राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी

Rar - harishchandra.jpg
३ मे १९१३...गिरगावातील 'कॉरोनेशन सिनेमा' च्या परिसरात जमलेल्या गर्दीनं एक अद्भुत क्षण अनुभवला. दादासाहेब फाळके निर्मित "राजा हरिश्चंद्र" हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला.

याच इतिहासाच्या एका पानावर नुकतीच म्हणजे सप्टेंबर २००९ मधे सन्मानानी नोंद झाली 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या मराठी चित्रपटाची...निमित्त होतं जगविख्यात ऑस्कर स्पर्धेसाठी भारतातर्फे झालेली या चित्रपटाची निवड!
वृत्तपत्रात 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' बद्दल वाचताना नकळत मनात विचार चालू झाले... काय योगायोग आहे नाही? महाराष्ट्राच्या विविध पैलूंपैकी एक महत्वाचा पैलू म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी. मुळात अवघ्या भारतीय चित्रपटयुगाची मुहुर्तमेढ रोवली ती देखील दादासाहेब फाळके या एका मराठी माणसानंच!

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या निमित्तानं महाराष्ट्राला आज वयाची 'पन्नाशी' साजरी करत असताना मराठी चित्रपट जगताकडून मिळालेली ही अमूल्य भेटच नाही का! आणि गंमत म्हणजे चित्रपटाचा विषयही काय? तर ९५ वर्षापूर्वीच्या 'राजा हरिश्चंद्र' ह्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीचा, त्या काळाचा, त्या इतिहासाचा मागोवा घेणारा... !
Publicity_poster_for_film_Raja_Harishchandra_(1913).jpg'भारतातर्फे हरिश्चंद्राची फॅक्टरी ची ऑस्करसाठी निवड' ही माझ्या डोळ्यासमोरची बातमी आता धूसर व्हायला लागली होती. त्या जागी डोळ्यासमोर आता वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स, त्यात मांडले गेलेले विषय, त्या चित्रपटांतील वेगवेगळे प्रसंग, त्यांना पडद्यावर साकारणारे कलाकार दिसायला लागले. "राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी" या कालावधीत झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवासाबद्दलच्या विचारांची 'रिळं' आता डोक्यात फिरायला लागली... मराठी चित्रपट काळाप्रमाणे किती बदललाय याची नव्यानं जाणीव झाली. मनात पटकन् विचार चमकून गेला "काय कमाल आहे नाही! साक्षात 'राजा हरिश्चंद्र' देखील आजच्या इंग्रजीच्या विळख्यातून सुटलेला नाही तर. त्याला सुद्धा काळानुसार बदलावं लागलंय... जसे 'छत्रपती शिवाजी महाराज' नव्या युगात शिवाजीराजे भोसले झालाय... अगदी तसाच !

तब्बल ९५ वर्षाचा काळ... जुना.. नवीन.. बदललेला...बदलत जाणारा... आणि काळाबरोबर अगदी चित्रपटाच्या नावापासून ते निर्मिती, तंत्रज्ञान, गाणी, चित्रपटाचा विषय.. अशा सगळ्याच पातळ्यांवर बदलत गेलेला मराठी चित्रपट ! मराठी चित्रपटातल्या ह्या प्रत्येक पैलूमधे घडलेला बदल म्हणजे एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. मग आपण लिहायला घेतलंच कधी, तर "राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी" या प्रवासातल्या मराठी चित्रपटसॄष्टीनी अनुभवलेल्या नक्की कोणत्या स्थित्यंतराबद्दल विस्तारानी लिहावं?.. गाण्यांबद्दल... निर्मितीबद्दल...तंत्रज्ञानाबद्दल, अभिनेते-अभिनेत्रींबद्दल... की खुद्द चित्रपटाच्या विषयाबद्दल....???

A_scene_from_film_Raja_Harishchandra_1913_1.jpg
माझ्या मनात कुठेतरी नकळत हे द्वंद्व चालू असणार, कुठेतरी माझ्याही नकळत मराठी चित्रपटाच्या ह्या वेगवेगळ्या पैलूंवर डोक्यात विचार होत असणार कारण एका क्षणी अचानक माझ्या लेखाचा विषय आणि आवाका मला नजरेसमोर दिसला. निमित्त ठरलं ते योगायोगानं याच काळात वाचनात आलेलं नंदन निलेकणींचं 'Imagining India' हे पुस्तक. ह्या पुस्तकात जेव्हा 'समाजात घडणार्‍या सर्व पातळीवरच्या स्थित्यंतराचं हिंदी चित्रपटातून वेळोवेळी दिसून आलेलं प्रतिबिंब' या संकल्पनेचा उल्लेख वाचनात आला, त्याच क्षणी मनातलं द्वंद्व संपलं. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत स्वत:ला अनेकवेळा विचारलेला प्रश्न, वेळोवेळी केलेलें निरिक्षण - मी मराठी चित्रपटसॄष्टीच्या बाबतीत विचारायचं ठरवलं आणि ते म्हणजे गेल्या ६०-७० वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांमधून कोणकोणते विषय हाताळले गेले आहेत, मांडले गेले आहेत? बदलणार्‍या काळाचे ठसे मराठी चित्रपटांच्या सगळ्याच कालखंडात तितक्याच खोलवर किंवा स्पष्टपणे उमटले आहेत का?

ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा माझ्या कुवतीप्रमाणे मी केलेला एक प्रयत्न म्हणजे हा लेख - राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या काळात मराठी चित्रपटातून मांडले गेलेले विविध विषय !

Phalke_0.jpgदादासाहेब फाळक्यांनी 'राजा हरिश्चंद्र' च्या रुपानं कॅमेर्‍याशी, त्या रुपेरी पडद्याशी, या चित्रपट माध्यमाशी लोकांची ओळख करुन दिल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे चित्रपट मुकाच राहिला... मराठीच नव्हे तर अवघ्या भारतीय चित्रपटाला पहिला आवाज लाभला प्रभात चित्र कंपनीच्या 'अयोध्येचा राजा' या चित्रपटापासून. ह्या चित्राच्या निर्मितीपासूनच भारतीय चित्रपटाच्या इतिहासातलं 'बोलपटांचं' एक अद्भुत युग सुरु झालं. सुरुवातीच्या काळात, मुळात चित्रपट माध्यमच लोकांना इतकं नवीन होतं की प्रेक्षक चित्रपट बघायला येत तेच मुळी ह्या माध्यमाची नवलाई म्हणून! आजपर्यंत ज्या गोष्टी कीर्तनातून ऐकल्या होत्या, पोथ्यांमधून वाचल्या होत्या आणि क्वचित नाटकांमधून उलगडल्या जात होत्या, त्या कथा डोळ्यासमोर प्रत्यक्षपणे पडद्यावर साकार होत आहेत याचंच प्रेक्षकांना खूप अप्रूप होतं. त्यामुळे त्या काळात चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अभिनय या ही पेक्षा 'कॅमेर्‍याने घडवलेला एक चमत्कार' याच दृष्टीनी लोकं चित्रपट बघायला येत, त्यालाच लोकांच्या दृष्टीनी अधिक महत्व होतं. एकीकडे निर्माते दिग्दर्शकांचा कलही 'चित्रपट' हे नवीन माध्यम शिकण्याकडे, त्यातील तंत्रज्ञान अवगत करून घेण्याकडेच जास्त होता. साहजिकच प्रेक्षकांची ही मानसिकता आणि नवीन तंत्रज्ञान ह्यांचा विचार करता 'परिचित' असलेल्या कथानकावर म्हणजेच मुख्यत: पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवरच चित्रपट काढण्यात आले.

अगदी चित्रपट बोलू लागण्यापूर्वी आणि बोलू लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारणत: १९३०-१९४० च्या दरम्यान अयोध्येचा राजा, कालिया मर्दन, भक्त प्रल्हाद, माया -मच्छिंद्र, श्यामसुंदर, गोपाळकृष्ण, सैरंध्री (भारतातला पहिला रंगीत चित्रपट) यांसारख्या 'पौराणिक' कथांवर आधारित चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी सर्वात अधिक कथानकं पुरवली ती शिवचरित्रानं! एक तर शिवरायांचं अवघं जीवनच, अगदी त्यांच्या बालपणापासून, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यापर्यंत ते त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीपर्यंत 'नाटयमय' प्रसंगांनी भरलेलं. शिवाय स्वत: महाराज आणि त्यांचे साथीदार यांच्या एका पेक्षा एक पराक्रमाच्या, स्वामिनिष्ठेच्या कथांनी महाराष्ट्राचा इतिहास पावन झालेला. त्यामुळे महाराष्ट्राकरता आणि मराठी माणसाकरता लढाई, युद्ध, देशप्रेम, कर्तव्य, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती, पराक्रम म्हणजे 'शिवरायांचं चरित्र' हे जणू समीकरण... साहजिकच एक 'हुकुमी ऐतिहासिक विषय' म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेले चित्रपट मराठीमधे निर्माण केले गेले. राजा शिवछ्त्रपती, सिंहगड, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, नरवीर तानाजी यांसारख्या 'ऐतिहासिक' विषयांवरच्या चित्रपटांनी हा (आणि याही पुढचा बराचसा ) काळ गाजवला. वास्तविक पाहता पेशव्यांच्या पराक्रमाचा, भाऊबंदकीचा, अगदी पेशवाई रसातळाला जाण्यापर्यंत पेशवाईच्या इतिहासाचा महाराष्ट्र तितकाच साक्षीदार असूनही 'रामशास्त्री' (१९४४) सारखे काही मोजके चित्रपट सोडले, तर बहुतेक ऐतिहासिक चित्रपटांनी कथानकासाठी शिवचरित्राचाच आधार घेतला.

