख्या प्रगल्भ आणि वादकुशल ऋषींचा वारसा चालवत या संतांनी प्रस्थापितांना हादरे दिले, वर्णवर्चस्वाची निर्भर्त्सना केली आणि समाजात समतेची, प्रेमाची रुजवणी केली. हे सर्व करताना त्यांनी वेदांताची कास कुठेही सोडली नाही, हेही विशेष!

वज्रसूचिकोपनिषद विचारते - ब्राह्मण म्हणावे तरी कोणाला? जीव ब्राह्मण नाही, कारण सर्व शरीरांमध्ये जीव असतो. शरीर, ज्ञान, कर्म इत्यादी ब्राह्मण दर्शवीत नाहीत, कारण ते सर्वांच्या ठिकाणी आपापल्या कुवतीनुसार दिसून येते. धर्माप्रमाणे म्हणावे, तर आजच्या युगातले स्वधर्म वेगळे आहेत आणि त्यानुसार सर्वच वागताना दिसतात. मग ब्राह्मण कोण? या प्रश्नाला ते उत्तर देते की
'य: कश्चिदात्मानद्वितीय जातिगुणक्रियाहीन वर्तत एवमुक्त लक्षणो य: स एव ब्राह्मण:।'
(जो कोणी अद्वितीय, जातीरहित, गुणरहित, क्रियारहित अशा आत्मस्वरूपात रमून राहतो तोच खरा ब्राह्मण होय.)

आणि ही ब्रह्मलक्षणे संतांनी स्वत: आचरून दाखविली आणि वर समजावूनही सांगितली.

ब्राह्मणु ब्रह्मवेत्ता तो । ब्राह्मणु ब्रह्मनिश्चयी । ब्राह्मणु ब्रह्मस्थितीचा । ब्राह्मणु म्हणिजे गती ॥
(जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, ज्याला त्याचे परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान झाले आहे तो ब्राह्मण. ज्यांस खरी, सत्य गती मिळाली आहे तोच ब्राह्मण.)

ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात 'कुळ जाती वर्ण । हे अवघेचि अकारण ।'

स्मृतींमधील सोवळ्या-ओवळ्याची चौकटही संतांनी नाकारली.
सोवळे कोणते रे ब्राह्मणा । ओवळे कोणते रे।
विटाळे उपजला विटाळे वाढला । विटाळेंचि मेला सावकाश ।
हाडामांसाच्या सगट मोळ्या । पाणियें सोळिया होती कैशा ॥
समर्थ रामदास म्हणतात, तुमच्या विटाळ शब्दाची जी कल्पना आहे त्यांतून ज्याचा जन्म झाला, मळमूत्रांत खेळत वाढला व मेल्याबरोबर अशौच मागे ठेवून गेला, अशी शरीरे सारख्याच हाडामांसाची असताना तुझ्या पाण्याने ती सोवळी कशी होतील? आजच्या काळांतही पुरोगामी मानले जाणारे हे विचार संतानी शेकडो वर्षांपूर्वी मांडले आहेत, हे बघून ज्यांस आश्चर्य वाटणार नाही तो विरळाच!

