मांजरपण

"अहो सविताबाई, ऐकलं का? वरच्या मजल्यावरच्या अलकाताई मुलीच्या बाळंतपणाला अमेरिकेत निघाल्यात म्हणे!"
असे संवाद पुण्यामुंबईच का, अगदी कोल्हापुरातल्या सोसायट्यातही रोज ऐकू येतात असं म्हणतात. अमेरिकेत जन्मलेल्या मुलींचे आईबाप अशा बाळंतवार्‍या करताना फार ऐकू येत नाही. माझी एक मैत्रीण एकदा महिनाभर रजा घेऊन कॅलिफोर्नियातून कोलोराडोला भर थंडीत बर्फ तुडवत गेली होती मुलीच्या बाळंतपणाला, तर पंधरा दिवसात परतली. मुलगी "पेरेंटींग" वगैरे मासिकं वाचून बाळंतपणात स्वयंभू झाली आणि आईला म्हणाली, "मॉम, आय कॅन मॅनेज नाऊ!"

मी तर तेव्हाच ठरवून टाकलं की आपण मुळीच आपल्या मुलींच्या बाळंतपणाला जायचं नाही! शिवाय आमच्या मुलींनी लग्नाचं मनावर घेतलं तर मग बघू बाळंतपणाचं असा विचार केल्यानं सध्यातरी हा 'मुळीच जायचं नाही' निर्धार करायला आणि सांगायला काही धोका नाही अशी स्वत:ची समजून करून मी अगदी निर्धास्त होते. त्यामुळे फोनवर बोलता बोलता थोरल्या कन्यारत्नानं आपण तीन आठवडे सुट्टीवर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा मी काहीशी बेसावधच होते. "अगं, एवढे दिवस तुझी मांजरं त्या मांजरपोळात का ठेवणार आहेस?" मी मठ्ठ प्रश्न विचारला आणि आमच्या चलाख मुलीनं मला मांजरानं उंदीर पकडावा तसं पकडलं! झाऽऽलं. त्यानंतर तिनं मला शाब्दिक खेळ्या आणि भावनिक चपळाया (इंग्रजीत आम्ही त्याला इमोशन ब्लॅकमेलिंग म्हणतो) करून घायाळ करून टाकलं.

मांजरं मांजरपोळात (म्हणजे पेट हॉटेलमध्ये) ठेवल्यानं त्यांचं मानसिक संतुलन कसं बिघडतं यावर माझं भलं मोठं बौध्दिक घेण्यात आलं. "मॉम, यू डोन्ट अंडरस्टॅंड" असं धृपद दर पाच वाक्यांनंतर टाकल्यानं माझं मानसिक संतुलन पार बिघडून आपण शून्य डिग्रीखालचे मठ्ठ आहोत असं मला वाटायला लागलं. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन नवर्‍यानं संगणकावर टिचक्या मारून विमानाची दोन तिकिटं काढूनदेखील टाकली. (म्हणजे बापलेकींचं आधीच संभाषण झालं होतं तर! अस्सं!) वर त्यानं $१५ x २० = $३०० हे गणित करून कन्येचे तीनशे डॉलर्स वाचतात आणि "तुझं तिकिट फक्त दोनशे पन्नास डॉलर्सला म्हणजे पन्नास कसे वाचतात" हे भास्कराचार्यांना बुचकळ्यात टाकणारं तत्वज्ञान मला ऐकवलं! कोणाचे का होईना पैसे वाचतात असं कळलं की मला नेहेमीच बरं वाटतं हे नवर्‍याला बरोब्बर माहिती!

क्षणभर तसा आनंद झालादेखील, पण दुसर्‍याच क्षणी मला प्रश्न पडला की "मग नवर्‍याच्या तिकिटाचं काय?"
"अगं, असं कसं तुला कळत नाही? तनिष्का तिथून फक्त वीस मैलावर आहे. ती नाही का भेटणार? मुलीला भेटण्याचा आनंद मोठा की तुझे दीडदोनशे डॉलर्स महत्वाचे!"
नवर्‍याने पुन्हा एकदा तो "यू डोन्ट अंडरस्टॅंऽऽड" चा टोला हाणलाच शिताफीने!

