पातक

नेहमी पाय घासत चालणारा त्याचा एक कलीग शेजारून गेला, अन् त्याच्या अस्वस्थपणात आणखीच भर पडली. याला एकदा कान पकडून असा पाय घासत चालत जाऊ नकोस, म्हणून खडसावून सांगावे असे त्याला खूपदा वाटे. पण असलं काही त्याच्या स्वभावातच नव्हतं. चूप बसून होईल ते बघावं, हा खाक्या. कुणाशी फारसा मिसळत नसे; पण मितभाषी असला, तरी गोड बोलण्यामुळे माणूसघाणेपणाचा आरोप सहसा कुणी करीत नसे.

आधीच हबच्या नवीन डिझाइनवरून डीजीएमशी वाद झाला होता. अर्थात वाद घालणारा डीजीएम! याचे काम फक्त अस्वस्थ होऊन ऐकत राहणे. स्वतःचे मुद्दे पटवून देता न आल्यामुळे मनाशीच चरफडणे, मग डिप्रेस वगैरे होणे.. इत्यादी इत्यादी.

तर, आधीच्या डिप्रेशनमध्ये या पास घासत चालणार्‍याची भर पडली. बाबा म्हणायचे, पाय, चप्पल, बूट घासत चालणारे कर्मदरिद्री असतात. घरात कुणी सहज म्हणूनही पाय घासला, तरी 'भिकेची लक्षणे..' वगैरे ओरडून 'च्या'कारान्त शिव्या ठरलेल्या. साला, याला नव्हता का कुणी सांगणारा? बापाने नसेल सांगितलं, पण आता बायकोने तरी सांगावे की नाही?

मरो. तो अन् त्याचं नशीब. काय एवढा त्याचा विचार करायचा? अन् नसत्या गोष्टींचा, बिनमहत्त्वाच्या विषयाचा एवढा विचार करणे आपण कधी बंद करणार?

छे. आता इथे बसणे नकोच. जरा चहा सिगरेट झाले, तरंच बरे वाटेल.. म्हणून तो बाहेर आला. उस्मानच्या टपरीवर येऊन नेहमीच्या आवडत्या जागेवर बसून पांढरेकरडे धुराचे ढग सोडल्यावर त्याला क्षणभर वाटलं - हा धूर निर्जीव नाही. याला जीव आहे, कदर आहे, भावना आहेत. कित्येकांना त्याने समजून घेतलं असेल. कित्येकांची सुखदु:खे ऐकून घेतली असतील, मग तरल-हलकं होऊन - हवेत विरून जात दुसर्‍यांनाही हलकं केलं असेल..

"अरे साब.. क्या सोच रहे? चाय ठंडी हो रही है.." उस्मानने त्याला जागं केलं. उस्मानला हा कुणातही फारसा न मिसळणारा, पण समोर आलेल्याशी हसून बोलणारा पोरगा आवडायचा. इतरांसारखं मोठमोठ्याने बोलत, ऐसपैस हसत, गप्पाविनोद करताना, रस्त्यावरून जाणार्‍या पोरींवर शेरे मारताना त्याला हा कधीच दिसला नाही. पण हे पोरगं एवढा कसला विचार करतं? - अगदी हरवून जाण्याइतका - याचा त्याला प्रश्न पडे.

उस्मानच्या बोलण्यावर तो ओशाळं हसला अन् सिगरेट टाकून चहा पिऊ लागला. साला, आपण भुक्कडच. विचार! विचार!! फक्त एवढेच करणार आपण. अन् सारे मनातच ठेवणार. मनात कितीही मळ असला, तरी बाहेरून पांढरेस्वच्छ दिसण्याचा प्रयत्न करणार. मनात काही वाकडा विचार आला, की बाबांच्या संस्कारांच्या नावाने मनातच घोकणार. एखाद्या मुलीबद्दल कसकसले विचार मनात आले, तर त्याचंही आपल्याला वाईट वाटणार.

कॉलेजात असताना थर्डच्या रश्मीच्या फिगरवर प्रचंड मरायचो. अशा मुली काही कमी नव्हत्या, पण ही चालायला लागली, की डोकं हलायचं! इतर पोरांना वाटायचं, 'पठ्ठ्या अडकला. इमोशनली वगैरे झालंय प्रकरण..' पण तसं नव्हतं.

