अ लव्ह साँग

12:40 AM

स्टुडिओतला लाईट बंद झाला. काचेपलीकडच्या एडिटिंग टेबलवर झुकलेली त्याची आकृती दिसेनाशी झाली. उघडलेल्या दरवाजातून 'आय थिंक आय ड्रीम्ड यू इन्टू लाइफ..' चे स्वर तिच्यापर्यंत आले आणि अजूनही सुरूच असलेल्या मागच्या अखंड पावसाच्या दाट आवाजात मिसळून जात अस्पष्ट झाले.
"अजून तू जागी? काय लिहिलंस?"
चार्ज संपत आलेल्या आपल्या मांडीवरच्या लॅपटॉपकडे तिने हताशपणे पाहिले. रिकामा चौकोन. याचे अठरा हजार शॉट्स एडिट होऊन संपतात आणि मला एक शब्दही उमटवणं जमेना!
"काय लिहिणार होतीस?"
".."

"तू लव्हस्टोरी का लिहीत नाहीस?"
"काय?"
"लव्हस्टोरी. निदान तुला प्रेम या विषयातलं काहीतरी कळतंय हे दाखवणारं एखादं पोस्ट."
"काहीही! इतकं ढीगभर लिहिलंय त्याबद्दल. बघ परत वाचून. की एकदाही मी लिहिलेलं काही वाचलेलंच नाहीयेस तू इतक्या वर्षांत?"
"नाही लिहिलंस. मला त्या तुझ्या नात्यांचे धूसर संदर्भ वगैरे टाइप्सबद्दल बोलायचं नाहीये. प्रॉपर आणि सिंपल प्रेम. अनकाँप्लिकेटेड. या गाण्यासारखं. "
तिने पावसाचा आवाज ट्यून आऊट करून त्या गाण्याचे शब्द ऐकायचा प्रयत्न केला. 'आय न्यू आय लव्हड् यू बिफोर आय मेट यू.. '
"टीनएज गाणी ऐकतोस?"
"डोंट बी सारकॅस्टिक. गाण्याला वय नसतं."
"हं?.."
"तू ते कोणतं 'मॅच्युअर्ड' गाणं म्हणून दाखवायचीस, तेव्हा किती वर्षांची होतीस? टिनएजर तरी होतीस का?"
"ओ ते.." तिला हसायला आलं. तिचं - कोणी सांगितलं की म्हणायचं ते - तेव्हाचं फेव्हरिट गाणं. 'चांद फिर निकला.. '
'ये रात कहती है.. वो दिन गये तेरे..' आपल्याला गाण्याच्या ओळींबरोबर त्या थंडगार दगडी काळ्या पायर्‍या, पायर्‍यांच्या बाजूला फुललेल्या मधुमालतीचा तो मध्यरात्र उलटून गेल्यावर जास्तच तीव्रतेने येणारा वास, सगळं तसंच आठवंतय हे पाहून तिला जरा कमी सिनिकल वाटलं.
"तुला संगीत खरंच आवडतं यावर आत्ता विश्वास बसलाय माझा. अजून तुला ते गाणं आठवतं म्हणजे.."
"गाणं तू म्हणायचीस हे आठवतंय."
".."

"ओके. तेव्हा मी एक सिंपल लव्हस्टोरी लिहायची. तो आणि ती भेटतात. प्रेमात पडतात."
"आणि सुखाने एकत्र राहायला लागतात. विसंवाद-वैफल्य-वेदना वगैरे काहीही क्रॅप त्यात आणायचं नाही. प्रेमात पडणं अ‍ॅक्चुअली एंजॉय करतात काही लोक, यू नो?"
"माहीत नाही. म्हणजे.. इट्स नॉट व्हेरी रिअ‍ॅलिस्टिक, इज इट?"
"व्हॉट डु यू मीन नॉट रिअ‍ॅलिस्टिक? सगळ्यांचीच आयुष्यं म्हणजे बर्गमनच्या फिल्म्स् नाहीत. जगात कितीतरी जण लग्न करतात. आनंदाने राहतात."
"बहुतेक. पण मला ते लिहिता येईल की नाही, माहीत नाही."
"ते तू बघ. पण मला वाटतं एक आनंदी लव्हस्टोरी लिहावीस आता तू. तेवढीच वाचणार्‍यांची डिप्रेशन, उदासीपासून सुटका." तो हसला.
"व्हेरी फनी. पण ठीकच आहे. मी बघेन जमतंय कां. "
"नक्की?"
"नक्की."

लॅपटॉप रीचार्ज करायला ठेवून मग तिने विचार केला. अ सिंपल लव्हस्टोरी? इंटरेस्टिंग. प्रेमात पडलेल्यांची नाही, तर नंतर सुखात राहिलेल्यांची लव्हस्टोरी. जमतं काही जणांना असं म्हणतोय ना तो, मग असेलही. अशी लव्हस्टोरी लिहिणं नक्कीच चॅलेंजिंग आहे. उगीचच सेंटिमेंटल किंवा नाटकी न होता लिहिता यायला हवी.

ओके. मग सुरुवातीला तो आणि ती भेटतात. कुठे? एखाद्या पार्टीमध्ये? नको, बरेच वेळा तिथेच भेटत असतात. कॉलेज? नको. खूपच फिल्मी. एखाद्या क्लासमध्ये? नवी भाषा शिकण्याच्या क्लासमध्ये प्रेमाची भाषा शिकतात वगैरे? अजिबात नको. अगदीच टिपिकल.

त्याचा स्टुडिओ परत प्रकाशाने उजळला. कुठल्यातरी ऑर्केस्ट्राचा कल्लोळ. आणि मग पॅशनेट उंचावलेली धून. अनफिनिश्ड! पहिल्या सात मिनिटांची ती अस्वस्थ करणारी सुरावट.. ते संपलेले तिने ऐकले आणि मग आता हा काय लावणार, याचा विचार मनात यायच्या आतच कोसळले ..एकामागोमाग एक... इतक्या वर्षांमध्ये चुकलेले सारेच ऋतू.. काळ्या फरसबंदी अंगणातल्या गार, दगडी पायर्‍यांवर त्याला शोधत ती जायची, तेव्हा खिडकीतून विवाल्डीचे हेच चार ऋतू सळसळत यायचे.

काचेपलीकडून दिसणार्‍या त्याच्या नजरेतल्या ऋतूंच्या खुणा तिला चुकवता येईनात. डिस्टर्ब करतोय हा आवाज. दरवाजा घट्ट लावून घे. तिने त्याला खुणावलं.