सत्य निर्भीडपणे सांगणार्‍या या संतसाहित्यात वेदान्तशास्त्राबरोबरच लालित्याचेही अचूक मिश्रण पाहायला मिळते. विवेकसिंधूसारखा अद्वितीय ग्रंथ लिहिणार्‍या मराठीतील आद्यकवी मुकुंदराजांचे खरेतर त्याविरुद्ध मत होते,
नवरसांचे उपलवणे । ते उघड वाचेंसी नागवणे । म्हणौनी न प्रवर्तती स्याहाणे । तेथ विषई ॥
तैसी मायीक रसवृत्ती । बोलता आंगासि न ये महंती । आणि परमार्थसंवित्ती । दुरीदुर्‍हावें ॥
वि.सिं. १-१-१९॥
रसालंकारांनी श्रोत्याला किंवा वाचकाला भुलवून संतत्व येत नाही. उलट परमार्थाचा ठेवा फार दूर जातो, असे त्यांचे स्पष्ट मत. पण महाराष्ट्राचे सुदैव असे, की ज्ञानियांच्या राजाने ते मानले नाही! ज्ञानेश्वर माऊली परतत्त्वाचा संदर्भ असलेले सालंकार कवित्व मान्य करून म्हणतात,
दाऊं वेल्हाळें देशी नवी । जे साहित्याते वोजावी । अमृतांते चुकी ठेवी । गोडिसेपणें ॥ १३.११५८॥
ये मराठीयेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । घेणे देणे सुखचि वरी । हो देई या जगा ॥ १२.१६ ॥
यांचा प्रत्यय ज्ञानेश्वरीत ठायी ठायी येतो. रसाळ, सालंकृत भाषेतून अमृतालाही गोडीत मागे टाकणारा हा ग्रंथ लिहिताना त्याच वेळी त्याचा अपेक्षित हेतू सांगावयासही ते विसरले नाहीत.
अध्यात्मशास्त्री इये । अंतरंगचि अधिकारिये । येरु ते वाक्चातुर्ये । होईल सुखिया ॥
त्यामुळे ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचताना, त्यांतील ओव्यांचे अर्थ बघताना, आपल्यावर काय जबाबदारी आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. राजकारण ते लेखनकला अशा विविध विषयांवर भाष्य करणारा समर्थ रामदासांचा दासबोध वाचतानाही हेच लक्षात राहणे गरजेचे आहे. ग्रंथाचे अपेक्षित फळ सांगताना ते म्हणतात,
नासे अज्ञान दु:ख भ्रांती । शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फलश्रुती । इये ग्रंथी ॥

यावरून समर्थांची इतरत्र स्पष्ट दिसणारी समाजाभिमुखताही समाजाच्या आध्यात्मिक कल्याणाच्या दिशेने होती, हेच ध्वनित होते. गाडगेमहाराजांनीही देवकीनंदनगोपालाच्या ठेक्यावरच सामाजिक चळवळ उभी केली. ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजीमहाराज म्हणतात,
कशाला काशी जातो रे बाबा। कशाला पंढरी जातो।
संत सांगती ते ऐकत नाही। इंद्रियांचे ऐकतो। किर्तनी मान डोलतो बरी । कोंबडी बकरी खातो ॥

आपल्या कल्याणाच्या ओढीने कधीकधी अशी कान धरून दटावणी करणारे, या सर्वांतून परतफेडीची कसलीही अपेक्षा न ठेवणारे हे साधुपुरूष, समोरची व्यक्ती कुठलीही असो, तिला अनुरूप सुखापर्यंत जाण्यासाठी योग्य असाच मार्ग सांगतात कारण,
अधिकार तैसा करुं उपदेश । साहे ओझें त्यास तेंचि द्यावें । मुंगी वरी भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धि ॥ असे त्यांचे म्हणणे आहे.
भुकेजलेल्या पिलांना चारा आणून देणार्‍या पक्षिणीच्या कळवळ्याने ते मोक्षेच्छा असलेल्यांना प्रगतिपथावर नीट हाताला धरून घेऊन जातात. या मार्गावर चालण्यासाठी,
विधी ते पाळीत । निषेधा ते गाळीत । मज देऊनि जाळीत । कर्मफळे ॥
हा पथनियम देऊन मार्गस्थांनी गोंधळू नये, यासाठी नेमके कुठले विधी आणि निषेध पाळावेत हेही सांगतात. अशा वेळी 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा' असे निश्चयाने सांगणार्‍या तुकोबारायांनी सांगितलेले तीन विधी आणि तीन निषेध हेच माथ्यावर धारण करण्यायोग्य आहेत! आईवडिलांची सेवा करा, नेहमी खरे बोला, मुखाने नाम घ्या हे तीन विधी आणि परद्रव्य, परनारी व परनिंदेपासून दूर राहा हे ते तीन निषेध. संतांचे हे साधेपणाचे आणि नेमकेपणाचे बोल धार्मिक भ्रष्टाचारांच्या वादळांमध्ये आत्मसुखाच्या ओढीने अंधारात चाचपडणार्‍यांसाठी असलेले जणू लखलखते दीपस्तंभच आहेत!