बोलून, ओकून टाकलं असतं, तर कुणी सांगावं.. ही घुसमट संपलीही असती. पण ते चुकीचं - ही भावना मनातून जाईना. मनातले विचार आपल्यापासूनच दडविणारे आपण, तर तिला कसं सांगायचं - की बाई गं, मी तुझ्यावर प्रेम-बिम करत नाही. पण तुला बघितलं, की मी उभा पेटतो. तर काय करू, हे तूच सांग!

छे छे! ही तर खरं बोलण्याची गोष्ट झाली. आपली तर खोटं, म्हणजे मी तुझ्यावर मनापासून प्रेम वगैरे करतो असं खोटं बोलायची पण हिंमत नव्हती! पांढरपेशे संस्कार झालेत ना आपल्यावर, मग हे सारं चुकीचंच वाटणार.

त्याला आता त्याचा कॉलेजचा मित्र आठवला - गुरुदास. गुरूच होता तो. किती 'गिर्‍हाइकं' फिरविली, याचा हिशेब नाही. "लाईफ एंजॉय करा लेको. कसलं घेऊन बसलात बरोबर नि चूक. कोण ठरवणार ते? ठरेल तेव्हा ठरेल, पण तोपर्यंत जख्ख म्हातारे झालात, तर पश्चात्ताप घेऊन मेल्यामुळे भूतसुद्धा व्हाल, कुणी सांगावं?"

हा गुरुदास विकृत वाटायचा, पण खरंतर आपण त्याहून आहोत. मनात कितीही विकृती असो, जे चकचकीत, पांढरंस्वच्छ असणार - तेच जगाला दाखवणार. मुळात आपलं मन विकृत विचारही करू शकतं, हेच आपण स्वीकारत नाही. मग ते जगाला दाखवणं, त्यावर काहीतरी कृती करणं तर दूरच. तो गुरुदास ग्रेट होता. आपण भेकड, कृतिशून्य, विकृतातले विकृत!

या उस्मानच्या टपरीवर आपण रोज येतो. याची कारणं - मस्त चहा, मोकळं वातावरण, तो देत असलेला मान ही असली, तरी 'उस्मानची बायको' हेही एक कारण आहे - हे मान्य करायला आपल्याला जड जातं!

घरी शुभात्येची उघडी पाठ दिसल्यावर आपली अवस्था एस्सेलवर्ल्डच्या सर्व पाळण्यांत एकाच वेळी असल्यागत झाली होती अन् ती थर्ड इयरची रश्मी तेव्हा कडकडून आठवली होती - हे आठवलं की आपण प्रचंड अस्वस्थ होतो. मग हा विचार बळजबरीने आपण मनातून काढू पाहतो.

अन् हा उस्मान आपल्याला मानतो. कारण काय, तर आपण जे गोडगोड, छानछान असेल तेच बोलतो, स्मूथ फेस्ड, वेल ड्रेस्ड झाल्यावरच बाहेर पडतो म्हणून?

पातेलं अन् चहाच्या पळीच्या लढाईने तो भानावर आला. त्याने उस्मानकडे पाहिलं. पान खात तो पातेल्यात एकाग्रतेने पळी हलवीत होता.

पैसे देताना त्याला उस्मानकडे पाहायचा धीर झाला नाही.

***

खोलीत अडकलेल्या पाकोळीसारखी स्थिती झाली होती त्याची. रात्रीचे दोन वाजूनही डोळे टक्क उघडे होते अन् संध्याकाळी मनात घुसलेली शुभात्या आता धुडगूस घालीत होती.

शुभात्या. एक वल्लीच होती ती. त्याच्यापेक्षा फारतर दोन-चार वर्षांनी मोठी असेल. त्याची खूप दूरची आत्या होती. तिच्या घरादाराबद्दल त्याला फारसं ठाऊक नव्हतं. पण ती एक बिनधास्त बाई होती, त्याच्या घरातही तिच्याबद्दल फारसं चांगलं मत नव्हतं. अख्ख्या लहाणपण-तरुणपणाच्या आठवणींत ती फक्त एकदा तीन-चार दिवस राहण्यासाठी आली होती. तेव्हा ती केव्हा एकदाची जाते असं या सुसंस्कारित घराला झालं होतं. या तीन-चार दिवसांत तिच्या त्या निराळ्याच विश्वदर्शनाने हा मात्र पार कामातून गेला होता. ते दिव्य प्रदर्शन, ते तसले बोलणे वगैरे ती जाणूनबुजून करीत होती, की तिच्या बिनधास्त सवयींची सवय नसल्याने त्याला असे वाटत होते, ते त्याला उमजेना.

