दिवाळी संवाद - श्रीधर फडके

दिवाळी संवाद : श्रीधर फडके
मुलाखतकार : प्रणव मायदेव

मराठी सुगम संगीतात आपल्या प्रतिभेने रसिकांचे मन जिंकलेल्या, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्रीधर फडके, यांच्याशी गप्पा मारण्याचा अत्यंत मनोहारी योग काही महिन्यांपूर्वी आला. त्यांच्या सुरेल गायनाची व त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गाण्यांची ओळख नसलेला मराठी माणूस विरळाच. त्यांच्या कोणाही चाहत्याला 'फडके घराण्याचा वरदहस्त लाभलेल्या या अतिशय गुणी कलाकाराला प्रत्यक्ष भेटायला मिळणे' यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असणार? गेल्या दोन वर्षात आवर्जून त्यांचे "ऋतू हिरवा" आणि "बाबूजींची गाणी" हे कार्यक्रम प्रत्यक्ष बघितले होतेच. पण या भेटीत श्रीधरजींच्या अतिशय साध्या व प्रेमळ स्वभावाने त्यांच्याविषयीचा आदर दुणावला आणि त्यांनी माझं मन गाण्यांशिवायही पुन्हा एकदा जिंकून घेतलं. श्रीधरजींबरोबर झालेल्या या अनौपचारिक गप्पा मायबोलीकरांसमोर ठेवताना आनंद होत आहे.

प्रणव: सर्वप्रथम तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमची गाण्याची आवड कधीपासूनची?
श्रीधरजी: तसं बघितलं, तर शाळेत असताना मला संगीताची फारशी आवड नव्हती. पण तेव्हाही शिकलो नसलो, तरी थोडीफार पेटी वाजवायला आवडायची. तबलाही वाजवत असे. कॉलेजमधे गेल्यावर मला आणखी आवड निर्माण झाली. बाबूजींची रेकॉर्डिंग्ज असायची, तेव्हा त्या रेकॉर्डिंग्जना मी बर्‍याच वेळा त्यांच्याबरोबर जायचो. मग ते रेकॉर्डिंग कसं चाललंय हे बघून, त्याचा अभ्यास करत, नकळत मनावर संस्कार होत गेले. पूर्वी स्पूल्स असायची - ज्याला रील टू रील म्हणतात - त्यावर गाणं रेकॉर्ड करायचं, मोठ्या टेपरेकॉर्डरवर ते लावून ऐकायचं, असं करत करत हळूहळू आवड निर्माण झाली.

प्रणव: घरी बाबूजी, म्हणजे सगळं वातावरण संगीतमय असणार. शिवाय तुमच्या आई, ललिता फडके, यादेखील सुप्रसिद्ध गायिका. मग या क्षेत्रात काम करायला तुम्हाला स्वतःला आवडेल हे कधी कळलं?
श्रीधरजी: खरं तर मी संगीतात काम करायला, म्हणजे व्यवसाय या अर्थी, कधी घेतलंच नाही. तरी देखील मला चाली तयार करण्याची आवड निर्माण झाली. आणि आवडीमुळे असो किंवा व्यवसाय म्हणून असो, एकदा आपण त्यात पडलो की हळूहळू शिकायला लागतो. मग चाली बांधता बांधता वेगवेगळ्या कविता बघायच्या; किंवा कधी आधी चाली बांधून मग त्यावर कविता लिहून घ्यायच्या असा हा सगळा प्रवास सुरु झालेला आहे.

प्रणव: तुम्ही कंप्यूटर सायन्सचे विद्यार्थी, बरोबर? मग या दरम्यान तुम्ही गाण्याकडे कसे काय वळलात?
श्रीधरजी: हो, मी इथे अमेरिकेत शिक्षणासंदर्भात आलो असताना, कॅम्लिनच्या मालती दांडेकरांनी मला एका अभंगाला चाल लावायला सांगितली होती. त्याआधी मी आणि माझा मित्र उदय चित्रे, असं दोघांनी मिळून भारतात असताना रेकॉर्डिंग केलं होतं. ते आम्ही EP (Extrended Play) मधे केलं होतं. पण इथे शिकत असताना बसवलेला अभंग म्हणजे माझं स्वत:चं असं पहिलं रेकॉर्डिंग. तो अभंग म्हणजे 'देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी' हा, जो मी १९७४ च्या जून-ऑगस्टच्या सुमारास संगीतबद्ध केला. म्हणजे आता यालासुद्धा ३४ वर्षं झाली बघा.

प्रणव: संगीताचं औपचारिक शिक्षण न घेतासुद्धा तुम्ही तुमच्या गाण्यांमधे शास्त्रीय संगीताचा इतका सुरेख वापर करता. ते कसं जमवलंत?
श्रीधरजी: एकदा आवड निर्माण झाली की आपण त्यावर विचार करायला लागतो. आता बाबूजी गायचे तेव्हा ते यमन, मालकंस, भीमपलास, किंवा तोडी, भैरवी असे वेगवेगळे राग गायचे. ऐकून ऐकून भैरवी म्हणजे नेमकं काय आहे हे आपोआप कळू लागलं. म्हणजे जरी मी ते शिक्षण एखाद्या गुरुकडे जाऊन, तिथे बसून घेतलं नसलं, तरी मी ते स्वतःहून शिकत गेलो. माझे काही संगीतक्षेत्रातील मित्र आहेत, जे वादक आहेत. त्यांना विचारायचं की, 'अरे हा मालकंस आहे ना, मग याचा जरा आरोह अवरोह दाखव." आणि मग ते वाजवतील ते लक्षात ठेवायचं आणि नंतर त्या रागाचं चलन बघून त्याच्यावर चाल बांधायची.