एखाद्या कॉन्सर्टमध्ये भेटवायचं का त्यांना? क्लासिकल कॉन्सर्ट. आणि तिथे ते दोघे. आणि मग गप्पा काय मारणार? गाण्यांवर? (अजून कशावर?) शास्त्रीय संगीतातलं तिला काहीही कळत नाही. म्हणजे मग परत त्याची मदत घ्यावी लागणार. साधी सुरुवात करतानाच इतका गोंधळ? शिवाय पहिल्याच कॉन्सर्टला काही ते प्रेमात पडणार नाहीत. निदान दोन-तीन वेळा भेटून मग काहीतरी डेव्हलप होणार ना? की पहिल्यांदाच ते एकमेकांकडे पॅशनेटली बघणार आणि प्रेमात पडणार? पण मग नंतर ते सुखाने राहण्याचं प्रकरण आहेच की. म्हणजे इंटेन्सिटी पुरेशी टिकवायची जबाबदारी आलीच.

तर मग तो आणि ती भेटतात. ओळख होते, खुणा पटतात आणि मग संगीताच्या प्रत्येक तानेबरोबर हलणारी एकमेकांची मान, एकमेकांकडे न बघताही एकमेकांची एक्स्प्रेशन्स अचूक मनात टिपली जायला लागतात. इंटर्वलमध्ये गप्पा सुरू होतात, मैफल संपली, तरी त्या संपत नाहीत. मग पुढे ते रस्त्यावरून जातात, ट्रेनमधून जातात, टॅक्सीमधून जातात, कॅफेत बसतात, धाब्यावर जेवतात, दुकानात भेटतात, तरी आपले बोलतच राहतात.
अनेक दिवस, अनेक तास. आवडते संगीतकार, त्यांच्या रचना.. भान विसरून बोलत राहतात.
स्वतःच्या आवडीच्या गोष्टींवर बोलताना, दुसर्‍यालाही ती आपल्याइतकीच आवडतेय हे कळणं मनात कसं खोलवर झिरपत जाणारं. बोलण्याची नशा त्यांना वेढून राहते.

मग हळूहळू कधीतरी ते स्वतःबद्दल बोलायला लागतात. स्वतःबद्दल म्हणजे आयुष्यातली स्वप्नं, आकांक्षा वगैरे मूर्ख, बिनमहत्त्वाच्या गोष्टींबद्दल नाही, तर अ‍ॅक्चुअल स्वतःविषयी. कोणते रंग आवडतात, पदार्थ आवडतात, सकाळी किती वाजता उठतात, पुढचा दिवस कसा जातो, शाळेतल्या गमती, कॉलेजातल्या मजा, कटकटे नातेवाईक असं सर्व. एकमेकांना पूर्ण ओळखण्यासाठी ज्या गोष्टी माहीत असणे मित्रांना महत्त्वाचे वाटते, त्या सर्व गोष्टी.

असे खूप दिवस जातात. मग कधीतरी एकेकटे असताना त्यांच्या लक्षात येतंच, की या सगळ्यांमध्ये आता संगीत मागे पडलं. कॉन्सर्ट्सना ते आता कधीतरीच जातात आणि त्याबद्दल ते एकमेकांशी बोलत नाहीत. स्वतःबद्दलही बोलत नाहीत. ज्या गोष्टींमुळे ते एकमेकांच्या जवळ आले, त्या सगळ्याच गोष्टी विसरून ते एकमेकांना भेटत आहेत. एका कॉमन पॅशनच्या पायावर उभं राहिलेलं ते नातं आता अधांतरी लटकतंय.

एक मिनिट. ..

तिची बोटं कीबोर्डवर होती तिथेच थांबली. '..आणि ते अनंत काळासाठी सुखाने एकत्र नांदू लागले' असा शेवट करायचा आहे ना? मग त्या दिशेने हे नक्कीच चाललेलं नाही. असं का होतंय? सुरुवात तर किती चांगली झाली होती! कुठे चुकतं नेमकं नेहमीच?

संगीताच्या आवडींत फारच विरोधाभास आहे का त्यांच्या? त्याच्या मनात दमदार सोप्रानो आणि तिला लताची नाजूक तान आठवतेय. हे मुळातच चुकीचं आहे. असं नकोच. आवडी समानच असू देत. ऑपोझिट्स अट्रॅक्ट इज बुलशिट. शरीरांतले एकमेकांना खेचून घेणारे उसळते उष्ण प्रवाह रोजच्या सहवासाने कोमट झाले, की मग तिला त्याच्या शॉपेने बोर होणार आणि त्याचं तिच्या एसडीमुळे डोकं उठणार. इतक्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सींवर नकोच ठेवायला दोघांना. अशाने मग त्या दोघांचंच असं एकंही गाणं कधी नसेल.

पण आधी मुळात ही अशी ऑब्सेशन असल्यासारखी संगीताची पार्श्वभूमीच का घेतोय आपण आपल्या कथेला? सगळ्या शक्यता त्या एका अदृश्य गाण्याच्या अवतीभवतीच का गुंफल्या जाव्यात अशा आपल्या मनात? मनातला नात्यांचा गुंता इतका प्राचीन आहे, त्याची मुळं खोलवर कुठे जाऊन पोचताहेत, हे आत्ताच समजायला हवं होतं?

ती ते सगळंच डिलीट करून टाकते.

स्टोरी फुलवायला इतकी केलेली मेहनत फुकट गेली म्हणून नेहमीप्रमाणे दु:ख होतंच. पण परत मागे जाऊन दुरुस्त करणं काही खरं नाही. नैसर्गिक फ्लो गेला, की गेलाच.

तिला एकदम कंटाळा आला. प्रेमात पडणं वेगळं आणि त्या खड्ड्यातच पडून राहणं वेगळं. प्रेमात आपण पडत आहोत, हे जाणवण्याच्या त्या विशिष्ट क्षणाच्या मॅजिकमधली इंटेन्सिटी टिकून टिकून किती काळ टिकणार? आणि इथे तर अनंत काळ एकत्र राहण्याच्या गोष्टीविषयी विचार करतोय आपण. मनाला चिकटून काही राहू शकतं कां एकमेकांबद्दल कधी?

असं कोणतं पॅशन आहे, जे दोघांना एकत्र बांधून ठेवेल...?

या अशा विषयावर लिहिताना मदत म्हणून आपल्या पोतडीत धुंडाळले, तर तिथे असंख्य निरुपयोगी गोष्टी आणि नीरस, गंजक्या भावनांच्या अडगळीशिवाय दुसरे काहीही हाताला लागण्याची शक्यता शून्यच, हे तिला चांगले माहीत होते.

कशाला याचे काहीतरी ऐकून आपल्या घट्ट, करकचून बांधलेल्या पोतडीची गाठ उलगडतोय आपण? आपल्या आयुष्यात टप्प्याटप्प्याने आलेली, सुरू होतानाच संपण्याचा शाप घेऊन जन्माला आलेली ती सगळी आपोआप संपून गेलेली, काही संपवावी लागलेली, तर काही मुळात सुरूच का झाली होती असा प्रश्न पाडणारी कंटाळवाणी नाती.. ती निभावून न्यायला आपण असमर्थ, की आपल्या मनाला आतपर्यंत जे हवंय ते समजूनही घ्यायला ही नाती अपूर्ण?