आता चांगलं व्यवस्थित कळतंय.

इतकं करून याच्या लक्षात येत नाही म्हटल्यावर, एकदा एकटा बघून ह्या बाईनं सरळ त्याला अंगावर ओढून घेतला होता. अंगात अचानक देवीचं वारं संचारल्यागत धपापत्या छातीचा, गरम श्वासांचा अन् सळसळत्या ओठांचा अक्षरशः वर्षाव केला होता!

आणि तो? अडकलेला श्वास नाकात अन् जीव मुठीत धरून, तिला ढकलून देऊन तो कसाबसा निसटला होता. मग दूर जाऊन घडाघडा श्लोकही म्हटले होते!

शुभात्या जाताना त्याच्याकडे पाहून हसली होती. आता त्याला वाटलं, ते नुसतं हसणं वा निरोप घेणं नव्हतं. त्यात विखार होता. एका वीस वर्षांच्या तरूणाला नामर्द ठरवणारा उपहास होता! ओ गॉड!!

त्याने जोरजोरात मान हलवली. डोक्यातून जणू शुभात्येला झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत. त्यावेळी चूक केली, असं आता का वाटू लागलंय? तेव्हा का नाही वाटलं?

आता सुधारलो, स्वतंत्र झालो, 'ग्लोबल' झालो, 'कॉर्पोरेट वर्ल्ड'मध्ये वावरतो म्हणून? घरचे संस्कार थिटे, बुरसट, जुनाट वाटू लागले काय?

बाबांची पीतांबर नेसलेली, भव्य कपाळावर पांढरे गंध लावलेली, स्पष्ट उच्चारांत मोठ्याने रामरक्षा अन् स्तोत्रे म्हणणारी मूर्ती त्याला आठवली. त्या धिप्पाड मूर्तीची कठोर-करडी नजर त्याला जाणवली अन् तो मनातच चरकला.

अस्वस्थ मनस्थिती असताना रामरक्षा म्हणण्याचा त्यांचा उपाय त्याला आठवला. रामरक्षा याद करण्याचा तो प्रयत्न करू लागला. केविलवाणेपणाने. पण काही केल्या सुरुवात आठवेना. मधलेच श्लोक आठवू लागले.

..एतां रामबलोऽपेतां रक्षा यः सुकृति पठेत् ।
स चिरायु: सुखि पुत्रि विजयि विनयि भवेत् ॥

बाबांनी सांगितलंय, लगेच अर्थही घोकायचा. नुसते गाढवासारखे एकापाठोपाठ श्लोक म्हणत सुटायचं नाही. या श्लोकाचा अर्थ म्हणजे,

..कसल्यातरी ओळखीच्या गंधाची जाणीव त्याला झाल्यागत वाटलं. त्याला खाडकन आठवलं - शुभात्येने अंगावर ओढलं, तेव्हा तिच्या मानेचा, गळ्याचा, अर्ध्याउघड्या छातीचा हा वास!! हा भास की..

देवा, एकंदरीत ही शुभात्या जायला तयार नाही तर! पोहता न येणार्‍याला पाण्यात ढकलल्यावर असहाय होऊन त्याने आधारासाठी इकडेतिकडे पाहावं, तसा तो रामरक्षा आठवू लागला. दोरीच्या गुंत्यातून तिचे टोक शोधून काढल्यागत त्याने कसाबसा एक श्लोक ओढून काढला.

...रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥

पुढचे श्लोक किती म्हटले, ते त्याचं त्यालाही कळलं नाही. पण एव्हाना पहाट झाल्याचं त्याला जाणवलं, तसा तो उठला. अन् जवळच असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिराकडे निघाला. मंदिरात जाऊन येऊन बाहेर दगडी बाकावर बसला. त्याला थोडं पवित्र झाल्यागत, त्याहीपेक्षा सुरक्षित झाल्यागत वाटू लागलं - देवाचा लाल टिळा कपाळावर असल्यामुळे असेल कदाचित! म्हणजे असं, की आता समोर येणारा माणूस आपल्या मनात डोकावून बघण्याच्या आधी आपल्या कपाळावरचा लाल टिळा बघेल, असं त्याला वाटलं असावं!!

शुभात्येची कोणतीही आठवण येऊ नये, असं त्याला वाटत होतं, पण मन मात्र त्याच रस्त्याला एखाद्या पोळागत उधळत होतं, शुभात्या नावाचा भयपटच त्याला दाखवीत होतं. तो फरपटला जात होता अन् गुंत्यातून दोरीचं टोक ओढून काढताच तिला पुन्हा पाचपंचवीस नवीन गाठी बसाव्यात तशी त्या बिचार्‍या रामरक्षेची गत होत होती!

