इये मराठीचिये नगरी


iye_601.jpg

माध्यम: ऍक्रिलिक रंग, पेस्टल खडू, स्केच पेने

खरं तर चित्रकाराने स्वतःच्या चित्रावर, चित्राशयावर काही लिहायच्या भानगडीत पडू नये, जो काही आशय मांडायचाय तो चित्रातून मांडावा असा संकेत आहे. विचार मांडायला, आशय व्यक्तवायला चित्रातली रूपकं, रंगसंगती, रचना, रेषा, पोत यांचा आसरा घ्यावा - कारण चित्रकलेची ती अस्सल बोली आहे, तिचा तोच खरा पिंड आहे. पण या चित्राच्या आशयाचा आवाका बराच मोठा असल्यामुळे म्हणा किंवा माझ्या कलाविषयक कुवतीच्या मर्यादेमुळे म्हणा, पुरवणी म्हणून मला शब्दमाध्यमदेखील वापरावंसं वाटतंय.

'इये मराठीचिये नगरी' अवतीभवती चालणारे तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांचे समाजव्यवहार, मुरब्ब्यांचं राजकारण, लाटांच्या सपक्यांसारख्या प्रसारमाध्यमांतून डोळ्यां-कानांवर आदळणार्‍या घडामोडी, टीव्हीवरच्या सर्कशी अश्या सार्‍या क्रियांच्या प्रतिक्रिया दैनंदिन रहाटीत आपल्या मनात उमटत राहतात. मनात घोळत असलेल्या अशाच काही विचारांतून हे चित्र चितारावंसं वाटलं.

सध्या मराठी असण्याचा आणि मराठा असण्याचा असे दोन्ही मुद्दे महाराष्ट्रात चर्चेत आहेत. दोन्ही मुद्द्यांची दिशा त्या-त्या समाजाचे हितसंबंध राखण्याची, त्यांच्या सक्षमीकरणाची असली तरीही गमतीची गोष्ट अशी की मराठा आणि मराठी या दोन शब्दांत काही फरक नाही, म्हणजे किमान काही दशकांपूर्वीपर्यंततरी नव्हता. महाराष्ट्रात राहणारा, इथली संस्कृती अनुसरणारा, महाराष्ट्रधर्माची परंपरा सांगणारा शहाण्णव कुळी क्षत्रिया-ब्राह्मणा-परभांपासून कुणब्या-धनगरा-रामोश्यांसह प्रत्येक माणूस मराठा समजला जायचा. इथला माणूस उपखंडात इतरत्र मुलुखगिरी करतानाही मराठाच संबोधला जायचा. टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्राला 'मराठा' हे नाव देण्याइतपत ही व्याख्या अख्ख्या महाराष्ट्रीय समाजाला व्यापणारी होती. पण कालौघात 'मराठा' शब्दाची व्याख्या संकोचून जातिवाचक झाली. दरम्यान समाजातल्या अनिष्ट चालींविरुद्ध उभे राहणारे फुल्यांपासून सावरकरांपर्यंत सुधारकही झाले. लौकिकार्थाने काही अनिष्ट चाली संपल्या, चळवळी काही प्रमाणात यशस्वी झाल्या. महाराष्ट्रीय बायका शिकू लागल्या, दलितांना मंदिरं खुली झाली, शिक्षण उच्चवर्णीयांबरोबरीने इतर समाजालाही उपलब्ध होऊ लागलं. पण सुधारांच्या-विकासांच्या या पहिल्या थरावर पुढचे थर लावत आपल्या समाजाला वेगाने मनोरा मात्र उभारता आला नाही. प्रस्थापितांचा पीळ शिल्लक होता, नव्यानं विकसू पाहणार्‍या उपेक्षितांमधल्या विकासाच्या सर्व आकांक्षा थोरांच्या पावलांवरच डोकं टेकत होत्या. सुधारकांच्या मशालींत अजून धुगधुगी होती, पण त्यातलेच निखारे उचलून आपल्यातले काही हात आपल्याच समाजघटकांच्या घरादारांवर ठेवत होते. महाराष्ट्र असा स्वतःशीच झुंजत राहिला, किंबहुना अजूनही झुंजतोय. जय तर लाभला नाही, पण चरचरणार्‍या जखमा मात्र अजूनही भोगतोय.