तनिष्कानं म्हणजे धाकटीनं तेवढ्यात फोन करून (हिला कस कळलं - हा प्रश्न आलाच मनात) "मॉम, आय एम सोss एक्सायटेड दॅट यू आर कमिंग" म्हणत आनंद व्यक्त केल्यावर माझं दीड-दोनशे डॉलर्स गेल्याचं दु:ख विरघळून गेलं आणि बिनपगारी रजा घेतल्यामुळे गेलेल्या पगारांचंही... थोडक्यात मुलगी गावाला निघाली आणि आम्ही मांजरपणाला! - अमेरिकेत रहातो म्हणून बरं. पुण्यात असतो, तर आमची शेजारीण पलीकडल्या शेजारणीच्या कानात कुजबुजली असती, "अहो ऐकलं का ते मुलीकडं मांजरपणाला निघालेत म्हणे!"

मी आपली मनातल्या मनात कुजबुजले, "बरं झालं बाळंतपण नाही!" नाहीतर पेरेंटींगचं पुस्तक वाचून हिनं मला "मॉम यू डोन्ट अंडरस्टॅंऽऽड हाऊ टू टेक केअर ऑफ बेबी" म्हणून माझी बोळवण केली असती. शिवाय ते 'मांजरपण' तिच्यासमोर करायची वेळ येणार नव्हती.

maa.njarapaN१

मांजरांचं मला एवढ वावडं नव्हतं. लहानपणी पुण्यात घरातले उंदीर कमी करण्यासाठी एक मांजरीण पाळली होती. ती आणि तिच्या पिलावळीच्या दोन तीन पिढ्या घरात आणि वाड्यात सुखासीनपणे नांदत होत्या.

"अमेरिकेत उंदीर नसल्यामुळे मांजरं पाळण्याची आवश्यकता नाही" हे मी ठासून सांगत आले आहे. मांजरं गराजमध्ये चोरून पाळण्यामुळे झालेले मुलींचे आणि माझे दोन तीन समर प्रसंग सोडले तर मुली तशा समजूतदारपणे वागल्या होत्या. विद्यापीठांच्या आवारात आणि नंतर आपल्या नोकरीच्या गावी आपल्या घरात नांदायला गेल्यावर त्यांनी प्रत्येकी दोन मांजरे पाळून आपली मांजरांची हौस भागवून घेतली आणि मीही दरवेळी न चुकता मांजरचौकशी करून माझं मांजरप्रेम दुरून का होईना भरभरून व्यक्त करत असते! अगदी मांजरांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना भेटकार्ड सुध्दा पाठवतो आम्ही! आमच्या वाढदिवसांनाही मांजरांच्या पावलांचे ठसे मारलेली कार्ड येत असतात.

विमानतळावरून आम्ही कनिष्काकडे पोहोचलो. कनिष्कानं दार उघडलं तेव्हा दोन अक्राळविक्राळ मांजरं (उंची सुमारे वाघाएवढी आणि वजन तीनचारशे पौंड असावं) समोर दिसली. "अगं, तुझे मुमुक्षू आणि सावळी कुठे गेले? कित्ती गोड पिल्लं होती मागच्या वेळी पाहिली तेव्हा!" हे नवर्‍यानं म्हटलं म्हणून बरं! मी म्हटलं असतं तर ते वाघाचे मावसामावशी माझ्यावर चालच करून आले असते!

"डॅडी, यू आर सच अ क्यूऽऽट जोकर! दीज आर मॅक्स अँड झोई! दे आर ग्रोन अप बाय वन इयर नाऊ! - मॅक्स, से हाऽऽय टू ग्रॅंडपा अँड ग्रॅंडमा!"

बापरे! आता यांचं आम्ही काय "बेबीसिटिंग" उर्फ मांजरपण करणार? मी एवढा विचार करेपर्यंत कनिष्कानं मॅक्स उर्फ मुमुक्षु आणि झोई उर्फ सावळी यांचं लालनपालन कसं करावं याबद्दलच्या सूचना असलेली दोन लठ्ठ पुस्तकं नवर्‍याच्या हातात कोंबली आणि तासाभरात तयार होऊन 'अभ्यासवर्गाला' येण्याचं फर्मान सोडलं!

"माझ्या बाई अलिकडे लक्षात रहात नाही. तू तुझ्या बाबालाच दे धडे! 'ट्रेन द ट्रेनर'. मग तो मला शिकवेल सगळं हं" असं म्हणत मी स्वयंपाकघरात सटकले! आणि दुसर्‍या क्षणी नाकाला हात लावत बाहेर आले! आमच्या कन्यकेनं दोन मांजरांची "शिशू"घरं चक्क स्वयंपाकघरात ठेवली होती!

