फॉर ऑल दोज, हू लेफ्ट देअर स्मेल बिहाइंड!

हे गंधित वारे फिरणारे.. घन झरझर उत्कट झरणारे..

सलीलचं हे गाणं काल बर्‍याच दिवसांनी ऐकलं अन् कोरिएंथन क्लबमध्ये झालेली एक गचाळ, कंटाळवाणी पार्टी आठवली. तशी, वेगवेगळ्या पर्फ्यूम्सची आवड मलाही आहेच. पण त्या पार्टीत शेजारी, विचित्र पर्फ्यूम अंगभर मारून आलेले एक फिरंगी जोडपे बसले होते. तो वास इतका नाकात बसला होता, की नंतर त्या पार्टीत प्यायची, खायची इच्छाच राहिली नव्हती. नंतर बरेच दिवस तो वास विसरायचा प्रयत्न करीत होतो.

थोडा दचकलोच मी. छ्या! इतकं सुंदर गाणं अन् आपल्याला काय आठवतंय हे? कुठे त्या गाण्यातले गंधित वारे, कुठे हा पोट ढवळून टाकणारा विचित्र वास.

मग लक्षात आले - सलीलची ती सीडी त्याच दिवशी विकत घेतलेली अन् गाणं बेहद्द आवडलं म्हणून पुन्हा पुन्हा ऐकलं. पार्टीला जाताना सीडीदेखील सोबत घेतली अन् गाडीत ते गाणं पुन्हा पुन्हा वाजवलं. नंतर पिण्याखाण्याचा झालेला पचका थोडातरी विसरावा, म्हणून येताना परत तेच गाणं. कित्येक वेळा.

त्यानंतरही कित्येक वेळा ते गाणं ऐकलं. दरम्यान बरेच दिवसही निघून गेले. पण इतक्या दिवसांनंतर ते पुन्हा ऐकलं अन् आपसूकच ते सर्वांत पहिल्यांदा भावलं, तो दिवस, प्रसंग आठवून गेला.

***

कॉलेजला वगैरे असण्याच्या आसपासच्या काळात पहिल्या पावसाचा वास, वेलमोगर्‍याचा वास असे काही वास आले, की डोक्यात अनेक प्रसंगांची, आठवणींची टोपल्याच्या टोपल्या हारीने मंडईत मांडल्यागत गर्दी व्हायची. मग अस्वस्थ, हळवं वगैरे असं बरंच काय काय वाटायचं. मग वाटायचं, या वासांशी जोडलेल्या आठवणी म्हणजे डोक्याला त्रास. काही वर्षे असं चालल्यावर वाटलं, हे काही खरं नाही. प्रत्येक सुंदर वासागणिक आपण हे असं काय काय विस्कटत बसतो, हे चुकीचं. त्या गंधाचा स्वतंत्रपणे आस्वादही घेऊ शकत नाही, म्हणजे किती करंटे आपण!

पण हे सारं काही असंच टोकदार राहत नाही. व्यवहाराला रोज उठून तोंड द्यावं लागलं, की बोथट होतोच आपण. पहिल्या पावसाचा गंध अन् ओंजळभरून घेतलेल्या फुलांचा सुवास तितका अस्वस्थ करीत नाही मग. पहिल्या पावसासरशी मनात दुष्ट शंका डोकावून जाते - नवीन घर आहे.. कुठे गळणार तर नाही ना? दिवाळीच्या फराळाचा वास आसमंतात फिरू लागला, की यादी उभी राहते - या दिवाळीतल्या कमिटमेंट्सची. मग चिंता - कसे होईल? जमेल की नाही? अन् लाख. मग पुन्हा वाटते, छ्या! अशा शेकडो सुंदर सुगंधांचा अजूनही आपण स्वतंत्रपणे आस्वाद घेऊ शकत नाही. करंटेच राहिलो आपण.

हे असलं काहीसं मनात असतानाच 'गंध' पाहिला. 'गंध' या समान धाग्याव्यतिरिक्त एकमेकांशी काहीच संबंध नसलेल्या वेगवेगळ्या कथा. कोलाज म्हणा पाहिजे तर.

