माझे उडते अनुभव

दिवाळी अंकासाठी काय लिहावे हा विचार करताना माझा अमेरिकन सहकारी प्रवासाविषयी काहीतरी बोलला आणि आपणही प्रवासावर लिहावे असे वाटून गेले. आता रोजच्या धावपळीत कोठे लिहिण्यासारख्या घटना घडणार ? फार फार तर इथे लंडनमध्ये एखादी ट्यूब लाईन काहीही खोळंबा न होता दिवसभर नीट चालली किंवा स्नो झाला तरी गाड्या चालल्या, ही बातमी होऊ शकते, पण त्याशिवाय काही विशेष घडत नाही.

जाऊ दे, माझ्या जगप्रवासावरच लिहितो... नाही, नाही, तुम्हाला वाटतो तसा जगप्रवास नाहीये हा. माझ्या अमेरिकन सहकार्‍याच्या मते अमेरिका हेच जग. त्यामुळे तीच व्याख्या घेऊन मी माझ्या जगप्रवासाबद्दल लिहिणार आहे. सध्या माझे जग हे युरोपपुरते, किंबहुना फक्त इंग्लंड आणि जर्मनीपुरते सीमित आहे. मी जर्मनीत काम करतो आणि लंडनला राहतो. त्यामुळे अर्थातच दर आठवड्याला ये-जा करावी लागते. आपल्याकडे नाही का लोक मुंबई-पुणे प्रवास करून कामांवर जात? मीही तसाच जातो, फक्त आठवड्यात एकदाच जातो आणि एकदाच येतो. रोज जा-ये करायला लागलो, तर माझा सगळा वेळ फक्त प्रवास आणि झोप यांतच जाईल. असो, तर अशा या माझ्या साप्ताहिक आणि इतर प्रासंगिक प्रवासांत आलेले हे काही अनुभव, काही निरीक्षणे आणि बरीचशी टिप्पणी.

तसा माझा प्रवास फक्त दीड तासांचा, म्हणजे विमानतळावरचा वेळ सोडून. पण माझ्या स्वभावाप्रमाणे, मी शक्य तेवढ्या लवकर तेथे जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो. एकदा सकाळी ६ च्या विमानासाठी लवकर (म्हणजे ३ वाजता) गेलो होतो, तर कोणीतरी (हे कोणीतरी कोण हे सांगायची गरज आहे ?) "अजून थोडा लवकर गेला असतास, तर विमानतळदेखील झाडून झाला असता" असे म्हटल्याचे आठवते आहे. तर सांगायचे म्हणजे मी वेळेत जाऊन बसतो. यामुळे मला एकूणच वेगवेगळ्या प्रवाशांचे निरीक्षण करायला, ते कसे वागतात, बोलतात ते बघायला बराच वेळ मिळतो.

सर्वसाधारणपणे, विमानात चढणार्‍या माणसांचे ३ प्रकार करता येतील.
अ) नेहमी जाणारे लोक. हे सराईतपणे वावरतात. यांना आपली सीट कोठे असेल / आहे याची बरोबर माहिती असते आणि ते बरोबर तेथे जातात. कधीकधी कॅबिन पर्सरने सीट दाखवली, तर हे लोक दुर्लक्ष करतात आणि 'तू काय सांगतेस / सांगतोस?!' असा तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून पुढे जातात.
ब) दुसरा प्रकार म्हणजे अगदी कधीतरीच येणारे लोक. हे लोक विमानतळावर गेटपाशी बसल्यापासून दहा वेळा आपलं तिकिट बघतात. विमानात प्रवेश करताना आपला सीट नंबर परत परत बघतात आणि दिसेल त्या हवाई सुंदर/रीला सीट कोठे आहे ते विचारतात. अगदी जागेवर पोचेपर्यंत हा कार्यक्रम चालू असतो.
क) शेवटचा प्रकार म्हणजे वरील दोन्ही प्रकारांच्या मधले लोक. हे लोक तसे बर्‍यापैकी प्रवास केलेले असतात, पण मनात नेहमीच शंका असते. मग विमानात चढले, की कोणाला सीट विचारणार नाहीत, पण प्रत्येक सीटपाशी थांबून ओळीचा नंबर बघून पुढे जातील. आता एकदा ६ नंबर पाहिला की पुढे ७ असेल हे काय वेगळे सांगायला हवे ? पण नाही, पुन्हा ७ पाशी थांबतील, तो क्रमांक बघतील, आपलं तिकिट बघतील आणि मग ही (ओळ) ती नव्हेच असं ठरवून पुढे जातील. असेही नग असतात, की एका ओळीपाशी थांबतील, एका बाजूला बघतील, समजा त्यांना A,B,C अशा सीट्स दिसल्या, तर लगेच दुसर्‍या बाजूला बघतील, जणू यांना याच ओळीत बसायचे आहे. दुसर्‍या बाजूचे पण आकडे-अक्षरे वाचतील, आणि मग आपला काय संबंध असा विचार करून पुढे जातील. आपण aisle सीटमध्ये बसावे, आपल्या शेजारच्या दोन्ही सीट मोकळ्या असाव्यात आणि एखादी व्यक्ती वर सांगितल्यासारखे करत असावी. आपण अगदी "यांची इथली सीट आहे वाटतं" असा विचार करत उठायच्या तयारीत राहावे आणि ती व्यक्ती शांतपणे पुढे जावी.. अशी चिडचिड होते ना.. काय सांगू?