***

"काय मित्रा, आज डब्बल देवदास मुडात दिसताय तुम्ही?" महादेवन्, त्याचा एक कलीग, नेहमीप्रमाणे ऑफिसात लेट एंट्री करत त्याच्या डोक्यावर टपली मारून पुढे निघून गेला.

महादेवन् कसला, महादैत्यच हा. कॉलेजातल्या त्या गुरुदासाचा गुरू शोभेल असा! आता या दोन ध्रुवांची कशी काय मैत्री झाली, ते एक देवच जाणे. मैत्री काय ठरवून थोडीच होते? कॉलेजात नाही का तो गुरुदास मित्र झाला?

अर्थात या मैत्रीला कारणही त्या महादेवनचाच पुढाकार. तो ऑपरेशन्सला, हा डिझाइनला. हे सारं जग चालू आहे, बिलंदर आहे अन् त्यात राहायचं, तर आपणही तसंच झालं पाहिजे या महादेवनच्या तत्त्वज्ञानाचं त्याला हसू यायचं की पटायचं की आणखी काही, हे काही याला अजून सांगता आलं नव्हतं. त्याच्याबरोबर फिरताना नित्यनवं जग उलगडलेलं दिसायचं. काहीही असलं, तरी तो मित्र असायला त्याची काही हरकत नव्हतीच!

"चल, आपल्याला जायचंय. राज्या, तू नि मी.." ऑफिस सुटल्यावर सवयीप्रमाणे डोक्यावर टपली मारत महादेवन् म्हणाला, तेव्हा तो भानावर आला. "अं? कुठे?" आपसूकच त्याच्या तोंडून निघून गेलं.

त्या महादैत्याने डोळा मारीत, हलकी शीळ वाजवीत मान वाकडी केली, तेव्हा तो काय समजायचे ते समजला. तो म्हणाला, "हो. येतो. पण याआधीही सांगितलंय, ते आताही आधीच सांगून ठेवतो. मी पिईन, खाईन, पण मध्ये मात्र येणार नाही. आग्रह केलास, तर आताच येत नाही..!"

महादेवन् मान डोलवत पुढे झाला. नुसता सोबत असला, तरी त्याला बरं वाटे. का, ते त्यालाही सांगता आलं नसतं.

महादेवनने गाडी सुरू केली अन् शहराबाहेर जाऊन एका मोठ्या हॉटेलासमोर उभी केली. ही त्याची आवडती अन् नेहमीची जागा. फक्त दरवेळी पार्टी, म्हणजे पोरगी वेगळी असायची!

तिघे गार्डनमध्ये जामानिमा मांडल्यावर बसले. ड्रिंक्स आली अन् सर्वांनी सुरू केलं, तसं महादेवन् डोळे मिचकावून म्हणाला, "महाराज, तुम्ही थोडी का होईना, दारू पिता हे आमचं नशीबच म्हणायला हवं, नाही का?" तिघेजण हसले अन् त्या मस्त हवेतल्या मोकळ्या गप्पा सुरू झाल्या.

दोन-तीन ड्रिंक्स झाली असतील, तेवढ्यात महादेवनचा फोन वाजला, तसा तो डोळा मिचकावत म्हणाला "चला, सिग्नल आलाय. मी कटलो. शॅल बी बॅक सून!"

"सून कशाला? आरामात ये रे. आम्ही संपवतो तुझी दारू!" तो खिदळून म्हणाला. महादेवनही दैत्यासारखं हसत, त्याच्या डोक्यावर टपली मारत जायला निघाला.

त्याने ग्लास तोंडाला लावला, तेवढ्यात थोडा ओळखीचा वाटेल असा आवाज त्याच्या कानांवर पडला. तो आवाज बंदही होत नव्हता. शेवटी न राहवून त्याने मागे वळून पाहिलं. दोन सेकंदभर तो पाहत राहिला अन् पृथ्वी फिरल्याचा आभास त्याला झाला.

महादेवनसोबतची ती मुलगी.. की बाई..

शुभात्या..?
आणि इथं??