मराठी चित्रपटांच्या याच सुरुवातीच्या कालखंडात अजून एक विषय मराठी चित्रपटातून मोठया प्रमाणात आणि अतिशय यशस्वीपणे हाताळला गेला तो म्हणजे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संताच्या जीवनकार्याचा. एकंदरीतच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीमध्ये वारकरी पंथाच्या शिकवणूकीचा आणि संतवाड्मयाचा प्रभाव पाहता, या संतसाहित्यावर आधारित असलेले चित्रपट त्याकाळात आणि त्यानंतरही अनेक काळ लोकांच्या पसंतीस उतरले. महाराष्ट्रात खोलवर रुजलेल्या भेदभावाच्या, स्पृश्य-अस्पृश्यतेच्या आणि सामाजिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, भक्त दामाजी, झाला महार पंढरीनाथ, जोहार मायबाप, संत गोरा कुंभार, धर्मात्मा ह्यांसारख्या संताच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या चित्रपटांनी एका अर्थानी, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्याकाळच्या सामाजिक परिस्थितीवर, समाजाच्या मानसिकतेवर नजर टाकली. समाजातली जातीव्यवस्था, वर्णभेद यावर प्रकाश टाकून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करणारे, एका अर्थाने मराठीतले पहिले 'सामाजिक चित्रपट' कोणते म्हणता येतील तर ते हे संतांच्या जीवनावर आधारलेले चित्रपट. मराठी संतपटांच्या कामगिरीचा उल्लेख करताना 'संत तुकाराम' या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल. केवळ मराठीच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला 'मेगा हिट' चित्रपट आणि आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेला पहिला भारतीय चित्रपट म्हणजे १९३६ सालचा हा प्रभातचा 'संत तुकाराम'!

एकीकडे मराठी चित्रपट, पौराणिक, ऐतिहासिक आणि संतसाहित्यावर आधारित कथानकांची मांडणी करत करत चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेशी अधिक अधिक परिचित होऊ लागला होता. मराठी चित्रपट असा हळूहळू विकसित होत असताना, चित्रपटनिर्मितीच्या तंत्राबद्दल निर्माते- दिग्दर्शक यांच्यात जास्त आत्मविश्वास निर्माण झाल्यावर, आपोआपच चित्रपटात मांडण्यात येणार्‍या विषयाबद्दल, त्या विषयाच्या हाताळणीबद्दल अधिक खोलवर आणि बारकाईनं विचार करण्याची आवश्यकता जाणवू लागली. या जाणीवेतून मराठी चित्रपटात कथा आणि पटकथा या चित्रपटातल्या दोन महत्वाच्या पैलूंचा अधिक गांभीर्याने विचार केला जाऊ लागला. समाजात आजूबाजूला घडणार्‍या घटना, सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणारे प्रसंग, राजकीय पुढार्‍यांच्या आणि समाजसेवकांच्या प्रभावामुळे बदलू पाहणारा, रुढीतून मुक्त होऊ पाहणारा समाज आणि एकीकडे त्याला बंधनात ठेवणार्‍या परंपरा आणि रुढी यातला संघर्ष अशा विविध विषयांकडे 'चित्रपटाच्या कथेचे विषय' म्हणून पाहिलं जाऊ लागलं आणि बघता बघता खर्‍या अर्थानं मराठी चित्रपट सामाजिक आणि कौटुंबिक विषयांकडे वळला. लौकिकार्थाने यशस्वी ठरलेला मराठीतला पहिला सामाजिक चित्रपट म्हणजे १९३७ सालचा प्रभातचा 'कुंकु'. जरठ-बाला विवाहाची समस्या मांडणार्‍या ह्या चित्रपटानं त्या काळच्या विवाहसंस्थेवर आणि पर्यायानी कुंटुबव्यवस्थेवर प्रकाश टाकला आणि लोकांना त्याविषयी विचार करायला परावृत्त केलं. एका सामाजिक समस्येकडे उघडपणे आणि डोळसपणे पाहणार्‍या 'कुंकु' ह्या चित्रपटाने विवाहसंबंधांविषयी एक क्रांतिकारी विचार त्या वेळच्या समाजाला दिला. मराठीत पुढच्या काळात जे सामाजिक चित्रपटांचं युग निर्माण झाले त्यांची नांदी 'कुंकु' ह्या चित्रपटापासून झाली, तर ह्या सामाजिक समस्यांना प्राधान्य देणार्‍या चित्रपटांना दिशा दिली ती प्रभातच्याच 'माणूस' (१९३९) आणि 'शेजारी' (१९४१) या अजून दोन चित्रपटांनी. 'माणूस' ह्या चित्रपटातून एक फौजदार आणि एक वेश्या यांची प्रेमकहाणी रंगवताना, त्या वेश्येशी लग्न करून तिला माणूस म्हणून समाजात स्थान देण्याचा फौजदाराचा प्रयत्न आणि त्याला विरोध करणारा समाज यातला संघर्ष दिसला तर 'शेजारी' मधे त्या काळाइतकाच आजच्या काळातही महत्वाचा ठरलेला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा विषय हाताळण्यात आला.