प्रणव: शुद्ध शास्त्रीय रागदारीवर आधारित अशीही गाणी बसवलीत का?
श्रीधरजी: हो, बसवलीत ना. आता बघा, शुद्ध शास्त्रीय म्हणजे एकही स्वर बाहेरचा लागता कामा नये. असं माझ्या संगीतात फारसं झालेलं नाहीये; नाहीच म्हणा. परंतु तो राग आधार धरुन गाणं बांधणं आणि एखादा स्वर वेगळा बांधणं हे स्वातंत्र्य सुगम संगीतात घेता येतं. तसं केल्यामुळे गाण्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे. गाणं ऐकताना मधेच एखादा स्वर ऐकून, "अरे वा! हा कोणता वेगळा स्वर आहे! त्या रागात नाहीये, पण त्यामुळे ते ऐकायला कसं गोड वाटतं!" असं वाटणं हे महत्त्वाचं आहे. जसं माझं 'ॐकार स्वरूपा' बैरागी भैरव मधे आहे. 'सांज ये गोकुळी' यमन कल्याण आणि पूर्वा कल्याण या दोघांचं मिश्रण आहे. म्हणजे यमन मधे शुद्ध रिषभ लागतो तर यात कोमल रिषभ लागतो. नंतर 'ऋतू हिरवा' चारुकेशी मधे आहे. 'घनरानी' हे पूर्ण तिलंग मधे नसलं तरी तिलंग वर आधारित आहे. अशी अनेक गाणी आहेत. आता 'मी राधिका' हे आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायलेलं गाणं मधुकंस मधे आहे. पण त्यात मधेच एखादा स्वर मधुवंती मधे आहे तसाही लागतो. असा वेगळा स्वर लागल्यामुळे त्या गाण्यात काहीतरी वेगळं, खास असं वाटलं पाहिजे. 'त्या कोवळ्या फुलांचा' शिवरंजनी मधे किंवा, 'विठ्ठल नामाचा रे टाहो' मालकंस मधे आहे.

'दे साद दे ह्रदया' मधे मला बिलासखानी तोडीमधे आणि झपतालात काहीतरी करायची इच्छा होती. तर काय करावं या विचारात मी आरतीला विचारलं की त्या रागाचं चलन काय आहे. मला साधारण माहीत होतं, आणि त्यावर विचार करुन मग ती चाल सुचली.

प्रणव: आपण चालींविषयी बोलतो आहोत, तर मला विचारायचं होतं, की एखादी चाल कशी सुचते हो? म्हणजे गाणं हजारो वेळा ऐकूनही ज्याची गोडी संपत नाही, अशी चाल परफेक्शन पर्यंत कशी पोचते?
श्रीधरजी: कुठलंही गाणं किंवा एखादी कविता असो, जिला चाल लावायची आहे, ती निवडल्यावर प्रथम हा विचार करावा लागतो की त्या कवितेतून काय सांगायचं आहे. कधीकधी त्या शब्दांमधूनच पटकन चाल सुचते तर कधी हळूहळू चाल तयार होत जाते. 'ॐकार स्वरुपा' ही जी कॅसेट आहे त्यामधे एक अभंग आहे, 'माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद'. तर या अभंगाला चाल लावताना माझ्या मनात होतं की आपण याला वेगळा ताल वापरावा, म्हणजे दादरा. आणि त्याच्यामधे बंगाली वाद्यं वापरावीत, जी बाऊलगीतांमधे वापरतात. त्यात बंगाली एकतारा असतो आणि खोळ असतो. म्हणजे नाल. बारिक तोंड असलेल्या मृदुंगासारखं हे वाद्यही वापरायचं मनात होतं. पण हे वापरायचं तर चाल देखील तशाच प्रकारची यायला पाहिजे. मग हे सगळं माझ्याच मनाप्रमाणे केलं आणि तिलक कामोदच्याच प्रकारातल्या एका रागात ती चाल बसवायच्या नादात अचानक मला मुखड्याची चालही सुचली. ती अशी -

प्रणव: वा, सुरेख! मग अशी एखादी चाल डोक्यात घुमत असेल आणि पूर्णत्वास जात नसेल, तर त्रास होतो का?
श्रीधरजी: होतो तर! मुखडा झालाय आणि अंतरा होत नाहीये असं होतं कधी सहा-सहा महिने! किंवा आधी चाल सुचली आणि मग मागाहून शब्द लिहिले असंही अनेकवेळा झालेलं आहे. जसं माझ्या डोक्यात एक चाल होती जी मी शांताबाईंना ऐकवली. (गुणगुणून दाखवत) आणि त्यांनी त्यावर 'गगना गंध आला' हे सुरेख गाणं नंतर लिहून दिलं.