***

लग्नाची मुलगी.. वीणा. रीतसर दाखविण्याचे, कांदेपोह्यांचे सोपस्कार पार पडतात. पण कुठेतरी माशी शिंकते अन् लग्न ठरत नाही ते नाहीच. अशातच मिलिंद भेटतो. त्याचा साधेपणा, कमी बोलणं तिला आवडतं. तितकंच अगम्यही वाटतं. पण यापलीकडे एक गोष्ट आहे, ज्यामुळे ती अक्षरशः खेचली जाते त्याच्याकडे. तो सोबत घेऊन येणारा अन् सारखा सोबतच घेऊन फिरणारा एक विशिष्ट गंध! तो वास ओळखीचाही आहे; अन् नाहीही. ती अस्वस्थ होते, घुसमटते. ही घुसमट तिला एक दिवस त्याचा पाठलाग करायला लावते आणि ती पोहोचते अडगळीत थाटलेल्या एका उदबत्तीच्या कारखान्यात! पझल गेममधला शेवटचा तुकडा जोडून झाल्यावर आनंद व्हावा, पण तयार झालेलं चित्र अतिशय दु:ख देणारं असावं, अशी तिची अवस्था होते. आपले लग्न ठरावे म्हणून देवासमोर ज्या उदबत्त्यांची जुडीच आई लावते, ती हीच उदबत्ती की! त्याचबरोबर दिवसभर तो झोपाळलेल्या डोळ्यांनी का वावरतो हेही उत्तर तिला मिळते.

हे सारे त्रयस्थपणे पाहत असलेला मिलिंद तिला अचानक लग्नाचं विचारतो अन् ढगांची गर्दी सरसरसर करीत पांगावी आणि निरभ्र आकाशात सुंदर इंद्रधनुष्य पडावं, असं काहीसं तिला वाटतं. घरी येऊन देवासमोर मनोभावे उदबत्त्या लावत तिच्या लग्नासाठी साकडे घालणार्‍या आईला ती थुईथुई नाचणार्‍या शब्दांत सांगते, "आई, काय सांगू तुला! एका अतिशय 'धार्मिक' स्थळाकडून मला होकार आलाय!"

कथा अगदी साधी. कुणाला खरी वाटेल, तर कुणाला काल्पनिक. पण मला मात्र वाटून गेलं, या कथेतले तुकडे तुकडे आपल्याच आजूबाजूला कधीतरी, कुठेतरी आपण अनुभवले. त्या उदबत्तीचा वास प्रत्यक्ष न घेताही अनंत लहानमोठ्या प्रसंगांनी मनात गर्दी केली.

वाटलं, अरे, आपण बोथट झालो आहोत असं आपल्याला वाटत होतं. अन् आज, इथं तर प्रत्यक्ष कसला गंध वगैरे न येताच आपण अस्वस्थ झालो!

***

वडील कॅन्सरनं गेले, त्याच्या आदल्या दिवसाची गोष्ट. त्यांचं टाईम-प्लेस-पर्सन वगैरे भान हरपलेलं. त्यांचे कपडे बदलण्यासाठी त्यांना बसवण्याचा प्रयत्न करत होतो; पण त्यांना तोल सांभाळता येत नव्हता. शेवटी मी त्यांना कवेत घेतलं अन् भावाला सांगितलं, "तू मागून शर्ट काढ आणि नवीन घाल". तसं मिठीत घेतलं मात्र, अन् 'पोरांनो..' असा शब्द वेडावाकडा होत त्यांच्या ओठांतून घरंगळला. आम्ही चकित झालो अन सैरभैरही. कसंबसं स्वतःला आवरत आम्ही ते कपडे बदलले.