१९४० चं दशक भारतासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या सर्वंच पातळ्यांवर धामधुमीचं ठरलं. भारताच्या इतिहासातलं एक मोठं पर्व या दशकानं अनुभवलं... चळवळीचं, स्वातंत्र्याचं, फाळणीचं... देशामधे सर्व पातळ्यांवर घडलेल्या परिवर्तनाचं!

१९४७ ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, पाठोपाठ अनुभवलेले फाळणीचे आणि गांधी हत्त्येने उसळलेल्या दंग्यांचे दिवस सरेपर्यंत, सामान्य माणसाला बेकारी, महागाई, रोगराई, लोकसंख्यावाढ अशा विविध समस्यांनी ग्रासलं. भारतातली आणि त्याच बरोबरीनं महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक परिस्थितीही या काळात झपाटयानं बदलत गेली. भारत स्वतंत्र झाला खरा, पण मध्यमवर्गीय माणसाला स्वातंत्र्याकडून असलेल्या सगळ्याच अपेक्षा, सगळी स्वप्न काही पूर्ण झाली नाहीत आणि समाजाला वास्तवतेचे चटके जाणवायला लागले. शहराबरोबरच ग्रामीण भागाला आणि तिथल्या राजकारणाला महत्व प्राप्त झालं. शहरातला सामान्य माणूस सरकारी नोकरीसाठी धडपडू लागला, गिरणीकामगार समाजवाद आणि वित्तवाद याच्या भोवर्‍यात सापडला, तर ग्रामीण भागातला शेतकरी जमिनदारांच्या कर्जाखाली भरडला गेला. एकीकडे भारतात इतकं मोठं राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतर होत असतानाच, १९५०- ६० च्या दरम्यान मराठी चित्रपटनिर्मितीच्या व्यवसायानं पुणे सोडून कोल्हापूरची वाट धरली. या बदलाचाही मराठी चित्रपटांवर मोठा परिणाम झाला. हळूहळू मराठी सिनेमातून दिसणारं शहरी, मध्यमवर्गीय समाजाचं चित्रण बदलत जाऊन ५०-६० च्या दशकात ते मुख्यत: ग्रामीण जीवनावर येऊन स्थिरावलं. या ग्रामीण सामाजिक कथांना जोड मिळाली 'तमाशा या मनोरंजनाच्या माध्यमाची' आणि त्याचबरोबर मराठीतील तमाशापटांचं एक युगच निर्माण झालं. पुढील काळात तर अनेकदा अशा चित्रपटात तमाशाला मूळ कथानकापेक्षा अधिक महत्व दिलं गेलं.

सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर गावावर हुकुमशाही गाजवणारा गावचा पाटील, जमीनदार किंवा सावकार , कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा शेतकरी, परिस्थिती आणि गरीबीनं गांजलेलं त्याचं कुटंब आणि कलेचं प्रतीक मानली गेलेली तमासगीरीण अशा त्या काळच्या तात्कालिक परिस्थितीवर आधारलेल्या व्यक्तीरेखा ह्या ५०-६०-७० च्या दशकात मराठी चित्रपटाचा अविभाज्य भाग झाल्या. हे तमाशापट प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्राचा प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जात होते. 'पुढचं पाऊल (१९५०), सांगत्ये ऐका (१९५९), पिंजरा (१९७७) यासारखे उत्कृष्ट कथानक लाभलेले तमाशापट कोणत्याही भौगोलिक सीमा न जुमानता लोकप्रिय ठरले असले तरी या ३०-३५ वर्षाच्या दीर्घ कालावधीत प्रदर्शित झालेले तमाशापट हळूहळू कथेत एकसूरीपणा आल्याने, एकाच साच्यातले, एकाच पठडीतले वाटायला लागले. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांच्या नजरेसमोर तर मराठी चित्रपट म्हणजे तमाशापट, म्हणजे लावणी-सवालजबाब, म्हणजे फेटे बांधलेले गावातले पाटील हे समीकरण, हे चित्र अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे गेल्या १५ वर्षापर्यंत पक्कं होतं.

जसजशी चित्रपट निर्मिती व्यवसायानं प्रगती केली तसतशी मराठीमधे प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांची संख्या, त्यात हाताळण्यात आलेले विषयही वाढत गेले. अनेक निर्माते, दिग्दर्शक वेगवेगळ्या धाटणीचे, प्रकारचे (genre) चित्रपट निर्माण करायला लागले. एकाचवेळी पौराणिक चित्रपटापासून ते सामाजिक, कौटुंबिक, तमाशापट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. या प्रकारातला मराठीनी अत्यंत समर्थपणे हाताळलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला प्रकार म्हणजे विनोदी चित्रपट!