प्रणव: बाबूजी म्हणजे मराठी संगीतविश्वातला एक अढळ तारा. त्यांची एवढी मोठी कारकीर्द. बाबूजी, पुलं, अशी दोन चार नावं आपलं मराठी विश्व define करतात. तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला कधी असा दबाव जाणवला का, की आपली वेगळी ओळख निर्माण करावी, किंवा आपली वेगळी, स्वतंत्र स्टाईल असावी?
श्रीधरजी (हसत): नाही, असा दबाव कधी नाही आला. कारण मी असं ठरवलं कुठे होतं, की मला काही स्वतःचं वेगळं करायचं आहे म्हणून! ते होत गेलं! जर तुम्ही काही ठरवलं की मला हे पाहिजे, मला हे असं साध्य करायचं आहे, तर ते वेगळं. प्रयत्न तर कुठल्याही कामासाठी करावेच लागतात. पण माझ्या बाबतीत ते ठरवून न केल्यामुळे आपोआप होत गेलं. नंतर लक्षात आलं जेव्हा लोक म्हणायला लागले की श्रीधरची गाणी जरा वेगळी आहेत. आणि बाबूजींनाही ते आवडलं. अगदी मागे, सुरुवातीला, मी त्यांना एकदा विचारलं होतं की मी इथे अडलोय, तर तुम्ही मला काही सुचवा, काय करु ते सांगा. ते त्यांनी मला तेव्हा सांगितलं. पण नंतर ते म्हणाले की नाही, मी तुला सांगणार नाही. मी सांगितलं तर ती तुझी चाल राहणार नाही. त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवलं. हे फार महत्त्वाचं आहे. कुठेही ते माझ्यासाठी बोलले नाहीत. अगदी पहिला चित्रपटही, केवळ दिग्दर्शकांना माझी चाल आवडली होती, म्हणून बाबूजी म्हणाले की याला द्या. आणि मग लोकांना गाणी आवडत गेली. आता ज्याअर्थी लोकांना ती गाणी आवडली असावी केवळ म्हणूनच मी आज तुमच्यापुढे आहे.

प्रणव: बाबूजींनी संगीताला आपली कारकीर्द बनवून सगळ्या आयुष्यभर त्याची साधना केली. आपण संगीतासाठी स्वतःला वाहून घेणं आणि केवळ आवड म्हणून संगीत करणं यामधे काही फरक आहे का?
श्रीधरजी: आहे ना! आता संगीताला वाहून घेणं म्हणजे तो तुमचा व्यवसाय होतो. आणि मग व्यवसायात कधी 'अरे ही चाल अशी नाही, तशी करा' वगैरे अशी काही बंधनं येऊ शकतात. कदाचित आपल्याला आवडलेली चाल दिग्दर्शकाला आवडली नाही असं होऊ शकतं. अर्थात बाबूजी तसं करत नसत. कधी त्यांना पटलं, की दिग्दर्शकाचं म्हणणंही बरोबर आहे, तर ते चाल बदलायचे पण अन्यथा नाही. पण तरीही सिनेमामधे असं होऊ शकतं. माझ्या बाबतीतही असं बरेचदा झालंय की मी जी चाल बांधली, ती जशीच्या तशी आवडली आहे. पण कुठल्याही व्यवसायात असतात तशी व्यवसायाची बंधनं तिथे येतात. जर आवड म्हणूनच करायचं असेल तर मात्र तशी बंधनं येत नाहीत; तेव्हा तो आपला मुक्तछंद असतो.

प्रणव: दोन वर्षांपूर्वी पुण्यात तुमचा 'बाबूजींची गाणी' हा कार्यक्रम अफाट गर्दीत कुठेतरी दूर बसून मी ऐकला होता...
श्रीधरजी: तो ठीक झाला होता कार्यक्रम? कारण बाबूजींची गाणी म्हणणं हे अतिशय कठीण आहे. तसं कोणाचीही.. पण माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांची गाणी म्हणणं अवघड आहे. कारण त्यांच्या गाण्यात लयीचा जो अंदाज असतो तो आला नाही, तर मग ते गाणं गेलं. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

प्रणव: कार्यक्रम अतिशय सुरेख झाला होता. 'बाबूजींची गाणी', 'ऋतू हिरवा' या सारखे इतरही काही कार्यक्रम करता का?
श्रीधरजी: 'ॐकार स्वरूपा' म्हणून एक आहे. त्यात फक्त अभंग, भक्तिगीतं म्हणतो. पूर्वीच्या संतांच्या आणि आत्ताच्या नवीन कवींच्या देखील, ज्यात भक्तिरस असेल, अशा प्रकारच्या रचना त्यात सादर करतो.