"अग ही 'शिशूघरं' इथे ठेवणं चांगलं नाही आरोग्याला. तू बेसमेंट नाहीतर बाथरूममध्ये का नाही ठेवत?" मी न रहावून बोललेच.

"अगं, अस काय करतेस? बेसमेंटमध्ये त्यांना थंडी वाजत नाही का? आणि बाथरूममध्ये जंतू असतात - ते त्यांच्या आरोग्याला चांगलं नाही! शिवाय मी कुठे स्वयंपाकघर वापरते? आणि बरं का, तूही स्वयंपाकघरात तुझ्या फोडण्या करू नकोस - मॅक्सला अस्थमा आहे!"

माझी काय बिशाद होती 'त्या' स्वयंपाकघरात उभं राहून फोडण्याबिडण्या करत साग्रसंगीत स्वयंपाक करण्याची! मी शांतपणे या गावात आमचे कोण मित्र आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि भराभरा आमचे वार लावून टाकले.

आता हिनं स्वयंपाकघराचं 'शिशूघर' केलं म्हणजे मांजरांचं भोजनघर बहुधा पाहुण्यांच्या खोलीत असणार असं म्हणत मी 'आमची' म्हणजे पाहुण्यांची खोली गाठली. तिथं मांजरखाऊचे दहा दहा किलोचे दोन उंच डबे होते आणि मांजरांची चित्रं असलेल्या चटयांवर शिगोशीग भरलेले दोन वाडगे होते. शिवाय पिण्याच्या पाण्याचा झरा वाहत असलेलं एक यंत्र होतं!

घरात जागोजागी मांजरखेळणी विखुरलेली होती. बाहेरच्या दर्शनी भागात एक विटकी, मुडकी पेटी होती. तिच्यावर 'डिझायनर लेबल'वाले एक ब्लॅंकेट होते. त्यावर मांजराचे केस सांडलेले होते. ते मॅक्सचे शयनगृह! हा 'मुमुक्षु' तिथे बसून दिवसातले सोळा तास चिंतन करत असतो! जेवणाच्या टेबलाखालचा गालिचा मांजरांनी कुरतडून आणि ओरखाडून 'पुरातन' केला होता. "अरे, हाच ना तो आपण भेट दिलेला गालिचा? चांगले दोन हजार डॉलर्स मोजले होते!" मी हळूच नवर्‍याच्या कानात कुजबुजले! "अगं, असू दे! मांजरांनी त्याची पुरातनता (अँटिक व्हॅल्यू) वाढवल्याने कनिष्काला दहा हजार मिळतील त्याचे!" नवर्‍याने स्वत:ला पैशाबिशातलं बायकोपेक्षा जास्त कळतं हे पुन: एकदा सिध्द केलं. दोन तासाच्या मांजर अभ्यासवर्गात मांजरनिष्णात होऊन आलेल्या नवर्‍यानं आणि तेवढ्या वेळात मांजर हे कोणत्याच देवाचे वाहन का नाही या विषयावर सखोल चिंतन केलेल्या 'मी'नं नंतरची संध्याकाळ कनिष्का आणि आम्हाला भेटायला वीऽऽस मैल ड्राईव्ह करून आलेल्या तनिष्काबरोबर मांजरांच्या गोष्टी करत घालवली.

तीन प्याले 'मार्टीनी'नंतर नवरा एक मेलेल्या मांजराचा विनोद सांगू पहात होता, तेव्हा मी चपळाईनं त्याला शर्ट धरून उपहारगृहाबाहेर काढलं आणि गाडीत कोंबलं!
maa.njarapaN2

मांजरांचे एक लाख पापे घेऊन "मॉमी विल मिस यू" असं त्यांना सांगत आमची वरिष्ठ कन्यका सुट्टीवर जायला विमानात चढली तेव्हा मी हुश्श केलं. "ग्रॅंडपा विल टेक केअर ऑफ यू हं" असं तिनं माऊलोकांना सांगितलं होतं. तेव्हा 'ग्रॅंडमा'नं यांचं काही करावं अशी तिची अपेक्षा नाही हे सोयिस्करपणे लक्षात घेऊन मी निवांतपणे पुस्तक वाचायला घेतलं!