आचार्य अत्र्यांच्या गाजलेल्या विनोदी नाटकांवर हंस पिक्चर्सने १९३७-३८ च्या सुमारास निर्मिती केली 'ब्रह्मचारी', 'ब्रॅंडीची बाटली' या चित्रपटांची आणि इथेच मराठी चित्रपटातला विनोदाचा पाया रोवला गेला. ही परंपरा पुढे चाळीसच्या दशकाचा उत्तरार्ध आणि पन्नासचं दशक या काळात दामूअण्णा मालवणकर, पु.ल. देशपांडे, राजा गोसावी, शरद तळवलकर, राजा परांजपे यासारख्या अभिनेत्यांनी समर्थपणे चालवली. मराठी चित्रपटांवर मराठी साहित्याचा आणि रंगभूमीचा प्रभाव असल्यानं, मराठी विनोदपटांचं स्वरुप प्रामुख्यानं कौटुंबिकच राहिलं. 'गुळाचा गणपती' (१९५३) सारख्या निवडक चित्रपटांचे अपवाद वगळले तर मराठी चित्रपटाने फार कमी वेळा राजकीय अथवा सामाजिक व्यंगावर टिका केलेली आढळते.

मराठी विनोदी चित्रपटांचा विषय जेव्हा येतो तेव्हा दादा कोंडकेंच्या चित्रपटांचा उल्लेख आवर्जून केला जातोच. एका निरागस, भोळ्या भाबड्या सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या छोट्या छोट्या साध्याश्या वाटणार्‍या, प्रसंगी दुर्लक्षित होणार्‍या घटनांना दादांच्या चित्रपटात विनोदी प्रसंगांचं स्थान मिळालं. दादा कोंडकेंच्या 'सोंगाडया', 'पांडू हवालदार', 'एकटा जीव सदाशिव' यासारख्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांनी 'सिल्व्हर ज्युबली' चित्रपटांचा मान मिळवला. पण दादा कोंडक्यांच्या चित्रपटातला विनोद हा मुख्यतः द्वयर्थी संवादांवर आधारीत असल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेची व्याप्ती ही ग्रामीण महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली.

एकीकडे मराठी रंगभूमीवर जेव्हा फार्सिकल नाटकांनी यश मिळवायला सुरुवात केली तेव्हा तेच सूत्र बर्‍याचश्या प्रमाणात मराठी चित्रपटांनीदेखील अंगीकारलं. ८० आणि ९० च्या दशकात सचिन-अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे या त्रयीने तर फार्सिकल चित्रपटांवरच अफाट लोकप्रियता मिळवली. सचिनचा 'नवरी मिळे नवर्‍याला' आणि त्याच जमान्यातला महेष कोठारेचा 'धुमधडाका' हे चित्रपट मराठी प्रेक्षकानी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आणि मराठी चित्रपटातल्या ग्रामीण विनोदाची शहराकडे वाटचाल सुरु झाली. याचा परिणाम म्हणजे नव्यानं मराठी चित्रपटांना शहरातला तरूण वर्ग प्रेक्षक म्हणून लाभला. सचिन आणि महेष कोठारेला 'मराठी प्रेक्षकांची नाडी सापडली' किंवा formula मिळाला असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. महेष कोठारेचे 'दे दणादण' , 'झपाटलेला', ' थरथराट' किंवा सचिनचे 'गंमत जंमत', माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी हे सगळेच चित्रपट मराठीमधले 'मेगा हिट' चित्रपट ठरले. या काळातल्या चित्रपटांकडे अनेक वर्ष प्रेक्षकांनीही केवळ मनोरंजनाचं एक साधन म्हणूनच पाहिलं. फार्सिकल विनोदाची परंपरा अगदी अलिकडेच लोकप्रिय झालेल्या 'वळू' सारख्या चित्रपटांपर्यंत अविरतपणे चालू असलेली आढळते. विनोदपटात जे काही मोजकेच प्रयोग झाले त्यात नवलकथा (फॅंटसी) वर आधारीत 'एक डाव भुताचा', 'भुताचा भाऊ' आणि अलिकडेच आलेले 'अगबाई अरेच्चा', 'चष्मेबहाद्दर', 'ईश्श' यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनापेक्षा वेगळं जग दाखवणारा, ताण तणाव विसरायला लावणारा विनोदी चित्रपट वेळोवेळी प्रेक्षकांनी पसंत केला. मराठी विनोदपटांनी चित्रपट निर्मितीमागील 'मनोरंजन' हा हेतू सफल करण्याचं कार्य यशस्वीपणे पार पाडलं आणि आजही ही परंपरा भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे यांसारखे कलावंत 'भागम-भाग', '९ महिने ९ दिवस', 'जत्रा', 'मुख्यमंत्री गणप्या गावडे', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' यासारख्या चित्रपटातून अखंडीतपणे चालू ठेवत आहेत.