प्रणव: बाबूजी आणि गदिमा यांनी एकत्र मिळून 'गीतरामायणाचा' आविष्कार घडवला. तसं काही करण्याचा तुमचा मानस?
श्रीधरजी: गीतरामायण म्हणजे विस्तृत रामकथाच आहे. प्रत्येक प्रसंगाला एकेक गीत आहे आणि अशा ५६ गीतांमधे ते बसवलेलं आहे. तसं मी काही करत नाहीये, आणि करूही शकणार नाही. कारण 'गीतरामायण' हे एकदाच होतं. गदिमा आणि बाबूजी या दोघांच्या हातून हे जे एवढं मोठं कार्य झालेलं आहे, ते अद्वितीय आहे. ते तसं परत कोणी करायचं म्हणून करायला गेलं तर होत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. गदिमा आणि बाबूजी दोघेही प्रतिभावान. गीतरामायण अजरामर व्हावं अशी विलक्षण त्यांची कामगिरी आहे. कुठल्या तरी अज्ञात शक्तीनी ते त्यांच्याकडून करवून घेतलं अशी त्यांची धारणा होती. परंतु मला वाटतं की त्या अज्ञात शक्तीलाही माहीत असणार की हे दोघे तेवढे प्रतिभावान आहेत, त्यांच्याचकडून हे काम करवून घ्यायला पाहिजे म्हणून!

गीतरामायणाचे प्रयोग मी आत्ता दोन तीन वर्षापूर्वीच सुरु केले. इतके दिवस मी गाणार नाही म्हणत होतो, कारण मला धीर होत नव्हता. अभ्यास केल्याशिवाय करायचं नाही हे नक्की होतं. जेव्हा सुवर्णमहोत्सव सुरु झाला तेव्हा मी माझ्या आईला विचारलं. ती म्हणाली की हरकत नाही. मी तिला म्हटलं की माझ्या कानावर जे संस्कार झालेत, जे मी ऐकलंय ते बरोबर आहे की नाही ते बघ. मग तिने ऐकवलं की हे असं गा. बाबूजी कार्यक्रमात कसे गायचे, त्यांचे उच्चार कसे असत हे सगळं तिने सांगितलं.

प्रणव: बाबूजींना आपल्यातून जाऊन सहा वर्षं झाली जुलै मधे. तुम्ही सगळ्यात जास्त त्यांना कसं मिस करता?
श्रीधरजी: त्यांचा सहवास. कुठेतरी असं वाटतं की ते आहेत, बघतायत आपल्याकडे. काही काम करत असतांना त्यांची आठवण आली की मग गलबलून जायला होतं. समाजसेवा आणि राष्ट्रसेवा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. नुसतंच संगीत किंवा गायन असं नव्हतं. त्यामुळे त्यांचं जीवन मल्टीफोल्ड म्हणतात तसं होतं. त्यांच्या कामामधे वैविध्य होतं. सामाजिक कामांमधे पण ते स्वतःला झोकून द्यायचे. सावरकरांवरचा चित्रपट हा त्याचाच भाग. ते गेल्याचं वाईट वाटतंय अर्थात.

प्रणव: एखादी नवीन सीडी काढायचा विचार?
श्रीधरजी: हो, आता आशाबाईंबरोबर एक सीडी करत आहे. म्हणजे रेकॉर्डिंग्ज अजून सुरू व्हायची आहेत पण बाकीचं काम सुरु आहे. ध्वनिमुद्रण नोव्हेंबर-डिसेंबर मधे सुरु व्हावे असे वाटते. त्या सीडीचं नाव अजून ठरलं नाही, पण त्यात गदिमा, शांताबाई, ग्रेस, इंदिरा संत, शिरीष गोपाळ देशपांडे, निधी नाखवे, अरूणा ढेरे वगैरेंच्या रचना आहेत.

शिवाय एक पूर्ण सीडी समर्थ रामदासांवर करतो आहे, सज्जनगडाच्या संस्थानातर्फेच आहे ते. त्याचं काम तेरा ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यात सुरेश वाडकर, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, आरती अंकलीकर-टिकेकर, संजीव चिमलगी, मंजुषा पाटील, अमृता सुभाष, विद्या करलगीकर, आणि अजय-अतुल हे जे नवीन संगीतकार आलेत, त्यांच्यातले अजय असे सगळे गातायत. समर्थांच्या रचनांमधे इतकं विलक्षण वैविध्य आहे - सगळ्याच संतांच्या अभंगामधे ते असतं - त्यामुळे हे काम करताना फार मजा येत आहे. वीस नोव्हेंबरला पुण्यामधे संत संमेलन आहे. तेव्हा ही सीडी प्रकाशित करावी असा आमचा विचार आहे.

तल्लीन गोविंदे या कॅसेट मधला हा एक अभंग.

समर्थांवर एक चित्रपटही येत आहे; आणि त्याचंही संगीत मी करत आहे. त्याशिवाय आणखी एक भावगीतांची सीडी करायची इच्छा आहे.

प्रणव: आशाताईंचा उल्लेख केलात.. आशाताई आणि बाबूजी हे काँबिनेशन म्हणजे मराठी माणसाचा वीक पॉईंट! तुमचे असे बरोबर काम केलेले एखादे आवडते गायक किंवा गायिका?
श्रीधरजी: वाडकरांबरोबरची माझी काही गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत...