स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा डाव सुरु झाला. राष्ट्रवाद आणि उपराष्ट्रवादाबद्दलच्या अपरिपक्वतेमुळे भारतातल्या उपराष्ट्रीय भाषिक समूहांच्या परस्परसंबंधांवरून काही वर्षांतच गोंधळाची परिस्थिती उडाली. त्यावर भाषावार प्रांतरचनेचा तत्त्वतः शास्त्रीय तोडगा योजला खरा; पण राजकीय लॉब्या, व्यक्तिगत पूर्वग्रह आणि राष्ट्रवादाचं तत्त्वज्ञान यांमध्ये गल्लत केल्याने प्रांतरचनेत बरीच विघ्नं आली. औरंगजेबाच्या परंपरेला शोभेसा आकस दाखवत स्वकीय असलेल्या दिल्लीकर सरकारने महाराष्ट्राचं स्वतंत्र भाषिक अस्तित्व नाकारून, त्याला प्रथम गुजरात्यांबरोबर महाद्विभाषिक राज्यात कोंडलं आणि नंतर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची योजना जाहीर केली. दीड शतकं राख धरलेलं महाराष्ट्राचं स्फुल्लिंग या वेळेस मात्र चेतलं; इतर भाषिकांना इ.स. १९५६ साली पावलेली मान्यता मराठ्यांना झगडून, रक्त सांडून इ.स. १९६० साली मिळवावी लागली.

पण महाराष्ट्राची ही सळसळ पुन्हा अल्पायुषीच ठरली असं वाटतं. ज्या मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून मराठा दिल्लीशी भांडला, त्या मुंबईचा चेहरा कालौघात बदलतोय हे वेळीच त्याच्या लक्षात आलं नाही. औद्योगिक युगात उद्योजकांची, व्यापार्‍यांची सद्दी असते, नोकरदारांची नसते, हे वास्तव नोकरीतच सुखी-सुरक्षित जीवन असल्याचं मानणार्‍या अल्पाकांक्षी शहरी मराठ्याला उमगलं नाही; किंबहुना अजूनही उमगत नाहीये. त्याला फक्त आपलं आपल्याच घरातलं स्थान घसरतंय याचा सल मात्र बोचतोय. त्याच्या अस्वस्थतेला बोलकं करणारं नव्या-जुन्या ठाकर्‍यांसारखं कुणी उभं राहिलं की त्याची तेवढ्यापुरती छाती फुलते. पण सध्याच्या जमान्यात आपल्यात उद्यमशीलता रुजवल्याशिवाय आणि भाषिक समाज म्हणून आपल्या समाजबांधवांबरोबर नेटवर्किंग केल्याखेरीज टिकाव लागणार नाही, ही गोष्ट गुजरात्या-पंजाब्यांच्या किंवा दाक्षिणात्यांच्या व्यावसायिक यशोगाथेतून त्याला उमजत नाहीये. मुंबईतलं आणि महाराष्ट्रातल्या शहरी भागांतलं स्वतःचं घसरतं अस्तित्व रोखायला दुकानांवर मराठी पाट्यांचा आग्रह धरणं हा उपाय वरकरणी झाला.. पण मुळात आपण स्वतः हिकमतीने दुकानदारी करणं आणि मराठी ही आपली व्यापाराची भाषा बनवणं हा खरा शाश्वत उपाय आहे. पण धाडसाअभावी आणि बळकट सामाजिक नेटवर्किंगअभावी शहरी मराठी माणूस नोकरीच्या आधारावरच संसार चालवतो, आपल्या मुला-बाळांनाही भावी नोकरदारीकरता एखाद्या इंग्लिश शाळेत घालतो, आणि Lord Ganeshaचा गनेश फेस्टिव्हल वगैरे सणावारांतून 'आपले संस्कार' पोरांवर बिंबवतो. शिवजयंतीला शिवरायांच्या जयजयकाराची नारेबाजी करणार्‍या मराठी कंठांतून हॉटेलांमध्ये हिंदी (उंची असेल तर इंग्लिश) आणि चकचकीत मॉलांमधल्या विक्रेत्यांशी बोलताना इंग्लिश फुटते. एवढंच कशाला, आपल्यासारख्याच मराठी माणसाशी नव्याने परिचय करताना/करवून देताना आपली "एकदम-सो-हाय-क्लास" अशी प्रतिमा व्हावी म्हणून गाडी इंग्रजीत धडाडू लागते. जगात अवतीभवती असलेल्या आपल्याहून अल्पसंख्य असलेल्या इतर भाषिक समाजांची स्थितीही याहून अभिनंदनीय वाटते. मराठीहून अल्पसंख्य असलेल्या फ्रेंच, इटालियन, चेक भाषांकरता मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या विंडोज-ऑफिस वगैरे सॉफ्टवेअरं लिहितात, या भाषांचे 'बिझनेस फ्रेंच/इटालियन/चेक' वगैरे अभ्यासक्रम परदेशांमध्ये शिकवले जातात; मराठीबद्दल असं काहीच घडताना दिसत नाही. हिंदी किंवा तमिळभाषिक भारतीयांना परदेशांत स्वतःच्या मुलांना स्वभाषेची पद्धतशीर ओळख व्हावी म्हणून आपापल्या भाषा शिकवणार्‍या शाळा/संस्था सापडतात, पण मराठी शिकवणारी एकही जागतिक भाषाशिक्षणसंस्था अस्तित्वात नाही. जागतिकीकरणात इतर भाषिक समाज भाषिक सपाटीकरणाविरुद्ध जागरूकपणे उभे राहताहेत, स्वभाषा वापरत-मिरवत समर्थपणे स्वतःचं स्थान मिळवताहेत; पण महाराष्ट्रातला त्यातल्या त्यात सुखवस्तू असलेला शहरी वर्ग यातलं काहीही न करता आपल्या गृहस्थाश्रमी साध्यांपुरताच सीमित आहे. शहरी महाराष्ट्रीयांचीच नव्हे तर बहुसंख्य परदेशस्थ मराठ्यांची स्थितीही यापेक्षा उजवी नाही.