एकात एक गुंतलेले हे सारे प्रश्न एकाच उत्तरापाशी येऊन थांबत आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी इथेच का आलो आपण? ह्या सार्‍या गुंत्याचे एक टोक कुठेतरी त्या काळ्या दगडी पायर्‍यांवरच्या गप्पांमध्ये अडकले आहे, ते सोडवून घेण्याचा प्रयत्न खरंच व्यर्थ आहे? ते जे होतं, ते नक्की काय होतं हे नीट सगळ्या बाजूंनी जाणून, तपासून घेतल्याशिवाय पुढे एकही पाऊल टाकणे शक्य नाही, हे आता इतक्या वर्षांनंतर अर्धवट का होईना उमगतंय, हेच काय कमी?

तिला गंमत वाटली ती याची, की या त्याच्या नव्या घरात आल्यावरही परत तसंच झालं, जे त्या जुन्या दगडी पायर्‍या असलेल्या त्याच्या घरात होत असे. तिचं भरभरून विश्वासाने स्वतःबद्दल, आयुष्यातल्या न सुटलेल्या प्रश्नांबद्दल बोलत राहणं! आणि त्याचं ऐकणं. तिचा एवढा मोठा प्रवास किती सहज काही तासांतच जाणून घेता आला याला. खरंतर, पहाटे दार उघडलं, तेव्हा यावंसं वाटलं म्हणून आले शोधत, इतकंच सांगितलेलं पुरलं होतं त्याला. त्याने हसून स्वागत केलं आणि नंतरही स्वतःहून काहीच विचारलं नाही. तिने सांगेपर्यंत.

कदाचित काहीच नसतं सांगितलं, तरी चांगलं झालं असतं. पण ते कुठे तिच्या हातात होतं? आताही नाही आणि तेव्हाही नव्हतंच बहुतेक. काल इथे असताना, गाणी ऐकणार्‍या त्याला समोर बघत असताना, जे काही आतून उन्मळून आलं, ते अगदी आतलं, त्या जुन्या - आतलं काहीतरी सांगण्याच्या - उर्मीतूनच आलेलं आहे; त्या प्राचीन काळांमधल्या रात्री त्याच्या घराच्या अंगणातल्या पायर्‍यांवर बसून, त्याला त्यावेळी तिच्या नुकत्या सुरू होत असलेल्या आयुष्यातलं इतकं जे काही रोज सांगण्यासारखं असे, आणि ती ते श्वास घ्यायचीही उसंत न घेता ज्या भरभरून त्याला सांगत बसलेली असे, ते सारं तिने परत एकदा सांगितलं होतं इतकंच. ते सांगून झाल्यावर अजूनही काही शिल्लक आहे, ते आता लॅपटॉप उघडून बसल्यावर स्वतःच्या बोटांत दाटून आलंय. फक्त जे जाणवतंय, ते शब्दांत उतरवणं जमत नाहीये..

पण आता नात्यांवरचा, त्यांच्या आयुष्याला सुखी करण्याच्या क्षमतेवरचा विश्वासच उडून गेल्याचं त्याला इतकं कळवळून सांगून झाल्यावर, त्याचा कोणतीतरी मूर्ख, पोरकट प्रेमकथा आपल्याकडून लिहून घेण्याचा हट्ट किती चमत्कारिक आहे? अशी गोष्ट, जिचा शेवट त्याला हवा आहे तसा, अस्तित्वातच नाही. जखमेवर मीठ चोळण्याचाच एक प्रकार म्हणावा का याला?

तिने खिडकीचा पडदा बाजूला केला.
उजाडायला बराच वेळ होता बहुतेक. लांबचं काही दिसत नव्हतं. चौदाव्या मजल्यावरून मुंबई अनोळखी वगैरे वाटण्याचं काही कारण नव्हतंच. उलट मुंबई इथूनच पटकन ओळखीच्या खुणा दाखवू शकायची. इथे असेपर्यंतची ती काम करत असलेली सगळी ऑफिसं उंचावरची तर होती. मुंबई फक्त लांबूनच दिसावी ही काळजी घेऊनच बांधल्यासारखी. गॉथिक मनोरे, समुद्राचे किनारे आणि इमारतींची आकाशात सरत जाणारी टोकं. दुरून मुंबई साजरी.. तो तेव्हा म्हणायचा.

तिच्या एकदम लक्षात आलं, आता इतक्या वर्षांनी भेटला आहे, तर त्याच्या स्वतःबद्दल काहीच म्हणाला नाहीये तो. यायच्या आधी त्याच्या इकडच्या, तिकडच्या, नेहमीच काही ना काही कारणांनी तिच्या पायांत घोटाळून गेलेल्या त्याच्या असंख्य मैत्रिणींनी मुद्दामहून तिच्या कानावर घातलं होतं, तितकंच माहिती आहे तिला.

पुढे काही नवीन लिहिण्याआधी तिने त्याची चाहूल घेतली.
पण सगळीकडेच शांत होतं. अनफिनिश्डची ट्यून संपल्यावर झोपला असणार.
तिने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेऊन दिला. हा आणायलाच नको होता सोबत. जगाशी जोडलं राहण्याच्या अ‍ॅडिक्शनचं काय करायचं असतं?

हे असलं काही करण्यात वेळ वाया घालवतोय आपण. इतक्या टाईट शेड्यूलमधून असं मध्येमध्येच उठून येणं, म्हणजे करिअरच्या दृष्टीने एकप्रकारचा सेटबॅकच स्वतःवर लादून घेणे.. कॉलम्स, डेडलाईन्स, असाईन्मेंट्स, स्टोरीज, रिपोर्ट्सच्या भोवंडून टाकणार्‍या चक्रातून सुटकाच नव्हती. पण त्यातून थोडा काळ का होईना बाहेर पडावं, स्वतःला शिल्लक राहिलोच असलो, तर शोधावं ही उर्मी इतकी तीव्र झाली होती याच्याकडे उठून यायचं ठरवलं तेव्हा!

सरत्या जुलैतला गुदमरवून टाकणारा ढगाळपणा अवतीभवती गच्च दाटल्यासारखा झाला होता. तिला शहरावरून जाणार्‍या केबलच्या आणि इतर कसल्या कसल्या तारांच्या जाळ्याशिवाय फारसं काहीच इतक्या अंतरावरून दिसेना. खालचा रहदारीचा रस्ता आता शांत होता. तिला तो बाहेर पसरलेला मळकट पांढरा रंग अजिबात आवडला नाही. दिवसभरातला वाहनांचा धूर साकळून वर आल्यासारखा. कुठे राहायला आलाय हा? राखाडी धूसर प्रकाशातून पाऊस आवाज न करता निर्जीवपणे पडत होता. तिच्या घरातून समुद्र थेट दिसायचा. अगदी दाट अंधारातही पाण्याची तरंगती रेष चमकायची दूरवर. तिच्या आतापर्यंतच्या सर्व घरांमध्ये तेच जास्त छान होतं. नाही सर्व नाही.. तिला पुन्हा ते काळ्या दगडी पायर्‍यांचं घर आठवलं.