***

ह्याला काल घेऊन जायची अवदसा कुठून आठवली होती, असं त्या महादेवनला झालं होतं. हा पठ्ठ्या एक नाही की दोन नाही. असला बधिर झाला होता, की बस्! ती बाई आवडल्यामुळे तिच्यावर जीव लावून आला की काय, असा एक विनोदी विचारही त्याच्या मनात येऊन गेला. असल्या घुम्या पोरांचं कुणी काय सांगावं म्हणून त्याने तो बोलूनही दाखविला, तर हा कुत्र्यागत वसकन अंगावरच आला.

महादेवनला त्याने मनातच ढिगाने शिव्या मोजल्या. काय सांगणार याला? की हरामखोरा, काल तू मला जिथं नेलं होतंस ना, तिथे मला शुभात्या दिसली.. असं?

मेलो तरी सांगणार नाही असं आपण कुणाला!

शिवाय, आपलाच अजून विश्वास बसत नाहीये, ती शुभात्याच होती यावर. दुसर्‍यांना काय सांगणार, कप्पाळ?

ती बाई शुभात्या नसण्याची कितपत शक्यता आहे, याचा तो पुन्हा विचार करू लागला. काल रात्रीपासून तो हेच करत होता.

आवाज तसाच असला, तरी दोन व्यक्तींचे आवाज थोडेफार सारखे असू शकतात की. बाकी, तसं असलं, तरी तिच्यासारखा आवाज नेमका तिथेच ऐकायला येणे हा भारीच योगायोग!

आवाजाचं असो. आता चेहेरा. तो पाहिला, तेव्हा अंतर किमान पन्नास फूट तरी असेलच. शिवाय भरपूर म्हणता येईल, असा उजेडही नव्हता. आपण पाहिलं ते फार तर दोनेक सेकंद. त्यातलाही निम्मा वेळ ती पाठमोरी होती अन् उरलेला वेळ तिची उजवी बाजू त्याच्याकडे होती. शुभात्या घरी आली होती, तेव्हा बाजूने अगदी तश्शी दिसत होती! पण हे खरं असलं, तरी समोरून पाहिल्यावर माणसे वेगळी दिसू शकतात की..

आता, नीट आठवल्यावर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, की गेले दोन दिवस ती शुभात्या मनात ठाण मांडून होती. अन् काल थोडीफार तिच्यासारखी दिसणारी बाई बघताच ती शुभात्याच असल्याचा समज आपण करून घेतला.. असं तर नसेल?

किंवा कुणी सांगावं, ती शुभात्येसारखी अजिबातच दिसत नसेल. पण तो आवाज ऐकल्यावर आपण मनात कुठेतरी शुभात्या हा शब्द शेकडो वेळा गिरवला. अशा मनस्थितीत ती बाईही शुभात्याच असल्याचा भास आपल्याला झाला..

रुमाल काढून त्याने खसाखसा घाम पुसला. ती शुभात्या नव्हती, हे ठरवताना थकला होता बिचारा..!

जवळ जाऊन चांगलं निरखून बघायला हवं होतं, असं आता त्याच्या त्रासलेल्या, शिणलेल्या मनाला वाटू लागलं. गर्दीच्या चौकात नवशिक्या ट्रॅफिक पोलिसाची होते, तशी त्याची गत झाली. असहायतेने तो पुन्हा रामरक्षा आठवण्याचा प्रयत्न करू लागला.

समजा ती शुभात्या असेल, तर असं आपल्याला एकदम समोर पाहून तिने काय केलं असतं? आपल्यासारखीच तिचीही अवस्था झाली असती? चेहरा लपवला असता?

की महादेवनच्या गळ्यात हात घातले, वागली तसेच वागली असती?

त्याच्या अंगावर शहारे आले. हा ताण सहन न होऊन त्याने डोळे मिटले.

***

... तिला शोधत तो वेड्यासारखा फिरत होता. निश्चयच केला होता त्याने - दिसली, की सरळ समोरच जाऊन उभं राहायचं..!

एकदम त्याला ती ओझरती दिसली. तिनं त्याच्याकडे क्षणार्ध बघितलं मात्र अन् तोंड फिरवून ती पळत सुटली. तोही जीव खाऊन तिच्यामागे पळत सुटला. गर्दी सोडून अगदी सुन्या रस्त्यावर पाठलाग करीत आला, तेव्हा चांगलाच थकला होता तो.

साला, कमाल आहे. एवढं पळते ही?!

ती हाताबाहेर जात असल्याचं पाहून तो जीव खाऊन खच्चून ओरडला, "थांब, थांब तिथंच. मला तुझा चेहरा बघायचा नाही. तुझ्या गळ्याचा, छातीचा वास घ्यायचा आहे मला! तिचा माझ्या ओळखीचा आहे. मला एकदाचं ठरवू दे - तू ती आहेस की नाही ते! थांब, थांब जरा.."