याउलट सराईत प्रवासी, लांबून आपल्या सीटकडे बघत येतात, की आपल्याला लगेच कळते आणि मग अशावेळी आपण दुर्लक्ष करायचे असते.

स्टुटगार्ट तसे बर्‍यापैकी छोटे गाव आहे. दर थोड्या दिवसांनी उगाच कसलातरी मेळावा भरवतात आणि विमान, हॉटेल, सगळ्यांचं आरक्षण मिळण्याची पंचाईत करून ठेवतात. कधी कधी मला थेट विमान मिळत नाही आणि मग विमाने बदलत जावे लागते. अशाच काही वेळी Swiss Air ने प्रवास करण्याचा योग आला. लंडनहून झुरिकला जाताना प्रवास ठीक झाला, पण पुढे झुरिकहून स्टुटगार्टला जाणारे विमान पाहिले आणि विमाने आकाशात उडताना जेवढी छोटी दिसतात, तितकीच छोटी प्रत्यक्षात पण असू किंवा दिसू शकतात हे जाणवले.

हे विमान इतके छोटे होते, की माझी बसण्याची जागा विमानाच्या पंखाखाली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं की पंख, पंख आणि फक्त पंखच दिसत होता. 'पंखाखाली घेणे' याचा असा शब्दश: अर्थही लावता येतो हे नव्याने कळले. माझी जागा जमिनीपासून एकूणच इतक्या कमी उंचीवर होती, की अजून थोडी खाली असती, तर धावपट्टीवर पाय टेकवून पळू शकलो असतो. या विमानात बसल्यापासून मजाच मजा चालली होती. सुरक्षिततेचे प्रात्यक्षिक चाललेले असताना सेफ्टी बेल्ट अडकला आणि निघेचना. कधी नव्हे ते त्या हवाई सुंदरीला खरेखुरे हसू फुटलेले पाहायला मिळाले. या विमानात जे सुरक्षितताविषयक सूचनांचे माहितीपत्रक होते, त्यात 'उड्डाणाच्या वेळी दोन सीटच्या मध्ये जमिनीवर झोपण्यास मनाई आहे' असे लिहिले / दाखवले होते.. अरे.. जिथे बसायला जागा नसते, तिथे झोपायला जागा होईल का ? पण सूचना देणे आणि देत राहणे हा या विमान कंपन्यांचा हक्क असतो.

त्यावरून आठवलं. एकदा मुंबईहून लंडनला येत होतो. विमान सुटण्याच्या आधी हवाई सुंदरीने नेहमीची घोषणा करायला सुरुवात केली. 'This is flight xyz, going to London ...' वगैरे. आणि तिने ठराविक २० वाक्यं सांगितली. त्यांत आपल्याला किती वेळ लागेल, साधारण किती वाजता पोचू, प्रवासात काय काय दिले जाईल इत्यादी माहिती इंग्लिशमधून सांगितली. नंतर हिंदीतून सांगण्याची वेळ आली तेव्हा "ये ... की उडान xyz है, हम लंडन जायेंगे" एवढं बोलून ती थांबली आणि थांबलीच. पुढे काहीच नाही. माझ्या बाजूला एक गोरा होता. त्याने एवढं संक्षिप्त बोलणं ऐकून 'तिने काय सांगितले?' असे विचारले. इंग्लिशमधून हे भलं मोठं आख्यान आणि हिंदीत दोनच वाक्यं ? मला एकदम 'Lost in translation'मधल्या अशाच एका प्रसंगाची आठवण झाली.