ते कधी आणि का सोडलं त्याने? खरं तर ते तिचं नाही.. त्याचं घर. तिचं फक्त अंगण .. आणि त्या पायर्‍यांवर बसून मारलेल्या गप्पा .. आता गेल्या जन्मातल्या वाटाव्यात इतका एक मोठा काळ उलटून गेला आहे दरम्यान. शेवटचं त्या घरातल्या पायर्‍यांवर बसून याच्याशी गप्पा मारल्या, त्याला किती वर्षं झाली? नऊ? तिने चक्क हातांच्या बोटांवर मोजूनच पाहिलं.

तिच्या घरी फक्त ती आणि बाबा. ते कधीतरी रात्री उशिरा येणार, तोपर्यंत ती जागत अभ्यास करत बसलेली. ट्रेनी जर्नालिस्टची ती कोणत्यातरी टुकार जिल्ह्याच्या पेपरमधली नोकरी.. दिवसभरातली धावपळ संपवून परत आल्यावर रात्री उशिरापर्यंत जागून केलेला अभ्यास, परकीय भाषा शिकणे, परदेशांतल्या स्कॉलरशिप्सवर उच्चशिक्षण देणार्‍या युनिव्हर्सिटीजना अर्ज.. शरीरातली प्रत्येक पेशी थकव्याने मलूल झालेली असताना, रात्री अभ्यास करतानाच कधीतरी जर त्याच्या घरातल्या पायर्‍यांवर नजर गेली आणि तिथे सिगरेटचा लाल ठिपका चमकताना दिसला, तर ती सगळं सोडून खाली उतरून, मधुमालतीच्या गुच्छांच्या तोरणांखालून त्याच्या अंगणात गप्पा मारायला जायची. गाण्याने भरून गेलेलं असायचं ते घर तसंही दिवसाच्या कोणत्याही प्रहरी. सकाळी त्याच्या आईचा गाण्याचा क्लास, ती शास्त्रोक्त संगीत शिकवायची. दुपारी त्याच्या बहिणीने रेडिओच्या सुरांवर मिसळलेला आपला किनरा, उंच आवाज, संध्याकाळी काका लावून बसायचे त्या अख्तरीबाईंच्या गझला, 'घटत जाय रैन..'.

आणि रात्रीचा तो. गाण्यात संपूर्ण बुडालेला.. त्याचं ऑपेरा ऐकण्याचं तेव्हापासूनचं वेड. वेस्टर्न क्लासिकलच्या रेकॉर्ड्सचे ढिगारे होते त्याच्या खोलीत. पण रात्री तिला हवं असणारं हिंदी गाणं शिळेवर वाजवायचा, तेव्हाही सूर महत्त्वाचे म्हणत खूशच असायचा.

lovesong21.jpgपुढे हायवेपर्यंत पसरत गेलेल्या मोकळ्या मैदानाच्या पलीकडच्या टोकावरचं त्याचं ते घर. आजूबाजूला काही फार दाट झाडी होती असं नाही. एक जांभळाचं आणि पांगार्‍याचं झाड होतं त्या अंगणात, आणि पायर्‍यांना लागून प्राजक्त आणि जरा अंतरावर कडुनिंबाचं कातरलेल्या पानांचं झाड. पण दिवसातल्या कोणत्याही वेळी किती शांत, थंड वाटायचं त्याच्या घरी. पिवळ्या, टपोरलेल्या लिंबोण्यांचा किंचित उग्र, हवाहवासा कडूसर वास - पारिजातकाच्या फुलांच्या मंद सुवासावर मात करत रात्री अंगणभर पसरलेला. आणि पायर्‍यांच्या मागच्या भिंतीवरून कुंपणापर्यंत पसरत गेलेला, तिचा सर्वांत आवडता मधुमालतीचा वेल. त्याचे ते लाल-गुलाबी-पांढर्‍या पाकळ्यांच्या नाजूक कमनीय फुलांचे अगणित घोस. प्रत्येकी फक्त पाच पाकळ्या. त्या फुलाची प्रत्येक पाकळी तिच्या नखांवर बरोबर त्याच आकारांत चिकटायची आणि मग हात नेलपेंट लावल्यासारखे दिसायचे. त्याच्याशी बोलत असताना नखांवरच्या पाकळ्या पडून जाऊ नयेत म्हणून अलगद बोटं अधांतरी ठेऊन किंवा खाली पायरीवर हात टेकवून ती काही सांगायला लागली, की वैतागून तो फुंकरीने त्या पाकळ्या उडवून टाकायचा.

वयाच्या तेराव्या वर्षी बाबांची बदली होऊन ते तिथे आले, त्यानंतर ती एकोणीस वर्षांची होईपर्यंत अशा किती मधुमालतीच्या पाकळ्या त्या रात्रींच्या अंधारात त्याच्या घरातल्या अंगणात विखरून पडलेल्या असणार! तिला जरा आश्चर्य वाटलं, की दिवसातून वेगवेगळ्या वेळी त्याच्या घरात, त्याच्या आईला, काकूला, चुलत बहिणीला, नाहीतर धाकट्या भावाला भेटायला आणि बोलायला तिचं कधी ना कधीतरी आत जाणं झालंच होतं, पण आठवणी शिल्लक राहिल्यात त्या अशा रात्रीच्या गडद अंधारात बुडून गेलेल्या अंगणाच्या आणि त्याच्या बरोबरच्या गप्पांच्या.

तो सतत गाण्यांचा विचार करतोय असं वाटायचं, त्याबद्दल बोलायचा नाही कधी, तरीसुद्धा तिला तसं वाटायचं. गाणं त्याच्या आत भरून राहिलंय असं.. तेव्हाही. बोलायचा मात्र कोणत्या ना कोणत्या तिला अनोळखी असणार्‍या सिनेम्यांबद्दल, नाहीतर तिच्याबद्दल. कशाबद्दलही. तिला काही ना काही प्रश्न सतत पडलेले असायचे तेव्हा. एकंदरच आयुष्याबद्दल आणि घरातल्या ती रोज अनुभवत असलेल्या विखरून पडलेल्या नातेसंबंधांबद्दल, ते सगळं ओलांडून पुढे कसं जाता येईल याबद्दल.. सगळेच प्रश्न काही ती विचारत बसायची नाही, पण मनात असायचेच.

