सुरेल महाराष्ट्र

१ मे १९६० रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या पन्नासाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या अंकात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विचारवंतांनी निरनिराळ्या क्षेत्रांतील महाराष्ट्राच्या वाटचालीचा परामर्श सखोल व समर्थपणे घेतला आहे. भारताबाहेर वास्तव्य करून असलेल्या मराठी मंडळींचं त्यांच्या मायबोलीच्या मायभूमीशी असलेलं अतूट नातं हे मराठी मनाच्या मर्मबंधातल्या 'नाटक' व 'संगीत' या दोन अमूल्य ठेव्यांमुळे सदोदित ताजंच राहिलं आहे. या सुवर्णवाढदिनानिमित्त 'संगीतातील महाराष्ट्राची कामगिरी' या गुणगाथेची आरती ओवाळून काही आशीर्वाद घेता आले तर ते भाग्यच!

Surel_Maharashtra.jpg



हजारो वर्षांचा हा वाहता संगीतप्रवाह महाराष्ट्रात कसा रमला आणि त्याने महाराष्ट्रातल्या कणखर दगडामातीतून हे संगीताच्या सोन्याचं अमाप पीक कसं उगवलं, याचा इतिहास विलक्षण रोमांचकारी आहे.

महाराष्ट्रात ओव्या, लोकगीते, रामायण-महाभारतातील प्रसंगवर्णनांची गाणी, भजने, कीर्तने, लळिते, भारुडे अशा निरनिराळ्या पिकांनी संस्कारमळे फुलवले. ओवी आणि आई हा तर विशेष दुवा! जात्याच्या घरघरीच्या खर्जाच्या पार्श्वसंगीतावर उठावदार वाटणारी सरल व सुरेल ओवी आईच्या मांडीच्या उशीतून कानात प्रवेश करून ह्रदयात केव्हा विरघळून जायची ते कळायचंच नाही. अशाच ओवीपरंपरेतून खानदेशच्या मातीतून फुललेलं तेज म्हणजे बहिणाबाई चौधरी. शाळेची पायरी न चढलेल्या, अक्षरओळखही नसलेल्या बहिणाबाईंना 'धरतीच्या आरशात विश्वरूप' पाहण्याची दृष्टी होती.

Vasudev.gif पायघोळ अंगरखा, मोरपिसांचा टोप, कपाळावर टिळा, हाती टाळ, गळ्यात माळ व पायी चाळ असलेले 'वासुदेव' हे नृत्य, नाट्य व संगीत यांचा एकपात्री प्रयोग घेऊन गावोगावी फिरायचे. रसाळ वाणी, विनोदाची खसखस, मधाळ गायन या माध्यमांतून समाजसुधारणेचे कठीण धडे सर्वसामान्य जनतेपर्यंत सोपेपणाने व रंजकपणे पोहोचवणारे सिद्ध कीर्तनकार हे तर आजकालच्या अभिनय व गायन कलाकारांचे पूर्वजच मानायला हरकत नाही. याव्यतिरिक्त लोककलांतून मनोरंजन आणि प्रबोधन करणार्‍या कित्येक ज्ञात व अज्ञात कलाकारांनी संस्कृतीचा पाया मजबूत केला. सण, उत्सव व जत्रांच्या प्रसंगीतर या मंडळींचं घाऊक दर्शन व्हायचं. निसर्गाशी सुसंवाद साधणार्‍या गीतांच्या व निरनिराळ्या संस्कारक्षम गाण्यांच्या शब्दांना साध्या सुबोध स्वररचनांच्या पालख्यांत घालून संस्कृतीचा प्रवास डौलात चालला होता.