हा प्रवास पूर्ण होईपर्यंत घडलेली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे Swiss घड्याळ एक तास मागे होते. हे मी त्या सुंदरीला दाखवले, तेव्हा तिने 'हॅ.. त्यात काय.. नेहमीचेच आहे' अशा आविर्भावात तिकडे दुर्लक्ष केले.

यांच्याच विमानाने लंडनला जाताना दिसणार्‍या नकाशात लंडनच नव्हते. अगदी बर्मिंगहॅम होते, पण लंडन नव्हते. विचार केला... हे जर राणीला कळले, तर लंडनचा अनुल्लेख म्हणून ती हाय खाईल आणि त्या कंपनीचे लंडनला येणे बंद करतील.

असाच एकदा या छोट्या विमानात बसलो. विमान हळूहळू भरले. दुपारी ३.१५ ला सुटणारे विमान, ३.०५ ला सगळे जागेवर आलेले होते. ३.१५ झाले, ३.३० झाले, आम्ही आपले तिथेच. मग ३.४५ ला सुंदरीने सांगितले, की आपल्याकडे नोंदल्यापेक्षा जास्त सामान आले आहे, तेव्हा प्रत्येकाने आता आपापले सामान ओळखायचे आहे. सर्वजण पुढच्या दाराने खाली उतरले, आपापल्या बॅगा ओळखून मागच्या दाराने आत आले. माझ्या शेजारी एक जोडपे होते. त्यांची तर असे करत पकडापकडी खेळायची तयारी होती, इतकी त्यांना मजा वाटत होती. एकदाचा हा ओळखपरेड कार्यक्रम संपला आणि उरलेल्या बॅगा घेऊन विमानतळावरचे कर्मचारी परत गेले. माझ्या सहप्रवाशांचे ठीक होते, त्यांच्या बॅगा कळल्या, पण ज्या लोकांच्या बॅगा आमच्या विमानात आल्या होत्या, त्यांना त्या आता परत कशा मिळणार हा गहन प्रश्न मला पडला होता. मी तसे त्या सुंदरीला विचारण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला.

इकडे विमान सुटायची अजूनही चिन्हे नव्हती. इतक्यात आमच्या वैमानिकाने सांगितले, की आपण ठरलेल्या वेळी न गेल्याने आपला झुरिकमधला उतरण्याचा स्लॉट गेला. आणि झुरिकला हवा खराब आहे, त्यामुळे आपण अजून थोड्या वेळाने जाऊ. मला अगदी आपल्याकडे कोल्हापूरहून मुंबईला येणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस 'लेट' झाल्यावर कशी लोकलच्या मध्ये येऊ नये म्हणून वांगणी किंवा अंबरनाथला बाजूला काढून ठेवतात, त्याची आठवण झाली. भल्या सकाळी मुंबईला पोचणारी महालक्ष्मी दुपारी पोचली तरी चालेल. पहा, देश बदलला, माध्यम बदलले, पण प्रश्न सोडवायची पद्धत तीच. 'टाळाटाळ'.

एकदाचे आम्ही उडलो. (टाळ्या.. टाळ्या...). नेहमीच्या २५ मिनिटे प्रवासाऐवजी एक तास प्रवास करून झुरिकला पोचलो, तेव्हा लख्ख ऊन पडले होते. वैमानिकाने तर खराब हवेचे कारण दिले होते. कदाचित, तेथे नेहमी बर्फ पडत असल्याने ऊन पडले म्हणजे हवामान खराब आहे, असा वैमानिकाचा समज झालेला असू शकतो. असो.

या २५ मिनिटांच्या प्रवासावरून आठवले. या प्रवासात विमान जवळपास दहा हजार फूट उंचीवर गेले होते. वर पोचलो १०-१२ मिनिटांत, वर पोचल्या पोचल्या, उतरायची तयारी चालू.. अरेच्या.. मग एवढ्या वर जायचंच नाही ना... उगाच काय आपलं मोकळं आकाश आहे म्हणून वर...खाली ? त्यामुळे अक्षरश: वर पोचलो म्हणेपर्यंत उतरतो आहोत असे झाले होते.