कधी तो बाहेर अंगणात नसायचा. आत शास्त्रीय संगीताचा रियाझ करत असलेल्या त्याच्या आईला साथ देत असायचा. तिच्या खिडकीतून मग तो दिसायचा नाही. त्या नीरव रात्री किती तर्‍हांचं संगीत पाझरत राहायचं अंगणात. तिथल्या काळ्याभोर फरसबंदीवर पसरलेल्या चंद्रप्रकाशात मग ती येऊन उभी राहायची आणि आजूबाजूला पसरलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या नाजूक देठांसारखा केशरी मारवा, नाहीतर जांभळाच्या गडद पानांसारखा तजेलदार हिरवा पूरियाधनाश्री ऐकत राहायची. खोलवर शांत वाटत राहायचं अशा वेळी. सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाल्यासारखं.

त्या घराच्या अंगणात त्याच्याशी बोलत असताना तिच्या आयुष्यातले सगळेच प्रश्न कसे साधे, सोपे, मूलभूत होऊन गेल्यासारखे वाटले नेहमी. बाबांचं कामात बुडवून घेणं, ममाचं घर सोडून निघून जाणं, नंतरचा त्यांचा डिव्होर्स हे आणि असले तिचं आयुष्य त्यावेळी कठीण बनवणारे सगळे प्रश्न पायर्‍यांवर त्याच्याशी गप्पा मारत बसल्यावर आजूबाजूच्या सुकलेल्या, निर्जीव पानांच्या पाचोळ्यासारखे, वार्‍याच्या हलक्याशा फुंकरीनेही उडून जातील इतके बिनमहत्त्वाचे वाटत राहिले.

lovesong_new.jpgआणि मग नऊ वर्षांपूर्वीच्या दिवाळीतली ती मधल्याच कोणत्यातरी दिवसातली रात्र .. त्यादिवशी बाहेरच्या पायर्‍यांवर बसून त्याच्याशी भरभरून उत्साहाने बोलत असलेली एकोणीस वर्षांची ती तिला नजरेसमोर आता स्पष्ट दिसली. त्याचं ते जुनं, ऐसपैस घर नाजूक, थरथरत्या ज्योतींनी उजळून गेलेलं. अंगणातली रांगोळी.. बाजूच्या पारिजातकाने त्या रांगोळीतल्या रंगांवर केलेली शुभ्र केशरी पखरण.. हे सगळं दरवर्षी एकदातरी मनसोक्त पाहिल्याशिवाय तिला दिवाळी आल्यासारखी वाटायचीच नाही. दुसर्‍या दिवशी पहाटे मुंबईला जायचं होतं, पुढची फ्लाइट पकडायला, आणि तरी मध्यरात्र उलटून गेल्यावरही ती त्याच्याशी बोलत बसलेली होती. पुढचे प्लॅन्स, सगळे कसे सरळ रेषेवर आखून दिल्यासारखे आता पक्के झालेले, परदेशातल्या सर्वांत प्रतिष्ठित विद्यापीठात मिळालेला प्रवेश.. उच्चशिक्षण. मग जॉब.. मग नव्या माध्यमांची नवी क्षितिजं..

डाव्या बाजूने गार वार्‍याचा एक हलकासा झोत अंगावर आला तशी तिने लगेच वळून पाहिलं. त्याने बाजूच्या छोट्या टेरेसचं दार उघडलं होतं. आल्या आल्या तिला तिथे जायचं होतं, तर त्याने 'पाऊस आत येतो, पुस्तकं भिजतील, तिथून फार काही दिसत नाही' असली काहीतरीच कारणं देत दार घट्ट लावून टाकलं होतं.
"ये इकडे. पाऊस थांबलाय आता. छान मोकळं वाटेल."
तिला पावसात भिजतानाही छान मोकळं वाटलंच असतं. तिला मजाच वाटली. काय वेडा आहे हा. आठवत नाहीये का याला..

"पाऊस चढलाय तुला.." त्याच्या मानेवरून फिरत, वर केसांत खुपसल्या जाणार्‍या तिच्या हातांच्या ओल्या तळव्यांना घट्ट पकडत तो तिला म्हणाला होता. त्याच्या नाकावरून ओघळलेल्या थेंबांना आपल्या उघडलेल्या ओठांमध्ये टिपत तिने ते लगेच मान्यही करून टाकले होते. त्यानंतर मग पाऊस थांबला, तेव्हा तिच्या मोरपिशी ओढणीचा रंग त्याच्या पांढर्‍याशुभ्र शर्टावर तर उतरला होताच, शिवाय गालांवर आणि गळ्यावर आणि हातांवरही कुठे कुठे पसरला होता. ते पाहून हसू फुटलेल्या तिच्या चेहर्‍याभोवती आपल्या दोन्ही हातांची ओंजळ पकडून त्याने खूप वेळ तिच्याकडे नुसतेच पाहिले होते. तिला त्याची ती एकाग्र, इंटेन्स नजर गेल्या नऊ वर्षांत कितीदातरी आठवून गेली.. अगदी प्रामाणिकच राहायचं, तर त्यानंतर आपल्या शरीरावर खिळलेल्या प्रत्येक नजरेला त्याच इंटेन्सिटीच्या मापाने ती मोजत आली हे कबूल करायला काय हरकत आहे आता..

नाही जमलं कधी त्याबद्दल नीटसं विचार करायला. किंवा तिने ते टाळलंही असेल कदाचित. आणि गेल्या काही वर्षांत तर इतक्या नव्या घडामोडी, धावपळ, नव्या मैत्र्या, जुन्या अटीतटीने निभावून नेण्याचा अट्टहास सतत सुरू होता, की त्या प्रयत्नांना यश यावं या हेतूनेच तिने ते टाळलं असणार.

इथे येऊन आता कितीतरी तास उलटून गेले. दुपारपासून तर सतत पाऊस सुरूच होता. का नाही दाखवली याने ही पावसात भिजणारी गच्ची?
"फारसं काही दिसत नाही इथून. शिवाय इथे बसून भिजत राहायला पायर्‍याही नाहीत," तिच्या मनातलं सवयीने ओळखलंच त्याने आणि मग तोही मजेने हसला.
फायनली. तिला हायसं वाटलं. जुन्या आठवणींपर्यंत पोचला तर हा.

"सो? कुठपर्यंत पोचली आहे गोष्ट?"
"ते महत्त्वाचं नाही. पण तू इथे कधी राहायला आलास ते कळवलंही नाहीस. याला त्याला पत्त्ते विचारत, शोधत यावं लागलं. निदान एक फोनतरी..""
"तसा कधी केला होता आधीही? तीन वेळा घरं बदलली आतापर्यंत. प्रत्येकवेळी तू येशील असं वाटलं होतं. यावेळी आलीस."