भाऊ रडत होता अन् मी सुन्न होऊन विचार करत होतो... किती दिवसांनी, किती वर्षांनी आपण दादांच्या इतक्या जवळ, मिठीत, त्यांचा तो विशिष्ट वास जाणवण्याइतपत जवळ गेलो! कधी... कधी आला होता बरं हा अस्साच वास याआधी?
मुका होऊन रात्रभर आठवत राहिलो, आठवलं नाहीच. दुसर्‍या दिवशी दादा गेले. मग त्यांना पुन्हा एकदा तसंच मिठीत घेतल्यावर ते आठवलं. कॉलेजला असताना केव्हातरी दरवाजाचा बेदम मार लागून मी जवळपास बेशुद्ध पडलो होतो. तेव्हा दादांनी घाबरून जाऊन जिवाच्या आकांताने मला पोटाशी धरलं होतं. बेशुद्ध व्हायच्या वाटेवर असताना जाणवलेला त्यांच्या अर्ध्याउघड्या अंगाचा हा वास! आणि त्यानंतर काल-आज!

मला लागलेलं मी कधीच विसरलो. त्यांनी मिठीत घेतल्यानंतरचा त्यांच्या अंगाचा तो विशिष्ट गंधही विसरलो, बरीच वर्षे त्यानंतर. दादा गेल्यावर मात्र तो अगदी कालच घेतल्यासारखा ताजा झालाय, तो आजवर.

***

दादांच्या प्रसंगानंतर अशा अनेक मृत्यूंचे निरनिराळे वास मनात घर करून राहिले आहेत खरं तर.

माझ्या एका काकाने आत्महत्या केली होती. कीटकनाशकाचा अख्खा डबाच प्याला तो. भयाण आवाजात ओरडू लागल्यानंतर जेव्हा सारे घरात गेले, तेव्हा प्रचंड ओकत जिवाच्या आकांताने हात पसरून मदत मागत होता. त्या औषधाचा तो भयानक वास घरात भरून राहिला होता. अन् तो इतका असह्य होता, की घरात गेल्यागेल्या माणसाला अक्षरशः चक्कर येत होती. नाकतोंड दाबून काहींनी त्याला घराबाहेर ओढला, पण वाचवण्याचे प्रयत्न सुरू करायच्या आतच काकाचा खेळ आटोपला.

त्यानंतर कित्येक दिवस तो असह्य वास जणू नाकातोंडात भरून राहिला होता.

आजीच्या वेळी तिच्या लुगड्याचा. त्या वासात ती घेत असलेल्या अनेक औषधांचे वास मिसळून गेले होते. त्यातून तयार झालेले ते निराळेच मिश्रण, हवेहवेसे.. नकोनकोसे..!

मरणाची ओळख झाली, ती अशा अनेक गंधांमधून. आजपर्यंत दुष्ट, भयावह, निराकार, गूढ असं वाटणारं मरण जेव्हा अशा निरनिराळ्या गंधांमधून विशिष्ट व्यक्तिमत्त्व धारण करून सामोरं आलं, तेव्हा ते थोडंसं ओळखीचं, आपलं वाटू लागलं. मग त्याबद्दल वाटणारी भीती थोडीशी कमीही झाली..!

***

पण मृत्यूला नेहमी वास असेलच, असे नाही. नाही का?

'गंध'मधला औषधांवर जगणारा, एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेला सारंग. प्रचंड औषधे घेतल्याने वास घेण्याची क्षमता संपलेला. काही वर्षांनी भेटायला आलेल्या त्याच्या बायकोला, रावीला, घरात अनेक भयानक वास येत राहतात. हे सारे आपल्याला येत नाहीत; अनेक दिवस घातलेल्या सॉक्सचा, मेलेल्या उंदराचा, अन्नाचा, पर्फ्यूमचा, गॅसचा.. कसला कसलाही वास येत नाही हे समजते तेव्हा सारंग कोसळतो. आजाराने मृत्यू येण्याआधीच सारंग स्वतःच त्याला सामोरा जातो. शांतपणे समीप आलेल्या त्या मरणाला त्या वेळी कुठलाही वास नसतो. खरेतर कुठलाही गंध नसलेला, हीच त्यावेळी त्या मृत्यूची आपल्यासाठी ओळख बनून राहते.