प्रतिष्ठाननगरीच्या (पैठण) सातवाहनांपासून ते देवगिरीच्या सम्राट महादेवराय यादवापर्यंत महाराष्ट्राचं वैभव कलेकलेने वाढतच गेलं. समृद्धी आणि श्रीमंती शिगेला पोहोचली. उत्तरेकडील कलाकार, शास्त्री, संगीतकार मंडळी तिकडे चाललेल्या आक्रमणांच्या उत्पातापासून आपली कला व जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे देवगिरीच्या आश्रयाला आली. सिंघण या देवगिरीच्याच यादवकुलीन राजाच्या पदरी काश्मीरहून आलेल्या, भास्कराचार्यांचा नातू असलेल्या, शारंगदेवाने 'संगीत रत्नाकर' हा मौलिक ग्रंथ लिहिला.

या देवगिरीच्या वैभवाचा घमघमाट दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. समृद्धीची सुस्ती व श्रीमंतीने आलेली निष्क्रियता यांनी पोखरलेलं यादवांचं प्रचंड साम्राज्य खिलजीने अफवा, कट व फितुरी यांचा वापर करून संपूर्णपणे लुटून नेलं. त्याच लुटीत देवगिरीच्या दरबारातील एक दिव्य संगीतरत्न, 'गोपाल नायक' हेही खिलजीने दिल्लीला नेलं. खिलजीच्या दरबारात पर्शियन प्रणालीवर पोसलेल्या संगीतकार अमीर खुसरोला, गोपाल नायकाच्या रूपात तत्कालीन भारतीय संगीताचा कुंभच हाती आला. तत्कालीन भारतीय संगीत हे ईश्वरस्तुती, निसर्गवर्णन, राजस्तुती वगैरेंनी युक्त असे. त्यात भक्तिरसच प्रामुख्याने असे. जेत्यांच्या वेगळ्या धर्मामुळे व भाषेमुळे या मिश्रणाचा कल शृंगाररसाकडे झुकू लागला व गानप्रकार बदलून खयाल गायकी, गझला वगैरेंची सुरुवात झाली. अर्थात, या नवीन गायकीचा पूर्ण स्वीकार व्हायला पुढील कित्येक शतके जावी लागली.

खिलजीच्या पहिल्या स्वारीनंतर पुढील तीनशे वर्षं महाराष्ट्राचा हा सगळा नंदनवनासारखा समृद्ध प्रदेश आक्रमणांच्या रणधुमाळीत भरडून निघाला. अत्याचार, जाळपोळ, निर्घृण हत्यांच्या वादळांत संस्कृतीचा दिवा मंदावला. स्वर निस्तेज झाले. उरल्या त्या भयानक अंधारातून उमटणार्‍या किंकाळ्या आणि दबलेले हुंदके!

या अंधःकारातून संतवाणीने लावलेल्या भक्तीच्या ज्योतींनी शक्तीची प्रखर मशाल पेटवून आशेचा उजेड पाडला. महाराष्ट्राच्या सुदैवाने संतांची मोठी माळ या प्रदेशाला लाभली आहे. अभंग, भजनं, कीर्तनं, दिंड्या, आरत्या अजूनही महाराष्ट्रातील भक्तिमार्ग प्रज्वलित करीत आहेत.

शक्तीच्या या फुललेल्या मशाली वीरत्वाच्या तेजाने तळपत ठेवण्याकरिता पोवाड्यांच्या स्फूर्तीगीतांचं तेल वापरलं जावू लागलं. वीरपुरुषांच्या तेज:पुंज कर्तृत्वांच्या कथा स्फुरण येईल, अशा काव्यपंक्तींत गुंफून तुणतुणं व डफाच्या जोडीनं पोवाडे गर्जू लागले. या वीररसाच्या मागोमाग आला शृंगाररस. पेशवाईच्या समृद्धीबरोबर विलास आला. सरदार व शिपाई मंडळींच्या मनोरंजनार्थ शृंगारिक लावणी आली. शृंगाररसाने थबथबलेली पदे, ठसक्यात आवाहन असलेलं नृत्य व ढोलकीच्या ठेक्याचा जोश या तिहेरी मार्‍यात हरवलेला शिपायाचा होश त्याला काय करायला लावेल हे सांगणं कठीण.