मग एका मोठ्या दगडाला ठेचकाळून तो चांगलाच घसरत गेला..

***

... स्वतःला खाली पडलेलं बघून आणि अंथरूणा-पांघरूणाची दशा पाहून, स्वप्नात पळत असताना प्रत्यक्षातही आपण भरपूर व्यायाम केला, हे त्याच्या लक्षात आलं खरं; पण त्याआधी आपला निथळणारा घाम अन् धडधडती छाती बघून आपण खरंच एवढं पळून खाली पडलो की काय, असंही क्षणभर त्याला वाटून गेलं!

घाम पुसत तो नीट सावरून बसला. थोडा विचार केल्यावर, त्याला गंमत वाटली. तो तिचा फक्त चेहरा बघण्याच्या गोष्टींचा विचार करत होता, तर या स्वप्नाने त्याला त्यासाठी एक निराळाच उपाय दिला होता.. चेहरा न बघता..!

तशाही स्थितीत त्याला हसू आलं. मग विचार करता करता तो गंभीर झाला. रामरक्षेच्या एकाही श्लोकाचा एकही शब्द त्याला आता आठवेना.

***

"'त्या' मुलीला फोन कर अन् बोलाव तिला त्याच ठिकाणी. आज जाऊ या!!" गेले दोन दिवस गप्प बसलेला हा म्हटला, तेव्हा महादेवनच काय, कुणालाही चक्कर आली असती. एकदा कन्फर्म करावं, म्हणून किंचाळून, गदागदा हलवून "काय?" विचारलं, तर त्याचं तेच थंड उत्तर!

दोन ड्रिंक्स झाल्यावर महादेवन् त्याला वरती एका आलिशान रूममध्ये घेऊन आला अन् मग दरवाजा ओढून निघून गेला.

तो वळला, तेव्हा ती आरशासमोर उभी होती. परवा अगदी अश्शीच आपल्याला ही दिसली होती बाजूने. त्याच्या चाहुलीने ती हसून सामोरी झाली, तेव्हा मेस्मेराइझ झाल्यागत तो जागीच थबकला.

शुभात्या! अगदी हुबेहूब शुभात्याच!!

***

महालक्ष्मीच्या मंदिरासमोरल्या दगडी बाकावर तो बसला होता. आता त्याला जर कुणी पाहिलं असतं, तर ओल्या अंगाने दर्शनासाठी आलेला भला मोठा मळवट भरलेला कुणी 'भगत' आहे असंच म्हटलं असतं!

जणू आताच शुद्धीवर आल्यागत मधल्या प्रसंगांची संगती लावण्याचा तो प्रयत्न करू लागला. मधले तुकडे जोडण्याचा प्रयत्न करू लागला.

ती शुभात्या नव्हती, हे कळलं. पण एक प्रश्न तसाच राहिला, ती शुभात्या असती तर तिनं काय केलं असतं?

तिने गळ्यात हात टाकल्यावर त्याच्या लक्षात आलं होतं, की अरे, शुभात्येची प्रतिक्रिया बघण्याची तयारी करून आलेल्या त्याने या प्रसंगाची मुळीच तयारी केली नव्हती!

नंतर मग हेही लक्षात आलं, की त्यावेळच्या त्या नशेत नंतर जे काय काय झालं, केलं ते सारं तिला शुभात्या समजूनच! माय गॉड.. कोणत्या ट्रान्समध्ये गेलो होतो आपण तेव्हा??

डोके हलवून हे जोखड उतरवण्याचा प्रयत्न तो करू लागला. मग ते तसे उतरणार नाही हे कळल्यावर केविलवाणा झाला अन् असहायपणे रामरक्षा आठवू लागला. नवल म्हणजे आता त्याला पहिलाच श्लोक आठवला..

... चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥

रामरक्षा नुसतीच म्हणायची नाही, तर तिचा अर्थही घोकायचा असं बाबांनी शिकवलेलं.

हे प्रभूरामचंद्रा, तुझ्या चरित्रातील एकेका शब्दात मी केलेल्या महापातकांचेसुद्धा क्षालन करण्याची क्षमता आहे..

आता पुढचा श्लोक..

..साला, एक राहिलंच..
तिचं नाव तर आपण विचारलंच नाही.

तिचं नावही शुभात्या असेल का??

- SAJIRA