***

अनेक गंधांच्या साक्षीने आयुष्यभर आपण काय काय करत असतो! प्रत्येक प्रसंगांत, घटनेत ते असतात. काही घडताना ते असतात, तसंच काहीही नाही घडलं तरी ते असतातच. आपल्या जन्मापासून सोबतीचा करार करून आलेलं हे गंधमय जग शेवटपर्यंत साथसंगत सोडत नाही. मग आपली इच्छा असो अथवा नसो.

मागल्या महिन्यात मित्राला मुलगी झाली म्हणून बघायला भेटायला गेलो होतो. सारं घर कसं आनंदात! म्हातारी माणसं असलेल्या घराला नाही म्हटलं तरी शांततेची, सावकाशीची कळा येतेच. नवरा-बायको दोघे कामावर गेले, की मित्राचे आईवडील दोघे एकटेच. अशातच घरात ही खबर.
घरात शिरायच्या आधीच चैतन्याची चाहूल लागली. एक विशिष्ट वासच आला म्हणा ना. म्हातारा-म्हातारी थुईथुई उडत होते जणू, कारंज्यासारखे.
"मावशी, तुमचा फुलटाइम जॉब सुरू झाला की!" असं हसून म्हटलं.
तर ती म्हणाली, "हो रे बाबा. पण ते काहीच नाही बघ. हा आनंद न्याराच रे. शब्दांत नाही सांगता यायचा. बाळाला कितीही हुंगलं, तरी मन भरत नाही. नातीचा तो नवाकोरा, अर्धाकच्चा वाटणारा, कोवळा, थोडा मांसल वास.. अन् ही दुपटी बघ ढिगाने. बाळाचं हगलं-मुतलं सारं आहे यांत. तू हसशील, पण वाटतं, ही दुपटी धुवू नयेत. हा गंध घरात दरवळावा, म्हणून किती नवस केले, तेव्हा कुठे आलंय हे सारं. हे सारे वास घरात असतानाच मरण यावं अशी इच्छा आहे बघ. अभद्र वाटेल, पण हा नवागताचा, ईश्वरी अंश असलेला गंध घरात दरवळतो आहे, यापेक्षा आणखी मागणं काय असणार या वयात?"

म्हातारीची विचित्र अपेक्षा ऐकून मी क्षणभर थरारलोच. नंतर वाटले, ठीकच आहे. मरण येताना कोणकोणते औषधांचे अन् इस्पितळाचे तर्‍हेतर्‍हेचे वास सोबत करतील, ते एक देवच जाणे. एका जन्मातून, नवनिर्माणातून तयार झालेले हे गंधाचे अप्रूप मरताना सोबत राहिले, तर नशीबच म्हणायचे..!

***

जन्मावरून पुन्हा 'गंध'मधली जानकी आठवली. अजून 'पोटपाणी न पिकलेली'; आणि आता 'चार दिवस बाजूला बसलेली' जानकी. म्हणजे चार दिवस कशाला हातच नाही लावायचा, वेगळ्या खोलीत राहायचे. अन् त्याच वेळी घरात नणंद बाळंत होते. पावसाच्या आणि हिरव्याकंच गंधभरल्या वातावरणात हे बाळ जन्म घेते तशी जानकीची ऊठबस वाढते. घरात येणार्‍या निरनिराळ्या वासांतून हा नवा जन्म जणू अनुभवण्याचा ती प्रयत्न करते. खाटेखाली ठेवण्यासाठी सुईण निखारे घेऊन जाते, तेव्हा त्या कोळशाच्या धुराचा मोठा श्वास जानकी छाती भरून घेते.
हो. हा असा, खास या कारणासाठी तयार केलेल्या निखार्‍याचा धूर, त्याचा तो गंध.. घरात पुन्हा येतो, नाही येत; कुणी सांगावे?