तर असा मी तब्बल दीड तास उशिरा पोचलो तेव्हा तोपर्यंत तिथल्या 'खराब' हवामानाची पर्वा न करता माझे लंडनचे विमान निघून गेले होते. मी एकटा नव्हतो, आमच्या विमानातले बहुसंख्य प्रवासी अशाच स्थितीत होते. जाऊन Transfer desk च्या रांगेत उभे राहिलो. या डेस्कवर काम करण्यासाठी सगळीकडे पात्रतेचा एकच निकष असणार आणि तो म्हणजे स्थितप्रज्ञता ! आमच्या रांगेत साधारण ५० लोक होते आणि तरीही एकच खिडकी चालू होती. तिथली सुंदरी बहुधा येणार्‍या प्रत्येकाची जन्मकुंडली मांडून, ग्रहतार्‍यांची स्थिती पाहून, त्याला/तिला कोणत्या दिशेला जाणार्‍या विमानात पाठवता येईल याचा अंदाज बांधून निर्णय घेत होती. मी दोन-तीन वेळा अजून खिडक्या उघडण्याविषयी विनंती करून आलो, पण तीच ती स्थितप्रज्ञता वापरून मला सांगण्यात आले की 'आम्ही आम्हांला शक्य होईल तेवढे करत आहोत'... घ्या.. म्हणजे पुन्हा आमच्यावरच उपकार! माझा नंबर येईपर्यंत अजून एक लंडनचे विमान गेले होते. अशा रीतीने संध्याकाळी ६ वाजता लंडनला पोचणारा मी, ६ वाजता झुरिकला हताश होऊन, त्या कंपनीवर (खरे तर त्यांच्या विमानाच्या पंखांवर) भरवसा ठेवून पुढच्या विमानात जागा मिळण्याची आशा बाळगून उभा होतो.

त्या सुंदरीने निर्विकार चेहर्‍याने आणि कसलाही भाव नसलेल्या आवाजात मला सांगितले, की 'एकतर उद्या सकाळी जा, नाहीतर पुन्हा एकदा विमाने बदलून जा.' कोठे बदलायचे असेल विमान असे वाटते तुम्हांला? नाही, नाही, स्टुटगार्ट नाही, पण तेथून फक्त दोनशे कि.मी. अंतरावर असलेल्या म्युनिकमध्ये. तिकडे माझे रवानगी करण्याचे नक्की झाले. जाताना ती सुंदरी मला काय म्हणाली असेल ? "आशा करते, की तुम्हांला पुढची flight मिळेल आणि तुम्ही लंडनला (त्या flight च्या) वेळेवर पोचाल." मी अवाक्! अगं, इथे मी आधीच इतका उशिरा जाणार म्हणून माझी चिडचिड चालली आहे आणि तुला अजून फक्त 'आशा' आहे ?

पुढचा प्रवास, म्युनिकपर्यंत आणि पुढे लंडनपर्यंत तसे काही उल्लेखनीय न घडता पार पडला. आणि आम्ही रात्री १०.३० ला लंडनला पोचलो. हुश्श.. सुटलो एकदाचा असा नि:श्वास टाकला. पण मी लंडनच्या विमानतळावरच्या कर्मचार्‍यांना कमी लेखले होते. आमचे विमान एका आडनिड्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. पुढे काय? उतरायला जिना पाहिजे ना? आमचा वैमानिक जर्मन होता. आधीच त्याला इंग्लिश लोक अतिशय आवडणार आणि त्यात रात्री १०.३० वाजता तेथे कोणीच नव्हतं. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने चौकशी केली, तेव्हा त्याला कळले की आमचे विमान येणार आहे हेच म्हणे कोणाला माहीत नव्हते. मी पुन्हा एकदा अवाक्! रोज येणारे विमान, आज येणार हे माहीत नव्हते? हे म्हणजे मुंबईहून सुटणार्‍या गोरखपूर एक्स्प्रेस वगैरे गाड्या कशा सुटल्या तर सुटतात, तेव्हा 'गाडी आली, तर आली' असे लोक म्हणतात, त्यातला प्रकार झाला.