मनोरंजनाबरोबरच समाजातल्या घटनांचं प्रतिबिंब मराठी चित्रपटात डोकावताना दिसू लागलं... आणि राजकारण हा देखील याला अपवाद ठरला नाही. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यपूर्व काळात तर सेन्सॉर बोर्ड ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली असल्यामुळे तात्कालिक राजकिय विषय चित्रपटांतून मांडण्यावर अर्थातच मर्यादा होत्या. १९४७ साली आलेला राम गबाल्यांचा 'वंदे मातरम' हा लौकिकार्थाने राजकीय पार्श्वभूमी असलेला पहिला मराठी चित्रपट. १९६०-७० च्या सुमारास भारताची शेतीविषयक धोरणं बदलल्यानंतर ऊस लागवडीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी मोठया प्रमाणावर खरेदी करण्यात आल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या जमिनदार, सावकार, सरपंच यांच्या ग्रामीण पातळीवरच्या राजकारणाला जोड मिळाली साखरकारखानदारांची. डॉ. जब्बार पटेल ह्यांनी 'सामना' चित्रपटात महाराष्ट्रातील शुगर लॉबीचं चित्रण, 'सिंहासन'मध्ये सत्तेसाठीची चढाओढ, तर 'मुक्ता' मध्ये जातियतावादाचे प्रश्न प्रभावीपणे हाताळले. तसं बघायला गेलं तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने आणिबाणी, प्रांतियतावाद यांसारखे अनेक विषय पुरवले असूनही तरीही राजकारण हा गाभा किंवा पार्श्वभूमी असलेले मोजके मराठी चित्रपट निर्माण झाले आणि प्रेक्षंकांच्या पसंतीस उतरले. सर्वसाक्षी, वजीर, सरकारनामा यासारख्या काही चित्रपटातून पुढील काळातही राजकारणाचं चित्र दिसून आलं.

एकूणच गेल्या ५०-६० वर्षातल्या मराठी चित्रपटांवर ओझरती जरी नजर टाकली आणि या काळात मराठी चित्रपटात हाताळलेले विषय बघितले तर लक्षात येईल की बहुतांशी मराठी चित्रपट हे फिरुन फिरुन शेवटी कौटुंबिक पातळीवरच येउन पोहोचतात. अगदी एकत्र कुटुंबपद्धतीपासून ते आजच्या काळातल्या विभक्त कुटुंबपद्धतीपर्यंत सगळे विषय, त्याच्याशी निगडीत असणारी सासू-सून, नणंद-भावजय, दीर-जाऊ ही नाजूक नाती, या नात्यांमधलं गहिरं प्रेम आणि त्यांच्यातले तणाव, समस्याही चित्रपटातून वेळोवेळी केवळ मांडल्याच गेल्या नाहीत तर मराठी चित्रपटांचा तो एक अविभाज्य भाग बनला आणि आजही आहे. साहजिकच कुटुंबसंस्थेचा महत्वाचा भाग असलेली घरातली स्त्री ही पण अनेक चित्रपटांची मध्यवर्ती भूमिका बनलेली आढळते. मराठी चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या पौराणिक चित्रपटांच्या काळातली राणी किंवा दासी, त्यानंतर चूल आणि मूल यांच्यात अडकलेली गॄहिणी, नंतरच्या काळात महागाईमुळे नोकरी करुन नवर्‍याला घरखर्चात हातभार लावणारी गृहलक्ष्मी, शिक्षण घेउन, नोकरी करून जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सर्वार्थानं स्वतंत्रपणे वावरणारी, मत मांडणारी आजच्या अधुनिक युगातली स्त्री ही तिची सगळीच रूपं बदलत्या काळानुसार चित्रपटातूनही साकारली गेली. मध्यमवर्गीय घरातल्या स्रियांना मराठी चित्रपटानं कधी 'श्यामच्या आई'च्या रूपानं संस्कार करणारी उदात्त माता म्हणून पाहिलं तर कधी 'मानिनी', 'सुवसिनी' म्हणून तर कधी 'वास्तुपुरुष' मधली मुलाच्या शिक्षणाचं स्वप्नं बघणारी धोरणी आई म्हणून. कधी 'मोलकरणीच्या' हालअपेष्टा तिच्या वाट्याला आल्या तर कधी 'माहेरच्या साडीचा' तिला आधार मिळाला. १९८० च्या सुमारास स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असताना स्त्रीने संघर्षाचा सामना आणि स्वीकार करत 'उंबरठा' ओलांडला आणि मराठी चित्रपटातली स्त्रीची प्रतिमाच बदलून गेली. 'जैत रे जैत' मधल्या ठाकर वस्तीवरच्या चिंधी पासून ते दोघी, बिनधास्त, सरीवर सरी, शेवरी अशी ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत, अल्लड, ध्येयवादी, आधिनुक अशी स्त्रीची वेगवेगळी रूपं मराठी चित्रपटानं आपल्याला दाखवली आणि या सर्वच स्तरावरच्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या समाजासमोर आणायला मदत केली.

सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मराठी माणूस हाच मराठी चित्रपटांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग असल्यानं मध्यमवर्गीय समाजाची मानसिकता, आर्थिक स्थिती, कौटुंबिक स्थिती जसजशी बदलत गेली तसंतसं मराठी चित्रपटातून दिसणारा मध्यमवर्गीय माणूसही बदलात गेला. १९५४ सालच्या 'उन-पाऊस' चित्रपटातून पहिल्यांदा मांडला गेलेला वृद्ध माता-पित्यांचा प्रश्न, नव्या बदललेल्या कुटुंबव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 'तू तिथे मी' किंवा 'पैलतीर' सारख्या चित्रपटातून मांडण्यात आला तर नव्या पिढीवर होत असलेला western culture चा प्रभाव मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांना इतका प्रकर्षानं जाणवला की 'सातच्या आत घरात' सारख्या चित्रपटातून त्याची आवर्जून दखल घेतली गेली.

मराठी चित्रपट जसजसा प्रगल्भ होत गेला, तसतसं त्यानी समाजात, लोकांमधे दिसणार्‍या शारिरिक आणि मानसिक व्याधींकडेही लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. विज्ञानयुगानं सामान्य माणसाला ज्ञानाचे, माहितीचे नवे पंख दिले, त्याच्या विचारांच्या कक्षा रूंदावल्या, त्याचा पूर्वी क्लिष्ट मानल्या गेलेल्या वैद्यकीय क्षेत्राशी परिचय वाढला. सामान्य माणसामधल्या या बदलाचा प्रत्यय मराठीचित्रपटानी हाताळलेल्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित चित्रपटांमधे दिसून आला. 'चौकट राजा' (१९९१) ह्या मानसिक विकलांगावर आधारलेल्या चित्रपटानं मराठीमधलं वैद्यकीय चित्रपटांचं पर्व सुरु केलं आणि २००० च्या दशकात ऑस्करची वारी करून आलेला 'श्वास' आणि त्याच्या जोडीने देवराई, नितळ, कदाचित यांसारख्या चित्रपटातून अतिशय प्रगल्भपणे वेगवेगळे वैद्यकीय विषय लोकांसमोर मांडले गेले.

ऐतिहासिक चित्रपटापासून ते अगदी वैद्यकीय चित्रपटापर्यंत मराठी चित्रपटांचा हा प्रवास तुमच्यासमोर मांडत असताना मराठी सिनेमामधे कोणते विषय हाताळायचे राहून गेलेत का? अस प्रश्न माझ्याही मनात लिहिताना येत होता आणि कदाचित तुमच्याही मनात वाचताना आला असावा. मला स्वत:लाच ह्याबद्दल प्रचंड कुतुहल आहे की भारताच्या स्वातंत्रलढयावर, त्यानंतर ६०-७० च्या दशकांमधे भारताने अनुभवलेल्या पाकिस्तान आणि चिनी आक्रमणावर किंवा ९० च्या दशकातल्या कारगिलच्या युद्धावर, त्या सैनिकांच्या जीवनावर आधारलेले कोणतेच नावाजलेले चित्रपट मराठीमधे का बरं निर्माण झाले नसतील? महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील दहशतवादी हल्ले, मुंबईतील टोळीयुद्ध, underworld आणि त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर होणारा प्रभाव हे हिंदी चित्रपटातून खूप मोठया प्रमाणावर मांडल्या गेलेल्या प्रश्नांकडे मराठी चित्रपटसृष्टीनी संपूर्णपणे दुर्लक्ष का केले असावे? इतकंच नाही तर मराठी भाषेत गूढ कथा लिहिणारे अतिशय नावाजलेले लेखक असूनही, मराठी चित्रपटांमध्ये टक्केवारीप्रमाणे बघायला गेलं तर रहस्यपटांची आणि विज्ञानपटांची टक्केवारी अगदीच नगण्य आहे. 'पाठलाग' हा मराठीतला सगळ्यात यशस्वी रहस्यपट म्हणावा लागेल. त्यानंतर 'एक रात्र मंतरलेली', 'सावरखेड-एक गाव' यासारखे मोजकेच रहस्यपट आले पण म्हणावं तसं यश त्यांना मिळालं नाही. कदाचित मधल्या काही वर्षात 'मराठी चित्रपटानी पाहिलेला हालाखीचा काळ', त्याची असणारी सुप्तावस्था ह्यामधेच ह्या प्रश्नांची उत्तरं सामावलेली असतील.