दोनच मिनिटात झोई उर्फ सावळीनं पुस्तक आणि माझ्यामधे ऐसपैस पसरून "आता माझे केस विंचर" अशा आशायाचं शेपूट वर केलं! मी टेबलावरचा मांजरकंगवा घेऊन तिचे केस विंचरायला लागते तोच, नवरा धावत आला, "अगं, तो कंगवा मॅक्सचा! त्यानं नको विंचरू - नाही तर त्याच्या पिसवा तिच्या अंगावर जातील!"

"पिसवा?" मी ताडकन उठले! (तरीच मला काहीतरी चावल्यासारखं वाटत होतं!)
कन्यकेनं "ट्रेन द ट्रेनर" च्या गळ्यात शिताफीनं मॅक्सची पिसवा ट्रीटमेंट, झोईची "वार्षिक आरोग्याची तपासणी" आणि काही इंजेक्शने इ. प्राण्यांच्या डॉक्टरकडे जाऊन करण्याच्या गोष्टी (अर्थातच खर्चासकट) मारल्या होत्या हे माझ्या लक्षात आलं. नशीब या मांजरांना मधुमेह वगैरे दुखणी नाहीत. माझ्या ऑफिसात माझ्याबरोबर काम करण्यार्‍या अमेरिकन बाईच्या मांजराला मधुमेह आहे तर ती रोज त्याला इंजेक्शने देते. तिच्या स्वयंपाकघरातल्या दिनदर्शिकेवर विषम तारखांवर खुणा होत्या. ते दिवस डाव्या "टूशी"वर सुई मारण्याचे! सम दिवस उजवीकडचे! पण आपलं मांजर बरोबर विषम दिवसांना डावी बाजू समोर करून कसं तय्यार रहातं हे ती दर विषम दिवसाला मला कौतुकानं सांगत असते. "तुझ्यापेक्षा ते हुशार आहे ही मला खात्रीच आहे" हे मी तिला मनातल्या मनात सांगत असते. तात्पर्य, 'मधुमेह नसल्याने प्राण्यांच्या डॉक्टरचा भूर्दंड आपल्याला कसा कमी पडणार आहे' हे पटवून देण्याचा नवरा प्रयत्न करणार हे लक्षात घेऊन मी चाणाक्षपणे "पिसवा उपाया"ची जबाबदारी घेऊन दवाखान्याचा रस्ता धरला.

त्या प्राणिवैद्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि एक प्रश्नावली समोर टाकली. त्यात "मांजर पिसू चावल्यावर हसतं का" इथपासून अनेक (माझ्यामते) निर्बुध्द प्रश्न होते. मी 'सम-विषम' अंकांप्रमाणे 'हो, नाही' ठोकून मग 'पिसवाउपायां'वर त्याला प्रश्न विचारले आणि माहिती काढून घेतली. हात्तिच्या! हा उपाय सोपा आहे. हा तर घरी करता येईल, हा विचार करून फक्त पिसवांच्या औषधाची पूड मी दवाखान्यातून घेतली आणि दरवेळचे $२५ गुणिले १५ म्हणजे आपले भरपूर पैसे वाचले ह्या आनंदात मी घरी! लहानपणी उवा झाल्यावर मोलकरीण डोक्याला औषध लावून न्हायला घालत असे तसंच या मांजरांचं करायचं होतं. फक्त या तीनचारशे पौंडी मांजराला उचलून टबात टाकून आंघोळ घालणे हा एक किरकोळ प्रश्न होता. त्या झटापटीत आमचं दोघांचं आणि मॅक्सचं वजन आठ दिवसात घटलं. सकाळी उठून मी दिसले की मॅक्स शेपूट वर करून अत्यंत केविलवाणा रडे! दुसर्‍या बाजूने नवरा पटकन त्याला टबात टाकी! त्याला छान घासून पुसून आंघोळ घालून तो वाळल्यावर मी त्याचे केस विंचरून सुगंधी टाल्कम पावडर लावून देई! एकाची अशी वेणीफणी आणि दुसर्‍याचं चारापाणी करेपर्यंत आमची सकाळ संपे! दुपारी जरा काही वाचन करावं किंवा संगणकावर बसावं तर झोई वाचनाच्या कागदावर नाहीतर संगणकाच्या टंकलेखणी (उर्फ कीबोर्ड)वर ऐसपैस पसरे! सम विषम दिवसागणिक तिच्या 'या' नाहीतर 'त्या' पृष्ठभागावर चापट मारून काहीही फरक पडत नसे! काही लिहायला घेतलं तर लेखणी आणि माझ्यामध्ये तिचे डोळे आणि मिशा जवळ जवळ माझ्या नाकात! चार दिवसांनंतर मी कोणतीही बौध्दिक गोष्ट करणं सोडून दिलं आणि दोन लठ्ठ मांजरांमध्ये मठ्ठपणे बसून रहावं असं ठरवलं