वैमानिकाने पाठपुरावा केल्यानंतर कळलं की कंट्रोल सेंटर त्या माणसाला शोधत होते, जो जिना घेऊन जाणारा माणूस कोठे आहे, हे कोणत्या माणसाला ठाऊक असेल, हे सांगू शकला असता. (Control centre was trying to contact the person who could tell them whom to contact to know who is supposed to bring the stairs वाक्याचं स्वैर भाषांतर...)

आता प्रवाशांची झोप उडून हास्यविनोदाला ऊत येऊ लागला होता. जवळपास खूप जिने मोकळे होते, ते आपणच कोणीतरी जाऊन आणावेत असाही प्रस्ताव मांडण्यात आला. असा पाऊण-एक तास काढल्यानंतर एक माणूस डोळे चोळत, जिना घेऊन आला आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट केला.

लंडन 'हिथ्रो' विमानतळावरील 'immigration' हा एक वेगळा निबंध लिहिता येईल असा एक महान प्रकार आहे. कधीही जा, युरोपियन युनियनच्या रांगेत शंभर जण उभे आणि दोन खिडक्या उघड्या. 'इतर'च्या रांगेत वीस जण, तेथे मात्र पाच खिडक्या चालू. मी एकदा माझा नंबर आल्यावर तेथल्या माणसाच्या हे नम्रपणे निदर्शनास आणून दिले, तेव्हा त्याने काय उत्तर द्यावे? काही अंदाज ? "Sir, we are understaffed". अरे, मी काय सांगतोय, तू कोणत्या प्रश्नाचं उत्तर देतोस?

अशा रीतीने ३ तासांत घरी पोचणारा मी फक्त १२ तासांनी घरी पोचलो.

अर्थात असे अनुभव नेहमी नेहमी येत नाहीत. असे अपवाद येतात, काही काळ लक्षात राहतात आणि स्मरणातून जातात. पण लगेचच पुढच्या आठवड्यात आलेला अनुभव लक्षात घेता, ते इतक्या सहजपणे जाणार नाहीत हे नक्की.

पुढच्याच आठवड्यात आमचे विमान लंडनहून वेळेवर निघाले. (एक दुर्मिळ अनुभव असं म्हणू शकता). सकाळी साधारण १०.४५ च्या आसपास ते स्टुटगार्टला पोचते, त्याप्रमाणे वैमानिकाने उतरायला सुरुवात झाल्याची सूचना द्यायची वाट बघत होतो. सूचना आली, पण वेगळीच. तिकडे उतरणार्‍या दुसर्‍या एका विमानाचा लँडिंग गिअर अडकला होता आणि ते विमान आकाशात घिरट्या घालत होते. त्यामुळे आम्हांलासुद्धा थोडा वेळ तसेच फिरावे लागणार हे नक्की होते. आकाशात घिरट्या घालणे, हे हिथ्रोला येणार्‍या कोणत्याही विमानाच्या नशिबात असतेच. लंडनच्या आकाशाची ओळख व्हावी, शक्य झाल्यास सगळ्यांना 'पटेल पॉइंट' आकाशातूनच बघता यावेत असाही उदात्त हेतू यामागे असू शकेल. एकदा आमचे विमान अशीच घिरटी घालत उलट्या दिशेने जाऊ लागले. राहिलेले अंतर २० मैलांवरून ५० मैल झाले, तेव्हा अजून थोडे पुढे गेलो तर स्टुटगार्टलाही जाऊन परत येता येईल का, अशी एक शंका आली होती. असो. तर आम्ही फेर्‍या मारायला सुरुवात केली. १५ मिनिटे झाल्यावर वैमानिकाने सांगितले, की ते विमान अजूनही फिरतेच आहे. तेव्हा आपण म्युनिकला जाऊन इंधन भरून घेऊ आणि मग स्टुटगार्टला येऊ. आमचा प्रवास त्या दिशेने चालू झाला. सगळ्यांच्या डोक्यात एकच विषय - 'त्या दुसर्‍या विमानाचं काय झालं?'

आम्ही म्युनिकला उतरलो. इंधन भरले. मग आमच्या वैमानिकाला कळले, की स्टुटगार्टचा विमानतळ चार तास बंद करण्यात आला आहे. कारण ते विमान अजूनही उतरले नव्हते.

