सृजन

HDA2014_srujan.JPG

पहाटेच्या नाभीपासून,
रात्रीची नाळ तुटते तेव्हा,
जन्माला आलेला 'दिवस'
टकामका डोळ्यांनी सूर्यकिरण पसरत राहतो...


दुडदुडती पाऊलं क्षणामाजी वाढत जातात
मध्यान्हापर्यंत अवघ्या धरणीचा ताबा घेतात!


मातीवरची सुस्त दुपार सरत जाते,
उन्हे कूस बदलतात,
रिमझिमता पाऊस अलवार उतरत साथ करतो...
दिवसाचं मुसमुसलेलं तारुण्य प्रकट नाचू लागतं!


कलत्या सूर्याला क्षितिजापार निरोप देऊन परतताना,
घराघरांतून कानावर येणाऱ्या 'शुभं करोति'ने
म्हाताऱ्या दिवसाच्या मिशा थरथरू लागतात!


निजेला कवटाळत दमलाभागला दिवस अंग टाकतो तेव्हा
धरणी सृजनतेने निथळत असते!
कणाकणाला वाढणारा रेशमी अंधार
तिच्या गर्भाला चंद्राची आभा देतो!


निसर्गाची काही वेळाची नि:स्तब्धता पार पडली, की
पहाटदंवाबरोबर धरतीच्या वेणा सर्वदूर ऐकू जातील....

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_blackseparator.jpg

बागेश्री

HDA_14_bageshreedeshmukh.jpg

बागेश्री यांनी मायबोली, मराठी कविता समूह, अनाहत व इतर अनेक ई-पुस्तकांतून लेखन केले आहे.
नोकरीबरोबरच त्यांचा साहित्यविषयक प्रवासही चालू आहे. 'वी नीड यू' संस्थेद्वारा आयोजित 'कविता महाराष्ट्राची'मध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभाग, शिवाय त्यांच्या 'नाते तुझे नी माझे' दीर्घकथेचे ऑडियो बुक प्रकाशित झाले आहे. ब्लॉगलेखन, आंतरजालीय लेखन यांबरोबरच देशोन्नती वृत्तपत्रातील युवा पुरवणीमध्ये त्यांनी ललितलेखन व कविता प्रकाशन केले आहे.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

कविता आणि चित्र - सुंदर !

चित्र छान

आहा, सुंदर

चित्र मस्त आहे

बालचित्रकलेतल्या रंगाचा ताजेपणा चित्रात आहे.
पहाडकुशीतली सानघरं निळागार श्वास घेणारी.....
कवितापण छान.

कविता चांगली आहे.

चेतनागुणोक्तीचा वापर छान झालाय.
फक्त,
"म्हाताऱ्या दिवसाच्या मिशा थरथरू लागतात!"
या ओळीचा संदर्भ, गर्भितार्थ नीटसा समजला नाही

आवडली :)

सुंदर रचना ...

कसलंच सुचतं गं तुला :)
कविता सुंदर आणि तितकंच प्रसन्न चित्रं!
आहाहा :)
माझं आधी तर चित्रं बघुन मन खुष झालं कविता वाचून दुप्पट आनंद :)

छान कल्पना..!