"कशी आहेस?"
"जिथे पोचायचं ठरवलं होतं, तिथे फार सहज आणि लवकर पोचले. त्यामुळे मजेत आहे, यशस्वी आहे असं नक्की सांगू शकते." कठड्यावर कोपर रोवत तिने खाली पाहिलं. अथांग अंधाराचा समुद्र. रिकामा, तळ हरवल्यासारखा. गच्चीत यावं ते संध्याकाळ गडद व्हायच्या आत, नाहीतर मग लख्ख चांदण्या रात्री. हे असं ढग भरलेल्या अंधार्‍या आभाळाखाली लुप्त झालेल्या चंद्रप्रकाशात येण्यात काही गंमत नाही.

"वाचलं नाहीस कधी मी लिहिलेलं?"
"नाही. नुसती बघितली नावं तुझी. इतरांसाठी लिहितेस, प्रोफेशनल - त्यात मला खरंच काही इंटरेस्ट नाही."
"हं!.."
"रागावू नकोस. स्वतःचं, स्वतःसाठी असं कां लिहिलं नाहीस? इतकं बोलायचीस.. मी वाट पाहत होतो ते वाचण्याची."

खालच्या अंधारात डोळे रुतवून ती स्तब्ध झाली. स्वतःचं - स्वतःसाठी.. वाटलंच नव्हतं तसं काही शोधावंसं इतक्या वर्षांत. पण असं आतून वाटण्याचा क्षण नुकताच येऊन गेला.. तू आत स्टुडिओत दिसत होतास तेव्हा आणि तू लिहायला सांगितलेल्या सुखी शेवटाच्या लव्हस्टोरीवर मी विचार करायला लागले तेव्हाही कदाचित. आणि पूर्वी येऊन गेलेला क्षण पकडून ठेवता आला असता, तर कदाचित पुढच्या प्रवासात स्वतःबरोबर प्रामाणिक राहायला जास्त शिकली असती ती.

पण हे त्याला सांगण्यात तिला अर्थ वाटेना. आता त्याच्याशी बोलताना हे जाणवतंय, तितक्या स्पष्टपणे तेव्हा नव्हतंच जाणवलं.
तो क्षण उलटून गेल्यावरच त्याची जादू का जाणवते अशी प्रत्येकवेळी?

तेव्हा त्या नाजूक, थरथरत्या दिव्यांच्या ज्योतींकडे टक लावून पाहत तिचे सगळे परदेशात जायचे पुढचे प्लॅन्स ऐकत असताना, त्याने अचानक तिच्याकडे नजर वळवत तिला "गाणं म्हणतेस?..माझ्यासाठी?" असं विचारलं होतं. वरच्या पायरीवर बसलेल्या तिचा गुडघा त्याच्या छातीजवळ होता. तिला एकच तर गाणं येत होतं.. चांद फिर निकला.. तिने म्हणायला सुरुवात केली, तेव्हा आपला हात त्यावर रोवत त्याने वर तिच्याकडे पाहिले होते.. पायरीच्या कडांवर ओळीने मांडलेल्या शेकडो दीपकळ्यांची आरास तिच्या चेहर्‍यावर उमटली होती तेव्हा.. त्याचा आपल्या गुडघ्यावर घट्ट रुतलेला हात थरथरला हे तिला समजलं होतं.
पण मग गाणं संपता संपताच बाबांची हाक आली होती. "उद्याचं फ्लाइट चुकवायचा विचार आहे का? वर ये. उशीर झालाय."
ती जायला निघाली तेव्हा "नको जाऊस. थांब." त्याने म्हटलेही होते. ते तो का म्हणतोय हे नीटसे जाणून घेण्याच्या भानगडीत नव्हती पडली ती. फ्लाइट चुकवणं तिला परवडलं नसतं. घरातल्या असह्य, त्रासदायक प्रश्नांपासून दूर जायचा तेव्हा तिच्याकडे तो एकच उपाय होता.
"नको. जाते.. उद्या पहाटे उठायचंय." इतकंच म्हणून ती गेली होती.. धावत.
मधुमालतीच्या वरचेवर अलगद राहिलेल्या पाकळीसारखे असे अनेक अलवार क्षण गमावले होते तिने.. आणि आता नऊ वर्षांनी या अंधार्‍या गच्चीत ते गोळा करण्यात खरंच काही अर्थ नव्हता. उशीरच म्हणायचा असतो याला.

त्याने कठड्यावरच्या तिच्या हातांवर आपला हात ठेवला आणि मृदू आवाजात विचारलं, "का? काय झालं? कां लिहिलं नाहीस?"
"नाही.. नाही लिहिलं. काही सुचतच नाही स्वतःसाठीचं. उमटतच नाही."
"कंटाळली आहेस."
"अजिबात नाही. काय कारण? हवं ते माध्यम हातात आहे. मनासारखा पैसा आहे, पोझिशन आहे. लोकांना आवडतंय. प्रत्येक शब्दाचे मोजून पैसे मिळताहेत."
"तरी हवं ते उमटत नाहीये. इतक्या दूरदूरच्या प्रवासांची, धावपळींची, भेटलेल्यांच्या अनुभवांची पुटं चढवून ठेवली आहेस मनावर. त्या थरांखाली हरवून टाकलं आहेस स्वतःला. "
"हे खरं नाही. "
"पत्ता शोधत इथे आलेली तू खरी नाहीस. आयुष्यात डोकावणार्‍या, मार्गात येणार्‍या नकोशा, त्रासदायक प्रश्नांना दूर सारत स्वतःला शोधायला, हवं ते मिळवायला बाहेर पडलेली ती मुलगी निदान खरी होती."
"नाही झेपली मला नाती. नाही जमलं कुणाशी. गुंता तेवढा झाला. तो सोडवत एकेक पाऊल पुढे टाकण्यातच मग इतकी शक्ती खर्च होतेय की.. स्वतःचं काही शिल्लकच राहत नाहीये. "
"आलेले अनुभव म्हणजेच पुढचं सगळं आयुष्य नसतं, हे तेव्हा नीट कळलं होतं तुला. मग नंतर काय झालं? काही नाती तुटली, तर सोडून जायचं त्यांना तिथेच. पण ते तुटके अवशेष जवळ बाळगलेस. मग पुढच्या सगळ्याच जगण्यावर तो तुटकेपणाचाच अंश. सुखी शेवटाकडे कशी येणार अशाने तुझी कथा मग?"

ममाने घर सोडून जाताना तिला विश्वासात घेतलं नव्हतं. नंतरही कधी फारसा संवाद झाला नव्हता त्यांच्यात. तसा तो असता, तर कदाचित तिने विचारून घेतलं असतं तेव्हाच, की नात्यांचे बंध जर इतके कमकुवत असतात की सहज तोडून पुढे जावं, तर मग माझ्याच पायात का अशा चिवट जुन्या बंधांचा गुंता अडकतोय? की ते बाजूला सारून तू जाऊ शकलीस सहजतेने, म्हणूनच मला कोणत्याही नात्यामध्ये कायमचं स्वतःला अडकवून ठेवण्याची भीती वाटत राहिली?