मांजरपालिकेची (कॅट सिटर) दैनंदिनी असं मुखपृष्ठ असलेली एकेक वही आम्हाला देण्यात आली होती. त्यात नोंदी करण्याची सक्त ताकीद होती! (मुद्दे दिले होते म्हणून बरं!) त्यात पूर्वी एका मांजरपालिकेनं केलेल्या नोंदी वाचून आम्हीही तसल्याच नोंदी करू लागलो. मॅक्सनं मिशा कशा फेंदारल्या, झोईनं कितीवेळा म्याऊ केलं - तिला प्रेमानं कसं थोपटलं, तिनं माझ्या मांडीवर किती तास ताणून दिलं - इ. इ. बर्‍याच गुजगोष्टी त्यात लिहायच्या असत. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली की मांजरपालिका एक तास घरी येण्याची सोय गावात आहे. त्या तासाचे ती पंचवीस डॉलर्स घेते. मी नवर्‍याला सुचवलं की यापुढे दोघांनी 'मांजरपालन' हा व्यवसाय केला तरी भरपूर पैसे मिळतील.

त्यामुळे आठ दिवसांनी आमच्या धाकटीनं म्हणजे तनिष्कानं आपला सुट्टीचा बेत जाहीर केला तेव्हा मी तिला चाणाक्षपणे 'मांजरपालिके'चा उपाय सुचवला! (तरीच "शी वॉज सोऽऽ एक्सायटेड व्हेन वी वेअर कमिंग" हेही माझ्या लक्षात आलं!)

पण ती कसली खमंग, तिनंही तिची भावनिक चपळाई (इमोशनल ब्लॅकमेलिंग - लक्षात आहे ना?)ची नखं बाहेर काढली - वर आपल्या मांजरीला मधुमेहाचं दुखणं आहे (हं? हे नव्हतं हिनं पूर्वी सांगितलं! बापरे - म्हणजे सुया टोचाव्या लागणार?) हे सांगताना तिनं मॅव मॅव करायचंच बाकी ठेवलं होतं. "अगं, पण तू इतकी लांब रहातेस. आम्ही रोज कसं येणार तुझ्याकडे"" माझा चतुर प्रश्न. "यू डोन्ट अंडरस्टॅंड...मी नाही का हल्ली तुम्हाला भेटायला दर दिवसाआड येत?" - तनिष्काचं अतिचतुर ह्रदयाला हात घालणारं भावनिक उत्तर.

"हे बघ, तू आमच्याबरोबर जेवायला म्हणून येतेस. कधीही बिल देत नाहीस आणि दुसर्‍या दिवसासाठी 'फूड' घेऊन जातेस! आणि हे अंतर लांब नाही तर मग तुझ्या बहिणीची मांजरं बघायला का नकार दिलास?" नावरू पहाणारं ह्रदय आवरून, मन घट्ट करून नवर्‍याचा प्रतिहल्ला! (कधी नव्हे तो माझ्या मदतीला आला बाई!) शेवटी बर्‍याच वाटाघाटी होऊन तनिष्काकडेही मांजरपालक या नात्यानं जाण्याचा निर्णय तीन विरूध्द दोन मतांनी घेण्यात आला. तीन म्हणजे तनिष्का, मोरू(मार्सेलस) व सीता(सीसी) आणि दोन म्हणजे आम्ही "आजी-आजोबा"!