प्रणव: आणि असं एखादं नाव की ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल पण तशी संधी आली नाहीये?
श्रीधरजी (हसत): लताबाई?! पण आता काय आणि कसं होईल ते माहीत नाही. आता बघा, आपल्याला पारितोषिक मिळतं, तेव्हा त्याचा आनंद कोणालाही असतोच. तो आपला बहुमान असतो. मुंबई दूरदर्शनची जी सह्याद्री वाहिनी आहे, ते दरवर्षी नवरत्न पुरस्कार देतात. नऊ जणांना हा पुरस्कार दिला जातो. २००४/२००५ मधे त्यातला संगीताचा पुरस्कार मला मिळाला होता. तेव्हा लताबाई तिथे उपस्थित होत्या. त्यांनी भाषणात सांगितलं की 'मी फडके साहेबांची गाणी खूप गायले. (आशाबाई आणि लताबाई 'फडके साहेब' म्हणतात, बाबूजी नाही!) मला त्यांची गाणी आवडतात. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मला श्रीधरचं एखादं गाणं मिळावं! मला त्याचंही संगीत आवडतं'. लताबाई म्हणाल्या की ते कसं होईल ते मला माहीत नाही पण मला आवडेल. आता ही जी पावती आहे, ती कुठल्याही संगीतकाराला वाटेल तशी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. लताबाईंनी - म्हणजे प्रत्यक्ष जी सरस्वती - त्यांनी असं म्हणणं हा मला फार मोठा बहुमान वाटतो.

प्रणव: अरे वा! अशी गाणी आम्हाला रसिकांनाही लवकर ऐकायला मिळोत अशी मी आशा करतो. कारण हे काँबिनेशनही तितकंच सुरेख होईल याची मला खात्री आहे.
तुम्ही हिंदी गाण्यांना किंवा चित्रपटांसाठी कधी संगीत दिलंत का?

श्रीधरजी: हिंदीमधे 'सुराज' म्हणून चित्रपट होता. आर्ट फिल्म होती ती. त्यासाठी एक गाणं दिलं होतं. बाकी पुढे नाही केलं कारण हिंदीसाठी म्हणजे तुम्ही त्यात फुल टाईम पाहिजे. ते विश्व वेगळं आहे.

प्रणव: तुम्ही वेस्टर्न म्युझिक ऐकता का? आणि कशा प्रकारचं ऐकता?
श्रीधरजी: हो. खरं सांगू का, वेस्टर्न आणि ईस्टर्न, म्हणजे त्यांची जी पद्धती आहे - मेलडी आणि हार्मनी - तर ती आणि आपल्या पद्धतीमधे जे स्वर आहेत ते सारखेच. मांडणी, सादरीकरण हे सगळं थोडं वेगळं आहे. कॉर्ड सिस्टम थोडी वेगळी आहे. आता आपल्याकडे जे चाललंय ते मला, म्हणजे माझ्या वयाच्या पिढीला, फार पसंत पडत नाही. कारण सगळ्याच गाण्यांमधे असा रिदम येऊन चालत नाही. हल्ली सगळी गाणी आता तशी यायला लागली आहेत. एखाद दोन गाण्यात तो आनंद वाटतो, पण तेच तेच झाल्यावर त्यातली मजा जाते. मूळ चाल आणि शब्द हे सगळ्यात महत्त्वाचे. मुलगी सुंदर असली की मग तिला काहीही पेहराव केला तर ती जास्त सुंदर दिसते, पण ती मुळात सुंदर पाहिजे तसं आहे ते.

संगीत मी सगळ्या प्रकारचं ऐकतो. मला इथलं कंट्री म्युझिक फार आवडतं. आमच्या वेळी ग्लेन कँपबेल म्हणून होते; त्यांचं 'Like a Rhinestone Cowboy' म्हणून फार गाजलेलं गाणं आहे. १९७५ सालचं हे गाणं आहे - तुम्हाला माहीत असेल. ते एक आठवतंय. कंट्री म्युझिक मधे कसं असतं की बँजो असतो आणि सोलो व्हायोलिन, म्हणजे एकच व्हायोलिन असतं. पण ते फार काहीतरी वेगळं असतं. ते टॅपवरती करतात ते फार आवडतं. नंतर मला पोल्का म्हणजे ईस्ट युरोपिअन संगीत खूप आवडतं. अरेबिक छान असतं. शेवटी संगीत हे संगीत आहे. ते कानांना जोपर्यंत गोड वाटतं तोपर्यंत ते आवडतं.