कोणी म्हणेल, मराठी समाजाच्या स्थितीचं हे अतिरंजित चित्रण आहे; आणि अस्सल मर्‍हाटमोळा वारसा सांगणारा महाराष्ट्र खेड्या-पाड्यांत वाड्या-वस्त्यांत जिवंत असताना असल्या चिंता निष्कारण आहेत. कबूल, की ग्रामीण मराठा अजूनपर्यंत सपाटीकरणाच्या तडाख्यात शहरी मराठ्यासारखा पुरता सापडला नाही. पण आज सुपात असलेले उद्या जात्यात जाणारच. शेतकर्‍यांना शेतीच्या अल्पउत्पादकतेमुळे, बेभरवशाच्या उत्पन्नामुळे एखाद-दुसरा मुलगा सोडून बाकी मुले शिकून तालुक्याच्या गावी किंवा शहरात सरकारी नोकरीत लागावीशी वाटतात. मुळात सरकारी यंत्रणेतल्या नोकर्‍यांच्या संधी लोकसंख्येच्या अन् राखीव जागांच्या रेटारेटीत किती गड्यांना पुर्‍या पडणारेत? पण खासगी क्षेत्रातल्या नोकर्‍यांपेक्षा सुरक्षा असल्याने आणि सरकारी शिक्का कपाळी असण्याचे अनुल्लेखित बरेच फायदे असल्यामुळे पोलिसभरतीपासून तहसीलदार कचेर्‍यांच्या भरतीकरता इच्छुकांचे रमणे भरतात. अश्या परिस्थितीत क्षत्रिय मराठ्यांना आरक्षणाचं पालव देऊ करण्याची बिलंदर टूम कोणी काढली की अवघा महाराष्ट्र डहुळतो. स्वतःच्या कर्तबगारीवर तंजावुरापासून अटकेपर्यंत मुलुख मारणारा धिट्टा मरहट्टा राखीव जागांच्या गाजरांना भुलतोय, आखाड्याच्या लाल मातीत वाढलेला गडी चौकातल्या होर्डिंगांवरच्या छबीदारापुढे इमानी 'मोत्या'सारखा झुलतोय... सध्याच्या जगात उत्कर्षाच्या दिशा न सापडल्यानं. या साचलेपणातून बाहेर पडण्याची, आपल्या मातीत राहूनच उत्कर्ष साधण्याची खटपट करणारे हिकमती लोकही आहेत, पण अठरा-अठरा तास ऊर्जेविना काढणार्‍या ग्रामीण महाराष्ट्रात अशा प्रयत्नांना गती कुठून मिळणार? गावात हे असं म्हणून शहरात हललेली मंडळी मग शहरी मराठ्यांना आंधळेपणाने अनुसरू बघतायत, अस्सल मराठपणाचा पीळ नकळत सैलावत जातोय.. काही बाळसेदार गावांमधले आमचे छावे हल्ली 'लिटल एंजल्स' किंवा तत्सम नावांच्या नर्सरी स्कुलांत जाऊन 'जॅक अँड जिल' घोकत वाघिणीच्या दुधावर वाढू लागलेत.