सामाजिक जाणिवेचे इतके भान ठेवूनही संतांवर, त्यांनी प्रतिपादलेल्या तत्त्वज्ञानावर नेहमी निष्क्रियतेचा आरोप केला जातो. 'कर्माची खती करिती ते गावंढे गा' - 'कर्माकडे दुर्लक्ष करणारे मूर्ख अडाणी आहेत' असे सरळ म्हणणार्‍या या तत्त्वज्ञानाला निष्क्रिय कसे ठरवले गेले, याचा अभ्यास करणे जरूरीचे ठरेल. उलटपक्षी संतसाहित्यात नेहमी दोन सत्तांचा उल्लेख आढळतो. अध्यात्मशास्त्राशी निगडित असलेली ती पारमार्थिक सत्ता आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेल्या ज्ञानावर आधारित असलेली व्यावहारिक सत्ता. संतांनी सांगितलेले वैराग्य व्यावहारिक सत्तेच्या सर्व कक्षा सांभाळूनही बाणवता येते. याची स्वत: त्यांनीच उदाहरणेही दिलेली आहेत. संत गोंदवलेकर महाराजांच्या भावाने त्यांची काही जमीन हडप केली, तेव्हा त्याच्याविरुद्ध महाराजांनी शांतपणे कोर्टात खटला दाखल केला. आपल्या भावाने केलेला अन्याय महाराजांनी सहन न करता व्यावहारिक सत्तेत कसे वागावे, याचे भक्कम उदाहरण दिलेच, पण त्याच वेळेस अजून एक शिकवणही दिली. दोघेही कोर्टात असताना महाराजांनी त्यांच्या भावास जेवायला बोलावले. तो यायला तयार नव्हता, तेव्हा महाराजांनी त्याला समजावले, की जमिनीच्या बाबतीत आपण खटला चालू केला आहे, त्याबद्दल वकील आपापली बाजू कोर्टात मांडतील आणि न्यायाधीश निर्णय देतील तो आपण मान्य करू. मग मिळून भाकरी खाण्यात काय अडचण आहे? व्यवहार सांभाळूनही महाराजांची शांती मुळीच ढळली नव्हती. हेच प्रत्येक संताच्या शिकवणीचे मर्म आहे. व्यवहारांतून निवृत्त झाल्याशिवाय माझी साधना होईल कशी, असे म्हणणार्‍यांना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥

अशा पद्धतीने प्रपंच योग्य रीतीने करूनही या आनंदाची प्राप्ती होऊ शकते, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. नाहीतर वैराग्याचे सोंग आणून नाव विचारल्यावर "या देहाला क्ष म्हणतात" अशा प्रकारची उत्तरे देण्याचा पारमार्थिक दांभिकपणा दिसून येतो, ज्याचा प्रत्येक संताने धिक्कार केला आहे. या सत्ता वेगळ्या ठेवूनही स्वत: परमार्थ सिद्धीस नेऊन इतरांसही मार्गदर्शन करणार्‍यांची उदाहरणेही बरीच आहेत. असे आताच्या काळांतील उदाहरण म्हणजे डॉ. श्रीकृष्ण देशमुख, ज्यांना सर्व प्रेमाने डॉक्टरकाका म्हणतात. डॉक्टरकीचा व्यवसाय करूनही वेदांतशास्त्रात प्रभुत्व असलेल्या डॉक्टरकाकांनी गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यांवरील भाष्ये लिहिली आहेत. त्याचबरोबरीने शिष्यप्रबोधनासाठी ते पूर्ण भारतभर सतत भ्रमंती करत असतात. मुखाने रामकृष्णहरी म्हणताना आत्मारामावर प्रवचने करणारे, सार्थ दासबोध लिहिणारे, पंढरपूर आणि सज्जनगड दोन्हीकडे सारख्याच प्रेमाने जाणारे काका सांप्रदायिकांमधल्या दुराव्यांच्या भिंती दूर करून एक महत्त्वाचा पाया रचत आहेत. त्याचवेळेला भूतबाधा, करणी यांसारख्या चुकीच्या आणि घातक समजुती काढण्याचाही ते प्रयत्न करतात. त्यासाठी ओवाळून टाकलेल्या लिंबाचे सरबत करून पिणे, मिरच्यांवर मुद्दाम पाय देऊन जाणे अशा गोष्टी स्वत: करून त्याला परस्पर उत्तर देऊन टाकतात!

'वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदीयाळी' या माउलींच्या सुफळ इच्छेप्रमाणे अशी ही साधुपरंपरा 'अनवरत भूमंडळी' चालूच आहे. या संतांच्या मांदियाळीत मराठी समाजाच्या अनेक थरांतून वेगवेगळ्या विभूतींचा समावेश आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर माऊली, भक्तशिरोमणी नामदेव महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, चांगदेव, गोरोबाकाका, चोखोबा, एकनाथ महाराज, समर्थ रामदास, जगद्गुरु तुकाराम महाराज, सावतामाळी, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी वरदानंद भारती, स्वामी स्वरूपानंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेमहाराज आणि अशा आजवर झालेल्या अनेक दिव्य प्रभृतींपासून ते सध्या त्याच श्रेष्ठ परंपरेचे श्री डॉक्टर देशमुख, अमरावतीच्या श्रीसंत मंदाताई गंधे यांसारख्या आजच्या चेतना-चिंतामणींच्या प्रकाशाने महाराष्ट्र झळाळून उठला आहे.

आज सुखलालसेपायी विषयभोगांच्या मृगजळामागे धावणार्‍या जगाला परत एकदा या संतांच्या विचारांकडे वळून बघण्याची गरज आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतून उदयास आलेल्या भौतिकवादाने केलेल्या सुखाच्या व्याख्येनुसार चालल्यावर अपेक्षाभंगामधून येणारे नैराश्यच जास्त शक्य आहे, हे कळायला फारसा वेळ लागलेला नाही. अशा स्थितीत आपल्या प्रखर तेजाने तळपणार्‍या भारतीय तत्त्वज्ञानाचे संतसाहित्यामध्ये जे रूप दिसते, ते कोणतीही भेसळ न करता, कुठल्याही फुटकळ अंधश्रद्धेला महत्त्व न देता त्याच रूपात आपल्यापर्यंत पोहोचवणारे डॉक्टरकाकांसारखे सत्पुरुष आज महाराष्ट्रात, मराठी भाषेत मार्गदर्शन करत आहेत, हे मराठी जनांचे निस्सीम भाग्यच! ज्या तत्त्वज्ञानाची कास धरून विजीगिषु वृत्तीने आर्यांनी आपला उत्कर्ष साधला, तेच शुद्ध, लख्ख तत्त्वज्ञान आज आपल्याला उपलब्ध आहे खरे, पण जेत्यांनी उपहासपूर्वक त्याला पुराणातली वानगी ठरवल्यामुळे आपल्याही डोळ्यांवर झापड आल्यासारखी झाली आहे! ही झापड दूर करण्यासाठी संतविचारांचे अंजनच हवे आणि ते आपलेसे करताच सर्वत्र, सदा, सम असा आनंदच भरून राहिला आहे, या जगद्‌गुरु तुकाराम महाराजांच्या स्वानुभूतीपर्यंत आपल्यातल्या प्रत्येकाला सहज पोचता येईल. या संतांच्याच कृपेने तेथवर पोचून खर्‍या आनंदाचा असा अनुभव आपल्या सर्वांनाच सर्वदा येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आनंदाचे डोही । आनंद तरंग ।
आनंदचि अंग । आनंदाचे ॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ -
सार्थ ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा - श्री शंकरमहाराज खंदारकर
प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचा योगवासिष्ठ
कल्याणी
श्री. द. देशमुख लिखित ग्रंथांमधून त्यांचे विचार, शब्द त्यांच्या अनुमतीने.
www.vedantbhaskar.org

- ksha