पेशवाई उताराला लागली. व्यापाराकरिता आलेले इंग्रज घरी परत जायचं विसरले. त्यांनी व्यापाराच्या तराजूची दांडी सोडून सत्तेचा दंडा हाती घेतला. या इंग्रजी अंमलात भारतीय संगीताची वाढ खुंटली. रागदारी संगीतातील निरनिराळ्या घराण्यांतील उत्तरेकडील नामवंत कलाकार पोटापाण्याच्या सोयीकरिता मराठा सरदारांच्या आश्रयास आले. बडोदा संस्थानात आग्रा घराण्याचे फैयाझ खान व किराणा घराण्याचे अब्दुल करीम खान (जे पुढे मिरजेला गेले) दरबारी गायक होते. कोल्हापूरला शाहू महाराजांकडे जयपूर घराण्याचे अल्लादियाखाँ होते. ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर मिरजेला आले. या सर्वांमुळे महाराष्ट्राचे आणि हिंदुस्तानी संगीताचे संबंध घनिष्ट झाले.

महाराष्ट्राचे आणि कर्नाटक संगीताचे लागेबांधेही जुनेच - देवगिरी दरबारात दक्षिणी विद्वान संगीतकार बरेच होते. तसच तंजावुरात जवळजवळ १७३ वर्षे राज्य केलेल्या भोसले कुळातील तुळजाजीराजांनी १७६३ - १७६८ या कालावधीत 'संगीत सारामृत' हा ग्रंथ लिहिला. व्यंकटमखींनी वर्णिलेल्या ७२ थाटांची नोंद घेऊन त्यातील २१ थाटांद्वारे ११० तद्जन्य रागांची माहिती त्यात वर्णिली आहे. याच भोसले कुळातील तुळोजीराजांनी कर्नाटक संगीतातील तेज:पुंज संगीतत्रयीपैकी पं. शामाशास्त्रींना आश्रय दिला होता. प्रसिद्ध संगीतसंत त्यागराजांनाही त्यांनी पाचारले होते; पण 'रामरसात' पूर्ण रमून गेलेल्या त्या थोर संगीतकाराला अशा लौकिक गोष्टींची गरज नव्हती. पुढे सर्फोजीराजांच्या 'सरस्वती महाल' पुस्तकालयात संगीतातील दुर्मिळ पुस्तकांची जपणूक झाली. बरेच कर्नाटकी राग मराठी नाट्यसंगीताच्या सुंदर चालींत नटून बसले आहेत.

पूर्वी संगीत कलाकार हे राजाश्रयाने आपली कला राखून असायचे. मुघलांच्या काळात बर्‍याच कलाकारांनी राजाचाच धर्म स्वीकारला. त्यामुळे संगीतकला बर्‍याच अंशी मुसलमान कलाकारांकडेच राहिली. पंडित भास्करबुवा बखले व पंडित रामकृष्णबुवा वझे यांनी मात्र भगीरथप्रयत्न करून ही संगीताची उत्तरगंगा दक्षिणाभिमुख केली. या दोघांनी हिंदुस्तानी व दाक्षिणात्य रागांच्या खांबांवर लावणी, साक्या, दिंड्या, ठुमर्‍या, दादरे इत्यादी लोकसंगीताची नक्षी कोरून नाट्यसंगीताचे महाल सजवले. नारायणराव राजहंस (बालगंधर्व), दीनानाथ मंगेशकर व केशवराव भोसले यांच्या त्रिगंधर्व मुखांतून निरनिराळ्या संगीत प्रकारांनी सुगंधित झालेला नाट्यसंगीताचा प्रवाह जेव्हा सर्व महाराष्ट्रावर कोसळू लागला, तेव्हा मराठी जनमनाचा कण न् कण त्यात न्हाऊन निघाला. पंडित गोविंदराव टेंबे व पुढे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं या क्षेत्रातलं कार्य प्रचंड आहे.