***

श्रावणात अन् त्यानंतर, सर्वांची नवीन सीझनसाठी जाहिरातींची तयारी सुरू होते. त्यातलाच हा एक माझा क्लायंट. बर्‍यापैकी जुना, म्हणून मित्रासारखा. सुपरमार्केट, शिवाय त्यातच नाविन्यपूर्ण वस्तूंचे 'गिफ्ट शॉप' असा त्याचा धंदा. सगळी चर्चा संपल्यावर गप्पा मारताना "दिवाळी येऊ घातली, की तुला फार आनंद होत असेल नाही? मालामाल व्हायचे दिवस आले म्हणून?" असे खवचटपणे बोललो.

तेव्हा तो म्हणाला, "हं. बरोबरच आहे, मालामाल होताना कुणाला आनंद होणार नाही? पण तुला सांगू? दिवाळीच्या आधी काही दिवस, काही आठवड्यांपासून वातावरणात जो एक वास भरून राहतो, त्यामुळे एक चैतन्य येऊ घातल्याची जाणीव होते. असा वास तुला किंवा आणखी कुणाला येत असेल की नाही, मला माहिती नाही. मला असला काही वास येतो, हे खरे तर गेले कित्येक वर्षे मी कुणाला सांगितलेलंच नाही. कारण हसतात सारे. मला हा भारून टाकणारा सुगंध येतो; अन् मला कळतं.. उत्साहाने काम करण्याचे दिवस आले! तो सुगंध जणू स्फूर्ती देतो बघ मला. नुकताच पावसाळा संपलेला किंवा संपण्याच्या मार्गावर असल्याने सभोवार एक प्रसन्नता भरून राहिलेली असते. या प्रसन्नतेमुळे, हवेतल्या बदलामुळे येतो, की आणखी कशाने, ते मला सांगता नाही यायचं. दिवाळी जवळ येते तसे दिवाळीची आठवण करून देणारे अनेक वास यायला लागतात; पण ते नंतर. तो विशिष्ट सुगंधच सर्वांत आधी येतो आणि सणासुदीची नांदी वाजवतो. वर्षभर आसुसल्यागत मी या सुगंधाची वाट पाहत राहतो."

मी त्याच्याकडे एकटक बघत असतानाच तो भानावर आला. म्हणाला, "अरे, काय नेतो आहेस तू आज इथून? शिरस्ता मोडायचा नाही, सांगून ठेवतो!"
हा माणूस याआधी इतका संवेदनशील कधी वाटला नाही बुवा.. वगैरे विचारात असतानाच मी त्याला सांगितले, "दे की. युवर चॉइस. अँड टेल मी द प्राइस!"
"माय चॉइस? ओके. टेक धिस." असं म्हणून त्याने काउंटरावर 'इसाबेला'ची बाटली ठेवली.

इसाबेला! इसाबेला!!

किंचित थरथरत्या हाताने मी ती उचलली. कितीतरी दिवसांनी! केव्हा बरं? ती उघडून किंचित फवारली, आणि जोराच्या वार्‍यात भिरभिरणार्‍या पक्ष्याला आपलं झाड सापडून त्यावर त्याने चटकन बसावे, तसे झाले. व्हॅलेंटाइन डे! फर्स्ट व्हॅलेंटाइनला मिळालेलं गिफ्ट हे!

"बायकोलाच दे हां!" तो खोचकपणे म्हणाला. मी नकळत बोलून गेलो, "येस. फॉर हर ओनली! पण खरं तर फक्त तिलाच नाही. इट्स फॉर ऑल दोज.. हू लेफ्ट देअर स्मेल बिहाइंड..!"

मंतरल्यागत 'इसाबेला' हातात घेऊन तिथून बाहेर पडलो, तर फूटपाथाच्या कडेला आडदांडपणे थांबलेल्या एका भल्यामोठ्या ट्रकने घाणेरड्या धुराचा फवारा नाकातोंडात सोडला.

पण छे! दुसरा कुठला गंध नाकाला जाणवणार नव्हताच बहुतेक आज!!

- SAJIRA