इकडे आम्ही काय करायचे असा विचार करत बसलो होतो. शेवटी विमान कंपनीने एका बसची व्यवस्था केली आणि आम्ही म्युनिक ते स्टुटगार्ट अशा निसर्गरम्य प्रवासाला निघालो. तीन तासांचा प्रवास, अगदी छान झाला. मस्त धुके होते, पाऊस पडत होता आणि आजूबाजूला हिरवीगार शेते छान दिसत होती. प्रवास चालू झाला आणि एक मुलगी जर्मनमध्ये रडायला लागली (म्हणजे जर्मनमध्ये पुटपटत होती आणि रडत होती ... ती मात्र युनिव्हर्सल भाषा) तिची चौकशी केल्यानंतर कळले, की ती 'मायामी'हून आली होती, आधीचा पूर्ण दिवस तिने प्रवास केला होता आणि आता हा ताण तिला सहन न झाल्याने तिचा बांध फुटला होता.

तर मी अशी मजल दरमजल करत घरून निघाल्यापासून १० तासांनी ऑफिसमध्ये पोचलो. पोचल्यावर कळले, की त्या दुर्घटनाग्रस्त विमानात माझा एक सहकारी होता. तो पूर्ण दिवस शॉकमध्येच होता आणि त्याने मग दुसर्‍या दिवशी आम्हांला त्याचा चित्तथरारक अनुभव सांगितला. हा अनुभव त्याचा, शब्द माझे आहेत.

"आमचे विमान अगदी उतरण्याच्या बेतात होते. १० मिनिटांत लँडिंग असे वैमानिकाने सांगितले. पुढच्याच मिनिटाला वैमानिकाचा काळजीयुक्त स्वर आला, की विमानाचा मागचा लँडिंग गिअर चालत नाहीये आणि त्यामुळे उतरणे शक्य नाहीये. आमच्या फेर्‍या सुरू झाल्या. वैमानिक खूप प्रयत्न करत होता. एकदा मध्येच त्याने विमान एकदम नाक खाली करून प्रचंड वेगाने खाली आणले आणि धावपट्टीच्या अगदी जवळ आणून परत तशाच वेगाने वर नेले. अगदी शत्रूवर हल्ला करणारी विमाने जातात तसं! आमच्या सगळ्यांच्या पोटांत गोळे आले होते. सगळे जीव रोखून आता काय होणार याची वाट बघत बसले होते. अशीच अजून एकदा कसरत करून झाल्यावर आम्हांला कळले, की असे जाताना आम्हांला कंट्रोल टॉवरने सांगितले, की अजूनही प्रॉब्लेम तसाच आहे. शेवटी इमर्जन्सी लँडिंगची तयारी झाली. आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. विमान उतरेल का इथपासून आपल्याच विमानाला असं का व्हावं इथपर्यंत सगळे विचार करून झाले. वैमानिकाने कौशल्याने विमान खाली उतरवले आणि धावपट्टीवर घासत नेले. तेथे आधीच फोम पसरून ठेवण्यात आला होता. विमान थांबले आणि सगळेजण सुखरूप आहेत, हे बघून वैमानिकाला सगळ्यांनी टाळ्यांची मानवंदना दिली... तेवढ्यात मागून कोणीतरी ओरडले, की धूर येतो आहे. मग गडबडीने सगळे जण खाली उतरले आणि एकदाचे सुखरूप विमानतळाच्या बाहेर आले."

माझा सहकारी सांगत होता, की 'त्या' वेळी फक्त एकच विचार डोक्यात होता, की आता आपल्या कुटुंबाचं काय...? खरंच...किती अनिश्चित आहे हे जीवन. आत्ता आहे आणि कदाचित थोड्या वेळाने नसणार.. हा विचार किती भयानक आहे...

तर असाच एकदा मी... अरेच्च्या... माझी विमानात चढण्याची वेळ झाली. आता गेलो नाही, तर विमान चुकेल आणि मग अजून लिहायला अनुभव कसे मिळणार ? तेव्हा मला स्वत:लाच 'Happy journey! Timely takeoff and normal landing (with all working gears)' अशा शुभेच्छा देऊन थांबतो.

फिर मिलेंगे...

- milindaa