पुन्हा आणखी दोन सूचनावह्या आणि शिवाय पंधरा हजार तोंडी सूचना यांच्या अभ्यासक्रमातून जाणे आलेच! मी ते अर्थातच शिताफीनं टाळलं. नवर्‍याच्या डोक्यात बौध्दिक गोंधळ - एकीनं बेसमेंटचं दार रात्री उघडं ठेवायला सांगितलं तर दुसरीनं बंद. त्या रात्री नवरा झोपेतून दचकून उठला - "अगं, मी तनिष्काच्या बेसमेंटचं दार बंद करायलाच विसरलो" असं म्हणताना घामाघूम झाला होता. "विशेष काही फरक पडणार नाही. उद्या जाऊ तेव्हा बेसमेंट मध्ये जाऊन त्यांनी केलेली 'शी-शू' निस्तरावी लागेल. झोप आता. आत्ता मध्यरात्री उठून आपण वीस मैल मुळीच जाणार नाही. गेलो तरी उपयोग नाही. त्यांची 'विधी' करण्याची वेळ रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी असते असं तांबड्या रंगात टाईप केलेलं आहे त्या मोरूच्या बाईंडरवर!" असं नवर्‍याला सांगून मी शांतपणानं मांजरासारखंच 'गुरगुर' असं घोरायला सुरुवात केली.

दुसर्‍या दिवशी मांजरानं तोंड घातलेला चहा शांतपणे पिणारा नवरा पाहताना मात्र मी धसकलेच! "अरे, अरे, त्या मोरूला बाजूला कर आणि तो चहा फेकून दे!" असं ओरडले. तर हा शांतपणे सांगतो, "अगं, मला काहीही होणार नाही. आमच्या लहानपणी मांजराचं पिल्लू चक्क दुधात पडलं होतं. तेव्हा आमच्या आईनं त्याचं मानगूट धरून त्याला बाहेर काढलं आणि नंतर ते दूध चहाबिहाला वापरलं. एवढं सगळं दूध फेकून थोडीच देणार? 'मोरूनं चहा प्यायला' ही गोष्ट मात्र तनिष्काला सांगू नकोस. ती वकील आहे. आपल्यावर उगाच खटला बिटला भरेल!"

खटल्याचं ते वेगळंच. पण त्या आधी या बयेनं मांजराला मानसोपचार तज्ञाकडं नेलं तर आपलं अधिकच आर्थिक नुकसान होईल या विचारानं मी अर्थातच गप्प बसायचं ठरवलं.

माझ्या शेजारणीच्या सुनेनं तसं काही केल्याचं मला सुनीती एकदा बोलली होती. म्हणजे अमेरिकेतले मराठी पालक आपल्या मुलाबाळांच्या कुत्र्या-मांजरांचा वारसा घेतात तसं सुनीतीच्या सुनेनं तिचं मांजर एकदा सुनीतीकडे वारसाहक्कानं दिलं होतं. (म्हणजे शी-शू सुनीतीनं बघायचं आणि मुलगा-सुनेनं पापे घेण्याचं बघायचं) तर त्या "मांजर-इन-लॉ"समोर सुनीती सरळ "मांजरं अगदी यूसलेस प्राणी असतात" असं मोठ्यानं बोलली.. ते सुनबाईंनं वाटतं ऐकलं आणि "मांजराच्या मनावर याचा परिणाम झाला" म्हणत माऊला ती मांजरमनतज्ञाकडे घेऊन गेली.

ते काही असो, आम्ही आता बौध्दिक पातळीवरून घसरत घसरत मानसिक पातळीवरूनही खाली लोळत लोळत येऊन पडल्यामुळे आम्हाला तरी मानसोपचाराचं भय उरलेलं नाही.

मांजरवेळ झाली की आम्ही पलंगातून लोळत खुर्चीवर येऊन पडतो. मांजरांना आंघोळी घालतो. मग आम्ही पाण्यात लोळतो - मांजरांनी खाल्लं की आम्हीही खातो. त्यांच्याशी खेळतो - आयुष्याला आम्ही मस्तपैकी सुस्तावलो आहोत. हो, एका प्रश्नाचं उत्तर मला सापडलं आहे. "मांजर हे कोणत्याच देवाचं वाहन का नाही?" कारण ते स्वत:च देव आहे!

तळटीप:
(या लेखातील मुलींची नावे सोडून सर्व जसेच्या तसे आहे. मुलींना मराठी समजत नसल्याने हा लेख मराठीत लिहिला. कृपया याचा इंग्रजी अनुवाद करू नये. केलाच तर निदान धाकटीला दाखवू नये. "मांजर नको पण वकील आवर" अशी आमची स्थिती होईल!)

- rajasgauri