Vishnu_Digambar_Paluskar.jpgBhatkhande_0.jpg संगीतात भारतव्यापी भरीव कामगिरी करणारे दोन विष्णुद्वय म्हणजे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णु नारायण भातखंडे. गुरुवर्य विष्णु दिगंबर पलुस्करांनी निरनिराळ्या ठिकाणी संगीत जलसे करून व आपल्या प्रचंड शिष्यशाखेच्या साह्याने भारतभर शास्त्रोक्त पद्धतीने संगीत शिकविणार्‍या शाळा स्थापल्या. प्रसिद्ध गायक डी. व्ही. पलुस्कर हे त्यांचेच सुपुत्र. पं. विष्णु नारायण भातखंड्यांनी संपूर्ण भारतातील निरनिराळ्या संस्थानांच्या ग्रंथालयांमध्ये असणारे जुने ग्रंथ अभ्यासून, उत्तर व दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञांना भेटून व चर्चा करून शास्त्रोक्त संगीताचं संकलन केलं. या दोघांच्या प्रयत्नांनी सुशिक्षित समाजात संगीताची प्रतिष्ठा वाढली.

गोदावरी नदीचं व भारतीय सिनेमासृष्टीचं उगमस्थान एकच. त्र्यंबकेश्वरास जन्मलेल्या दादासाहेब फाळक्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूकपट काढून १९१३ मध्ये भारतीय चित्रपटांची सुरुवात केली. पुढे चित्रपटसृष्टीने आपला संसार थाटला मुंबईत. हे तेजस्वी माध्यम नुसते नाट्यप्रकाराला निस्तेज करून थांबले नाही, तर सूर्याला गिळायला निघालेल्या हनुमानाप्रमाणे सर्वव्यापी व्हायला निघाले. सुरुवातीच्या मराठी बांध्यावर इतर प्रांतांचे दागिने चढायला लागले. सचिनदांनी बंगाली मिठाई आणली. ओ. पी. नय्यरांनी पंजाबी धमाका उडवला. मदनमोहनजींनी उत्तरेकडून आणली नाजूक नक्षी व नजाकत. मदनमोहनजींनी निरनिराळ्या सुंदर शब्दरचना लताजींच्या स्वर्गीय स्वरांत भिजवून, त्याला विविध रागांचे सुगंध देऊन घडवलेल्या उत्कट स्वररचना अजूनही तेवढ्याच दिमाखात मिरवत आहेत.

रामचंद्र चितळकरांनी (सी. रामचंद्र) मराठी, पोर्तुगीज व त्या काळातल्या 'रॉक' संगीतांची सांगड घातली. सलीलदांनी मोझार्ट आणला. या सगळ्या रंगपंचमीत निरनिराळ्या प्रादेशिक संगीतांनीही आपले रंग ओतले. अशा रसायनातून निघालेलं हे जुनं चित्रपटसंगीत (हिंदी), सर्व प्रांतीय व भाषिक कुंपणे ओलांडून संपूर्ण भारताच्या गळ्यात जाऊन बसले. अनेक नामवंत कलाकारांनी आपले आवाज चित्रपटसृष्टीला देऊन या संगीतात सूरबहार आणली. प्रत्यक्ष संगीत-देवतेनेच भारतात पदार्पण केले, ते लताजींच्याच अवतारात. पं. दीनानाथ मंगेशकर या तेजस्वी कलाकाराच्या या कन्येने तर संगीताचा स्वर्गच धरतीवर आणला आहे.