'उम्मीद पे दुनिया कायम है' या न्यायानं मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होण्याची वाट पाहणार्‍या प्रेक्षकवर्गासाठी जणू काही १९९९-२००० च्या सुमारास मराठी चित्रपटांनी 'कात टाकली'. नवीन नवीन दिग्दर्शक, नवीन कलाकार यांनी मिळून नव्या युगाचे विषय, नव्या युगाच्या समस्या चित्रपटातून मांडायला सुरुवात केली... मराठी चित्रपटातला परत एकदा सूर गवसला. २००० सालानंतर संगणकक्षेत्रात क्रांती घडली आणि globalization चं युग आलं. दरम्यानच्या काळात मुंबई हे जागतिक व्यापाराचं एक महत्वाचं केंद्र बनलं. व्यापारासाठी, रोजगारीसाठी भारताच्या कानाकोपर्‍यातला माणूस मुंबईकडे धाव घेऊ लागला आणि बघता बघता मराठी माणूस त्याच्याच घरात, मुंबईत परका होऊन गेला... राजकारण, गुंडगिरी, भ्रष्ष्टाचार, महागाई यांनी मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आयुष्यात खळबळ माजवून दिली. केवळ भाषेवरचाच नव्हे तर एकूणच जीवनावरचा इंग्रजीचा, परकीय संस्कॄतीचा पगडा त्यानं स्वीकारला असला तरी कुठेतरी त्याला तो अस्वस्थही करायला लागला. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या प्रांतीय आणि भाषेच्या राजकारणानं रौद्र रुप धारण केलं आणि ह्या सगळ्या बदलाची 'डोंबीवली फास्ट' किंवा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ' यांसारख्या मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटातून दखल घेतली गेली. सध्या भारताला भेडसावत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न 'गाभ्रीचा पाऊस' किंवा 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' यांसारख्या चित्रपटातून मांडणार्‍या मराठी सिनेमानं परत एकदा नव्यानं सामाजिक जाणीव जोपासायला सुरुवात केली.

लिहिता लिहिता मी थबकले...
'राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी' या दरंम्यानच्या मराठी चित्रपटांच्या विषयांचा आढावा घेता घेता मी नकळत कुठेतरी त्या काळाबद्दल, त्या काळातल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीबद्दल विचार करायला लागलीये...जाणवायला लागलं की या चित्रपटाच्या माध्यमातून लेखकांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, कलाकारांनी त्या त्या वेळच्या काळाचं, त्या वेळच्या समाजजीवनाचं एक चालतं, बोलतं documentation-च जणू पुढच्या पिढीसाठी करून ठेवलंय. आज आपण ज्याला 'वर्तमान' समजतोय तो लवकरच 'भूतकाळात' जमा होणार आहे.. पण भूतकाळाला तात्पुरतं का होईना पण वर्तमानाचं स्वरूप देण्याचं सामर्थ्य या चित्रपटांमधे आहे.. तसं पाहायला गेलं तर आपण जो काळ पाहिला नाही, ज्या घटनांचे आपण साक्षीदार होऊ शकलो नाही... त्या काळाची, त्या घटनांची 'अनुभुती' देणारा चित्रपट आजच्या नव्या युगातही एका अर्थी 'कॅमेर्‍याने घडवलेला एक चमत्कार' च आहे... आणि या चमत्कारामधे चित्रपटात मांडल्या गेलेल्या, काळाचा मागोवा घेणार्‍या विविध विषयांचं योगदान खूप मोलाचं आहे.....
.... म्हणूनच तर आज २००९ मधे 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या रुपात ९५ वर्षापूर्वीचा 'राजा हरिश्चंद्र' आजच्या नव्या पिढीसमोर केवळ एक पुस्तकात किंवा internet वर वाचलेला, चित्रात पाहिलेला, पिढ्यान-पिढ्या ऐकलेला 'इतिहास' न राहता 'वर्तमान' बनून येतोय.

'राज्ये बुडाली नृप थोर गेले' याची प्रचिती घेत घेत आपण बदलणारा काळ पाहिला...बदलत जाणारा काळ पाहात आहोत, अनुभवत आहोत..

न जाणो... बदलणार्‍या काळाची पावलं ओळखत मराठी सिनेमांचे विषय अधिकाधिक प्रगल्भ होतील... कदाचित तंत्रज्ञानाच्या मदतीनं तो परत परत भूतकाळाला हाक देईल....कदाचित एखादा मराठी लेखक, दिग्दर्शक 'भारताच्या चांद्रमोहिमेच्या युगात' मराठी 'वैज्ञानिक चित्रपटांचं' दालन खुलं करून देईल! किंवा कदाचित राजा हरिश्चंद्रप्रमाणेच नव्या युगातली 'श्यामची मॉम' नटून थटून ऑस्करसाठी अमेरिकेच्या प्रवासाला निघेल....

कालाय तस्मै नम: !

- rar
-------------------------

Rar_article.jpg

** हा लेख लिहिताना मला मोलाची मदत करणार्‍या नीलेश अग्निहोत्री ह्या माझ्या मित्राचे मन:पूर्वक आभार ...त्याच्या मदतीचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.
---------------------