प्रणव: माझा एक आवडता व्हिडीयो आहे. बाबूजी आणि आशाताईंच्या 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याच्या लाईव्ह रेकॉर्डिंगचा. तो बघताना आपल्याला सगळा वाद्यवृंद वाजवताना दिसतो, आशाताई लाईव्ह गाताना दिसतात आणि हे सगळं प्रत्यक्ष साकारतानाचे बाबूजींच्या चेहर्‍यावरचे भाव बघायला मिळतात. तर आजच्या काळात हे असं शक्य होतं का?
श्रीधरजी: नाही होत. पूर्वी कसे मोठे स्टुडियो असायचे. एका स्टुडियोमधे २५-४० लोक बसतील एवढे ते मोठे असायचे. मधे गॅप्स म्हणजे पार्टीशन्स असायची साऊंड सेपरेशनसाठी. याशिवाय ते उंचही असायचे कारण sound ambience महत्त्वाचा असायचा. तो नैसर्गिक असणं केव्हाही चांगलं. जरी खूप वेळ लागत असला तरी, सगळ्यांनी एकत्र येऊन गाणं बनवणं हेच चांगलं असं मला वाटतं. आता तसं होत नाही. बेसिक ट्रॅक करायचा झाला तरी तो टक-टक-टक-टक क्लिक वर जसा ताल असेल तसा करायचा. आणि मग एक जण येऊन स्पॅनिश वाजवतो. मग दुसरा तबला वाजवतो आणि मग तिसरा येऊन ढोलक वाजवेल. असं करत करत ते चालतं. कारण एवढ्याश्याच खोलीत हे सगळं रेकॉर्डिंग चालतं. त्यामुळे सगळं एकत्र न होता तुकड्या-तुकड्यानी होत जातं. आणि मग कोणी चुकला तर मग परत त्या जागेपासून वाजवा. म्हणजे तुम्हाला जी उर्मी असते, स्वतःला वाटत असतं की नाही, मला बरोबर वाजवायला पाहिजे ती उर्मी रहात नाही. वाजवणारे वाजवतात उत्तम, सगळं लिहून घेतात... आजकालच्या काळात सगळं बार टू बार लिहिलेलं असतं. बार म्हणजे मात्रांचे. त्यात सगळे बदल लिहून घेतलेले असतात. पण अशी सगळी तयारी असूनही पूर्ण गाणं पूर्वीसारखं लाईव्ह असं तयार होत नाही.

वाद्यांबद्दल बोलायचं झालं तर हल्ली फार इलेक्ट्रॉनिक्स त्यात आलंय. एका ठराविक मर्यादेपर्यंतच ते वापरलं तर ठीक आहे असं मला वाटतं. सगळीकडे ते वापरलं तर मग ते सिंथेटिक वाटायला लागतं. नैसर्गिक ध्वनी निर्माण करणारी जी वाद्यं आहेत, आपली सतार, बासरी किंवा अगदी पाश्चिमात्य म्हटली तर व्हायोलिन्स, पियानो, पिकोलो, सॅक्सोफोन, की फ्ल्यूट, ट्रंपेट वगैरे - त्यांची मजा वेगळीच. ही सगळी नैसर्गिक वाद्यं आहेत, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक काही नाही. आता सगळंच सिंथेसायजरने होत असल्यामुळे तो जो मूळ व्हायोलिनचा टोन, तो तुम्हाला काही म्हटलं तरी मिळतच नाही. दहा-पंधरा व्हायोलिन्स एकदम वाजवण्यात जो ग्रँजर येतो तो सिंथेसायजरने नाही मिळत.

प्रणव: अशा वेळेस मग तुम्ही काय करता?
श्रीधरजी: कधी कधी तडजोड करावी लागते. आता त्यांना किती खर्च करायचा आहे त्याप्रमाणे आहे. काही जणं असतात जी म्हणतात की तुम्ही वापरा. मग आम्ही जेवढी बसतील तेवढी व्हायोलिन्स वापरुन ती दोन तीन वेळा रेकॉर्ड करुन गाण्यात वापरतो.

प्रणव: हल्ली टीव्ही वर जे 'सारेगमप' सारखे कार्यक्रम येतात, ते तुम्ही बघता का? आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
श्रीधरजी (हसतात): काय आहे की कार्यक्रम हा स्तुत्य आहे. त्याच्यातून नवीन गायक मिळतात. चांगल्या तरुण मुलामुलींना त्यातून संधी मिळते. मला एवढंच वाटतं की त्यांनी जे विजेते निवडावेत ते परिक्षकांच्या माध्यमातून निवडावेत, SMS ने नव्हे. आणखी एक मला असं वाटतं की जो कोणी त्यातून निवडला जाईल, उत्तम गायक किंवा गायिका, त्यांना त्यांनी शिष्यवृत्ती द्यावी. आणि चांगल्या गुरुकडे पाच वर्षं शिकायला पाठवावं. इतर काहीतरी पारितोषिकं देण्यापेक्षा तुम्हाला चांगला गायक व्हायचं आहे ना? मग त्यांना पाच वर्षं, दहा वर्षं क्लासिकल शिकू देत. जेणेकरुन ते उत्तम शिक्षण घेऊन जास्त तयार होतील, अधिक पुढे येऊ शकतील. हे माझं मत आहे.

प्रणव: तुम्हाला आवडेल अशा कार्यक्रमांना परिक्षक म्हणून काम करायला?
श्रीधरजी: मी मागे केलं होतं, आणि मला आवडेल. नुकताच मी परिक्षक म्हणून गेलोही होतो.

प्रणव: नवीन पिढीला संगीत शिकवण्याचा पुढेमागे काही विचार?
श्रीधरजी: शिकवणं हा तर मोठा शब्द झाला पण मला जे काही माहीत आहे ते सांगायला मला आवडेल. तसा विचार आहे. बघू कधी होतंय ते.