स्वतंत्र भारतात आकाशवाणी जागी झाली. रेडिओमुळे प्रांतीय व शास्त्रीय संगीताचा घराघरांतून शिरकाव झाला. आपल्याला जे जे संगीत झेपेल, रूचेल, ते ते संगीत जवळ करायची सोय झाली.

sudhir_gadima.jpg महाराष्ट्रात भक्तिगीते, भावगीते, मराठी चित्रपटगीते, लोकगीते व रागदारी यांचे गुंजन घरोघरी सुरू झाले. १९५६ च्या सुमारास सिद्ध कवी ग. दि. माडगूळकरांच्या प्रतिभावान लेखणीतून उतरलेली रामायणातील प्रसंगांची गीतं व बाबूजींसारख्या (श्री. सुधीर फडके) सुगम संगीतातील अधिकारी संगीतकाराने लावलेल्या व गायलेल्या सुंदर चाली यांचा सुंदर मिलाप म्हणजे गीतरामायण. दर आठवड्याला एक गीत अशा डौलात ५६ आठवडे हा सोहळा आकाशवाणीवर चालू होता. नंतर त्याची कितीतरी पारायणे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही होत होती. शनिवारी सर्व देशभर प्रक्षेपित होणार्‍या 'नॅशनल प्रोग्राम'मधून 'रागदारी' मंडळीही घरबसल्या ऐकायला मिळू लागली. महाराष्ट्राला संतांसारखीच लाभलेली प्रतिभावान कवींची माळ, मंगेशकर मंडळींनी उघडलेली सुवर्णसुरांची खाण व त्या काव्यसुरांची गुंफण करणारे सिद्ध संगीतकार या सुवर्णयोगामुळे सुगम संगीताची पंढरी फुलून आली. श्री. सुधीर फडके, श्री. यशवंत देव, श्री. श्रीनिवास खळे, पं. ह्रदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि आणखी अनेक प्रतिभावान संगीतकारांनी लावलेल्या जीवघेण्या चालींनी सजवलेल्या, कवी ग. दि. माडगूळकर, मंगेश पाडगांवकर, शांताबाई शेळके, आरती प्रभू, सुरेश भट अशा कवींच्या मराठी मनांतील भावतरंगांना खेळविणार्‍या कविता कितीतरी गोड गळ्यांनी गायल्या आहेत.

दूरदर्शन व You-Tube यांनीतर सर्वच संगीत-जगात क्रांती केली आहे. 'सा रे ग म प' पाहताना ज्या सभाधीटपणे व आत्मविश्वासाने हे चिमुकले गंधर्व कठीण चालींचा तोल सांभाळून, बारीक नक्षीला धक्का न लावू देता सुंदर गाणी 'पेश' करतात, ते पाहून शतकानुशतकांचा महाराष्ट्रावर झालेला संगीतसंस्कार किती जोमाने प्रगट झाला याचा आनंद होतो.

You-Tube वर तर कित्येक वर्षे गुप्त असलेले भूत, वर्तमान व भविष्य काळातील कलाकार काँप्युटरच्या कीबोर्डाच्या पोटावर बोटांनी गुदगुल्या करताच पडद्यावर सेवेस हजर होतात. सध्या सर्व जगाचेच रंग एकत्र होत आहेत. बाराही स्वर, वेगवेगळ्या भाषांच्या व ढंगांच्या पोशाखांत, निरनिराळ्या तालांच्या इशार्‍यांवर जगभर नाचत आहेत. संस्कृतीच्या राज्यात संगीत व अभिनय हे दोन दूत शब्दांना सुंदर नटवून, त्यांचे रेषा-रंग गहिरे करून विविध भावरंगांच्या पंखांवर बसवून निरनिराळ्या भावार्थांना, मनाच्या खोल ठेव्यात आंथरून ठेवलेल्या आठवणींच्या मोरपिसांच्या गालिच्यावर हळुवारपणे घेऊन जातात. जेव्हा हे शब्द मराठी असतात, तेव्हा मात्र या आठवणींच्या मोरपिसांचा उडता गालिचा घेऊन जातो मायबोलीच्या मायभूमीकडे.

- DrMohan.Deshpande

(गदिमा व बाबूजींचे प्रकाशचित्र गदिमा.कॉमवरून साभार)

(पोवाडा शाहीर व गायक : शाहीर पिलाजीराव सरनाईक)