म्हणजे गोष्ट तिला वाटलं होतं तशी त्याच्या अंगणापासून सुरू होत नव्हतीच तर? त्याच्याही खूप आधीपासून. तिची एकटीची कदाचित.

"माहीत नाही. तुला हवा आहे तसा गोष्टींचा शेवटही खरा नाहीच. प्लीज.. नको बोलूयात त्याबद्दल. निदान आतातरी. इतक्या वर्षांनी भेटतोय.."

जराही वारा नव्हता. गच्च दाटलेले ढग पुंजक्यापुंजक्यांनी नुसतेच एकमेकांजवळ गोळा होत होते. गच्चीबाहेरचं आणि आतलंही जग स्तब्ध, निश्चल, अगदी स्थिरावल्यासारखं झालं होतं.

"तुझ्याबद्दल काय? तूसुद्धा जाहिराती रंगवत, नाहीतर त्यांच्या फिल्म्स बनवत राहिलास. संगीत तुझं इतकं आवडतं असणारं एकेकाळी. मला वाटलं होतं स्वतःचं काहीतरी निर्माण करशील त्यातूनच तूही. पण.."
"ते माझ्याजवळ आहेच नेहमी. जे जवळ आहे, स्वतःचं आहे, ते विकून त्यात करिअर करण्याचा, पुढे जाण्याचा हट्ट केला नाही म्हणूनच कदाचित, अजून माझ्याजवळ शिल्लक आहे ते."
त्याचे क्रूर शब्द दुखावत होते. तिला काही उत्तर सुचेना. ती वळली. हातांच्या मुठींत नखं रोवत नुसतीच उभी राहिली. स्वतःतल्या हरवत गेलेल्या अमूल्य ठेव्याची किंमत तिला नव्हती असं अजिबात नाही; पण तिला आपण करूच काय शकत होतो त्या त्या वेळी ते कळेना. निसटत गेलेले ते ते क्षण नाही पकडता आले. तेवढी मुभाच नव्हती आपल्याला. दुसर्‍याच्या अंगणात उभं राहून असे हक्क मिळवता येत नसतात. याला ते क्षण पकडून ठेवायची असोशीच नव्हती.. ते नेहमी त्याच्यातच होते.

बोटांच्या अग्रांवर वरच्यावर चिकटवलेले ते क्षण.. ते आपले नव्हतेच, तर आता ते हरवून बसण्याचं दु:ख का करावं? आणि हा.. नुसता पूर्वीचा मित्रच नव्हे, आपले निसटलेले क्षण मुठींमध्ये पकडून असलेला.. जे आपल्याला जमू शकलं नाही, ते प्रामाणिकपणे निभावून नेलं याने. आपल्यासारखी दूरचं काही धावत जाऊन मिळवल्याची नशा महत्त्वाची नव्हतीच याला..

कशाला आलो आपण इथे? न उमटूनही छान जगता येतच होतं नां? पण ती समजूत खरी नाही. हे आताचं इथे असणंही खरं नाही.. आपणच खर्‍या नाही!!
एकदा हरवलेलं हाताला पुन्हा न गवसण्याइतकं अप्राप्य असतं का? आपल्याला काहीच नीटसं समजून घेता का येत नाहीये?
"कमॉन.. इतकी टेन्स होऊ नकोस. त्यावेळी गेलीस, पुढचे ते सगळे मागे वळून न बघता केलेस ते प्रवास तुला आवश्यकच होते, हे कळतंय मला आता. पण तेव्हा.. इतकी वर्षं.."

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. अंधारात त्याची तिच्याकडे निरखून पाहणारी नजर.. तीच होती का? तिच्या चेहर्‍यावर उमटलेली दीपकळ्यांची आरास पहाणारी.. तिला ठरवता येईना. तिचे पाय लटपटायला लागले. आधारासाठी काहीतरी धरावं, तसे तिने आपले हात हलवले.. तिला वाटलं.. हा क्षण खरा नाही.. अगदी अ‍ॅब्सर्ड! पण मग त्याने सहजपणे पुढे होऊन तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. या आवेगाची तिने अपेक्षा केली नव्हती. तिला ते हवं होतं किंवा नाही, काही ठरवताच आलं नाही. तो आणि ती .. दोघांची गोष्ट तिला जमणार आहे का लिहायला, त्याला हवी तशी? त्या असहाय्य स्थितीतही तिने दिवसभर रचलेल्या आणि शेवटाकडे फसत गेलेल्या तिच्या लॅपटॉपवरच्या त्या सगळ्या कहाण्या, तिच्या नजरेसमोरून सरकत गेल्या. आणि तरीही मग स्वतःतल्या लाटा तिला थोपवता आल्या नाहीतच. तिला अंगणातल्या काळ्या दगडी पायर्‍यांवरचे त्याच्या मानेवरून वर सरकणारे आपले ओले हातच आठवत राहिले.. आणि आपल्या सगळ्याच हालचालींवरचा ताबा जावा, तशी ती त्याच्या स्वाधीन झाली. डोळे बंद करून घेताना त्यांच्यावरचा तो नऊ वर्षांपूर्वीचा झिमझिमता पाऊस तिने पुन्हा एकदा अनुभवला आणि त्याच्या चेहर्‍यावर मोरपिशी रंग पुन्हा एकदा पसरवला. जुनाच क्षण नव्याने परतून येताना यावेळी तिला तो स्पष्टपणे कळल्याच्या तीव्र सुखद जाणिवेत तिची शेवटची लाट विरत गेली.

मोत्यांसारखा अनोखा प्रकाश अस्पष्टपणे क्षितिजाच्या दिशेने वर उमलत जाताना तिने पाहिला. नक्की किती वाजले माहीत नव्हते, पण ही वेळ आपण कधी पाहिलीच नाहीये असं तिला वाटलं. या वेळेआधीही ती कितीतरी वेळा नक्कीच उठलेली होती. अवेळच्या फ्लाइट्स पकडण्यासाठी, नाहीतर ट्रेन-टॅक्सीज पकडण्यासाठी, एखाद्या शहरात परतून येण्यासाठी, नाहीतर शहर सोडून जाण्यासाठी .. पण संथपणे असं यावेळी क्षितिजाकडे पाहत राहण्यासाठी ही वेळ समोर नाहीच आली कधी. अशा निवांत न पाहिलेल्या वेळा याच्या घरी अशा आपसूक सामोर्‍या येणार असतील तर.. कदाचित त्यासाठीही आपण पुन्हा पुन्हा इथे परत येऊ..