प्रणव: नवीन पिढीचा विषय निघालाय तर तुमच्या घरी पुढच्या पिढीला संगीताची आवड आहे का?
श्रीधरजी: मोठी स्वप्ना आणि धाकटी प्रज्ञा. मी कधी मुद्दाम त्यांना शिकवलं नाही. पण त्यांनी स्वतःहून आवड दाखवली तर माझा पूर्ण पाठिंबा आहे.

प्रणव: सध्याच्या प्रोजेक्टस व्यतिरिक्त काही आवडी?
श्रीधरजी: आहेत ना. सध्या मी शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा अभ्यास करतोय. मला अनेक हिंदी संगीतकार आवडतात. त्यात हे माझे खूप आवडते. या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाण्यात खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमधे कोणी, कशी गाणी केली याचा अभ्यास करतो. लताबाईंना भेटलो, आशाबाईंना भेटलो, ज्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं अशा इतर बर्‍याच जणांशी बोललो. खूप माहिती मिळाली.

प्रणव: गातांना किंवा रियाज करताना खाण्यापिण्याची काही पथ्य असतात का?
श्रीधरजी: हो. मी शक्यतो कार्यक्रमाच्या आधी पोट जड ठेवत नाही. नाहीतर त्रास होतो. आणि हळदीचं गरम दूध थोडंसं घ्यायचं. बाबूजी रियाज करायचे तेव्हा खर्जापर्यंतचे आपले सगळे स्वर - अ आ इ ई उ ऊ - हे गायचे प्रत्येक वेळी. म्हणजे सा रे ग म असं खालपासून वरपर्यंत आणि श्वासासाठी म्हणून असे वेगळे.

प्रणव: श्रीधरजी, आता थोडे प्रश्न रॅपिड फायर म्हणतात ना, जरा तशा पद्धतीचे...?
श्रीधरजी: (हसत) हो चालेल...

प्रणव: नुकतंच वाचलेलं पुस्तक?
श्रीधरजी: आत्ता इथेच वाचलेलं पुस्तक म्हणजे आर्थर क्लार्क चं 'द फरगॉटन एनिमी' हे. शिवाय मराठी मधे मला सगळं आवडतं. नुकतीच समर्थांवर असलेली रवींद्र भटांची एक जुनीच कादंबरी आहे; ती वाचली.

प्रणव: आवडता खाद्यपदार्थ?
श्रीधरजी: खरं सांगू? वरण भात! (हसतात)

प्रणव: तुमच्या गाडीत सध्या वाजणारी कॅसेट किंवा सीडी?
श्रीधरजी: माझ्या गाडीत सध्या वाजणारी म्हणजे एक तर शंकर जयकिशन आणि दुसरी मदन मोहन. आणि बाबूजींची गाणी. नवीन मधे म्हणजे नुकताच मी इजिप्तला गेलो होतो. तिथल्या गाण्यांच्या सीडीज आणल्या होत्या ऐकण्यासाठी म्हणून. त्या सध्या घरी ऐकतोय.

प्रणव: तुमच्या गाण्यांपैकी तुमचं सगळ्यात लाडकं गाणं?
श्रीधरजी: नाही सांगता येणार! कारण काय आहे की आपली गाणी म्हणजे आपण निर्माण केलेली अपत्यच असतात. त्यामुळे हे मूल मला आवडतं आणि हे दुसरं नावडतं आहे असं होऊ शकत नाही. जेव्हा गाणं तयार होत असतं त्याचवेळी आपण ठरवायचं असतं की हे कसं आहे. ते आधी स्वतःलाच आवडलं पाहिजे. त्याशिवाय ते लोकांसमोर ठेवण्यात अर्थ नाही.

प्रणव: मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल?
श्रीधरजी: मला कौतुक आहे की तुम्ही इतक्या दूर येऊन, म्हणजे अमेरिकेत काय, किंवा कॅनडा, इंग्लंड वगैरे, जिथे जिथे आपली मराठी माणसं आहेत, त्या सगळ्यांचं मला कौतुक वाटतं की मराठी भाषा टिकवली जाते आहे. तुम्ही तरूण आहात आणि इतके शुद्ध मराठी बोलताय याचं मला खरंच कौतुक आहे. तसंच मी आत्ता बघितलं की अनेक लहान मुलं देखील फार छान मराठी बोलतात. शेवटी इतकी जुनी भाषा आहे आपली, ज्ञानेश्वरांपासून समृद्ध झालेली, ती टिकवली पाहिजे असं मला तरी वाटतं. का कोणास ठाऊक पण आपल्या महाराष्ट्रात देखील हे प्रयत्न व्हायला पाहिजेत. होतायत; होत नाहीत असं म्हणणंही बरोबर नाही. पण सगळ्यांनी प्रयत्न केले तरच आपली भाषा टिकेल. त्यामुळे मायबोलीसारखं आपलं जे माध्यम आहे त्याचं मला कौतुक वाटतं आणि त्यांना मला मनःपूर्वक शुभेच्छा द्याव्याश्या वाटतात.