एवढं सारं स्थित्यंतर घडत असताना, यातल्या बर्‍याचशा गोष्टी भाषिक समाज म्हणून आपल्याकरता हानिकारक असतानाही आपल्याला यातून मार्ग शोधण्याची इच्छा का न व्हावी?! इतकी मानसिक गुलामी, परधार्जिणेपणा, इतकं मांद्य आपल्या मनावर कसं चढलं याचं नवल वाटतं. मानसिक द्वंद्व चाललेल्या भ्रमिष्टासारखे आपण आपल्याच समाजघटकांबरोबरच झुंजतोय, अंतःसंघर्षातच शक्ती खर्चतोय. गणपती मिरवणुकांमधल्या वादांमधून रस्त्याचा आखाडा होतो काय अन् कुणी प्राणाला मुकतं काय! मानाच्या, भव्यतेच्या, कीर्तीच्या सीमा आमच्या डबक्यापुरत्याच सीमित; जगाच्या घोडदौडीकडे आमचं लक्षच नाही! आपल्या समाजव्यवस्थेत, धर्मात, संस्कृतीत दोष आहेत; पण जुन्या थरातल्या टिकाऊ, मजबूत सांगाड्यावर नवा थर लावून ते दोष आम्ही हरणार नाही. त्याऐवजी नव्या धर्माचा, नव्या संस्कृतीचा, नव्या मन्वंतराचा ओनामा करू पाहणार! पण अशी वेगळी चूल मांडल्याने आधीच उभ्या-आडव्या छेदांनी विरका झालेला समाज अजून विरू लागेल त्याचं काय? चित्रात एकमेकांना लोळवू, झगटू, लाथाडू पाहणारी माणसं म्हणजे या अंतःसंघर्षाचं चित्रण. या सर्वांच्या हातात मद्याचे पेले आहेत - डोळ्यांवर आलेल्या धुंदीचं, झापडबंदपणाचं, विवेकशून्यतेचं रूपक म्हणून. उजवीकडच्या भागात वाघिणीमागे दोघे विद्वान हातांतले पेले मस्तकी चढवून, डोक्यावरल्या विद्वत्तेच्या पगड्यांची झोळी करून वाघिणीचं ज्ञानामृत मिळवण्याकरता तिष्ठतायत. नीरक्षीरविवेक गहाण टाकून वाघिणीच्या पादारविंदांकडे लय लावून बसलेल्या या विद्वानांना तिच्या कणा वाकवून उभं राहण्याच्या अवस्थेचा बोध दुर्दैवाने होत नाहीये. आपल्या पिंडाला पोषक तेवढीच सत्त्वं वाघिणीकडून उचलण्याची अक्कलहुशारी हरपलेल्या आपल्यातल्या परधार्जिणेपणाचं, भाषिक गुलामीचं हे रूपक. तिथून पलीकडे समांतर रेषेत दोघेजण तुंदावस्थेत हरवून सुस्तावलेत. खाली मध्यभागी एकजण नार्सिससासारखा आरस्पानी जळात स्वतःची प्रतिमा निरखण्यात गुंगून गेलाय. फिल्मीच्या एखाद्या चौकटीसारख्या आरस्पानी जळात असलेली त्याची प्रतिमा.. त्याच्याच मध्यमवर्गीय, शहरी, सुखवस्तू गृहस्थाश्रमी आयुष्याची चौकट दाखवणारी, टीव्ही-चित्रपट-रेडिओ-जाहिरातींमधून त्याच्या मेंदूवर गिरवली जाणारी त्याचीच प्रतिमा - आत्ममग्न! या सर्वांच्या केंद्रस्थानी डोकं वाळूत पुरून घेतलेला शहामृग - भवतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, स्वतःचा पिंड-तोल-प्रकृती बिघडू न देता आगामी संकटं-स्थित्यंतरं पचवण्यासाठी आपल्यातले दोष परिहरण्याऐवजी, त्यापासून तोंड फिरवून घेणार्‍या आत्मघातकी निष्क्रियतेचं हे रूपक.

भाषिक समाज म्हणून आपलं वर्तमान असं असतानाही, आपलं मन भूतकाळ विसरू शकत नाही. शिवजयंती, महाराष्ट्र दिन वगैरे नैमित्तिक सणासुदीच्या दिवशी निष्प्रभ ठरत असलेल्या मराठ्यांच्या कंठांतून पूर्वजांच्या पराक्रमाच्या अभिमानाने 'जय भवानी, जय शिवाजी' असे उद्घोष उमटतात. निष्प्रभतेच्या जाणिवेमुळे खंतावणारं मराठी मन दिशा मिळण्याच्या आशेनं 'राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या' असं साकडं घालतं. पण स्वहित-स्वजनहित न ओळखणार्‍या, आत्ममग्नतेच्या कैफात झिंगलेल्या यादवांना मराठ्यांचा कृष्ण कसा दिशा दाखवणार?! तरणोपाय एकच.. आपण आपल्यालाच बजावावं:

दुष्ट संहारिले मागें| ऐसे उदंड ऐकतो|
परंतु रोकडे कांही| मूळ सामर्थे दाखवी||

- pha