सोफ्यावर पाय वर घेऊन बसत तिने लॅपटॉप पोटाशी धरला. आज रात्री परत जायला निघायचंय. स्टोरी संपवायलाच हवी तोपर्यंत. तिच्या जगात गेल्यावर मीटिंगा-कॉन्फरन्सेस्-क्लायंट्स-प्रेझेंटेशन्सचं चक्र एकदा सुरू झालं, की त्या केऑसमध्ये ही स्टोरी कुठल्याकुठे भिरभिरत जाईल.

नैना अपने पिया से लागे रे.. रशीद खानच्या आवाजाने ती लहानशी लिव्हिंगरूम भरून गेली आणि तिने मागे वळून पाहिले. त्याचं असणं आणि गाणं किती एकमेकांत मिसळून गेलेलं आहे. आपण आलोय म्हणून हा आपल्याला पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटणारी अशी सगळीच गाणी मुद्दाम लावतो, की तो लावतो ती गाणी आपल्याला पुन्हापुन्हा ऐकायला आवडतात, हा एक प्रश्न तिला तेव्हाही पडत असे आणि आज तो नव्याने पडला. पण काही काही प्रश्नांची उत्तरं नाही शोधली तरी चालतात. जगात असे आपल्याला कंफर्टेबल बनवणारे प्रश्न अजून शिल्लक आहेत, या भावनेने ती जरा सुखावल्यासारखी झाली. तू ऐक तुझं 'नैना अपने पिया से लागे रे..'. मला आपलं माझं 'पिया तोसे नैना लागे रे..'च आवडतं! - ती पूर्वी मुद्दाम त्याला म्हणायची. आता नाही. यांपैकी कोणतंच गाणं गेल्या कित्येक वर्षांत तिने ऐकलेलंच नव्हतं.

इथे आल्यापासून पहिल्यांदाच ती आत त्याच्या स्टुडिओत गेली. त्याची ती नेहमीच्याच परिचयाची उंच, काहीशी कृश आकृती तिला समोर दिसत होती. काचेतून त्याच्या हालचाली निरखून बघत असताना तिला छान वाटलं उगीचच. उघड्या गच्चीच्या चौकोनाला लागूनच असलेल्या त्याच्या चिमुकल्या किचन काउंटरवर कप मांडून तो एकाग्रतेने चहा गाळत होता. त्याने मागे वळून आत कपाटात ठेवलेल्या कपांच्या सेटमधला तिच्या आवडत्या पारदर्शक निळ्या रंगाचा कप काढला आणि तिला चक्क भरून आल्यासारखे झाले. मध्यरात्री त्या पायर्‍यांवर बसून त्याने म्हण असं नुसतं सांगितल्यावर आपण लगेच गाणं म्हणून दाखवायचो, त्या रात्री उलटून संपून गेल्याला खरंच इतकी वर्षं झाली?

यादरम्यान इतकी वेगवेगळी नाती आपल्या दोघांच्याही आयुष्यांत येऊन गेली.. आता याक्षणी, दोघांमध्ये त्यातलं एकही शिल्लक नाहीये. पुन्हा फक्त तेच दोघे आहेत.

गोष्ट सुरू होताना त्याची आणि तिची होती.. आताही फक्त तेच आहेत.. आणि त्यांच्यामध्ये भरून राहिलेलं गाणं.. त्याच्यातून तिच्यापर्यंत सहज पोचत असलेलं.. तसंच आहे ते. सगळं खूप जुनं.. सुरक्षित आहे, सुगंध टिकवून आहे असं तिला वाटलं. आणि गोष्टीच्याही आधी अंगणाबाहेर एकटी असलेली ती.. आतातर सोबत स्वतःला नव्याने गवसलेली तीसुद्धा आहे. त्या सगळ्या दिवसांमध्ये तिचं मन परत गेलं.
त्याच्या या उंच घरातल्या गच्चीवर मनाचे दरवाजे खुले करून ती उभी राहिली होती आणि आत-बाहेर मोकळं अंगण होतं.. सर्वांना सामावून घ्यायला, जागाच जागा होती. पुन्हा त्यात तिने परतायचं धाडस केल्यामुळे आत्मशोधाची हरवलेली वाट परत मिळतेय, असं तिला वाटायला लागलं. अंतिम टप्पा तिचा स्वतःचाच असणार आहे. त्याचं असणं, त्याचं गाणं, तिचं लिहिणं.. गोष्ट पुरी करणं.. ह्या सगळ्यांतला तिचा आविष्कार तेवढा खरा असणार आहे. त्याच्याकडे परतून येणं किंवा त्याने तिची वाट बघणं हे केवळ निमित्त.

घरातून बाहेर पडताना तिच्या आईची लग्नातली जुनी पैठणी तिने सोबत नेली होती. गेल्यावर्षी पहिल्यांदा ती उघडून पाहिली, तेव्हा आतल्या घडीतले केवड्याचे अजूनही आपला मंद सोनसळी सुगंध जपून असलेले पान अलगद तिच्या मांडीवर पडले होते.
त्याच्या घराचा पत्ता शोधायला तिने तेव्हापासूनच सुरुवात केली होती बहुतेक.

त्या सुरक्षित, बंदिस्त, सुंदर अंगणातलं त्यांचं दोघांचं आयुष्य, त्यांच्यातलं नातं, बाहेरच्या जगात आल्यावरही विस्कटून नव्हतं गेलं.. छान विस्तारलं होतं.
तास-न्-तास बोललो आपण त्या फक्त गप्पा नव्हत्या.. त्याने ऐकवलेलं आणि तिने म्हटलेलं ते फक्त गाणं नव्हतं.. त्याहून पलीकडचं काही.. रंग, आकार आणि घनता असलेलं, आणि त्याच्याही आतलं उसळून येणारं, तिच्या आणि त्याच्या मनांतली एकमेकांबद्दलची जाग सजग ठेवणारं असं ते काहीतरी .. सुखी शेवटापर्यंत सहज प्रवास करून जाणारं असं ते तेव्हाच जन्मलं होतं त्यांच्यामधून.

गोष्टीची सुरुवात फक्त आता होणार होती.

स्टुडिओचं दार उघडून तो आत येणार त्या क्षणाच्या आधीच तिने त्याच्या म्युझिक सिस्टिमचं बटण प्रेस केलं. तिचं ते जुनं गाणं.. त्याने शिट्टीवर वाजवलेलं.. तो आत आला. त्यानंतर कधीतरी सुरू झालेले विवाल्डीचे ते चारही ऋतू एकामागोमाग एक क्षणार्धात त्यांच्या अंगांवर बरसत राहिले.. पुन्हा पुन्हा.. आणि पुन्हापुन्हा पांढर्‍याशुभ्र स्टुडिओच्या भिंतींवर मोरपिशी रंगाचा शिडकावा करत उधळले...!

- tulip

रेखाटने - Divya