प्रणव: तुमच्यासमोर बसून तुम्हाला गाताना ऐकणं हा हेवा वाटावा असा अनुभव मला आज मिळतोय, पण मायबोलीकरांसाठी एखादं गाणं तुम्ही गाणार का?
श्रीधरजी: जरुर... ही कुसुमाग्रजांची कविता आहे.


माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

प्रणव: अतिशय सुरेख! मायबोलीसाठी "माझ्या मातीचे गायन" याहून सुंदर आणि समर्पक गाणं कोणतं असेल!

श्रीधरजी, शेक्सपियरचं एक वाक्य आहे की या जगात संगीताएवढं चिरस्थायी दुसरं काही नाही अशा अर्थाचं. तर या क्षेत्रात तुमचं एवढं मोठ्ठं कार्य झालं, योगदान झालं त्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत?
श्रीधरजी: अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला वाटतं की माझं फक्त एक टक्का काम झालंय. कारण जेव्हा मी माझं काम बघतो तेव्हा एक तुलना असते की इतर लोकांनी केवढं काम केलंय. म्हणजे बाबूजींचं आहे, इतर संगीतकारांचं आहे. आणि त्यांचा आवाका बघितल्यानंतर, त्यापुढे माझं काहीच नाही. अजून खूप करायचं आहे आणि उत्तम करायचं आहे. शेवटी काय असतं की आपण जसं म्हणतो क्वालिटी आणि क्वांटिटी. असे संगीतकार असणं की क्वालिटी मधे बेस्ट आणि क्वांटिटीही भरपूर तर छानच. पण समजा क्वांटिटी नाही झाली तरी गुणवत्ता असली तरी ते जास्त महत्त्वाचं.

प्रणव: तुम्ही एवढे कार्यक्रम करता. हजारो चाहत्यांना भेटता. काही लक्षात राहिलेल्या आठवणी?
श्रीधरजी: एक आठवण तुम्हाला सांगतो. 'ऋतू हिरवा' या कार्यक्रमाच्या वेळचा. एका प्रयोगाला एक अंध माणूस आला होता. तर त्यांनी मला कार्यक्रमानंतर भेटून सांगितलं की, 'अहो, ऋतू हिरवा हे ऐकल्यानंतर मला रंग म्हणजे काय याची जाणीव झाली'. ही सगळ्यात मोठी दाद आहे! आणि खूप लोक येतात. वयोवृद्ध येतात. खूप प्रेमानी आशिर्वाद देतात. लहान मुलं, तरुण भेटायला येतात आणि आम्हाला आवडलं असं आवर्जून सांगतात. शेवटी आपण हे कशासाठी करतो? अशी कोणाकडून पावती मिळणं हीच समाधानाची गोष्ट आहे.

प्रणव: 'दिवाळी संवाद' च्या निमित्ताने वाचकांसाठी आणि तुमच्या चाहत्यांसाठी काही संदेश?
श्रीधरजी: देशात आणि परदेशात राहणार्‍या आपल्या सगळ्या बांधवांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांची दिवाळी खूप सुखा-समाधानाची आणि आनंदाची जावो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो!

प्रणव: तुमच्याकडून आणखी एखादं गाणं ऐकायला खूप आवडेल...
श्रीधरजी: जरुर.. कुठलं गाणं म्हणू? तुम्हाला कुठलं आवडतं?

प्रणव: तुमची सगळीच गाणी माझी आवडती आहेत. "रंग किरमिजी" हे गाणं माझं खूप आवडतं आहे!

श्रीधरजींनी माझं खूप आवडतं असं हे गाणं तर प्रत्यक्ष म्हटलंच पण खास मायबोलीकरांसाठी गाण्याची मूळ ध्वनीफीतही वाजवण्याची परवानगी त्यांनी दिली. गाणं 'आतून' येऊन कसं 'आतपर्यंत' पोचतं त्याचा प्रत्यय म्हणजे हे गाणं! त्यांच्या या सुरेल गाण्यानेच या मुलाखतीचा समारोप करुया. शब्द आहेत प्रवीण दवणे यांचे. या गाण्याचं संगीत श्रीधरजींचं आहे, ते गायलंही त्यांनीच आहे. आणि या गाण्यातली शीळही श्रीधरजींनीच वाजवलेली आहे!

रंग किरमिजी, सांज तिर्‍हाईत, मी दुखणाईत
दिठीतली सल, अंधुक चंचल, बघ आंदोलीत
विझता तगमग, आलीस तू मग, पदर सावरीत
क्षण उजळावा, चंद्र फिरावा, हीच नसे रीत

जिवलग हात, मूर्तीमंत घात, दंश सराईत
आता सांजरंग, काळीज दुभंग, मना जोजवीत
तुझ्याच पाऊली, जुन्याच चाहुली, कोण बोलवीत
आठवांचे पीस, गमते आकाश, चंद्र सजवीत

कुठले काहूर, मग दूरवर, क्षण पाजळीत
आयुष्य वेल्हाळ, मन रानोमाळ, कुठे हारजीत
सुटलेला शर, खोल खोलवर, तोच मनमीत
चाललो चाललो, काठाशी बोललो, जिवा उधळीत